डॉक्टरचे दुखणे

Submitted by अंकुरादित्य on 20 September, 2013 - 11:41

डॉक्टर म्हणून काम करत असताना , मला अनेकदा धन्वंतरी सोबत संजयाचा सुद्धा रोल पार पाडवा लागतो . . मला जे पाहतात त्यांना मी डॉक्टर आहे हे सांगून पटत नाही , त्यांना मी स्वतःला धन्वंतरी द ग्रेट आणि संजय द ग्रेट यांची उपमा लाऊन घेत आहे समजल्यावर भोवळच आली असेल . . चिंता नको . . या माझ्याकडे मोफत इलाज करून देतो . . असो तर सांगायचा मुद्दा असा की होऊ घातलेल्या कवीला चंद्राच्या चांदण्यात आकाशी रंगाची साडी घातलेली गव्हाळ रंगाच्या मुलीचे लाल चुटूक ओठ किती सुंदर दिसतील यावर कल्पनाशक्ती खरवढून काढून हाती पडलेली खरपुड कागदावर उतरवावी लागते , तसेच काहीसे माझ्या बाबतीत होते . . . लोक डॉक्टर कडे जाताना पेशंटला घरात ठेऊन काय साध्य करतात हे मला मागच्या जन्मापासून न उलगडलेले कोडे आहे .

. चेहरा आवळून , घामाच्या धारा पुसत उगाच हुष हुष अन चूक चूक आवाज काढत , भिंतीचा आधार घेत , बारा जोतिर्लिंगाचे दर्शन घेऊन झाल्यावर पिशवीत जितकी नारळाची बकले जमतात त्यात शेजाऱ्याला द्यायला वागवलेले प्रसादाचे पुडे मिसळले की पिशवीचा जितका आकार होईल तेवढी रिपोर्ट ने भरलेली पिशवी , सोबत चालू औषधाचे पोते , नैवेद्याचा स्वयंपाक करत असताना घरचा एकुलताएक सिलेंडर संपल्यावर बाईच्या चेहेऱ्यावर जे भाव उमटतात तेच भाव जपून घेऊन आलेली एखादी सोबतीण , शांततेत सिनेमा चालू असताना मधेच भोकाड पसरणाऱ्या कार्ट्याच्या गुणांना जपणारा मोबाईल कानाला लावत , एकदम सस्पेन्स तयार करत ' डॉक्टर कड आलोय . . कळवतो काय म्हणतात ते ' असे समोरच्याला महाग झालेल्या एलपीजी वर फुकटात बसवून माझ्या समोरील खुर्चीवर कसेबसे आदळतात . . . खरं सांगतो त्यांच्या नजरेत ' अब तुम ही मुझे बचा सकते हो ' भाव बघून माझ्या डोक्यामागे एखादे चक्र असून मी तारणहार आहे असे वाटू लागते . . असो . .

काय होतंय , कस होतंय , शेजाऱ्याच्या चुलत्याच्या साडूच्या मामे बहिणीला असेच काहीसे झाले होते आणि नंतर काय काय झाले , आजपर्यंत किती खर्च केला , कोणत्या डॉक्टर ने किती बिलं केली इत्यादी सगळे ' शेरलॉक होम्स ' सारखे मध्ये मध्ये उपप्रश्न विचारून संपूर्ण माहिती काढून आणि टिपून घेतल्यावर विजयी मुद्रेने मी नसलेल्या 'वोटसन ' ला म्हणतो . . . आता एकदा टेबल वर तपासले की केस सोल्व . . नंतर आपण उकडलेले बटाटे आणि गरम कॉफी पिऊ . . ऐटीत एक हात खिशात अन एका हाताने टेबल कडे बोट करून मी म्हणतो ' झोपा टेबल वर . . तपासतो ' . . . त्यानंतर समोरचा जे म्हणतो ते ऐकून फिल्टर कोफिच्या वरच्या भांड्यात त्या माणसाला घालावे वाटते . . अगदी शांतपणे म्हणतो . . ' पेशंट मी नाही हो . . . माझ्या जावेचा मुलगा आहे ' . . . . अरे काय मखरात घालून नाकात उदबत्त्या अन धूप खोवलाय का त्याच्या ?? त्याला वेळ नाही म्हणून म्हंटला आपणच जावू . . फोनवर बोला न त्याच्याशी . . अस म्हणत समोर केलेला फोन 'जप्त ' करावा वाटतो . . अरे डॉक्टर काय संजय असतो का ?? लक्षणे अन रुग्णस्थिती , परीक्षण जागेवर बसून करायला का कवी असतो ? कल्पना करून काहीबाही कागदावर लिहून द्यायला ?? . . . . असतो हो . . . पाउण तास डोके खाल्लेल्या माणसाला केवळ 'consulting ' फी घेऊन सोडणे म्हणजे फारच insulting असते . .मग शाळेत आगाऊपणा केलेल्या टोराला मास्तर समज देऊन आई बाबांना घेऊन यायची तंबी देतो तशी खालच्या सा मधे तंबी द्यावी लागते ' पुढच्या वेळी पेशंट ला घेऊन या म्हणून ' . . . आयला हे असले लोक सलून मधे जाताना काय करतात ?? का तिकडे पण म्हणतात ?? त्याला यायला वेळ नाही हो . . तुमची अवजारे मला द्या . . भादरून झालं की आणून देतो . .

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अंकुर,

प्रोफाईलला फोटो लावलाय तो ताजा असेल, तर आताशी मेडिकल डिग्री घेतली आहेत. प्र्याक्टीस करायची प्र्याक्टीस बाकी आहे असे दिसते.

आपल्याकडे डॉक्टरकी शिकवताना फक्त वैद्यकशास्त्र, तेही असंख्य मेडीकल कॉलेजात फक्त पुस्तकी, तेही तुमच्या नशिबाने मास्तर अन मुख्य म्हणजे रेसिडेंट्/पीजी करणारे लोक असतील तरच शिकवतात.
दुकान कसे चालवायचे, बेडसाईड मॅनर्स म्हणजे काय, इ. इ. प्रकारातले काहीही शिकवत नाहीत.

असो.
हळूहळू शिकाल. हे असले अनुभवच अनेक गोष्टी शिकवतात.
उदा. केबिनमधे घुसलेल्या प्रत्येकाला, 'पेशंट कोणे?' हा प्रश्न आधी विचारायचा असतो, हा पहिला धडा या निमित्ताणे घ्या.

- डॉ. इब्लिस

होय डॉ . इब्लिस . . नुकतीच सुरु केली आहे . . मी बहुतेकदा विचारतो पेशंट कोण आहे . . आणि बहुतेकदा उत्तर आणि पेशंट एकाच वेळी मिळतो पण काही 'वस्ताद ' लोक भेटतातच . . . जे आपले संपूर्ण बोलून झाल्या शिवाय समोरच्याला अजिबात किंमत देत नाहीत . . सुरुवातीच्या दिवसात त्यांना दरडावता येत नाही . . ऐकून घ्यावे लागते जे काही कानावर पडते ते Happy

सुरुवात तर झाली आहे अजून खूप भोग बाकी आहेत बरे .अगदी आदित्यायण होईल ,पण हे विश्वच वेगळे आहे अन वेगळेपणात च त्याची मजा आहे .
डॉ.विक्रांत

मस्त लिहिलय, डॉ क्रूर... सॉरी अंकूर Happy
('तो' म्हणतो जावेचा मुलगा?.. 'ती'ने म्हणायला हवं... )

लेख आवडला राव.. पण फार्फार छोटा आहे.

आवडला लेख! Happy

केबिनमधे घुसलेल्या प्रत्येकाला, 'पेशंट कोणे?' हा प्रश्न आधी विचारायचा असतो, हा पहिला धडा या निमित्ताणे घ्या.>>
हेही आवडलं!

तुमची प्रॅक्टिस/स्पेशलायझेशन कशात आहे? स्वतःचे दुकान (इब्लिसांच्या भाषेत) सुरु करण्यापूर्वी आधी किती वर्षे अनुभव घेतला आहे?

शुभेच्छा!

लेख ठिक लिहिला आहे पण खूपच अलंकारीक भाषेत लिहायचा प्रयत्न केला आहे, उगीच बर्‍याच उपमा लावल्याने मी पुर्ण वाक्य वाचेपर्यंत नक्की काय म्हणायचेय असे झाले...

असो.पुलेशु.

स्वतःचे दुकान (इब्लिसांच्या भाषेत)
<<

देवाशपथ सांगतो वत्सलातै, शॉप अ‍ॅक्टचं लायसन लागतं.
किमानवेतन कायदा, बालकामगार कायदा, पोल्युशन कन्ट्रोल बोर्ड, इतकंच नाही तर एलबीटी पण लावलाय आता दवाखान्यांना.

दुकानच ते.

iblis

da

rling.