का विडा ना रंगतो

Submitted by UlhasBhide on 16 November, 2013 - 10:43

का विडा ना रंगतो

भरकटे तारू .... प्रयत्ने मी किनारा गाठतो
भरकटावे वाटते तेव्हा किनारा रोखतो

प्राक्तनाशी झुंजताना सोसल्या घावांतुनी
नित्य आडाखे सुखाचे मी मनाशी बांधतो

घेउनी आलाप, ताना गीत मी गातो तरी
का समेवर येत असता सूर हा हेलावतो ?

रोमरोमी वेदनेचे वीष हे भिनले असे
की सुखाचा भास होता जीव हा भांबावतो

पार ओलांडून पारा, पाहताना आरसा
ना दिसे प्रतिबिंब माझे, मी स्वत:ला पाहतो

तोच ठेला, तोच जर्दा, पानवाला तोच तो
रंगती हे ओठ तरिही का विडा ना रंगतो ?

....उल्हास भिडे (१६-११-२०१३)

-----------------------------------------------------------
आज अचानक हा शेर सुचला :

मी इमानी कार्यकर्ता, वेस ना ओलांडतो
पक्षश्रेष्ठी बोलती.... त्याचीच री मी ओढतो

.... उल्हास भिडे (१८-११-२०१३)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सर्वांना धन्यवाद.
--------------------------------------------------------------------------------
मूळ रचनेत आणखी एका शेराचा(आज सुचलेल्या) अंतर्भाव केला आहे.

मस्त.

तोच ठेला, तोच जर्दा, पानवाला तोच तो
रंगती हे ओठ तरिही का विडा ना रंगतो ?

व्वा. आपल्या कवितांतील निरागस भाव फार भावतात.

सर्वांना धन्यवाद.
--------------------------------------------------------------------------------------------
समीरजी,
अभिप्रायाबद्दल धन्यवाद.

"आपल्या कवितांतील निरागस भाव फार भावतात." >>>
याचा अर्थ मी असा समजू का, की माझ्या या रचनेला
एक वेळ कविता म्हणता येईल पण गझल नाही.

मार्गदर्शनाची अपेक्षा.

याचा अर्थ मी असा समजू का, की माझ्या या रचनेला
एक वेळ कविता म्हणता येईल पण गझल नाही.<<<

हा मुद्दा ह्या धाग्याच्या संदर्भात अनावश्यक वाटत आहे. तुम्ही प्रकाशित करताना रचना कविता व गझल या दोन्ही विभागांत प्रकाशित केलेली असावीत. त्यामुळे सहज म्हणून कोणीतरी तीस कविता म्हंटले तर हा मुद्दा काढण्याचे कारण दिसत नाही.

याचा अर्थ मी असा समजू का, की माझ्या या रचनेला
एक वेळ कविता म्हणता येईल पण गझल नाही.

मला असे काहीही म्हणायचे नाही.
मी तुमच्या प्रकृतीला दाद दिली बस.

बेफिकीरजी,
हा मुद्दा उपस्थित करण्यामागे मार्गदर्शन मिळावे इतकाच हेतू आहे हे स्पष्ट करतो.

सदर रचना प्रकाशित करताना ’गझल’ आणि ’कविता’ या दोन्ही विभागातील वाचकवर्गाचा समावेश केला असल्याने
ती दोन्ही विभागात दिसत आहे. अशा प्रकारे एकापेक्षा अधिक विभागात लिखाणाचा समावेश आणखीही काही
सभासदांकडून केला जातो. काही प्रसंगी ’कविता’, ’ललित’, ’विनोदी लेखन’ असे विविध विभाग समाविष्ट केलेले
आढळले आहेत. (उदाहरणे शोधून पहावी लागतील. अत्ता हाताशी उपलब्ध नाहीत.)

तुम्ही म्हणता त्याप्रमाणे समीरजींनी सहज तसे म्हटले असेल.
परंतु,
काही रचनांच्या बाबतीत "ही गझल वाटत नाही, कविता वाटते"
अशा आशयाचे प्रतिसाद (समीरजींचे नव्हेत) वाचनात आलेले आहेत.
गझलप्रांतातील माझ्यासारख्या नवख्या माणसाला स्वत:च्या लेखनाची गझलेच्या निकषांनुसार कितपत
गुणवत्ता आहे हे जाणकारांकडून समजून घेणे अत्यंत गरजेचे वाटते.
केवळ याकरताच माझ्याकडून तो मुद्दा उपस्थित केला गेला. कृगैन.
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
आकृतीबंधाव्यतिरिक्त गझल आणि कविता यातील सीमारेषा अनेकदा नीटशी समजत नाही.
याबाबत चर्चा, मार्गदर्शन इ.साठी एक स्वतंत्र धागा काढला जावा असे अनेकदा वाटते.

अरे !!!
मी वरील प्रतिसाद देण्याआधी समीरजींचा प्रतिसाद आला आहे हे लक्षात आलंच नाही.

धन्यवाद समीरजी.

मला मतला आवडला.

बाकी बऱ्याच ठिकाणी adjustment केल्यासारखी वाटली.

उदा.
'सूर हा' , जीव हा , हे ओठ …. बऱ्याच ठिकाणी रचनेत हा ,हे आल्यास , काही प्रमाणात वृत्त शरणता वाटू लागते( वै.म. )
वीष हे ( दोन्ही वीष आणि 'हे' शब्द खटकले )
पानवाला तोच तो ( अधिक प्रभावी शब्दरचना अपेक्षित )

अजून एक..... रंगती, बोलती असे क्रियापदांचे रूपे असलेले शब्दप्रयोगही गझलेत टाळले पाहिजेत ( हे ही व्यक्तीसापेक्ष मत असू शकते )

खयाल चांगले आहेत.

शुभेच्छा.

याबाबत चर्चा, मार्गदर्शन इ.साठी एक स्वतंत्र धागा काढला जावा असे अनेकदा वाटते.>>>

असा एक धागा मी काढला होता पण त्यावर मी आणि बेफिकीर ह्यांच्या व्यतिरीक्त कुणी चर्चाच करत नव्हते. कुणाला काही शंकाच नसाव्यात म्हणून अप्रकाशित केला मग मी तो.

सर्व शेर आवडले काका पण मतल्याची पहिली ओळ जितकी उत्तम आणि आतून आली तितक्या बाकी अनेक ओळी नाहीत वाटल्या ...विडा मात्र सर्वोत्तम आहे मला फार आवडला
असो बाकीची चर्चा वाचली ...
असो
शुभेच्छा

सर्वांना धन्यवाद.
----------------------------------------------------------------------------------------
वैभव फाटक,
धन्यवाद.
मनमोकळेपणाने तुम्ही तुमची वैयक्तिक मते व्यक्त केलीत हे फार आवडलं.
----------------------------------------------------------------------------------------
वैवकु,
"मतल्याची पहिली ओळ जितकी उत्तम आणि आतून आली तितक्या बाकी अनेक ओळी नाहीत वाटल्या" >>>
प्रांजळ अभिप्राय आवडला. धन्यवाद.
---------------------------------------------------------------------------------------
विदिपा,
तो धागा कदाचित माझ्या ध्यानात आला नसावा किंवा त्यावेळी मी गझल विभागात सक्रीय नसेन.
असो..... पुन्हा प्रकाशित केलात किंवा नवीन धागा उघडलात तर माझा सहभाग नक्की असेल.

घेउनी आलाप, ताना गीत मी गातो तरी
का समेवर येत असता सूर हा हेलावतो ?
व्वा....

उल्हासजी,

सूरही - असे केले तर कसे...

तोच ठेला, तोच जर्दा, पानवाला तोच तो
रंगती हे ओठ तरिही का विडा ना रंगतो ?
हाही खास......

वीष बाबत वैभवशी सहमत आहे. पूर्वी एकदा या वीष वरून वादळ उठले होते आणि त्यातूनच माझी एक हझल - तयार झाली. अर्थातच प्रस्थापितांना (इथल्या नव्हे) ती इतकी खरी वाटली (म्हणून झोंबली...) की काय सांगू...

असो.
पुलेशु.