माझ्या कुतुहलाची दीनगाथा !

Submitted by सफरचंद on 22 January, 2014 - 20:48

आजतागायत मानवप्राणी जे काही साध्य करू शकलाय ते त्याच्या 'कुतुहल' या गुणामुळेच, असं अनेक विचारवंत म्हणतात. पण माझा मात्र यावर काडी इतकाही विश्वास नाही. खरंतर माझा 'विचारवंत' या जातीवरच विश्वास नाही. मुळात डोक्यावरचं जंगल अन दाढीचे खुंट अस्ताव्यस्त वाढवून लोकं विचारवंत होतातच कशाला?? हा प्रश्न मला नेहमी पडतो.हे असले अवतार करून लोकांची टरकवण्यापेक्षा, स्वत:च्या डोक्याला अधून मधून 'कंगवा' दाखवून ते 'विंचारवंत' का होत नाहीत ? हे माझं आपलं एक कुतूहल आहे. असो... कोणाच्याही डोक्यापर्यंत पोहचण्याचा हक्क आपल्याला नसल्यामुळे आय रेस्ट माय 'केस'!!:

तर मला म्हणायचय काय, की कुतुहलापोटी केलेल्या कुठल्याही कामाचा चांगला परिणाम होऊ शकतो ही गोष्ट तद्दन खोटी आहे असा माझा दावा आहे.

कित्ती ही नाही म्हटलं तरी ऐन वेळी माझं भाबडं मन त्या कजाग कुतूहलाच्या कचाट्यात सापडतच बघा.आता परवाचीच गोष्ट घ्या, "तुम्ही स्वतः हसरे, प्रेमळ, आणि सकारात्मक झालात कि समोरचाही आपोआप तसा होतो" असं मी कुठल्याशा अध्यात्मिक कार्यक्रमात ऐकलं होतं. आता ते खरच तसं होत असेल का याच कुतूहल मला लागून राहील होतं.मानगुटीवर येउन बसलेल्या सकारात्म्कते च्या कुतूहलाला शमवण्यासाठी, चिडून अमाप खळखळ करणाऱ्या म्यानेजरणी कडे मी शांत मंद हसत पाहून बघितलं.पण त्याच्या बदल्यात मिळालं काय ?? तर , " आधी चुका करता आणि वर निर्लज्जपणे दात काढता" ही दात !! हे आप्लं दाद!! आता या मेलीलाच हसरी बनवण्यासाठी केलं न मी हे? पण तिने त्याची भलतीच पोचपावती दिलीन.. तर असा हा सगळा माझा खटाटोप वाया गेला असला तरी एक गोष्ट मात्र मला पक्की कळलिये , की 'हे अध्यात्म वगैरे माणसांवर परिणाम करतात. "हिडींबा राक्षसणिवर" नाही!!.

या कुतूहलाविषयी माझ्या आईच हि तितकसं चांगलं मत नसावं बहुतेक. कारण लहानपणापासून च्या माझ्या सर्व कुतुहलांना तिने 'आगाऊपणा' हे एकमेव संबोधन बहाल केलय!. फक्त आईचंच नाही सरकारी कॉलनीत राहणाऱ्या आम्हा मुलांबद्दल गावातल्या एकुनेक माणसाचं हेच मत होतं. "कुतूहल ही विज्ञानाची जननी आहे" हा सुविचार भल्या मोठ्या अक्षरात आमच्या शाळेच्या प्रयोगशाळेवर लिहिला होता. पण त्याचा अर्थ आमच्या पालकांच्या (आणि शिक्षकांच्या ही) टकुर्यात काही शिरत नव्हता. आणि हेच आम्हा सर्व निरागस, अजाण बालकांचं दुखः होतं. त्यामुळे हा कुतुहलचं काही 'फळ' मिळो ना मिळो पण अंगावर 'वळ' मात्र जरूर उठायचे!!.

या कुतुहलापायी लहानपणी असंख्यवेळा मी मार खाता खाता वाचले आहे.... (अन तेवढयाच वेळा खाल्ला ही आहे!!) उगाच कशाला खोटं बोला. शेजारच्या फरांदे काकुंच्या पेरूचे पेरू कसे लागत असतील बरे याच कुतूहल मला त्यांच्या कंपाउंडवर चढवून गेलं.. शिंदेकाकांनी फेकून दिलेल्या अर्धवट सिगारेटी गोळा करून नाकातून धूर काढायचा सामुहिक कार्यक्रम आम्ही सर्व पोरांनी मोठ्या उत्साहाने केला होता. नंतर लागलेल्या ठसक्यांनी अख्खी कॉलनी दणाणून गेली हे सांगायला नकोच. सदानकदा रांगत इकडेतिकडे हिंडणारं बोरकरांचं बाळ त्याच्या पायाला रिबीन बांधून खांबाला बांधल्यास एका जागी शांत बसतं का?? वगैरे वगैरे.. बाबांच्या कलापाने देशमुखांच्या पामेरियन 'चिनू' चे पण केस रंगवले जातात का याची एकदा हळूच चाचणी घेणं चालू होतं.तेवढ्यात आत्तापर्यंत शांतपणे हे सगळं बघत असणारा बुलडॉग 'दिग्या' अचानक भो भो करीत आमच्या अंगावर आला. आपल्या दोस्ताच्या देखण्या रुपाची वाट लावली जात आहे हे त्याला कळल्यावर त्याला आमचा फार राग आला... दिग्या च्या बांधलेल्या साखळीच्या परिघाबाहेर कसंतरी भिंतीला चिटकून उभ्या असलेल्या मला या कुतूहलाने, भेदरून ए 'कुतु' 'हल' ना असे म्हणायला लावले!! घाबरून बेहाल झाल्यावर कशीतरी जीव वाचवून घरात पोचले. पाणी पिऊन जरा निश्वास टाकणार इतक्यात बाबांना 'कलापाच्या ब्रश मध्ये कुत्र्याचे केस सापडल्याने' घरात हलकल्लोळ माजला. पुढचे काही दिवस मात्र देशमुखांनी घरी छोटा 'झेब्रा' आणलाय अशी अफवा गावात पसरली.

बाकी वर उल्लिखलेल्या शिंदे काकांच्या श्रीमती हि एक ढालगज बाई होती. त्यांच्या घरातून काकुंच गुरकावणं आदळआपटीच्या कोरस मध्ये ऐकू आल की दुसऱ्या मिनिटाला शिंदे काका घराबाहेर येउन तावातावाने फकाफक सिगरेटी ओढत बसणार हे आम्ह्या प्रत्येक पोराला माहित होतं. एकदा काका जोरदार सिगारेटी ओढत असताना आमच्या टोळक्याने त्यांना, "अशा टारगट काकूशी तुम्ही का बरे लग्न केले? हि शंका विचारली" होती. काकांनी आमच्या तोंडावरून मायेने हात फिरवल्याचं अंधुकसं आठवतंय. पुढे कधीतरी काकांनी भांडणात (किंवा गोडीत ही असू शकेल) काकुना हे सांगितलं असावं बहुतेक. कारण एके दिवशी " दारातून धडधडत पळालात तर तंगडी मोडीन" असा फतवा काकूंकडून उगाचच्या उगाचच जारी करण्यात आला.

आमच्या इथे घोरपडे नावच कुटुंब राहत असे. त्यातले आजोबा रोज दुपारी सामाईक व्हरांड्यात 'घोरत पडत' असत. एकदा त्यांची वामकुक्षी चालली असताना लयीत वरखाली होणारं त्यांचं भलंमोठ्ठ पोट त्यावर सगळ्यानी मिळुन एखादी जड वस्तू(दिन्याच्या घरातला खलबत्ता!)ठेवल्यास हलायचं बंद होतं का हे प्रयोग करून पाहिल्यामुळे जागे झालेल्या त्या म्हाताऱ्याने आमच्या पाठीत मारेलेले गुद्दे अजूनही आठवले की दुखतात. माझ्या दोन्ही शेंड्या धरून "अगं पोरगी आहेस कि अवदसा" असं म्हणत त्यांनी मला गदागदा हलवलं होतं. त्यांच्या हातून शेंड्या कशाबशा सोडवून आम्ही सगळे धावत सुटलो ते "पूढच्या वेळी खलबत्ता ठेवायचा नाही तर 'आपटायचा' हे ठरवूनच. त्या संध्याकाळी ( म्हणजे सगळे बाबा लोक घरी आल्यावर) थोड्या थोड्या वेळच्या अंतराने आजूबाजूच्या घरांमधून भोकाड पसरल्याचे आवाज येऊ लागले. माझे दोस्त आता या वेळी 'असले राग' का आळवत आहेत हे मला लगेच कळाले. नाहीतरी त्या घोरपडे आजोबांना चहाड्या करायची फार सवय.!! त्यामुळे त्यांच्या पावलांना माझ्या घराचा रस्ता दिसायच्या आधीच ताटातलं गबागबा खाऊन मी तीराच्या वेगाने बिछाना गाठला. आणि तोंडावर पांघरून गुरफटून घेऊन झोपी(?) गेले!! नाहीतर लोकांच्या पोटांवर मी खलबत्ता वगैरे ठेवते असं ऐकल्यावर घरातल्या सगळ्यांनी मला नक्कीच कुटलं असतं.

आमच्या कॉलनीत मैदानाच्या नावाखाली रिकाम्या जागेचा एक तुकडा होता. पण तिथे खेळायची संधी आम्हाला फार क्वचितच मिळे. याचं कारण म्हणजे 'मिसाळ काकू'.. याचा अर्थ मिसाळकाकू त्या मैदानात कुस्तीचा सराव वगैरे करत असं नाही. पण त्या बाईला सदानकदा काहीतरी वाळत घालायची फार सवय. धान्य-धुन्य, कुरड्या, पापड, मिरच्या, मसाले असले काहीतरी मैदानात नेहमी वाळवलंच पाहिजे असा काहीसा नियम त्यांनी स्वत:ला घालून घेतला होता. अगदीच काही मिळाल नाही तर घरातले रग काढून त्या वाळवत असत. वाळवण घातल्यावर आम्हा पोरांना त्या तिकडे फिरकू ही देत नसत. लांब कोपऱ्यात खेळलो तरी त्यांना राग येई. बऱ्याचदा चिडून जाऊन त्या काठी घेऊन आमच्या मागे ही लागत. पण असल्या अवजड भोपळ्याला थोडेच आम्ही हातात घावायला. त्यांचं वाळवण कधी निघतंय याची वाट बघण्यात आमचा बराच वेळ खर्ची पडलाय. दुपारची झोप काढून उशिरा त्या ते सगळं उचलून नेत असत. भलामोठा देह , विस्कटलेले केस, लाल भडक डोळे, असं वामकुक्षी नंतरच 'तेजस्वी' रूप घेऊन त्याना पाहिलं कि आम्हाला त्राटिका आठवत असे. त्यावेळी जर देवाने एखादा वर दिला असता तर आमच्यापैकी प्रत्येकाने "मिसाळ काकूंच्या पापडात थयाथया नाचायचीच इच्छा'"पूर्ण करून घेतली असती. काकूं पेक्षा आकाराने निम्मे असणारे मिसाळकाका बिचारे खूप चांगले होते.

या काकू रोज वाळवण्यासाठी वस्तू पैदा करतात तरी कुठून हे आम्हा सर्वांच्याच कुतूहलाचा भाग होता. एकदा मला मैदानाजवळ काकू भेटल्या. मी सहजच त्यांना "काय काकू आज काय वाळवताय ?? असं विचारलं. अन काय सांगू तुम्हाला माझा तो प्रश्न ऐकून काकू भडकल्याच. माझा कान करकचून ओढून त्या बरच काही बडबडायला लागल्या.माझं सगळं लक्ष त्यांच्या हातातल्या माझ्या कानाकडे केंद्रित झाल्यामुळे मला काही ऐकूच येत नव्हतं, आज काकू माझा कान उपटूनच टाकतायत की काय या विचाराने घाबरून जाऊन मी, कान सोडवायचा शेवटचा उपाय म्हणून काकूंच्या दुसऱ्या हातावर कडकडून "दंतास्त्र" सोडलं. आता काहीतरी दुखायची पाळी काकुंवर आल्यावर मात्र एका झटक्यात त्यांनी माझा कान सोडला. जीवाच्या आकांताने धावत मी घरी पोचले. आणि मला माझी घोडचूक कळाली ( काकूंना चावण्याची नव्हे!) तर चावून घरी धावत यायची... माझ्या मागे काही सेकंदातच मिसाळ काकू उल्केसारख्या आमच्या घरात घुसल्या आणि आईसमोर चावका हात नाचवत धुमाकूळ घालू लागल्या. "आम्ही आमच्या घरचे वाळवतो, तुमच्या घरी मागायला येत नाही , कोणाच्या बापाला हक्क नाही विचारायचा". इकडे आईचे डोळे रागाने गरगर फिरू लागले. विनाकारण ही बाई भांडतेय म्हणून नव्हे तर आपल्या लेकीने 'चावण्याचा' पराक्रम करून बोलायला जागा न ठेवल्यामुळे.. . बराच वेळ काकूंचा थयथयाट चालू होता. इतक्यात आईचे लक्ष माझ्या लाल भडक कानाकडे गेले. तिला काय कळायचं ते कळालं. भांडण परतवायला इतका भारी मुद्दा मिळाल्यावर आई सोडते का काय? "अहो, इतक्या छोट्या कारणासाठी एवढ्याशा पोरीचा कान उपटणार होतात की काय?? बघा तरी कसा लाल लाल झालाय" वगैरे सुरु झालं . बचाव आता आक्रमणात बदलला. माझ्या कानाचा उल्लेख होताच तो पूर्वीपेक्षा कितीतरी पटीनी दुखू लागला. अन मी बेंबीच्या देठापासून भोंगा पसरला. आता मात्र मिसाळ काकूनी काढता पाय घेतला. मग आईचा मोर्चा माझ्याकडे वळला. ती थोडीच बधतेय माझ्या रडण्याला!! असला आचरटपणा परत करशील तर फोडून काढीन म्हणून ती गरजली. एरवी तिने मला खरच फोडून काढलं असतं पण 'लालग्या कानाने' वाचवले बघा.

तर मंडळी तुम्हाला समजलं असेलंच की, या कुतुहलाने माझ्यासारख्या साध्या, सरळ मुलीच्या आयुष्यात कसले कसले प्रसंग उभे केलेत. लहानपणी प्रत्येकवेळी कपाळमोक्षच पदरी पडल्याने मोठ झ्याल्यावर मी नाकासमोरच चालण्याची सवय अंगी बाणवायचा प्रयत्न करते आहे.तरीही 'कुतूहलराक्षस' अधून मधून माझ्या बुद्धीवर झडप घालतोच. आणि त्याला जसं हवय तसं माझ्याकडून करून घेतो. त्याच्या नादात नेहमी आगीतून फुफाट्यात ....अन फुफाट्यातून ...... आईबाबां समोर (त्यापेक्षा फुफाटा बरा !!!)

या सगळ्या गर्तेत मी सापडलेय आणि एक नवंच कुतूहल बरेच दिवस मनात कुचीपुडी करू लागलय. "हे सगळ माझ्याच बाबतीत होतं का?. की तुम्हा सर्वांची ही अशीच अवस्था आहे?. त्या न्यूटनला कुतुहलाने शोध वगैरे लागतात. अन आमच्या नशिबी मात्र वर गेलेला चेंडू सरळ रेषेत खाली न येता फळीवरची सगळी भांडी खाली घेऊन येतो.!! शी... याला काय जीणं म्हणायचं? तुम्हीच सांगा..

ढिस्क्लेमर : इतरत्र पुर्वप्रकाशित...

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Lol
लेखातल्या प्रसंगांचा कुतूहलाशी निकट संबंध जाणवला नाही तरी वाचताना मजा आली.
लहानपणी मार-बीर खाणार्‍या मुलींची वर्णने वाचनात आलेली आठवत नाहीत.
"मुळात डोक्यावरचं जंगल अन दाढीचे खुंट अस्ताव्यस्त वाढवून लोकं विचारवंत होतातच कशाला?? "
हे वाक्य वाचताना स्त्रियांना विचारवंत हे बिरूद लागत नाही की काय असा प्रश्न पडला.

छान आहे लेख.. कुतुहलापोटी आमचेही बरेच लागलेत.... शोध नाही हं !

जेवणात चुकून मुंगी खाल्ली गेली तर डोळे चांगले होतात असे ऐकोन कित्येक मुंग्या कचाकचा खाल्यात. नंतर मग डोळे चांगले झाले की वाईट हे समजणार कसे हे न समजल्याने थांबवला तो उद्योग.... आता खरे की खोटे अजूनही माहीत नाही मात्र जो पर्यंत मला चष्मा लागत नाही तो पर्यंत हा त्याचाच परीणाम हा विश्वास कायम राहणार हे नक्की..

छान मस्त जमलेय आम्हीपण खालयं............... छान आहे लेख.. कुतुहलापोटी आमचेही बरेच लागलेत.... शोध नाही हं !

जेवणात चुकून मुंगी खाल्ली गेली तर डोळे चांगले होतात असे ऐकोन कित्येक मुंग्या कचाकचा खाल्यात. नंतर मग डोळे चांगले झाले की वाईट हे समजणार कसे हे न समजल्याने थांबवला तो उद्योग.... आता खरे की खोटे अजूनही माहीत नाही मात्र जो पर्यंत मला चष्मा लागत नाही तो पर्यंत हा त्याचाच परीणाम हा विश्वास कायम राहणार हे नक्की..
अभिषेक नंबर 1 हां......

मस्त खुसखुशीत लेख!!!

(नसत्या)कुतुहलापायी लहानपणी खाल्लेल्या धबक्यांची नव्याने आठवण करून दिलीस.. Happy

मस्तं लेख.... लहानपणीं चाळीत आम्ही सामुहिक वात्रटपणें करायचो असेच. विशेषतः गृहिणी काकवांची दुपारी 'पडण्या' ची वेळ हा 'ब्राह्ममुहूर्त' साधून.माझी आई नोकरी करत असे, त्यामुळे घरात फक्त आजोबा. सबबसर्व ईचकगिरी प्रत्यक्षात उतरवण्याची जागा म्हणजे आमचं घर. चहात चहापावडर आणि कॉफीपावडर दोन्ही घातल्यास कसे लागेल हा आजोबांच्यावर प्रयोग करणे, त्यांच्या चहात दुधाऐवजी ताक घालणे, भाजलेल्या किंवा कच्च्याही शेंगदाण्याचे पूर्ण भरलेले डब्बे सर्व मित्रमैत्रिणींच्या मदतीने एका दिवसात चट्टामट्टा करून आईला झीट आणणे आणि नंतर केलेल्या कर्माची फळे भोगणे हा सकाळची शाळा झाल्यावरचा पेटंट कार्यक्रम. एकदा एका अतिउत्साही मित्राने मात्रं लईच गोत्यात आणलं, पठ्ठा म्हणाला लाईटरने गॅस पेटतो तसे तारेवरचे कपडे पेटतात का पाहूया. एका काकूंनी त्याला करताना आणि बाकीच्या आम्हाला उत्सुकतेने बघताना ' रंगेहाथ' पकडलं आणि नंतर चाळीतल्या मधल्या चौकात आधी सामुहिक आणि नंतर घरी वैयक्तिक बिनपाण्याची चम्पी झाली.