होणार मूर्ख मी हे बघुनी

Submitted by बेफ़िकीर on 9 December, 2013 - 02:51

अतीश्रीमंतीने सजलेली घरे, मढलेल्या बायका, घरातही लग्नासाठी जमावे तसे सजलेले स्त्री-पुरुष, जनरेशन गॅप, कौटुंबिक नाट्य, रटाळ चित्रण, प्रत्येकाच्या चेहर्‍यावर कॅमेरा रेंगाळवून प्रत्येकाची रिअ‍ॅक्शन दाखवण्याची अविकसित बुद्धीमत्ता, टिपीकल कंटाळवाणी संवादफेक, चांगले असणारे फारच चांगले आणि वाईट ते फारच वाईट, रिअल लाईफमध्ये कधीही होणार नाहीत असे संवाद व त्यांचा वेग, ही सर्व गुण(?)वैशिष्ट्ये घेऊन मालिका अवतरतात.

मध्यमवयीन, ज्येष्ठ नागरीक व वेळ मिळेल तेव्हा काही स्त्री पुरुष या मालिकांवर जीव उधळतात. डोक्यात कुठेतरी सीमारेषा असते की ही एक काल्पनिक मालिका आहे आणि आपण वास्तवात जगत आहोत. काहींच्या बाबतीत ही सीमारेषा हळूहळू पुसट होऊ लागते. आपल्याही घरात असेच काहीसे आहे हे उगीचच पटायला लागते. नसलेल्या प्रश्नांची उत्तरे मालिकेमार्फत सुटतात का हे बघितले जाऊ लागते. मनोरंजन किंवा वेळ घालवणे या पलीकडे या ,मालिका जाऊन बसतात.

चीड आणणार्‍या ह्या मालिका काहींसाठी संध्याकाळचे ध्येय ठरते

त्यात पुन्हा जाहिराती वगैरे तर फारच महान!

या अश्या मालिकांमध्ये घडणारे नाट्य अद्भुत असू शकते. अपघात, अफरातफर, घरभेदीपणा, कौटुंबिक राजकारण, वाटण्या अन् काय काय! त्यात पुन्हा अगदीच 'घरेलू' स्वरुपाच्या मालिकांमध्ये तर जुने झालेले व त्यामुळे किंवा कश्यामुळे तरी ऑब्सोलेट झालेले संस्कार योग्य होते हे सिद्ध करणे यासाठी अहमअहमिकाच लागते. कोणीतरी वडीलधारी व्यक्ती म्हणजे जणू एकखांबी तंबू वगैरे असतो. त्याचा शब्द म्हणजे काळ्या दगडावरची रेघ!

नुकतेच काही कारणाने अक्षरशः 'होणार सून मी' या मालिकेचे सलग तीन भाग थोडेथोडे बघितले गेले. मोठी आई, बेबी वन्सं, जान्हवी वगैरे पात्र होती. ह्यात जान्हवीची आई अचानक जावयाकडून पैसे आणते व एक नाट्य घडते. नवरा बायकोला फोन करण्याआधी अनेकदा विचार वगैरे करतो. आत्ता हिचा मूड असा आहे, आत्ता हिला फोन करावा का? हिचा फोन का आला नाही? बरेच बरे नसेल का? मग ती कोणीतरी एक बेबी की कोण आहे तिने लावलेल्या शिस्तीमुसार त्या जान्हवीने वेळच्यावेळी 'उशीर होईल' असा निरोप न दिल्याने जणू घरातले सगळे चक्रच बिघडते. त्यावर विश्व रसातळाला जाणार असल्यासारखे चेहरे करून जो तो वाक्ये फेकू लागतो. मग माफीनामे, तेही अश्या टोनमध्ये की अगदी त्या बेबीपुढे लोटांगण घातल्यासारखे! फार तर काय, दोन पोळ्या अन् थोडीशी भाजी जास्त केली गेली असती किंवा करावीच लागली नसती. आठ दहा जण असलेल्या घरात, तेही इतक्या श्रीमंत घरात, त्याने असा काय फरक पडला असता? घरातली माणसे एकमेकांशी अजिबात ज्या पद्धतीने बोलत नाहीत त्या पद्धतीने ही पात्रे बोलत असतात.

आणखी कोणत्यातरी एका मालिकेत एक कोणीतरी घरातून निघून गेलेला असतो. त्याने त्याच्या मैत्रिणीला 'माझे बरेच नातेवाईक आहेत' असे काहीतरी सांगितलेले असते जे खोटे असते. ती तो घरी नसताना अचानक घरी प्रकट होते. मग तिला त्याचे म्हणणे खरे आहे हे पटावे म्हणून त्या तरुणाची आई, लहान बहिण, आत्या, वडील (बहुधा मोहन जोशी), मोठा भाऊ, वहिनी ही पात्रे एकामागोमाग एक उभी केली जातात. प्रत्येक पात्रासाठी हे नवीनच असल्याने त्या त्या पात्राच्या चेहर्‍यावर उमटलेले नवलाचे व धक्याचे भाव बघूनही त्या मुलीला एकदाही शंका येत नाही की लोक खोटे बोलत आहेत. मग ते इतके ताणलेले दाखवले की असे वाटले की टीव्हीच्या आत जाऊन त्या मुलीला गदागदा हालवून दोन थोबाडात लगावून विचारावे की अक्कलशून्य बये, तुला कळत नाहीयेका की ह्यांच्यातला कोणीही त्याचा खरा कोणीही नाही आहे वगैरे!

त्या होणार सून मध्ये परवा एकदा त्या नवर्‍याला जान्हवी विचारते की 'ए, मला तू ते (काहीतरी) सांगशील का?' हे विचारताना तिचा चेहरा असा झालेला असतो जणू दोघे नुकतेच प्रेमात पडलेले प्रेमवीर बागेत बसले आहेत आणि प्रेयसी विचारत आहे की तू मला कधी विसरणार नाहीस ना रे? त्यावर तो नवरा म्हणतो की नक्की सांगेन पण आधी डोके चेपून दे! मग तो पलंगावरून उतरून खाली बसतो आणि ती पाळलेल्या कुत्र्याच्या केसांतून हात फिरवावा तसे हात फिरवत स्वप्नील डोळे करून आढ्याकडे बघत राहते.

मध्यंतरी एका मालिकेत एका युवकाने आपल्या साहेबाला 'लिफ्टपाशी थांबलेल्या लोकांसाठी आरसे लावा म्हणजे ते कंटाळणार नाहीत' असा सल्ला दिला. तो सल्ला देण्यापूर्वी 'मी तुम्हा महान लोकांमध्ये बोलायला किती नालायक आहे' हे सांगण्यासाठी दहा वाक्ये खर्ची घात्रली. त्यात आगाऊ माफी वगैरे मागून घेतली. तेव्हाच पूर्ण खात्री झालेली होती की ह्याचे सजेशन साहेबाला पटणार. पण किती तो वेळेचा अपव्यय! त्या साहेबाला कोणी मंजिरी आवडत असते आणि तिचे उत्तर काय अशी पाटी असलेल्या जाहिराती गेले दोन दिवस झळकत आहेत. एव्हाना मंजिरीचे उत्तर काय ह्याची वाट न पाहता आजचा एखादा तरुण भलतीच्या प्रेमातही पडला असता च्यायला!

असेच एका मालिकेत कोणा एका तरुणाला मुलगी बघायला म्हणून तिच्या घरी घेऊन जातात. त्याचा कंप्लीट विरोध असतानाही! आणि अचानक त्याला ती मुलगी पाहून आवडते वगैरे! पण तिच्या मनात तसे काही नसते हे तर स्क्रीन बघणार्‍या प्रेक्षकांनाही समजते पण त्या बैलाला समजत नसते.

ह्या असल्या मालिका प्रेक्षकांना 'आपण काय बघावे' हे सुचवू तर शकतच नाहीत, पण तसा प्रयत्नही करताना दिसत नाहीत. अशी घरे नसतात, अशी नाटकी माणसे नसतात, अशी तत्ववादी, शिस्तप्रिय, जुनाट संस्कारांनी माखलेली धेंडे हल्ली नसतात, असे कोणी कोणाशी बोलत नाही हे लक्षात तरी घेतले जाते की नाही कोणास ठाऊक!

संभाव्य परिणामः

१. वेळ फुकट जाणे
२. अनावश्यक कथानकात गुंतल्यामुळे त्या कथानकानुसार बाकीची दिनचर्या किंवा तिचा काही भाग आखला जाणे
३. आपल्याकडे काही फार वेगळे चाललेले नाही असे काही जणांना वाटू लागणे व त्यातून बहकणे
४. अनुसरण केले जाण्याची शक्यता निर्माण होणे (मर्यादीत प्रमाणात)

शक्य असलेले उपायः

१. मालिका वास्तववादी असाव्यात
२. वास्तववादी मालिका बघाव्यात
३. मालिकांऐवजी बातम्या, चित्रपट, कॉमेडी शो, गाणी, स्पोर्ट्स चॅनेल्स बघावेत.

ह्या अश्या मालिका हिंदीतही अमापच आहेत.

तुम्हाला काय वाटते?

धन्यवाद!

-'बेफिकीर'!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

पोळ्या बडवल्या जातात.<<<<

वा नवीनच पाकृ !! धागा काढाच प्लीज
आजवर ...पोळ्या लाटून बनवतात आणि भाकर्‍या बडवून इतकेच माहीत होते ....;) Lol

अवांतराबद्दल दिलगीर Happy

चालूद्या ............

मी भारतात असताना गटः३ ... पण असा प्रश्न विचारल्याने जे. ना. 'म्हणजे काय झालं, की.... ' असं भाग १ ला पासून पूर्ण कथा सांगतात. त्यामुळे मी तोही गट सोडला.

मला त्या सिरियल्सचे डायलॉग ऐकू आले तरी त्रास होतो.. व्यवस्थित माणसाचे विचारही घाण होतील असल्या सिरियल्स बघून असं वाटतं. त्यातून बिन्डोक पात्र, मख्ख, माठ, धो धो अभिनय करणारे लोक दिसले कधी तर जी चिडचिड होते... i just cant stand it!

असो..

कैलास गायकवाड व साती सोडून माबोवरील इतर सर्व वैद्यांना तीन महिन्यांची सक्तीची वैद्यकीय रजा देण्यात यावी अशी आम आदमीची मागणी आहे.

स्वतःच्या अनेक कसदार कविता व गझला असणार्‍यांनी प्रथम लय म्हणजे काय हे समजून घ्यावे व नंतर इतर धाग्यांवर ज्ञानामृताचे वाटप ठेवावे अशीही एक विनंती आहे .

बेफि लेख पट्ला.....

मी स्वतः कोणत्याही मालिकेची/चॅनल ची/ कार्येक्रमाची गुलाम नाही. अनेकदा आपलेच उद्योग करत असल्याने लक्ष पण नसतं. मुलगी (वय १२) पूर्वी खुप कार्टुन्स पहायची. पण सध्या तिला इतर अनेक नव्या वाटा मिळाल्याने टि.व्ही बंद आहे. समोर चालु असेल तरी पाठ फिरवुन वाचत असते.

मध्यंतरी मी क्राइम पेट्रोल आणि सावधान इंडियाची अ‍ॅडिक्ट झाले होते ( साधारण ४ महिने) पण नंतर नंतर मलाच त्याचा त्रास व्हायला लागला.

आमच्या घरातले ज्येष्ठ पण तारतम्य असणारेच आहेत. महत्वाची चर्चा वा पाहूणे आले तर आपोआपच टि.व्ही. बंद होतो. त्या मुळे तो धोका नाही.

माझी आई ४खोल्यांच्या घरात (वडिल गेल्या पासुन गेली ४ वर्ष) एकटी रहाते. टिव्ही हा तिचा सखा आहे. ती कुठल्याही खोलीत असु दे टिव्ही चालुच असतो. पण ती मालिकां पेक्षा म्युझीक चॅनल जास्त ऐकते. ती "टिव्ही पहाण्या पेक्षा ऐकते " अश्या लोकांना ह्या मालिका म्हणजे वरदान आहे. पण कोणीही आलं तर ती टुणक्न दार उघडुन पहिले टिव्ही बंद करते. मग कोणतीही मालिका कोणत्याही टिपेला असु दे. ती नेहेमी म्हणते, " बाई ग! हा माझा मित्र आहे. मी बटण दाबलं की माझ्याशी बोलतो. "

ज्यांची मुलं दूर देशात आहेत. फारसे नातेवाईक जवळ नाहीत. त्या वेळी ठराविक दिवशी येणारे फोन आणि ह्या मालिका त्यातली पात्र ...हेच त्यांचं जीवन. त्यांनी जर मालिके मधल्या पात्रांना जवळ्चं मानलं तर चूक काय?

आजकाल सगळे कर्ते लोक खुप बीझी असतात. अगदी गृहिणी म्हंटली तरी तिला हजार व्यावधानं असतात. अश्या वेळी म्हातारे लोक काय करणार? मुलं सुद्धा त्यांच्या त्यांच्या मालिका ( भीम, डोरेमन, शिनचॅन) पहातातच ना!!! अगदी भरल्या घरातही म्हातार्‍यांना एकटं वाटु शकतं.

त्यामुळे मालिका बघतात, बोर होतं..... हे म्हातारे लावतात म्हणुन आम्हाला पहायला लागतं..... वगैरे वगैरे सगळं ठीक आहे, पण त्यांचीही बाजू असू शकेल ना!!!!! तुम्ही तुमचे कार्येक्रम त्यांच्या साठी बदलता का? मग त्यांनी त्यांची एंटर्टेन्मेंट का बदलावी ? जरी अनेक छंद असले, तरी प्रत्येक छंदाचा एक कालावधी असतो. वाचुन तरी किती वाचणार!!!! मग ह्या गोष्टींचा गुलाम व्हायला वेळ लागत नाही. आपण समजुन घेतले पाहिजे. फारतर करार केला पाहिजे की फक्त दोन मालिका पहाणार वगैरे वगैरे...

खरा दोष अश्या लोकांचा आहे ज्यांनी कुवत असुनही इतर मनोरंजन आवडुन न घेण्याचे ठरवले आहे.

असो हे माझे विचार ....

बर्‍याचशा मालिका म्हणजे अत्याचारच... Happy अगदी यथार्थ वर्णन...!!
दक्षिणाशी सहमत... मी मराठी मालिका अधून मधून तुकड्यातुकड्यात बघते ते इथली चर्चा वाचूनच... माबोवर जास्त इंटरेस्टिंग रसग्रहण असतं...
काही मालिकांमधील काही गोष्टी आवडत आहेत... जसं नवीन सुरू झालेली जुळून येती... त्यातील त्या लग्नाळू मुलाचे ठाम विचार निष्कर्ष आणि त्यांच्या घरचं गोग्गोड वातावरण... मोरंब्याच्या बरणीसारखं!! हाये... मै मरजावा...!!! नवर्‍यापुढे हज्जारदा मोठ्याने घोकून झालं "अस्सं सासर हवं गं बाई!!!" पण त्याला एलदुगो पासून हा इश्श्यू हँडल करायची प्रॅक्टीस झालीया... चक्क हळूच कन काणा डोळा माझ्याकडे करत कानाडोळा करतो बोलण्याकडे!! माबोच्या भाषेत काय ते अनुल्लेखान एमारतो म्हणे!! मुरलाय गडी संसारात!! Happy

चॅनेल बदलताना ह्या मराठी वाहीन्यांचा घोळका येऊ लागला की नवरा बटणं धावडवतो... तरी त्या सत्यजित नी मंजीरी मुधोळकरांची (मंजीरीचं म्हायेरचं नाव काय... काडीमोड घ्येतेय म्हणे...) जुगलबंदी तुकड्यातुकड्यात कानावर पडते... आणि अगदी आमच्या जुगलबंदीला कस्काय बुआ डिट्टो म्याच करतात म्हणून नवरा काण्या डोळ्याने माझ्या काण्या डोळ्याकडे पाहत बटणं पुढची ताबडवतो... अगदी स्पोर्ट्स चॅनेल येईपर्यंत... मग हुश्श्य करतो Happy

कधी कधी असल्या गोग्गोड सासरची, गोंडस श्रीची, त्या नव्या मालिकेतल्या हिरोची बायकोबद्दलची बायकोच्या माहेरबद्दलची अविश्वसनीय काळजी बघून माझ्या "बघा... शिका जरा शिका" लूककडे कानाडोळा करण्या इतपत नवरोजी हुश्शार झालाय!!!
बेफी...आपल्याकडे काही फार वेगळे चाललेले नाही असे काही जणांना वाटू लागणे व त्यातून बहकणेहसून हसून गडबडा लोळण>> याला मात्र शतशः अनुमोदन... याने आमच्या दोघांत कायम लुटूपुटूची जुगलबंदी चालूच असते Happy एन्जॉय करते मी अगदी Happy

मोकीमी पटलंच Happy

साबांची येगळीच तर्‍हा!! मी सासरी होते तेव्हा कुंकू, पिंजरा, दिल्याघरी सुखी रहा बोकाळलेल्या... त्यातल्या व्हिलन सासवांचा मालवणीमध्ये फुलं उधळून उद्धार रोजच्या रोज... अगदी दोळ्यांतून पाणी-बिणी काढून...
वर मध्येच माझ्याकडे वळून तुला अस्ली सासू मिळायला हवी होती मग समजलं असतं कस्स्सा सासुरवास असतो ते!! Uhoh

एकदा हळदीकुंकवाला गेलेल्या... श्शी बाई आजच्या भागांत काय दाखवतील कोण जाणे... श्शी बाई दुपारचं हळदीकुंकू का नाही ठेवत या बायका कोण जाणे असं मोजून पंधरावीसवेळा बडबडून Proud
परत आल्या तर बघीतलं आम्ही हिंदी सिनेमा लावून बसलोय... हा पारा चढला... अस्मानीला भिडला...
तणतणत म्हणाल्या मी नव्हते म्हणून तुम्ही लग्गेच चॅनेल कशाला बदलायचं??? बघून स्टोरी नाही का सांगायची??? श्शी बाई आता कसं समजणार आजच्या भागांत काय दाखवलं ते??? Uhoh Proud

त्या मानाने मी सुदैवी मग. माझ्या साबा निदान थोडा वेळ तरी भजन पुजनात घालवतात. साबु मात्र टीव्हीला चिकटतात. कधी तरी विरक्ती आली किन्वा केबल बन्द असेल तर मग टिव्ही बन्द असतो. नाहीतर उपरोक्त मालीका अव्याहत चालू असतात.

मोकिमी पोस्ट पटलीय. पण या बीनबुडाच्या सिरीयल ऐवजी चान्गली कथानके असतील तर हे सगळे सुसह्य होते. हे ही खरे की वृद्ध लोकान्ना टिव्ही शिवाय जवळचे कोण? नव्या पिढीला त्यान्च्याशी बोलण्यात रस नाही. आणी काही ठिकाणी बोलायला जावे तर ती कुन्कुतली जानकी आणी विब मधली मुक्ता कित्ती चा.न्गली आणी आदर्श सून आहे! नाहीतर या आजकालच्या सुना.:अरेरे::फिदी:

आता दूरदर्शनवरच्या एकेक सुंदर मालिका आठवत आहेत. लहानपणी दादा-दादी की कहानियां ही एक हिंदी मालिका होती. त्यात अशोक कुमार आणि दीना पाठक (चुकत असेन तर दुरुस्ती सांगावी) हे आजोबा-आजी आणि ते मुलांना गोष्ट सांगत आहेत अशी ती मालिका होती. ती आजही लागली तर किती मजा असे वाटते कारण मग माझ्या मुलांना ती दाखवता येईल.

दुसरी म्हणजे चाणक्य, सद्ध्या ती दूरदर्शनवरच दर रविवारी सकाळी १० वाजता पुनःप्रक्षेपित होत आहे. कुणाला इच्छा असल्यास जरूर पहावी. अंभी राजकुमाराने अलक्षेन्द्र (Alexander) शी संधी केली आणि राजाने (त्याच्या वडिलांनी) आत्महत्या केली इथपर्यंत ती मालिका आली आहे.

हमलोग
बुनियाद
ये जो है जिंदगी
श्वेतांबरा
रामायण
महाभारत
नुक्कड
फौजी
मालगुडी डेज
रजनी (ठीकठाक)

एकदा 'खानदान' नावाची मालिका सुरू झाली आणि तेव्हापासून मालिका म्हणजे श्रीमंत कुटुंबे, घरभेद, भांडणे, खानदानकी इज्जत, सासबहू वगैरे समीकरणे जुळू लागली. मग सगळेच कंटाळवाणे झाले. अगदी खानदान ही मालिकाही कंटाळवाणीच होती.

माझी मुलगी खुप हसते.... ' होणार सुन मी त्या घरची ' रात्री ८ वाजता असे म्हणतात तेव्हा Lol

एकदा 'खानदान' नावाची मालिका सुरू झाली आणि तेव्हापासून मालिका म्हणजे श्रीमंत कुटुंबे, घरभेद, भांडणे, खानदानकी इज्जत, सासबहू वगैरे समीकरणे जुळू लागली. >>> +१००

तेंव्हा खानदान आवडायची. पण आता पुढे वर्षानुवर्षे हाच कथा-प्लॉट बघावा लागणार आहे याची पुसटशी पण शंका नव्हती.

होणार सुन मी त्या घरची ' रात्री ८ वाजता <<< Lol

हे म्हणजे 'मला जाउद्या ना घरी आता वाजले की बारा' सारखे वाटते खरंच!

माधव - अनुमोदन

होणार सून मी या घरची या मालिकेत कोणीही त्या घरची सून का होऊ नये याची सर्व स्पष्टीकरणे दिलेली आहेत.

होणार सून मी या घरची या मालिकेत कोणीही त्या घरची सून का होऊ नये याची सर्व स्पष्टीकरणे दिलेली आहेत.>>> Biggrin

लेख आवडला... एकदम खुसखुशीत.. Happy

खानदान मालिका आवडायची. `होणार सून मी' सुद्धा पहिल्यांदा अतिशय आवडली होती. रोज जमत नाही; पण जमेल तेव्हा ही मालिका मी बघते.

होणार सुन मी त्या घरची ' रात्री ८ वाजता <<<

हे म्हणजे 'मला जाउद्या ना घरी आता वाजले की बारा' सारखे वाटते खरंच!
>> Lol

होणार सून हा ओरिजिनल धागा आणि हा 'होणार मूर्ख' हा धागा ह्या दोन्ही धाग्यांवर मालिकेला शिव्याच दिल्या जात आहेत, तरीही दोन्ही धागे दयाळूपणे अलाऊड केल्याबद्दल प्रशासनाचे विनम्र आभार!

"कैलास गायकवाड व साती सोडून माबोवरील इतर सर्व वैद्यांना तीन महिन्यांची सक्तीची वैद्यकीय रजा देण्यात यावी अशी आम आदमीची मागणी आहे. " !!

वंडर्फुल ! एक विरोधी मत व्यक्त झालं काय आणि बेफीजी हे बोलून गेले ! शेवटी ते ही माणूसच आहेत हे कळलं !

या माणसाची सार्वजनिक इमेज आणि ही अशी अधून मधून उसळी घेणारी मूळ वृती यातला विरोधाभास लक्षात आला हे बरं झालं.

मायबोलीवर कोणी रहावं आणि कोणी नाही याचा निर्णय बेफीजी घ्यायला लागले की काय ऍडमिन ?

वंडर्फुल ! एक विरोधी मत व्यक्त झालं काय आणि बेफीजी हे बोलून गेले !<<<

एक विरोधी मत नव्हे, दोन विरोधी मते, दुसरे मतही एका वैद्यानेच दिलेले आहे आणि त्या मतामध्ये या धाग्याबाबत काहीही विषय नसून निव्वळ वैयक्तीक खुन्नस आहे, जशी तुमच्या मतांमध्ये येत चालली आहे कारण तुमच्या एका गझलेत लयीचा प्रॉब्लेम डिस्कस झालेला तुम्हाला आवडला नाही. (हे सगळे लिहिणे टाळण्याची इच्छा होती, पण तुम्ही केलेतच बोलते).

शेवटी ते ही माणूसच आहेत हे कळलं !<<< माझा काही वेगळा दावा कुठे होता?

या माणसाची सार्वजनिक इमेज आणि ही अशी अधून मधून उसळी घेणारी मूळ वृती यातला विरोधाभास लक्षात आला हे बरं झालं.<<<

माझी (माबोवरील) सार्वजनिक इमेज अत्यंत वादग्रस्त आणि काँप्लिकेटेड आहे हे तुम्हाला अजुनही माहीत नाही झालेले??

मायबोलीवर कोणी रहावं आणि कोणी नाही याचा निर्णय बेफीजी घ्यायला लागले की काय ऍडमिन ?<<<

कृपया नीट वाचावेत, मी 'आम आदमीची मागणी' असे म्हणालेलो आहे. मी कोण निर्णय घेणार?

होणार सून मी या घरची या मालिकेत कोणीही त्या घरची सून का होऊ नये याची सर्व स्पष्टीकरणे दिलेली आहेत.
>> हो!
आताच हा एपिसोड जेवताना 'ऐकला'.

हे लोकं नक्की काय प्रमोट करताहेत? एक सज्ञान व्यक्ती , तिचे हक्क वगैरे वगैरे तर सोडाच - ह्यांना ऑफिस, डेड्लाईन्स, प्रेशर्स, सेव१ इशुज - झोकून देऊन काम करणं ह्यातलं काहीही ऐकून तरी माहित अ सावं का?

घशात आवाज टाकून बोलणारी बुळी बाई म्हणजे चांगली?

वेल, पुन्हा एकदा असो!

Pages