देऊळ

Submitted by सई केसकर on 9 October, 2013 - 05:22

नुकताच 'देऊळ' हा चित्रपट बघितला. खरंतर मी खूप दिवसात नाना पाटेकरचा कुठलाच चित्रपट बघितला नव्हता त्यामुळे डीव्हीडी घेताना नानाच्या डाय हार्डच्या भूमिकेतून घेतली. पण चित्रपट बघितल्यावर मला खूप मोठा साक्षात्कार झाला. तो सांगण्यासाठी मला तीन वाक्यात या चित्रपटाची गोष्ट सांगणं जरूरीचं वाटतं.

एक दुर्लक्षित गाव असतं. तिथे एकाला गाय चारायला गेलेला असताना दत्ताचा साक्षात्कार होतो. त्यामुळे गावात गाईचं आणि दत्ताचं देऊळ बांधतात आणि त्या गावाची 'जागृत देवस्थान' अशी प्रसिद्धी होते.

गोष्ट पुढे जात असताना बरेच प्रश्न मनात येतात. माझ्यासारख्या सायकॉलॉजी टुडेचा रातीभ असणार्‍या लोकांना साक्षात्काराला "सायकॉलॉजीकल टर्म्स" मध्ये काय बरं म्हणतील असे प्रश्न पडू लागतात. साक्षात्कार झाल्यावर केश्या (गिरीश कुलकर्णी) गावातल्या सुशिक्षित आणि तर्कशुद्ध विचार करणार्‍या अण्णा कुलकर्णींकडे (दिलीप प्रभावळकर) जातो. साक्षात्कार हा एक वैयक्तिक अनुभव आहे. आणि आपल्याला जसा देव दिसतो तो दुसर्‍याला दिसेलच असं काही नाही असं अण्णांचं मत ऐकून केश्या आनंदी होतो. आपल्याला दत्त दिसल्याची बातमी जरी त्यानी गावात केली असली तरी त्याचं पुढे काही व्हावं असं त्याला वाटत नाही. पण ही बातमी ऐकून गावातील बेकार तरुणांची टोळी पैसे उभे करून मंदिर बांधायला सज्ज होते. त्यात गावचे पुढारी भाऊ गलांडे (नाना पाटेकर) यांना पुढाकार घेण्याची विनंती होते. आधी अण्णांशी सहमत असलेले भाऊ राजकीय वारे बघून देवळाच्या गटात सामील होतात. हळू हळू सुरु झालेलं काम जोमाने संपतं आणि देवळांमुळे गावाचा भरपूर सांपत्तिक विकास होतो. गावात वीज येते, घरी बसून राहणार्‍या बायका मंदिराच्या बाहेर दुकानं उघडून गंडेदोरे, उदबत्त्या, पोथ्या, नारळ विकू लागतात. आणि थोडे दिवसांनी देत्त हा गावच्या रोजगारनिर्मितीचा मुख्य स्त्रोत होऊन जातो.

चित्रपटाच्या या भागानंतर अण्णा गाव सोडून जायला लागतात तेव्हा भाऊसाहेब त्यांना थांबवायला येतात. इथे नानाच्या अभिनयाचे पैसे वसूल झाले आहेत. देवामुळे जर गावाचा विकास होत असेल तर देवाला का नाही विकायचं? देवामुळे गावाचं राहणीमान सुधारत असेल तर देवाला का नाही विकायचं? आणि देव आहे किंवा नाही, तो प्रकट आहे किंवा अप्रकट, तो मंदिरात आहे की सगळीकडे या उत्तर नसलेल्या प्रश्नांची उत्तरं शोधताना, देवळाबाहेर बसून दिवसभर फुलं विकणार्‍या गाववालीच्या उत्कर्षाचे मोजमाप मात्र नक्कीच होऊ शकते.

अर्थात याबरोबर भ्रष्टचारदेखील वाढतो. गावची अधिकारी मंडळी राजरोसपणे पैसे खाऊ लागतात. पण हे सगळं गावात एखादा साखर कारखाना उभा झाला असता तरी झालं असतं आणि कदाचित जास्त प्रमाणात झालं असतं. कारखाना उभा करण्यासाठी जास्त मनुष्यबळ, बुद्धिमत्ता, कष्ट आणि पैसे लागले असते, जे इथे लागले नाहीत.

इथे खटकणारा मुद्दा हा आहे की हा श्रद्धेचा व्यापार आहे. आणि तो व्यापार आहे हे कबूल केल्यावरच त्याकडे इतक्या तटस्थ नजरेने बघता येतं. आणि त्या व्यापाराकडे प्रगतीचा मार्ग म्हणून बघणार्‍या भाऊंचा मुद्धा पटवून घ्यायचा नसला तरी विचार करायला भाग पाडतो. त्याचं समर्थन करणार्‍यांची बाजू पूर्णपणे कमकुवत ठरवता येत नाही.
भारतात असे व्यापार सगळीकडे उघडपणे चालतात. भारतातली देवळे जशी श्रीमंत आहेत तशीच पाश्चात्य देशातील चर्चेसदेखील आहेत. धार्मिक संघटनांकडे पैसा येणे आणि त्याचा कधी चांगला तर कधी वाईट वापर होणे हे कधीच कालबाह्य होऊ शकत नाही. कारण या संस्थांकडे लोक फक्त देव शोधत येत नाहीत. बर्‍याचवेळेस तिथे लोक स्वत:च्या शोधात जातात. स्वत:सारख्या दुसर्‍यांच्या शोधात जातात. कधी कधी आपल्यासारख्या नसलेल्यांच्या विरोधात जातात. कधी आपलं अस्तित्व भक्कम आहे याची खात्री करण्यासाठी जातात. या जनप्रवाहात वाहून देवाचा व्यापार करणारे लोक देवासाठी काम करतात का माणसासाठी हा प्रश्न महत्वाचा आहे.

ब्लॉग लिंकः http://saeechablog.blogspot.in/2013/10/blog-post.html

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

त्या व्यापाराकडे प्रगतीचा मार्ग म्हणून बघणार्‍या भाऊंचा मुद्धा पटवून घ्यायचा नसला तरी विचार करायला भाग पाडतो. त्याचं समर्थन करणार्‍यांची बाजू पूर्णपणे कमकुवत ठरवता येत नाही.
>> +1
छान लिहिलं आहेस.
मला हा सिनेमा जरा कंटाळवाणाच झाला होता.

पिक्चर बघितल्यावर जसं विस्कळीत वाटलं होतं तसंच लेख वाचल्यावर वाटलं .. पिक्चरचा (आणि म्हणूनच लेखाचाही) नक्की उद्देश काय हे अजूनही नीट ठरवता आलेलं नाही ..

नानाचा अभिनय फारच मस्त आहे ह्यात. खर्या अर्थानी ट्रान्स्फॉर्म झाल्यासारखा वाटला तो ह्यात. त्याची तीच पठडीतली संवादफेक न वापरता बोलायची नवीन लकब, नवीन बॉडी लँग्वेज आत्मसात करुन एकदम वेगळाच अवतार दिसला त्यात. एरवी कुठल्याही भुमिकेत नाना दिसतो ह्या भुमिकेत भाऊ दिसतात. सोनाली कुलकरणीचे काम ही एकदम मस्त. नाना आणि ती असलेले प्रसंग बघायला तर फार मजा येते. Happy

श्रद्धेच्या व्यापाराबद्दल बोलायचे तर भाऊंनी त्यांच्या बौद्धिक झेपेनुसार आणि राजकीय घडामोडींच्या प्रेशर खाली ते उत्तर देतात खरं पण एखादं गाव जागृत देवस्थान झालं की खरच त्याचा किती सर्वांगिण विकास होतो हा एक मोठा चर्चेचा विषय आहे. देवस्थान झाल्यामुळे त्या गावाला गिर्हाईक मिळतं आणि अर्थातच त्या गिर्हाईकानी दिलेल्या धंद्यायाच्या जोरावर प्रगती होईलही पण परत ती प्रगती गिर्हाईक सेंट्रिकच असते आणि एकंदरित ते गाव आणि त्यामुळे देश पुढे सरकतो ह्यावर माझा तरी आजिबात विश्वास नाही.

>> एकंदरित ते गाव आणि त्यामुळे देश पुढे सरकतो ह्यावर माझा तरी आजिबात विश्वास नाही.

बुवा, कोकणात ते एक गाव आहे दीवेआगर तिकडे ती गणपतीची मुर्ती मिळाली आणि मग अचानक टुरिझम वाढलं हे चांगलं उदाहरण आहे की ..

विकास होतो गावाचा आणि पर्यायाने देशाचा ह्यावर विश्वास का नाही? देवासारख्या एन्टिटी चा धंदा झाला म्हणून?

श्रद्धेचा व्यापार केला म्हणून मला काही वावगं वाटत नाही आजिबात. माझा मुद्दा देवस्थान झालं की विकास होतो ह्या विचारसरणीबद्दल आहे. मी वर लिहिलय तसं गिर्हाईक सेंट्रिक प्रगती होईलही थोडीफार पण ती प्रगती निश्चितच आपला देश खर्या अर्थानी प्रगत होयला वगैरे मदत होते हे मला पटत नाही. गाव जागृत देवस्थान झालं की त्याचा खरा फायदा मंदिराशी निगडीत ट्रस्ट, पुढारी ह्यांना होतो. थोडेफार "वेल्थ" बाकी विक्रेत्यांवर पण शिंपडले जाते पण त्याच्यानी कसला आलाय डोंबलाचा विकास? बर्याच विक्रेत्या लोकांच्या पिढ्यानपिढ्या शिक्षण सोडून, आयता धंदा मिळाला म्हणून तोच पुढे चालवलात. थोडक्यात ह्या प्रगती/विकासाच्या मुळाशी शैक्षणिक विकास हा मुद्दा आजिबात नसतो ज्यामुळे माझ्यामते एका लिमिटच्या पुढे ह्या गावांचा आणि आपल्या देशाचा आजिबात विकास वगैरे होत नाही.

सशल, मला वाटते, हा विकास काही काळापुरता एक उत्कर्ष बिंदू गाथतो आणि मग ..... जसं शेवटच्या काही प्रसंगात 'दत्त आमची प्रोपायटरी आहे' असं म्हणताना जाणवतं.
आणि विकास म्हणजे काय नुस्ताच पैसा का? तो महत्त्वाचाच, पण त्यामुळे भ्रष्टाचार वाढतो (काळा पैसाही), ते नको.
लोकांनी दिलेल्या देणग्या केवळ मंदीरं मोठे करण्यासाठी वापरला जातो, त्याजवळची वस्ती, ती गलिच्छ होत जाते, हा कसला विकास. यावर स्वतंत्र धागा आहेच, त्यामुळे तो मुद्दा इथे नको.
असो. लोकांचा केवळ आर्थिक विकास होणे अभिप्रेत नाही.

मला नाही वाटत की पैसा फक्त देवळे मोठी करायला वापरला जातो. कित्येक मंदिरे रोज प्रसादासाठी पूर्ण जेवण देतात. जसं की सुवर्णमंदिर आणि महाराष्ट्रात शेगाव. जिथे सगळ्या स्तरातील लोक एकच प्रसाद घेतात आणि एकाच ठिकाणी बसून खातात. सुवर्ण मंदिरात तर लंगर मध्ये कित्येक लोक विनाशुल्क काम करतात. असे लोक बघितले की मला वैयक्तिक असं वाटतं की धर्मावर आणि देवावर विश्वास न ठेवून समाजाला काहीच न देणा-या माझ्या सारख्या लोकांपेक्षा धार्मिक लोक कितीतरी जास्त चांगले आहेत.

वैद्य बुवा नानाच्या अभिनयाबद्दल +१. आणि सोनालीच्याही. पटकथा सुद्धा फार छान लिहिली आहे.

सई, अरे प्रसादाला असा किती पैसा लागतो? आणि भारतातली सगळी देवळे बघता किती देवळं प्रसाद फुकट देतात?
ह्या नवीन पोस्टीतला अख्खा मजकूर माझ्या फुल्ल डोक्यावरुन गेलाय. इथे माझाही आता सशलसारखा घोळ व्हायला लागलाय. नेमक्या उद्देशाबद्दल. श्रद्धेचा व्यापार करुन गावाचा विकास हा मुद्दा मला सरतेशेवटी जाणवला आणि म्हणूनच त्या विषयी लिहिले. आता ह्या नवीन पोस्टीत तुम्ही धार्मिक लोकांचे समाजात असलेले काँट्रिब्युशन ह्याबद्दल लिहिता आहात. आणि ते काँट्रिब्युशन पण काय तर मंदिरात विनाशुल्क काम करणे, जेवण फुकट देणे? त्यानी काय विकास होतो? सुवर्णमंदिरात विनाशुल्क काम करुन दिल्लीचा अन पुढे देशाचा काय विकास झाला? त्यापेक्षा झोपडपट्टीत मोफत शिक्षण देणार्‍या एखाद्या संस्थेत विनाशुल्क काम करुन नक्कीच जास्त विकास नाही का होणार?
धार्मिक लोकं वाईट आजिबात नाहीत पण धर्म आणि त्यापुढे देवस्थानं ह्या भोवती व्यापार वाढवून एखाद्या गावाचा नक्की काय विकास होईल हा मुद्दा महत्वाचा आहे आणि मला वाटलं तोच मुद्दा तुम्ही मांडून त्याकडे तटस्थपणे बघा असं सांगताय असा अर्थ मी घेतला. तुमची ही पोस्ट बघता तुम्ही जोडलेलं धार्मिक लोकांचे समाजाच्या काँट्रिब्युशनशी कनेकश्न हे सिनेमात भाऊंनी देऊळामुळे जर गावाचा विकास होत असेल तर काय वाईट ह्या कनेक्श्नासारखेच प्रथमदर्शनी प्रॅक्टिकल पण नीट बघता एकदम बाळबोध वाटावे असे आहे.
थोडंसं स्पष्टपणे लिहिले ह्याबद्द्ल कृपया राग मानू नये. Happy

"विकास" याची व्याख्या काय? जर देवळाबाहेर फुलांचं दुकान चालवून मुलांना शाळेत पाठवता आलं, त्यांच्या शिक्षणासाठी पैसे जोडता आले, त्यांना योग्य तो आहार देता आला, तर ज्या माणसाकडे काहीच नाही त्या माणसासाठी तो विकास नाही का? देशाचा विकास म्हणजे नक्की काय? मंदिरामुळे गावात रस्ता झाला, वीज आली तर तो विकास नाही का? आणि जे लोक आधी अंधारात राहायचे त्यांना हा "विकास" योग्य नाही हे पटेल का?
पूर्ण वेळ घरात बसून कंटाळलेली एखादी गृहिणी जेव्हा स्वत:चं छोटं दुकान चालवते, तिच्याकडे पैसा येतो, तिची नव-याला मदत होते, तिला आत्मविश्वास येतो तो विकास नाही का? त्या महिलेचा आणि एखाद्या डबे करणा-या महिलेचा "विकास" वेगळा आहे का?

मंदिरातून मिळणारा पैसा लोक भ्रष्टाचाराला वपरतात. पण हे सगळ्या व्यवसायात होतं. कारखानदार भ्रष्टाचारी नसतात का? आणि एखाद्या उपेक्षित, दुर्गम गावात कारखाना टाकणं तितकं सोपं आहे का? मध्यमवर्गीय लोकांची ९-५ नोकरी सोडली तर कुठल्या व्यवसायात भ्रष्टाचार नाही? रस्त्यावरच्या वडा पाव वाल्याला सुद्धा पोलिसाला हफ्ता द्यावा लागतो. मग देवामुळे सुरु झालेल्या टूरिझम चा गरीब लोकांना फायदा झाला तर काय बिघडलं? देवस्थानाची बाजू मी घेत नाही. मला घ्यायचीही नाही. पण त्या मधून निर्माण झालेल्या रोजगाराला तुच्छ का लेखायचं?

सुरुवातीला ते योग्यच वाटतं, पण खरा प्रश्न पुढे सुरु होते. आता आसारामही लोकांना चाम्गलाच वाटायचा ना... आणि काहींना तर तो आताही वाटतो.
शॉर्ट टर्मला याचे फायदे जास्तच दिसतील, पण पुढे लाँग टर्म हे धोकादायक आहे. Sad
असो.
हे तर पटलंच नाही की कोणाचीच मदत न करण्यापेक्षा देवळात मदत करायची. २-४ उदाहरणं सोडुन (शेगाव, सुवर्णमंदीर) बाकी काय सावळा गोंधळ आहे. इतकच असेल तर रोज फ्री जेवण शाळेत मुलांना द्या की, ते का नाही करत? आमच्याकडे (मंदिरात) या आणि मगच सगळं काही मिळेल, हा तर बिजिनेस झाला.
वर वैद्यबुआंनी म्हटल्याप्रमाणे "त्यापेक्षा झोपडपट्टीत मोफत शिक्षण देणार्‍या एखाद्या संस्थेत विनाशुल्क काम करुन नक्कीच जास्त विकास नाही का होणार?" याला १००+

मला वैद्य बुवांचं म्हणणं १०० % पटतं. पण धर्माच्या पठडीच्या बाहेर राहून आपण किती वेळा हे करतो? आणि मंदिरात जरी भ्रष्टाचार असला तरी मंदिरासाठी काम करणा-या लोकांचा विकास चुकीचा असं तुम्ही कसं म्हणू शकता? मंदिराच्या जागी रोजगार निर्माण करणारी कुठली संस्था असती तर हा विकास योग्य झाला असता? आणि नफा न घेता रोजगार कसा निर्माण होणार?

आपला रोष फक्त त्या लोकांनी घेतलेल्या शोर्ट कट वर आहे असं मला वाटतं.

आपला रोष फक्त त्या लोकांनी घेतलेल्या शोर्ट कट वर आहे असं मला वाटतं. >>>>>>> एक्झॅक्टली. हेच म्हणायचं होतं.

Happy
आणि त्या रागामागे एक अहंकार सुद्धा आहे. आम्ही शिकलो, कष्ट केले, परीक्षा दिल्या, नोक-या मिळवल्या. आणि आज हे अशिक्षित लोक देवाचा बाजार करून आपल्या पुढे जात आहेत/ आपल्याशी स्पर्धा करत आहेत ही छटा त्यात नक्कीच असते. पण देव आहे किंवा नाही इथपासूनच भांडवलाचे जिथे प्रश्न असतात, त्या व्यवसायाला प्रोत्साहन देणारे भक्त (ग्राहक) कमी झाले तरच हे कमी होइल. आणि असं होणं शक्य आहे का?

> पिक्चर बघितल्यावर जसं विस्कळीत वाटलं होतं तसंच लेख वाचल्यावर वाटलं .. पिक्चरचा (आणि म्हणूनच लेखाचाही) नक्की उद्देश काय हे अजूनही नीट ठरवता आलेलं नाही ..

पिक्चर हा एक आर्टफॉर्म आहे - त्यात नुसत्या घटना मांडून बाकी तुमच्यावर सोडता येतं. लेखात शक्यतो तसं नको. सईनं तिचं म्हणणं नंतर प्रतिसादांमध्ये मांडलं आहे.

त्या अनुशंगानी वैद्यबुवांचे म्हणणे वैध आहे (देश्मुखांचे पण).

> "विकास" याची व्याख्या काय?
हे थोडं एन्ट्रॉपी सारखं असतं. एका ठिकाणची सुव्यवस्था वाढल्या मुळे इतर ठिकाणी किती नुकसान होतं हे पहायला हवं (देशाची मालमत्ता, लोकांचा वेळ, त्यामुळे डिसप्लेस झालेली इतर उत्पादनं ई.) ते एक बंदिस्त जग असतं तर काहीच नुकसान नव्हतं. पण मानवतेचा भाग म्हणून पाहिल्यावर प्रॉडक्टिव्हिटीच्या त्या (धार्मीक उद्योग) सिन्क्स आहेत हे लक्षात येतं.

आणि कारखान्यांमध्ये भ्रष्ट आचार होतो म्हणून तसा देवळात हरकत नाही हे कुठले लॉजीक? ते लोक पुजा करण्याऐवजी अशा गोष्टींविरुद्ध निनावी पत्र का नाही लिहीत? (त्यांनी ते करायला हवे असे मुळीच नाही, पण ...)

लॉजिक नाही पण जो स्रोत रोजगार तयार करतो आहे त्यापेक्षा रोजगार तयार होतो आहे हे बघणेदेखील क्रमप्राप्त आहे. त्याला त्या स्रोताशी सतत जोडण्यात काय अर्थ आहे? उद्या याच रोजगारातून कदाचित पुढच्या पिढीला एखादा कारखानदार मिळेल. जिथे पैसा जातो तिथे तो कसा वापरला जातो यालाही महत्व आहे. आणि अशा वीज नसलेल्या आणि व्यवस्था नसलेल्या गावाकडे खरच कोणी व्यावसायिक दृष्टीने बघेल का? आणि गावातील सगळ्यांनी संधीच्या शोधत शहरात हलणे तरी कितपत योग्य आहे?

'स्वच्छता' या एका निकषावर देवळामुळे गावाचा विकास झाला, हा निष्कर्ष काढणं चूक आहे. मंदिरात काम करणारे 'सेवाधारी' असतात. वर्षाचं धान्य आणि दोन जोडी कपडे त्यांना मिळतात. पगारी चाकर थोडके. त्यांचा पगारही थोडका. मिळणार्‍या देणग्यांमधून अगोदर संगमरवरी मंदिरं आणि एंटरटेनमेंट पार्क बांधले जातात. अन्नछत्राचा खर्च त्या तुलनेत नगण्य असतो. आदिवासी आश्रमशाळा बंद केली जाते. श्रीमंत भक्तांनी दिलेल्या कोट्यवधी रुपयांच्या देणग्यांतून तिथे इस्पितळ बांधा, आंही फुकट सेवा देतो, असं डॉक्टर सांगत राहतात. मग मंदिर 'तुम्ही औषधोपचार करून या, आम्ही अर्धा खर्च देऊ' अशी जिल्ह्यातल्या खेड्यात योजना सुरू करतं. मग खोटी बिलं तयार केली जातात. दहा टक्क्यांचा व्यापार सुरू होतो. गावातले रस्ते गलिच्छ. शाळांमध्ये प्यायला पाणी नाही. नाल्या उघड्या. इंजीनियरिंग कॉलेजाची व्यायामशाळा मात्र संगमरवरी. पण यामुळे स्वच्छतेचं महत्त्व मात्र पटतं.

विजय देशमुख +१.
नुसता पैसा खेळू लागला . काही सुविधा आल्या म्हणजे विकास झाला असे म्हणायचे का? इथे मला ते वादग्रस्त 'मानसिक स्थिती' हे शब्द आठवले.
असा येणारा पैसा हेच त्यांचे ध्येय राहणार आहे की ते साधन म्हणून वापरले जाणार आहे?
देऊळ चित्रपटातल्या गावात पर्यटकांमुळे, आलेल्या पैशामुळे वीज, रस्ते आले.(पण सगळीकडे ते येतातच असे नाही आणि त्यामुळे असे पर्यटक यायचे थांबतात असेही नाही). ते यावेत म्हणून देऊळ व्हायच्या आधीही काही हालचाली चालू होत्या ना? (चित्रपटातले सगळे तपशील स्पष्टपणे आठवत नाहीत.)
अलीकडेच आनंद यादव यांचा एक लेख वाचला. गावच्या संस्कृतीबद्दल. पंढरपूरची संस्कृती वारी आणि विठ्ठल यांना केंद्र करून आहे. पण वारी नसते तेव्हा तिथे काहीच नसते....

सई, मला वाटतय की थोडीशी गल्लत होतेय की काय, म्हणुन जरा विस्तारानं लिहितो.
मंदिरात पैसा देणे हे चुकिचं आहे, असं मुळीच नाही, पण तो पैसा कसा वापरल्या जातो, हे अधिक महत्त्वाचं आहे. आपल्यासारख्यांच्या १००-२०० रुपयांच्या पावत्यांचा काही problem नाही (नसावा), पण कोणी सोन्याचं कडं, चांदीचं काहीतरी दानपेटीत टाकतं, तेही निनावी, ते का म्हणुन? त्या आलेल्या काळ्या पैशाचा प्रश्न आहे आणि मागे जसं एक उदाहरण म्हणुन पंढरपुरच्या विठठल मंदिरात चालेलेल्या भ्रष्टाचाराची (आणी न केलेल्या ऑडीटींगची) लिंक दिली होती, त्याची चीड आहे.
स्वतः भ्रष्टाचार न करणे, ही एक देशसेवाच म्हणावी असं मला वाटते. त्यामुळे भ्रष्टाचाराला support न करणे हेही उत्तमच. त्यानुसार देवळात निधी न देणे (आणि वाटल्यास इतर कुठेही न देणे, जसे वर शाळांना निधी देणे म्हटलय, तसं), हेसुद्धा माझ्यामते योग्यच.
चुकिच्या गोष्टीला विरोध करताना, तुम्ही काय योग्य/ चांगलं करताय का? नाही ना मग शांत बसा, हे मला नाही पटत. असो.
माझ्याकडे दरवर्षी देणगीसाठी मंदिराचे लोकं यायचे. मी त्यांना म्हटलं, स्पर्धा-परिक्षेच्या पुस्तकांसाठी आणि त्याच्या वाचनालयासाठी तुमच्या मंदिरात जागा द्या, मी १ लाख रुपयांची पुस्तके देईन (त्यावेळी होतेही) आणि गरज पडली तर अजुन पैसे उभे करेन. पण नाही.... शेवटी देव केवळ आपल्या प्रयत्नांना लागणार्‍या मानसिक/ आत्मिक मदतीचे नाव आहे, हे कळलं की सगळं सोपं होतं. नाहीतर त्याचा बाजार करुन आपल्याला फिरवणारे कमी नाहीत.
अवांतर :- मी नास्तिक नाही, देवळातही जातो, मात्र कोणतीही देणगी देत नाही. अगदी फुलं पानंही विकत घेत नाही. असो.

मी मंदिरात पैसे देण्याचं समर्थन करतच नाहीये. मी मंदिराबाहेर तयार झालेल्या रोजगाराबद्द्ल बोलते आहे जो मंदिरामुळे झाला. जो मंदिराच्या व्यवस्थेच्या बाहेर आहे. आणि जो फक्त मंदिर आल्यामुळे तयार झाला. असा रोजगार सगळ्या पर्यटन स्थळी तयार होतो. कित्येक ठिकाणी लोक आपल्या घरातील काही खोल्या भक्तांना राहायला देतात. असं कोकणात खूप ठिकाणी आहे. त्याबरोबर जेवण सुद्धा करतात. असा रोजगार त्या गावात दुस-या कुठल्या कारणाने येणार? आणि हा रोजगार म्हणजे विकास नाही का? फक्त देव धर्मामुळे झालाय म्हणून त्याला कमी लेखायचं का?

सईचा मुद्दा पडताळण्यासाठी गणपतीपुळे आणि सशलने लिहिलेले दिवे आगर ह्या दोन्ही गावी जावं. ती गावं बदलली आहेत. घराघरात रोजगार रिलिजस टुरिझममुळे उपलद्ध झाला आहे.

तिरूपती गावात (खाली) देखील गावचा विकास मंदीरामुळेच इतका आहे की तिथे एअरपोर्ट पण आहे. देवस्थान प्रसिद्ध झाली की मंदिराबरोबरच गावकर्‍यांचाही थोडाफार विकास होतोच. हा सईचा मुद्दा आहे.

भ्रष्ट्राचार आहेच, तो इतर ठिकाणीही असतो. साखर कारखान्यात आणि सहकारी संस्थांमध्ये जास्त असतो. मग केवळ मंदीरानेच काय घोडे मारलेय? हा तिचा मुळ प्रश्न आहे. एकदा का भ्रष्ट्राचार आहे हे मान्य असेल तर तो कुठे आहे? ह्यानी काही फरक पडू नये.

देशाचा आर्थिक विकास आणि मंदीर वगैरेचां संबंध लावता येणार नाही. आपली विकासाची व्याख्या काय? ह्यावर खरे उत्तर थांबेल. ज्या गावात वीजच नसेल आणि केवळ तिथे दत्त मंदिर निर्माण होऊन वीज, पर्यायी सोयी सुविधा आणि गावाला जोडणारा टार रोड जरी आला तर मला त्या दत्त टूरिझमचे अजिबात वाईट वाटणार नाही. जोडच लावायची तर प्रसिद्ध मंदीर = टुरिझम = चांगला रस्ता = एखाद्या व्यक्तीला अ‍ॅम्बुलंसने लवकर दवाखान्यात (जिल्ह्याच्या ठिकाणी) जाता येणे अशी लावा. फरक कळेल. (तिरूपती, शेगाव, अक्कलकोट, मंत्रालय, गाणगापूर, अमृतसर, गणपतीपुळे ही काही ठळक उदाहरण. जीथे ह्या सोयी आहेत. ती देवस्थान नसली असती तर कदाचित फक्त गावेच राहिली असती.)

आता तो रस्ता मंदीर टुरिझम नसतानाही करता आला असता. प्रत्यक्ष महाराष्ट्रात हजारो गावात अजूनही नीट रोड नाहीत. ते का नाहीत? मग ही पर्यायी व्यवस्था गावकरीच बाजार लावूनही करून घेत असतील तर निदान ह्या क्षणाला मलाही चालेल.

श्रद्धेचा बाजार किंवा मंदीरातून भ्रष्ट्राचार ह्यापेक्षा टुरिझमच्या व्याखेतून विकास बघा, फरक जाणवेल.

असा विकास व्हायला हवा का? हे योग्य आहे का? हा प्रश्न वेगळा आहे. कारण सध्या विकासच नाही, तर चांगला विकास कश्यानेही चालेल हे उत्तर असू शकते असे आताशा मला वाटायला लागले आहे. कदाचित हे वाटने चुकीचेही असेल. नव्हे आहे. पण त्यामुळे प्रश्न सुटतो का?

ज्याला खरे उत्तर माहिती आहे तो दिलिप प्रभावळकर निघून जातो आणि नाना ज्याला हे सर्व व्यापार आहे हे मान्य आहे तो स्वतःच्या भल्यासाठी आणि पर्यायाने गावकर्‍यांच्या भल्यासाठीही हा व्यापार मांडतो. कुणाची चॉईस चांगली हा प्रश्नच मुळी वादाचा आहे. जो लेखाचा मुद्दा आहे.

कुणाची चॉईस चांगली हा प्रश्नच मुळी वादाचा आहे. जो लेखाचा मुद्दा आहे.>>> बरोबर आहे आणि मी मंदिर हा चॉईस चांगला का नाही वाटत त्याबद्दल लिहित आहे.

सई, मी मंदिरामुळे तयार होणार्‍या रोजगाराला कमी लेखत नाहीये. काही लोकांच्या रोजगाराची सोय झाली हे चांगलच आहे आणि येवढं म्हणून थांबायचे असेल तर ठीक आहे आणि तीच तुमची विकासाची व्यख्या असेल तर ते ही ठीक आहे तुमच्या परीनी. केदार म्हणतोय तसं सध्या विकासच नाही तर त्यामानानी हे काय वाईट आहे हे मला समजतं पण पटतं असं म्हणणार नाही. का नाही पटत हे पण मी लिहिलय. माझी विकासाच्या व्याख्या वेगळी आहे असं म्हणून मी आवरतं घेतो.

अहंकाराविषयी म्हणाल तर मी स्वतः शिकत होतो तेव्हा कदाचित मला वाटून ही गेलं असेल तसं (की काय आपल्या शिकायचा फायदा वगैरे) पण आता जेव्हा मी शिकून पुढे नोकरी करत आहे आणि त्याहीपेक्षा शिक्षण मिळाल्यामुळे माझ्या ज्या काय बरोबर आहे आणि काय चूक ह्याच्या व्याख्या तयार झाल्या, एक बौद्धिक कुवत तयार झाली ती बघता आता मला धार्मिक किंवा कुठल्याही शिक्षणाच्या बळावर न बेतलेल्या बाजारात लोकं जास्त पैसे कमवत असतील त्याबद्दल त्यांचा किंचित सुद्धा हेवा वाटत नाही.

अशी चर्चा कोणत्याही टूरिझम बद्दल करता येइल. रिलिजस टूरिझम, टेरर टूरिझम, योगा टूरिझम, नेचर टूरिझम. प्रोज आणि कॉन्स आहेतच.
पूर्वी त्या कासच्या पठाराबद्दल कोणाला काहिही माहिती नव्हती. फार थोडे लोक जायचे आणि निसर्गाचा आनंद मनमुराद घेउ शकायचे. नुकताच तिथली गर्दी आणि बाकीच्या त्रासाविषयी इथेच एक लेख वाचला.
जितकं त्या ठिकाणच महत्व वाढणार (कास्/देवळाचं गाव) तितका तिथल्या लोकांचा वैयक्तिक आर्थिक विकास होणार(चहच्या वडापावाच्या गाड्या किंवा फुलं/खण्/नारळाच्या गाड्या) पण पर्यावरणाचा र्‍हास होणार. फक्त देउळ सेंट्रिक टूरिझम मुळे दूरगामी परिणाम म्हणजे मनाचा कमकुवत पणा किंवा पॉसिबली अंधश्रद्धा वाढणे. देवळामुळे आपला रोजगार आहे हे त्या दुकानदारांना समजून धंदेवाइकपणे देवळाच्या/तिथल्या देवाच्या जागृतपणा विषयी समजपसरवणे प्रोपोगंडा करणे हे धंदा करणार्‍याकडून होणरच की.

शिवाय देवळात जाणारी लोकं काही आपल्या देणग्यांद्वरे गावाचा विकास करावा ह्या हेतूने जात नाहीत. वैयक्तिक स्वार्थासाठी जातात. देवळाबाहेरची दुकान ही व्यवस्थेचा भाग नाही म्हणून कसं चालेल? देउळ नाही तर दुकानं पण नाहीत. ती तर त्या व्यवस्थेचा भागच आहेत माझ्या मते.

केवळ आपण देवळात जात नाही म्हणून आपण समाजोपयोगी नाही असं निस्चितच नाही सई. तू हा लेख लिहिलास, ही चर्चा घडून येते आहे, ती लोक वाचत आहेत आणि आपणच तर समाज आहोत ना? समाजाला विचारांचं योगदान पण तितकच महत्वाचं असतं माझ्या मते.

केवळ आपण देवळात जात नाही म्हणून आपण समाजोपयोगी नाही असं निस्चितच नाही सई. तू हा लेख लिहिलास, ही चर्चा घडून येते आहे, ती लोक वाचत आहेत आणि आपणच तर समाज आहोत ना? समाजाला विचारांचं योगदान पण तितकच महत्वाचं असतं माझ्या मते.>>>> शुम्पी +१

वैद्यबुआ अगदी मनातलं लिहिलत. मला हेच लिहायचं होतं. आर्थिक विकास गरजेचा आहेच, पण म्हणुन नुस्ताच आर्थिक विकास झाला तर त्याच मानसिकतेचे फक्त श्रीमंत लोकं, असा समाज निर्माण होईल. बाकी ठीकाणी भ्रष्टाचार आहे, हे मान्य, पण तिथे कामही करावं लागतच की. देवळाबाहेरच्या दुकानात अक्षरशः लुट असते, ते कसं नाकारता येईल? मुद्दा शेवटी तोच आहे, की मानसिकतेचा विकास न होता आर्थिक विकास झाला, तर हे अपरिहार्य होईल. पैसा गुजरातमधेही आहे आणि उप्र/बिहारातही, पण गुजरातेत भाईगिरी/गुंडगिरी त्यामानाने कमी आहे. नवी मुंबईत रिक्षावाल्यांची दंडेली का आहे? कारण एकच अचानक खुप पैसा हातात आला आणि त्याने डोके फिरले. सरसकट सगळीकडे नसले, तरी एक उदाहरण लालबागच्या राजाचे दिसले आहेच.
शिक्षणाने माणुस (किमान ५०% तरी) सुसंस्कृत होतो, जे देऊळ, जमीनीला अचानक मिळालेला भाव, इत्यादी मार्गाने होऊ शकत नाही/ होईल याची खात्रीच नाही.
अगदी काहीच नाही, तरी किमान देवळाचा (आणी तिथल्या दुकानाचाही) परिसर स्वच्छ ठेवावा हीदेखील जाणीव, हे लोकं ठेवत नाही, मग बाकीचं तर सोडाच. आणि अश्या अनेक लोकांना प्रत्यक्ष/ अप्रत्यक्ष मदत करणारे आपण भाविकच ना?

असला विकास म्हणजे कोणतातरी एक तो रोग वाटतो, ज्यात पोटाचा नगारा अन हातापायाच्या काड्या होतात. वजन उंचीनुसार अगदी बरोबर, पण कुपोषित Sad

असला विकास म्हणजे कोणतातरी एक तो रोग वाटतो, ज्यात पोटाचा नगारा अन हातापायाच्या काड्या होतात. वजन उंचीनुसार अगदी बरोबर, पण कुपोषित>>> वेगळीच उपमा आहे ही. Happy

शुम्पी बरी आठवण करुन दिलीस. धार्मिक लोकांच्या तुलनेत आपण काहीच करत नाही किंवा समाजाला देत नाही ह्याबद्दल लिहायचं राहिलं. धार्मिक लोकांच्या हातून काही चांगली कामं पण होत असतील पण ती बघून मला त्यापुढे आपण फार कमी पडतोय असं काही वाटत नाही. हे मी मला धार्मिक लोकांचा राग आहे म्हणून नाही पण त्यांचे काँट्रिब्युशन मला इतकं मोलाचं किंवा स्पेशल वाटत नाही, त्यामुळे म्हणतोय.
इतर काही लोकं आहेत ज्यांचे काँट्रिब्युशन मात्र फार मोलाचे वाटते आणि त्यांचा हेवा ही वाटतो कारण ही लोकं खुप सातत्याने समाजसेवा करतात किंवा काहींनी तर समाजसेवा हे स्वतःच्या जीवनाचे ध्येय बनवले आहे. असं समाजाकार्यात स्वतःला झोकून द्यायची अजून तरी हिंमत झाली नाही आणि पुढेही होईल की नाही माहित नाही त्यामुळे मी सतत स्वतःला त्यांच्यापेक्षा कमीच समजत राहेन.
परत ही लोकं धार्मिक असली तर? असाही मुद्दा निघेल पण आपण ज्या लोकांबद्दल चर्चा करत आहोत ते सामान्य धार्मिक लोक ,देऊळ सिनेमा मध्ये दाखवली आहेत तशी किंवा आपल्या आजूबाजूला दिसतात ती देव धर्म करणारी, मंदिरात जाणारी जनता आहे हे लक्षात घ्यावे.

केदार, माझे मुद्दे मांडल्याबद्दल धन्यवाद. Happy
दिलीप प्रभावळकर गाव सोडून निघून जतात. का? कारण त्यांना जायला ठिकाण असतं. आपले तात्विक मतभेद होण्यासाठी सुद्धा काही मूलभूत गरजा पूर्ण व्हाव्या लागतात. त्या झाल्या की मनाचा, समाजाचा विकास तुम्ही म्हणता त्या दिशेने होतो. जिथे लोक विकास कशामुळे झाला हा विचार करू शकतील. आणि तसा विवेक येण्यासाठी शिक्षणाची गरज आहे (ते घेतल्यानी तो येइलच असं नाही. पण शक्यता वाढेल), समाजातही आणि नेत्यांमध्ये सुद्धा. दिलीप प्रभावळकर सारखे लोक नेते का होत नाहीत?

<कारण सध्या विकासच नाही, तर चांगला विकास कश्यानेही चालेल हे उत्तर असू शकते असे आताशा मला वाटायला लागले आहे> हे एक सोपे आणि फार वाईट जनरलायझेशन आहे.

आमच्या कोकणातल्या गावी मी शाळेत असताना गेलो होतो. तेव्हा गावापर्यंत थेट एसटी जाण्यासारखा रस्ता नव्हता. शेजारच्या मुख्य गावात उतरून मध्यरात्रीनंतर दीड-दोन मैल सामान घेऊन चालत आम्ही घरी गेलो. गावातल्या घरात त्यावेळी एकच बल्ब होता, जो पडवीवर टांगलेला असे. आज त्याच गावातले लोक वाहनाशिवाय फिरत नाहीत. माझ्या चुलतभावाकडे वॉशिंग मशीन आहे. शेतीए, बागायत, सुंभ व़ळणे हे त्यांचे उत्पन्नाचे मुख्य स्त्रोत नाहीत, तर व्यापार हा आहे.

(अनेक गावांत यातले काही पोचलेले नाही, हे कबूल. पण सध्या विकासच नाही असे म्हणणेही चूक आहे.)

तरीही गावातले (म्हणजे गावात राहणारे, पण त्याहीपेक्षा जास्त मुंबईतले गाववाले) लोक देवळे बांधायच्या , जीर्णोद्धार करायच्या, ते झाले की देवीला सोन्याचे दागिने करायच्या योजना आखत असतात. पण आमचे गाव पर्यटनक्षेत्र/तीर्थक्षेत्र नाही. तर्थाटन करायला आजही मुंबईतले चाकरमानीच तिथे जातात.

<मंदिराच्या जागी रोजगार निर्माण करणारी कुठली संस्था असती तर हा विकास योग्य झाला असता? आणि नफा न घेता रोजगार कसा निर्माण होणार? >

अनेक संस्था अशी कामे करत आहेत. महिला बचत गट, नीलिमा मिश्रा ही चटकन आठवणारी उदाहरणे. त्यांना प्रचंड झगडावे लागतेय. विरोधही सहन करावा लागतोय. देवाच्य नावावर काहीही करणे सोपे आहे, हे खरे.

इतेह विकास अणि देऊळ हे मुद्दे आहेत म्हणून लिहितोय.
माझ्या वडिलांनी काही दशकांपूर्वी मुंबईतल्या गाववाल्यांना एकत्र करून ग्रामोन्नती संघ स्थापन केला. तेव्हा आण्यांमध्ये वर्गणी जमा होत असे. त्या संस्थेच्या बैठकीची इतिवृत्ते, इ. आमच्याकडेच होती म्हणून मी वाचली. त्यातून त्यांना फार काही साध्य करता आले नाही. अगदी जमा केलेला पैसा शाळेला नकाशा देणे,इ. कामांवर खर्च झाला.
पुढे ती संस्था विसर्जित करून गावातील देवीच्या मंदिराची जीर्णोद्धार समिती स्थापन झाली. ग्रामोन्नती संस्थेकडे शिल्लक असलेला पैसा तिकडे वळला. पहिल्या दोन देवळांच्या जीर्णोद्धारालाही अनेक वर्षे लागली. नंतर गावातून मुंबईत आलेल्या लोकांची दुसरी पिढी तयार झाली. आर्थिक सुबत्ता दोन्हीकडे आली. आत तर जीर्णोद्धाराचा सपाटा चालू आहे. पण यातही सामाजिक विकास(सामाजिक विषमता दूर होण्याच्या दृष्टीने) झालेला नाही.

देवाच्य नावावर काहीही करणे सोपे आहे, हे खरे. >>>> भरत अनुमोदन. याचं कारण म्हणजे हजारो वर्षांची बनलेली मानसिकता.
किमान गरजा पुर्ण करण्यासाठी पैसा वापरला जावा, हे कोणीच लक्षात घेत नाही. काय करणार एकेक वेड म्हणावं लागेल. Sad

Pages