अन्या - ११

Submitted by बेफ़िकीर on 27 January, 2014 - 02:23

बदललेल्या समीकरणांचा पूर्ण विचार करताना रतनच्या चेहर्‍यावर निग्रही आणि गूढ हास्य पसरले होते. हा दुसरा दिवस होता वीर गावातील. सकाळी दहा वाजता निवासाच्या आतल्या खोलीत ती अन्यासमोर बसलेली होती. तिला पाहून अन्या चिडलेला होता. तिच्या सल्ल्याने वागून इग्या आणि पवारला हाकलून दिलेले होते आणि तालुक्याच्या गावातून तो आता वीरला आला होता. कालच्या दिवसाच पहिला सगळाच भाग अभूतपूर्व स्वागत समारंभामुळे अतिशय गोड वाटला होता. मात्र शेवटी शेवटी सगळ्याचा अर्थ समजला होता. मशालकराच्या स्वार्थासाठी आपला आणि आपल्या समाजात निर्माण झालेल्या स्थानाचा वापर केला जाणार हे लक्षात आलेले होते. हे सगळे रतनचे ऐकल्यामुळे झाले हे अन्याच्या मनात पक्के बसलेले होते. त्यामुळे अन्याचे मन पुन्हा पूर्ववत करणे हेच एक मोठे काम रतनला करावे लागले होते गेल्या अर्ध्या तासात! ह्या अर्ध्या तासात तिने बदललेले समीकरण अन्याच्याही गळी व्यवस्थित उतरवले होते. अर्धा तास कुजबुजत केलेल्या बडबडीचा परिणाम म्हणून आता अन्या भारावल्यासारखा रतनकडे पाहात होता.

काय ठरत होते त्या दोघांमध्ये?

त्या दोघांमध्ये एक अशी योजना ठरत होती जी सफल झाली तर वीरमधून कधी बाहेरही पडावे लागले नसते, महत्वही अबाधित राहिले असते आणि प्रमुख विरोधकही नामशेष झालेला असता.

गावातील समीकरण असे होते. मशालकर हा गावचा प्रमुख! स्वार्थासाठी त्याने रतन आणि अन्याला अंधश्रद्ध भक्तांकडून मिळणारे महत्व वापरायचे ठरवले होते. 'एवढे मोठे महाराज आणि देवी माझ्याकडून आनंदाने आश्रय घेतात' ही बाब गावकर्‍यांच्या मनावर ठसवून आपण आहोत त्याहून मोठे होऊ व पुढेमागे राजकारणातही पडू असा त्याला विश्वास वाटत होता. एवढेच नाही तर ह्या महाराजांच्या निमित्ताने परगावातील मंडळींचा ओघही सुरू झाला तर पैसा फिरू लागेल आणि त्यातही आपला भरपूर वाटा असेल हेही मशालकरच्या लक्षात आलेले होते. उघड होते की अन्या आणि रतनचे गावकर्‍यांच्या मनात असलेले महत्व तसूभरही कमी न होऊ देणे व ते वाढवतच ठेवणे ह्यावर मशालकरची स्वतःची कित्येक स्वप्ने साकार होणार होती. अगदी मशालकरच्या कुटुंबातील व्यक्तींनाही मशालकरचा हा उद्देश ज्ञात नसल्याने त्याच्या दोन्ही बायका अन्या आणि रतनसमोर नतमस्तक होत होत्या. अपवाद होता तो सुकन्याचा, जिला रतन आणि अन्या ह्या दोघांमध्ये काही विशेष आहे हेच मान्य झालेले नव्हते. मशालकरच्या ह्या योजनेमुळे असे झाले होते की एकांतात जेव्हा मशालकर आणि हे दोघे असतील तेवढी वेळ सोडली तर इतर प्रत्येक वेळेला ह्या दोघांना देवतूल्य वागणूकच मिळत राहणार होती. म्हणजेच, ज्या गोष्टीचा मशालकर स्वार्थासाठी उपयोग करू पाहात होता त्यायोगे आपसूकच मिळणारे श्रेष्ठत्व हे ह्या दोघांना स्वार्थासाठी वापरता येणार होते. नाही म्हंटले तरी मशालकराच्या हेतूंपासून अनभिज्ञ असलेल्या आंधळ्या गावकर्‍यांचा जोरदार पाठिंबा ही एक मोठीच ताकद होती जी ऐनवेळी वापरता येणे ह्या दोघांना शक्य होते.

दुसरीकडे सुकन्या, मशालकरची द्वितीय कन्या ह्या दोघांना पाण्यात पाहात होती. पण तिच्या मनातील विचार ती कोणालाही बोलून दाखवत नव्हती कारण तिला असे वाटत होते की प्रत्यक्ष तिचे वडीलच ह्या दोघांना पाहून दृष्टांत झाल्यासारखे वागत आहेत. ह्यामुळे तिचे रतन आणि अन्याबाबत काही बोलण्याचे धाडस होत नव्हते हे चतुर रतनच्या चांगले लक्षात आलेले होते. तसाही, सुकन्याचा रतनला काही विशेष त्रास नसल्याने तूर्त तिच्याकडे दुर्लक्ष केले तरी चालण्यासारखे होते. सुकन्या ही विरोधी पक्षात असली तरी ताबडतोब ज्यावर कारवाई करावी असे ते प्राधान्य मात्र नव्हते.

सुकन्याची मोठी बहीण वेडी होती. पण सध्याच्या परिस्थितीत ती वेडी बहिण ही रतनची सर्वात मोठी पाठराखीण होती. ती त्या वाड्यातील एक अशी व्यक्ती होती जिला रतनचे आगमन नुसतेच आवडलेले होते असे नाही तर तिची रतनकडून अतिशय खास अशी काहीतरी अपेक्षा होती. धड बोलून दाखवणे तिला शक्य नसल्याने ती ज्या काही खाणाखुणा करत होती त्यांचा अर्थ जर लागला तसाच असला तर तो पायाखालची वाळूच सरकवणारा होता. कोणत्यातरी कारणाने ती रतनला त्या खिडकीतील आकड्यातून तुळईचा खिळा काढायला सुचवत होती. असे केले असते तर तुळई थेट मशालकरच्या अजस्त्र डोक्यात पडली असती आणि त्याच्या डोक्याचा चेंदा झाला असता. त्या वेडीला हे का व्हायला हवे होते हे रतनला माहीत नव्हते. मात्र हे होणे ही सध्या त्या वेडीपेक्षाही रतनचीच अधिक इच्छा होती. त्या वेडीशी वरकरणी काहीही संबंध आहे असे इतरांना अजिबात न दाखवता त्या वेडीला मात्र आपल्यात गुंगवून ठेवणे असे दुहेरी कार्य रतन आता करणार होती. रतनचा जन्मजात कारस्थानी स्वभाव ह्या समीकरणातील प्रत्येक घटक वेगळा काढून त्याचे महत्व तपासत त्याला योग्य त्या ठिकाणी बसवत होता. मशालकर मेला नाही तरी जन्माचा अपंग होईल हे नक्की होते. ते झाले तरी बरेच काही झाले असते.

मशालकरच्या घरातील इतर प्रत्येकजण मशालकरला घाबरून आणि तसाही अंधश्रद्ध असल्याने अन्या आणि रतनसमोर लोटांगणेच घालत होता. त्या आघाडीवर रतन शांत होती हे त्यामुळेच! त्या बाजूचा फारसा विचार आत्ता नाही केला तरी चालण्यासारखे होते.

पाचवी आघाडी म्हणजे प्रत्यक्ष गावकरी! ही सर्वात मोठी आघाडी होती. जे कृत्य करण्याचे, त्या कृत्यातून जे परिणाम प्राप्त करण्याचे विचार तुरळकपणे मनात येत होते ते सत्यात उतरण्यासाठी ह्या आघाडीचा अत्यंत सशक्त पाठिंबा असणे अत्यावश्यक होते. ह्या आघाडीमधील कोणालाही जरासादेखील सुगावा लागला की बाबा आणि देवी ह्यांच्यात काहीतरी घोटाळा आहे तर ओम फस् झाले असते. हे होऊ नये म्हणून काय वाट्टेल ते करण्याची मनाची तयारी व्हायला हवी होती.

आणि गेले अर्धा तास कुजबुजत्या स्वरात रतनने अन्याच्या गळी हेच उतरवले होते......की ......

"...... गावकर्‍यांन्ला आसं कैतरी वाटाय हवंन् की मशालकर म्येला ह्ये द्यवाच्याच मनात व्हतं आन् आता सर्व ठीक झाल्यालं हाये......"

रतनकडे रोखून बघत बसलेल्या अन्याने जणू जादूने भारावलेल्या आवाजात त्यावर उत्तर दिले......

"पापं न्हाई व्हय वाढली वीर गावात्ली तवा? गणं घडे भरल्यालेत पापांचे! तिन्मुर्ती दत्ताला बळी लागंन् आता! आन् त्यो बी त्याचा जो पापी हाय! आता पापी कोन हाय ते कोनाला ठावं? जो कोन आसंन् पापी त्यो मरंन्! आन् न्येमका त्यो मादरच्योद तुळई पडून म्येला तं मंग गावाला आप्सूकच ध्यानात यीन न्हवं?"

ते ऐकून गाली गुलाब फुललेल्या रतनला अन्याला मिठी मारावीशी वाटत होती. पण बाहेर नरसू होता, तो भक्तांना रांगेत उभा करत होता. अचानक कोणी आत आलं असतं तर नको ते दिसलं असतं! त्यामुळे अन्याला नुसताच डोळा मारंत रतन म्हणाली......

"चला मंग अवलिया बाबा! भक्तान्ला म्हनावं आजपासून दत्तनामाचा जप हाये! पापं नष्ट कराया चार सा दिसांत दत्तम्हाराज सोता येनार हाईत! मंग त्ये घ्येतील तो बळी त्यांन्ला दिला की मंग गाव सुटलं फेर्‍यात्नं! क्काय?"

तिने मशालकरच्या स्टाईलमध्ये 'क्काय' विचारल्यावर अन्या खदखदून हासला आणि रतनकडे झेपावला. पण चपळाईने दूर होत उभी राहात आणि स्वतःच्या ओठांवर बोट ठेवून डोळे विस्फारून रतन म्हणाली......

"दत्तम्हाराजांन्ला बळी मिळस्तवं आपन ह्ये पाप न्हाई बरं करायचं म्हाराज?"

हिरमुसलेल्या अन्याला पाहून खोडकर हासत रतनने डोक्यावरून पदर घेतला आणि ध्यानस्थ बसून तिने उच्चारवात जप सुरू केला......

"गोरखनाथ म्हाराज की ज्जय"

बाहेरून त्या जपाला भक्तांचे जोरदार प्रत्युत्तर आले आणि नरसूने रांगेतील एकेकाला आत सोडायला सुरुवात केली.

=====================

'बळी'!

हा एक शब्द आता वीर गावाला व्यापून राहिला. आठ दिवसांत पापी आत्म्याचा बळी घेतला जाणार आहे ही बातमी कर्णोपकर्णी झाली आणि नाही नाही ते लोक हवालदिल झाले. कोणी लहानशी चोरी केलेली होती, तो आता अवलियाबाबांसमोर चणे फुटाणे ठेवू लागला. कोणी जमीन लाटली होती तो निवासाला रोजचा तीनवेळा चहा पुरवू लागला. कोणी सुनेला मारहाण केली होती तो भक्तांना स्वखर्चाने प्रसाद वाटू लागला. कोणी कोणाच्या डोक्यात दगड घातलेला होता तो पहाटे निवासासमोर नारळ फोडू लागला. कोणी काहीही अभ्यास नसताना भविष्य सांगण्याचा धंदा सुरू केला होता तो आता रानात जाऊन लाकुडफाटा आणू लागला होता.

आपण पापी आहोत असे आता प्रत्येकालाच वाटू लागले होते. प्रत्येकजण आता आपण केलेली लहानमोठी पापे आठवून त्यांचे निवारण व्हावे म्हणून अचानक औदार्य दाखवू लागला होता. कधी नव्हे ते गावात सौजन्याचे वारे वाहू लागले होते. एरवी जमीनीवरून एकमेकांना पाण्यात पाहणारे आता वाटेत एकमेकांना बघून रामराम म्हणत होते. काही वैरे उगीचच मिटू लागली होती. कोंबड्यांवर मात्र वाईट दिवस आले होते. आपला बळी जाऊ नये ह्या भीतीने कोंबड्यांचा बळी देण्याचे प्रमाण वाढले होते.

काही जण मात्र त्यातही छातीठोकपणे म्हणत होते की कर नाही त्याला डर कशाला? आम्ही असे केलेच काय आहे की आम्ही घाबरावे, असा त्यांचा सवाल होता. त्या सवालानेही काही जण घाबरत होते. हा असाच सवाल आपण जाहीररीत्या कोणाला विचारू शकत नाही ह्याचा अर्थ आपले मन आपल्याला खात आहे हेही लोकांना समजत होते.

तिकडे मशालकर मिशीतच हासत होता. जे जसे हवे होते तसेच चाललेले होते. गाव पागल झालेले होते. अन्या आणि रतन उत्सवमूर्ती झालेले होते. अचानक सगळेजण शहाण्यासारखेही वागू लागलेले होते. ह्या सर्व भावनिक वादळावर स्वार होण्याची संधी आपल्याला लवकरच मिळेल ही मशालकरची आशा आता जोर धरू लागली होती. फक्त हे वादळ वीर गावाभोवतालचे रान ओलांडून पंचक्रोशीत पोचले आणि परगावचा ओघ सुरू झाला की आपण आपले खरे महत्व लोकांना पटवून द्यायला सुरुवात करायची हा बेत त्याने आखलेला होता.

सुकन्याला ह्या सगळ्याशी घेणेदेणे नव्हते. गावकर्‍यांमध्ये काही बदल घडला आहे हेही तिच्या खिजगणतीत नव्हते. तिला मुळात ही दोन रत्नेच मान्य नसल्याने बळी वगैरे बाबींवर तिचा शून्य विश्वास होता. पण वडिलांपुढे काही चालत नसल्याने ती ह्या सगळ्याच प्रकाराकडे पूर्ण दुर्लक्ष करत निवांत जगत होती.

तिची थोरली वेडी बहिण मात्र दिवसेंदिवस फुललेल्या चेहर्‍याने रतनकडे बघू लागली होती. सर्वांच्या नकळत रतनने खाणाखुणा करून तिला इतकेच आश्वासन दिलेले होते की तिला हवे असलेले काम लवकरच केले जाईल. त्या वेडीला आपलाच बाप मरावा असे का वाटत होते हे रतनला माहीतच नव्हते. पण कसेही का असेनात, तिने रतनचीच सुटका होण्याचा एक अत्यंत परिणामकारक मार्ग रतनला दाखवलेला होता.

अन्याची भाषा मात्र भक्तांच्या डोळ्यावर येऊ लागली होती. अन्या आणि ते भक्त ह्यांची भाषा एकच होती. महाराज म्हंटल्यावर चारदोन तरी सुविचार, वचने तोंडातून यायला हवी होती. पण 'तिन्मुर्ती दत्त पाप्याचा बळी घ्येनार'च्या पुढे अन्या बोलतच नव्हता. हे जसे रतनच्या लक्षात आले तसे तिने करेक्शन्स करून घेतल्या. आता अन्या अधूनमधून जप करणे, तालुक्याच्या गावात ऐकलेल्या प्रवचनांपैकी काही वाक्ये फेकणे असेही प्रकार करू लागला तसे मग गावकरी नॉर्मलला आले.

आणि रतन?

जसजसे दिवस जाऊ लागले होते तसतसा रतनला हुडहुडी भरवणार्‍या थंडीतही घाम फुटू लागला होता. संध्याकाळी एकदोनदाच दिसणारा मशालकरचा अवाढव्य देह पाहून तिच्या मनातील ती योजना ढेपाळत होती. हा माणूस त्या तुळईने अपंग तरी होईल का की तुळईच मोडेल असा संभ्रम तिला वाटू लागला होता. मुळात म्हणजे आपल्याला त्या आकड्यातून इतक्या जड तुळईचा खिळा काढता येईल का हेच तिला समजत नव्हते. बरं, एकदा नुसता प्रयत्न करून बघायला गेलो आणि चुकून आधीच तुळई पडली तर सगळेच मुसळ केरात गेले असते. ऐन वेळी आपण कच खाणार असेच तिला वाटू लागले होते.

पाच दिवस होऊन गेले तसे मात्र गावातील वातावरण जरा निवळले. 'काई बळीबिळी जात न्हाय हो, हाये कोन पापी हित्तं तवा?' असे गावकरी कुजबुजू लागले. आणि पुन्हा एकदा अन्याचे नशीब आपला चमत्कर दाखवून गेले.

एक हिरा नावाचा म्हातारा अचानक तडफडू लागला. हा पूर्वी एका हाफ मर्डरमध्ये आत जाऊन आलेला होता. तेव्हापासून आजवर तो त्याच धुंदीत दादागिरी करत असे. पण वय झाले तसे गावाने त्याला दोन वेळचे खाणे मिळवून देणे ह्यापलीकडे जवळ केले नाही. पण त्याला पुरेसे प्रायःश्चित्त मिळालेलेच नसणार असा गावाचा ग्रह झाला. हा तडफडणारा हिरा उचलून निवासासमोरच्या अंगणात आणून टाकण्यात आला. अन्याने गंभीर होत त्या हिराच्या अंगावरून हात फिरवला आणि कशामुळे कळेना पण हिरा ताठरला आणि निधन पावला. ह्या हिराचे कोणीच मागेपुढे नसल्याने हा झालेला प्रकार हरकत घेण्यास पात्र आहे हेच कोणाच्या टाळक्यात आले नाही. इतकेच नही तर ही बातमी समजल्यावर क्षण दोन क्षण मशालकरही हादरला. नुसता त्या पोराने हात फिरवला आणि चांगलं तडफडणारं थेरडं गचकलं हे ऐकून मशालकरला त्यावर काय बोलावे हेच समजेना! इतकेच नाही तर रतनही क्षणभर अन्याकडे संशयाने पहू लागली.

गावकर्‍यांनी मात्र अन्यापुढे लोटांगणे घातली. कोणीतरी अती साहस करून 'बळी बळी म्हनत व्हता त्यो ह्योच काय म्हाराज' असा प्रश्न पुटपुटत विचारला तसा संतापातिरेकाने अन्या त्या गृहस्थावर काठी उगारत ओरडला......

"ह्या म्हातार्‍यास दत्तानं सोडिवल्याला हाय! ह्यो बली न्हाई"

आता आली का पंचाईत! एकदाचा कोणीतरी एकजण बळी म्हणून मरतोय हे पाहून जरा कुठे गाव सुस्तावू म्हणतंय तोवर हा बळी नसून ह्याला उलट दत्ताने त्रासातून सोडवला असे ऐकायला मिळाले. आता प्रश्न असा होता की ज्यांनी स्वतःच्या डोळ्याने पाहिले होते की महाराजांनी नुसता अंगावरून हात फिरवताच हिरा ताठरला आणि गुजरला, त्यांची श्रद्धा अधिकच गडद झाली आणि त्यांच्या मनात 'खरा बळी कोण' ही शंका फारच फोफावली.

हिरा म्हातार्‍याची बातमी वार्‍यासारखी पसरली आणि उत्साहाच्या लाटेवर स्वार होऊन रतन वाजतगाजत वाड्यावर आली. तोवर दुसरी बातमी धडकली की तारा मावशी तापाने फणफणली आहे. तिच्यासारखी सत्शील म्हातारी का ह्या परिस्थितीत यावी हे पब्लिकला समजत नव्हते. पण अवलिया बाबांनी मार्गदर्शन केले. एक महत्वाचा बळी घेण्याअगोदर काही चांगली माणसेही न्यावी लागतात. आता अवस्था अशी आली होती की ज्या मेलेल्याला महाराज बळी म्हणतील तो सोडून बाकीचे निव्वळ चांगले होते म्हणून उचलले गेले असे गावाला वाटू लागले. ती तारामावशी तासात खपली. गावाबाहेरील स्मशानात हिराच्या कवटीच्या आवाजाच्या प्रतीक्षेत उगाचच बिड्या फुंकत बसलेल्या मंडळींसमोर आणखी एक प्रेत येऊन विसावले आणि चर्चेला उधाण आले.

इकडे वाड्यावर आल्यावर रतन जरा वेळ बसली आणि सुकन्या खाली जेवायला निघून गेल्यावर तिने दाराजवळून ती वेडी आता सरकत जाते का ह्याची थोडा वेळा वाट पाहिली. ती वेडी खिडकीतूनही दिसेना आणि दारापासूनही जाईना हे बघून रतनला समजले की ती आधीच खाली गेलेली असणार! तशी मग रतन तुळईपाशी आली आणि तिने तुळईचा आकडा हाताने चाचपला. एकुणात फारच जोर लावला तर पराक्रम असाध्य नव्हता. उत्साहाने रतन बाथरूममध्ये शिरली आणि पातळ वर घेऊन हात पाय धुवू लागली. अचानकच बाथरूममध्ये एक भली मोठी सावली शिरली तसे दचकलेल्या रतनने उभे राहून पातळ सारखे केले. बाथरूमच्या दारात मशालकर उभा होता. त्याची घाणेरडी नजर अर्धवट भिजलेल्या रतनच्या शरीरावरून वळवळत होती. एक पाऊल पुढे होऊन मशालकरने तिला ओढून स्वतःच्या जवळ घेतले आणि म्हणाला......

"द्येवी, उद्यापास्नं यगळी जागा हाय तुमाला! आमच्या बागंमदी दोन खोल्या हायेत! थितं र्‍हायच आता तुमी! तवा उद्या गावाला सांगून टाका! म्हनावं द्येवी आता बागंमागं र्‍हायला निघाल्यालीय! क्काय? मंग रातचं आमी यूच दर्शनाला! क्काय? लय खाज हाये ना त्या प्वाराबर्बर निजायची! आता कळंन् मर्द म्हन्जी काय त्ये!"

मशालकरने रतनला तसेच मागे ढकलून दिले. धडपडत रतन एका लोखंडी बादलीवर पडली. तिच्य कोपरातून रक्ताचा एक ठिपका बाहेर आला. कंबरेत उसण भरलेली होती. उजवे मनगट ओल्या फरशीवर आपटून लचकल्यासारखे झाले होते. ह्यापेक्षाही महत्वाचे म्हणजे मशालकरने एका सेकंदात तिला तिची जी जागा दाखवून दिलेली होती त्याचा तिच्या मनावर अतिशय भयानक परिणाम झालेला होता. भीतीने ती थिजून तशीच पडून मशालकरकडे पहात होती. मिशीला पीळ देत खुसखुसत तो बाहेर जाऊन दोन मिनिटे झाली तरी रतन उठलीही नाही. आणि हिय्या करून उठताना तिला तीन गोष्टी जाणवल्या.......

पहिली गोष्ट म्हणजे...... आजची रात्र तुलनेने मिळत असलेल्या स्वातंत्र्याची शेवटची रात्र! उद्यापासून दिवसा गावाची देवी आणि रात्री मशालकरची रखेली होणे हेच आपले नशीब!

दुसरी गोष्ट म्हणजे.... पडल्यामुळे जो काही मुका मार लागलेला होता... त्याचा परिणाम तुळईचा आकडा उचलण्याचा आत्मविश्वास नष्ट होण्यात झालेला होता.... आता तो आकडा उचलणे सर्वस्वी अशक्य वाटत होते.... एका हाताचे कोपर आणि दुसर्‍या हाताचे मनगटच दुखावलेले होते... कंबरेतला जोर संपलेला होता...

मात्र तरीही..... तिसरी जाणवलेली गोष्ट म्हणजे.... आज जर तुळईचा आकडा काढला नाही... तर परत कधीच काही करता येणार नाही!!!!!!

===============

सुकन्याचे घोरणे एका लयीत आले तसे आवाज न करता रतन उठून बसली. अंधारात कितीतरी वेळ ती सुकन्याच्या पलंगाच्या दिशेला बघत होती. सुकन्याचे तोंड आपल्याकडे आहे की उलट दिशेला हे तिला समजत नव्हते. आपण उठून बसल्यापासून बराच वेळ झाला हे जाणवले तशी ती अलगद उठली. अजुन खालून काही अस्पष्ट आवाज येत होते. पण मुख्य आवाजच येत नव्हता. तो म्हणजे मशालकर जेथे झुरके मारायला बसायच त्या झोपाळ्याचा! पिसासारखी चलत रतन खिडकीपाशी आली आणि बघते तर समोरच्या खिडकीत अस्पष्ट उजेडात ती वेडसर मूर्ती उभीच! पायातला जोरच गेला रतनच्या! आपल्याला ते कृत्य करताना ही वेडी पाहणार असेल तर आपण ते करावे की करू नये हेच तिला समजत नव्हते. पण वेडी काहीतरी खाणाखुणा करत असावी. अंधारात त्यांचा अर्थ रतनला समजला नसला तरीही वेडी उत्साहात आहे इतके जाणवले. आणि त्याचक्षणी खालून तो परिचित आवाज सुरू झाला! कर्र कर्र!

धाडस करून रतनने खाली पाहिले तर मशालकर धुंदीत बसून झुरके मारत होता. तेथे मात्र प्रकाश होता. त्याच प्रकाशात रतनला समोरची वेडी अस्पष्ट का होईना पण दिसत होती. मशालकरचा मंद झोका सुरू झाला आणि रतनने आपले दोन्ही दुखरे हात खिडकीबाहेरच्या आकड्यावर ठेवले. रतनचा स्वतःच्या हृदयाच्या ठोक्यांवर आता विश्वास बसत नव्हता. आपणच छाती फुटून कोलमडून पडू असे तिला वाटू लागले होते. अचानक समोरच्या वेडीच्या तोंडातून अती उत्सुकतेने घुर्र घुर्र असा विचित्र आवाज सुरू झाला होता. त्या वेडीचे विचित्र डोळे तेवढे मधूनच चमकत होते. खूप जोर लावून एकदाचा रतनने तो आकडा उचलला आणि त्याचक्षणी आतून तिला सुकन्याचे घोरणे बंद होऊन तिने जणू कूस बदलावी व सुस्कारा सोडावा तसा आवाज आला. यांत्रिकपणे आकडा जागच्याजागी ठेवत एखाद्या निर्जीव वस्तूप्रमाणे खिळून रतन आतल्या दिशेला पाहू लागली. पलीकडे त्या वेडीचे निराश झाल्यामुळे आणखीन विचित्रच आवाज सुरू झाले. खालून मशालकरच्या झोक्याचा आवाज आता नियमीत ऐकू येऊ लागला होता. भयंकर थंड वारे आत येणार्‍या त्या खिडकीच्या आधाराने घामाने भिजलेली रतन खिळून कितीतरी वेळ उभीच राहिली. बराच वेळ सुकन्याच्या घोरण्याचा किंवा कसलाच आवाज येईना तसे रतनचे साहस हळूहळू पुन्हा जमू लागले. पाच एक मिनिटांनी तिने पुन्हा त्या आकड्याला हात घातला तशी पलीकडची वेडी पुन्हा उत्सुकतेने घुर्र घुर्र असे चमत्कारीक आवाज काढू लागली.

कित्येक सेकंद रतन तो आकडा पूर्ण उचलण्याचा प्रयत्न करत होती. पण आधीच दोन्ही हात दुखावलेले आणि त्यात ती महाभयंकर तुळई! जमेचना ते तिला! भुवयांमध्ये न मावणारा घाम डोळ्यावर येऊ लागला तशी हतबल होऊन पदराने चेहरा खसाखसा पुसून ती पुन्हा जोर लावू लागली.

आणि अचानकच! अचानकच ते घडले! अतिशय भयावह, अत्यंत अनपेक्षित असे!

रतनच्या कानापाशी तीव्र कुजबुजण्याचा आवाज आला!

"तुला यकटीला नाई जमायचं! हां! आता उच्चल"

दोनाचे चार हात झाले, तुळई आकड्यातून निघाली, सरकली, तुळई काढणार्‍यांचा तोल जाईल इतके भयंकर वजन होते तिचे! असणारच, शेवटी मशालकरासारखा अजस्त्र देह पेलणारा झोपाळा त्या तुळईला लटकलेला होता. सरकलेली तुळई हातातून सटकली! काहीही कळायच्या आत भयानक वेगाने खाली गेली! पहिल्यांदा झोपाळ्याच्या बारवर पडली त्याचा भयानक आवाज झाला. पण तेथे ती अर्थातच स्थिरावली नाहीच. बारची शकले करून ती मशालकरच्य मानेवर पडली आणि मशालकरच्या गळ्यातून एक विचित्र दबलेला आवाज निघाला! समाप्त!

मान मोडलेला मशालकर जमीनीवर अस्ताव्यस्तपणे पडलेला होता.... आवाजाने दचकून दिवे लावले जात होते.... धडपडत पावले धावल्याचे आवाज येऊ लागले होते... पण रतन??????

रतनचे नुसते डोळेच खाली बघत होते...... मेंदू मागच्या बाजूचा विचार करत होता.... तेवढ्यात तिच्या कानाशी पुन्हा आवाज आला.......

"जाऊन निज जाग्यावं! आन् घोराया लाग, मीबी घोरते न्हेमीसार्खी"

शांतपणे सुकन्या पुन्हा पलंगावर जाऊन घोरू लागली होती.

=====================

-'बेफिकीर'!

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अफाट
पुढचा भाग जेव्हढा लवकर टाकता येईल तेव्हढा लवकर टाका, आता उत्सुकता खुपच वाढली आहे.>>>>>>+१००१

भन्नाट!!!!!!!!!!!
पुढचा भाग जेव्हढा लवकर टाकता येईल तेव्हढा लवकर टाका, आता उत्सुकता खुपच वाढली आहे. >>>>>>+१०००००००००००००००००

जब्रि लिहिलय...... ते तुळई काढण्यापासुनचे वर्णन ३-४ वेळा वाचले इतके भन्नाट लिहिले आहे.

आणि वाचताना तर कित्येकदा माज्याच छातीचे ठोके वाढलेले.

लवकर ताका पुढचे भाग

बापरे.................................. अफाट लिहिलेय की बेफिजी तुम्ही.............खुप मजा येतेय आता

अपेक्षेप्रमाणे सुरेख

पण

सर्वसाधारणपणे मुली ह्या वडीलाच्या जास्त जवळ असतात

असे असताना दोन्ही मुली वडीलाच्या जीवावर उठल्या म्हणजे ते वडील कसे असतील..

पुढील भागात ह्याचा उलगडा होईलच

mast jitke trak karawet tyachya peksha weglach kahitari
bhayanak dhake deta tumhi

Pages