पुरातनासोबत काही क्षण : मध्यप्रदेशातील मितावली आणि पडावली मंदिरे

Submitted by अमेय२८०८०७ on 23 October, 2013 - 11:04

मध्य प्रदेशातील चंबळ खोर्‍यात अनेक पुरातन मंदिरे आहेत त्यापैकीच ह्या दोन जागा : मितावली आणि पडावली. नुकतीच इथल्या प्राचीन मंदिरांना भेट दिली. यापैकी नवव्या शतकातील बांधकाम असलेले मितावली येथील वर्तुळाकार मंदिर अजूनही बरेच सुस्थितीत आहे. आपल्या संसदेची वास्तू या मंदिराची प्रेरणा घेऊन बांधण्यात आली असे मानण्यात येते. छोट्या टेकडीवर स्थित मितावली थोडे दुर्गम भागातच आहे. ग्वाल्हेर - कानपुर हायवेवर १० किमीनंतर हायवे सोडल्यावर, पुढील २५ किमीचा रस्ता बरेच ठिकाणी खचलेला आहे. मात्र सभोवतालचे दृश्य रस्त्याबद्दलच्या वैतागाला थोडे सुसह्य करते. हिरवीगार शेते, लहानमोठ्या टेकड्या आणि त्या दिवशी कधी नव्हे ते दिसलेले निळे आकाश यामुळे मजा आली. अशात उजव्या हाताला मितावलीची टेकडी दिसू लागली. पायथ्याला तीन-चार वाहने एका वेळी लागतील एवढीच पार्किंगची जागा आहे. भोवताली विस्तीर्ण मळे आहेत पण जमीन सपाट नाही त्यामुळे पायथ्याशी पार्किंग मिळाले नाही तर अर्धा पाऊण किमीवर गाडी लावून चालत जावे लागते. आम्ही सुदैवाने आरंभाचे पक्षी (अर्ली बर्ड्स) होतो त्यामुळे त्रास झाला नाही. लगेच चढण सुरू झाली.
From mitawli 131013

१०० फूट दगडी पायऱ्या चढून मंदिरात जावे लागते.

चढण छोटी असली तरी एकदम खडी आहे त्यामुळे बर्‍यापैकी दम लागला. शेवटची पायरी चढली आणि मंदिराची वास्तू एखाद्या प्रचंड भित्तीचित्राप्रमाणे अचानक समोर आली.

या छोट्या दरवाजातून मंदिरात प्रवेश होतो.

आत जाताच विस्तीर्ण वर्तुळाकार स्तंभरचना मन वेधून घेते. या प्रकाराच्या मंदिरांना चौसष्ठ योगिनी मंदिर म्हणतात असेही कळले. बाहेरील वर्तुळाला आतील बाजूने चौसष्ठ कोनाडे आहेत आणि प्रत्येकात एक छोटे शिवलिंग स्थापित आहे.

मध्यभागी गर्भगृह आहे, यातही शिवलिंग आहे. मात्र आता पूजा वगैरे होत नाही. पूर्वी एक कायमस्वरुपी पुजारी असायचा.

मंदिराची इमारत छतावरुन कशी दिसेल अशी उत्सुकता वाटल्याने तिथेही चढून पाहिले. तिथून इमारतीचा सुबक वर्तुळाकार आणि भव्यता आणखीनच उठून दिसत होती. दूरवर हिरवी शेतीही दिसत होती, आमच्या गाड्याही सुरक्षित दिसल्या.

तेवढ्यात एक स्थानिक आपणहून ओळख करून घ्यायला आला. त्याने आणखी माहिती दिली. त्यानुसार स्थानवैशिष्ट्यामुळे इथे खगोलशास्त्र आणि गणित यांची अभ्यासकेंद्रे होती. त्या माणसाने भिंतींवरील कोरीव कामाकडेही आमचे लक्ष वेधले. मंदिराखाली पूर्वी पाण्याची कुंडे होती आणि मंदिर परिसरात पडलेल्या पावसाचे पाणी आपसूक त्या कुंडांत जावे अशी रचना असल्याचेही त्याने सांगितले.

मितावली पाहून झाल्यावर आम्ही मंदिराच्या बाहेर असलेल्या एका डेरेदार झाडाखाली बसून खाणे-पिणे उरकले, काही काळ विश्रांती घेतली आणि खाली उतरून ४-५ किमीवर असलेल्या पडावलीच्या वाटेला लागलो.
जवळच सखल भागात असलेल्या पडावलीतील मंदिराची मात्र बरीच दैना झाली आहे. बाहेरुन भक्कम बुरुज दिसतात, बाहेरची मोठी बागही छान सांभाळली आहे मात्र आतील मंदिराचे आणि पुढे १९ व्या शतकात जाट राजांनी बांधलेल्या गढीचे भग्नावशेषच उरले आहेत.

केवळ एक गाभारा सुस्थितीत आहे ज्याच्या छतावर आणि भिंतींवर कोरीव काम पाहायला मिळते.

एक दोन ठिकाणी खजुराहो शैलीतील शिल्पांच्या ओळीही कोरलेल्या आढळतात.

जिथे जाण्यासाठी आजही बरेच कष्ट पडतात तिथे नवव्या-दहाव्या शतकात इतक्या उच्च प्रतीचे बांधकाम करणार्‍या अनामिक कारागीरांसाठी अपार आदर वाटला. उत्तम स्वच्छता आढळली. एक मात्र आहे की या दोन्ही ठिकाणी खाण्या-पिण्याच्या वा तत्सम सोयी फारशा नाहीत. पण एका अर्थी बरेच आहे, त्यामुळे या स्थानांचे अलिप्त - गंभीर व्यक्तिमत्व टिकून राहिले आहे असे वाटले.
फारशा परिचित नसलेल्या या प्राचीन स्थळांची ही सहल पुरातनाशी काही काळ नाते जोडून गेली आणि खूप आनंद देऊन गेली हे मात्र नक्की.

------------------------------------------------------------------------------------------------------------------
इथे भेट द्यायची असेल तर ग्वाल्हेर मध्ये मुक्काम करुन कारने जाण्याखेरीज पर्याय नाही. बस वगैरेची काहीही सोय नाही. आधी सांगितल्याप्रमाणे दिवसभराचे खाणे-पिणे बरोबर घेऊन जावे लागते.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

फार सुंदर जागा आहे. फोटोही खुप छान आलेत.
कमी लोक जाताहेत तेच ठिक आहे. एखादी वार्षिक जत्रा भरू लागली म्हणजे ती टिपीकल गर्दी होणारच.

सुंदर फोटो Happy
चौसठ योगिनी म्हणजे त्या चौसष्ट कोनाड्यांमधे चौसष्ट योगिनींच्या मूर्ती असतात. हे तांत्रिक पद्धतीचे मंदिर असते. त्या सगळ्या योगिनीमूर्ती गायब झालेल्या दिसतायत..

जबलपूरहून भेडाघाटला जातानाही रस्त्यातच एका छोट्याशा टेकडीवर फार सुरेख चौसठ योगिनी मंदिर आहे.

लै भारी !
पन याच्या खाली काय हाये का ? म्हंजी सोनं नाणं ?
( शनवारवाड्याखाली अडीच हजार टन कांदा सपनात आल्ता )

मस्त !!!!

मग शनवार वाडा पण अजेंड्यावर घ्या.:हाहा:

खूप म्हणजे खूपच आवडली ही मंदिरं आणी फोटो, मनःपूर्वक धन्यवाद.:स्मित:

बाय द वे, मध्यप्रदेशातच मुक्तागिरी येथे जैनांची प्राचीन लेण्यांसारखी मंदिरं आहेत, जमल्यास पुढच्या वेळी ती ट्रिप करा आणी फोटु डकवा. ( आमच्या नशीबात पर्यटन नाही, त्यामुळे तुम्हाला स्पेशल विनंती)

वा अमेयराव, मस्त फोटु आणि मस्त माहिती .....

या बांधकामात चुनादेखील वापरलेला दिसत नाहीये - आश्चर्यच !!

कमी लोक जाताहेत तेच ठिक आहे. >>>+१०...

चौसठ योगिनी म्हणजे त्या चौसष्ट कोनाड्यांमधे चौसष्ट योगिनींच्या मूर्ती असतात. हे तांत्रिक पद्धतीचे मंदिर असते. >>>>> वरदा - हे जरा अजून उलगडून सांगणार का ???

वरदा - हे जरा अजून उलगडून सांगणार का ???+१००
मलाही हे अगदी अद्भुत वाटतंय. आर्किटेक्चरली, ऐतिहासिक दृष्ट्या!
अगदी जाऊन बघून यावंसं वाटतंय!

Pages