वाहतूक समस्या

Submitted by Anvita on 14 January, 2014 - 22:50

पुण्यातली वाहतूक व्यवस्था अपुरे रस्ते आणि वाढत्या गाड्या यामुळे फारच विस्कळीत झाली आहे. त्यात परत वाहतूक नियम न पाळणार्यांची संख्या पण खूपच आहे. अगदी तरुण मुले , मुली, काका, काकू ते पार वयस्कर लोन्कांपर्यंत सर्व वयोगटातील माणसे सिग्नल तोडत असतात . समजा आपण सिग्नल हिरवा व्हायची वाट बघतोय व सिग्नल बदलायला १० सेकंद उरली असली तरी लोकं मागून होर्न वाजवतात जणू काही आपण सिग्नल ची वाट पाहणे हा गुन्हा आहे. मधूनच भसकन indicator न दाखवता वळणे अगदी इतक्या जवळून जाणे कि गाडी घासली जाते कि काय असे वाटते.
हि समस्या पुण्यातच असेल असे नाही आणि सगळेच पुणेकर वाहतूक नियम तोडत असतात असेहि नव्हे पण आजकाल ' काय वाईट ट्राफिक आहे' हे बर्याच वेळा एकू येते . बरेच वर्षे अमेरिकेत राहिल्यामुळे असेल पण ह्या गोष्टींचा त्रास होतो . आता सवय झाली आहे. पण अशी सवय आपण करून घेतो . आपण वाहतुकीचे नियम पाळणे एवढेच आपल्या हातात असते .
आपले ह्याबाबत अनुभव काय आहेत? किंवा यावर उपाय काय?

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अन्विता,

१. तुम्ही कळकळ मांडलीत, पण कारणमीमांसा, उपाय याबाबत स्वतःची मते नोंदवली असतीत तर तेही आवडले असतेच.

२. अगदी प्रामाणिकपणे सांगायचे तर बेशिस्त व नियम मोडणार्‍या वाहनचालकांना चक्क थोत्रीत देण्याची शिक्षा द्यायला हवी आहे. ज्या दिवशी जातपात, आर्थिक दर्जा, वय, लिंग ह्यातील काहीही न बघता सर्वांसमक्ष श्रीमुखात भडकावली जाण्याची शिक्षा सुरू होईल त्या दिवशी बेशिस्त आटोक्यात यायला सुरुवात होईल.

// अगदी प्रामाणिकपणे सांगायचे तर बेशिस्त व नियम मोडणार्‍या वाहनचालकांना चक्क थोत्रीत देण्याची शिक्षा द्यायला हवी आहे. ज्या दिवशी जातपात, आर्थिक दर्जा, वय, लिंग ह्यातील काहीही न बघता सर्वांसमक्ष श्रीमुखात भडकावली जाण्याची शिक्षा सुरू होईल त्या दिवशी बेशिस्त आटोक्यात यायला सुरुवात होई////अगदी असे वाटते पण ते कितीवेळा करणार आणि कोणाच्या श्रीमुखात मारण्याचा तेवढा आक्रमक स्वभाव नाही त्यामुळे हे सगळे मनातच वाटते.
दुसरा उपाय म्हणजे बराच दंड करावा ( किमान ५००० ) पण ह्यात सुद्धा भ्रष्टाचार होण्याचा धोकाच अधिक त्यामुळे समस्या राहतेच .

मला नेहमी वाटतं की बेकारी वाढत्ये तर त्या बेकारांना उभं करा ना चौका चौकात आणि करा दंड वसूल, त्यांना काही ठराविक पगार द्या आणि मग जितका जास्त दंड ते वसूल करतील / ते जिथे असतील तिथे जितकी जास्त शिस्त तितका बोनस किंवा तत्सम पर्क्स द्या जेणेकरून ते मन लावून काम करतील. अगदी थुंकणार्‍यांवर / रस्त्यात कचरा टाकणार्‍यांवरही ही मुलं-मुली कारवाई करू शकतील.

१. प्रत्येक चौकात कॅमेरे (तात्काळ उपाय).
दंडाची रक्कम वसुल करणे, हे काम कोणत्याही सरकारी/ बिगर-सरकारी व्यक्तीस देणे हे भ्रष्टाचाराला निमंत्रणच, त्यामुळे डीजीटल उपाय अधिक बरे.
१-२ वर्षात प्रत्येक वाहनास जीपीएस आवश्यक. (त्यावरुनही लेन बदलणे यासारखे गुन्हे कमी करता येतील).
२. नियमभंगाचा फोटो/ व्हिडीओ इमेल/ पत्राद्वारे घरी पाठवणे आणि सोबत दंडाची रक्कम. (तात्काळ उपाय). प्रत्येक गाडिवानाच्या बँकखात्यातुन लगेच ती रक्कम वळती करुन घेणे. उगाच दंड भरायला रांगा नको.
३. प्रत्येक शाळा, कॉलेजमधुन वाहतुकीचे प्रशिक्षण वर्ग. (लाँग टर्म उद्देश)

कॅमेरांचा खर्च (किमान पुण्याततरी) एका महिन्यातच निघेल हे नक्की. बाकी इतरही काही गुन्हे कमी होतील ते वेगळेच.
बाकी दर महिन्याला कोण ५०००-१०००० भरणार? त्यामुळे धाकानेच का होईना नियम पाळले जातील.

विजय देशमुख , चांगले उपाय सुचवले आहेत तुम्ही . अजून एक समस्या म्हणजे सिग्नलला भिक मागत तान्ह्या मुलांना घेऊन फिरणारे भिकारी . त्यांना पूर्ण बंदी केली पाहिजे . हातीपायी धडधाकट असताना त्या लहान मुलांना घेऊन भिक मागताना बघणे अतिशय त्रासदायक असते.

प्राजक्ता -शिरीन , बेकारांना काम दिले तरी ते सुद्धा दंडाची पावती न देत पैसे खिशात टाकण्याची शक्यता आहेच .
रस्ता किंवा एकंदरीतच सार्वजनिक ठिकाणी घाण करणार्यांना सुद्धा कडक शिक्षा व्हायला हव्यात हे
मात्र अगदी बरोबर.

भिकारी, अगदी अगदी..... पण त्यावर मुळ समस्येचं निराकरण गरजेचं आहे.
भीक मागणे जसा गुन्हा ठरवणे गरजेचे असेल, तर भीक देणेही गुन्हाच ठरवला पाहिजे.

अन्विता.....तुम्ही बेशिस्तीबाबत पुण्याचे उदाहरण दिले आहे शिवाय अंकल सॅमच्या गावातील शिस्तही पाहिली आहे. या दोन्हीची सुवर्णमध्य साधण्यासाठी सर्वात प्रभावी यंत्रणा कुठली असेल तर ती आहे ट्रॅफिक पोलिसांची. पण घोडे पेंड खाते ते इथेच. तुमचे पुणे काय आमचे कोल्हापूर काय...येथील प्रत्येक वाहन चालकाने रस्ता हा फक्त माझ्यासाठीच आहे अशी जी समजूत करून घेतलेली असते तिला आवर ट्रॅफो ने घातला पाहिजे असे तुम्ही आम्ही म्हणतो. प्रत्यक्षात वाहतुक नियमांचे उल्लंघन कितीही केले तरी त्यातून अगदी स्पॉटवरच गांधीबाबाची निळी नोट देवून सुटका करून घेता येते [हे मी पाहिले आहे.]

पुण्यात निदान मुख्य रस्त्यावरील एकेरी वाहतूक नियम आणि रस्त्यांचा दर्जा किमान समाधानकारक आहेत; पण कोल्हापूरात रस्त्यांचा जो बोजवारा उडाला आहे तो पाहिल्यास कुणी आणि कसे हे वाहतूक नियम पाळतील हा भला मोठा प्रश्न आहे.....शिक्षा आहे अक्षरशः....पोलिसही कंटाळले आहेत.

उपायाबाबत इथे चर्चा होईल पण अवाढव्य राक्षसासारखी वाढत चाललेली वाहतुकीची साधने आणि त्यांचा २४ तासाचा बेदरकार वावर अधिक वाहनचालकांकडील पैशाची उब ह्या गोष्टी नियमांना नेहमी दुय्यम समजत राहतील. मी वाचले आहे की अमेरिकेत ड्रायव्हिंग लायसन्स रद्द करणे वा विशिष्ट कालावधीसाठी सस्पेन्ड ठेवले जाते [नक्की माहीत नाही]....जर तसे असेल आणि हा उपाय प्रभावी ठरणार असेल तर त्याचा वापर इथेही केला जाऊ शकतो.

विजयराव.... त्याविषयीही मला लिहायचे होते; पण अमेरिकेत तशी नेमकी काय तरतूद आहे याची माहिती जर इथे कुणी तरी देणे गरजेचे आहे....म्हणजे अमेरिकेत वास्तव्य असलेल्या एखाद्या सभासदाने.... तसेच तिथे ड्रायव्हिंग करणार्‍या व्यक्तीच्या गुन्ह्याबाबत License Disqualification, License Cancellation आणि License Suspended असे काही प्रकार असल्याचे मी वाचले होते. अशा प्रकारास पात्र होणारी व्यक्ती त्यानंतरही गाडी चालविते वा चालवू शकते का ? याबद्दल माहिती हवी होती.

पुणेकर वाहतुकीच्या बाबतीत खरोखर अतीशय बेशिस्त आहेत, हे खेदाने नमुद करावे लागतेय.:अरेरे:

आणी अजून एक गोष्ट तेवढ्याच हर्षातिशयाने लिहाविसी वाटते की या बेशिस्तपणात स्त्री-पुरुष, तरुण-तरुणी कुठेच मागे नाहीत, निदान इथे तरी कुठलाच भेदभाव, पक्षपात नाही.:फिदी:

१) माझ्या मुलीला मी शाळा सुटल्यावर आणायला गेले होते. दुसर्‍या बाईने स्कुटीवरुन मुलीला शाळेत सोडले, मागे पुढे, आजू- बाजूला न पहाता बाई सुसाट वेगात निघाल्या. मागुन येणार्‍या रिक्षेच्या मागच्या चाकाचा धक्का लागुन खाली पडल्या, फारच खरचटले होते. लोकानी मदत केली, पाणी दिले. पण रिक्षेवाल्याला कुणी काही बोलु शकले नाही, कारण चूक बाईन्ची.

२) स्वतच्या लहान मुलाला पुढे उभा करुन बाई रॉन्ग साईडने कुठेही न पहाता एक बाईकवाल्या मुलाला धडकल्या. मुलगा, बाई, लहान मुल सगळे पडले. लोकानी बाईकवाल्याला धोपटायला सुरुवात केली. शेवटी एक बाईच मध्ये पडली, म्हणाली चूक त्या बाईचीच होती. खूप जोरात आली ती. सहसा बायका एवढय स्पीडमध्ये नसतात.

३) २ बाईकस्वार शहाण्यानी २ कॉलेजकुमारीना पाड्ले. नशीब जास्त लागले नव्हते.

हे वरील अपघात आमच्या एरियात कायम घडतात. डोळ्यावर, मनावर धुन्दी, हातात वाहन( मनात गाणे जिन्दगी एक सफर है सुहाना)

बर्‍याच ठिकाणी सिग्नल बन्द पण असतात, तिथे मामा ( अशोकजी नाही ) पण नसतात, काय करावे?

अगं....रश्मी

तुझ्या या अशोकमामाने देखील वाहतुक रक्षकांच्या ड्युटीचे असे काही नमुने पाहिले आहेत की सिग्नल बंद असोत वा चालू असोत त्यांची याना फिकिर नसते....केवळ नजर ड्रायव्हिंगवाल्याच्या पाकिटावरच. पुण्यातील व कोल्हापूरातील उदाहरणे इथे चर्चिली जात आहेत; पण कर्नाटकदेखील याबाबतीत मागे आहे असे कुणी समजू नये. मागील पंधरवड्यात मी व आणखीन एक मायबोली सदस्य असे आम्ही दोघे हुबळीला बहिणीकडे गेलो होतो. धारवाड ते हुबळी या दरम्यान आमची कार असतानाच दोन ट्रॅफिक पोलिसांनी अगदी अचूकपणे आमच्या गाडीचा MH-12 हा नंबर टिपला व शिट्टी वाजवली....गाडी कडेला घेताघेतानाच अविनाश म्हणाला, "अशोकमामा १०० रुपये काढून ठेवा सुट्टे....". सिग्नल तर तोडला नव्हता...रॉन्ग साईड नव्हती..ओव्हरटेक केले नव्हते...काहीही नाही, तरीही याना पैसे का द्यायचे असा प्रश्न माझ्या डोक्यात आला. त्या दोघांनी सारी कागदपत्रे तपासली...जी बरोबरच होती. अविनाशचे ड्रायव्हिंग लायसेन्स मागितले, तेही व्हॅलिड...मग पोल्युशन सर्टिफिकेट तेही योग्य...आता कन्नडमधून त्यानी काहीतरी गिचमिड बोलणी सुरू केली. आम्हा दोघांनाही कानडी येत नव्हते म्हणून थांबविण्याचे हिंदीत विचारले....तर त्याने डोळे मिचकावित हिंदीत उत्तर दिले..."गाडीची काच काळी आहे...ये नही चलेगा... एक हजार रुपये दे दो !". म्हणजे त्या दिल्ली 'निर्भया' प्रकरणानंतर सर्व गाड्यांच्या काचा स्वच्छ काचाच्या हव्यात असा सुप्रीम कोर्टाचा आदेश आहे म्हणे....त्याला आता वर्ष होऊन गेले...गाड्या तशाच धावतात, पुण्यातही धावत असतील काळ्या काचेच्या कार्स....हे चूक की बरोबर हा मुद्दा नव्हता तर या पोलिसांना पैसे खाण्याचा आणखीन् एक राजरोस मार्ग सापडला....एक हजार मागणारे ते दोघे ५०० रुपयावर संतुष्ट झाले...अन्यथा गाडी स्टेशनवर घ्या असे म्हणू लागला. त्यामुळे वाहतुक संदर्भात कायदे कितीही झाले तरी ते पोलिसांचे खिसे गरम करण्यासाठीच असतात असे वाटू लागले आहे.

काय सुधारणा होणार...आणि कशी होणार ?

पुण्याची वहातूक बेशिस्त म्हणणार्‍यांनो, कलकत्त्याला या! मग पुण्याचं ट्रॅफिक किती शिस्तशीर, तुरळक, आदर्श आणि नियम पाळणारं आहे याचा तुम्हा सर्वांना साक्षात्कार होईल Proud

जोक्स अपार्ट, पुण्याची वहातूक खरंच दिवसेंदिवस बिघडत चालली आहे. एके काळी कलकत्ता-पुणे जो जमीन अस्मानाचा फरक होता तो फार झपाट्याने कमी होत चालला आहे

<<त्यामुळे वाहतुक संदर्भात कायदे कितीही झाले तरी ते पोलिसांचे खिसे गरम करण्यासाठीच असतात असे वाटू लागले आहे.>> आपण ते कायदे कटाक्षाने पाळले की खिसे गरम करायला लागत नाहीत हा माझा पुणे आणि कलकत्ता येथील अनुभव आहे. समोरच्यांनी सीटबेल्ट्स लावणे, गाडीच्या काचा काळ्या नसणे, व्यवस्थित कागदपत्रे/त्यांच्या कॉपीज जवळ बाळगणे, दुचाकीवाल्यांनी हेल्मेट घालणे, सिग्नल न तोडणे, रॉन्ग साईड न घेणे इ. खूप क्षुल्लक बाबी म्हणून दुर्लक्ष केले जाते. मग आपणच पोलिसांना पैसे खायला वाव देतो.
मी फार आदर्शवादी (किंवा मूर्खपणे) वागते असं समजा, पण क्वचित माझ्या हातून अशी चूक झालेली असताना मी कमी पैशांत तोडपाणी केलं नाही. समोरच्या पोलिसांनी तयारी दाखवूनही. शिस्तशीर पावती घेऊन जास्तीची दंडाची रक्कम भरली. एकदादोनदा ही चरचरीत फोडणी बसल्यावर आपसूकच परत चूक झालेली नाही.

हो, इतरांना वाट्टेल तसं वागून पैसे देऊन सुटका करून घेताना बघितलंय. पण मी पण असंच केलं तर मला कुठलीही तक्रार करायचा हक्क उरत नाही. नियम पाळताना जेव्हा आसपासचं समस्त विश्व बेदरकारपणे नियम तोडून वागत असतं तेव्हा मानसिक त्रास होणारच. पण तो करून घ्यायचा नाही. आपण काहीही करून शिस्त पाळायची असा मी माझ्या स्वत:साठी घालून घेतलेला नियम आहे आणि तो मी पाळते.. ही फार गांधीगिरीयुक्त वाक्ये आहेत हे मलाही कळतंय Wink पण मी खरंच यावर ठाम आहे

अशोकजी ( मामा) हे कधी थान्बणार माहीत नाही, पण वर वरदा हिने लिहील्याप्रमाणे आपणच पुढाकार घ्यायला हवेत. मुक्तपिठमधला पुण्यरत्न लेख वाचा.:फिदी:

डोळ्यावर, मनावर धुन्दी, हातात वाहन( मनात गाणे जिन्दगी एक सफर है सुहाना)<<<<< आता त. कानात पण गाणे. कानात इअर फोन खूपसून, हातातल्या मोबाईल वर मेसेज टाईप करत जाणारे लोक डोक्यात जातात. आपण रस्त्यावर आहोत, वाहने जोरात जात आहेत, कशाचीही पर्वा नसते. मोबाईल कान. आणि खांद्यामध्ये धरुन बोलत गाड्या चालवणारे दुसरे शहाणे. बायको दुकानात आणि नवरा रस्त्यावर मधोमध गाडीत बसलेला हे तर नेहमीचच.

ह्यावर आम्ही आमच्या पुरता शोधलेला उपाय म्हण्जे सायकल. गेल्या महिन्याभरापासून आम्ही सायकल वापरायला सुरुवात केली आहे शक्य तिथे. मी रोज ऑफीस मध्यी सायकल घेऊन जाते. अर्थात ऑफीस गावातच आहे. पण एरवी ही सायकल वापरतो. लांब जायच असेल किंवा दोघांना जायच असेल तर आणि तरच स्कूटर किवा गाडी.

सिग्नल सुटायला वेळ असेल तर आजूबाजूला गाड्या बंद करा अस सांगते. फा$$$र थोडे ऐकतात... ते ही नसे थोडके.

रस्त्यावर माझ्याजवळून मोबाईल मध्ये डोक घालून चालताना कोणी दिसल, तर मी सरळ थांबवते. चक्क चांगला रिस्पॉन्स मिळ्तोय. हाच मेसेज पुढे स्प्रेड करा अस सांगते. जमेल तितक करायच.

उपाय?

लहान मुलांना शाळेत 'दिवाळीत फटाके फोडू नये' असे शिकवतात, तसे वाहतुकीचे नियम शिकवावे व पाळायचे असतात असे मनावर बिंबवावे.

शिकवणार्‍यांनी किमान त्या वयाच्या मुलांसमोर नियम पाळण्याचे कष्ट घ्यावे.

बास.

२० वर्षांत समस्या मिटेल Happy

कोलकाता - जिथे नवी कोरी गाडी केवळ शोरुममध्येच दिसते Happy
समस्या सगळीकडे सारखीच आहे. एक काम करु शकता, जर कार असेल तर कारचा कॅमेराही बसवुन घ्या. त्यात ऑडिओ रेकॉर्डींगही असु शकते. भ्रष्टाचारावर आता फक्त कॅमेरेच उपाय राहिले की काय, असंही वाटतं, पण माणसांपेक्षा कॅमेरेच परवडतील.
कारच्या एका कॅमेराची जाहीरात (?) इथे बघता येइल. इथल्या जवळजवळ प्रत्येक कारमध्ये हा कॅमेरा असतोच.
पीएमटी (आता काय म्हणतात) आणि ऑटो-रिक्षाला असे कॅमेरे लावणे बंधनकारक केले पाहिजे. Happy
http://item2.gmarket.co.kr/English/detailview/item.aspx?goodscode=349846004
तसाही का कॅमेरा अंदाजे ३००० रुपये, म्हणजे महाग नाही. Wink

अहो पण ते कॅमेरे वापरणारी माणसे तर बदलणार नाहीत ना. त्यातले रेकॉर्डीन्ग पाहुन त्यावर कारवाई करणारे लोक हे आत्ताचेच असणार आहेत.
मानसिकता जो पर्यंत बदलत नाही तोपर्यंत ब्रह्मदेव आला तरी काहीही बदलणार नाही.
इब्लिस यांनी सांगितलेला उपाय बराच प्रभावी होऊ शकतो, पण त्यासाठी देखील खुप चांगले लोक जमवून हे घडवून आणावे लागेल.

महेश, काही अंशी नाही पटले. आजकाल एखादा व्हिडीओ फेसबुक किंवा युट्युबच्या माध्यमातुन फिरवला, तर त्यातील दोषींवर कारवाई का झाली नाही म्हणणार्‍या बर्‍याच संघटना आहेत. शिवाय मिडियाला तर खाद्य हवच. त्यामुळे किमान या संधीचा फायदा घ्यावाच म्हणतो मी.
आणि असे पुरावे केवळ संबंधीतांना न देता इंटरनेटच्या माध्यमातुन आधी पुढे आणावे आणि नंतरच पुढचे काय ते बघावे. बहुदा RTI च्या माध्यमातुन काम करणार्‍या लोकांची हत्या याच कारणाने झाली कारण ते पुरावे जगापुढे आलेच नाही {किंवा येऊ दिले नाही}.
So better to be safe first.

अशोकमामा ( मायबोलीवर तुमचा ह्या नावाने उल्लेख करताना पहिले म्हणून मी पण अशोकमामा लिहिण्याचे धाडस फारशी ओळख नसताना केले आहे. )
अमेरिकेत वाहतुकीचे नियम पाळणार्यास शिक्षारुपी points देण्याची पद्धत आहे. जसे तुम्ही कोणता नियम पाळला नाही त्यावर ते अवलंबून आहे. २ points , ४ points etc . ठराविक points झाले कि मग
License suspension , cancellation वगेरे गोष्टी होतात. तसेच हे points गाडीच्या insurance शी सबंधित असल्यामुळे points मिळाले कि insurance पण वाढतो .

तिथे वाहतुकीचे नियम पाळले जातात लोंकानमध्ये स्वयंशिस्त आहे.
इब्लिस म्हणतात त्याप्रमाणे लहानपणापासूनच नियम पाळण्याची शिस्त मोठ्यांनी लावणे व स्वत: त्याचे पालन करणे आवश्यक आहे.
तसेच विजय देशमुख म्हणतात तसे technology वापरूनच भ्रष्टाचारला आळा बसण्याची शक्यता आहे.
तसेच सरकारने infrastructure सुधारण्याची फारच गरज आहे.

अन्विता...

[जरूर....मामा या नात्याने केलेला उल्लेख खूपच छान वाटतो मला.]

प्रतिसादाच्या अनुषंगाने ~
कित्येक हॉलिवूडपटातून मी पाहिले आहे की पोलिस वा तिकडील भाषेनुसार 'कॉप्स' बेशिस्तीच्या सदरात मोडणार्‍या वाहनांवर वायपरखाली दंडाची पावती जोडतात....त्याला 'तिकिट' म्हणतात की काही अलग हे माहीत नाही, पण तसली नोट पाहून संताप वा नैराश्य व्यक्त करणारी मालक/ड्रायव्हर लोकही दिसतात. आता दंडच असेल तर तो भरणेही क्रमप्राप्त. पण संबंधित व्यक्ती ती रक्कम भरते कुठे ? कारण तिकिट लावणारा तर तिथे नसतोच.

अर्थात ही वाहतुक शिस्तीसंदर्भातील पद्धत इथे शक्य आहे का ? असल्यास तिचे पालन कोणत्या पातळीपर्यंत यशस्वी होऊ शकेल हाही एक प्रश्न आहेच. कारण अशा पद्धतीची अंमलबजावणी फक्त सुशिक्षित समाजातच होऊ शकेल असे वाटते.

बेशिस्त वाहतुक - काय करणार याचे??

त्यामानाने नव्या मुंबईत वाहतुक बरीच शिस्तीत चालते. रस्त्यावर पोलिसही ब-यापैकी दिसतात, काही प्रेमाने ड्युटीही करत असतात.

पण तरीही मोठ्या गाड्या घेऊन फिरणा-याची मुजोरी आहेच. मला तर हल्ली गाडी चालवण्याचा इतका ट्रॉमा झालाय की मी विस मिनिटांवर असलेल्या ऑफिसला जाण्यासाठीही रेल्वे स्टेशनला गाडी सोडुन जाते. सकाळी व्यवस्थित जायला होते, संध्याकाळी येताना समोरुन येणा-या वाहनाच्या हाय बीममुळे डोके, डोळे सगळेच दुखायला लागते, चिडचिड होते आणि परिणाम मानसिक थकव्यात होतो. लोकांना रस्त्यावरच्या दिव्यांच्या ढळढळीत प्रकाशात गाडी चालवणे नामंजुर. त्यामुळे यांचे हायबीम कायम चालु.

गरज नसताना हायबीम लावल्यास दंड होतो असे गाडी शिकताना सांगितले गेलेले. पण मी तरी कोणाला या कारणासाठी दंड भरावा लागल्याचे ऐकले नाहीय.

वर विजय देशमुख यांनी जे लिहिलेय साधारण त्या प्रकारची पद्धत नवी मुंबईत टप्प्याटप्प्याने सुरू करणार असे दिडेक वर्षांपुर्वी वाचलेले. नंतर काही महत्वाच्या रस्त्यांवर कॅमेरे आलेही. ड्रायविंग लायसेंसमध्ये असलेल्या चिपचा उपयोग करुन नियमभंगाचा दंड थेट बँकेतुन वळता करुन घ्यायलाही सुरवात करणार असेही वाचलेले. बघुन कधी होतेय ते.

सर्व जातींचे, सर्व धर्मांचे, अशिक्षित-सुशिक्षित, सर्व आर्थिक परिस्थितीतले, सर्व वयांचे लोक वारेमाप नियम मोडून चालवत असतात. उद्दाम पणे फुटपाथ वरून गाडी घालणे ई प्रकार स्त्रिया कमी करताना पाहिलेल्या आहेत, पण नसतीलच असे नाही. पुण्यात आता बर्‍याच फुटपाथ वर खांब उभारलेत मोटरसायकल जाउ नये म्हणून.

हातावर पोट असलेले लोक सोडले तर (सगळे नक्कीच नाहीत, पण) बरेच पांढरपेशे लोक घरी एरव्ही तंगड्या वर करून निवांत टीव्ही पाहात बसलेले असतात. हेच लोक गाडीवर्/गाडीत आले की यांना कसली प्रचंड घाई होते कळत नाही. चौकात गोंधळलेल्या अवस्थेत उभे असलेले वृद्ध लोक व आजूबाजूने आपले रेसिंग कौशल्य दाखवणारे वीर हे जाम डोक्यात जाणारे दृष्य आहे.

आधीच्या तुलनेत यावेळेस पादचारी सिग्नल्स बरेच चालू दिसले. पण लोकांच्या ते अंगवळणी पडलेले नाही, त्यामुळे चालणारे कधीही रस्ता ओलांडतात व वाहने "वॉक" असला तरी बिनदिक्कत जातात. आधी मुळात उभी असतात तीच त्या झेब्रा क्रॉसिंग वर.

इब्लिस यांचे पटले. तसे सर्वांनी केले तर प्रॉब्लेम नक्कीच सुटेल. २० वर्षांच्या आत, कारण मुलांना शिकवता शिकवता पालकही पाळतील. शाळेत मुलांना ब्रेनवॉश करणे आवश्यक आहे, ते उलटे प्रेशर आणतील पालकांवर.

अजून सविस्तर लिहायचे आहे. पण हा धागा वाहता असेल तर ते निघून जाईल. अन्विता - तू नवीन गप्पांचे पान वर क्लिक करून उघडलास की नवीन लेख वर?

फा +१
शिवाय दुचाकीवर मागे बसणार्‍या बायकामुली हा स्वतंत्र विषय असतो. त्यांचे 'हवामें उडता जाये' श्टाईल ओढण्या, पदर पंधराहात दूरपर्यंत फडफडत असतात. अगदी रिक्षात साईडला बसलेले असतानाही. स्वतःचा किंवा दुसर्‍याचा शब्दशः जीवघेणा अपघात होऊ शकतो हे मठ्ठ डोक्यात येतच नाही. किंवा मोटरसायकलवर एक साईडला बसून मांडीवर एका हातात लहान मूल, दुसरा हात नवर्‍याच्या खांद्यावर हे तर प्रचंड डोक्यात जातं. बाजारात बाळांसाठी सेफ्टी हार्नेस मिळतात ती आणली तर काय जहागिरी खर्च होणार असते का?

आपल्याकडे नियम पाळायच्याही आधी स्वत:च्या सुरक्षिततेचे उपाय पालन करायला शिकवायची गरज आहे. पादचारी सिग्नल लाल असतानाही किती जण त्या वाहनांशी आट्यापाट्या खेळत रस्ता पार करायला जातात. अगदी म्हातारे-कोतारे (हातातली काठी उंच झेंड्यासारखी उंचावून थांबा असा आदेश देऊन), त्यांचा आदर्श घेतलेली पोरंपोरी, मोबाईल कानाला लावलेला/ न लावलेल्या अवस्थेतले कायम अर्धा तास उशीरा असलेले तरुण आणि मध्यमवयीन लोक. मोकळा फूटपाथ असतानाही रस्त्याच्या मधून चालणारे पादचारी...
असो.

साधना, वाचुन बरं वाटलं. होईल, पण हळुहळू.... मकर आहे ना भारताची रास... असच होणार. Happy
गप्पांचे पान आहे का ते बघा आणि लेखानत बदलवा, नाहीतर वाहुन जातील सगळे उपाय... जसे मुंबईत रस्तेच वाहुन जातात तसे.... Biggrin

Pages