मी अनामिका, ती रिबेका

Submitted by भारती बिर्जे.. on 25 October, 2013 - 03:51

मी अनामिका, ती रिबेका

मीच ती न-नायिका, माझ्या कथेचं नावही माझ्यावरून नाही.
मी नामहीन, वंश-अनुवंशहीन,श्रेयहीन अस्तित्वहीन कुणीही.

माझ्यासारख्यांना आस नसते प्रभावाची , सत्तेची, सौंदर्याची .
मला स्वप्नं पडायची तीही गवसताना हरपणाऱ्या भागधेयाची.

अनाथ आयुष्य सोबत घेऊन मी चालत होते पावलं न वाजवता .
नाही कळलं अकल्पनीय दिशांना कधी वळत गेल्या पाऊलवाटा .

तुटलेल्या पुलाखालून रोरावतं पाणी.
अंधाराच्या उरात सलतात गाणी.
******

तर एक होता राजा.त्या राजाची होती म्हणे पूर्वी एक सुंदर राणी.
नाव तिचं रिबेका. लोक अजून आठवतात त्या प्रेमाची रम्य कहाणी.

राणीच्या अपघाती मृत्यूच्या काळोखात गोष्ट लोपलेली.
तिथूनच तर माझ्या फुटक्या नशिबाची पहाट फुटलेली.

तिचा झाला अस्त म्हणून माझा उदय. उदय? छे ! भाग्योदय !
राजाचं ते राजस मौन , त्याचा दुखरा आवेश , गूढतेचं वलय !

नवल काय, जेव्हा त्याने केली सलगी , मी पुरती भाळले
मग सावरले स्वत:ला. सारे विसरून जायला सिद्ध झाले

पण नव्हते ते स्वप्न . राजा खरंच होता माझा झाला.
असे काहीतरी होते माझ्यात ज्याचा मोह पडला त्याला.

अनाथाला सारे बोलतात बालवयापासूनच देऊन टोमणे
जेव्हा कळलं हे सारं मलाही खिजवलं माझ्या मालकिणीने

‘’ भलती स्वप्ने, भलते भ्रम - भिकारणीला मिजास खूप
खरीच आतल्या गाठीची तू बरीच मोठी दिसते भूक ‘’

दुखले नाही मला कुठेही. सुखाचा अनोळखी प्रहर होता
तरीही आत आठवले काही, मनात काहुरले जाताजाता

निर्हेतुक प्रेम करणारे कुणीएक वडीलधारे भेटले होते
आयुष्याच्या मार्गक्रमणेत पूर्वीच सांगून गेले होते

म्हणाले होते ‘’सांभाळ बाळा निवडताना जीवनसाथी
डोळ्यांवरचे सरते धुके खूप उशीर झाल्यावरती ..

...दारी तुझ्या कोण उभे ? सुखच आहे की नजरबंदी
पारखून घेशील ना पोरी आयुष्य डावावर लावण्याआधी ? ‘’

सुखाचा नवा प्रहर होता . शंकांना नव्हते स्थान मनी.
का आठवली ही हितचिंता ? मंगलसमयी अभद्र वाणी .

नवा डाव . नवे गाव. राजाची हवेली वैभवशाली.
जीव मुठीत धरून तिथे नव्या राणीची स्वारी आली.

कुजबूज नोकरांत .मुख्य नोकराणी रिबेकाची लाडकी दाई
सलू लागले मी तिच्या डोळ्यात.मला नित्य पाण्यात पाही.

दाईचे तरी काय चुकले ? कुठे रिबेका? आणि मी कुठे ?
ती राजस्त्री भोगविलासिनी. सामान्यतेशी माझे नाते.

घरानोकरांवर रुबाब तिचा. तिची आज्ञा.तिची व्यवस्था
तिची जागा घेताघेता तारांबळलेली माझी अवस्था

तिचे रूप, तिचा गर्व, तिची कलासक्ती तिचा नखरा
तिची आवड खानदानी.उच्चभ्रू वर्तुळात शोभणारा तोरा

मिरवणे तिचे- तीच रोषणाई- संमेलनांची ती शान होती
तिच्या पावलातळी किती हृदये आसुसत बेभान होती.

तिच्या पडछाया वेढून मला खिजवत होत्या रात्रंदिनी
हरपले आभासी श्रेय माझे.तळमळत राहिले सुखशयनी

माझ्या फुटक्या नशिबाचा खेळ संपत आला होता
दुरावला होता राजाही मला तिची जागा घेता-घेता

ती गेल्यावर शून्यमहाली तडफडला होता राजा किती
अभ्यासिकेत येरझारा कसा घालत राही अर्ध्या राती

सारे सांगितले मला दाईने तुच्छतेचे टाकत कटाक्ष
‘जा तू मरून टाक उडी येथून’ -दाखवले मला उंच गवाक्ष

जीव द्यावा, संपवावे अधांतरातले आयुष्य असले
ऐकावे दाईचे ,टाकावी उडी मलाही सारे तिचे पटले

घडायचे होते वेगळेच काही.राजाने गुपित मला सांगितले
राणीचे चारित्र्य कुटील म्हणून त्याने तिला मारून टाकले.

पुरावे नव्हते. सुटला राजा.
संसारही सावरला माझा .

प्रेम राजाचे रिबेकावर नव्हते.पण माझ्यावर तरी होते कोठे ?
सडले होते दोघांचे नाते. त्या भूतकाळापासून मी पळवाट होते

जगासमोर नक्षीपात्रात दोन सुंदर फळे मांडलेली.
बहराचे रंग ल्यायलेली पण आतून पूर्ण किडलेली .

त्यांचे लग्न म्हणजे एक करार जगाला दाखवण्यासाठी .
ती होती शोभा हवेलीची . अन तो तिचा परिपूर्ण पती .

तिच्या अदम्य आसक्तीला मंजूर नव्हते कसलेच बंधन
खरेच सारे ? ती तर गेली. तिचे खरेखोटे मृत्यूचे इंधन

रिबेका .. ती परिसीमा लावण्याची,चातुर्याची,रसिकतेची
ती तर गेली. हवेली जळली. परागंदा झाली दाईही तिची.

आम्हीही मग गेलो तिथून पुन: अनाथ अज्ञात झालो
तिची कहाणी वाऱ्यावरच्या अवशेषात सोडून आलो

राजाबरोबर सुखात मी आता उरीचे सल विसरू पहाते .
जुने प्रश्न टाळते अचूक नव्या भ्रमांना खूप जोपासते .

खरी रिबेका कोणाला कळली? नाही झेपली,तिला संपवले
कदाचित दाईलाच तिच्या अस्तित्वाचे सार होते कळले

व्यक्तित्व नसणे ,रिबेका नसणे हीच माझी खरी ओळख
अचूक झाली माझी पारध.अचूक राजाने केली पारख.

म्हणून तर माझ्या कहाणीला साधे माझे नाही नावही
नाव रिबेकाचेच जी हरून न हरली, मरूनही मेली नाही

पण कधी निनादतात शब्द माझ्या कानी अज्ञातातून
किती खरे ते कळण्यासाठी जीवन गेले हातून निसटून

‘’.. दारी तुझ्या कोण उभे ? सुख आहे ते की नजरबंदी
पारखून घेशील ना पोरी आयुष्य डावावर लावण्याआधी ‘’ ....

-जिगीषा

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

जिगिषा....

शीर्षकावरूनच अंदाज बांधला की तुम्ही त्या कथेला कवितेत आणून एक आगळीवेगळी अनुभूती दिली असणार. मी डॅफनेची कादंबरी वाचली आहे; पण त्या अगोदर हिचकॉकचा चित्रपट पाहिला होता....त्याचा जबरदस्त असा प्रभाव माझ्या मनावर होताच....पण विश्वास ठेवा, एखादी सदस्या "रिबेका" च्या जीवनावर, किंवा तिच्या पतीच्या दुसर्‍या पत्नीवर अशी दीर्घ कविता रचून आपल्या अभ्यासाची खोली दाखवेल असे चुकूनही माझ्या मनी स्वप्नी आले नव्हते. पण आंतरजाल विश्व हे कमालीच्या धक्क्यांनी भरून आणि भारून गेले आहे याची प्रचिती हरेक वेळेला येत असते....आज तुमच्या "मी अनामिका,ती रिबेका..." ने तो प्रत्यय पुनःश्च आणून दिला आहे.

मी कवितेच्या वाटेने तुमच्या रिबेकाकडे गेलो आहे (परतपरत जावे लागणार आहे, हेही खरे, इतकी ती पात्रे विलक्षणरितीने सदैव नजरेसमोर येत आहेत]....जरी कविता तिला उद्देश्यून नसली तरी :

मी नामहीन, वंश-अनुवंशहीन,श्रेयहीन अस्तित्वहीन कुणीही. ~ होय...रितीरिवाजानुसार नायिकेला नाव नाही. लोक, कर्मचारी म्हणतात ते 'मिसेस विंटर...." कुणालाही वाटत नाही ही रिबेकानंतर या इस्टेटीची मालकीण झाली आहे. हाऊसकीपरच्या पदावर असलेली ती दाई मिसेस डॅन्व्हर हीच सर्वार्थाने जणू मालकीण असून तिच्या इशार्‍यावर सारा वाडा चालतोय.

मला स्वप्नं पडायची तीही गवसताना हरपणाऱ्या भागधेयाची. ~ किती कठोर असे सत्य तुम्ही स्वप्नातूनच उघडे करून दाखविले आहे, जिगिषा..... कादंबरीच्या सुरुवातीलाच ती म्हणते : "....Last night I dreamt I went to Manderley again ....ही उघडी ओळच तिच्या आयुष्यातील स्वप्नाची कहाणी सांगणार हे समोर येते.

अंधाराच्या उरात सलतात गाणी. ~ तिला ह्या गाण्यांचीच साथ होती....रिबेका तर अदृश्य पण तिची छाया सार्‍या इस्टेटीवर आपला प्रभाव टाकून आहे. जिगिषा....याच कादंबरीवर व चित्रपटकथेवर हिंदीत "कोहरा' नामक चित्रपट आला होता. ज्यात वहिदा रेहमानला अशी अंधारगाणी ऐकू येत असल्याचे दाखविले गेले त्यावरून रिबेकाची ठसठसणारी जखम ह्या दुसरीच्या हृदयात किती खोलवर रुतली आहे ते जाणवायचे.

कवितेतील "....दुरावला होता राजाही मला तिची जागा घेता घेता...." हा भोग अपरंपार दु:खाने भरलेला वाटतो. रिबेकाच्या सवतीने दिलेली ही हताश कबुली एका शेवटाकडे न्यायला तिला प्रवृत्त करणार की काय ही भीती सहज निर्माण होते.

"खरी रिबेका कोणाला कळली? नाही झेपली,तिला संपवले
कदाचित दाईलाच तिच्या अस्तित्वाचे सार होते कळले ..
.." ~ नाही कळली ती रिबेका कुणाला....तिच्या नवर्‍याला समजली असेल असे मानण्याची जागाही नाही. दाईला ? कदाचित, कारण रिबेका तिला मुलीसारखीच होती आणि मुलीच्या ठिकाणी मग स्वर्गातून तिलोत्तमा आली असेल तर तिला स्वीकारण्यास ती कदापिही तयार नाही....वाड्याला आग लावली जातेच.

'...म्हणून तर माझ्या कहाणीला साधे माझे नाही नावही
नाव रिबेकाचेच जी हरून न हरली, मरूनही मेली नाही ....."
जिगिषा, ही रचना केवळ अप्रतिम.... अगदी सारे सार आले आहे मि.विंटरच्या वेदनेचे....आणि पराभवाची कबुलीदेखील.....मरूनही मेली नाही....ही खरी कहाणी.

खूप खूप समाधान मिळाले मला रिबेका [आणि प्रत्यक्षात रिबेकाची नसलेली] ची काव्यकहाणी वाचताना. हार्दिक अभिनंदन !!

छान लिहिलं आहे.
अशोक मामांनी उल्लेख केला आहे ती मूळ डॅफेन ची कादंबरी वाचलेली नसल्याने ते संदर्भ माहित नाहीत.

माशा.... कादंबरी वाचली नसलीस तरी हरकत नाही....मात्र आल्फ़्रेड हिचकॊक यांचा ’रिबेका’ याच नावाने जगभर गाजलेला चित्रपट तू केव्हाही पाहू शकतेस...! त्यावरूनही जिगिषा यांच्या ह्या कवितेमागील तीव्रता तुला जाणवेल.

ओके अशोकमामा.
कादंबरीचेही नाव हेच आहे का ?
असं काही वाचलं की जगातल्या कितीतरी उत्तमोत्तम कलाकृती वाचायच्या/बघायच्या राहून गेल्यात याची जाणीव जास्त तीव्र होते. Sad

होय....’रिबेका’ इतकेच नाव आहे कादंबरीचेही.....१९३८ साली प्रकाशित झाली होती. तर चित्रपट १९४० चा.... दोन्ही आजही तितकेच आपापली नावे राखून आहेत.

आभार वरदा, अशोक, माशा.

Dafne Du Maurier च्या नायिका रिबेकाचे याच नावाच्या सुप्रसिद्ध कादंबरीत Honour Killing झाले आहे. तिच्या पतिकडून, उमराव Max de Winter कडून .
तिची सवत, दुसरी मिसेस विंटर , जी कादंबरीचीही निवेदिका आहे, जिचे नाव कुठेही आलेले नाही म्हणून एक न-नायिकाही म्हणता येईल तिला, तिचे एक मनोगत जरा वेगळ्या प्रकारे मांडण्याचा प्रयत्न केला.सत्याला अनेक बाजू असतात हे लक्षात घेऊन .
माशा, या काव्यात्म ललित लेखनात ती कथा आलीच आहे ..
अशोक, या तरल, अभ्यासू प्रतिसादातून तुम्ही मूळ कथा अन तिच्यावर केलेल्या या लेखनालाही यथार्थ समजून घेतले आहे, समजावून सांगितले आहे..

>> या काव्यात्म ललित लेखनात ती कथा आलीच आहे .. >>
हो जिगीषा ,
कादंबरी न वाचल्याने या काव्यात्म ललित लेखनाच्या(हा शब्द आवडला) आस्वादात कुठेच उणीव येत नाही.
एक स्वतंत्र काव्यात्म ललित म्हणूनच मी त्याचा आस्वाद घेतला. पण अशोक मामांनी उल्लेख केला म्हणून मग कुतुहलापोटी इतर माहिती विचारली.

अतीशय सुरेख! पण ती कादंबरी मी वाचलेली नाही, आणी नाव पण माहीत नव्हते. ( सॉरी ,माझे वाचन एवढे खोलवर नाही.:अरेरे:) त्यामुळे माझ्या डोळ्यासमोर लेडी डायनाच उभी राहिली.

आता जरुर वाचणार.

रचना छानच.अशोकजींची प्रतिक्रियाही.रश्मी खरेच की, लेडी डायनामध्येही रिबेकाच्या रिबेल व्यक्तित्वाची काही समान सूत्रे सापडतात !

जिगिषा, खूपच छान...

यशस्वी कादंबर्‍यांवर आधारित आणि तितक्याच किंवा त्यापेक्षा जास्त ताकदीच्या तुरळक चित्रपटांपैकी रिबेका एक. अर्थात चित्रपट कादंबरी वाचण्याच्या आधी बघण्यात आल्यामुळे कादम्बरी वाचताना सतत जोन फोन्टेन डोळ्यांसमोर उभी रहायची. तुमचे ललिलकाव्य वाचतानाही त्याचा पुनःप्रत्यय आला. धन्यवाद!

खूपच छान..
रिबेका ही माझी अत्यंत आवडती कादंबरी.. योगायोगाने मी थोड्यावेळापूर्वी नेटवर my cousin rachel बद्दल वाचत होते. त्यावरून रिबेकाची आठवण झाली. आणि लगेच माबोवर हे दिसलं Happy

आवडले.
रिबेका माझीही आवडती कादंबरी. मास्टरपिस थियटरचा रिबेका, मॉडर्न ट्विस्टवाला पण मला आवडला होता.

दिनेश....

मला पुन:श्च एकदा सांगावेसे वाटते तुमचा प्रतिसाद वाचल्यानंतर की....तुलनेने माझ्या मनातील तिथे काहीच उतरलेले नाही, हे प्रामाणिकपणे मी कबूल करतो, इतक्या जबरदस्त आशयाने जिगिषा यानी त्या जगप्रसिद्ध कादंबरीचे आणि तितक्याच प्रसिद्ध चित्रपटाला कवितेत गुंफले आहे.

जे काही काव्यात शब्दबद्ध केले आहे ते कादंबरी वाचून की चित्रपट पाहून हा प्रश्न इथे दुय्यम ठरतो... महत्वाचे हे की सार्‍या पात्रांना त्यानी आपल्या क्षमतेचे असे एक गारुड घातले आहे की ती सारी त्यांच्या कवितेच्या छंदात बंदिस्त झाली आहेत.... फार फार कठीण आहे ही सारी प्रक्रिया जी जिगिषा यानी लिलया पेलली आहे.

...‘’.. दारी तुझ्या कोण उभे ? सुख आहे ते की नजरबंदी
पारखून घेशील ना पोरी आयुष्य डावावर लावण्याआधी ‘’ ......."

~ शेवटच्या या दोन ओळीमुळे तर मी वेडाच झालो आहे; दिनेश.

वहिदा रहमान चा 'कोहरा' picture 'रिबेका' कादंबरी वरच आधारीत होता ना? 'ये नयन डरे डरे'.. हे गाणं त्यातलाच ना?

खूप आभार सर्वांचे.
रिबेका वाचली आहे अन चित्रपटही पाहिला आहे ( कोहरा पाहिलेला नाही Happy आता पाहेन ). रिबेका ही एक ललितकृती आहे, तिचा तथाकथित सुखान्त शेवट असला तरी लेखिकेने मौनात ठेवलेले कैक प्रश्न आपल्यासाठी सोडून दिले आहेत. त्यामुळे रिबेकावर काहीतरी लिहावेसे वाटत होते,कसे लिहावे या विचारात होते अन हा फॉर्म प्रयोगादाखल वापरला. तुम्हा सर्व चोखंदळ वाचकांना आवडला त्याअर्थी जमले असावे.

अशोक,
...‘’.. दारी तुझ्या कोण उभे ? सुख आहे ते की नजरबंदी
पारखून घेशील ना पोरी आयुष्य डावावर लावण्याआधी ‘’ ......."

या ओळींच्या उल्लेखाबद्दल विशेष आभार, ती रिबेकाच्या कथानकात माझी स्वत:ची जोड आहे.विवाहबंधन काय किंवा कोणतेही मानवी नातेसंबंध खूपदा दिसतात तसे नसतात, त्यावर कळकळीचा सल्ला देणारे हितचिंतक आयुष्यात भेटले तरी उपयोग नसतो कारण आयुष्य अतर्क्यच असते एकूण..

जिगिषा, अफलातून आहे हे. Happy तुझे काव्यात्म ललित की ललितामधे उतरलेले काव्य सही झालेले आहे.

मी रिबेका सिनेमाच पाहिलाय. कादंबरी वाचली नाही, आता वाचायला हवी.

खुप छान लिहिलेय... मी कादंबरी वाचली नाहीये पण चित्रपटाची कथा वाचलीय.

.. दारी तुझ्या कोण उभे ? सुख आहे ते की नजरबंदी
पारखून घेशील ना पोरी आयुष्य डावावर लावण्याआधी ‘’ ....

सुखाचा नवा प्रहर होता . शंकांना नव्हते स्थान मनी.
असली कसली ही हितचिंता ? मंगलसमयी अभद्र वाणी .

किती विरोधाभास आहे ना.... सगळे माहित असुनही माणसे डोळे मिटुन आयुष्य लोटून देतात. Sad

(रच्याकने, कोहरा अजिबात पाहु नका, निराशा होईल)

>> किती विरोधाभास आहे ना.... सगळे माहित असुनही माणसे डोळे मिटुन आयुष्य लोटून देतात. अरेरे>>
साधना, अगदी खरं.. सगळं माहीत असल्यासारखं आपल्याला त्या त्या वेळी वाटतं हीच गंमत आहे .
कोहरा बघू नका हा अलर्ट लक्षात ठेवून पाहेन आता..

हे लेखन, त्यावरचे सर्व प्रतिसाद वाचताना जाणवलं की अनामिका अन रिबेका ही प्रेरणांची दोन रुपं आहेत आणि जीवनासक्त रिबेकाला मारून अनामिकेसारखं अनाम होणं ही सुरक्षित जगण्यातली गरजही आहे.. किती नव्याने भेटत रहातात या कालातीत व्यक्तिरेखा..

Pages