१९८० नंतर जन्मलेल्या पोरांचा सॉलिड लोचा

Submitted by बावरा मन on 3 November, 2013 - 01:19

गरवारे कॉलेज मध्ये असताना आमचा एक छान ग्रूप जमला होता .बर्याच वर्षानी आम्हि काही दिवसापुर्वि एक मस्त गेट टुगेदर केल. खाण -पिण आणि गगन भेदी गप्पा . सगळे साधारण २८ ते ३० या वयोगटातले .या गप्पांमध्ये मला आणि माझ्या एका मित्राला एक गोष्ट strike झाली की आमच्या गप्पांमध्ये खूप वेळा 'आपल्या वेळेस अस नव्हत ' हे वाक्य अनेक वेळेला repeat झाल होत ……. आईला ! भर तिशीतच आम्हाला nostalgia आला कि काय ? मला अस वाटत होत की हा निवृत्त झाल्यावर , सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडून झाल्यावर पोरटोर मोठी झाल्यावर येणारी हि गोष्ट असते . कुठेतरी काहीतरी चुकत आहे खास.

म्हणजे अस पाहा . तेंडूलकर निवृत्त होत आहे. फेडरर उतरणीला ला लागला आहे . रहमान रहमानच राहिला आहे का असा प्रश्न पडला आहे . बाळासाहेब पण गेले. फेकू आणि पप्पू शी relate होता येत नाही . तिशीतच घर घेतलि. गाड्या आल्या . परवाच असाच माझा एक मित्र मला फोन वर उसासून म्हणाला ," झाल सगळ करून . आता पुढच्या आयुष्यात काय करू यार? whats next ?" मुक्त अर्थव्यवस्थेचा खंदा समर्थक असणारा मी पण जागतिकीकरण च्या या बाय प्रोडक्ट मधून आलेल्या प्रश्नाने भोवंडून गेलो . कमी अधिक फरकाने मी पण या complex चा शिकार होतोच कि .

१९९१ नंतर देशात जे वादळी बदल सुरु झाले त्यात अनेक जुन्या गोष्टी वाहून गेल्या. २००० नंतर या बदलांची गती अजूनच वाढली. ८० च्या दशकात जन्मलेली पिढी हि त्या जुन्या काळाची पण साक्षीदार आणि या भोवंडून टाकणाऱ्या काळाची पण वाटेकरी . एक उदाहरण द्यायचं झाल तर आम्ही पोस्टाने टपाल पण पाठवली आहेत आणि आता तितक्याच सहजपणे इमेल संस्कृतीचे पण वाटसरू बनलो . आई वडिलांची सरकारी नौकरी च सुरक्षित आयुष्य पण जवळून बघितलं आणि आताच्या अति असुरक्षित नौकरया तर आम्हीच करत आहोत . आम्ही शाळा सुटल्यावर मैदानावर जाऊन उन्हातान्हात खूप खेळलो आहोत आणि video games पण जाम खेळलो आहोत. स्वतःच घर -आंगण ते बंदिस्त flat संस्कृती हा प्रवास पण झरझर झाला . त्या अर्थाने आमची पिढी हि 'transition ' मधली पिढी . जागतिकीकरणाचे सगळे फायदे ओरपून घेतल्यावर त्याचे तोटे नको असणारी पिढी . प्रचंड भोवंडून टाकणाऱ्या जगाप्रमाणे बदलताना आमची पिढी तिशीतच थकून गेली आहे . ऐन उमेदीतच आपल आता पुढे काय होणार या भीतीने कोकरासारखी दबून गेली आहे .

कुणी नोंद घेतली आहे कि नाही ते माहित नाही पण social networking वर गेल्यावर कुणी या पिढीतल्या लोकांची status बघितलीत तर जाणवेल की ती प्रचंड nostalgic अस्तात. आपल्या शाळा-होस्टेल-कॉलोनी चे group बनवून तिथे ती लोक (आम्ही ) ते दिवस किती भारी होते आणि आता कस सगळ बोर होत चाललय असल्या चर्चा करत अस्तात. दोन पूर्णपणे वेगळी जग पाहिल्याच्या धक्क्यातून हि पिढी कधी बाहेर येईल असे वाटत नाहि.

आपली पिढी हि नशीबवान आहे आणि तिने खूप बघितले /सोसले आहे हा फेनोमेना जागतिक आणि सार्वकालिक आहेच. पण स्थानिक, जागतिक बदल पचवून त्या बदलांचा भाग बनलेली पिढी हि एकमेवच . जागतिकीकरण मधून एकाकी करणाकडे चालणारा प्रवास या ८० च्या दशकात जन्मलेल्या पिढी बरोबरच संपेल बहुदा .

प्रत्येक पिढीला काही समस्यांचा सामना करावा लागतो. आम्हाला काही वेगळे करावे लागते असा दावा नाही पण lets give davil his credit . खूप पाहिलं रे तुम्ही पोरांनी लहान वयात असे कुणी मायेने तरी भरून पावल.

पण तरी तोच माझ्या मित्राने विचारलेला प्रश्न दशांगुळे व्यापून उरतोच . Whats Next ? कुठेतरी काहीतरी लोचा आहे खास.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आमच्या ७० च्या नंतरच्या पिढीचं तर विचारुच नका! आम्हाला तर शिक्षण संपल्यावर संगणक हाताळायला मिळाले.

पटतय! मी पण ८०व्या दशकातलीच आणि परवाच मैत्रिणिशी बोलत होते की इतक्यातच कसे दमलो आपण.. अजुन आख्ख आयुष्य जायचय.

Whats Next ? >> हा प्रश्न आला म्हणजे पोट भरलय, बेसिक गरजा भागल्यात..
मला वाटतय, पुढची स्टेज ज्या़ंच्याकडे ते नाही त्यांना एनेबल कर ण्याची, हायर मिनिंग शोधण्याची, त्याकरता धडपडण्याची असा वी..( आहे त्यात एक्सेल करणे, नवीन क्षेत्रात करियर करणे, काही शिकणे,समाज कार्य, व्यक्तिमत्व विकास, अध्यात्म, आयुष्या चा अर्थ शोधणे, आनंदासाठी साध्या साध्या गोष्टी कर णे अशा अनेक गोष्टी यात येतील)
we r lucky if we reach that stage when we r still young - आपल्या शरीरात ताकद आहे..

मॅस्लॉ ची थेअरी वाचा Happy

Hierarchy of Needs

प्रथम पातळी:- शाररीक, मूलभुत गरजा,

दूसरी पातळी:- सुरक्षितता,

तिसरी:- प्रेम आणि सहवासाची भूक

चौथी:- सन्मान, आदर

पाचवी:- Self Actualization (मराठी शब्द?)

तुमच्या लिखाणातुन असे वाटत आहे कि पहिल्या चार झाल्या आहेत. आता पाचव्याकडे वळा Wink आत्मिक समाधान, मानसिक शांती मिळेल Proud

जग हे बदलत राहणार आहे. आपण त्यात काही करु शकत नाही. मस्त होणारे बदल एन्जॉय करा. अधुन मधुन आमच्या काळी असं नव्हतं म्हणत जुन्या आठवणींमधे हरवून जाण्यात, जुनी गाणी ऐकण्यात पण एक वेगळी मजा असते. ती पण एन्जॉय करा. Happy

आमच्या ७० च्या नंतरच्या पिढीचं तर विचारुच नका! आम्हाला तर शिक्षण संपल्यावर संगणक हाताळायला मिळाले.>>>> अगदी अगदी! फुल्ल अनुमोदन!!
नानबांची पोस्ट सही आहे.
एकदा आपल्या आधीच्या पिढीचा जरा विचार करुन पहा. आपल्यापेक्षाही त्यांची जास्त गोची आहे. स्वातंत्र्य मिळाले त्याच्या आगेमागे ५-१० वर्षे जन्मलेली ही पिढी.. पेहराव बदल, परंपरागत व्यवसाय ते शहरात येऊन नोकरी, खाण्यापिण्यातले बदल, नोकरीतही शेवटची १० वर्षे राहिलेली असतांना संगणक वापराची सक्ती, त्यामुळे त्याचे शिक्षण..
सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे कडक शिस्तीतील आधीच्या पिढीचंही ऐकणे आणि जास्त हुषार म्हणून नंतरच्या पिढीचेही ऐकणे ही त्या पिढीची गोची आहे. पण त्यांनी दिलेला बेलबॉटम फॅशनचा काळ आजही आपल्याला खुणावतो, आज गिर्यारोहण क्षेत्रामध्ये मी मी म्हणून हल्लीची पोरं उड्या मारतात पण त्यावेळी कुठलंही दळणवळणाची साधने नसतांना त्या पिढीने सह्याद्रीतील वेगवेगळे ट्रेकरुट्स शोधलेत, सुळ्क्यांवर चढाया केल्यात. मी तर म्हणेन की गिर्यारोहण क्षेत्राचा तो सुवर्णकाळ होता.
आपल्या आधीच्या पिढीने सगळा पाया रचून ठेवल्यामुळे आपण उड्डाणे करु शकतोय. त्यांची साच्यातली नोकरी वगैरे शब्द वापरून आपण कदाचित त्यांना चिप ठरवू पण ते आत्ताच्या कामाशी तुलना करुन..! आपणही आता आपलं भागलं असलं तर पुढील पिढीसाठी असं काहीतरी भरीव योगदान देऊया की त्यांच्यापुढे या पिढीचा आदर्श उभा राहिला पाहिजे. इथे नुसतं आर्थिक भागलेपणाचा विचार करुन चालणार नाही. आर्थिकदृष्ट्या समृद्धी आली असेल आता विचार आणि कृती वैयक्तिकतेकडून समाजाभिमुख (समृद्धीसाठी) करण्याची योग्य वेळ आली आहे असाच अर्थ काढायचा.

बेस्ट आहे लेख. चटकन रिलेट झालो. Happy
याचीच दुसरी बाजू अशी, की आपल्या पिढीने 'बेस्ट ऑफ बोथ वर्ल्डस' अनुभवले आहेत. मी कॉलेजला असतांना घरी एसटीडी बूथवरून रात्री अकरानंतर फोन करायचो, कारण तेव्हा कॉलिंग रेट्स निम्मे व्हायचे. (बोलतांनाही एक नजर कायम त्या गुलाबी अक्षरात 'पल्स' दाखवणार्‍या पट्टीकडे!) त्या एकमेव बूथसमोर माझ्यासारख्या अनेक होतकरूंची रांग लागलेली असायची. आता माझ्या कॉलेजात जाणार्‍या भावाला ही परीकथा वाटते. Happy
आपण पोस्टकार्डे, आंतरदेशीय पत्रे पाठवली आहेत. 'चित्रहार' पाहिले आहे. दर रविवारी टेल्सस्पिन, डकटेल्स ची मजा घेतली आहे. 'हॉट व्हिल्स' गाड्या पहिल्यांदा बहुधा आपल्याच पिढीने पळवल्या आहेत. मैदानावर मनसोक्त क्रिकेट खेळलो आहोत. टीव्हीवर मारिओला पळवले आहे. आर्चिसच्या दुकानातून ग्रीटिंग्ज पहिल्यांदा घेतली आहेत. चांदोबा, चंपक, ठक-ठक, चाचा चौधरी (आणि 'प्राण' चे इतर सर्व पात्र) कॉमिक्समधून वाचले आहेत. आंणि त्यानंतर केबल टीव्ही, मोबाईल फोन्स, कॉम्प्युटर्स आणि स्मार्टफोन्सपर्यंतची उत्क्रांती अनुभवली आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, सचिन तेंडुलकरची संपूर्ण कारकीर्द आपल्यासमोर घडतांना आपण पाहिली आहे.
अरे.. नॉस्टाल्जिक झालो की मीसुद्धा !
पण एकूण मजा आहे. मला तरी थकल्यासारखे/हरल्यासारखे वगैरे नाही वाटत. तीस वर्षांत जग बदलतांना पाहिल्याचा, अनेक अनुभव मिळवल्याचा आनंद वाटतो.

मी ७०च्या दशकात जन्मले, टी.व्ही. चा पहिला काळ होता तेव्हा खूप लहान होते मी, पण कुठेतरी एरियात एखाद्याकडे टी.व्ही. असायचा, सगळे जमायचे मोजके कार्यक्रम बघायला, आमच्याकडे ८३ला टी.व्ही. आला, तेव्हा झालेला आनंद गगनात मावेना, सायकल असणे एखाद्या घरी कौतुक होते, डोंबिवलीला स्कूटर असणारा आम्हाला श्रीमंत वाटायचा, गाडी वगैरे असणारा अतिश्रीमंत, पण छोट्या छोट्या गोष्टीचा आनंद लुटता आला, भावंडाबरोबर, चाळीतील शेजाऱ्यांबरोबर, त्यामुळे शेअरींग करायची सवय खूप होती. कधी कधी वाटते आपण जरा उशिरा जन्माला यायला हवे होते, पण तेवढ्यापुरतेच.

काही वर्षांपूर्वी (दशकांपूर्वी) मला असे वाटले होते तेंव्हा एका शहाण्या माणसाने माझे डोळे खाडकन उघडले होते. त्याची वाक्ये
" तुझ्या वडीलांच्या वेळेस टिव्ही घेणे, फोन असणे ही सुद्धा यशस्वी झाल्याचे मानदंड होते. आता पूर्वीपेक्षा जास्त सुलभ रितीने किंवा स्वस्तात टिव्ही , फोन मिळायला लागल्यावर तो तू घेतला म्हणून तू यशस्वी झाला असे नाही. तर फोन स्वस्त झाले आहेत. पूर्वी परदेशात जाण्याचे अप्रूप होते. आता ते इतके सुलभ झाले आहे की कोणी आपण परदेशात जाउन आलो असे म्हणाला म्हणून त्याचे सगळे करून झाले असे होत नाही. तू आणि तुझे कुटुंब सोडून इतर कुणाच्या आयुष्यात तू काय चांगला फरक घडवला आहेस याचा विचार करून बघ मग ठरव तू काय यश मिळवले आहेस ते?"

मी पण ह्याच पिढीतली (८०च्या दशकात जन्मलेली). मला आमच्या पिढीबद्दल जाणवलेली एक गोष्ट म्हणजे आमच्या पिढीतल्या बर्‍याच मुलांच्या आया नोकरी करत नव्हत्या. आणि करतअसतील तरी बहुतांश नोकर्‍या ह्या routine आणि एकाच गावात घडणार्‍या असत. कामाच्या राक्षसी वेळा. वेगळ्याच देशातील वेळेप्रमाणे adjust करून काम करावे लागणे हे आयांना करावे लागले नव्हते. माझ्या कोणत्याच मित्राच्या किंवा मैत्रीणीच्या आई ला अश्या नोकर्‍या नव्हत्या. परिणामी आमचं बालपणं हल्लीच्या मुलांपेक्षा बरच सुरक्षित आणि predictable होतं. म्हणजे आई वडिल ठराविक वेळ आमच्या साठी नक्की देऊ शकायचे.
आईची नोकरी Demanding असेल, तर बर्‍याच घरात आजी-आजोबा मुलांची काळजी घ्यायचे.
पण आमच्या पिढीतल्या नोकर्‍यांच स्वरूप बघता आमच्या मुलांना असं सुरक्षित आणि predictable आयुष्य देऊ शकू का अशी काळजी वाटते. हल्ली आजी-आजोबा पण आपण राहतो त्या गावातच असतील ह्याची खात्री नसते.
तर मुद्दा असा की, सुरक्षित आणि predictable बालपण आणि तरीही जागतिकीकरणामुळे नोकरी/ व्यवसायाच्या अफाट संधी हे दोन्ही उपभोगायला मिळालेली भाग्यवान (?) पिढी आमची आहे असं म्हणता येईल का?

सोहा,
एवढ्यातच असे काही म्हणू नका.. तूम्हाला अजून बरेच आयुष्य बघायचे आहे. खरं तर माझी भाचरं या पिढीतली, त्यामूळे हि पिढी माझ्या डोळ्यादेखत वाढली असे म्हणू शकेन.. पण अजून बराच पल्ला गाठायचा आहे तुम्हाला.

मंझिले और भी है ...

लेखन आवडले पटले रिलेट झाले, पण सविस्तर प्रतिसाद द्यायला गेलो तर उगाच नॉस्टेल्जिक व्हायची भिती आहे राव..

तू आणि तुझे कुटुंब सोडून इतर कुणाच्या आयुष्यात तू काय चांगला फरक घडवला आहेस याचा विचार करून बघ मग ठरव तू काय यश मिळवले आहेस ते?" >>
भारी वाक्य आहे एकदम

मुळात आपल्याकडे जी संन्यासाश्रम व्यवस्था होती ती सर्व संसारिक जबाबदाऱ्या पूर्ण केल्यावर यायची . म्हणजे त्यात आयुष्याचा बहुतांश वेळ जाणार असे कुठेतरी गृहीत धरले होते. पण हल्ली मुलांचे संगोपन सोडले तर बहुतेक (सर्व नाही पण बहुतेक ) गोष्टी या तिशीतच पूर्ण होतात . वरती अनेकांनी वाचन ,समाजसेवा , ई . पर्याय सुचवले आहेत पण वरती नगरी निरंजन म्हणतात तसे हे फारच वरवरचे आहे. किंवा समस्येचे simplification आहे. कारण माझ्यासकट अनेक जण या गोष्टी करत आहेतच . पण यासाठी फावल्या वेळातले छंद , १० ते ५, आणि फारस seriously न घेता आयुष्य मस्त एन्जॉय करायचे यापलीकडचा अजून काही option आहे का हे जाणून घ्यायला आवडेल . काहीजनाच्या प्रतिसादातून पण खूप चांगले मुद्दे मिळाले हे नाकारता येत नाही : )

याच पिढीचा असूनही अजिबात रिलेट झालं नाही.
वयाच्या तिशीत 'व्हॉट नेक्स्ट?' हा प्रश्न पडत असेल तर फार अवघड आहे बॉस!
घर, गाडी, उत्तम नोकरी, परदेशप्रवास या सगळ्या गोष्टी आहेत म्हणजे भरुन पावले हा विचारच भयानक आहे. अजय म्हणतो तसे अर्थकारण-समाजकारणाचा रेटाच असा होता की जरा बर्‍यापैकी परिस्थितीतून आलेल्या अनेकांना हे आज ना उद्या, कमी-अधिक मिळालेच. त्यात आपले यश कसले?
पुन्हा तो म्हणतो तसे 'समाजासाठी काय केले 'वगैरे विचारही जाउद्या. पण जे काम करीत आहे किमान त्यात तरी काही भरीव, ओरिजिनल, मूलभूत असे योगदान असावे एवढा प्रयत्न असायला काय हरकत आहे? माझ्या मते असा प्रयत्नही उरलेले सगळे आयुष्य व्यापून टाकायला पुरेसा आहे.
मग नॉस्टॅल्जिक अन बोअर इ.इ.व्हायला वेळ मिळेल असे वाटत नाही!

आगाऊचं म्हणणं मला पटतंय...घर,गाडी, वगैरे हे यशाचे सो कॉल्ड मापदंड मागच्या पिढीचे आहेत.कारण त्यांना ते मिळवायला खरंच रक्ताचं पाणी करावं लागलं.आपल्याला आज ना उद्या ते मिळत आहे.त्यासाठी खूप संघर्ष करावा लागला नाही म्हणून व्हॉट नेक्स्ट हा प्रश्न पडतोय.आपल्या आधीची पिढी म्हणत असेल बरंय तुम्हाला तिशीत सगळ्या गोष्टी मिळतायत.नाहीतर आमचं आयुष्य गेलंय हे सगळं जमवताना.
नविन क्षितिजं असतात आणि असणारच आहेत आपण शोधायला हवीत.

खूप प्रांजळपणे लिहिलं आहे. मी याच पिढीची आहे. माझी विद्यार्थीदशा अजून संपली नसल्याने बऱ्याच गोष्टींशी relate करू शकत नाहीये पण भावना पटल्या. असं नक्कीच वाटू शकतं. यावर उपाय म्हणजे काहीतरी नवीन challenging शोधणं. जगात कितीतरी प्रॉब्लेम्स आहेत. आपले सुटले की दुसऱ्यांना त्यांचे सोडवायला मदत करायची.
आपली पिढी खरंतर भाग्यवान! आपण एकदम करेक्ट वेळी जन्माला आलो! ज्या विज्ञान-तंत्रज्ञानातील बदलांनी जगाचा चेहरा बदलून टाकला त्या बदलांच्या वेळी आपण बालपणातून तारुण्यात प्रवेश करत होतो! लवचिक होतो/आहोत! हा लवचिकपणा मात्र सतत टिकवला पाहिजे! म्हणजे आपली मुलं जेव्हा त्यांच्या वेळेच्या क्रांतीला सामोरी जातील तेव्हा आपण outdated होणार नाही!
त्यासाठी नवीन गोष्टींना, बदलांना सतत सामोरं जात राहायचं! आणि जुनं ते सोनं ही टेप आजिबात वाजवायची नाही! म्हणजे मग तुम्ही तुमची लवचिकता गमावून बसणार नाही! हे मला सध्या फार जाणवतं! मी ठरवलंय! आपल्याला लहानपणी/टीनएज मध्ये मोठ्यांच्या ज्या गोष्टी खटकल्या, त्या गोष्टी आपली वेळ आली की आपण करायच्या नाहीत! उदा. नवीन हिंदी गाणी माझ्या घरच्या मोठ्यांना फारशी रुचत नसत आणि मला कहो ना प्यार है अत्यंत उच्च गाणं वाटायचं!! आता मलाही जूनी हिंदी गाण्यांची गोडी किती अवीट आहे हे कळलंय पण मी माझ्या छोट्या भाचीला लुंगी डान्स हे फालतू गाणं आहे असं मुळीच म्हणत नाही! In fact I enjoy that too!
"नावीन्याची हौस" संपली की आपण जुने व्हायला लागतो! आणि ती हौस कायम असेल तर what next? ह्या प्रश्नाचं उत्तर आपोआप मिळेल!

"नावीन्याची हौस" संपली की आपण जुने व्हायला लागतो! आणि ती हौस कायम असेल तर what next? ह्या प्रश्नाचं उत्तर आपोआप मिळेल! >>>>>>> क्या बात है... वाह...

Pages