बैल आहे साक्षीला ..

Submitted by अंड्या on 4 November, 2013 - 06:23

..... त्या गजबजलेल्या बकाल वस्तीतून सौरभ आपल्या साथीदारांसोबत जीव मुठीत धरून चालला होता. इतरांची जणू रोजची पायाखालची वाट असल्यासारखे आरामात चालणे होत होते. सौरभला मात्र ते वातावरण अंगावर येत होते. आजूबाजुच्या वखवखलेल्या नजरा जणू त्याच्याच शरीराकडे लागल्या आहेत असा भास होत होता. अनोळखी रस्त्याने जाताना अचानक एखादे साखळधारी श्वान समोर यावे आणि त्याच्या जबड्यातून वीतभर बाहेर लोंबकळलेली लालचुटून जीभ पाहता कोणत्याही क्षणी तो आपल्या मालकाला हिसका देऊन आपल्या अंगावर तुटून पडून आपले लचके तोडेलसे वाटावे, अगदी असेच सौरभला त्या तिथे झाले होते. पुरुषांची आजवर न अनुभवलेली घाणेरडी नजर, त्याचा चालायचा वेग किंचित वाढवतच होती, मात्र आपल्या साथीदारांपासून दूरही जाता कामा नये या विचारांनी पावले आपसूकच मंदावत होती. एक कसलासा दर्प त्या वातावरणात जाणवत होता, जणू आसपास ओढल्या जाणार्‍या सार्‍या सिगारेटी आपला धूर त्याच्याच नाकावर फेकत होत्या. नाक मुरडायचीही चोरी झाली होती, न जाणे तेवढेच निमित्त व्हायचे आणि एखादी नजर आपल्यावरच खिळून राहायची. शक्य तितके अंग चोरून, त्याला शक्य तितक्या लवकर तिथून बाहेर पडायचे होते. अगदीच असह्य होईल तेव्हा त्याने जोरदार किंचाळी मारायची तयारी ठेवली होती. इतक्यात एका वळणावर समोर आलेल्या टॅक्सीला त्यांच्यातल्याच एकाने हात दाखवला. एकजण जसा आत शिरला, तसा पाठोपाठ तो आणि मागाहून आणखी एक शिरला. एक जण पुढे टॅक्सीवाल्यासोबत बसला तेव्हा सौरभला जाणवले की आपण मोजून चौघे आहोत... आणि टॅक्सीवाला पाचवा..!

एक एक करत वीजेचे खांब उलट्या दिशेने पळत होते. मध्येच एखादे झाड अंगावर आल्यासारखे वाटावे, पण ते आपल्याला चुकवणार हे सवयीनेच ठाऊक होते. मागे पडत चाललेल्या झोपड्यांमध्ये वळून बघण्यासारखे काही नव्हते, तरीही मध्येच मान मागे वळवायचा मोह टाळता येत नव्हता. त्या दूर जात आहेत हेच काय ते समाधान !

टॅक्सी आता भरघाव सुटली होती. थंड वारा अंगाखांद्यावर खेळू लागला, अन सोबतीला रस्त्याकडेच्या पिवळ्या दिव्यांचा प्रकाशसावलीचा खेळ सुरू झाला. पहिल्यांदाच तो आता आपल्या साथीदारांना निरखून बघत होता. चेहरे तितकेही ओळखीचे नव्हते... किंबहुना जितके निरखून बघावे तितकेच भेसूर वाटत होते. दोन बाजूंनी दोन धटिंगण अश्या दाबलेल्या अवस्थेत त्याने टॅक्सीला उजवीकडच्या खडकाळ रस्त्याला वळताना पाहिले आणि समोरच्याने मागे वळून दिलेल्या नजरेच्या जरबेपुढे तोंडातून शब्द फुटायचा राहिला. दोनचार मिनिटांच्या प्रवासानंतर पिवळ्या दिव्यांनी साथ सोडली अन प्रकाशासाठी खिडकीतून दूरवर दिसणार्‍या चांदण्यावर तेवढी भिस्त राहिली. कुठे खळाळणार्‍या पाण्याचा आवाज तर कुठे रातकिड्यांची किर्रर.. काळोखाशी स्पर्धा करणार्‍या शांततेचा भंग करत, एकदाचे खूडखूड आवाज करत इंजिनाचे धूड शांत झाले. कसलेसे सुकलेले शेत होते ते, एवढेच काय ते गाडीतून बाहेर फेकले जाताना त्याला जाणवले. जोरात फेकले गेल्याने जबरी मार लागला होता की अंगात उठून बसायचे त्राण उरले नव्हते. समोर लुकलुकणारे चार सहा आठ डोळे आणि एक बारीकसा टॉर्चचा झोत, अन त्यात दिसणार्‍या, अंगावर झेपावणार्‍या काही काळ्याकुट्ट सावल्या. कोणीतरी मागून हात तर कोणी पुढून घट्टपणे पाय पकडले आहेत याची जाणीव होईपर्यंत फार उशीर झाला होता. समोरून एकाने त्याची विजार फर्रकन खेचून गुडघ्यापर्यंत सरकवली अन पाठोपाठ जंगली श्वापदासारख्या त्याच्या उघड्या देहावर तुटून पडणार्‍या त्या सावल्या.. त्यांचा स्पर्श, त्यांच्या अंगाचा दर्प, तोच तसाच जसा मगाशी त्या बकाल वस्तीत जाणवत होता, वा त्यापेक्षाही बीभत्स अन किळसवाणा.. त्याला दूर दूर फेकून द्यावेसे वाटूनही त्याचे काहीही न करू शकणे.. एक असहाय्यता, एक अगतिकता, एका क्षणाला या सर्वांनी परीसीमा गाठली आणि धापा टाकतच तो उठला. उर नुसता धपापत होता. अजूनही दोन्ही हातांनी तो आपले अंग झाडत होता. शरीराचे मुटकुळे करून जमेल तितके चादरीत अंग चोरून बसला तरी नुकतीच अनुभवलेली झोंबाझोंबीची शिरसिरी काही त्याच्या शरीराची साथ सोडायला तयार नव्हती. हे स्वप्न होते समजूनही त्या स्वप्नाला स्विकारायला त्याचे मन अजून धजावत नव्हते... जणू आजचे स्वप्न उद्याचे वास्तव होणार होते..!

----------------------------------------------------------------------------------------------

बुग्गूबुग्गू बुग्गूबुग्गू बुग्गूबुग्गू बुगू..... बुग्गूबुग्गू बुग्गूबुग्गू बुग्गूबुग्गू बुगू.....

नंदीबैल मान डोलावत होता आणि स्वताला पंडित म्हणवणारा एक मध्यमवयीन इसम एका हाताने डमरू वाजवत लोकांचे भविष्य सांगण्याचा दावा करत त्याच्याभोवताली फिरत होता. सभोवताली जमलेल्या पोराटोरांसाठी आधी तो एक करमणूकीचा विषय होता, मात्र जसे त्याने एकेकाच्या भूत भविष्य वर्तमानाबद्दल अचूक निदान करायला सुरुवात केली तसे बघताबघता बायाबाप्यांचीही गर्दी जमू लागली. संकष्टीलाच काय ते तेवढे मित्रांबरोबर म्हणून विनायकाचे दर्शन घ्यायला जाणार्‍या सौरभचा या सगळ्यांवर विश्वास नसल्याने त्याचे आतापावेतो खिडकीतूनच न्याहाळणे चालू होते. काळ्यासावळ्या, भरभक्कम अन पीळदार शरीरयष्टीच्या त्या मामांच्या आवाजात एक जरब तर नक्कीच होती, जी आवाज फारसा न चढवताही जाणवत होती. पांढर्‍या फेट्याच्या शुभ्रतेला जराही धक्का न लावता गुलालाने भरलेले कपाळ अन कानातल्या मोठाल्या रिंगा त्या आवाजाला साजेशी करारी मुद्रा तर उभारत होत्याच, पण खरी कमाल होती ती त्या बिनकाजळाच्या काळ्या टपोर्‍या डोळ्यांची अन त्या भेदक नजरेची. एखाद्यावर पडताच समोरच्याच्या चेहर्‍याचे भाव असे काही बदलावेत की मामांना त्याच्याबद्दल जे जाणून घ्यायचेय ते हातोहात गवसावे. कोणाच्या असाध्य रोगाबद्दल त्यांनी सांगितले, तर कोणाच्या सांसारीक छळाबद्दल.. पैश्याची तणतण तर दर दुसर्‍याला होती.. एका विवाहेच्छुक तरुणाला त्याची दोन लग्ने होणार सांगून उपस्थितांत हास्याचा एकच फवारा उडवून दिला, तर एकाची आतली भानगड उघड करून त्याला जवळजवळ गोत्यात आणला.. पण आता मात्र त्यांची नजर खिडकीतल्या सौरभवर पडली होती !

"जरा सामोरे येतोस का पोरा", आतापर्यंत कोणीही या आवाहनाला नकार दिला नव्हता. ना सौरभ देऊ शकला.

"हा, इथं, अगदी इथं असा उभा राहा.." सौरभ एखाद्या आज्ञाधारक मुलासारखे त्याचे ऐकत होता... इथवर..!

"नाव?"

"सौरभ"

"शिक्षण?"

"मेकॅनिकल ईंजिनीअर"

"आता नोकरीच्या शोधात आहेस तर...", हे मामांनी स्वताच ताडले. आतापर्यंत त्यांनी चारचौघांबद्दल ज्या आत्मविश्वासाने आणि अचूकतेने माहिती सांगितली होती ते पाहता हे यांना कसे समजले याबद्दल सौरभला जास्त आश्चर्य वाटले नाही.

"हो, शोधात तर आहे, पण तशी काही चिंता नाही, आज ना उद्या मिळेलच.." त्याने स्पष्ट केले.

शहरात काही जण असे एखाद्या विभागातील लोकांची जुजबी माहिती काढून तिथे आपण अंतर्यामी असल्याचा आव आणून जातात आणि त्या माहितीच्या आधारे लोकांचा विश्वास संपादतात. त्यानंतर त्यांचे भविष्य वर्तवायचा तसेच येणार्‍या संकटांना दूर सारायचा दावा करत पैसे उकळतात अश्यांबद्दल सौरभने ऐकले होते. हे मामाही त्यातलेच एक हे तो समजून चुकला होता आणि सहजासहजी काही तो त्यांच्या जाळ्यात फसणार नव्हता.

"लग्नाचं कसं काय जमवशील?" मामा आपला हेका सोडायला तयार नव्हते.

सौरभला त्यांचा हा प्रश्न जरा आगाऊच वाटला तरीही तो बेफिकीर मुद्रा करत उत्तरला, "नशीबात असेल तसे जमेलच"

"नशीबाचा दोर आपल्या हातात असतो होय?"

"मग माझी नशीबाची दोरी तुमच्या हातात आहे होय?"

"दोरी नाही, पण चावी तर आहे", मामा डग डग डग डमरू वाजवत म्हणाले.

"बरं, मग उघडा तर जरा माझ्या नशीबाची तिजोरी आणि सांगा काय दडलंय आत" सौरभही आता मामांची उलटतपासणी घ्यायच्या हट्टाला पेटला होता.

"इथंच सांगायचं का? .. चारचौघांत.."

"हो इथंच"

"नंतर पस्तावणार तर नाही.."

"सांगा तर"

सौरभ आणि मामांचा संवाद आता चांगलाच रंगला होता. बघणार्‍यांची तेवढीच करमणूक होत होती.

"पुढचा जन्म बाईचा घेणार बघं तू.." मामांचा अगदीच अनपेक्षित प्रतिसाद.

"काय फालतूपणा आहे हा......." सौरभ वैतागलाच.

मामांचं मात्र चालूच होतं,
"काही पापं अशी असतात, ज्याच्या शिक्षा एका जन्मात भोगून पुर्ण होत नाहीत. प्रायश्चित करायला दुसरा जन्म हा घ्यावाच लागतो.."

"काही पटेल असे बोला, जमत नसेल तर राहू द्या" आता त्या मामांच्या नादी लागण्यात फारसा अर्थ नाही, उगाच चारचौघांत आपलेच हसे व्हायचे हे ओळखून त्याने तिथून निघायचे ठरवले.

इतक्यात मामा गरजले, "थांब...!"
अन क्षणभरासाठी तिथला कोलाहल गोंगाट गजबजाट सारे काही थांबले.

"पापं रात्रीच्या अंधारात केली तरी त्याच्या सावल्या या पडतातच.. मग काळोख असो वा लख्ख सूर्यप्रकाश, त्या आयुशभर आपला पिच्छा नाही सोडत..! तेव्हा सावधच राहा, रात्र आहे वैर्‍याची आणि बैल आहे साक्षीला.. बैल आहे साक्षीला..!!"

न जाणे पुढे किती तरी वेळ सौरभ थिजल्यासारखा जागीच उभा होता. कसले होते ते संमोहन, कसली होती ती पकड. त्या शब्दांची, की त्या मुद्रेची. मामा निघून गेले तेव्हाच तो त्यातून बाहेर पडला, भानावर आला तेव्हा सभोवतालचा जमाव पांगत होता, जणू इतरांसाठी काही विशेष घडलेच नव्हते.

----------------------------------------------------------------------------------------------

कालची तीच तशीच स्वप्ने पडायची या आठवड्यातली तिसरी रात्र होती. तपशील थोड्याफार फरकाने वेगळा होता मात्र तोच तसाच झोपेतही अंगावर काटा आणणारा किळसवाणा थरार. दिवस उजाडला तरी त्या सावल्या कुठूनही येऊन आपल्या अंगाशी झोंबाझोंबी करतील अशी धास्ती सौरभला सतत वाटत होती. या पार्श्वभूमीवर त्याला काही दिवसांपूर्वीची मामांची शापवाणी राहून राहून आठवत होती. तेव्हापासूनच हे सुरू झाले होते. तेव्हापासूनच या सावल्या मागे लागल्या होत्या. पापाच्या सावल्या वगैरे काहीतरी तो बरळत होता, आणि ते बैल आहे साक्षीला... बैल आहे साक्षीला?? कसे शक्य आहे?? आज चार वर्षे झाली त्या घटनेला.. आपणच हे सारे विसरलो तर हे त्याला कसे ठाऊक असावे.. आणि आज इतक्या वर्षांनी.. छे छे..!!

पण नक्की कोण असावा तो??

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users