'पितृऋण'च्या निमित्ताने श्री. नितीश भारद्वाज यांच्याशी गप्पा

Submitted by माध्यम_प्रायोजक on 3 December, 2013 - 01:11

पशुवैद्यकशास्त्रामध्ये शल्यविशारद असणारे नितीश भारद्वाज यांना दिग्दर्शनाची आणि अभिनयाची विशेष आवड होती. त्यातूनच त्यांनी अनेक दूरचित्रवाणी मालिका आणि नाटकांमध्ये काम केलं. अभिनेता म्हणून त्यांची ओळख अधिक असली तरी त्यांनी भारतामध्ये आणि परदेशातही अनेक दूरचित्रवाणी मालिका आणि अनुबोधपट दिग्दर्शित केले असून, परदेशात, विशेषत: ब्रिटनमध्ये, रेडिओसाठी दिग्दर्शनही केलं आहे.

इंग्रजी नाटकांमधील कामगिरी आणि बीबीसी रेडीओ-४वरील सादरीकरण यांसाठी त्यांचं कौतुक झालं. महत्त्वाच्या अशा सोनी पुरस्कारासाठी त्यांना नामांकन मिळालं होतं, तसंच त्यांना नाट्यनिर्मितीसाठी प्रतिष्ठीत ‘लंडन टाईम आउट डान्स अॅन्ड परफॉर्मन्स अवॉर्ड’ मिळालं आहे. त्यांनी भारत, ब्रिटन, कॅनडा आणि युरोपमध्ये नाट्यमहोत्सवांमध्ये आपली नाटकं सादर केली आहेत.

‘पितृऋण’द्वारे चित्रपटदिग्दर्शनामध्ये पदार्पण करणार्‍या श्री. नितीश भारद्वाज यांचा ‘कर्मयोगी’ हा अनुबोधपट (२००७) प्रसिद्ध आहे.

येत्या ६ डिसेंबरला 'पितृऋण' सर्वत्र प्रदर्शित होतो आहे. त्या निमित्तानं त्यांच्याशी मारलेल्या गप्पा...

PITRUROON - POSTER.jpg

तुम्ही दूरचित्रवाणीमालिकांचं दिग्दर्शन याआधी केलं आहे. चित्रपट दिग्दर्शित करावा, असं का वाटलं? दूरचित्रवाणीमालिका ते चित्रपट हा प्रवास कसा घडला?

मी पहिला चित्रपट केला १९८७ साली. त्याआधी मी हिंदी मालिका करत होतो, ’पृथ्वी’त हिंदी नाटकंही केली होती. त्यावेळी टीव्ही हे माध्यम चित्रपटमाध्यमापेक्षा मागे होतं. नुकत्याच ’हमलोग’सारख्या मालिका संपत होत्या. त्यामुळे प्रत्येकालाच चित्रपटांमध्ये काम करायचं असे. ’पृथ्वी’त जे प्रशिक्षण मी घेतलं, ते चित्रपटासाठीच, या भावनेनं मी काम करत होतो. त्यानंतर व्ही. एन. मयेकरांकडे मी संकलन शिकलो, कॅमेराचं काम शिकलो, मराठी - हिंदीमध्येसुद्धा काम करताकरता हिरो म्हणून, चित्रपटाच्या तंत्राकडे सतत लक्ष होतं. त्यामुळे जास्तीत जास्त काम करायचं तर चित्रपटांमध्येच, असं स्वप्न होतं. दूरचित्रवाणीमालिका वाटेत भेटल्या, म्हणून केल्या.

तो फक्त एक टप्पा होता, असं म्हणायचंय का?

अतिशय अनपेक्षित असा तो टप्पा होता. हा समोर आला तो ’महाभारत’ या मालिकेच्या निमित्तानं. टीव्हीवर काम करावं, असं काही तेव्हा मला वाटत नव्हतं. कारण तोपर्यंत माझी मुख्य भूमिका असलेले दोन मराठी चित्रपट आणि एक हिंदी चित्रपट, ’तृषाग्नी’, ज्यात नाना पाटेकर, पल्लवी जोशी आणि मी होतो, असे प्रदर्शित झाले होते. त्यावेळी माझ्या वाट्याला ’महाभारत’ आलं आणि तो इतिहास तुम्ही जाणताच. ’महाभारता’मुळे मी टीव्हीकडे वळलो, पण एक दिवस पुन्हा चित्रपटांकडे यायचं, हे स्वप्न कायम होतं.

nitish_pitru1.jpg

यालाच जोडून अजून एक प्रश्न आहे. अभिनयाकडून दिग्दर्शनाकडे, हे कसं घडलं?

अभिनयाकडे वळणं हेपण अपेक्षित नव्हतं खरंतर. कारण मी सुधा करमरकरांनी स्थापन केलेल्या ’लिटल थिएटर’मध्ये प्रशिक्षण घेतलं आणि त्या प्रशिक्षणात मुख्य भाग हा दिग्दर्शनाचा होता. पटकथालेखन, नेपथ्य, वेशभूषा, रंगभूषा यांवर सगळा भर होता, अभिनय सगळ्यांत शेवटी होता. मी आंतरमहाविद्यालयीन नाट्यस्पर्धांमध्ये भाग घेतला तेही दिग्दर्शक म्हणूनच. त्यामुळे माझा मूळ पिंड हा दिग्दर्शकाचा आहे आणि अभिनय करतानाही तंत्राचं भान ठेवूनच मी कायम अभिनय केला. जसजसं मी वेगवेगळ्या माध्यमांमध्ये काम करत गेलो, तसतसं माझं तांत्रिक ज्ञानही वाढत गेलं. अगदी चित्रपटांमध्ये हिरो म्हणून आलो तरी चित्रपटाच्या तांत्रिक बाजूंकडे दुर्लक्ष केलं नाही. कित्येक अभिनेत्यांना चित्रपटाच्या तांत्रिक अंगांशी काही देणंघेणं नसतं. दिग्दर्शक सांगेल तसं ते करतात. काही अभिनेते अभिनयाचं तंत्र सांभाळतात, पण इतर तंत्रांकडे त्यांचं लक्ष नसतं. पण मी दोन्ही बाजू कायम सांभाळून काम केलं.

मला ज्या तांत्रिक गोष्टी माहीत नसायच्या, त्या माहीत करून घेण्याचा मी कायम प्रयत्न केला. माझ्या पहिल्या दोन चित्रपटांचे छायालेखक श्री. एन. एस. वैद्य होते. ते उत्तम संकलकही होते. त्यांच्याकडून मी काही गोष्टी शिकलो. चित्रपटाचं पार्श्वसंगीत कसं रचतात, याचा अभ्यास केला. या अभ्यासाचा उपयोग मी पुढे जेव्हा दूरचित्रवाणी मालिका आणि लघुपट दिग्दर्शित केले, तेव्हा झाला. माझा एक लघुपट फार गाजला. त्या वेळी अटलबिहारी वाजपेयी या लघुपटाच्या पहिल्या प्रयोगाला उपस्थित होते. गोळवलकर गुरुजींच्या आयुष्यावर हा लघुपट होता. या लघुपटात केवळ गोळवलकर गुरुजींचेच विचार मांडले होते. त्यामुळे भरपूर संशोधन त्यासाठी मी केलं होतं. माझ्या मालिकांसाठीही मी संशोधन केलं. अभ्यासाशिवाय मी आजवर काहीही केलेलं नाही.

आजचं दूरचित्रवाणी या माध्यमाचं स्वरूप मात्र वेगळं आहे. ’तुम्ही तो अमूक चित्रपट पाहिला आहे का? त्यावर आम्ही ही सिरियल काढत आहोत’, असं मला निर्माते सांगतात. बहुतेक सगळ्या मालिका सारख्याच असतात आणि सगळेजण टीआरपीच्या मागे धावत असतात. त्यामुळे मी २००० सालानंतर मालिका तयार करण्याचं थांबवलं. टेलिव्हिजन हा एक खूप पैसे देणारा मार्ग आहे, हे ठीकच आहे. मी माझ्या आयुष्यात एक कृष्णाचा भूमिका केली आणि ती खरोखर गाजली. पण एक कलाकार म्हणून नवनवीन माध्यमांतून काम करणं आणि नवनवीन कथानकांतून स्वतःला चॅलेंज करत राहणं, हा माझ्यासाठी 'समुद्रमंथनाचा' भाग आहे. कलाकार, निर्माता, दिग्दर्शक, तंत्रज्ञ असं तुम्ही कोणीही असा, स्वतःला आतून घुसळण्याची प्रक्रिया झाली पाहिजे. या प्रक्रियेतून काहीतरी नवीन सापडलं पाहिजे, नवीन बाहेर पडलं पाहिजे. पण मात्र तेचतेच करत राहिलो, पाट्या टाकत राहिलो, तर असे लँडमार्क आयुष्यात तयार होत नाहीत. यातून तुमची योग्यता, तुम्ही काय करू शकता, काय लायकीचं काम उभारू शकता हे कधीच तुम्हांलाही आणि जगालाही दिसत नाही. 'मरावे परी किर्तीरूपे उरावे' अशी एक म्हण आहे - ती अशी इतकी सहज घेण्यासारखी नाही. निव्वळ पैशासाठी काम करून कीर्ती होत नाही. कला ही शेवटी समाजरंजनासाठी आहे, झालंच तर समाजप्रबोधनासाठीही आहे. हा एक बॅलन्स आहे शेवटी. पैसा कुठेही जात नाही, प्रामाणिकपणे आणि आपली समाजातली भूमिका ओळखून काम केलं, तर तो कसा ना कसा आपोआप येतोच. आजकाल टीव्हीचं बघा असं आहे - काम करायचं, मरमर अठराअठरा तास काम करायचं, आणि एक दिवस बेडवर जाऊन पडायचं. डॉक्टर विचारणार- 'काय बाबा, सिरियल करतोस का? कुठली? मी तर बघत नाही!' मला असं काम करायचं आहे, की जे लोक समरसून पाहतील, काहीतरी 'वेगळं' म्हणून लक्षात ठेवतील. मग ते अभिनेता म्हणून असेल, किंवा दिग्दर्शक म्हणून. लोक म्हणाले, की हा काहीतरी खरंच वेगळं करतोय, देतोय, आपल्यासमोर मांडतोय, तर मला समाधान मिळेल. आता अनेक कलाकृती लोकांसमोर ठेवल्या, तर त्यांतल्या काही लोकांना आवडतील, काही नाही. हे चालणारच. पण मी माझ्या समाधानासाठी काहीतरी केलं, मला उत्तम वाटलं ते लोकांसमोर मांडलं, याचं समाधान मला शेवटपर्यंत राहील, ही त्यातली मला फार मोठी गोष्ट वाटते. आम्हांला नशिबानं भालबा केळकर, स्मिता पाटील, सुधा करमरकर, काशिनाथ घाणेकर, प्रभाकर पणशीकर असे गुरू भेटले. या इतक्या मोठ्या माणसांनी आम्हांला तालीम दिली. या सार्‍यांनी हेच सांगितलं - तुमच्या कलेतून काहीतरी चांगलं द्या, वेगळं द्या, स्वतःचं सारं कौशल्य पणाला लावून काम करा.

तुम्ही ब्रिटनमध्ये रेडिओवर काम केलं. या कामाबद्दल जरा सांगाल का?

मी एक म्यूझिकल कॉमेडी केली होती तिकडे. ’मोटी रोटी पतली चुन्नी’ या नावाची. अतिशय गाजली ती. आम्हांला ’द टाईम आऊट अवॊर्ड’ मिळालं १९९३ साली या कॉमेडीसाठी. खूप मानाचं पारितोषिक होतं हे. या नाटकाचं परीक्षण ’गार्डियन’मध्ये आलं होतं आणि त्यात माझ्या कामाचं खूप कौतुक केलं होतं. याच निमित्तानं माझी रिचर्ड अटेन्बरो यांच्याशीही ओळख झाली. एका चित्रपटासाठी मी त्यांना दिग्दर्शनसाहाय्य करावं, असा त्यांनी प्रस्ताव मांडला. पण तो प्रोजेक्ट अर्ध्यातच बंद पडला आणि माझी एक महत्त्वाची संधी हुकली. मग बीबीसी रेडिओ फोरची मंडळी माझ्याकडे आली. मला म्हणाले, आमच्याकडे एक रेडिओ-स्लॉट आहे. प्राईमटाईमचा. या स्लॉटमध्ये आम्ही जगभरातले क्लासिक सादर करतो. आम्हांला आता रामायण आणि महाभारत सादर करायचे आहेत, तर ही जबाबदारी तुम्ही घ्या. त्यानंतर मी रामायण आणि महाभगवद्गीता हे दोन कार्यक्रम बीबीसीवर सादर केले.

हे अभिवाचन होतं का?

नाही, अभिवाचन नाहे. पूर्ण पटकथा लिहिली होती आणि स्टुडिओत रेकॉर्डिंग व्हायचं. साऊंड इफेक्ट असायचे. उदाहरणार्थ, आम्ही जंगलातून चालत जात असू, तर तसा इफेक्ट तिथल्या तिथे निर्माण केला जायचा. सगळं चित्रपटासारखंच होतं, फक्त समोर कॅमेरे नव्हते, माईक होता. आणि हे रेडिओसाठी होतं. हे कामसुद्धा अतिशय मेहनतीचं होतं. अनेक दिवस ध्वनिमुद्रण चालायचं. ९५ साली मी इंग्लंडहून भारतात परतलो आणि इथल्या टीव्हीसाठी कार्यक्रम तयार करू लागलो.

’पितृऋण’ हा चित्रपट मराठीतूनच का करायचं ठरवलं?

मी खरं सांगू का? मी मराठी चित्रपटच करायचा, असं काही ठरवलं नव्हतं. पण ही जी कथा आहे, ती इतकी छान कौटुंबिक कथा आहे. आणि मला असं वाटलं की, आजच्या हिंदी चित्रपटांपेक्षा ही कथा वेगळी आहे, आणि ती मराठी किंवा कन्नड या भाषांमध्येच अधिक शोभून दिसेल. मराठी, कन्नड, मलयाळम, बंगाली या भाषांमधल्या चित्रपटांची कथानकं अतिशय सशक्त असतात.शिवाय मराठी ही माझी मातृभाषा आहे. त्यामुळे मग ही कथा मी मराठीत आणायचं ठरवलं. हे सगळं जुळून आलं आय.एम.ई. मोशन पिक्चर्समुळे. यापुढे मी कदाचित हिंदी चित्रपटही करेन, पण मराठी चित्रपटांचं दिग्दर्शन करणं कधीच थांबवणार नाही, हे नक्की. कारण मराठीत जशा सुंदर कथा-पटकथा आहेत, त्या हिंदीत नाहीत. हिंदीत ते स्वातंत्र्यही नाही. माझी आई ही विल्सन कॊलेजमध्ये मराठीची विभागप्रमुख होती. मराठीत तिनं लेखनही बरंच केलं. माझे वडीलही मराठी साहित्य खूप वाचत. आमच्या घरी या दोघांची मोठी लायब्ररी होती. त्यामुळे माझा पहिला चित्रपट मराठीत करणं हे माझ्या आईवडिलांप्रति असलेलं ऋण आहे.

nitish_pitru2.jpg

तुम्ही मघाशी म्हणालात की सुधा मूर्तींची ही कथा मराठीतच करता येऊ शकत होती. तशा इतर काही कथा तुमच्या नजरेसमोर होत्या का?

मी अगोदर जवळजवळ तीन वर्षं खपून एकदोन कथांवर पटकथा लिहिल्या होत्या. पण ही कथा वाचल्यावर आपण याच कथेवर चित्रपट करायचा, हे मी ठरवलं. ही मूळ कन्न्ड कथा आहे आणि कानडी प्रदेशामध्ये स्थायिक झालेली मराठी कुटुंबं या कथेत आहेत. मी ही कथा मराठीत आणताना योग्य ते बदल केले. या चित्रपटातल्या कुटुंबाला महाराष्ट्रात आणलं. प्रत्येक चित्रपट आपलं भाग्य बरोबर घेऊन जन्माला येत असतो. झालं एवढंच की, इतर दोन पटकथा तयार असतानाही ’पितृऋण’ आधी आला. कदाचित हेच विधिलिखित असेल.

तनुजा, सुहास जोशी, सचिन खेडेकर यांच्याबरोबर काम करण्याचा अनुभव कसा होता?

अतिशय सुंदर! आपल्या कामात चोख असणं आणि स्वत:ला झोकून देऊन काम करायचं, हा जो मराठी कलाकारांचा गुण आहे, तो मला या चित्रपटाच्या निमित्तानं पुन्हा एकदा दिसला. अगदी पटकथेच्या वाचनापासून मला हा अनुभव आला. प्रत्येक टप्प्यावर. तनुजा, सचिन खेडेकर, सुहास जोशी या तिघांनाही मी पटकथा पाठवल्या होत्या. तिघंही म्हणाले, आम्हांला तुझ्याबरोबर चर्चा करायची आहे आधी. मग त्यांच्याबरोबर बसून त्या व्यक्तिरेखेची मानसिकता काय, ती व्यक्तिरेखा तशी का वागते, त्या व्यक्तिरेखेच्या आयुष्यात आधी काय घडलं असावं, ती व्यक्तिरेखा सादर कशी करायची, याची चर्चा केली. मला कुठेही व्यक्तिरेखेचं कॆरिकेचर व्हायला नको होतं. माझा ओढा नैसर्गिक अभिनयाकडे आहे. त्यामुळे माझ्या चित्रपटातही मला तसाच अभिनय हवा होता. कलाकारांशी चर्चा करून आम्ही प्रत्येक भूमिकेचा पोत ठरवला. एका विशिष्ट पातळीच्या वर आवाज गेला, हावभाव गेले की त्या भूमिकेचं कॆरिकेचर होणार. आम्ही ही पातळी ओलांडू न देण्याची प्रत्येक दृश्यात काळजी घेतली. एकाही कलाकारानं याबद्दल तक्रार केली नाही. काय होतं की, वाक्य बोलताना एखाद्या शब्दावरचं वजन जर दुसर्‍या शब्दावर गेलं तर अर्थ बदलू शकतो, पोत बदलू शकतो किंवा जे अपेक्षित आहे लिहिताना, ते बोलण्यात येत नाही. त्यामुळे अनेकदा आम्ही रिटेक घ्यायचो, पण इतके मोठे कलाकार असून एकानंही कधीच तक्रार केली नाही. प्रत्येकानं मला जे अपेक्षित होतं, तेच दिलं.

एक विशेष मला आवर्जून सांगावंसं वाटतं, की तनुजाबाईंना त्यांची भूमिका इतकी आवडली, की त्यांचे केस काढावेत, हे त्यांनी स्वत:हून सुचवलं. आम्ही विग वापरू शकलो असतो. हल्ली तंत्र इतकं पुढारलं आहे, की विग वापरल्याचं लक्षातही येत नाही. पण तनुजाबाई म्हणाल्या, माझे केस काढून टाका, आपण विग वापरायचा नाही. इतर सर्व तंत्रद्न्यांनीही प्रचंड सहकार्य केलं. माझ्या मनातला चित्रपटच पडद्यावर दिसावा याबाबत मी काटेकोर होतो, आणि मला सर्वांनी उत्तम सहकार्य केलं. प्रत्येकाला स्वातंत्र्य होतं अर्थातच काम करताना, पण मला योग्य वाटेल तिथे मी सूचना दिल्या. कौशलनं अतिशय सुरेख संगीत दिलं आहे चित्रपटाला. मी त्याला सांगितलं, की तू तुला हवं तसं संगीत दे, पण ते मला आवडलं पाहिजे. चित्रपटात ’मनमोहना’ हे गाणं आहे. मला त्यात Eकॉर्डिअन हवं होतं. तसं मी कौशलला सांगितलं. बाकी इतर ढवळाढवळ मी केली नाही. छायालेखकालाही मी दृश्याच्या प्रकाशयोजनेबद्दल सांगायचो नाही. ते त्याचं कार्यक्षेत्र. पण दृश्याचा मूड सांभाळला जातो आहे की नाही, अमूक एका ठिकाणी मला हवा असलेला काळोख दिसतो आहे की नाही, हे मी बघायचो.

'पितृऋण' या चित्रपटाचं वैशिष्ट्य काय आहे?

मराठीत असा विषय पहिल्यांदाच हाताळला गेला आहे. चित्रपटातलं नाट्य तनुजा, सुहास जोशी आणि सचिन खेडेकरांच्या दोन भूमिका, अशा चार व्यक्तिरेखांमुळे निर्माण निर्माण होतं. हे नाट्य अशा व्यक्तीभोवती निर्माण होतं, जी आता हयात नाही. त्यामुळे घटनेचा अन्वयार्थ लावणं कठीण. हे कोडं हळूहळू उलगडत जातं. पण हा चित्रपट एखादा थ्रिलर नाही. अतिशय भावनिक अशी ही कथा आहे.

तुमच्या भविष्यातल्या योजना काय?

अभिनय आणि दिग्दर्शन असं दोन्ही करायचं, हे मी नक्की ठरवलंय. ’यक्ष’ नावाचा एक हिंदी चित्रपट येतोय. मुकुल अभ्यंकर हा त्याचा दिग्दर्शक आहे. मी या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहे. या चित्रपटाद्वारे मी पुन्हा हिंदीतल्या मोठ्या पडद्यावर पदार्पण करतोय. माझ्या पुढल्या चित्रपटाचं कथानक माझ्या डोक्यात तयार आहे आणि जानेवारीपासून मी त्यावर काम करेन. अगोदर तयार केलेल्या पटकथांपेक्षा वेगळं कथानक आहे हे. अजून एक मला सांगावंसं वाटतं, की यापूर्वी मी दोनदा चित्रपटसृष्टीपासून दूर गेलो. एकदा मी इंग्लंडलाच निघून गेलो आणि एकदा मी राजकारणात गेलो, खासदार वगैरे झालो. पण आता मला आवर्जून सगळ्या माझ्या चाहत्यांना सांगावंसं वाटतं की, आता मात्र मी चित्रपटसृष्टीतच राहणार आहे. दिग्दर्शक आणि अभिनेता म्हणून. आता काहीही झालं तरी मी चित्रपटसृष्टी सोडणार नाही.

हे ऐकून खूप वरं वाटलं, कारण ’महाभारता’तल्या तुमच्या भूमिकेमुळे तुमचे असंख्य चाहते आहेत.

मला या गोष्टीचं आश्चर्य वाटतं की, आज पंचवीस वर्षं झाली ’महाभारता’ला, पण या मालिकेचा पगडा अजूनही टिकून आहे. आणि दरवेळेला नवीन ’महाभारत’ आलं, की तो जास्त दृढ होत जातो, असं लोकांचं म्हणणं आहे. लोक म्हणतात की, कृष्ण म्हणून आम्हांला इतर कोणीच पटत नाही. हा देवाचाच आशीर्वाद आहे. आपण माणूस म्हणून हे असं श्रेय घेऊ नये. त्या वेळी मी जे करायचं ते केलं, पण हे दैवी आहे. आजच्या पिढीनं ही मालिका डीव्हीडीवर पाहिली आहे. मला आजही फेसबूकवर रिक्वेस्ट येतात जगभरातून. ’आम्हांला आमच्या पाच वर्षांच्या मुलीला तुम्हांला भेटवायचंय, ती बघते महाभारत आणि तिला कृष्णबाप्पाला भेटायचंय’. म्हणजे हे चालूच राहणारं आहे. त्यामुळे मी मघाशी म्हटलं तसं, की आपण जे काम या माध्यमात करू, ते असं करावं की ते मागे उरेल आणि लोक त्याची आठवण काढतील आणि दाद घेतील. थातुरमातुर काम करू नये आयुष्यामध्ये.

शब्दांकनसाहाय्य - अश्विनी के, नंदिनी

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त आहे मुलाखत, बरीच नवीन माहिती कळली. नितीश भारद्वाजांनी महाभारत व्यतिरिक्त कायकाय केलंय त्याबद्दल जास्त काहीच माहित नव्हते.

मस्त आहे मुलाखत, बरीच नवीन माहिती कळली. नितीश भारद्वाजांनी महाभारत व्यतिरिक्त कायकाय केलंय त्याबद्दल जास्त काहीच माहित नव्हते.>>> +१
Happy

त्यांच्या या चित्रपटाला यश मिळावे आणि यापुढेही त्यांनी मराठीत चित्रपट निर्माण करत रहावे, या शुभेच्छा.

( तृषाग्नि चित्रपटात अलोकनाथ पण होते, त्यांचा उल्लेख राहीलाय. त्या चित्रपटात केवळ चारच कलाकार होते. )

मस्त आहे मुलाखत, बरीच नवीन माहिती कळली. नितीश भारद्वाजांनी महाभारत व्यतिरिक्त कायकाय केलंय त्याबद्दल जास्त काहीच माहित नव्हते. > अनूमोदन.

संपुर्ण टीम ला शुभेच्छा. सुधा मूर्तींची कथा म्हणून जास्त उत्सुकता आहे.

मस्त आहे मुलाखत, बरीच नवीन माहिती कळली. मला नितीश महाभारत आणि पसंत आहे मुलगी मधे खूप आवडला होता Happy आणि तो इतका गोड दिसायचा की "ते" असा उल्लेख करणे मला तरी जमणार नाही Wink

मा. माप्रा,

पहिल्याप्रथम मुलाखतकर्त्याचं अभिनंदन! Happy शब्दांकनासाठी अश्विनी आणि नंदिनी यांचेही आभार! मुलाखत सुरेख झाली आहे. नीतीश भारद्वाज यांना विचारले प्रश्न अगदी समर्पक आहेत. त्यातून त्यांच्या जीवननिष्ठांवर प्रकाश पडतो. एकंदरीत नीतीश तात्त्विक दृष्ट्या घट्टपणे पाय रोवून उभे राहिलेले आहेत. वलयांकित जगात असं व्यक्तिमत्व सापडणं अशक्य नसलं तरी दुर्मिळ खचितच आहे.

असो.

>> हा देवाचाच आशीर्वाद आहे. आपण माणूस म्हणून हे असं श्रेय घेऊ नये.

हे वाचतांना वाटलं की त्यांनी जी भूमिका जिवंत केली तिची (=श्रीकृष्णाची) शिकवणच जगताहेत की काय! त्यांनाही विनम्र अभिवादन. Happy

कृपया मुलाखतकर्त्याचे नाव देणे.

आ.न.,
-गा.पै.

नीतीश भारद्वाज यांच्याबद्दल बरीच नवी माहिती कळली. महाभारत, तृषाग्नी आणि एक सासूसून मराठी चित्रपट एवढेच माहीत होते.
<पशुवैद्यकशास्त्रामध्ये शल्यविशारद> हे वाचायला भारी वाटतं व्हेटपेक्षा.

काही टायपो राहिले आहेत.
<तंत्रद्न्यांनीही> तंत्रज्ञांनी?
खूप वरं वाटलं,
Eकॉर्डिअन

छान मुलाखात.. !

नीतीश भारद्वाज यांच्याबद्दल बरीच नवी माहिती कळली >>> अनुमोदन !

अतिशय मुद्देसूद आणि माहीतीपूर्ण मुलाखत झाली आहे यासाठी मुलाखतकर्त्याचे आणि शब्दांकनासाठी अश्विनी आणि नंदिनी यांचे विशेष कौतुक. नीतीश भारद्वाज म्हणजे महाभारतातील कृष्ण हीच प्रथमदर्शनी ओळख पटणार्‍या नीतीश यांचे दिग्दर्शनातील येवढे कार्य माहीत नव्हते.

मराठी चित्रपटांच्या वैविध्यपूर्ण विषयांमुळे आणि नवनवीन प्रयोगशील दिग्दर्शकांच्या ते विषय अभ्यासपूर्ण साकारण्याच्या प्रयत्न आणि हातोटीमुळे तसेच अभिनयाचे अंगभूत पोटेंशियल असलेल्या दिग्ग्ज कलावंतांनी विविध दिग्दर्शकांच्या समवेत काम करताना अधिक सकसपणे अभिनयचे नवीन पैलू दाखवण्यामुळे मराठी चित्रपटसृष्टीला सोनेरी दिवस नक्कीच आले आहेत.

तनुजा यांचे या चित्रपटाच्या निमित्ताने पुनःपदार्पण सुखद.

सुधा मूर्ती यांची ही कादंबरी वाचली नाही पण नक्कीच पाहणार हा चित्रपट!! आशा आहे इतर भाषांतील अशाच आणखी सकस साहित्याची निर्मीती मराठी मध्ये पाहावयास मिळेल.
माहीतीसाठी धन्यवाद.