भटकंती ४

Submitted by इन्ना on 31 December, 2013 - 07:00

भटकंती ४

द वॉल

द वॉल , द्रविड ? नै हो अजून भेटला .
चीनची भिंत? हो त्यावर पण एकदा लिहीन. पण आजची भिंत बर्लिनची आहे.

ही पहिल्यांदा ऐकली /वाचली इतिहासाच्या पुस्तकात. दुसर्‍या महायुद्धानंतर चक्क एका मोठ्या शहराचे २ तुकडे करणारी भिंत. मग रिडर्स डायजेस्ट मधे १,२ कथा वाचल्या ग्रेट एस्केप नावाच्या. पुर्व जर्मनीतून पश्चिम जर्मनीत केलेली पलायनं . तेव्हा फार उत्सुकता वाटाली होती या भिंतीबद्दल , इतकी की माझी एक पेन फ्रेंड होती जर्मनीची ,अर्थात पश्चिम जर्मनीची! पण ह्या माझ्या पत्रमैत्रीणीला ती अगदी स्विस बॉर्डर वर असल्यानी भिंतीबद्दल आस्था नव्हती ना खेद.

पुढे १९८९ मधे भिंत पाडली. वर्तमान्पत्रातून जर्मन एकीकरणाबद्दल बरच छापून आल. काही तरी ऐतिहासिक मोठ घडल ह्यापलिकडे फार काही कळाल नाही त्यावयात . माझ्या पुरता फरक पडला तो एवढाच की पुर्व जर्मनीच्या स्टँप्सच्या बदल्यात एका ऐवजी ३ एलिझाबेथ राण्या मिळायला लागल्या Happy

पुढे शिकुन सवरून होइतोवर भिंत मनात मागे पडाली होती. कामानिमित्ताने काही जर्मन कंपन्यां शी संबंध आला. सगळ्या 'नाक वर ' जर्मन लोकांमधे एखाद दुसरा जरा मवाळ भेटला की माझा मित्र पैज लावायचा हा नक्की इस्टजर्मन असणार. भिंतबाई आल्या सरसावून पुढे! संधी मिळाली की एकदा पाहयचीच भिंत अस ठरवून टाकल. लिस्टीत तिच नाव नोंदवून टाकल.

संधी मिळायला पुढे बराच काळ गेला. २ वर्षा पुर्वी बर्लीन चा दौरा ठरला तेव्हा माझ्या जर्मन मैत्रीणीला सांगून ठेवल की मला भिंत पहायचीये ! त्या आठवड्यात खरी भिंत तर पाहिलीच, पण पुर्व जर्मन नजरेतून पाहिली , पश्चिम्जर्मन नजरेतून पाहिली, कलाकाराच्या , वास्तुविशारदाच्या, नव्या पिढिच्या ही नजरेतून पाहिली.

खर सांगू का कोणास ठाउक ,माझ्या कल्पनेत ही भिंत म्हणजे आपल्या भुइकोट किल्ल्यांच्या तटबंदी सारखी होती. जाड , दगडी , बुरूज वाली, बर्लीनमधली २ उपनगरांची वाटावाटी केलेली. पण तिथे भेटलेली भिंत आणि तिची विविध रूपं वेगळीच होती. सगळ्यात महत्वाच म्हणजे चक्क गजबजलेल्या शहराचे दोन तुकडे करणारी. ह्या खालच्या चित्रात दिसतेय ते जुन घर, अन त्याची भिंत . भिंतीच्या आत इस्ट अन बाहेर वेस्ट. ह्याच घराच्या खिडकीतून बाहेर उडी मारून सुरवातीला लोकांनी पलायन केलय.

1

मग तयार झाला हा १०० मि चा पट्टा ! दोन्ही बाजूला काँक्रीट्च्या भिंती , मधल्या मैदानात पेरलेले सुरुंग, अन पहारा देणार्‍या चौक्या.
2

रस्त्याच्या पलिकडे एक वॉल म्युझियम आहे. तिच्या कथा वाचून ,पाहून , ऐकून काटा येतो अंगावर. ह्या कथा न भिंतीत चिणलेल्या वेदना अगदी वॉच टॉवरच्या कठड्यावर पण भेटत रहातात.

3

पायर्‍या उतरताना, समोरच्या इमारतीच्या खिडकीतून उडी मारणारा तरूण दिसतो, पुढे चौकात पुर्वेकडे अडकलेल्या आई वडिलांना भिंती पलीकडून जोडीदाराची ओळख करून देणारी नववधू दिसते , बेकरीच्या भट्टी खालून भुयार खणणारे बेकर काका दिसतात , डाव्या उजव्यांमधे भरडले गेलेले सामान्य जर्मन नागरीक दिसतात. सुन्न होउन आपण जमिनीवर पोचतो तेव्हा दिसते जतन केलेली भिंत. हे लोखंडी गज आता भिंतीच्या ठीकाणी उभे आहेत. त्या कटू इतिहासाची जाणिव , आठवण पुसली जाउ नये म्हणून ओळीत उभे हे गज! मज्जाव करणारी भिंत नाही , तर स्वतंत्र विचारांच आदान प्रदान ,अन लोकशाहीच वार खेळत ठेवणारी लोखंडी गजांची रांग.

4
पुढे शहरभर भेटत राहते ही भिंत! कलाकाराच्या नजरेतून .
5

येणारी अन जाणारी पावल रेखलेली.
6

नाहीतर अगदी फोटो अपॉर्च्युनीटी म्हणून राखलेला खर्‍या भिंतीचा तुकडा. ह्या फोटोतल्या पिढीला त्याभिंतीमागचे आक्रोश अन वेदना नसतील ऐकू येत कदाचित. 7

मला मात्र राहून राहून , बंदिस्त पुर्वेतून पलिकडे दिसणारं स्वातंत्र्य च दिसत राहिल.
8http://www.maayboli.com/node/31802 भटकंती-१
http://www.maayboli.com/node/35461 भटकंती २
http://www.maayboli.com/node/35470 भटकंती ३

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मला आधीपासूनच दिसत होतं की गं.. नाहीतर प्रतिक्रिया कशी दिली असती? ___/\___ महानच आहेस!! Proud

हो, प्रचि मस्त जमलीत

इन्ना, मस्तच फोटो, फोटोमागची नजर आणि विचार Happy

भटकंती ४ बघीतल्यावर आधीचे तीनही भाग वाचून काढले, सगळ्यांना आवडताहेत मलाही आवडलेच. आता भटकंती ५ साठी जास्त गॅप घेऊ नकोस... आणि फोटो टाकायला व्यवस्थित जमताहेत. तर तेही टाकत रहा.
हो ह्याला सक्त ताकीदच म्हणतात..... Happy

धन्यवाद सगळ्याना Happy
नविन वर्षाची वाट न पहाता लिहायला सुरुवात करायची अस ठरवल होत. धावत पळत पोस्टल १३ संपायच्या आधी Lol

हे ही पहा,1

भिंत पडली , पुर्व जर्मनी इतिहासाच्या पुस्तकात जाउन बसले. पण हे काका पासपोर्टवर स्टँप करून देतात !!

मी ही पाहिला नव्हता ह्यातला कुठलाच भाग ! आता चारही वाचले.

मस्त लिहिलं आहेस. खास इन्ना स्टाईल जाणवतेय. अजून लिही Happy

इन्ना....

फार सुरेख आढावा घेतला आहे तुम्ही....शिवाय तुमच्या लेखणाची धाटणीच अशी राहिली आहे की तुम्ही स्वतःच जर्मनीच्या गाईड बनून आम्हा पर्यटकांना उत्साहाने ठिकठिकाणी नेऊन अद्ययावत माहिती देत आहात. प्रवासवर्णनासाठी अशी लेखणी आवश्यक ठरते.

"भिंत....वॉल"....खरंय. १९४५ ला युद्ध संपले पण ते संपले युद्धभूमीवरील....जर्मनी जपान हरल्याने लयाला गेले तर इंग्लंड फ्रान्स विजयी वीर म्हणून समोर आले तरी त्यांचेही कंबरडे मोडकेच ठरले...त्यानाशी नव्याने श्वास घ्यावे लागले. म्हणजेच युद्धानंतर दोन महासत्ता उदयाला आल्या...अमेरिका आणि रशिया....सुरू झाला तो शीतयुद्धाचा जमाना...तू मोठा की मी मोठा....केनेडी श्रेष्ठ की ख्रुश्चेव ? जर्मनीचे दोन भाग तिथल्या नागरिकांनी मान्य केले.... बर्लिनची ती भिंत...बांधली, तरीही "मी पूर्वेत लाल निशाणाच्या अधिपत्याखाली राहाणार नाही..." असा पुकारा देणार्‍या जर्मन लोकांची संख्या काही कमी नव्हती....वॉल ओलांडणे म्हणजे आव्हानाला सामोरे जाणे. केनेडीना मुळातच वॉल प्रकरण नामंजूर होते....पण ख्रुश्चेवकडून ती बांधली जात असताना हा तरुण शांत राहिला.....त्याचे एक वाक्य या संदर्भात प्रसिद्धच होते...."It’s not a very nice solution, but a Wall is a hell of a lot better than a war.” जॉन केनेडीना तिसरे युद्ध नकोच होते; पण रशिया १९६० च्या दशकात लष्करीदृष्ट्या प्रबळ होताच हे अमेरिकाच काय पण सारा युरोप जाणत होताच.

१९८९ पर्यंत वाट पाहावी लागली वॉल जमिनदोस्त होण्यासाठी....पण इन्ना यांच्या चित्रावरून दिसतच आहे की आज या मितीलादेखील लोक जुन्या आठवणी विसरायला तयार नाहीत....ओळीत उभे असलेले ते लोखंडी गज आजच्या पोरांना नेमके काय सांगत असतील ?

अप्रतिम ! मी घेतलाय हा अनुभव. विशेषतः ते सगळं भोगलेल्या एका कुटुंबाचा एक सदस्य सद्ध्या माझा सहकारी आहे. त्याच्या तोंडून, त्याने आपल्या आजी-आजोबांकडून ऐकलेल्या गोष्टी ऐकताना अंगावर आलेले शहारे अजुनही विसरता येत नाहीत.