बंडलवाडीचा बाँड - केस नं. २

Submitted by A M I T on 20 December, 2013 - 08:42

बंडलवाडीचा बाँड - केस नं. १

गज्या म्हात्र्याच्या दुकानात चोरी झाल्याची खबर बंडलवाडीत वणव्यासारखी पसरली. चंदन आळीतल्या डागेवर गज्या म्हात्र्याचं किराणा मालाचं दुकान आहे. गावातील इतर दुकानांत न मिळणारी कुठलीही वस्तू गज्याच्या दुकानात हमखास मिळते. आणि धंद्याचं म्हणाल तर, एकेकाळच्या गज्याची कबड्डी वा क्रिकेटच्या भव्य स्पर्धा अथवा इतर कुठल्याही सटरफटर उत्सवाच्या निमंत्रणपत्रिकांत 'गज्याशेट' अशी प्रगती झाली होती.
गुणा धुमाळाची अख्खी बैलगाडी आरामात शिरली असती, इतकं मोठ्ठं भगदाड दुकानाच्या मागच्या भिंतीला पाडलं गेलं होतं. बघ्यांची मारे गर्दी जमली होती. उभ्या बंडलवाडीने चोरीचा असला प्रकार याची देही याची डोळा कधी पाहीला नव्हता. मेमन, पटेल, चोगले, भाऊ, नवीन दुकानवाला (याने दोन महिन्यांपुर्वीच नवीन दुकान टाकलं (?) होतं.) असे बंडलवाडीतले सगळे दुकानवाले घटनास्थळी उगीचच चेहरा ताणून उभे होते. 'हे कारस्थान या दुकानदारांपैकीच कुणा एकाने करवून घेतलं असावं', अशी कुजबूज बघ्यांमध्ये चालली होती.
गज्याशेटनी ही केस गोपीला दिली नव्हती. त्याने तालुक्याच्या पोलीस ठाण्यात चोरीची तक्रार केली होती. दोन हवालदार दुकानाचं निरीक्षण करून काही नोंदी करून घेत होते. सुक्या खजराची अर्ध्या-अर्ध्या किलोची दोन पाकीटं आणि तोंडात टाकायला मुठ-मुठभर भाजके शेंगदाणे घेऊन त्यांनी फटफटीची किक मारली आणि ते डांबरी सडकेला लागले.
हवालदार निघून गेल्यावर गज्याशेटनी पांड्या सुताराला बोलावून भिंत बांधून घेतली. पांड्या सुतार गवंडी कामंदेखील करायचा.

*

आमदार सायबांसोबत मुंबईला गेलेले सरपंच संध्याकाळी घरी परतले तेव्हा त्यांना चोरीचं म्याटर समजलं. त्यांनी गोपीला सोबत घेवून लागलीच गज्याशेटचं घर गाठलं. ते दोघे गज्याशेटच्या घरी पोचले तेव्हा गज्याशेट दिवाबत्ती करून देवापुढे हात आणि डोळे मिटून काहीतरी पुटपुटत होते. बहुधा ते चोर लवकर सापडावा यासाठी प्रार्थना करीत असावेत.

"आपल्याकडं गोपीसारखा डिटेक्टिव असताना तुमी पोलीसांत तक्रार केलीतच कशी ! याचचं मला नवल वाटतयं." सरपंचाना गोपीमधल्या डिटेक्टीववर विश्वास असावा.
"माझी म्हईस कीव्वा कोंबडी चोरीला गेलेली नाय सरपंच." गज्याशेटनी सरपंचाच्या विश्वासाचं पानिपत केलं.
"म्हंजे?" सरपंच पेडगावला जायचं नाटक करीत होते.
"अहो गोपी म्हंजे गळ टाकून माशे पकडणार्‍यांतला आनी पोलीस म्हंजे जाळे टाकून. काय समजलात?" गज्याशेटनी सरळसरळ गोपीच्या तपास क्षमतेवरचं प्रश्नचिन्ह उभं केलं.
आपल्याला चोर सापडला असता की नसता ही लांबची गोष्ट होती पण आयत्यावेळी गज्याशेटना आपल्यासाठी एखादी चांगली उपमा सापडली नाही म्हणून गोपी अस्वस्थ झाला.
त्यानं खुर्चीतल्या खुर्चीत चुळबुळ केली.
"पन मी काय म्हंतयं त्यालापन करू दे की तपास. तुमाला काय चोर सापडल्याशी कारन." सरपंच गोपीच्या शिफारशीची पराकाष्ठा की काय म्हणतात? ती करत होते.
"ठिकाय. करू दे त्याला तपास." गज्याशेटनी हिरवा सिग्नल दाखवला.
"मला सांगा दुकानातून नेमकं काय काय चोरीला गेलं?" डायरी नि पेन काढून गोपी तपासासाठी सज्ज झाला.
"गल्ल्यातली रोकड सोडून चोरानी बाकी कशालाच हात लावला नाई." हे बोलताना एकक्षण गज्याशेटचा 'गळ्ळा' भरून आला.
"पन गल्ल्यात दिड लाख रूपये ठेवतं का कुनी?" मोका मिळताच सरपंचांनी चोरीच्या मामल्यातली आपली दिड लाखाची मुठ उघडली.
"तुमाला कुनी सांगितलं, गल्ल्यात दिड लाख होते म्हनून?"
"आनंता भायदे गावात बोंबा मारीत सुटलाय." सरपंचांनी आपल्या बायकोचा खोटेपणा अनंता भायद्याच्या नावावर खपवला.
"त्याचं काय आयकायचं? थापाड्या तो ! खरं सांगायचं म्हंजे गल्ल्यात पाचेक हजाराच्या नोटा आनि सत्तर-अ‍ॅन्शी रूपायांची चिल्लर होती." सरपंचाच्या मते गज्याशेटनी चोरीच्या फुग्यातली हवाच काढून टाकली.
"हल्ली पयल्यासारखा धंदा होत नाय." असं म्हणून गज्याशेटनी एक दीर्घ सुस्कारा सोडला.
त्यांचं नाक इतकं मोठं होतं की, त्यांनी जर तसाच दीर्घ श्वास आत घेतला तर आपण अलगद जावून त्यांच्या नाकात शिरू की काय? याची गोपीला धास्ती वाटू लागली.
तसंही 'गज्याशेट वजनात मारतो' म्हणून लोकांनी नवीन दुकानवाल्याच्या दुकानात खरेदी करायला सुरूवात केली होती.
"तुम्हांला नोटांचे नंबर लक्षात आहेत का?" गोपी.
"आता माझ्या दुकानात चोरी होनाराय हे म्हायती असतं तर लिवूनच ठेवले असते." आपल्या दोन्ही भुवया एकमेकींना जुळवीत गज्याशेट बोलले.
"मग तुम्ही त्या नोटांवर कसला सुगंधी स्प्रे मारला होतात काय?"
"आता त्याने काय होनार होतं?"
"रोटकरांच्या म्हशीची केस विसरलात काय गज्याशेट?" गोपीने हसत हसत स्वत:चीच तारीफ केली.
"नाय. तसले फवारे-बिवारे काय मारले नाईत. पन रोज सकाळ-संध्याकाळ न चुकता गल्ल्यातना उदबत्ती फिरवतो." फवार्‍यातला 'फ' उच्चारताना वाटीभर थुंकी उडविणारे गज्याशेट आपल्याला धूप घालत नाहीत असं गोपीला वाटलं.
"तुम्ही दुकानात सीसीटिव्ही कॅमेरा तरी बसवून घेतला होतात काय?" आपल्या बोटांत पेन फिरवत गोपीने विचारले.
"शीशीटीवी क्यामेरा?" नथूराम गुरवाच्या परसातल्या वडावरच्या जखीणीचं नाव ऐकल्यासारखे गज्याशेट चमकले एकदम.
"अहो ज्यात दिवसभराचं शुटींग रेकॉर्डींग होतंय त्याला म्हंतात सीसीटिवी क्यामेरा." नुकत्याच मुंबईहून परतलेल्या सरपंचाना याबाबतीत गप्प बसणं शक्यच नव्हतं.
"माझं किराणा मालाचं दुकान हाय. सराफाचं नाय." गज्याशेट तोलून-मापून उत्तरं देत होते.
"मला तुमच्या दुकानाचं निरीक्षण करावं लागेल." प्रश्नोत्तरांचा तास संपवत गोपी बोलला.
"ठिकाय." असं म्हणून गज्याशेटनी मघासच्यासारखा दीर्घ सुस्कारा सोडला.
"उद्या सकाळी ये दुकानात."

*

अंगावर नेहमीचा काळा जॅकेट आणि डोक्यावर त्याच रंगाची फेल्टहॅट चढवून गोपी गज्याशेटच्या दुकानात पोचला. त्याने दुकानाचं नीट निरीक्षण केलं. सोबत आणलेल्या कॅमेर्‍याने काही फोटोदेखील घेतले. गज्याशेटकडून चोरीच्या आधी दुकानात सामान भरल्याची पावती घेऊन तो निघून गेला.

सुके खजूर अजून संपले नसावेत. पंचनामा करून गेलेल्या दिवसानंतर त्या दोन हवालदारांनी बंडलवाडीत एकही खेप टाकली नाही.

नेहमीप्रमाणे संध्याकाळी परश्या भायद्याच्या कंपौंडातल्या आंब्याखाली गोपी मालतीला भेटायला लगबगीने निघाला होता. गोपीला थोडा जरी उशीर झाला तर मालतीच्याच भाषेत सांगायचं म्हंजे तिचा मुड 'हाफ' होत असे.
"बांडा, चोर सापडला काय रे?" तोंडात तुंबलेल्या गुटख्याची जेवढी लांब टाकता येतील तेवढी लांब पिचकारी टाकत काश्या म्होयत्याने गोपीला विचारले.
यश्टीस्टँडवर सदानंद कांबळ्याची वडापावची गाडी आहे. त्या गाडीजवळील सिमेंटच्या बाकावर जना घाग, काश्या मोहीते, बाबू मिसाळ आणि बाबज्या ही चौकडी बसली होती.
"अरे इतक्या सहजा सहजी सापडायला चोर म्हंजे काय रोटकराचं ढोर हाय होय !" असं म्हणून बाबज्याने आणखी एक गुटख्याची पुडी तोंडात ओतली.
बाकीच्यांनी आपले राबलेले दात दाखवून हसून घेतलं.
फुटबॉलसारखी किक मारल्यावर दूर उडालेल्या मांजरासारखं गुरगुरत गोपीनं चौघांकडे पाहीलं आणि काहीही न बोलता तो निघून गेला.

कंपौंडालगतच्या सडकेनं गोपी नि मालती परतत होते. आसपास सडकेच्या रंगाचा काळोख पडू लागला होता. पण तरीही सडकेवर एखादं नाणं पडलेलं असलं तर ते किती रूपयाचं आहे, हे सहज ओळखता येईल इतका चंद्रप्रकाशही होता.
दोन मोर्‍या टाकून ते दोघे पुढे आले नि तिसर्‍याच मोरीवर त्यांना कादर आणि गुलम्या 'पित' बसलेले दिसले.
कादर बशीरभाईचा पोरगा. बंडलवाडी ते तालुक्यादरम्यान तो रिक्षाचे भाडे मारतो.
गुलम्याचं खरं नाव गोविंदा असूनही कपाळावर टेंगळासारखी मोठ्ठी गाठ असल्यामुळे लोकं त्याला 'गुलम्या' म्हणूनच ओळखायचीत.
आठवड्यातले दोन-तीन दिवस ते इथे पिताना हमखास दिसायचेत. गोपीनं नीट कान देवून ऐकलं तेव्हा ते दोघे बाबज्याबद्द्ल काहीतरी बोलत होते.
त्या दिवशी आपल्या घरी एक व्यक्ती पारय (लोखंडी पहार) मागायला आल्याचं मालतीनं गोपीला चालता चालता सांगितलं. ट्रंकेची चावी घरभर शोधणार्‍या म्हातार्‍याला ती चावी आपल्याच करगोटयाला सापडल्यावर तो म्हातारा आपल्या गाढवपणावर जसा हसेल तसाच गोपी आत्ता हसला.

भर अंधारात त्याला आशेचा किरण की काय म्हणतात? तो दिसला.

*

दगडू कांबळ्याने सबंध गावाची मिटींग भरवल्याची हाक बंडलवाडीच्या नाक्यानाक्यावर मारली. दुपारची उन्हे ओसरल्यावर शंकराच्या देवळाजवळच्या पटांगणात अख्खी बंडलवाडी जमली. सरपंच, शांताराम खोत, नामदेव गुरव, नर्‍या खेऊर आणि जाफरचाचा अशी पंचमंडळी पटांगणाच्या पश्चिमेला जांभ्या दगडांनी बांधलेल्या जोत्यावरील खुर्च्यांवर बसली होती.
गावातल्या भानगडी, तंटे मिटवण्यासाठी वरचेवर अशा मिटींगी लावल्या (?) जायच्या.

आज गज्याशेटच्या दुकानातल्या चोरीचं प्रकरण होतं.

"मंडळी, आपणा सर्वांना माहीतच आहे की गेल्याच आठवड्यात गज्याशेटच्या दुकानात चोरी झाली. भिंत फोडून दुकानातल्या गल्ल्यातली पाच हजाराची रोकड चोराने लंपास केली. गज्याशेटनी मोठ्या विश्वासानं ही केस माझ्याकडे सोपवली. तेव्हा मी गज्याशेटना आश्वासन दिलं होतं.. म्हटलं होतं, "गज्याशेट, आठ दिवसांच्या आत चोराला 'गज्या'आड करून दाखवीन तर नावाचा बाँड." गोपीनं हे अशा काय आवेशात म्हटलं की ते ऐकून इतका वेळ आपल्या दोन्ही तळहातांच्या बेचकीत हनवटी टेकून बसलेली मालती अचानक टाळ्या पिटायला लागली.
बाळा धुमाळ आणि त्याच्या बायकोनं आपल्या पोरीकडं काहीशा घुश्यातच बघितलं.
"मला सांगायला अतिशय आनंद होतोय की मी केलेल्या तपासाला यश आलंय आणि त्या गुन्हेगाराला मी शोधून काढलयं. तो शातीर चोर आहे.... बाबज्या."
उपस्थित लोकांत कुजबुज सुरू झाली. बाबज्यानं जणू आपल्याच घरी चोरी केलेली असावी अशा नजरेनं जो तो बाबज्याकडे पाहू लागला. पंचांनी बाबज्याला जोत्यावर बोलावले. पांढर्‍याफटक पडलेल्या चेहर्‍याने बाबज्या जोत्यावर चढला.
"चोरीच्या आदल्या संध्याकाळी बाबज्यानं बाळा धुमाळांकडून पहार म्हंजे आपण जीला पारय म्हणतो ती मागून नेली. ती कशासाठी? ते बाबज्याने इथं जाहीर करावं."
बाळा धुमाळाला आपणपण यात अडकले जाऊ की काय? अशी भिती वाटत होती. मालतीने त्यांना दिलासा दिला.
"म म म मी आमच्या परसात लावलेल्या भोपळ्यासाठी मांडव घालायला ती पारय नेली होती." एवढंसं बोलायला बाबज्यानं मिनिट घेतला.
"पारय लाल रंगाच्या मातीने माखली होती. जो रंग विटांचा असतो. बाबज्याच्या परसातली माती काळी आहे आणि तिथे कुठलाही मांडव अस्तित्वात नाही." गोपी सराईत वकीलासारखा युक्तीवाद करीत होता.
"काल रात्री मी भिंग घेऊन दुकानातला फोटो निरखत होतो तेव्हा माझ्या लक्षात आलं की, गज्याशेटनी दिलेल्या सामानाच्या पावतीतली एक वस्तू फोटोतून गायब आहे. बाबज्याची झडती घ्याल तर तुम्हांला त्याच्याकडे गुटख्याची पाकीटं सापडतील." दुकानातला फोटो आणि सामानाची पावती पंचांच्या हाती देत गोपी बोलला.
लोकं इतकी आवाक होऊन पाहत होती की त्यांनी तोंडात बोटं घालायचीच तेवढी बाकी ठेवली होती.
पंचांच्या परवानगीने दगडू कांबळ्यानं बाबज्याची झडती घेतली तेव्हा त्याला गुटख्याच्या पाकीटांच्या चार-पाच माळा सापडल्या.
"पण हे काम एकट्या बाबज्याचं नव्हे. मला वाट्टं या गुन्ह्यात त्याच्यासोबत आणखी दोन-तीन जणं असावीत. बर्‍या बोलानं बाबज्यानं त्यांची नावं सांगावीत अन्यथा पोलीस कुल्ले सुजवून ती नाव त्याच्याकडून वदवून घेतील यात शंकाच नाही."
जोत्यावरच्या उजवीकडल्या शेवटच्या खुर्चीवर बसलेले गज्याशेट आणि पंच गोपीकडे कौतूकाने पाहत होते.
पोलीसांत देण्याची धमकी ऐकताच बाबज्या टरकला. कादर, गुलम्या आणि आपण स्वत: अशी तीघांनी मिळून चोरी केल्याची त्याने कबुली दिली. जोत्यावर दोन माणसं अजून वाढली.
अखेर पंचांनी कादर, गुलम्या आणि बाबज्याने महीन्याभरात गज्याशेटचे पाच हजार रूपये परत करण्याचा निर्णय देवून सभा बरखास्त केली.

गज्याशेटनी खुशीनं गोपीला हजार रूपये आणि सुक्या खजराचं एक पाकीट दिलं. ते घेवून गोपी लगोलग परश्या भायद्याच्या कंपौंडाकडे मालतीला भेटायला निघाला.

केस निकालात निघाली होती.

* * *

http://kolaantudya.blogspot.in/

Group content visibility: 
Public - accessible to all site users

झकास

झकास !