अमृत हे विष की जाहले ………. अमृतवेलीमध्ये दडलेल्या विषवल्लीची कथा !

Submitted by SureshShinde on 1 April, 2014 - 10:27

image_4.jpg

"डॉक्टर, तुम्हाला फुलपाखरे आवडतात का? आमचे गाव सुंदर फुलपाखरांसाठी प्रसिद्ध आहे. फुलपाखरांचा राजा समजले जाणारे 'मोनार्क' जातीचे फुलपाखरू पाहण्यासाठी अनेक निसर्गप्रेमी आमच्या गावास नेहेमी भेट देत असतात. आपणही आमच्या 'फार्म-हाऊस'ला भेट देवून तेथील निसर्ग सौंदर्याचा व आमच्या फळबागेचा आस्वाद घ्यावा अशी माझी विनंती आहे."

फुलपाखरू भेटीचे निमंत्रण देणाऱ्या ह्या तरुण पेशंटची पहिली भेट मला चांगलीच आठवते. सुमारे एक वर्षापूर्वी परागचे बाबा त्याला घेवून माझ्या क्लिनिकमध्ये आले होते. तेंव्हा परागने माकड-टोपी घातल्यामुळे त्याचे डोके व कान संपूर्ण झाकले होते. एखादा पेशंट पाहताक्षणीच त्याला काय आजार असावा या विषयी तर्क बांधण्याचा मोह आम्हा डॉक्टरांना कधीच टाळता येत नाही. माझेही तसेच झाले. परागच्या टोपीकडे पाहून याला नक्कीच ताप येत असावा आणि तो हि नक्कीच टायफोईडचा ताप असावा अशी मी मनात नक्की खुणगाठ बांधली होती. पण परागच्या बाबतीत माझे 'प्रथम-दर्शनीचे निदान' पूर्ण चुकले होते कारण परागच्या टोपिमागे दडला होता केसांचा एक विचित्र आजार - 'अलोपेशिया एरियाटा'!
मराठीमध्ये या आजाराला चाई लागणे असे म्हणतात. परागच्या डोक्याच्या केसांना अनेक ठिकाणी अशी चाई लागली होती आणि उरलेले केस त्याने खूपच लहान कापल्यामुळे त्याच्या डोक्यावर जणू जगाचा नकाशाच काढल्यासारखे दिसत होते. हे झाकण्यासाठी परागला टोपी घालणे आवश्यकच होते. अनेक त्वचारोगतज्ञ, वैद्य, होमिओपाथ इत्त्यादींचा सल्ला व अनेकविध औषधे धेवूनदेखील परागच्या केसांमध्ये काडीइतकाही फरक पडला नव्हता. माझ्याकडून बरा होवून गेलेल्या एका पेशंटच्या शिफारशीवरून त्याचे बाबा त्याला माझ्याकडे तपासण्यासाठी घेवून आले होते. वैद्यकीय व्यवसायामधील नितीमत्तेनुसार आम्हा डॉक्टरांना आपली स्वतःची जाहिरात करता येत नाही. पण डॉक्टरांकडून बरे होवून गेलेले अनेक पेशंट इतरांना 'हेच डॉक्टर कसे चांगले आहेत' असा आग्रही सल्ला देत असतात व आमची जाहिरात करीत असतात. ही आम्हा डॉक्टरांची जणू जिवंत जाहिरातच असते !

परागचा वैद्यकीय इतिहास समजावून घेवून व त्याच्या लक्षणांचा अभ्यास करून त्याच्या आजाराचे काही कारण सापडते कि काय याचा मी शोध घ्यावा अशी त्याच्या बाबांची इच्चया होती. परागचे कुटुंब सुशिक्षित व इंटरनेटप्रेमी होते. त्यांच्या इच्छेनुसार परागला हॉस्पिटलमध्ये दाखल करून सर्व तपासण्या करण्याचे ठरले.

केसांच्या आजारांविषयी माहिती घेताना केसांचे शरीरशास्त्र समजावून घेणे महत्वाचे आहे. आपल्या डोक्यावर अंदाजे एक हजार कोटी केस असतात. प्रत्येक केसाचे मूळ हे त्वचेमध्ये असते. केस हा प्रथिनापासून बनलेला असतो. केशमूल सतत केस तयार करीत असते. केसांची लांबी ठरवण्याचे काम हार्मोनेस करतात. केसांची ठराविक वाढ झाल्यानंतर तो केस गळून जातो व त्याचे मूळ काहीकाळ विश्रांती घेते. हे मूळ विश्रांतीनंतर पुन्हा केस उत्पादनाचे काम सुरु करते. आपल्या डोक्यावरील सुमारे दहा टक्के केशमूले विश्रांती घेत असतात पण ती विखुरलेली असल्यामुळे लक्ष्यात येत नाहीत. परागच्या डोक्यावरील चाई लागलेल्या ठिकाणाची सर्व केशमूले एकसाथ विश्रांती अवस्थेमध्ये तरी गेली होती किंवा काही आजारामुळे ती संपूर्ण नष्ट झाली होती.

परागच्या केसांच्या आजाराची अनेक कारणे संभवत होती. पचनसंस्थेचे आजार, जंत, बुरशीचा संसर्ग, किडलेले दात, शरीरामध्ये कोठेतरी सेप्टिक फोकस, पांडुरोग, दृष्टीदोष आणि याचबरोबर केशमूले संपूर्ण नष्ट करू शकणारया अश्या ' केशमूलांना घातक एंटीबोडीज ' अश्या अनेक कारणांचा आम्ही कसोशीने शोध घेतला पण त्यातून काहीही निष्पन्न झाले नाही. आम्ही इंटरनेटवर देखील खूप शोध घेतला. पण कोणताही नवीन धागा अथवा नवा शोध-निबंध मिळाला नाही. अश्या काही रुग्णांना आहारातील गव्हामध्ये असलेल्या ग्लुटेन नावाच्या प्रथिनाची एलर्जी निर्माण होवून असा आजार होवू शकतो. त्यामुळे आहारामध्ये गव्हाचे पदार्थ टाळण्याचा व प्रथिनयुक्त आहार घेण्याचा सल्ला देवून परागला मी घरी पाठविले होते. त्यानंतर काही दिवस तो नियमितपणे माझ्या क्लिनिकमध्ये येत असे. उत्तम आहारामुळे त्याची तब्बेत तर सुधारलीच पण डोक्यावर थोडे थोडे केसही उगवू लागले होते. काही दिवसांतच तो येण्याचे बंद झाला व मीही माझ्या कामामुळे परागला विसरून गेलो.

"सर, चिंतामणी हॉस्पिटलमधून डॉक्टर ऋतुपर्ण सरांचा फोन आहे." माझ्या क्लिनिकची स्वागतिका बोलत होती. माझा मुलगा ऋतुपर्ण हा हृदयविकार तज्ञ आहे. माझा मोबाईल मी त्या दिवशी नेमका घरीच विसरलो होतो.
"हलो ऋतू , काय प्रॉब्लेम?"
"बाबा, मी एका विचित्र केसमध्ये अडकलोय. वीस वर्षांचा एक मुलगा येथे दाखल झाला आहे. सकाळपासून त्याला जुलाब-उलट्या होत आहेत, पोटात दुखत आहे."
"अरे मग त्यात विचित्र ते काय?"
"बाबा, त्याचे बी पी ठीक आहे पण पल्स फक्त पस्तीसच आहे."
"मोस्ट सर्प्रयासिंग !"
आपल्या हृदयाचे ठोके दर मिनिटास साधारणपणे बहात्तर पडत असतात पण ह्या तरुणाचे ठोके फक्त पस्तीसच पडत होते.
"बाबा, मी त्याचा ई. सी. जी. काढला आहे व त्यात 'कम्प्लीट हार्ट ब्लॉक' दिसतो आहे."
आपले हृदय हा एक विस्मयकारक अवयव आहे. गर्भावस्थेमध्ये पाचव्या आठवड्यामध्ये हृदयाचे स्पंदन सुरु झालेले सोनोग्राफी यंत्रामध्ये स्पष्ट दिसू लागते. ही स्पंदनक्रिया चालू असेपर्यंत मनुष्य जिवंत असतो. हृदयाची गती आपल्या शरीराच्या गरजेनुसार मेंदूकडून नियंत्रित केली जाते. हृदयाची गती प्राण्याच्या शरीरमानाच्या व्यस्त प्रमाणामध्ये असते. हत्तीचे ठोके दर मिनिटास फक्त वीस तर फुलपाखराचे वीस हजार असतात ! हृदयाचे स्पंदन हृदयातील 'पेसमेकर' नावाच्या पेशींमधून सुरु होत असते. येथे निर्माण झालेला विद्युत संदेश हृदयाच्या चारही कप्प्यांच्या स्नायुन्पर्यंत पोहोन्चवण्याचे काम काही विद्युतवाहक तंतुन्द्वारे केले जाते. या तंतुंच्या कार्यामध्ये काही कारणामुळे अडथळा आल्यामुळे 'कम्प्लीट हार्ट ब्लॉक' हा आजार निर्माण होतो.अश्या संकटप्रसंगी खरे तर हृदयक्रिया बंदच पडणार पण ऐनवेळी हृदयाच्या स्नायूंमध्ये नवीन पेसमेकर क्रिया सुरु होते व जीव वाचतो. पण हा संकटकालीन पेसमेकर खूप संथ, स्लो, असतो. इतक्या संथ हृदयगती मध्ये शरीराचे कार्य चालणे मुश्कील असते. यावर उपाय म्हणून शरीराच्या बाहेरून हृदयाला विद्युत झटके देवून हृदयक्रिया कृत्रीमरीतीने वाढविली जाते. जर काही दिवसात हृदयातील वाहक तंतू पुन्हा काम करू लागले नाही तर असे यंत्र कायमचे बसवावे लागते. ही सुविधा काही ठराविक रूग्णालयामध्येच उपलब्ध असते.
"बाबा, तो मुलगा तुमचा जुना पेशंट असल्याचे त्याचे बाबा मला सांगत होते. त्यांची त्याला तुमच्या देखरेखीखाली पूना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याची इच्छा आहे. त्याप्रमाणे मी त्याला शिफ्ट करण्याच्या सूचना देत आहे. बहुतेक व्ह्यायरस संसर्गामुळे त्याच्या हृदयाला सूज आलेली दिसत आहे पण बी पी स्टेबल असल्यामुळे सध्यातरी पेसमेकरची आवश्यकता वाटत नाही. पण आय. सी. यु.मध्ये ठेवलेले उत्तम! "
"ठीक आहे. मी इकडचे काम आटोपून त्याला तपासण्यासाठी नक्की जाईन. बाय!"
फोन ठेवून मी अश्या प्रकारचा रुग्ण येत असल्याची पूर्वसूचना पूना हॉस्पिटलला दिली आणि माझ्या पुढच्या कामाला लागलो.
संध्याकाळी पूना हॉस्पिटलच्या दारातच परागचे बाबा मला भेटले.
"तुम्ही येथे कसे?"
"अहो सर, आपल्या परागलाच येथे दाखल केले आहे. ऋतू सरांनी आपल्याला फोन केला होता तो परागसाठीच!"
"हो का?" असे झटकन उत्तर देवून मी आय.सी.यु.चे दार उधडून लगबगीने आत गेलो.
समोरच्याच बेडवर पराग होता. त्याच्या छातीवर जोडलेला मॉनिटर हृदयाचे ठोके दाखवीत होता 'चाळीस' व बी पी होते '९०/६०' ! आनंदाची गोष्ट अशी कि ओक्सिजेनचे प्रमाण मात्र १००% होते! एकंदरीत काय तर हृदयाचा स्लो रेट सोडल्यास परागचे बाकी व्हायटलस स्टेबल होते. ई.सी.जी.मात्र हार्ट ब्लॉक दाखवीत होता.
"सर, आम्ही टेम्पररी पेसमेकरची सर्व तयारी रेडी ठेवली आहे. पण लागेल असे दिसत नाही. आपण दिलेल्या ओर्डरप्रमाणे एट्रोपिन इंजेक्शन दर चार तासांनी व अलुपेंटची ड्रीप चालू आहे. आयव्ही फ्लुइडस आणि अन्तीबायोटिक सुद्धा देत आहोत. आणखी काही?" वार्डच्या डॉक्टरांनी विचारले. "बाकी काही नाही पण तुमचे व्यवस्थित लक्ष्य असू देत. रात्री दर दोन तासांनी नोट्स लिहा आणि सकाळी सहा वाजता मला प्रोग्रेस कळवा. मला हलगर्जीपणा मुळीच खपत नाही.p मी मध्यरात्रीदेखील अचानक राऊंडसाठी येवू शकतो हे लक्ष्यात असू द्या." ड्युटीवरील डॉक्टर नवे असल्यामुळे त्यांना कल्पना देणे आवश्यक होते. परागला व्यवस्थितपणे तपासून व त्याच्या केसपेपरवर माझी निरीक्षणे नोंदवून मी बाहेर पडलो. परागचे बाबा बाहेरच माझी वाट पाहत उभे होते.
" सर, आता परागची तब्बेत कशी आहे? 'औट ऑफ डेंजर' आहे का?" त्यांच्या आवाजामधील कंप मला जाणवला.
"हे पहा, पराग स्टेबल आहे. घाबरू नका. पण अजून धोका टळलेला नाही. आम्ही योग्य प्रकारे काळजी घेत आहोत. पण तो निश्चित बरा होईल असे मला वाटते. पण त्याच्या या आजाराचे कारण आम्हाला अजूनही समजलेले नाही. जंतू संसर्गा मुळेच हृदयाला सूज आलेली दिसते. दुसरे काही औषध वगैरे घेत होता काय?"
परागच्या अलोपेशियाची आठवण ताजी असल्यामुळे मी विचारले. माझ्या विचारण्याचा रोख बहुतेक त्यांच्या लक्ष्यात आला असावा. माझा हात आपल्या हातात घेवून ते म्हणाले," सर, तुमच्या प्रश्नाचा संदर्भ मी समजू शकतो. पण आताशा परागने त्याच्या केसांची काळजी करणे बंद केले होते. एक गोष्ट मात्र आपणांस सांगितली पाहिजे. पराग गेले सहा महिने रोज सकाळी गुळवेलीचा काढा घेत असतो. गेले सहा महिने तो व त्याची आई काढा पीत असतात. गुळवेल ही अतिशय औषधी असून ती रोग-प्रतिकारशक्ती वाढविते. क्यान्सरसारख्या दुर्धर आजारातही तिचा चांगला उपयोग होतो असे वैद्यांचे सांगणे आहे. माझ्या पत्नीला गेली पाच वर्षे क्यांसरचा आजार असल्यामुळे ती तर गेली पाच वर्षे नित्यनेमाने काढा पीत असते. तिच्यासाठी माझ्या फार्म हाऊसवर मी गुळवेलीची खास लागवड केली आहे. आज तिने व परागने सकाळीच काढा घेतला होता. मात्र आजचा काढा थोडा जास्तच काळा आणि जास्तच कडू लागत असल्याची तक्रार दोघांनी केल्याचे मला आत्ता आठवतेय."
परागच्या बाबांनी दिलेली माहितीची मी नोंद तर घेतली पण ती मला फारशी महत्त्वाची वाटली नाही. कारण जर त्या काढ्याने काही व्हायचे असते तर दोघांनाही त्रास झाला असता व परागची आई तर तब्बल पाच वर्षे काढा पीत होती. म्हणूनच मी ही 'काढ्याची हिस्टरी' परागच्या आजाराच्या कारणांच्या यादीमध्ये खालच्या क्रमांकावर ढकलून दिली. परागच्या बाबांचा हात माझ्या हातात घेवून व पराग नक्कीच बरा होईल याची ग्वाही देवून मी हॉस्पिटलमधून बाहेर पडलो.
सकाळी सहा वाजताच जाग आली ती फोनच्या रिंगमुळे! आयसीयू डॉक्टरांचा फोन होता. परागची तब्बेत 'जैसे थे' च होती. ६०० मी.ली. युरीन झाली होती. म्हणजेच जरी बिपी थोडे कमी असूनही त्याच्या मूत्रपिंडाचे काम समाधानकारक होते. हार्ट ब्लॉक मात्र कमी होण्याचे लक्षण न्हवते.
डॉ. ऋतूंची रावून्डला निघण्याची तयारी चालू होती. ऋतू सर माझ्यापेक्षा खूपच आधी घराबाहेर पडत असल्यामुळे माझ्या आधीच ते परागला तपासून मला फोन करणार असे आमचे ठरले होते. सकाळचे सुमारे आठ वाजले असतील जेव्हा अचानक परागच्या बाबांचा फोन आला. फोनवरील त्यांच्या आवाजावरून ते अतिशय घाबरलेले वाटत होते.
"सर, काही तरी विचित्र घडते आहे. माझ्या पत्नीलाही परागसारखाच त्रास होतो आहे. खरे म्हणजे तिला कालपासूनच बरे वाटत नव्हते पण परागच्या काळजीमुळे तिने अंगावर काढले. आज जेंव्हा त्रास अगदीच असह्य झाला तेंव्हा तिने मला सांगितले.हा सर्व फूड पॉयझनिंगचा प्रकार तर नसेल ना?"
"हे पहा, येथे आपण फोनवर चर्चा करीत बसण्यापेक्षा त्यांना लवकरात लवकर हॉस्पिटलात घेवून जाणे महत्वाचे आहे.
डॉ.ऋतू आत्ता तेथेच आहेत. तुम्ही हॉस्पिटलमध्ये पोहोचल्यानंतर ऋतू सरांना मोबईल करा म्हणजे ते पुढील काळजी घेतील. तुम्ही फक्त लवकर पोहोंचा."
सुमारे अर्ध्या तासानंतर ऋतूसरांचा फोन आला. त्यांचा आवाज अतिशय उत्तेजित वाटत होता.
"बाबा, ग्रेट सरप्राईज! परागच्या आईलाही कम्प्लीट हार्ट ब्लॉक झाला आहे. पण, शी इज ब्याड, रीअल्ली ब्याड! तिचे बिपी लागत नाहीये आणि हृदयक्रिया खूपच अनियमित आहे. खूप ठोके चुकताहेत! आमच्या प्रयत्नांची पराकाष्ठा चालू आहे पण मला शंका आहे ... शी इज नॉट लायीकली तो मेक इट!"
हे ऐकून मी तर पूर्ण हादरलो. पराग आणि त्याच्या बाबांचे चेहेरे माझ्या डोळ्यासमोर उभे राहिले. मी स्वतःला सावरले. चि. ऋतूचा फोन चालूच होता.
"बाबा, यू नो व्हाट, मला या दोघांच्या ईसीजीमध्ये जे चेंजेस दिसताहेत त्यावरून त्यांना 'डीजीटालीस टोक्सीसीटी' झालेली असावी असा दाट संशय आहे. मी असाच पेशंट माझ्या शिक्षण काळामध्ये ससून हॉस्पिटलमध्ये पाहिलेला. पण त्याने कन्हेराच्या बिया खाल्या होत्या. तुम्हाला वेळ असेल तर जरा नेटवर पहा काही नवीन सापडतंय का ते आणि मला कळवा. एनी वे, आय मस्ट अटेंड हर नाऊ. कीप इन टच, बाय!"

या सर्व घटना इतक्या वेगाने घडत होत्या कि मेंदू सुन्न झाला होता. मी इतर कामे बाजूला ठेवून कॉम्पुटरसमोर बसलो आणि नेटवर सर्च घेवू लागलो. ऋतूच्या म्हणण्याप्रमाणे या दोघांना खरोखरच कण्हेर पोयझानिंग तर झाले नसेल ना? त्यांना कोणी विषप्रयोग तर केला नसेल ना? तसे असेल तर मग मात्र गंभीर प्रसंग होता. कण्हेरामध्ये कार्डीयाक ग्लायकोसायीड नावाचे रसायन असते हे मला मेडिकल कॉलेजपासूनच माहित होते. त्यापासूनच डीजीटालीस नावाचे औषध तयार केले जाते. याचा उपयोग हृदयविकारामध्ये गेली शंभर वर्षे केला जात आहे. पण त्या औषधाची मात्रा चुकून जास्त झाल्यास या औषधाचे विषारी परिणाम दिसू लागतात. नेमके असेच परिणाम या दोघांना दिसत असावेत का? कण्हेर ही वनस्पती म्हणजे एक छोटेसे झाड जे आपणाला आपल्या आजूबाजूच्या परिसरामध्ये नेहेमीच दिसते. कुंपणासाठी हे झाड मुद्दाम लावले जाते. गाय,बकऱ्या इत्यादी प्राणी या झाडापासून दूर असतात. बहुतेक त्यांना या झाडाच्या विषारी गुणधर्माची माहिती असावी. या झाडाची पाने तोडली असता देठातून एक प्रकारचा पांढरा चीक बाहेर येतो. नेटवर आणखीही धक्कादायक आणि मनोरंजक अशी माहिती मिळाली. श्रीलंकेमध्ये ह्या वनस्पतीचा उपयोग आत्महत्या करण्यासाठी केला जातो. दरवर्षी सुमारे दोन हजार लोक कन्हेराच्या बिया अथवा पाने खावून हॉस्पिटलमध्ये दाखल होतात.या वनस्पतीमध्ये असलेल्या विषाला प्रतिविष अश्या अन्तीबोडीस परदेशामध्ये तयार केल्या आहेत. या प्रतीविषाचा उपयोग करून अनेक प्राण वाचविले जातात. पण हे औषध अतिशय महाग आहे. श्रीलंका सरकारने आपल्या नागरिकांसाठी हे औषध मोफत उपलब्ध करून दिले आहे.
घाईघाईने तयार मी हॉस्पिटलमध्ये जाण्यासाठी निघालो. जाताजाता हॉस्पिटलच्या बाहेरील केमिस्टला 'डीजीबाईंड' या औषधाची चौकशी करावयास सांगितली. मी हॉस्पिटलमध्ये पोहोन्चेपर्यंत केमिस्ट रोषण माझी वाट पाहत दरवाज्यामाध्येच उभा होता.म
"सर, डीजीबाईंड पुण्यात किंवा मुंबईमध्येदेखील उपलब्ध नाही. पण एक वाईट बातमी आहे."
माझ्या मनात पाल चुकचुकली. "तुमच्या पेशंटला कार्डियाक अरेस्ट झाल्याचे मला आत्ताच कळले आहे. ऋतू सर तेथेच आहेत. क्यजुअल्टीमधील सर्व टीम जोरदार प्रयत्न करते आहे. पण शेवटी परमेश्वराची इच्छा! "
रोशनची पुढील बडबड न ऐकताच मी क्यजुअल्टी कडे वळलो. आतील चित्र काही समाधानकारक नव्हते.
"बाबा, शी ह्यास एंरेस्टेड फिफ्टीन मिनिट्स एगो. शी इस जस्ट नॉट रीस्पोनडिंग. मला वाटते कि आता थांबले पाहिजे."
मी गेल्या अर्ध्या तासातील ईसीजीन्चा, ट्रीटमेंटचा आढावा घेतला.
"सिस्टर, नातेवाईकांना आत बोलवा, प्लीज!"
हि वाईट बातमी नातेवाईकांना सांगण्याचे कठीण काम आता मला करावे लागणार होते. परागचे वडील आत आले. त्यांच्या चेहेऱ्यावर काळजी आणि भीतीचे सावट स्पष्ट दिसत होते. त्यांचे हात माझ्या हातात घेवून मी म्हणालो," वाईट बातमी आहे. मन घट्ट करून समोरील परिस्थितीला धीराने तोंड द्यावयाला पाहिजे. आम्ही खूप प्रयत्न केले पण .. वुई ह्याव लोस्ट हर. शी इज नो मोर! आय एम सौरी .. रिअली व्हेरी सौरी."
परागचे बाबा एक शब्दही न बोलता काही क्षण स्तब्ध झाले. दुःखाचा आवेग सावरून ते मला म्हणाले," सर, माझ्या पत्नीचा शेवट मी पाच वर्षांपूर्वीच पहिला आहे. हे तर तिचे बोनस आयुष्य होते. पण मला आता काळजी आहे ती परागची! त्याला हा धक्का सहन होईल का? "
"हे पहा, परागची तब्बेत आता स्थिर आहे. पण हि बातमी सध्या तरी त्याला आपण सांगायला नको. योग्य वेळी मीच त्याला सांगेन. आता आपल्याला पुढील व्यवस्था करावी लागेल. बाईंचा मृत्यू अनैसर्गिक कारणांमुळे झाला असल्यामुळे आम्ही आपल्याला सर्टीफिकेट देवू शकणार नाही. हॉस्पिटलने एव्हांना पोलिसांना कळविले असेल. मेडिको-लिगल केस मध्ये पोस्टमोर्टेम केल्या नंतरच डेथ सर्टीफिकेट मिळेल."
परागचे बाबा अतिशय धीराचे! त्यांनी स्वतःला तर सावरलेच परन्तु इतर नातेवाईकांनाही धीर दिला.
एका नातेवाईकास पराग जवळ थांबण्यास सांगून बाकी सर्वजण पुढील कार्यवाहीस लागले.
पुढील तीन दिवस भरभर निघून गेले. परागची तब्बेत आता चांगलीच सुधारली होती. त्याचा हार्ट ब्लॉकहि आता रीझोल्व्ह झाला होता. त्याच्या रक्तामध्ये डीजीटालीस या औषधाचे अंश आढळल्याचा रिपोर्ट हि आला होता. आमचे निदान योग्य असल्याची हि जणू पावतीच होती. परागची हि केस हॉस्पिटलमध्ये चर्चेचा विषय झाली होती. पुढच्याच दिवशी मी हळुवारपणे आईच्या दुःखद निधनाची बातमी परागला सांगितली. दुःखद समाचार कसा सांगावा हे कोणत्याही पुस्तकात शिकवत नाहीत, हि कला अनुभवानेच आत्मसात करावी लागते. एकवेळ एमबीबीएस पदवी मिळविणे सोपे पण उत्तम डॉक्टर होणे याहून खूप कठीण!

या दोघा मायलेकांना अशी विषबाधा कशी झाली असावी हा विचार माझ्या डोक्यातून काहीकेल्या जात नव्हता. परागच्या बाबांना खूपच खोदून खोदून विचारल्यानंतर बरीच माहिती पुढे आली. दर आठवड्यातून एकदा त्यांच्या शेतावरून त्या गुळवेलीचे देठ कापून आणून ठेवीत असत व रोज सकाळी त्यातील काही देठ वापरून त्याचा ताजा काढा तयार करून रोज सकाळी ते दोघे तो नित्यनेमाने पीत असत. दुर्घटनेच्या दिवशीचा काढा नेहेमीपेक्षा जास्त काळसर व कडू होता असे दोघांनाही वाटले होते.
"सर, मी त्या दिवशी ज्या देठांचा वापर केला होता ते जपून ठेवले होते व तेच तुम्हाला दाखविण्यासाठी घेवून आलो आहे. नीट पाहिल्यानंतर या देठांमध्ये एक दुसरा काळसर दिसणारा देठ दिसतो आहे. कदाचित तोच विषारी असण्याची शक्यता आहे." परागचे बाबा माझ्या मनातले विचारच जणू बोलत होते. मी त्यांच्या हातातून ते देठ घेवून त्याचे जवळून निरीक्षण केले. एक देठ नक्कीच वेगळा होता. मी ते देठ माझ्या ताब्यात घेवून हॉस्पिटलमधून बाहेर पडलो.
त्या दिवशी दुपारी घरी जेवतानादेखील मनात हेच विचार होते. एखाद्या गुंतागुंतीच्या पेशंटच्या विषयी जेव्हा काही अडचण येत असते तेंव्हा सौ. माधुरीबरोबर शेअर केल्याने नेहमीच काही तरी नवीन क्लू मिळत असे. या वेळीही तिने माझी निराशा केली नाही.
"तुम्हाला जर वनस्पतीविषयी माहिती हवी असेल तर मग श्री. श्रीकांत इंगळहल्लीकरांना का नाही विचारत? त्यांचे सकाळमधील लेख मी अनेक वेळा वाचले आहेत."
"पण त्यांचा पत्ता कोठे मिळणार ? सकाळमध्ये विचारावे कां?"
"अहो, मला चांगले आठवते कि ते आपल्या न्युरोलोजीस्ट सुधीर कोठारींचे मित्र आहेत. मागे एकदा त्यांना साप चावल्यानंतर कोठारी सरांनीच त्यांना ट्रीट केल्याची गोष्ट मला वाचल्याचे स्मरते आहे. त्यांनाच फोन करून पहा नं ?"
पत्नी वाक्यं प्रमाणं!
फोन ए फ्रेंड!
सुधीर कोठारी म्हणजे माझे निकटचे व्यावसायिक स्नेही आणि खर्या अर्थाने माझी लाईफ लाईनच! अनेक गुंतागुंतीच्या पेशंट बाबतीत सरांचा सल्ला खूपवेळा उपयोगी पडतो. मी तातडीने डॉक्टर कोठारींना फोन लावला. त्यांनी पुढच्याच मिनिटात श्रीकांतरावांचा फोन नंबर मला एसेमेस केला.
पुढच्याच मिनिटात मी श्रीकांतरावांशी बोलत होतो.
त्यांच्या बोलण्यातून झाडे-झुडपे,वेली,पाने-फुले आणि एकंदरीत निसर्गाविषयी अथांग प्रेम असलेल्या माणसाशी बोलत असल्याची जाणीव झाली. दुसऱ्या दिवशी सकाळीच त्यांच्या घरी जाऊन धडकलो. घर कसले - जणू एखादे बोट्यानिकल गार्डनच! वृक्ष-वल्लींशी सोयरिक सांगणारे श्रीकांतराव म्हणजे पुलंच्या वल्लीन्पैकी एक वल्लीच जणू! सह्याद्रीच्या कुशीतील पानांफुलान्विषयी त्यांनी प्रकाशित केलेली अनेक पुस्तके पाहून मी थक्कच झालो. माझ्या पेशंटची कहाणी ऐकून झाल्यानंतर त्यांनी मी बरोबर नेलेल्या देठांचा बारकायीने अभ्यास केला.
"हे पहा डॉक्टर, या देठांना पाने नाहीयेत. त्यामुळे जास्त माहिती कळणे कठीण आहे. आपल्याला प्रत्यक्ष जागेवर जावूनच पाहावे लागेल. तुम्हाला शक्य असेल तर मी तुमच्याबरोबर त्यांच्या शेतघरावर यायला तयार आहे. "

एक आठवड्यानंतर व परागच्या आईचे सर्व विधी उरकल्यानंतर परागच्या शेतावर जायचे ठरले.

तोपर्यंत हे डीजीट्यालीस त्या काढ्यात कसे आले याविषयी माझे विचार व नेट सर्चिंग चालूच होते. शोधताना असे दिसले की इतर अनेक वनस्पतींमध्ये देखील डीजीट्यालीस सदृश्श ग्लायको सायीड्स असतात आणि त्यातील काही वनस्पती ह्या क्लाय्म्बर्स म्हणजेच झाडांच्या खोडावर चढणाऱ्या वेली असतात. या मिल्कवीड्स किंवा दूध वेलींचे वैशिष्ठ्य म्हणजे यांची पाने अथवा काड्या तोडल्या असता त्यातून पांढरा चीक निघतो. हा चीक आणि तसे पहिले तर ही संपूर्ण वनस्पतीच विषारी असते. जनावरे ह्या वनस्पतींना तोंडही लावीत नाहीत. आपल्या कडे सर्वत्र आढळणारी अशीच एक विषारी वेल म्हणजे - बेशरम वेल! या वेलीची पाने खावून दगावलेल्या अनेक केसेस मला आढळल्या. युरेका ! युरेका !! वेल विषारी असू शकते हे तर समजले पण आता तो नेमका कोणता वेल आणि नेमके त्यात विषारी गुणधर्म आहेत काय हे शोधणे बाकी होते. मी खूपच उत्तेजित झालो होतो आणि परागच्या शेतावर जाण्याच्या दिवसाची उत्सुकतेने वाट पाहत होतो.
अखेर तो दिवस उडाला. त्या दिवशी सकाळीच श्रीकांतरावांना बरोबर घेवून मी, पराग व त्याचे बाबा जेजुरी जवळील त्यांच्या शेतघराकडे निघालो. वाटेमध्ये अनेक ठिकाणी गाडी थांबवून अनेक गुणकारी वनस्पतींची माहिती श्रीकांतराव सांगत होते तर त्यांचा वैद्यकीय उपयोग मी त्यांना सांगत होतो. हि सदाफुली क्यान्सरवर तर हि पुनर्नवा जलोदरासाठी उपयुक्त आहे. अतिजहाल विष देणारी एकोनाईट ही वनस्पती, होमिओपथीमध्ये औषध म्हणून वापरतात. लहानपणी वाचलेली अरेबियन नाईट्स मधली एक गोष्ट मला आठवली. एका फकीराजवळ असे एक जादूचे अंजन होते की जे डोळ्यांमध्ये घातल्यावर जगातले सर्व गुप्त खजिने दिसू लागत. श्रीकांतरावांनी असलेच काही ज्ञानाचे अंजन डोळ्यात घातले होते. आम्हाला 'सब धोडे बाराटक्के ' दिसणाऱ्या वृक्ष-वेलींमध्ये त्यांना औषधी वनस्पतींचा खजिनाच दिसत होता. इंजिनियर व प्रथितयश उद्योगपती श्रीकांतरावांच्या या प्रचंड व्यासंगासमोर क्षणभर मी नतमस्तक झालो. गप्पांच्या ओघामध्ये शेतावर केंव्हा पोहोचलो ते समजले देखील नाही.
शेतावर पोहोंचताच श्रीकांतरावांमधील संशोधक कामाला लागला. परागच्या घरासमोरच एक लिम्बाचे झाड होते. त्या झाडाभोवती गुलवेलीचा वेल चढला होता. श्रीकांतरावांचा अभ्यास चालूच होता. एन्व्हाना आजूबाजूचे अनेक गावकरी,लहान मोठे उत्सुकतेने भोवती जमा झाले होते. आतापर्यंत कावळीमुळे झालेल्या भयंकर प्रकाराची बातमी गावभर पसरली होती.
"डॉक्टर, मला येथे दोन वगवेगळ्या वेली दिसताहेत. गुळवेलीच्या खोडावर एका वेळी एकच पान फुटते पण हा जो दुसरा वेल आहे त्याला एका वेळी समोरासमोर अशी दोन पाने फुटताना दिसतात. ही नक्कीच वेगळी वनस्पती आहे. "
इतका वेल आमचे संभाषण ऐकणारा एक सुमारे दहा वर्षे वयाचा एक चुणचुणीत मुलगा झटकन पुढे आला.
"साहेब, हा तर कावळीचा वेल आमच्या गावात हा सर्वत्र फोफावला आहे. या वेलींमुळेच आमच्या गावात खूप फुलपाखरे फिरतात. फक्त ही फुलपाखरेच ही पाने खातात. इतर कोणताही प्राणी या कावळीला तोंडही लावत नाही. फार कडू असते ही. याला सुंदर गुलाबी फुले येतात. हा उंच उंच चढतो. त्याच्या टोकाला बैलाच्या शिंगासारखी फळे येतात त्यांना आम्ही 'बैल' च म्हणतो. ह फळे फुटल्यावर त्यातून पांढरा कापूस निघतो. त्याची उशी लई मऊमऊ असते."
श्रीकांतराव त्या मुलाकडे कौतुकाने पाहत होते.
"अगदी छान माहिती दिलीस! हा कापूस म्हणजे या वेलीच्या बिया आहेत व वाऱ्याने त्या दूरवर जाव्यात म्हणूनच निसर्गाने त्या बियांना कापसासारखे पंख दिले आहेत. खरे म्हणजे या वनस्पतीमधील हे विष म्हणजे पाला खाणाऱ्या जनावरांपासून बचाव करण्यासाठी दिलेले शस्त्रच आहे. फुलपाखरे या वेलींचा वंश वाढविण्यासाठी, फुलांतील पराग वाहनासाठी मदत करीत असल्याने या विषाचा फुलपाखरांवर काही परिणाम होत नाही मात्र हे विष त्यांच्या शरीरामध्ये राहाते आणि एखाद्या पक्षाने जर हे फुलपाखरू खाल्ले तर त्याला विषबाधा होते व त्यामुळे फुलपाखरांचेही संरक्षण होते. या वेलाचे शास्त्रीय नाव आहे- 'क्रिप्टोस्टेजिया ग्रांडीफ्लोरा'. मराठीमध्ये तिला 'विलायती वाकुंडी' किंवा 'इंडियन रबर व्हाईन' असेही म्हणतात. "
आम्ही या वनस्पतीचे नमुने घेवून आणि परागच्या घरातील स्वादिष्ट जेवणाचा आस्वाद घेवून परतीच्या मार्गाला लागलो. श्रीकांतराव या वनस्पतींमधील निरनिराळ्या रसायनांचा अभ्यास करणाऱ्या मुंबईमधील त्यांच्या मित्राकडे हे नमुने पृथःकरणासाठी पाठविणार होते.
घरी पोहोन्चताक्षणीच मी पुन्हा नेटवर बसलो. आता त्या वेलाचे नाव माहित असल्यामुळे आणखीनच नवीन माहिती मिळत होती. ह्या वनस्पतीने ऑस्ट्रेलियामधील क़्विन्सलंड येथे हाहाःकार माजविला आहे. ही वेल इतकी फोफावली आहे की तिने उपयुक्त झाडांना अजगरासारखा विळखा घालून त्यांचा नाश केला आहे. तेथील सरकारने या वीडचा नायनाट करण्यासाठी राष्ट्रीय स्तरावर कार्यक्रम हाती घेतला आहे. ही वनस्पती खावून दगावलेल्या प्राण्यांच्या कथा खूपच आहेत. मिल्कवीड खावून अनेक माणसांना विषबाधा झालेली दिसते. पण क्रिप्टोस्टेजिया मुळे विषबाधा झालेल्या दोनच घटना सापडल्या व त्याही भारतामध्येच! दोन्हीमध्ये काढा करताना गुळवेल वापरला होता व त्यातच ह्या क्रिप्टोस्टेजियाची भेसळ झाली होती. दक्षिणेमध्ये बुद्धी वाढविण्यासाठीच्या काढ्यामध्ये गुळवेल वापरतात तर उत्तरेमध्ये थंडाईमध्ये गुळवेलचा प्रयोग करतात. काही दिवसांपूर्वी आपल्याकडे स्वाईन फ्लू ची साथ आली असतांना रामदेवबाबांच्या लोकांनी मिळेल तेथून गुळवेल जमा करून नेला होता. अशा वेळी जर त्यात क्रिप्टोस्टेजियाची भेसळ झाली तर काय होईल याची कल्पनाच करवत नाही. मोठ्या विश्वासाने घेतलेल्या औषधामध्येच जर भेसळ असेल तर सामान्य माणसाचे आरोग्यरूपी फुलपाखराचे भवितव्य देखील नक्कीच धोक्यात आल्याशिवाय राहणार नाही.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

बापरे ! लेख वाचता-वाचता अगदी हेच मनात येत होते की औषधांत अशी भेसळ झाली तर काय हाहा:कार उडेल.
बाकी लेख नेहेमीप्रमाणेच अतिशय सुरेख. >>> दुःखद समाचार कसा सांगावा हे कोणत्याही पुस्तकात शिकवत नाहीत, हि कला अनुभवानेच आत्मसात करावी लागते. <<< हे वाक्य फार आवडले Happy

आजच 'नवीन लेखन' वर क्लिक करताना विचार केला होता की बर्‍याच दिवसांत तुमचा लेख वाचला नाही Happy

तुमचे लेख वचून बर्‍याच वेळ भारावल्यासारखं होतं.... काय प्रतिसाद द्यावा ते कळतच नाही Happy
प्लिज लिहित रहा.

मित्रहो,
बर्याच दिवसात लिहिले नाही कारण मी सध्या अमेरिकेत आलो आहे. कालच वॉशिंगटन डीसी येथे माझ्या मुलाला अमेरिकन कॉलेज ऑफ कार्डीऑलोजी ची फेलोशिप मिळाल्याचा पदवीदान समारंभ होता व त्यासाठी आम्ही सर्व कुटुंबीय येथे आलो होतो. येथील हवामान फारच थंड, हिमवर्षाव झालेला. ती थंडी बाधून मला जाम सर्दी झाल्यामुळे हॉटेलच्या रूममध्येच झोपून आहे. त्यातच एक मायबोलीकराने मधुमेहासाठी मधुपर्णी म्हणजेच गुळवेल ही वनस्पती घेत असल्याचे लिहिले होते. म्हणून मी पूर्वी लिहिलेली ही कथा अपलोड करावी असे वाटले. हीच कथा पूर्वी 'घटीत अघटीत' या नावाने शांकली यांनी मायबोलीवर शब्दांकित केली होती. खरे पाहिले तर शांकली आणि शशांक पुरंदरे या जोडप्यामुळेच मला मायबोलीची माहिती झाली. त्यांच्यामुळे आपला सर्वांचा परिचय झाल्यामुळे मी त्यांचा ऋणी आहे.

तुम्ही अजूनही डीसीत आहात का, असाल तर सांगा मी संपर्कातून नंबर कळवते तुम्हाला भेटायला आवडेल.
तुमचे सगळे लेख मी नियमित वाचते प्रतिसाद देत नसले तरी.

डॉक्टर, नेहमीप्रमाणेच माहितीपूर्ण व उत्सुकता ताणणारा लेख. "वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे" हे खरंच आहे. पण ह्या 'सोयर्‍यांना' नीट विचारपूस न करता घरात घेतले तर काय होते याचंच जणू काही हे उदाहरण आहे. आपण उल्लेख केलेल्या श्रीकांत इंगळहल्लीकरांची पुस्तकं वाचनात आली नाहीत. मात्र हा लेख वाचून, डॉ. राणी बंग यांनी लिहीलेल्या "गोईण" ह्या पुस्तकाची आठवण झाली.

आपल्या चिरंजिवांचे हार्दिक अभिनंदन.

@रुनी पॉटर: माझा US मधील संपर्क क्र. ४०८८८६०५९६ आहे. मी येथे फक्त आजच आहे, मात्र us मध्ये आणखी तीन आठवडे आहे.

kite chhaan maahitee. aaNi Shankali che khaas aabhar, aamaalaa tumachee oLakh Karun dilayabaddal.

"डॉक्टर, मला येथे दोन वगवेगळ्या वेली दिसताहेत. गुल्वेलीच्या खोडावर एका वेली एकाच पण फुटते पण हा जो दुसरा वेल आहे त्याला एका वेळी समोरासमोर अशी दोन पाने फुटताना दिसतात. ही नक्कीच वेगळी वनस्पती आहे. "

हे फक्तं 'गुळवेलीच्या खोडावर एका वेळी एकच पान फुटते' असं एडिट करा.

तुमच्या मुलाचं अभिनंदन.

लेख आवडला .

नेहमीप्रमाणे दोनतीन वेळा वाचूनही समाधान होत नसल्याने परत नव्या माहितीसाठी आणखीन् एकदा वाचावे अशी ओढ डॉक्टरांच्या प्रसन्न लेखनशैलीमुळे निर्माण होते. "ऑपरेशन" मग ते कोणत्याही पातळी वा प्रकारचे असो, त्याविषयी सर्वसामान्य काहीसा दूरच राहू इच्छितो. पण असे लेख वाचल्यावर हा प्रकार किती सुरस आणि संशोधनात्मक असतो हे ध्यानात येते. श्री.श्रीकांत इंगळहल्लीकर यांच्यासारखी वनस्पतीशास्त्र विषयातील दर्दी आणि जाणकार संशोधक व्यक्तीदेखील प्रसंगी मित्र म्हणून लाभते हे तुमच्या या क्षेत्रातील अधिकाराची पावतीच होय.

मरूवनस्पती संदर्भात अपघाताने वाचन करत असताना विलायती वाकुंडीचा उल्लेख वाचल्याचे स्मरते. याच वनस्पतीला काकतुंडी असेही म्हटले जात असावे.

आपल्या चिरंजीवाना मिळालेल्या फेलोशिपच्या बातमीमुळे आम्हालाही खूप आनंद झाला. त्याना आमच्या शुभेच्छा जरूर कळवाव्यात.

तुमचं लिखाण इतकं सुंदर आहे कि आतापर्यंत दुर्बोध असलेले विषय , पटकन समजायला लागलेत.

हाही लेख अतिशय आवडला. गुंगून जायला होतं वाचताना!!

आश्चर्यचकित व्हायचि पाळी येते हे वाचल्यावर.
निदान कुठून कुठे पोहोचते........!
अचूक निदानाची प्रक्रिया अवघडच आहे ही.
छान माहितीपूर्ण ओघवता लेख. धन्यवाद.

डॉक्टर तुमच्या मुलाचे मनःपुर्वक अभिनंदन.

फारच छान लेख.

मी मात्र जरा टरकले हे वाचुन, हल्लीच रात्री गुळवेल पावडर पाण्याबरोबर घ्यायला सुरुवात केलीय. कारण असे विशेष नाही फक्त केस गळताहेत फार म्हणुन. आत्ताचे पाकीट संपले की (अजुन मी ठणठणीत आहे म्हणजे त्यात भेसळ नाहिय :डोमा:) पुढचे आणताना मात्र हा लेख डोक्यात असणार हे नक्की.

वाह डॉक्टर, खरे संशोधक.
तुमच्या मुलाचेही अभिनंदन. लिहित रहा.

डॉक्टर तुमच्या चिरन्जीवान्चे आणी तुम्हा सर्वान्चे हार्दिक अभिनन्दन. चिरन्जीवान्च्या यशात तुम्हा उभयतान्चा वाटा आहेच.:स्मित:

Pages