मशालकरांच्या भव्य स्वागतसमारंभाने अवलिया बाबा आणि रतनदेवी चिंब झाले. अर्ध्या रस्त्यातच मशालकरांनी आपल्या कुटुंबकबिल्यासकट बाबांना गाठले. नमस्कार चमत्कार झाल्यावर त्यांना घेऊन मशालकर आपल्या वाड्यावर आले. वीर गावातील गावकरी गर्दी करून होतेच. बाबांची यथोचीत पूजा झाली. पाठोपाठ रतनदेवींचीही झाली. मशालकरांनी सवयीने भाषण ठोकले. मुत्सद्दीपणे त्यांनी तावडे पाटील आणि तालुक्याच्या गावाचा उल्लेखच केला नाही. फक्त आज आपल्या वीरमध्ये अवलियाबाबांच्या चरणाची धूळ लागली आणि आता हे गाव पावन झालेले असून आता बाबांचा वास ह्याच गावात राहावा अशी प्रार्थना करत आहे म्हणाले. दोन अडीच वर्षापूर्वी दुसर्याच्या घरातले अन्न चोरून खाणारा अन्या आता मूर्ख जनतेच्या मूर्ख श्रद्धेच्या बळावर बाबा झाला होता.
दुपारी प्रसादाचे भोजन पार पडल्यानंतर मशालकरांनी एका अर्ध्या एकराच्या जागेत असलेले त्यांचे एक जुने घर नूतनीकरण करून अवलियाबाबांसाठी राहण्यायोग्य करणार असे जाहीर केले. ते ऐकून काही मंडळी त्या प्लॉटची व्यवस्था बघायला गेली. बाभळीचे कुंपण, तीन खोल्यांची स्वच्छता, प्लॉटच्या कोपर्यात असलेल्या लहान मंदिराची स्वच्छता हे सगळे प्रकार चालू झाले.
सूर्यास्ताला वाड्यावर वर्दी आली की बाबांचे निवासस्थान राहण्यायोग्य झालेले आहे. मोठ्या दिमाखात आणि सन्मानाने बाबा आणि देवी वेगवेगळ्या बैलगाड्यांमधून आपल्या नवीन निवासस्थानाकडे रवाना झाले. सोबतीने मशालकर एका पांढर्या शुभ्र घोड्यावर बसून तर त्यांचे कुटुंबीय आणखीन दोन बैलगाड्यांमधून रवाना झाले. वाटेत आयतेच दर्शन घेऊ शकणारे गावकरी आता वाकून नमस्कार करत होते. मशालकरांच्या रापलेल्या चेहर्यावर एक अनोखा अभिमान विलसत होता. अनेकांसाठी पूजनीय ठरलेली एक अध्यात्मिक शक्ती तावडे पाटलाच्या नाकावर टिच्चून वीर गावात आणण्याचा तो अभिमान होता. बाबा आणि देवींपाठोपाठ गावकरी मशालकरांना पाहूनही हात जोडत होते. बाबांना आणि मशालकरांना केल्या जाणार्या नमस्कारांमध्ये फरक होता. बाबांना केलेले नमस्कार हे श्रद्धेतून आलेले होते तर मशालकारांना केलेले नमस्कार गरजेतून आणि भीतीतून आलेले होते. मिश्यांना पीळ देत मशालकर चौफेर नजर टाकत छाती पुढे काढून बसले होते घोड्यावर!
वीर गाव प्रसिद्ध होते तेथील पाणीसाठ्यासाठी आणि थंड हवेसाठी! नुसत्या हवापाण्याने तब्येत सुधारेल असे ते गाव होते. गावकर्यांना नुसते पाहूनही हे कोणालाही समजले असते. बहुतेक मंडळी चांगली मजबूत हाडापेराची होती. गोड्या पाण्यातील मासळी वीर गावाहून पंचक्रोशीत जायची. खुद्द वीरमध्येच मासळीचे जेवण देणार्या तीन खानावळी होत्या. गावात हनुमंताचे एक, शिवाचे एक आणि गणपतीचे एक अशी तीन देवळे होते. एक शाळा होती दहावीपर्यंत! गावातून कोणत्याही दिशेने वीस पंचवीस मिनिटे चालले तर गावाबाहेरील दाट झाडी लागत होती. त्या पुढील झाडीच्या आणखी दाट थरात श्वापदे असल्याचे अनेकांनी अनुभवलेले होते. वीरपासून फक्त चार किलोमीटर अंतरावर त्यामुळेच लवकरच एक बिबट पालन केंद्र स्थापन होणार असल्याची बातमी सर्वांना सुखावत होती, त्या निमित्ताने अधिक रोजगार, पर्यटनसंदर्भातील लहानसहान व्यवसाय असे बरेच काही होईल असे स्वप्न गावकरी आणि मशालकर पाहात होते. वीरचा पाणीसाठा बारमाहा असला तरी भर पावसाळ्याच्या चार पाच महिन्यात ते विलक्षण सौंदर्य पाहण्यासाठी आजूबाजूच्या गावातील काही लोक तसेही येत असत. पण तेथे खासकरून काही पर्यटन स्पॉट करणे जरा अवघड होते कारण सातारा या जिल्ह्याच्या ठिकाणापासून हे गाव बर्यापैकी दूर होते. येथे येणेही तसे बर्यापैकी बिकटच होते. त्यात पुन्हा गावात काही लॉज वगैरे नव्हते. म्हणजे लोकांना राहायला लागणार तालुक्याच्या गावी आणि पाणी बघायला यावे लागणार वीरला! हे काही जमत नव्हते. तालुक्याच्या विकासाशी नेक टू नेक स्पर्धा लावणार्या वीरच्या गावमनाला आज नवीन उर्जा मिळाली होती.
अवलिया बाबांचे आगमन!
अन्या येड्यासारखा बघतच बसला होता. लोक सलाम करत होते, त्यांना आशीर्वाद द्यावा तसा हात करत होता. पण त्याचे सगळे लक्ष दाट झाडी, अनेक कोंबड्या, बकर्या आणि हिरवेगार असलेल्या मळ्यांकडे होते. जांभळी वांगी, हिरव्या शेंगा आणि काय काय! रस्त्यावर अनेक जण विकत असलेल्या भाज्या बघून अन्याच्या पोटात आत्ताच कावळे कोकलू लागले होते. दुपारची बासुंदी आणि वालाची चमचमीत उसळ केव्हाच विस्मृतीत गेली होती. जेवणाआधी मशालकरांनी दिलेले ताक, कांदा, काकड्या, मिरची आणि पापड हे सगळे ओरपतानाच अन्या वेडापिसा झाला होता. त्यात पुन्हा वालाची उसळ, भरली भेंडी, ठेचा, भाकरी आणि बासुंदी समोर आल्यावर युगायुगांचा भुकेला असल्याप्रमाणे तो जेवला होता. रतनदेवी त्याला सुचवायचा प्रयत्न करत होती की महाराजांचे असे वागणे योग्य दिसत नाही. पण सुग्रास पानावरून नजर हालेल तर खाणाखुणा कळतील ना?
पण ते जेवळ पोटाच्या जणू एका कोपृयात जाऊन पडलेले होते. आता समोर दिसत होती ताजी हिरवीगार भाजी, गुबगुबीत कोंबड्या आणि खोपटांमधून निघणारे चुलीचे धूर! फुकट खाण्याची सवय लागलेल्या अन्या गेल्या अडीच वर्षात गुबगुबीत झाला होता. आता अन्न मिळवून खायचे म्हंटले तर जमणार नव्हते त्याला! आता असेच मोठेपण जतन करत करत फुकट खावे लागणार होते.
रतनदेवीचे लक्ष मात्र इतर गोष्टींवर होते. मशालकरांची एक मुलगी जरा शिकली सवरलेली दिसत होती. तिचे नांव होते सुकन्या! ही सुकन्या रतनपेक्षा दोन एक वर्षांनी लहान असेल! तिची तीक्ष्ण नजर रतनला असह्य होत होती. सुकन्या अन्या आणि रतन दोघांकडेही भेदक नजरेने बघत होती. तिला काही त्या दोघांचे उगाचच मोठे ठरणे पटत नसावे. पण बापासमोर हे बोलण्याची हिम्मत नव्हती तिच्यात! मशालकरांनी नुसती भुवई वर केली असती तर आतल्या खोलीत निघून जावे लागले असते तिला!
रतनला सुकन्याशिवाय दिसत होते मशालकर बाईंच्या अंगावरचे असंख्य दागिने! आणखी एक बाई जवळपास तितक्याच तोर्यात आणि तितकेच दागिने घालून वावरत होती ती कोण असावी हे रतनला समजत नव्हते. ती मशालकरांची दुसरी बायको असून तिला मशालकरांनी बिनदिक्कतपणे त्याच वाड्यात ठेवलेले आहे हे तिला माहीत नव्हते. पण दोघींचे दागिने पाहून रतनदेवीमधील देवी नष्ट पावू लागली होती. ते झळझळते सोने पाहून तिचे लक्ष उडालेले होते. या लहान व गरीब अन्याबरोबर अनेक वर्षे काढून मग श्रीमंत होण्याऐवजी मशालकराला वश केले तर कदाचित एखाद्या बाजूच्या गावात आपल्याला ते थोडी जमीन, एक घर आणि काही दागदागिने देऊ शकतील असे तिच्या मनात एकदा येऊनही गेले होते. त्या दृष्टीने ती सर्व काही निरखत होती. अधूनमधून चोरटे कटाक्ष मशालकरांकडेही टाकत होती. पण त्यांचे लक्षच नव्हते. आपल्या वडिलांच्या वयाच्या माणसाबाबत आपल्याच मनात असे विचार येत आहेत ह्याची रतनला आता शरम वाटत नव्हती कारण तिच्या नवर्याने तर तिला टाकलेच होते आणि वर अवलिया बाबांबरोबर ती तशीच राहते हे गावाला माहीत झालेले होते. जसजसे सगळे नव्या निवासाकडे सरकत होते तसतसे रतनच्या लक्षात येत होते की फक्त एका मशालकरावर जादू केली तर अख्खे गाव आपल्याला तसेही वाकून मुजरे करू लागेल, देवी व्हायचीही गरज नाही. देवी व्हायचे म्हणजे बंधने फार येत होती. वयाप्रमाणे वागता येत नव्हते. मशालकराचा एखादा मुलगा आहे का हे तिने जेवणाआधीच विचारले होते, पण मशालकरांच्या दोन्ही बायकांना दोन दोन मुलीच होत्या. त्यातील एक मुलगी वेडसर होती, ती सगळ्यात मोठी होती. दुसरी मुलगी सुकन्या ही दुसर्या बायकोची होती. धाकट्या दोघी अजून शाळेत असाव्यात!
मात्र घोड्यावर बसून तरंगल्याप्रमाणे पुढे सरकणार्या आणि कित्येक पावसाळे पाहिलेल्या मशालकरांच्या चेहर्यावर दाढी मिश्यांचे जे जाळे होते त्या आत एक लबाड हसू फुटलेले होते. डोळ्यात बारा गावचा बेरकीपणा एकत्रीत झालेला होता. अन्या आणि रतन विचारही करू शकणार नाहीत अश्या गोष्टींवर आत्ता मशालकरांचे लक्ष होते. मुळात हे दोघे तालुक्यात गर्दी जमवत आहेत हे ऐकल्यापासूनच मशालकरांना हेही पक्के माहीत झालेले होते की हे नक्कीच भोंदू असणार. आणि आत्ता त्यांचे भव्य स्वागत करताना त्यांना ते स्वागत झेपत आहे का ह्यावर मशालकरांचे बारीक लक्ष होते. त्यांचा अनुभव त्यांना सांगत होता. हे दोघेही भोंदू आहेत आणि ह्यांना आपल्या कह्यात ठेवल्यास अनेक गोष्टी लीलया साध्य करता येतील. पण चेहर्यावर तसे दिसू न देता ते मोठा सात्विक चेहर्आ करण्याच्या प्रयत्नांत जरा चमत्कारीकच दिसत होते.
एकदाचे निवासस्थान आले आणि अन्या टुणकन्न बैलगाडीतून उतरला. त्याचे ते उतरणे पाहून मशालकर गालातच हासले तर रतन मनात हादरली. हा मुलगा असाच वेड्यासारखा वागला तर मिळवलेले स्थान नष्ट होईल असे तिला वाटले. गावकर्यांना मात्र तोही एक अद्भुतच प्रकार वाटला. मात्र गर्दीमुळे भेदरलेल्या बैलांना अन्याचे अस्तित्वच पटत नसावे. एका बैलाने अन्या पुढे आल्यावर जोरात शिंग उगारले. अवलिया बाबा हबकून बाजूला झाले. एवढा मोठा महाराज बैलाला घाबरतो हे पाहून क्षणभर गर्दीही बावचळली. पण ताबडतोब बैलगाडी वळवण्यात आली. मशालकरांनी मात्र ते नीट पाहिलेले होते.
दणदणीत मोठ्या प्लॉटवर असलेल्या अनेक झाडांच्या मधोमध एक टुमदार निवासस्थान होते. रंग वगैरे जुनाच होता, पण निदान स्वच्छ झालेले होते आता! क्षणभर मशालकरांनाही ती स्वच्छता पाहून आपणच येथे अधूनमधून राहायला हवे असे वाटून गेले. तीन खोल्या. बाहेरची खोली म्हणजे एक भरपूर मोठा हॉल होता शासकीय शाळांप्रमाणे पिवळा रंग त्याला मारलेला होता. तेथे अनेकांची बसायची सोय होईल आणि भक्तांना मार्गदर्शन करायला ती जागा वापरावी असे मशालकरांनी अवलिया बाबांना सुचवले. आतमध्ये असलेल्या एका खोलीत ओटा होता. ते स्वयंपाकघर असणार हे अन्याला समजले होते. पण मुळात फुकटच खायचे असल्यावर स्वयंपाकघर हवे कशाला असे त्याला वाटून गेले. स्वयंपाकघर तुलनेने अगदीच लहानसे होते. आत असलेली झोपण्याची खोली मात्र पुन्हा बर्यापैकी मोठी होती. अवलियाबाबांसाठी एक लाकडी भलीमोठी खाट तेथे ठेवण्यात आलेली होती. त्या खोलीला भडक हिरवा रंग फासून अद्वितीय अभिरुची प्रदर्शन करण्यात आले होते. त्या खोलीत अनेक देवदेवतांची चित्रे वगैरे लावण्यात आली होती. दोन वर्षांपूर्वी या खोलीला मशालकरांच्या रंगमहालाचे स्वरूप होते. गावकरी हे शपथेवर सांगू शकले असते की मशालकरांनी घरातल्या दोन बायकांमुळे मन भरत नसल्यामुळे इतर बायकांबरोबरचे रंगढंग येथे केलेले होते. पण आता ह्या खोलीचा एक अध्यात्मिक शयनकक्ष झालेला होता.
मात्र अन्या जरा विचारात पडलेला होता. अन्याच काय, रतनही! ती जी खाट होती ती एका माणसासाठी मोठी असली तरी दोन माणसांसाठी अपुरी होती. मुख्य म्हणजे गावकरी स्वतःहून ह्या दोघांची झोपण्याची सोय एकत्र करतील ही अपेक्षाच नव्हती ह्यांची! पण ह्या तीन खोल्यात रतनदेवींसाठी झोपण्याची काही विशेष खास सोय केली गेलेली दिसत नव्हती. आता जागा भरपूर असल्याने त्या कुठेही अंग टाकू शकल्या असत्या हे ठीक होते, पण एवढी मोठी देवी आहे म्हंटल्यावर काहीतरी सोय केलेली असायला हवी ना? हा प्रश्न नंतर सोडवता येईल व आत्ता त्यावर चर्चा करणे बरे नव्हे इतके मात्र अन्यालाही समजले.
काही जाणती मंडळी, अवलिया बाबा, रतन देवी, मशालकर आणि मशालकरांच्या दोन सौभाग्यवती असे सर्व स्थानापन्न झाले आणि चहापान झाले.
मशालकरांना भाषण ठोकण्याची फार आवड! त्यांनी सवयीने भाषण सुरू केले. त्यांच्या आश्रयावर आयुष्याची गुजराण करणारीच माणसे असल्याने जमलेले सर्वजण ते भाषण म्हणजे जणू देववाणी असल्याप्रमाणे ऐकू लागले आणि माना हालवू लागले.
मशालकरांकडे नवीन मुद्दे काहीच नव्हते. आपल्या गावात मोठे बाबा आणि देवी आले आहेत हे सकाळीच सांगून झाले होते. तेच त्यांनी पुन्हा सांगितले. त्यांना कसे गावाने जपायला हवे, त्यांच्यासाठी काय काय करायला हवे हेही पुन्हा सांगून झाले. फक्त ह्या निवासस्थानात बाबा राहणार असून त्यांची दिनचर्या तेच आपल्याला सांगतील आणि त्यांची व्यवस्था पाहण्यासाठी नरसू नावाचा एक गडी तैनात केला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. उगीच काही कारण नसताना पुन्हा बाबा आणि देवींचे स्वागत करतो आहोत वगैरे वाक्ये आवेशात फेकली. लोकांनी पुन्हा हातबित जोडले.
आता बाबांना आराम करायचा आहे असे सांगून मशालकरांनी गावकर्यांना तेथून निघायला सांगितले. त्यानंतर त्यांनी एक नजर नुसती मोठ्या बायकोकडे टाकली. नजरेचा अर्थ समजून त्याच क्षणी ती आणि पुढच्याच क्षणी लहान बायकोही उठली आणि बैलगाडीत बसून दोघी वाड्याकडे निघून गेल्या. जाताना अवलिया बाबा आणि रतनदेवींना हात जोडायलाही त्या विसरल्या.
शांतता झाली तसे मग मशालकर ऐसपैस बसत दोघांकडे बघत म्हणाले......
"कस्काय झालं मंग स्वागत आपलं?"
'महाराजपण' अंगात पुरेसे मुरलेले नसलेला अन्या लाजरे हासला. मात्र रतनला तत्क्षणीच धोका जाणवला. आपण स्वागताला भुललो असे मशालकरांना वाटता कामा नये हे जाणवून तिने परस्पर उत्तर दिले.
"भक्तीच्या मार्गावं चाल्नारे आमी, आमच्याकर्ता काह्यला स्वागत हवं?"
समाधानी झाल्यासारखे भासवत हासून मशालकर उठले आणि दारातून बाहेर पाहू लागले. कोणाची चाहुल नव्हती. एकटा नरसू लांब बसलेला होता. त्याला मशालकरांनी आणखी लांब पिटाळला. आत येऊन आतून दार लावून घेत पुन्हा दोघांसमोर बसले. आता मशालकरांचा चेहरा भलताच गंभीर दिसत होता. अन्या आणि रतन जरासे वचकलेलेच होते.
मशालकरांची भेदक नजर प्रथम रतनदेवीच्या डोळ्यांत आणि नंतर अन्याच्या नजरेत मिसळली. आपसूकच दोघेही नजर झुकवून खाली बघू लागले. कातरवेळीच्या त्या चमत्कारीक प्रकाशात मशालकर एखाद्या राक्षसासारखे आडदांड आणि भयावह दिसत होते.
मशालकरांनी आता खरे भाषण सुरू केले.
"ह्ये निवासस्थान अवलियाबाबांसाठी राखीव ठिवलेले हाये. आता अवलिया बाबा हितं कायमचे र्हानारेत. त्यांना पूर्ण संरक्षण देण्याची जिम्मेदारी गावाची आन् आमची! क्काय? घाबरायचं कारनंच न्हाई! अवो तिन्मुर्ती दत्ताचे साक्षात अवतारे तुमी! क्काय? खरं तर आमचं संरक्षण तुमच्या हातात! पन क्काये! की आजकाल दिस भारी ब्येक्कार आलेल्येत. मान्साला द्येवाबिवाचं भय र्हायलेलंच न्हाई आता! अवो परवाचीच बात! हनुमंताच्या मंदिराचा पूजारी आमचा? काय त्याचं नांव! कायतरी बामनचे त्यो! हां जोग जोग! त्याला मध्यरात्री हान्ला कोन्तरी आन् लुटला. एक हाडबी मोल्डं! आता त्यो रडतूय! आता हे बी हाये की लयच माया कमवून बस्ल्याला व्हता हनुमंताच्या नावावं! पन सांगायची बात म्हन्जे गणं भय नाय आता कोनाला कोनाचं! त्यात पल्याडच्या रानात बिबटं लय सापडत्यात! आमी जातू ना शिकारीला शन्वार रैवार्चे! यखादं बिबटं हितं आलं तर तिन्मुर्ती दत्त तरी ऐन वख्ताला काय कर्नार व्हो? क्काय? त्यात पुन्हा ह्ये निवासस्थान लयच आडबाजूलाय. चोराचिल्टाचं भय, बिबट्याचं भय आन् तुमी तर असे नाजूक प्रश्नागत! कोनी म्हन्तं खरा अवतारे तं कोनी म्हन्तं सगळा भोंदूपनाय! नाय! आमचा हाये इस्वास! पर पर्त्येकाचा आसंल आसंबी नाय ना? त्यान्ची यक वाईट नजर आस्नार तुमच्यावं! म्हनून मंग आमचं संरक्षण दिल्यालंय आमी! आता घाबरायचं कामंच नाई! निस्ता नरसूला पुकारा दिला की नरसू फुडचं गणं बघून घील सगळं! क्काय? बाकी आपली पूजा. अर्चा, काय जपबीप करायचा, कीर्तन बीर्तन करायचं ते खुशाल चालूद्या हितं! आवो तुमाला फुल्ल स्वातंत्रंय हितं! भक्ती करा, भज्ञं करा, काय हवं त्ये करा! क्काय? खानं, पिनं, र्हानं आमच्यावं लाग्लं! कोन दक्षिनाबिक्षिना घ्यून आला तर काई न्हाई म्हनू नका. आवो अवतारालाबी ह्या कल्युगात जगायचं म्हन्जे पैकापानी लाग्नारंच की? निर्धास्तपैकी पैका मिळवा, खा, प्या, कमवा आनि मजेत र्हा! आमाला पुन्य मिळो तुमच्या व्यवस्थेचं! क्काय? बाकी आस्लंतस्लं काय लागत न्हाई ना? वशाटबिशाट? तसं खरं वीरगावचं पेशल म्हनाल तर मच्छी हाये! पन तिन्मुर्ती दत्ताच्या अवतारासमोर त्ये नांव घ्यायाबी भ्या वाटतं! पन एक ध्यानात ठिवा! तुमाला दत्तानं मान्साच्या जन्मात अवतार घ्याया लावल्यायाय! तवा मान्साला जे जे लागतं, भावतं त्ये त्ये कराया दत्त काई न्हाई म्हनायचा न्हाई! तवा खावं वाट्लं वशाटबिशाट तर थेट नरसूला सांगायचं! म्हनाव मच्छीबिच्छी घ्यून ये म्हनाव! क्काय? आवो अख्खा मशालकर तुमाला संरक्षण द्येनार म्हन्ल्यावं हितं कोनाची जीभ नाय रेटायची आडवं बोलाया! अधूनमधून चिलीमबिलीम घेत चला! तुमच्या क्ष्येत्रात टेन्शन लय आस्तं! ह्याचा रोग बरा करा, त्याला गुप्तधन द्या. त्याला शहरात पाठवा, ह्याच्या वंशाला दिवा द्या, त्याला नोकरी द्या! सतरा ताप तुमाला! चिलीमबिलीम लाग्तीच अश्यान्ला मंग! आनि त्ये लाजायचं नाय! शेवटी तुमी जन्तेच्या भल्यासाठी अवतार घ्येतल्येलाय ना? मंग? दवादारूबिरू काय आसंन नसण ते नरसूला सांगायचं! एक पैसा द्याचा न्हाय नरसूला! त्ये समदं आमी बघून घ्यू! आवो तुमचे पाय लागले वीर गावाला! कल्यान झालं गावाचं! आता आमी यवढं नाय व्हय कर्नार? फकत तुमच्याकं यकच काम हाये! त्ये म्हन्जे वीर गाव सोडून जायचं नाई आता! कायम किरपा ह्या आमच्या गावावंच हवी! क्काय? गावाच्या चारी अंगाला लय झाडी आन् बिबटी हायेत! उगाच रात्रीबेरात्री आमाला न सांगता कुटं जायचा घाट घालू नका! नस्त्या फंदात पडायचात आन् आपंग्बिपंग व्हायचात न्हायतं दत्ताकं जायचात डायरेक! त्येवढं पाळा! गावातल्या गावात काय करायचं त्ये करा, भाईर नका जाऊ आता! क्काय?"
मशालकराचं ते भाषण ऐकून दोघे कंप्लीट हादरलेले होते. एक तर जे काय करायचे ते सगळे करायला परवानगी होती. पण ही कैद होती. ही कैद नशिबात का होती हेच समजत नव्हते. सूर्योदयापासून जे चकीत करणारे दिमाखदार स्वागत पाहायला मिळाले होते त्या सुखद भावनांचा आत्ता चक्काचूर झालेला होता. खरे आणि बीभत्स स्वरूप उघड झालेले होते. आपल्याला असलेल्या वलयाचा स्वार्थासाठी वापर करून त्या बदल्यात हा मशालकर आपल्याला ह्या गावात जगवत ठेवणार हे समजलेले होते. तेसुद्धा, गावासमोर तोही आपल्याला भगवंत समजत असल्याचे दाखवणार आणि एकांतात आपल्यावर चांगला वचक ठेवणार हेही लक्षात आलेले होते. पण आत्ता अचानक विरोधी पावित्रा घेता येत नव्हता. दिवसभर मशालकरने केलेले महान स्वागत आता विरोधी पावित्रा घ्यायला अंतर्गत विरोध करू लागले होते. त्यात पुन्हा भयही वाटू लागले होते. झक् मारली आणि तावडे पाटलाच्या ताब्यातून निघून इकडे आलो असे वाटू लागले होते. मनात नसतानाही माना मशालकरचे बोलणे ऐकून होकारार्थी हालत होत्या.
आडदांड शरीराचा मशालकर मिश्यांना पीळ देत उभा राहिला. नरसूला बोलावून जेवणाचे सांगा असे अन्याला सांगून रतनदेवीकडे पाहात म्हणाला...
"चला द्येवी! वाड्यावं चला! बैलगाडी हुबीय भाईर!"
मशालकरचे ते रोखून बघणे, ती भेदक नजर, तो आडदांड देह आणि गावातील सत्ता पाहून दोघांच्यातही 'का' असे विचारण्याची हिम्मत राहिलेली नव्हती. पण रतनने तरीही धाडस करून पाहिलेच.
"तालुक्याच्या गावी आमी यकाच आश्रमात असायचो! ही दत्ताची आज्ञा हाये"
हे वाक्य तिच्या तोंडून बाहेर पडले आणि त्या दोघांनाही एक चमत्कार पाहायला मिळाला. डोंगरासारखा मशालकर गदागदा हालत जोरजोरात हासला आणि म्हणाला......
"रांडे! सन्मानाने माझ्या प्वारीसोबत वाड्यावं ठिवतूय तुला थितं र्हा! दत्ताची आज्ञा गेली त्येल लावत! हितं र्हाऊन रंगढंग करायचे सोचशील तर त्ये जमायचं न्हाई! ह्या भडभुंज्या म्हाराजाची इज्जत र्हान्यासाठी तुला आन् त्याला यगळं यगळं र्हाया लागंन्! यकत्र र्हाया तावडे पाटलाचं गाव वाटलं काय ह्ये? मशालकराचं वीर गाव हाये ह्ये! हित्ली मुंगी आमच्या हुक्माबिगर हालत न्हाई! तुला आजच इंगा दावला आस्ता रातच्याला, पन जाऊद्येत दोन्चार दिस! रतनद्येवी म्हनं! तुला यका रातीत गायब क्येली तं गावात चर्चाबी व्हायची न्हाई! चल्ल उठ??"
मशालकरचा उजवा पंजा रतनदेवीच्या दंडात रुतला आणि ती जवळपास उचललीच गेली. प्रचंड घाबरलेल्या रतनने कसेबसे आधारासाठी अन्याकडे पाहिले तेव्हा तिला जाणवले की अन्या तिच्याहीपेक्षा जास्त हादरलेला आहे. मुकाट मान खाली घालून दारापर्यंत मशालकरासोबत ती फरफटत गेली. दार उघडल्यावर मात्र मशालकरने तिचा हात सोडला आणि तिच्याकडे पाहून आदराने हात जोडून म्हणाला......
"द्येवी, भाईर गाडीय त्यात बसावं! नरश्या, द्येवींना बैलगाडीत बशीव रं?"
हडबडत नरसू धावला. त्याच्या मागोमाग त्याच्या हातातील कंदिलाच्या मिणमिणत्या उजेडात भीतीने थिजलेली रतनदेवी कशीबशी पावले उचलत बैलगाडीपाशी पोचली. मशालकरने मागे खोलीचे दार बाहेरून लावून अन्याला आतच कोंडलेले होते. अंधारातच मिश्कीलपणे हसून स्वतःच्या मिश्यांना पीळ देत मशालकर घोड्यावर बसला आणि बैलगाडीच्या मागोमाग निघाला.
मशालकराच्या वाड्यावर बैलगाडी आणि घोडेस्वार मशालकर पोचताच वाड्यावर पुन्हा धांदल झाली. मात्र मशालकरने आता फार प्रकार करू नका असे नजरेने सुचवले आणि सुकन्याला रतनदेवींना आपल्या खोलीत घेऊन जायला सांगितले.
भेदक नजरेने रतनकडे बघत सुकन्याने तिचा हात हातात धरला आणि जिन्याने तिला वर नेले. वर गेल्यावर रतन पाहते तर सुकन्याची खोली मोठी सजवलेली होती. गर्भश्रीमंती सर्वत्र दिसून येत होती. रतनदेवीला एका सोफ्यावर बसवून सुकन्याने स्वतःजवळचे काही कपडे तिच्या हातात ठेवले आणि म्हणाली......
"जा कपडे बदलून ये, मला बोलायचंय"
रतनने सुकन्याच्या स्वरातील अधिकार जाणवल्यामुळे तिच्याकडे पाहणेच टाळले आणि आत पळाली. बाहेर आली तेव्हा सुकन्या तिच्या बेडवर लोळत पडलेली होती. आपण आता काय करावे हे न समजल्यामुळे क्षणभर खोळंबलेल्या रतनकडे न पाहताच सुकन्या तीक्ष्ण स्वरात म्हणाली......
"माझ्या खोलीत तुझी देवीबिवीपनाची नाटकं चालायची न्हाईत! कळ्ळं काय? मुकाट सांगीन तसं र्हायचं! त्या सोफ्यावर निजायचं! आनि प्रश्न विचारल्याशिवाय तोंड उघडायचं न्हाई ह्या खोलीत! समजलं क्काय?"
खाली बघत रतनने मान हालवली.
"साडे आठला जेवण मिळतंय इथे! खाली यायची गरज नाही सार्यांदेखत! तुझं ताट इथं पाठवलं जाईल"
रतनने पुन्हा मान हालवली.
"फुडेमागे तुझ्या राहन्याची वेगळी सोय व्हईल तोवर गपचूप र्हायचं इथं! नांव काय तुझं?"
"जी... रतन"
"शिक्षण?"
"आ..आठवी"
"तो पोरगा कोणे तुझा?"
"......कोन?"
"तो म्हाराज झाल्येला?"
रतनने नकारार्थी मान हालवली. सुकन्या अन्यालाही कोणी मानत नाही हे पाहून रतनला आणखीनच भीती वाटली. आपल्याला आणि अन्याला काहीही न मानणार्यांच्या संख्येत आता एकने वाढ झालेली होती. मशालकरांसोबतच आता त्यांची मुलगीही अॅड झाली होती. निराश मनाने रतन जमीनीकडे पाहात नुसती उभी राहिली. घोडचूक करून आपण ह्या अन्याच्या मागे लागलो असे वाटत होते तिला! तालुक्याला केवढा थाट होता. इथे होती कैद! उगाचच, काही गुन्हा न करताच! मग तिचे तिलाच वाटले. 'गुन्हा न करताच कसे? गुन्हा तर आपण केलेला आहे. जगाला फसवले आहे आपण! लोकांच्या श्रद्धेमार्फत पैसे कमवले आहेत. आरामात जगलो आहोत खोटे बोलून! ह्यापेक्षा आपल्याला टाकणारे आपले सासरचे काय वाईट होते?
सुकन्याचे रतनकडे लक्षही नव्हते. ती काहीतरी वाचत होती. अचानक कसलातरी आवाज झाला. कोणीतरी सरकल्यासारखा! तो आवाज दाराबाहेर झालेला होता. दारावर एका विशिष्ट पद्धतीने थापही पडली. सुकन्याने दाराकडे न बघताच जोरात सांगितले......
"तू जा खाली जेवायला...... मी नंतर येईन"
पुन्हा काहीतरी विचित्र सरकल्यासारखा आवाज झाला. हा प्रकार काही रतनला समजला नाही. मात्र अचानक दार किंचित किलकिले झाले. थोडे आणखीन किलकिले झाल्यावर रतनने नीट बघितले तर काहीच दिसले नाही. मग रतनची नजर दारातच खाली गेली. तर कोणीतरी बसलेले होते तिथे, बसून सरकत होते. मात्र तो चेहरा रतनला दिसला आणि तिच्या सर्वांगाला घामच फुटला. अतिशय विचित्र नजर, तोंडात अनेक दात नव्हते, बोळके हासत होते. केस जेमतेम एखाद्या विद्यार्थ्याइतकेच! डोळ्यांत पूर्णपणे वेडाची झाक! एक घाणेरडा गाऊन अंगावर! हातापायांच्या विचित्र हालचाली!
रतन गर्भगळीत होऊन त्या व्यक्तीकडे पाहात होती. सुकन्याला माहीतही नव्हते की दारातून रतन पलीकडे काही पाहात आहे. अचानक दाराबाहेरील त्या व्यक्तीने रतनकडे हासून पाहात आणि डोळे मोठे करत रतनच्या मागच्या बाजूला बोट दाखवले. रतनने लगेच तिकडे पाहायची घाई न करता आधी हळूच सुकन्याकडे पाहिले. सुकन्या तिच्याकडे पाठ करून काहीतरी वाचत होती. मग रतनने मागच्या बाजूला पाहिले तर तेथे एक खिडकी होती. ती खिडकी रतनने पाहिल्याचे त्या व्यक्तीला नक्की समजल्यावर मग त्या व्यक्तीने हासून उजवा हात स्वतःच्या छातीवर हलकेच आपटत पुन्हा त्या खिडकीकडे बोट दाखवले. रतनला एकुण दोन गोष्टी समजल्या. एक म्हणजे, त्या खिडकीतून पाहिल्यास कदाचित ती व्यक्ती पुन्हा दिसणार होती किंवा दिसत राहणार होती. आणि दुसरी आणि अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे, कोणत्यातरी कारणाने का होईनात, पण ती वेडसर दिसणारी व्यक्ती आपल्याला मदत करणार आहे हे रतनच्या लक्षात आले.
सुकन्याची मोठी बहिण होती ती! विचित्र तर्हेने सरकत सरकत ती जिना उतरू लागली. रतनची पावले घामाने जमीनीला चिकटलेली होती. अजुनही त्या वेडीचे दर्शन झाल्यानंतर उडालेला थरकाप तसाच होता. अन्या काय करत असेल आणि मशालकरांनी फरफटवले तेव्हा कसे वाटले होते ह्या गोष्टी ह्या क्षणी आठवतही नव्हत्या इतका परिणाम त्या वेडीला पाहून झाला होता तिच्यावर!
काही वेळाने सुकन्या आळसून उठली. रतनला 'तुझे जेवण वर पाठवतीय' असे सांगून धाडधाड जिना उतरून खाली निघून गेली. ती जाताच रतनने धाडस करून त्या खिडकीतून बाहेर पाहिले. अंधारात काहीच नीट दिसले नाही. निराश होऊन रतन पुन्हा सोफ्यावर बसून राहिली.
कोणीतरी घेऊन आलेले जेवण मात्र लाजवाब होते. पण आत्ता चवीने खावेसेही वाटत नव्हते. दुपारच्या आणि ह्या जेवणात किती फरक होता. आपल्या मनात मशालकरला वश करण्याचे विचार आले होते ह्याचे आता रतनलाच नवल वाटले. त्या नराधमाला वाटले तर तो आत्ताही आपले काहीही करू शकतो. त्याला वश करून आपण काय मिळवू शकणार होतो? त्यापेक्षा तो मठ्ठ अन्या बरा!
जेवण उरकल्यावर रतनने तेथेच ताट वाटी स्वच्छ धुवून वगैरे ठेवली. बराच वेळ झाला पण सुकन्या आली नाही. झोप आलेली होती पण सुकन्या येऊन झोपण्याआधी आपण झोपलेलो दिसलो तर काहीबाही बोलायची असे वाटून रतन जागीच राहिली मधेच दाराबाहेर पुन्हा सरकण्याचा आवाज झाला. रतन पटकन् उठून मगाचच्या जागी उभी राहिली. पुन्हा दार किलकिले झाले. आता निदान कोण दिसणार हे तरी रतनला माहीत होते. तोच चेहरा दिसला. ह्यावेळी अधिक हासरा आणि अधिक बोलका! पुन्हा त्या वेडीने त्याच खिडकीकडे बोट दाखवून आपल्या छातीवर हात थोपटला आणि सरकत सरकत निघून गेली. रतन लांबूनच त्या खिडकीकडे बघत उभी राहिली. दोन तीन मिनिटांनी अंधारातून पलीकडे कुठेतरी दिवा लागल्यासारखे दिसले. सुकन्याची चाहुल नसल्याने थोडे धाडस करून रतन हळूच खिडकीत गेली. चक्क ती वेडी तिथे एका पलंगावर बसून रतनकडे बघून हसून हात करत होती. आता रतनलाही थोडे हायसे वाटले. वेडी का असेना पण निदान आपल्याशी नीट वागते आहे हे बघून रतनच्या चेहर्यावरही थोडेसे हसू आले. मध्ये अंधार असला तरी दोन्ही खोल्यांमध्ये उजेड असल्याने दोघी एकमेकींना हासताना स्पष्ट बघू शकत होत्या. रतन हासत आहे हे पाहून आनंदीत झालेल्या त्या वेडीने पुन्हा रतनच्याच खिडकीकडे खाणाखुणा केल्या. रतनने पुन्हा खिडकीबाहेर पाहिले आणि पुन्हा तिला काहीही दिसले नाही. बर्याचदा प्रयत्न करूनही रतनला काहीच समजत नसल्याने ती वेडी थोडी निराश झाल्यासारखी वाटली. तितक्यातच जिन्यावर पावलांचा आवाज आल्यामुळे रतन त्या वेडीला हलकाच हात करून पटकन् सोफ्यावर येऊन बसली.
सुकन्या धाडकन् आत आली आणि धाडकन पलंगावर कोसळून पुन्हा वाचनात गढून गेली. मधेच रतनला म्हणाली की तू झोपलीस तरी चालेल. आज्ञा प्रमाण मानून रतन अंग चोरून सोफ्यावर आडवी झाली. हवेत थंडी होती. पण पांघरूण कसे मागायचे या तिरसट मुलीला? रतन विचार करत अंग आखडत कशीबशी झोपायचा प्रयत्न करत होती. थोड्या वेळाने तिला कल्पना सुचली. दिवसभर नेसलेली साडी ती बाथरूममधून घेऊन आली आणि तीच पांघरली, अगदी झोप लागणार तेवढ्यात खिडकीच्या दिशेने एक गूढ असा कर्र कर्र आवाज येऊ लागला. ती वेडी काय करत असेल हे बघायचा रतनला फार मोह होत होता. पण हिम्मत होत नव्हती. काही काळाने सुकन्यालाही झोप आली तसा तिने दिवा बंद केला, एकवार रतनकडे नजर टाकली आणि आपल्या पलंगावर ऐसपैस झोपली. अजुन थोडा वेळ गेला आणि सुकन्याच्या मंद घोरण्याचा आवाज त्या बाहेरून येणार्या आवाजात मिसळला. तशी मग धाडस करून रतन अलगद उठून बसली आणि चोरपावलांनी खिडकीपाशी पोचली.
रतनला फार मोठा धक्का बसला एकुण प्रकार पाहून! ती वेडी तिच्या खोलीतला दिवा लावून जागीच होती. तिला अंधुक प्रकाशात इकडे रतनही खिडकीत आल्याचे कळाल्यामुळे ती खूप आनंदीत झाली होती. आणि ती रतनला काहीतरी खाणाखुणा करत होती. कसला आवाज येत आहे हे बघण्यासाठी रतनने खिडकीतून खाली पाहिले तर......
...... खालच्या बाजूला मशालकर जेवण आटोपून झुरके मारत एका झोपाळ्यावर बसून झोके घेत होते...आणि ती वेडी रतनला रतनच्याच खिडकीबाहेरचे काहीतरी दाखवून खाणाखुणा करत होती....
कितीतरी वेळाने रतनच्या डोक्यात प्रकाश पडला... मशालकरांच्या झोपाळ्याच्या बरोब्बर वर एक तुळई होती, जिची खिट्टी रतनच्या खिडकीबाहेरच्या एका आकड्यात अडकवलेली होती.....
त्या क्षणी मात्र रतनला भर थंडीत घाम फुटण्याचा अनुभव आला.... कारण ती वेडी काय सांगत होती हे रतनच्या आत्ता लक्षात आले होते... ताकद लावून ती तुळई जर त्या आकड्यातून काढली तर ती सरळ मशालकरांच्या डोक्यावर कोसळणार यात शंका नव्हती....
...... आणि सुकन्याची वेडी बहिण रतनला नेमके तेच सुचवत होती!!!!!!
=============
-'बेफिकीर'!
आज मी १ न्॑बर
आज मी १ न्॑बर
अरे बापरे! काय जबरी कलाटणी
अरे बापरे! काय जबरी कलाटणी आहे.
भन्नाट!!!!!!! बेफिकीर राव -
भन्नाट!!!!!!!
बेफिकीर राव - हा भाग लवकर टाकल्याबद्द्ल धन्यवाद.
ढाक चिकी... ढाक चिकी.........
ढाक चिकी... ढाक चिकी......... ढाक चिकी................... ढाक्क्क्क्क्क्क
मस्त्त्तं !
मला या प्रत्येक गोष्टीचा शेवट
मला या प्रत्येक गोष्टीचा शेवट आवडतो.. एकदम सिरियलसारखा सस्पेन्स! आता रतन काय करणार
पुढील भागात पहा
छान जमलाय!
मला या प्रत्येक गोष्टीचा शेवट
मला या प्रत्येक गोष्टीचा शेवट आवडतो.. एकदम सिरियलसारखा सस्पेन्स! आता रतन काय करणार
पुढील भागात पहा
छान जमलाय!
>>>>>>>> +१
वाचतच जाते मी आणि मग लक्षात
वाचतच जाते मी आणि मग लक्षात येत संपलाय हा भाग ....
मस्त...
मस्त...
अफाट्ट्ट्ट्ट्ट्ट्ट्ट !!!!
अफाट्ट्ट्ट्ट्ट्ट्ट्ट !!!!
मला या प्रत्येक गोष्टीचा शेवट
मला या प्रत्येक गोष्टीचा शेवट आवडतो.. एकदम सिरियलसारखा सस्पेन्स! आता रतन काय करणार
पुढील भागात पहा
छान जमलाय!
>>>>>>>> +१११११११११११११११११११११११११
वेडीचं वर्णन सुरु झाल्यापासुन भागाच्या शेवट पर्यंत अंगावरचा काटा काही गेला नाही.
नविन भाग लवकर टाका.
खुप खुप मस्त झालाय हा भाग
खुप खुप मस्त झालाय हा भाग ..........
वेडीचं वर्णन सुरु झाल्यापासुन भागाच्या शेवट पर्यंत अंगावरचा काटा काही गेला नाही.
नविन भाग लवकर टाका.++++++++++1
आता खरा 'बेफिकिर' टच सुरू
आता खरा 'बेफिकिर' टच सुरू झालाय
heloo, Mr. Befikir, Why don't
heloo, Mr. Befikir, Why don't you reply me is their for mailing me,
My id : nishagaikwad1986@gmail.com
pls reply me,,,,
मस्तच ... शेवटचा परिच्छेद तर
मस्तच ...
शेवटचा परिच्छेद तर जबरीच .............
नेहमीप्रमाणे कथेला जबरदस्त
नेहमीप्रमाणे कथेला जबरदस्त वळण
वाचकाना कसे खिळवुन ठेवायचे ह्यात सध्या तरी बेफीकीरजी सारखा माहीर लेखक दुसरा कोणीही मायबोलीवर दिसत नाही आहे..ऊत्तम
पुढे काय होईल काहीच अंदाज बांधु शकत नाही.. बहूदा मशालकराना मारुन सगळी सुत्रे रतन स्वताकडे घेइल का??
पु ले शु
आयला डेंजर
आयला डेंजर
Khup Sunder Befikirji kharch
Khup Sunder Befikirji kharch tumchya likhanala tod nahi ekdum exciting zalay ha bhag. Pudhcha bhag vachnyachi khup utsukta lagliy ata. zalyas ya velesarakha lavkar ch taka. Tumche manpurvak Aabhar.
मस्त !!
मस्त !!
झकास....
झकास....
आता पुढचा भाग कधी
आता पुढचा भाग कधी
पुढचा भाग कधी ?????
पुढचा भाग कधी ?????
बेफिकीरजी, मी तुमचे लिखाण
बेफिकीरजी, मी तुमचे लिखाण regularly वाचते, आणि मला खुप आवडते पण... आता पुढच्या भागाच्या प्रतिक्शेत!!!
बेफी, पुढचा भाग कधी
बेफी,
पुढचा भाग कधी ???????????
आम्हा पामरांचा इतका अंत नक पाहु !!!
नवीन भाग लवकर टाका.
आता खरा 'बेफिकिर' टच सुरू
आता खरा 'बेफिकिर' टच सुरू झालाय >>>> बरोबर नविन भागाला उशिर होऊ लागला आहे (प्लीज ह.घ्या)
तुमच्या कथा खुप आवडतात म्हणुन नविन भाग यायला उशिर झाला की बैचैनी होते.
तुमच्या कथा खुप आवडतात म्हणुन
तुमच्या कथा खुप आवडतात म्हणुन नविन भाग यायला उशिर झाला की बैचैनी होते.>>>>>>>>>> खरच खुप बैचैनी येते लवकर टाका पुढचा भाग.....
तुमच्या इतर सर्व कथा कुठे भेटतील लिंक द्याल का......
नविन भाग कधी येणार बेफ़िजी?
नविन भाग कधी येणार बेफ़िजी?
बेफिकीर राव - पुढील भाग लवकर
बेफिकीर राव - पुढील भाग लवकर टाका हो!!!!
आम्ही आतुरतेने वाट पाहत आहोत.
पुढील भाग लवकर टाका...
पुढील भाग लवकर टाका...
पुढील भागाच्या प्रतिक्षेत_ _
पुढील भागाच्या प्रतिक्षेत_ _ _ _ _
तुमचा फोन number द्या sms
तुमचा फोन number द्या sms reminder देत जाएल
Pages