वाहतूक समस्या

Submitted by Anvita on 14 January, 2014 - 22:50

पुण्यातली वाहतूक व्यवस्था अपुरे रस्ते आणि वाढत्या गाड्या यामुळे फारच विस्कळीत झाली आहे. त्यात परत वाहतूक नियम न पाळणार्यांची संख्या पण खूपच आहे. अगदी तरुण मुले , मुली, काका, काकू ते पार वयस्कर लोन्कांपर्यंत सर्व वयोगटातील माणसे सिग्नल तोडत असतात . समजा आपण सिग्नल हिरवा व्हायची वाट बघतोय व सिग्नल बदलायला १० सेकंद उरली असली तरी लोकं मागून होर्न वाजवतात जणू काही आपण सिग्नल ची वाट पाहणे हा गुन्हा आहे. मधूनच भसकन indicator न दाखवता वळणे अगदी इतक्या जवळून जाणे कि गाडी घासली जाते कि काय असे वाटते.
हि समस्या पुण्यातच असेल असे नाही आणि सगळेच पुणेकर वाहतूक नियम तोडत असतात असेहि नव्हे पण आजकाल ' काय वाईट ट्राफिक आहे' हे बर्याच वेळा एकू येते . बरेच वर्षे अमेरिकेत राहिल्यामुळे असेल पण ह्या गोष्टींचा त्रास होतो . आता सवय झाली आहे. पण अशी सवय आपण करून घेतो . आपण वाहतुकीचे नियम पाळणे एवढेच आपल्या हातात असते .
आपले ह्याबाबत अनुभव काय आहेत? किंवा यावर उपाय काय?

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हेच बेशिस्त लोक परदेशात गेले कि अगदी व्यवस्थित वागतात व इथे आले की परत ये रे माझ्या मागल्या. प्रबोधन व शिक्षा या दुधारी हत्याराने शस्त्रक्रिया केल्याशिवाय वाहतूक प्रश्न सुटणार नाहीत. प्रबोधनाची तमा नाही व शिक्षेचे भय नाही असे असल्यावर वाहतूक अराजक माजेल नाहीतर दुसर काय होणार?
सध्या पुण्यात तर अशी परिस्थिती आहे की वाह्तुकीचे नियम पाळण्याचा प्रयत्न केला तर जीव धोक्यात येण्याची शक्यता बळावली आहे. पुर्वी निदान ज्याला वाहतुकीचे नियम पाळण्याची इच्छा आहे त्याला तशी मुभा होती. आता मी तर नियम पाळणार नाहीच पण तुही पाळशील तर खबरदार. तुझ्या नियम पाळण्याने माझ्या नियम न पाळण्याच्या मुलभूत अधिकारावर गदा येते. लाल दिवा लागला असला तरी मागून पॅ पॅ हॉर्न वाजवत बसतात.

मुख्य रस्त्यांवरील बेशिस्तीची उदाहरणे इथे घेतली जात आहेत; पण मी वारंवार प्रवास करीत असलेल्या कोल्हापूर ते पुणे तसेच पुणे ते कोल्हापूर या पट्ट्यात येणा-या ४ टोल नाक्यावरील शिस्तीचा प्रकार अगदी अंगावर येणारा आहे. फ़क्त पहाटे ४ ते ६ हे दोन तास सोडले तर बाकीचे २२ तास सदोदित गर्दी असते आणि त्यातच मग मी पुढे तुझ्यापेक्षा कसा जातो यातच मर्दुमकी दाखविणारे लाखाचे लाल दिसतात. एरव्ही महाबळेश्वरला तब्बल दोन दिवस लोळून, दंगा करीत असलेली ही पोरे आणि त्यांच्या गाड्या टोल नाक्यावर आल्या की इतरांपेक्षा माझीच गाडी कशी पुढे जाईल हाच यांचा गहन प्रश्न असतो, दोन गाड्या पुढे असल्या तरी यांचे कर्णकर्कश्श हॉर्न्स केकाटत असतात....याबाबत जरी अन्यांशी तूतू-मैमै झाले तरीही तिथे असणारा हवालदार पुढे येत नाही....अशाच एका ड्युटीवरील पोलिसांला आम्ही हस्तक्षेप का करत नाही ? असे विचारले तर, ती जबाबदारी टोल नाकेवाल्याची आहे, आमची नाही...असे फ़र्मास उत्तर मिळाले.

टोल नाक्याची वसुलीही चीड आणणारीच आहे....६६ रुपये कारसाठी ? असा विचित्र आकडा कशासाठी ? हाच आकडा ६५ का केला जात नाही...? किंवा जाऊ देत आमचे जादाचे चार रुपये आणि करा ना ७० रुपये ! म्हणजे त्या एका रुपयावरून होणारे वैतागाचे वाद थांबतील आणि वाहतुकीला काही तरी शिस्त लागेल.

हे करण्यासाठी पोलिसांना कसलेही अधिकार नाहीत, ही बाबही यातून समोर आली आहे.

अन्विता.. अमेरिकेतून परत आल्यावर (खरंतर अमेरिकेला जायच्या आधीपण) या गोष्टीचा खूप त्रास व्हायचा (अर्थात अजूनपण होतो पण कमी होतो). नियम न पाळणार्‍यांवर, गाडी व्यवस्थित न चालवणार्‍यांवर खूप चिडचिड व्ह्यायची. बर्‍याचदा त्यांना शिव्याही घातल्या. पण साधारण १ वर्षात लक्षात आलं की त्यानं फक्त आपल्यालाच आणि आपल्या कुटंबाला त्रास होतो. शिवाय कधी कुठल्या गाडीत कुठल्या टाइपचा माणूस बसला असेल हे माहिती नाही. ट्रॅफिक पोलिसांशीही (पुणे ट्रॅफिक डीवायएसपीशी) बर्‍याचदा बोललो. पण तेही फार काही करू शकत नाहीत असं दिसलं. शेवटी मी हाच निष्कर्श काढला की जोपर्यंत असल्या मेंटॅलिटीची लोकं आहेत (ज्यांना दुसर्‍यांच्या सोडा पण स्वतःच्या जीवाचीही काळजी नाही) तोवर आपल्या देशाचं (अ‍ॅट लीस्ट ट्रॅफिकचं) काहिही होउ शकत नाही. तेव्हापासून मी फक्त एवढंच करतो की स्वतः नियम पाळतो आणि कुटंबियांना/मित्र परीवाराला नियम पाळायला लावतो/सांगतो. लोकांना शिकवण्याच्या भानगडीत पडत नाही Happy

काही लोकांचा काय प्रोब्लेम आहे कळतच नाही म्हणजे XXXX खाली गाडी आली कि डोक्यात हवा, मग समोरचा एकदम फालतू, अशी विचित्र मानसिकता. समोर कोण आहे ?? काय बोलत आहे असे काही नाही, शब्दाला अडत बसायचे आणि वाईट शिवराळ बोलयाचे मग कोणी बाई समोर असेल तरी आपली मर्दानगी बडबड सिद्ध करायची.
बेफिकीर म्हणाले तसे बेशिस्त व नियम मोडणार्‍या वाहनचालकांना चक्क थोत्रीत देण्याची शिक्षा द्यायला हवी आहे.

इथे पुणे शहरातील चर्चा सुरु आहे आणि मुंबई शहराविषयी काहीच पोस्ट आले नाही आहेत Sad

मध्य मुंबईमध्ये रिक्षा सोडत नाहीत त्यामुळे आमची नेहमीची BEST बस ची सवय आहे. एक तर रिक्षावाले इतके माजोर ( त्या बद्दल वेगळा धागा होईल )
BEST सारखी स्वस्त आणि मस्त सेवा आणि चालक-वाहक सगळे मराठी, आवडते आपल्याला.
एकदा बाईकवाले २ मुले स्वतःच्या चुकीने बस ला थडकले तर चक्क एकाने बस driver ला वाईट शिवी दिली. बस driver काय बोलणार (थोडे वयस्कर होते) मग एक ट्रॅफिक पोलिसाने चांगलेच दोघांना ऐकवले.
एकदा वाहकाने बस खच्चून भरली होती म्हणून एकाला चढू नाही दिले तरी हा चढलाच आणि वरन हुज्जत घालत त्या बस वाहकाचे शिक्षण काढू लागला, असले डोक्यात जातात हे प्रकार.

मुंबई मध्ये शरद रावांच्या कृपेने चांगलेच रिक्षाचे फावले आहेत आणि BEST बस सारखी सेवा बुडीत जात आहे आणि अजून बुडीत कसे जाणार हेच प्रयत्न. अरे, BEST सारखी नौकरीवर मुंबईतील हजार कुटुंबे पोसत आहेत त्याचे काही नाही.

बऱ्याच बायकांना आणि लहान मुलांना गाडी चालवता येत नाही (परवडत पण नाही) त्यांचे काय ?? चांगली , सुरक्षित सार्वजनिक वाहतूक मुंबई-पुणे सारख्या शहरात असावी या साठी काहीच उपाय कसे नाहीत आणि प्रयत्न पण नाहीत.

मुंबई-पुणे शहराला दिल्ली बनायला काय वेळ लागणार आहे, असेच असह्य वाटत आहे. मग घाला सौदी सारखे काळे बुरखे आणि बंद करा ७ नंतर बाहेर पडणे, निदान सौदीमध्ये १०० कोडेची शिक्षा आहे, इथे तर ते पण जात-पात , मंत्री-संत्री यांना माफ असेल.

शिवाय दुचाकीवर मागे बसणार्‍या बायकामुली हा स्वतंत्र विषय असतो. त्यांचे 'हवामें उडता जाये' श्टाईल ओढण्या, पदर पंधराहात दूरपर्यंत फडफडत असतात. अगदी रिक्षात साईडला बसलेले असतानाही. स्वतःचा किंवा दुसर्‍याचा शब्दशः जीवघेणा अपघात होऊ शकतो हे मठ्ठ डोक्यात येतच नाही. किंवा मोटरसायकलवर एक साईडला बसून मांडीवर एका हातात लहान मूल, दुसरा हात नवर्‍याच्या खांद्यावर हे तर प्रचंड डोक्यात जातं. बाजारात बाळांसाठी सेफ्टी हार्नेस मिळतात ती आणली तर काय जहागिरी खर्च होणार असते का?

अस्ल्या लोकांना बघुन मलाच ट्रॉमा होतो. बाप्यामाणुस बाईकवर हेल्मेटशिवाय बसलेला असतो, पेट्रोल टाकीवर ४-५ वर्षाचे मुल आरामात जत्रेत चालल्यासारखं इकडेतिकडे बघत बसलेलं असतं. बाप्याच्या मागे त्याची बायको एका साईडने बसलेली असते, कधीकधी नीट बसलेलीही नसते. मांडीवर वर्षाचं बाळ असतं, बाईचा पदर उडत असतो. एक हात बाळाला सावरत आणि एका हाताने नव-याला धरलेलं आणि असे कुटूंब घेऊन तो दैवी बाप्या मोठ्या गाड्यांना कट मारत इकडुन तिकडुन आपली बाईक पुढे काढत असतो. आपण किती मोठी रिस्क घेऊन गाडी चालवतोय याची त्याला अजिबात कल्पना नसते.

मी अतिशयोक्ती करत नाहीय, नव्यामुंबईच्या रस्त्यांवर अशी कुटूंबे ढिगानी सापडतात. मला त्यांना बघुन जाम भिती वाटते. त्यात बाईने जर नायलॉनची साडी नेसलेली असेल तर ती बाई सीटवरुन घसरुन तर पडणार नाही ना ही भितीही मला वाटत राहते. असल्या दैवी लोकांच्या मागे मी माझी गाडी अजिबात ठेवत नाही. जितके होईल तितके दुर पळते त्यांच्यापासुन. उगीच त्यांच्या चुकीने अपघात व्हायचा आणि मी जायचे जेलात Happy

त्यात बाईने जर नायलॉनची साडी नेसलेली असेल तर ती बाई सीटवरुन घसरुन तर पडणार नाही ना ही भितीही मला वाटत राहते.>>> मलापण हा प्रश्न कायम पडतो.

आमच्याकडे चेन्नईला एक वेगळीच मज्जा आहे. इथे बसेसचे रूट हे जास्तीत जास्त मूर्खपणे कसे आखता येतील असा विचार करून आखलेले आहेत. म्हणजे आमच्या घरापासून कोलातूर तेरा किमी अंतरावर आहे. बसच्या रूटने तेवढेच अंतर पंचावन्न किमी आहे. (तेही सलग एकाच बसमधे नव्हे. तीन बस आणि दोन शेअर ऑटो बदलून) चेन्नईच्या लोकल्स ब्रिटीशांनी बांधल्या त्यानंतर त्यामधे काहीही फरक नाही, त्याच रूटवर लोकल्स धावत आहेत. पब्लिक ट्रान्स्पोर्टचा असा बोजवरा असल्याने साहजिकच कार असणं मस्ट किंवा टॅक्सी मस्ट. परिणामी ट्राफिक जाम नेहमीचंच. शिस्त वगैरे विषय इकडे नस्ल्याने तो प्रश्न येतच नाही.

अस्ल्या लोकांना बघुन मलाच ट्रॉमा होतो.>> अगदी अगदी.
मी एकदा एका लहान मुलीचा अपघात होता होता थांबलेला काही फुटांवरून बघितलं आहे. चूक पूर्णपणे (सुशिक्षित आणि स्टायलिश) आईबापाची होती. वेगात येऊन वेडावाकडा कट मारत कच्चकन ब्रेक मारताना शेजारच्या बाईकवर मागे बसलेल्या पोराची जीन्स यांच्या बाईकला घासून फाटून मांडीवर जखम झाली आणि सलवारकुर्ता घालूनही एका बाजूला बसून आईने अल्लाद धरलेलं पिल्लू चेंडूसारखं उडून चौकाच्या मध्यभागी. सिग्नल सुटलेला. बसचा रस्ता. त्या जखमी पोराने बाकी कुणी रिअ‍ॅक्ट व्हायच्या आत धाव घेऊन त्या पिल्लाला उचलून आणलं होतं. तो नसता तर काय झालं सांगता येत नाही!

अशोक,
त्या दंडाच्या पावतीवर दंड कोठे पाठवायचा तो पत्ता असतो. तसेच पोलिसपण स्वतःकडे तेव्हाच गाडीचा नंबर व गुन्ह्याची नोंद करुन रेकॉर्ड तयार करतोच. दंड भरला नाहीतर व्याजासहीत नविन दंड काही महिन्याने, वर्षाने गाडीच्या नंबरावरुन पत्ता मिळवुन पाठवु शकतात. ड्रायवर कोणी का असेना. म्हणुन आपली गाडी कोणाला आपण नसताना चालवायला देऊ नये.
हे चूकीचे लिहिले असेल तर ह्याबद्दल कोणाला वेगळी माहिती असेल तर दुरुस्त करा.
दंडाच्या पावतीवर पत्ता असतो हे पाहिले आहे.
६ वर्षांनी माझ्या शेजारणीला, २५ डॉलर्स चा दंड फुगुन जो ३००-३५० डॉलर्स झाला होता तो पत्राद्वारे पाठवला गेला होता हे पाहिले होते. तिचा प्रश्न जरा वेगळा होता. ती दुसर्‍या राज्यात होती. तिने दंड तेव्हाच भरला होता पण कसे कोण जाणे पोलिसांकडे ते नोंदवले गेले नसावे त्यामुळे तिने दंड भरला नाही असे वाटुन तिला भलामोठा दंड आकारला गेला. दुर्दैवाने तिने दंड भरल्याची पावती इतक्या वर्षानंतर ठेवली नव्हती म्हणुन तिच्याकडे पण पुरावा उरला नाही. तिने नंतर काय केले विचारले नाही.

ह्या सगळयाच्या मुळाशी शहरांची वाढती लोकसंख्या आहे त्या शिवाय टाटा मोटर्स सारखे उद्योग १ लाख रुपयात कार हा प्रयोग करत आहेत. सार्वजनीक वहातुक सुधारल्याशिवाय पुण्यासारख्या शहरांचा प्रश्न सुटणार नाही.

मुंबईचा माझा अनुभव लोक रहदारीच्या नियमांचे कसोशीने पालन करतात शिवाय सार्वजनीक वहातुक सुध्दा पुण्यापेक्षा उत्तम आहे त्यामुळे लोकसंख्येच्या मानाने खाजगी वाहनाने प्रवास करणारे मर्यादीत आहेत.

पुण्याच्या वहातूक समस्येमधे मुळ कारण हे राजकारण आणि अर्थकारण हेच आहे. केवळ बेशिस्त वहातुकीवर ठपका ठेवता येत नाही. पुण्याचा चौफेर विस्तार करण्याची योजना जेव्हा आखली जाते तेव्हा शहराच्या अंतर्गत व्यव्स्थेवर येणार्‍या समस्येचा विचारच केला गेला नाही.

सार्वजनिक वहातूक व्यवस्थेचे तिन-तेरा वाजले आहेत. सध्याचा परिस्थितीत त्यावर अवलंबुन रहाता येत नाही किंवा ते वेळ्खावू, त्रासदायक आणि खर्चिक झाले आहे.

मी रोज नोकरी निमित्ताने पुणे-चिंचवड (२३ किमी ) प्रवास करतो. सुरवातीला स्वतःची दुचाकी वापरत होतो तेव्हा ऑफिसला जाताना अर्धा तास व येताना पाउण तास लागायचा. पेट्रोल चा खर्च रोजचा ७० रु. गाडी नसेल तेव्हा पिएम्पी ने आलो तर तिकिट दोन बस बदलून ६० रु. आणि लागणारा वेळ जाताना पाऊण तास तर येताना दिड ते दोन तासा पर्यंत.

नशिबाने पिंचिमधे येणासाठी लोकल ट्रेन ची सुविधा आहे ती वापरल्यास येणारा खर्च रोजचा १० रु. महिन्याचा पास काढल्यास फक्त ८५ रू. किंवा प्रथम श्रेणी चा ४४० रू. आणि लागणारा वेळ जाताना पाउण तास तर येताना लोकलच्या बेभरवशी वेळापत्रकामुळे १ ते २ तास. पण सध्या मी याच सुविधेचा लाभ घेत आहे. थोडा वेळ जातो पण पैसे वाचतात आणि महत्वाचे म्हणजे श्रमही पाठदुखी साठी डॉक्टर कडे जायची गरज नाही पडत.

माझे घर स्टेशन पासुन जवळ आहे त्यामुळे हा फायदा झाला पण कात्रज, सिंहगड रोड, हडपसर भागातून चिंचवड ला जाणार्‍यांना बस पेक्षा स्वतःची गाडी वापरणे हाच पर्याय योग्य वाटतो

थॅन्क्स सुनिधी....

दंड कोणत्याही स्थितीत वसूल केला जातो आणि तो सरकार दरबारी जमा होतो ही बाब विशेष उल्लेखनीय वाटते मला. आता अमेरिकन वाहतुक दंड पद्धत आणि इथली पद्धत यांची तुलना होऊ [च] शकत नाही अशी स्थिती असल्याने तेथील परिस्थिती इथे कधी येईल ही आशासुद्धा नाही.

मुंबईचा माझा अनुभव लोक रहदारीच्या नियमांचे कसोशीने पालन करतात शिवाय सार्वजनीक वहातुक सुध्दा पुण्यापेक्षा उत्तम आहे त्यामुळे लोकसंख्येच्या मानाने खाजगी वाहनाने प्रवास करणारे मर्यादीत आहेत.>>+१००००

स_सा अगदी बरोबर. पण जर मोजक्या बसस्टॉपजवळही (जिथुन जलद वाहतुक शक्य आहे) विशेष पार्किंग केले तर पाँईंट टू पाँईंट (घर ते ऑफिस) जाणारे लोकं या सुविधेचा फायदा घेतील हे नक्की. आता पार्कींगलाच जागा नसेल (ठेवली नसेल तर) तर आधी अंड की मुर्गी प्रकार होवू शकेल. बीआरटी बहुदा अहमदाबाद व्यतिरिक्त इतरत्र फारशी सुरुच झाली नाही किंवा वाढवल्या गेली नाही.

वर लिहिलेली चौकांमध्ये /सिग्नलला कॅमेरा लावायची आणि नियम तोडल्यास चालान पोस्टाने घरी पाठवण्याची पद्धत अहे इथे दिल्लीत किमान ५-६ वर्षांपासून तरी. (गाडीची आरसी ज्या व्यक्तीच्या नावावर असते त्या व्यक्तीच्या नावे आरसीमध्ये दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने चालान येते.)

सहा वर्षांपूर्वी आम्ही गावाला गेलेलो असताना नवर्‍याची बुलेट घेवून दीर कुठेतरी गेला होता आणि त्याने सकाळच्या वेळी घराच्या जवळच्याच चौकातला एक सिग्नल तोडला. आम्ही गावाहून आलो तर घरी चालान आलेले होते. त्यावर नियम कुठे मोडला त्या ठिकाणाचं नाव, तारिख आणि वेळपण होती. चालान कुठे जावून भरलं ते मात्र आठवत नाहीये.
एकदा एअरपोर्टजवळ गाडी थांबायला बंदी असताना २ मिनीट गाडी रस्त्यावर थांबवल्याने आमच्या ड्रायव्हरकाकांचं चालानही घरी आलं होतं आणि एकदा स्पीड लिमिट क्रॉस केल्याबद्दलचं.

ट्रॅफिकच्या नियमांबाबत चंदिगढ सगळ्यात जास्त स्ट्रीक्ट आहे असा अनुभव आहे.

होईल लवकरच.

इथे त्या नव्या डिजिटाइझ्ड आरसी /लायसंस बरेच वर्षांपासून आहेत बहूतेक. त्यामूळे आधी इम्प्लिमेंट झालं असेल. तसेही ट्रॅफिकचे नियम बर्‍यापैकी पाळले जातात. चारचाकीमध्ये समोरच्या दोन्ही सीटवरील व्यक्तींनी सीटबेल्ट्स लावणे, कारसीट नसली तरी लहान मुलांना पुढे न बसवणे, दुचाकीवरील दोन्ही व्यक्तींनी हेल्मेट घालणे (मागे बसलेल्या बायकांना आणि सरदारांना सुट बहूतेक आहे यात.. ती बंद करावी म्हणून गेल्यावर्षी पोलिस खूप प्रयत्नात होते. मी सिग्नल तोडताना बघितलं नाहीये अजून कुणालाच. स्पिड लिमिट पण रस्ता मोकळा असला तरी पाळली जाते... कारण घरी चालान येईल ही भिती असते. दंडाची रक्कम पण चांगली भरभक्कम आहे.

आणि हो मध्यंतरी ड्रंक अँड ड्राइव्हमध्ये पकडलेल्या काही लोकांना ट्रॅफिक पोलिसांची दोन दिवसांची कार्यशाळा अटेंड करणे आणि आठवड्यातून काही तास पोलिसांबरोबर ट्रॅफिक ड्युटी बजावणे अशी शिक्षा दिल्याचंही पेपरात वाचलं होतं.

नियमांचा भंग केल्यास आरसीच्या पत्त्यावरून पत्र घरी पाठवणं हे पूर्वी क्वचित व्हायचं पुण्यातही (खरं तर तसाच नियम आहे)

मला एकदा किती तरी डिसेंबर, २१६५ या दिवशी सकाळी ९ वाजता अप्पा बळवंत चौकातला लाल सिग्नलचा भंग केल्याबद्दल संबंधित अधिकार्‍यासमोर हजर रहायचं पत्र आलं होतं. माझं नाव बरोबर असलं तरी आडनाव वेगळंच होतं आणि दीडदोनशे वर्षांनंतर तर जाऊ द्यात पण त्याआधी सुमारे दोन महिने मी पुण्यातच नसल्याने ते माझ्यासाठी नव्हे हे मला कळलं होतं... आता २१६५ साली मला लाल सिग्नलचा भंग करायचा पुरेपूर अधिकार आहे असा माझा समज आहे Proud
खरंतर ते पत्र मी जपूनच ठेवलं होतं. असेल कुठेतरी पुण्याच्या घरी, स्कॅन करून टाकलं पाहिजे!!

अजून एक महत्वाचा प्रश्न म्हणजे रस्त्यातून जाणार्या म्हशी !
हो बरोबरच वाचताय तुम्ही पुण्यात भर रस्त्यातून म्हशी आणि त्यांच्या मागे त्यांचा मालक असे निवांत जात असतात . मग आपण गाडी बाजूला घ्यायची त्या म्हशींना आदराने जाऊन द्यायचे .
हे चित्र अगदी वारंवार नाही तरीही अधूनमधून दिसतेच .

रस्त्यात वेड्यावाकड्या, डबल पार्किंग केलेल्या गाड्या बघितल्या ना की संताप येतो. अनेकदा बायको मस्त घासाघीस करत भाजी घेतेय आणि नवरोबा भर रस्त्यात गाडी थांबवून बसलेत असे दिसते.

वाटतं की एक रणगाडा घ्यावा आणि सरळ अश्या बेशिस्तपणे पार्क केलेल्या गाड्यांना चिरडून टाकावे.

वाटतं की एक रणगाडा घ्यावा आणि सरळ अश्या बेशिस्तपणे पार्क केलेल्या गाड्यांना चिरडून टाकावे.>>>>> डोळ्यासमोर आले ते.:फिदी:

वाटतं की एक रणगाडा घ्यावा आणि सरळ अश्या बेशिस्तपणे पार्क केलेल्या गाड्यांना चिरडून टाकावे. >>. अगदी. अगदी. मला वाटलं फक्त मलाच असे हिंसक विचार येतात की काय Wink वेलकम टू क्लब.
बरेचदा उतरून बदडून काढावे वाटते त्या डबल पार्क लोकांना पण संस्कार करु देत नाहीत. Proud

पण तरी मी त्यांना जमेल तसे सांगत असतो की तुम्ही शिकलेले दिसता असे करू नये. एकदा एका बाईने ( असेल २५ / ३० ची) तर अहो तुम्हाला हे म्हणायचा अधिकार नाही, तुम्ही देखील शिकलेले नाहीत म्हणून असे म्हणता, माझी गाडी, मी कुठेही डबल पार्क करेल असे म्हणले. यावर मी देखील, हो ना बाई, मी शिकलेला नाही तरी सांगतोय, आता तरी सुधरा असे सुनावले !

भारतात ट्रॅफिक कधीही सुधारणार नाही ह्याची मला खात्री आहे. अहो शाळेच्या बसेस सुद्धा उलट्या दिशेने धावताना मी रोज पाहतो. फर्गेट अबाऊट शिकलेले इडियटस. बस मालकाकडे तक्रार केली, तर अहो रस्ता मोठा आहे, दुसरे कोणी काही म्हणत नाहीत असे त्यांनी ऐकवले. शाळेत तक्रार केली, पाहू असे उत्तर आले. काही फायदा नाही. मुलीला त्या बस मध्ये आता मी पाठवत नाही.

बाकी अमेरिकेकडून एवढे (च)/(ही) शिकले तरी खूप प्रगती होईल.

हाय वे वर उलट बाजूने येणार्‍या गाड्या आणि बाईक्स बघितल्या आहेत का? ही मंडळी हेडलाईट लावून येतात. एका प्रसंगी चालकानी "लाईट लावालाय ना" असं उलट सुनावलही होतं. जणू काही हेड्लाईट लावला कि ह्यांना हक्कच मिळतो राँग साईडनी यायचा!

वरदा, चुकून टाईममशीनमधे बसून भूतकाळात जाण्याऐवजी भविष्यात जाऊन सिग्नल तोडून आलीस का? (विज्ञानकथेला मटेरीअल भारी आहे)

मी एकदा पुण्यात "अलूरकर म्युझिक" मधे गेलो होतो. परत आलो तर माझ्या दुचाकी मागे एक चारचाकी गाडी उभी आणि चालक गायब. पाच सहा मिनिटे थांबलो पण त्याचा पत्ता नाही. मग शेवटी गाडीची खिडकी उघडी होती म्हणून हॉर्न वाजवायला लागलो तर हा चालक शेजारच्या दुकानातच उभा होता तिथून पळत आला आणि म्हणे गाडीला हात लावू नका. जोरदार भांडण झालं माझं त्याच्याशी. तो म्हणे नेहमी अशीच गाडी लावतो आणि काही होत नाही. म्हणजे ट्रॅफिकचा नियम मोडल्याच आणि दुसर्‍याला त्रास झाल्याच दूर राहिलं वर हा ते कसं चालतं हेच सांगत होता! माझा आरडा ओरडा ऐकून जाणारे लोक "जाउद्या जाउद्या" म्हणत होते. शेवटी माझाच घसा दुखायला लागल्यावर त्याला गाडी हलवायला लावली आणि निघालो.

अमेरिकेत सामाजिक मूल्य खूपच जपली जातात आणि त्यामागे एकानी शिस्त पाळली नाही तर सगळेच तसं करतील आणि मग सगळ्यांनाच त्याचा त्रास होईल ही जाणीव असते. शाळांमधे सुद्धा तसं शिकवलं जातं. आपल्याकडे शिकून सवरूनही हे का कळत नसावं लोकांना? चक्रीवादळ येउन गेल्याच्या दुसर्‍या दिवशी ट्रॅफिक सिग्नल बंद आणि पोलीस नाही अशा स्थितीतही लोक नियम पाळत होते हा अनुभव मी स्वतः घेतलाय अमेरिकेत. आपल्याकडे दररोजच्या जीवनातही हे का जमू नये?
अमेरिकेत पोलीसाला अक्षरशः घाबरतात लोक (विषेशतः आपण भारतीय). पोलीसानी थांबवल्यावर "घ्या मिटवून" "बघा जरा चहा पाण्याचं" असलं काही बोलायची हिंमतही नसते. आपल्याकडे मात्र गृहितच असतं कि थोडे पैसे द्यायचे आणि जायचं निघून. हे असं का हा प्रश्न सारखा पडतो मला.
ह्या धाग्यावर चाललेल्या चर्चेमधे सगळेच लोक नियम पाळायच्या बाजूनी आहेत. आणि ते आपण रहातो ह्याच समाजाचे एक सँपल आहे. मग न पाळणारे एवढे सगळे कोण आहेत?
समोर लागलेला लाल दिवा आपण हॉर्न वाजवल्यानी हिरवा होणार नाही आणि तो होईपर्यंत समोरचा माणूस हलणार नाही हे न कळण्या एवढे तर मूर्ख लोक नक्किच नाहित. तरीही तसं का करतात? नियम मोडून दाखवणे ही "स्टाईल" झाली आहे का?
ओळखीचे एक काका म्हणाले होते कि उत्तर भारतातून जेव्हा पासून इथे कॉलेजला जाणारी मुलं यायला लागली तेव्हापासून हे प्रकार वाढीला लागले कारण त्यांच्यात बेदरकार प्रव्रुत्ती जास्त असते आणि त्यांच्याकडे पोलीसाला चारायला खूप पैसे असतात. पण अल्पना म्हणत आहेत कि दिल्ली , चंदिगढ मधे बरीच चांगली परिस्थिती आहे. मग ही प्रवृत्ती आली कुठून?
आपल्याकडेही शाळेत शिकवतात कि "नागरिक शास्त्र आणि सामुदायिक जीवन". किती वेळा परत शिकवायचं ते? कंबरडं मोडेल एवढा आर्थिक किंवा शारिरिक दंड हा एकच उपाय असू शकतो का?

चौकट राजा , इथे एक, दोघांनी सिग्नल तोडला कि त्यांच्या मागे ७-८ जण तोडतात . जणू काही आपण सिग्नल तोडला नाही तर दंड होईल काल सुद्धा एका चौंकात आम्हाला हिरवा सिग्नल होता पण एक माणूस सिग्नल तोडून आला तेव्हा नवर्याने जोरात होर्न वाजवला पण त्याच्या चेहऱ्यावर अजिबात अपराधी भाव नव्हता . ह्या वृत्तीला काय म्हणावे ?

हाय वे वर उलट बाजूने येणार्‍या गाड्या आणि बाईक्स बघितल्या आहेत का? ही मंडळी हेडलाईट लावून येतात. एका प्रसंगी चालकानी "लाईट लावालाय ना" असं उलट सुनावलही होतं. जणू काही हेड्लाईट लावला कि ह्यांना हक्कच मिळतो राँग साईडनी यायचा!

हे ठाणे बेलापुर रोडवरही खुप आहे. असे वेगात येतात जणु राजरोस असेच यायचे असते. अशा वेळी ट्रॅफिक पोलिस कुठे मेलेले असतात देव जाणे.... जाउदे, उगीच चिडचिड नकोच आता.... मी गाडी चालवणेच बंद केलेय ....

आणि पेड पार्किगमध्येही गाडी कुठे सुरक्षीत आहे? गेल्या आठवड्यात नेरुळच्या पार्किंग्मध्ये माझ्या गाडीला कोणीतरी बाजुने घासले. पैसे घेणा-या सज्जनाच्या लक्षात हे आणुन देताच त्याने हे शक्यच नाही असा पवित्रा घेतला. त्यानंतर गाडी बेलापुर स्टेशनात ठेवायला लागले. अजुन काही दिवसात गाडी घराखाली ठेवणेच सगळ्यात सेफ हा बोध होईल... Happy

फक्त दिल्लीत असेल तसे, बाकी उत्तर भा.त नसेलही>>> हो सगळीकडे नाहीये. दिल्लीमध्ये राजधानी असल्याने कदाचीत स्ट्रीक्ट आहेत पोलिस. पण आमच्याकडे पण आहेत्च की आमच्या ट्रॅफिक समस्या. त्यात सायकल रिक्शा आणि हल्ली नव्या आलेल्या बॅटरीवाल्या इ-रिक्शांचा प्रश्न खूप मोठा आहे. इ रिक्शा तर खूप्च रिस्की आहेत.

आणि चंदीगडमध्ये पण बरेच स्ट्रिक्ट आहेत. पण बाकी पंजाब-हरियाना, युपीमध्ये ट्रॅफिकचे नियम असतात का असं विचारवं अशी स्थिती आहे. स्पेशली युपीमध्ये.

Pages