कविता एक प्रवास (३)

Submitted by अज्ञात on 21 June, 2008 - 07:00

कविता एक प्रवास (३)

भावना त्याच पण पैलू वेगळे. जसं प्रेम :- प्रयेसीचं, पत्नीचं, मुलीचं, मुलाचं, आई-वडिलांचं, आजी-आजोबांचं, नातवंडांचं......... इ. चाखल्याशिवाय चव, डुंबल्याशिवाय स्पर्श, जगल्याशिवाय अनुभव आणि अनुभवाशिवाय प्रचिती येत नाही. माझी प्रत्येक कविता त्या त्या वेळी यातलं कांही ना काही घेऊन अवतरत होती. मनाच्या विविध अवस्था चितारत होती. सुरुवातीला कॅमेर्‍याने काढलेल्या फोटोसारखं जसं दिसतं तसं चित्र रेखत असे. शिवाय जे सुचलं ते आणि जे लिहिलं ते सर्वच चांगलं वाटत असे.

लिहून लिहून आणि मुकुंद आणि विशेषतः धनंजय सारख्या मित्रांच्या स्पष्टोक्त रसग्रहणामुळे, कवितेची 'फ्रेम' कळायला लगली. हळुहळू चित्राच्या सौंदर्याला बाधा आणणारा अनावश्यक भाग समजायला लागला. सहा कडव्यांची कविता वाचून दाखवतांना / वाचून झाल्यावर धनंजय ती पुन्हा वाचयला लावीत असे आणि मग कविता खरी कुठे संपली आणि त्यामुळे बाकी कडवी कशी अनावश्यक आहेत हे दाखवून देत असे. एकाच आशयाची, वेगवेगळ्या कल्पना घेऊन उतरलेली एकाच, कवितेतील दोन कडवी, त्या कवितेची अकारण लांबी वाढवतात, शिवाय तुमची एक कल्पना आग्रहानं वाढलेल्या अन्नासारखी वाया जाते खाणार्‍याला समाधान न देता.

आता 'जेवण आणि भोजन' , 'स्केच आणि चित्र', 'सरगम-स्वरालंकार-रागदारी', 'ग्रहण-रसग्रहण', 'स्वाद-अस्वाद', 'विषय-आशय', 'स्मरण-अवतरण' यांच्यातील फरक जाणवायला लागले. एखाद्या लिखाणावर झालेल्या नि:संकोच निकोप चर्चेतून स्फुरणारे संदेश खोल कुठेतरी कोरले जात होते.

धनंजयनी मला, ' कविता बदलायला कधीच लावली नाही, ना मी ती बदलली. कारण एकच होतं की ती माझी "ओरिजनल" होती. किरकोळ एखादा शब्द बदलणे अथवा कडवे वर-खाली करणे इतकेच काय ते कधितरी !

तुम्हाला उत्सुकता असेल ह्या 'धनंजय' प्रकरणाबद्दल, पहा :-

धनंजय

धनंजय हे रसायन,
स्वतः आत्मनेसाठी - कवी, लेखक, चित्रकार, फोटोग्रफर
पोटासाठी - रावसाहेब
संसारसाठी - "दादा" नावाचं कर्तव्य
आणि प्राणिमात्रांसाठी - 'मानव'
असं आहे.

त्याचा जन्म
पहण्या-ऐकण्यासाठी
आणि एकंदरित
जगणे समजण्यासाठी असल्याने
बोलणे कमी.

देण्याच्या वृत्तीमुळे
मागणे माहित नाही.

लिहितांना, चित्र काढतांना,
हात कायम आशिर्वादासारखा पालथा,
म्हणून
घेणारी ओंजळ नाही.

कधिकाळी
कुणाला स्वतःहून द्यावंसं वाटलंच
तर देणार्‍यासाठी
हे अवघड असलेलं दुखणं आहे.

त्याच्या वेदना / संवेदना समजणारा
जन्माला येण्याची शक्यता कमी आहे
कारण
त्याचा खरा संवाद चालतो
तो फक्त शाई, कागद आणि रंगरेषांशी !!

कुणाच्याहि
कविता; लेख अथवा चित्रं
जो तो आपापल्या अनुभूतीतून
वाचत असतो
म्हणून त्यांचं आवडणं
म्हणजे तो लेखक वा चित्रकार समजणं
असं होत नाही.

खरं तर जगातल्या कुठल्याच माणसाला
तो स्वतः कधीच समजलेला नसतो
पण तरीही
आत्मविषयी भ्रामक समजुती
खर्‍या समजून
एक 'अहं' किंवा 'न्यून'
गंड तयार करत असतो.

धनंजय
त्याच्या अज्ञातबाबत
प्रामाणिकपणे उत्सुक आहे
म्हणून प्रत्येक बाबतीत
तो
नाविण्य, वैविध्य आणि वैशिष्ट्य
शोधू शकतो.

स्वतःचा वेध घेतांना
सापडल्याच्या पलिकडलं शोधण्याच्या
त्याच्या विद्यार्थी वृत्तीमुळे
तो आपोआपच विनम्र होतो

धनंजय संत नाही
शांत नाही
भावनाशून्य अथवा स्वस्थ तर नाहीच नाही
षडरिपूंचे फासे
त्याच्यावरही अंमल करत असतात
त्यांना झिडकारून
त्यांच्या जाळ्यातून सुटका करून घेण्याचे मार्ग
त्याला अवगत आहेत

शरीर-मनाची घुसमट
रंगरेषांच्या अविष्कारतून
जणीवपूर्वक बाहेर फेकण्याचं मर्म
त्याला उमगलं आहे

प्रत्येक माणसात तो स्वतःला पहातो
म्हणून त्याच्या व्यक्तिमत्वामधला सालस नाद
नि:शंकपणे
त्याच्या हातून निघालेल्या रेषेची
कलाकृती बनवतो

मुक्कामाला पोहचण्याच्या आनंदापेक्षा
प्रवासाचा अस्वाद जास्त रंजक असतो
हे मानणारा धनंजय
त्यामुळेच
प्रत्येकाला आपला सहप्रवासी वाटतो

तो सर्वांसाठी सर्वांमधे असला
तरी स्वतःसाठी मात्र एकटाच आहे

माझी कविता अजून माझ्या वेशीपुरतीच मर्यादित आहे. तिची व्यापकता मला किंवा तिलाहि माहित नाही. अजूनही मला ती मुकुंदच्या म्हणण्याप्रमाणे "माझी संवेदनाच" वाटते.

वारं आल्यासारखं सुचेल तसं लिहीत गेलो. निद्रिस्त सुप्त भावना तुंबलेल्या अवस्थेतून प्रवाहित होत गेल्या. आजपर्यंत अशा २११ "समाध्या" धुवून स्वच्छ झाल्यात. पुढे अजून किती सापडताहेत माहित नाही.

"रोबा"( सौ. सुहास जोशी )ने दिलेली पहिली डायरी संपली आहे. तिनेच दिलेली दुसरी डायरी लिहायला सुरुवात करण्यापूर्वीची ही कृतज्ञतेची नोंद, आतापर्यंतच्या प्रवासाच्या सुखद आठवणी, पुढच्या वाटचालीची शिदोरी.

हा माझ्या अव्यक्ताने व्यक्ताशी सांधलेला संवाद आहे
प्रत्येक वेदनेत स्वर्गसुखाचा ओझरता पडसाद आहे

हा अतृप्त भावनांचा भातुकलीत मांडलेला संसार आहे
फुलपाखराच्या क्षणभंगूर जीवनाचा अस्वादक शृंगार आहे

हा तुंबलेला उद्वेग झिडकारण्याचा प्रक्षोभक अट्टाहास आहे
भरकटलेल्या आकांक्षांच्या विसर्जनाचा अश्वासक आभास आहे

इथे तृप्त गंधर्वक्षणांचा लोभस सहवास आहे
प्रत्यक्षात न येणार्‍या स्वप्नांचा हा एक प्रवास आहे

डायरी क्र. २ चे संदर्भ पुढील भागात.

......................................क्रमशः

गुलमोहर: 

केवळ हाईट !!! धनंजय हे रसायन अगदी परफेक्ट... शेवटची कविता मस्तच !!!!!

शेवटची कविता म्हणजे...(क्वालिटी !! ) दर्जेदार शब्दांची सुबक पण अर्थवाही मांडणी!!
<<
लिहितांना, चित्र काढतांना,
हात कायम आशिर्वादासारखा पालथा,
म्हणून
घेणारी ओंजळ नाही. >>
यालाच प्रतिभा म्हणत असावेत... जे सामन्यांही कळत असतं, दिसत असतं पण त्याचा अचूक नेमका अर्थ शब्दात बांधणं!!

Happy
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
अत्तराची कुपी संपतानाच जास्त जपायची असते...

असाच आश्रय असू द्या शब्दांना ! त्यांच्या संवेदनांना !!

अज्ञात,
तुम्ही म्हटल्या प्रमाणे पुढचं वाचलं--खुपच आवडलं.
"धनंजय" ही कवीता नाहीये--आयुष्याची व्याख्या, एक प्रकारे जगण्याची रीत आहे.
पहिली कविता तर आवडलीच होती.
अजुन वाचायला मिळु देत.
अनघा

अनघा,
भाग चवथा आज्-उद्या वाचता येईल. कामामुळे टाईप करायला जमलं नाही. प्रतिसादाबद्दल आभार.