टेरारियम (Terrarium) आणि वाढदिवसाची पार्टी

Submitted by मामी on 26 October, 2013 - 03:48

वाढदिवस साजरा करायचा म्हणजे सोपं थोडीच असतं? दरवेळी काहीतरी नविन क्लृप्ती काढायची. 'हटके' झालं पाहिजे, इतरांपेक्षा वेगळं काहीतरी आणि तरीही इंटरेस्टिंग!!! हम्म्.......

बरीच भवति न भवति होऊन लेकीच्या यंदाच्या अकराव्या वाढदिवसानिमित्तच्या पार्टीकरता थीम ठरली - टेरारियम (Terrarium).

टेरारियम म्हणजे अ‍ॅक्वेरीयम सारखीच बंद जागेत झाडं लावण्याची कला. Terra म्हणजे जमीन. तर बंद काचेच्या पारदर्शक भांड्यांतून छोटी छोटी, ज्यांना फार ऊनाची गरज नाही अशी इन्डोअर प्लँटस लावण्याची, ती जोपासण्याची कला. नुसतीच झाडं न लावता काही लहान, रंगित वस्तु वापरून त्यातून एक सुरेख लँड्स्केपही बनवता येतं. या भांड्यांवर काचेची झाकणं ठेवली तर आठवड्यातून केवळ एकदा पाणी देऊन पुरेसं होतं. कारण आतलं पाणी आतच राहिल्यानं रिसायकल होत राहतं.

या करता अत्यंत सुरेख सुरेख सिरॅमिक फिगरीन्स चीनमध्ये बनतात आणि अमेरीका, युरोपमध्ये मिळतात. आपल्याकडे सहज उपलब्ध होत नाहीत. पण या फिगरीन्स कसल्या मस्त असतात म्हणून सांगू! छोट्या रंगित मशरूम्स, फुलपाखरं, परीकथेतले नोम्स (gnomes), गोगलगाई, सुबक घरं... एक न दोन, चिक्कार प्रकार. हवे ते निवडा आणि सुरेख टेरारियम बनवा.

काही महिन्यांपूर्वीच नेटवर इथे तिथे हुंदडताना असल्या सुंदर सुंदर टेरारीयम्सचे फोटो हाती लागले होते. ते बघून भुरळ पडली होतीच. लेकीला तर फारच. (Terrarium असा सर्च देऊन बघा. कसल्या भारी भारी इमेजेस आहेत.) असं काही करायचंय म्हणून मागे लागली. मग काय? शोधाशोध सुरू.

लेकीच्या १५ मैत्रिणींकरता फिशबोल्स आणले, क्रॉफर्ड मार्केटमधून बरंच शोधून सुरेख लहान लहान (फायबरची) घरं आणि बाहुल्या आणल्या, चायनिज गिफ्टवाल्या दुकानांतून रंगित काचेच्या लांबटगोल गोट्या, चपट्या गोट्या मिळवल्या. रानडेरोडवरच्या कुंभाराच्या दुकानातून अगदी छोटी छोटी मातीची भांडी मिळाली. ती घेतली. अन घरी आणून अ‍ॅक्रिलिक रंगात लेकीनं आणि मी मिळून मस्त रंगवली.

टेरारियममध्ये काही विशिष्ट प्रकारची झाडं लागतात. त्यांची माहिती नेटवर आहे. ती झाडं देण्याचं आणि मुख्य म्हणजे टेरारियम बनवण्याची अ‍ॅक्टिव्हिटी मुलींकडून करवून घेण्याचं महत्त्वाचं काम एका ओळखीतल्या स्त्रीनं आनंदानं अंगावर घेतलं. या माझ्या मैत्रिणीची प्रभादेवीला झाडांची नर्सरी आहे.

दादर कबुतरखान्याजवळच्या विसावा हॉटेलच्या गल्लीत अत्यंत मस्त ज्युटच्या बॅग्ज मिळाल्या. काहींवर आधीच प्रिंटस होते. तीन बॅग्ज प्लेन होत्या. त्यावर पुन्हा आम्ही दोघींनी कुंचला चालवला. प्रत्येकीचा टेरारीयम बबल रॅपमध्ये गुंडाळून या ज्युटच्या बॅग्जमधून दिला. मुलींनीही जपून नेला.

मात्र या सगळ्या मेहनतीचं फळ फारच उत्तम आलं. लेकीच्या मैत्रिणींनी भारी आनंदानं टेरारीयम्स बनवली. (तीच त्यांची रीटर्न गिफ्टही होती). प्रत्येकीचा तिनं बनवलेल्या टेरारियमसोबत फोटो घेतला आणि केक कापणे आणि जेवणखाण इ. होईपर्यंत लगेच जवळच्या दुकानातून A4 साईजच्या जाड कागदावर प्रिंट करून लॅमिनेट करून जाताना प्रत्येकीला दिला.

एकूणात काय आम्ही खुष अन पब्लिक खुष. तुम्हीही या आनंदात सहभागी व्हा ....

फिशबोल्स आणि फिगरीन्स :

मातीची भांडी आणि काचेचे पेबल्स :

रंगवलेली भांडी :

सजवून वेगवेगळे प्रकार ट्रेजमध्ये घालून ठेवले. मुलींनी प्रत्येकातील एक्-एक आणि मग उरलेल्यातले हवे तसे निवडले. मग दोन-दोन, तीन-तीन मडकी टेरारीयममध्ये जाऊन बसली. एकीनं तर दोन दोन घरं देखिल टेरारियममध्ये ठेवली. Happy

या ज्युटच्या बॅग्ज - आधीच प्रिंट असलेल्या :

या आम्ही हात साफ करून घेतलेल्या :

अ‍ॅक्टिव्हिटीची जय्यत तयारी :

तयार टेरारियम्स :

हे लेकीनं केलेलं टेरारियम.

मुख्य विषयापासून दूर जातेय पण तरीही हे हवंच म्हणून - केक आणि खाऊ.

फोटो फक्त स्नॅक्सचेच आहेत - आल्याआल्या खाऊ दिला त्याचे. मुख्य जेवणात रेड पास्ता, व्हाईट पास्ता, डॉमिनोजचा पिझ्झा आणि चटणी सॅंडविचेस होती त्याचे फोटो काढले गेले नाहीत. नवरा, मी आणि खास बोलावलेला फोटोग्राफरही विसरलाच बहुतेक ते फोटो काढायला. Proud

विविध स्वादाची, रंगाची जेली :

जेली, सोया पफ्स, वेफर्स बिस्कीटं, ज्यूस (वाट्यांमधे नंतर पिझा पास्तावर घालण्याकरता पिझा सिझनिंग आणि चिली फ्लेक्स आहेत.) :

केक. आतून रेनबो केक होता. मात्र कापल्यावरचा फोटो नाहीये. :

टेरारियम प्रमाणेच आणखी एक अफलातून प्रकारही या निमित्ताने कळला - ब्रोकन पॉट गार्डनिंग. याकरता broken pot garden असा सर्च देऊन इमेजेस बघा. हा ही प्रकार आता करून बघणार आहे.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आई स्वतः हौशी, रसिक आणी कलानिपुण असली तर मुलांमध्येही, विशेषतः मुलींमध्येही ही कला उपजते/ निपजते याचा पुन्हा प्रत्यय आला. मामी तुम्हाला गालगुच्चा आणी तुमच्या हौशी कन्येला लाराला वाढदिवसाच्या अनेक उत्तम शुभेच्छा.:स्मित:

अतीशय आवडला हा उपक्रम.

मामी ती वरची पहिली लिंक उघड्त नाहीये, सिरॅमीक वाली.

आई स्वतः हौशी, रसिक आणी कलानिपुण असली >>> इश्श्य! लाजले ना मी! Happy

आता उघडेल बघ ती लिंक. Happy लक्षात आणून दिल्याबद्दल धन्यवाद, रश्मी. Happy

कुंड्या रंगवण्याची आयडिया पण मस्त आहे. >>> अल्पना, या प्लॅस्टिकच्या कुंड्या आहेत. म्हणून स्टिकर्स लावलेत. मातीच्या कुंड्या रंगवता येतील पण नेताना जड पडतील. छोट्या असतील तर चालतील.

आई स्वतः हौशी, रसिक आणी कलानिपुण असली तर मुलांमध्येही, विशेषतः मुलींमध्येही ही कला उपजते/ निपजते याचा पुन्हा प्रत्यय आला. >>> अगदी, अगदी ! भारीच आहेस तू मामी आणि तुझी लेक __/\__ ! मस्तच आहे हे टेरारियम.

लेकीला अनेक उत्तम आशीर्वाद Happy

एक म्हणजे तुमच्या घरातले पडदे फार सुरेख आहेत. आमच्या घरी मालकाने पडदे लावायची सोयच केलेली नाही त्यामुळे माझा जीव फार जातो पडद्यांसाठी

दुसरे मंजे त्या जेलीत काय घातले आहे रंगी बेरंगी असे?
मार्श मॅलो का?

हॅप्पी बड्डे, लारा!

वाढदिवसाला टेरारियम प्रॉजेक्टची कल्पना आणि एक्झिक्यूशन दोन्ही फार आवडलं.

केक सुंदर दिस्तोय. लारा, वाफे आणि भाज्या सुपरक्यूट.

फारच मस्त! लेकीला हॅप्पी बड्डे आणि मामीला _//\\_!

इतक्या सुंदर सुंदर कल्पना सुचविल्याबद्दल आणि या लेखासाठीही थांकु!

ब्रोकन पॉट गार्डन्ससाठी वाजवी दरात कच्चा माल पुरवायला माझी तयारी आहे >>>> Lol वरदा. तू दिलेले पॉट्स वापरले तर त्याला अँटिक ब्रोकन पॉट गार्डनिंग म्हणावं लागेल.

>>>> लारा पॉलीमर क्ले वापरून फिगरीन्स बनवू शकेल. मशरुम्स, कॅटरपिलर, लेडीबग वैगरे सोप्प्या सोप्प्या वस्तू तर अगदी आरामात जमतिल. तसाही तिच्या "क्लेकारी" मध्ये सफाई आहे. >>>>

धन्यवाद अल्पना. पण तयारी करायला तीन आठवडे आधीपासून सुरुवात केली तरी शेवटी एका दिवसात सगळं जमवलं. का आणि कसं ही एक वेगळीच मोठी स्टोरी आहे. त्यावर वेगळं लिहायचंय. इथे नको.

सगळ्यांना धन्यवाद. Happy

लाराला वाढदिवसाच्या शुभेच्छा.
आयडिया भारी आहे. आणि सगळं पूर्णत्वाला नेण्याची चिकाटीही भारी.

सुपरलाईक, मामी.

लाराचं टेरारियमही भुरळ पाडणारं आहे. लाराला वाढदिवसाच्या उत्तमोत्तम शुभेच्छा!

पण तयारी करायला तीन आठवडे आधीपासून सुरुवात केली तरी शेवटी एका दिवसात सगळं जमवलं. >> हे आमच्याकडे नेहेमीच होतं. Happy
इतक्याजणांसाठी फिगरीन्स घरी करणं अवघडंच आहे. पण तिच्या स्वतःसाठी बेक करता येणार्‍या पॉलीमर क्ले पासून करता येतिल तिला. ते मश्रुम्स करताना तर खूप मज्जा येते. पोरासाठी फ्रिज मॅग्नेट्स बनवले होते मी तसले. Happy

मस्त केलं आहे सगळं. मानलं उत्साहाला !
मामी, तू लेकीला खूप क्वालिटी टाईम देतेस असं वाटतं. Happy

आमच्याकडे मागच्या वर्षी लेक एक दिवस शाळेतून नाचत नाचत घरी आली व 'मी टरेरियम बनवणार' असं डिक्लेअर केलं तेव्हा मी पहिल्यांदा तो शब्द ऐकला. त्यांच्या शाळेत त्यांनी गॄप ने बनवलं होतं व तिला घरी तसंच बनवायचं होतं. अर्थात ते असं आर्टिस्टीक वगैरे नसून नॅचरल हॅबिटॅट्स शिकण्याच्या उद्देशाने होतं. घरी तिने माझ्याकडून लागेल ते साहित्य घेऊन स्वतः सगळं बनवलं होतं. त्यात बिया पेरुन अळ्या, किडे, गोगलगायी अश्या गोष्टी त्यात टाकल्या, माझी ४ वर्षांची धाकटी देखील अतीव उत्साहाने रोली-पोलीज, गांडूळं शोधून हातात पकडून आणायची तेव्हा. सर पे भूत संवार टाईप होतं त्यावेळी त्याचं. खोक्याच्या झाकणाला छिद्रं केली होती हवा यायला, पाणी टाकणे, कोण कोणाला खातं ते बघणे, झाडांची वाढ बघणे असे सर्व केले होते. अख्खे घर टरेरियम मय झाले होते १५-२० दिवस !

ज्यांना ७-८ वर्षांची मुलं आहेत त्यांनी घरी हे हॅबिटॅट स्टडी वालं टरेरियम करुन बघायला हरकत नाही, मुलं प्रचंड एंजॉय करतात व सगळी साखळी शिकतातही अगदी भरपूर ! आम्ही घरच्याच साहित्यातऊन बनवलं होतं पण कोणाला इंटरेस्ट असेल तर 'terrarium habitat kit' असं सर्च करा, इमेजेस पण बघू शकता अंदाज यायला.

फारच मस्त मामी!!! तुझ्या उत्साहाला सा.न. (थोडास्सा तरी दे ना पाठवुन).

लेकीला वाढदिवसाच्या शुभेच्छा. Happy

मस्तच !! छानच दिसते. रिटर्न गिफ्टची कल्पना अफलातुन आहे. मुली अगदी खुष झाल्या असतील. यापुर्वीही लाराची कला पाहीली होती...क्लेचे कपकेक्स ,डोनट्स... हे ही खुप आवडले. तुम्ही तिच्या कलेला छान प्रोत्साहन देता. तिला खुप खुप आशिर्वाद! अशीच तिची कला आम्हाला दाखवत जा.

हायला, लईच भारी की!
मला टेरेरियम म्हंजे सॉईल मॉइश्चर, ओटू-सिओटू परसेंट, सर्व्हायवल आणि जर्मिनेशन रेट असल्या गद्य गोष्टीच लक्षात येतात. हे असं डेकोरेटीव्ह म्हंजे मस्तच!

खूप छान आहे.... मलाही करायचा मोह होत आहे ... मुलगा एन्जॉय करेल... घरी जुना फिश टँक आहेच .... माती मध्ये काही अ‍ॅड करायचे आहे का? का नेहमीची कुंडीत असते तशीच ?

Pages