चोर

Submitted by बेफ़िकीर on 10 September, 2013 - 02:11

"थेरडं मोठं चलाख आहे इल्या. रात्रभर जागंच असतं म्हणतात यडं! दौलतीवर नाग बसतो तसं फिरतं म्हणे घरातल्या घरात रात्रभर! चोर आला तर समजावा म्हणून"

"आँ? अन् मग कामगिरी कशी करायची?"

"पहाटेचं झोपतं ते! साडे तीन चारला! साडे चारला उतरलास छपरातून तर अलगद शिरशील आत"

"पण आहे काय म्हातार्‍याकडे?"

"सोनंय म्हणतायत. वर रोकडही आहे"

"येत्या शुक्रवारी गेम करायची होय?"

"गेमबिम नाही करायची यड्या! गेम म्हणजे काय माहितीय का तुला? गेम म्हणजे खलास करणे"

"तसली गेम नाही हो! ती माझ्या बापाच्याने व्हायची नाही. कामगिरी म्हणतोय मी"

"हां! शुक्रवारची जी रात्र असते ना शुक्रवारची रात्र? ती संपता संपता शनिवारची सकाळ होते की नै? त्या पहाटे उडवायचंय सोनं"

"म्हणजे शनिवारी पहाटे म्हणताय ना?"

"अरे पण रात्र शुक्रवारचीच ना?"

"हो पण म्हणजे तारखेनं शनिवारी म्हातार्‍याला लुबाडायचाय ना?"

"हो रे बाबा! "

"चालतंय की!"

"न चालायला काय झालंय तुला? प्लॅन ऐक आधी"

"बोला"

"त्याचं जे टेरेस आहे, त्या टेरेसच्यावर थेट सोसायटीची गच्चीच आहे... म्हणजे संध्याकाळीच तू कसातरी अंधारात गच्चीवर जाऊन बसलास की रात्रभर तिथेच बसून जागं राहायचं! आणि मग चार वाजता म्हातार्‍याच्या टेरेसवर उतरायचं वरतून! काय? कबूतर किंवा गिधाड कसं उतरतं की नै? तसं! निवांत टेरेसमध्ये बसून कानोसा घ्यायचा. थेरडं जागं असलं तर त्याक्षणीच टेरेसचं दार उघडेल. तसं काही झालं आणि म्हातारा आमनेसामने आला तर सरळ सरसर गच्चीवर चढून जायचं खारीसारखं! क्काय? बोंबलूदेत थेरड्याला! तू त्या गच्चीवरून दोन अँटेनांना थोडा आधार म्हणून धरून पलीकडच्या सोसायटीच्या गच्चीवर अलगद उतरू शकशील. इकडे किती का बोंबाबोंब का होईनात! आणि मग त्या पलीकडच्या सोसायटीचा जिना धाडधाड उतरायचा माकडासारखा! आणि त्या सोसायटीचं गेट आहे भलत्याच रस्त्याला! त्या रस्त्याशी या म्हातार्‍याच्या सोसायटीचा झाट संबंध नाही. थेट तो रस्ता पकडून असं चालायचं जणू पहाटेचा चालायला किंवा पळायला निघाला आहेस. समजलास काय? ते काय ते ट्रॅक पँट वगैरे घालूनच कामगिरीवर जा! आणि खिशात कायतरी बाळगून राहा. एखादं पॅनकार्ड वगैरे! अंधारात काय फोटोबिटो बघत नाही कोण! अगदीच कोणी चौकशी केली तर ते कार्ड दाखवून अशी उत्तरे द्यायची की चौकशी करणार्‍याचीच फाटली पाहिजे. आणि समजा म्हातार्‍याने तुला धरूनबिरून ठेवला तर घाल त्याच्या कंबरेत एक लाथ आणि सूट पळत! तेवढ्याने काही मरत नाही म्हातारा! क्काय? आणि खिशात एक सुराबिरा ठेव नेहमीप्रमाणे. सगळं सांगायला नकोच म्हणा तुला, हे काही पहिलं काम नाही तुझं! पण एक आपलं सांगीतलं! वेळबिळ आलीच तर चरकवायला बरं पडतं हत्यार एखादं! निदान लोक बाजूला तरी सरतात ते बघून! क्काय?"

"चालतंय! पण त्याचदिवशी का म्हणताय? आज उद्यात का नको?"

"फार घाई आहे का?"

"तसं नाही. विचारलं! काही खास कारण आहे काय?"

"म्हातार्‍याच्या शेजारच्या फ्लॅटमधले लोक शुक्रवारी रात्री गावाला जाणारेत. म्हातार्‍याने बोंबाबोंब केलीच तर त्याच्या मदतीला खालच्या मजल्यावरून येणारा माणूस यायलाच भरपूर वेळ लागेल. तोवर तो सुटू शकशील"

"हे भलं झालं!"

"हं! एक चक्कर मारून ये आज अंधारात! कोणाला दिसूबिसू नकोस.. कोणाच्या नजरेत येऊ नकोस..क्काय?"

"हा"

"जरा बघून ये कसं कसं करावं लागेल सगळं ते! पण डायरेक्ट घुसू नकोस बिल्डिंगमध्ये! कोणीही पाहिलं तर चार महिन्यांनी पण लक्षात राहील असला थोबडाय तुझा! "

"चालतंय"

"ठेवू का?"

"हा!"

=====================

दादाने फोन ठेवला तसा इल्या मोबाईल ऑफ करत कुशीवर वळला. संध्याकाळचे साडे सात वाजले होते. एक कळकट्ट पोरगं मगाशी येऊन ठेवून गेलला चहा गार होत आला असावा. बक्कळ पैसा गाठीशी असूनही खर्च कोणाच्या डोळ्यावर येऊ नये म्हणून इल्या महिना फक्त सोळाशे रुपये घेणार्‍या होस्टेलवर राहायचा. सगळी रोकड त्याने कुठे ना कुठे गुंतवली तरी होती किंवा व्याजावर कोणाला ना कोणाला दिलेली तरी होती. उधारी कशी वसून करून घ्यायची ते इल्याला व्यवस्थित माहीत असल्याने ज्यांना पैसे उधारीवर दिले होते त्यांची त्याला काहीच चिंता नव्हती. फक्त डिपार्टमेंटला आपल्या कारवायांची टीप लागू नये यासाठी कमालीची दक्षता तो घेत असे! एकदा नाव डिपार्टमेंटच्या स्कॅनरखाली आले की हयातभर आत बाहेर आत बाहेर इतकाच कार्यक्रम करावा लागेल हे त्याला माहीत होते. इल्याला आठवत होते तेव्हापासून तो दादांचाच पित्त्या म्हणून वावरत होता. त्यांच्या पैशांनी घेतलेल्या जुजबी शिक्षणाचा इतर काहीही उपयोग न झाल्यामुळे आणि कमी वयातच दादांच्या व्यवसायाची 'जानपछान' झाल्यामुळे इल्या विशीबाविशीतच चोर्‍या करू लागला होता. मात्र वयाच्या आठव्या वर्षापासून दादांनी त्याला स्वतःपासून वेगळे ठेवलेले होते. मग हळूहळू पंधरा सोळा वर्षाचा झाल्यावर इल्याच आणखीन वेगळा, एकटा राहू लागला होता. तेव्हा तो पोर्‍या म्हणून काम करून जगत असे. नंतर त्या कामातील रस गेला आणि चोर होण्यात आयुष्याचे सार्थक आहे हे लक्षात आले. त्यामुळे गेल्या दोन वर्षात त्याने सहा चोर्‍या केल्या होत्या. दादांशी त्याचे अ‍ॅग्रीमेन्ट स्वच्छ होते. केलेल्या चोरीतून कमीतकमी तीन लाखांचा ऐवज दादांना द्यायचा. वर जे काय मिळेल ते त्याचे! ते वर किती मिळाले हे दादांनी विचारायचेही नाही आणि ह्याने त्यांना सांगायचेही नाही! मग ते चक्क सहा लाख का असेनात! या बदल्यात इल्या कधी अडकला गेलाच तर त्याच्या सुटकेसाठी दादा अडीच लाखापर्यंत मदत करणार! बाहेरून! आणि इल्या तीनपेक्षा जास्तवेळा पकडला गेला तर चौथ्या वेळी दादा त्याला ओळखणारच नाहीत. संबंध संपला!

इल्या आजवर एकदाही पकडला तर गेलेलाच नव्हता, पण नुसता संशयीत म्हणूनही डिपार्टमेंटला ज्ञात झालेला नव्हता. याची दोन सबळ कारणे होती.

कारण पहिले! दादा त्याला फोनवरून प्लॅन द्यायचे तेव्हाच असा फुलप्रूफ प्लॅन द्यायचे की त्यात तसूभरही चूक व्हायची शक्यता नसायची. दिड दिड महिना निरिक्षण करून आणि पाळत ठेवून ते टार्गेटची दिनचर्या आणि सर्व ठावठिकाणे समजून घ्यायचे. टार्गेटकडे किती मालमत्ता असेल, ती कोणत्या स्वरुपात असेल, कोणत्या वेळी टार्गेट बरेचसे बेसावध असू शकेल, कोणत्या मार्गाने चोरी करता येईल याचा संपूर्ण आराखडा ते तयार करायचे. शेकडो वेळा तो मनातच तपासायचे. तपासताना ते एक भूमिका ठरवून तो आराखडा तपासायचे. जणू आपल्याला असा असा प्लॅन करणारा चोर पकडायचा असला तर कसा पकडता येईल अश्या उलट्या भूमिकेतून ते आराखडा तपासायचे. प्रोसेस ऑफ एलिमिनेशनप्रमाणे एक एक चूक नष्ट करत जायचे. बरेचदा तर असे व्हायचे की संपूर्ण अभ्यास करून आणि तपशीलवार बनवलेला प्लॅन शेवटच्या क्षणी कचरापेटीत टाकून द्यावा लागायचा. पण त्यामुळे ते वैतागायचे नाहीत. उलट आपली बुद्धी अजूनही काम देत आहे आणि यापुढचा आराखडा अधिक निर्दोष करण्यास आपण आता पात्र झालेलो आहोत असेच ते वाटून घ्यायचे.

पण इल्या आजवर एकदाही पकडला न जाण्याच्या दोनपैकी दुसरे कारण होते ते हे, की इल्या स्वतःच अचाट होता. त्याच्या हालचाली, वेग, पहिल्याच दणक्यात शत्रूपक्षाला गारद करणे आणि संयम हे सर्वच इतके वाखाणण्याजोगे होते की ज्याच्याकडे चोरी व्हायची त्याच्यासाठी म्हणजे 'इल्या वादळासारखा आला आणि वादळासारखा गेला' असे असायचे. तोंडावर बुरखा घालून इल्या कामगिर्‍या करायचा. आजवर इल्याने शस्त्राचा धाक दाखवण्यापलीकडे हिंसा केलेली नव्हती. शस्त्राच्या नुसत्या धाकानेच जर माणसे हवे ते काढून देत असली तर उगाच कशाला कोणाला मारायचे? एकदोनदा इल्याला विरोध झालेला होता. तेव्हा किरकोळ शरीरयष्टीच्या इल्याने आवेशाने दोन दोन तीन तीन फटके टाकलेले होते. काही असले तरी मारामारी करण्याची हिम्मत असल्याचे भासवणे आणि प्रत्यक्ष मारामारी करणे यात बराच फरक असतो. बर्‍याच पब्लिकला मारामारी प्रत्यक्ष करण्याची भीती वाटते. इल्या ह्याच मनोवृत्तीचा फायदा घ्यायचा. पण आजवर त्याने कोणालाही शस्त्राने जखम केलेली नव्हती. उलट शस्त्र काढले की लोकच म्हणायचे 'काय हवे ते घेऊन जा पण मारू नका'! एकटा इल्या या कामगिर्‍या पार पाडायचा. एकटा असण्याचे अनंत फायदे होते. दुसरा कोणीतरी फुटला, फितूर झाला किंवा सापडला यामुळे इल्याही पकडला गेला हे होणे अशक्य होते. इल्याचा वेग आणि हालचाली इतर कोणाला जमणे अवघड होते.

मात्र एकदा भांडणे तेवढे झालेले होते. इल्याला ऐवजच फक्त साठ हजाराचा मिळाला होता एका चोरीत. त्याने तो सरळ दादांना दाखवला आणि म्हणाला की निम्मे निम्मे व्हायला हवेत. दादा खवळले, म्हणाले तू नीट शोधले नाहीस. भरपूर माल होता त्या घरात. इल्या म्हणाला घरात माणसे होती, सगळी जागी झालेली होती. मी एकटा होतो. मागून दोघातिघांनी धरले असते तर पिटला गेलो असतो. जास्त वेळ शोधाशोध करणे शक्यच नव्हते. दादांनी संशय व्यक्त केला की इल्याला अधिक पैशांचा मोह झाल्यामुळे इल्या कमी मिळाल्याचे दाखवतो आहे. मग चिडलेला इल्या संतापून निघून गेला होता. दोन महिने दोघे एकमेकांशी बोलत नव्हते. नंतर दोघांचाही राग निवळला. मग पुन्हा संपर्क सुरू झाला. शेवटी प्रेमाचे नाते होते ते!

नुकतीच हातात आलेली कामगिरी इल्याला दिलचस्प वाटत होती. आज मंगळवार होता. आज आणि उद्या रात्री म्हातार्‍याच्या सोसायटीपासून लांबून चकरा मारायला हव्या होत्या. कुठून कुठे पळता येईल हे समजायला हवे होते. म्हातारं चालतं कसं, आहे केवढं बळकट वगैरे बघून ठेवायला हवं होतं जमलं तर! नाहीतर म्हातारं आहे म्हणून जायचो आणि निघायचा जुन्या काळचा पैलवान! की हड्डीपसली एक! रात्रभर चोराच्या चिंतेने म्हातारं जागंच राहतं हे ऐकून इल्याच्या अँटेनाज सतर्क झालेल्या होत्या. नक्कीच म्हातार्‍याकडे बक्कळ काहीतरी होतं!

त्यातल्यात्यात सभ्य कपडे घालून इल्या रिक्षेत बसून निघाला त्या सोसायटीकडे! कोणी आत्ता इल्याला पाहिले असते तर एखादा कन्स्ट्रक्शन 'लायनीतला' सुपरव्हायझर मानले असते. सोसायटीपाशी रिक्षा पोचली तसा इल्या रिक्षेवाल्याला पैसे देऊन आत्मविश्वासाने सोसायटीला वळसा घालून मागच्या बाजूला निघाला. पण वॉचमनने हटकलेच.

"ओ... एंट्री करा"

"हां हां!"

इल्याला वाद निर्माण होऊच द्यायचा नव्हता. त्याने काहीच्या काही एन्ट्री केली. बी चारशे तीन, देशपांडे, वाटेल तो मोबाईल नंबर लिहिला आणि ताड ताड निघाला. वॉचमनचा फक्त इगो सॅटिस्फाय झालेला होता. आपण ज्या मध्यम दर्जाच्या साहेबाला हटकले त्याने आपल्यासमोर नमून ताबडतोब एंट्री केली. बास! इल्या असा चालत होता की जणू या इमारतीतील दोन थ्री बेडरूम्सचे फ्लॅट्स विथ कव्हर्ड पार्किंग त्याचे आहेत. मात्र एका वळणावर तो अत्यंत सावध झाला. त्याला असा एक स्पॉट दिसला होता जेथून त्याला व्यवस्थित टेहळणी करता आली असती पण तो फारसा कोणाला दिसला नसता. तसाही आत्ता अंधार असल्याने त्या स्पॉटला जाणार कोण म्हणा? ती सोसायटीच्या मागची एक टेकडी होती. दादांच्या कमी बुद्धीची कीव करत इल्या टेकडीकडे सरकला. चक्क एक टेकडी इतकी जवळ असताना भलत्याच इमारतीच्या गच्चीवर उडी टाकून तिकडून पसार होण्याचा बावळट सल्ल दादांनी का दिला असेल हे त्याला समजेना! आता हे उद्या दादांना फोनवर विचारायला लागेल हे त्याने ठरवले. मात्र टेकडीच्या जवळ गेल्यावर ते त्याला समजले. सोसायटीने तेथे दोन स्वतंत्र वॉचमन ठेवलेले होते. ते तिथे आहेत याची मुळीच जाणीव नसलेला इल्या आत्मविश्वासाने टेकडीकडे सरकला होता आणि अचानक भुतासारखे दोन वॉचमनच त्याच्यासमोर आले होते. एकंदर इल्या असा दिसत होता की तो त्या सोसायटीतील रहिवासी नसणार हे कोणीही ताडेल. आणि अचानक समोर आल्यामुळे त्याच्या चेहर्‍यावर जे भीतीचे भाव आले होते ते त्या अंधारातही वॉचमनना जाणवले होते, इथे दोन वेगळेच वॉचमन असतील हे माहीतच नसलेला इल्या हबकून उभा राहिला.

"कोण रे तू? कुठे चालला?"

एका वॉचमनने दरडावले. क्षणार्धातच सावरत इल्याने तोंडाल येईल ते उत्तर दिले.

"पेशाब करना है"

"इधर किधर?"

"बी चारसौ तीनमे काम शुरू है कारपेंटरी का"

"बी चारसौ तीन? मतलब?"

अती शहाणपणा नडलेला दिसत होता. बहुतेक असा फ्लॅटच नसावा.

"देशपांडेसाहब के यहाँ"

"देश... तो उधरच क्यूं नही करता पेशाब? इधर जाना और इधरसे आना मना है"

"ठीक है... बाहर जाता मै"

इल्या तेथून सटकला. सुटका झाली असली तरीही तुफान वेगात पळणे ही घोडचूक ठरली असती. काही झालेच नाही असे दाखवत इल्या पुन्हा सोसायटीत आला. तोवर थोडी अधिक बुद्धिमत्ता वापरणार्‍या एका वॉचमनला आठवले की त्याच्याकडे सोसायटीच्या रहिवाश्यांचे एक रजिस्टर आहे. त्याने ते पटकन चाळले तर मुळात बी चारशे तीन असा फ्लॅट त्या सेक्टरमध्ये नव्हताच. तो डी सेक्टर होता. आणि डी ४०३ मध्ये तिवारी राहात होते. हे तिवारी फ्लॅट बंद करून चार वर्षासाठी अहमदाबादला गेल्याचे त्या वॉचमनला माहीत होते. आणि समजा बी ४०३ मधून जरी मगाचचा माणूस आला असला तरीही तो पेशाब करायला इकडे, डी सेक्टरच्या मागच्या टेकडीकडे येण्याचे काही कारणच नव्हते. कसलाही विचार न करता वॉचमनने खच्चून बोंब मारली.

"चोर चोर... पकडो उसको..."

पहिल्यांदा कोण कोणाला उद्देशून चोर म्हणतंय हेच खाली असलेल्या पब्लिकला समजेना! पण इल्याला ते त्याचक्षणी समजले. आता करावे काय? म्हणून त्याने मागून ओरडत धावत येत असलेल्य वॉचमनकडे पाहिले आणि दोन चार लोकांच्या नजरा आपल्याकडे वळलेल्या बघताच तो स्वतःच चोर चोर असे ओरडत एका दिशेला हात दाखवत धावत सुटला. अश्यावेळी अनेक लोक यडचापसारखी वागतात हा त्याच्या तुटपुंज्या शिदोरीपैकी एक अनुभव होता. त्याच्या अपेक्षेप्रमाणे दोन चार लोक त्याच्यामागे कोणत्यातरी अज्ञात चोराला पकडायला धावत सुटले. मागून धावणार्‍या वॉचमनचाच गोंधळ उडाला. ज्याला आपण चोर मानत आहोत तोच लोकांना मार्गदर्शन कसे काय करत आहे हे त्याला कळेना! जेव्हा कळले तेव्हा त्याची चिडचिड झाली. त्याने शिट्टी फुंकून घशाच्या शिरा ताणून ओरडून सगळ्यांना सांगितले की तो धावणारा माणूसच चोर आहे. आता पब्लिकचीही चिडचिड झाली. आपल्यालाच यड्यात काढतो म्हणजे काय? आपण तर इथले रहिवासी! आता ते शिव्या घालत त्याला धरायला धावू लागले. आता इल्याची पाचावर धारण बसली. चहुबाजूंनी तो घेरला जाणार असे वाटू लागलेले होते, शेवटी एका लिफ्टच्या डक्टमधील अंधारात त्याने उडी घेतली आणि हाताला लागेल तो पाईप धरून तो वरवर चढू लागला. त्या हालचालींनी सूर्यास्तापासून आळसावून बसलेले काही पारवे उडले. त्यांच्या पंखांची फडफड एवढी होती की खाली कोणी माणूस आला असता तर नक्कीच त्याला समजले असते की चोर येथून वर गेला आहे.

इल्याचे दंड, मनगटे आणि पोटर्‍या भरून आल्या होत्या. चढवत नव्हते आता वर! पण जायला तर लागणारच होते. नाहीतर सुटका नव्हती. धाप लागलेला इल्या माकडासारख्या हालचाली करत वरवर जाऊ लागला. खाली अजुन गोंधळ चालूच होता. यडचाप पब्लिक त्याला पार्किंगमध्ये शोधत बसले होते. इकडे इल्या चौथ्या मजल्याच्याही वर पोचला आणि पाचव्या मजल्याच्या वर असलेल्या सार्वजनिक गच्चीची थंडाई त्याला जाणवली. तसा उत्साही आणि ताजातवाना होऊन इल्या निकराने कोंडाणा चढू लागला. आणि इल्या पाचव्या मजल्याच्या बाथरूमच्या खिडकीबाहेर पोचला. सहज त्याची नजर आत गेली. बाथरूमचा लाईट बंदच होता, पण दार उघडे होते. त्या दारातून पलीकडच्या बेडरूममधील दृष्य स्पष्ट दिसत होते.

बेडरूममध्ये मंद दिवा होता. एक डबलबेड होता. त्या बेडवर एक छोटी पेटी असावी तसे काहीतरी ठेवलेले होते. त्या पेटीकडे डोळे फाडून बघत आणि ती पेटी दोन्ही हातांनी गच्च दाबून धरून एक जुने खोड बेडवर बसलेले होते. तो म्हातारा म्हणजेच आपले टारगेट असणार हे इल्याला क्षणभरातच समजले. एकंदर म्हातारा अगदीच कृश होता. इल्या मनातच हासला. खाली चाललेली 'चोर चोर' ही बोंबाबोंब ऐकून म्हातार्‍याने इतक्या वरच्या मजल्यावर असूनही आपला खजिना असा गच्च धरून ठेवलेला होता. थोडक्यात म्हातारं हादरलेलं होतं! तापल्या लोखंडावर घाव घातला तर कामगिरी फत्ते होणार होती. शुक्रवारपर्यंत कशाला थांबा? खालचं पब्लिक अजुन खालीच कोकलतंय! इकडे आपण म्हातार्‍याला दचकवून पेटी घेऊन पलीकडच्या इमारतीतून पसार होऊ शकतो.

इल्यालाला ही जाणीव झाली तसा इल्या तरारला! ऐन कामगिरीच्या वेळी त्याच्यात जसे दहा हत्तींचे बळ यायचे तसेच आत्ता आले. आत्ता तो अजुन पाच मजलेही सहज चढला असता जणू!

सरसर चढून इल्या गच्चीवर आला. पलीकडच्या बाजूला जाऊन त्याने मागेपुढे न बघता आणि कोणत्याही पाईपचे सहाय्य न घेता थेट टेरेसमध्ये उडीच मारली. ज्या अर्थी चोराच्या नुसत्या कल्पनेनेच म्हातारं आतल्याआत इतकं घाबरतं त्याअर्थी प्रत्यक्ष चोर आल्यावर तर त्याच्या तोंडून शब्द बाहेर पडणार नाही हे इल्याने ओळखलेलं होतं.

दोन क्षण टेरेसमध्ये थांबून इल्याने अंदाज घेतला. आत म्हातार्‍याला आवाज तर नक्कीच आलेला असणार. याचा अर्थ म्हातारा हबकून बसलेला सणार हे इल्याने ताडले. आता टेरेस आणि बेडरूम यांच्यामधील दार कसे उघडावे यावर इल्या विचार करू लागला. दाराला धडका द्यायच्या म्हंटल्यातर कमीतकमी तीस चाळीस धडका द्याव्या लागल्या असत्या आणि खांदे तर दुखावले गेले असतेच पण वर म्हातार्‍याला तितका वेळ मिळाला असता पळायला किंवा कोणाला बोलवायला!

इल्याने युक्ती केली. त्याने दारावर टकटक केली आणि आत्मविश्वासाने म्हणाला

"आजोबा, मी आणि सावंत आहोत टेरेसमध्ये! काही घाबरू नका. तुमच्याकडे तो चोर येऊ नये म्हणून आम्ही थांबणार आहोत रात्रभर. फक्त तांब्याभर पाणी तेवढं द्या"

इल्या एवढे बोलून थोडा वेळ उभा राहिला. मिनिटभराने दार उघडले गेल्यासारखे झाले आणि किलकिले झाले. हाच तो क्षण होता जेव्हा पहिला घाव घालणे आवश्यक होते. खालून येणारे 'चोर चोर' हे आवाज आता कमी कमी होऊन पब्लिक इकडे तिकडे शोधाशोध करत असल्यासारखे दिसू लागले होते. दार किलकिले होताच इल्याने आपला पाय दारात घातला आणि दाणकन दार उघडले. उघडत्या दारासहितच म्हाताराही बाहेर ओढला गेला. त्याला धरून तसाच आत ढकलत आणि बेडवर आडवा पाडून खिशातला बारका सुरा त्याच्या गळ्यापाशी टेकवत जहरी आवाजात इल्या म्हणाला..

"म्हातार्‍या, आवाज काढलास तोंडातून तर जिवानिशी जाशील... सुखाने जग राहिलेली वर्षे... मी इथून निघून गेल्यानंतर दहा मिनिटांपर्यंत बोंब मारू नकोस... नाहीतर पुन्हा येऊन कोथळा बाहेर काढीन... समजलास काय?"

म्हातारा प्रचंड घाबरलेल्या आणि विस्फारलेल्या डोळ्यांनी इल्याकडे पाहात राहिला. विरोध तर त्याने केलाच नाही. इल्या उठला. समोरच पडलेली लहान पेटी उचलली. एकदा म्हातार्‍याकडे पाहिले. इल्याला कसलीतरीच शंका आली. म्हातारा आता तसेच डोळे ठेवून आढ्याकडे पाहात होता. इल्याने म्हातार्‍याला गदागदा हालवले. अंहं! इल्याच्या पाठीतून आयुष्यात पहिल्यांदाच भीतीचा शहारा खालपर्यंत गेला. पेटी हातात असो वा नसो, जमेल तसे निसटणे इतकेच आता कर्तव्य होते. म्हातारं गचकलेलं होतं! चक्क घाबरून, भीतीनेच मेलं होतं! असला प्रकार इल्याने बापजन्मात अनुभवलेला नव्हता. पायातले बळ गेल्यासारखा इल्या त्या निष्प्राण डोळ्यांकडे पाहात राहिला क्षणभर! जणू प्रत्यक्ष आपलाच मृत्यू समोर आहे तसा घाबरत घाबरत मागे सरकला आणि टेरेसमध्ये आला. त्यानंतर मात्र इल्याने एका हाताने पेटी धरून कसाबसा पाईप धरला आणि हातापायांना प्रचंड रेटा देऊन गच्चीच्या दिशेने जाऊ लागला. सुदैवाने खाली जमलेली माणसे सोसायटीच्या भलत्याच दिशेला शोधाशोध करत होती. आत्तापर्यंत त्यांच्यातील अनेकांच्यामते चोर निसटलेलाही होता. बारा पंधरा मिनिटांनी गच्चीवर कसाबसा पोचलेला इल्या धप्पकन गच्चीवर पडला. कामगिरी नव्वद टक्के फत्ते झालेली होती. फक्त खुनाचा आळ आला तर काय हा प्रश्न होता. पेटी बर्‍यापैकी जड होती. मुबलक माल मिळाला तर दादा खुनाच्या आरोपातूनही सोडवतील हे नक्की होते. मुळात आज पहिल्यांदाच कोणीतरी आपल्याला स्वच्छपणे पाहिलेले आहे आणि चोर म्हणून आपल्यामागे लोक लागलेले आहेत हे आठवल्यावर तर इल्याच्या मनावर पुन्हा दु:ख कोसळले. अज्ञात इसमाकडून खून व दरोडा ही बातमी आणि दहाजणांनी चोराला पाहिलेले असणे यात जमीन अस्मानाचा फरक होता. म्हातारं नुसतं दम देऊन मरेल याची कल्पनाच नव्हती इल्याला. काही असो, येथून सटकणे तरी मस्ट होते.

इल्याने गच्चीवर शोध घेतला. कोठेतरी दादा म्हणाले तश्या दोन अँटेनाज खरंच सापडल्या. त्यांचा आधार घेऊन आणि पेटी आधी पलीकडच्या इमारतीच्या गच्चीवर टाकून इल्या कबूतरासारखा पलीकडच्या गच्चीवर लँड झाला. त्याक्षणानंतर मात्र तुफान वेगाने तो त्या इमारतीतून सटकला. त्या इमारतीतील लोक या अलीकडच्या इमारतीत चोर आल्याचे कळल्यामुळे इकडच्या बाजूच्या फेन्सकडे जमलेले होते, तेव्हा विरुद्ध बाजूच्या फेन्सकडून इल्या रस्त्याला लागला आणि अत्यंत सुदैवाने समोरच आलेल्या एका ऑटोरिक्षात बसून निघालादेखील!

आता मात्र इल्याला खराखुरा घाम फुटला. रूमवर जाण्यात अर्थ नव्हता. ती पेटी त्याच्याकडे कोणी पाहिली असती तर साक्षीपुरावे त्याच्याचविरुद्ध गेले असते. इल्याने रिक्षेतील अंधारातच पेटी उघडली. हाताला विचित्र वस्तू लागल्या. दोन तीन कपडे, एक कसलीशी फ्रेम वगैरे! एका रस्त्यावरील दिव्याच्या उजेडात त्याने रिक्षा थोडावेळ थांबवायला सांगितली. उजेडात त्या वस्तू तपासल्या. एका लहानश्या मुलाचे ते कपडे होते. एका फ्रेममध्ये एक नवरा बायको आणि एक लहान मूल यांचा फोटो होता. एक चिठ्ठी होती जिच्यात लिहिले होते.

"काळाने माझा मुलगा आणि सून अपघाताचे निमित्त करून हिरावून नेले. पण नातू जिवंत होता. मी नातवाला क्षणभर कडेवरून उतरवून मुलाच्या प्रेतावर डोके टेकवून हंबरडा फोडला आणि वळून पाहतो तर नातू गायब! हे त्या नातवाचे आवडते कपडे आणि हा माझ्या कुटुंबाचा एक फोटो. ही दौलत कोणी चोरू नका रे! कधी कोणी चोरलीतच तर लक्षात ठेवा, इल्या माझ्या नातवाचे नाव आहे, तो कुठे भेटला तर त्याला म्हणाव तुझे आजोबा तुझी खूप वाट पाहायचे"

======================================

-'बेफिकीर'!

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बेफि, ह्यावेळी एकदम टिपीकल मेलोड्रामा लिहिलात! पण त्यालाही 'बेफि' टच आहेच म्हणा!

कम्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्माआआल लिहिली आहेत बर्र का!

मी पहिल्यांदा कोणता लेख वाचुन कपाळाला जोरात हात मारला आहे ऑफीस मध्ये बसुनसुद्धा................
बेफि तुमची लेखनशैली भन्नाट आहे.

आवडेश ....सकाळपासुन विचार करतेय इल्यान पुढे काय केल असेल..
खुप खुप प्रश्नचिन्ह्....:विचारात पड्लेली बाहुली:

चर्र झालं शेवट वाचून.

असा एक हिंदी चित्रपट पाहिल्याचे आठवतय त्यात एक जोडपं येणा-या - जाणा-या वाटसरुला आश्रय देत असे अन त्याची मालमत्ता हडप करुन त्याला ठार मारत असे, स्वतःच्या मुलीच्या बालपणी ठरलेल्या लग्नाच्या खर्चासाठी.

आणि एके रात्री एका तरुण व्यापा-याची निर्घूण हत्या करुन त्याचा ऐवज लंपास करतात पण दुर्दैव म्हणजे तोच त्यांचा होणारा जावई निघतो Sad

मांडणी, शैली अफलातून, नेहमीसारखीच !

-सुप्रिया.

अत्यंत उत्कंठावर्धक.. आणि शेवटी सॉलिड धक्का...
तुमच्या लिखाणाची खासियतच आहे, एकदा वाचायला सुरूवात केली की संपवल्याशिवाय वाचन थांबवता येत नाही.

पुलेशु!

बेफिकिरजी
तुमच्या कथा वाचताना एक खात्रि असते कि नक्की काहितरी वेगळे वाचायला मीळणार आहे..

तसाच अनुभव आता दिल्याबद्दल धन्यवाद

नविन कांदबरी कधि?

हो न ?

आशुचँप मुव्हीच नांव आठवतय का ?

खुप परिणामकारक कथानक होत ते , हाताळलही सुरेख होतं.

Supriya sinemache naav aaThavat naahi, pan Anang Desai tya jodpyacha mulaga daakhavalay. te rajasthani/ gujarathi jodape asate. phar tragic hota to.

हा हा हा.....धन्स ! या अस्ल्या एक एक आयडी आहेत इथे की घोळ घोळ होतो नुसता Wink

तरी शंकेची पाल चुकचुकतच होती मनात.

बेफिजी.................. तुमचे प्रत्येक लिखाण खुप मस्त असते................. खुप आवडतात तुमचे लिखान