अस्वस्थ करणारी : अनुमती

Submitted by अंकुरादित्य on 15 September, 2013 - 11:34

जुन्या तुळशी वृंदावनात ठेवलेली आशेची नवी वात . . . वात विझवायला कोसळणारा पाऊस . . सोसाट्याचा वारा . . निसर्गापुढे वाकलेली तुळस . . विजांचा खेळ पहात झुलणारा एक झोका . . आशेतून निराशेत अन निराशेतून आशेत झोक्यासह हेलकावणारे मन . . दिव्याच्या अस्तित्वात आपले अस्तित्व हुडकणारे दोन डोळे . . . पावसासोबतच बरसणारे . . वाऱ्यासह भिरभिरणारे . . विजांसह कडाडणारे . . अस्तित्वाच्या संघर्षात वातीची साथ देणारे . . अनंत भावना आपल्यात सामाऊन समाजाला प्रश्न विचारणारे . . अन सिनेमा संपल्यावरही माझी साथसोडायची 'अनुमती ' न देणारे . . . ! माणूस 'जगवण्यासाठी ' माणसाने केलेला प्रवास , संवेदनांना पाझर फोडणारा , आयुष्याची दोरी पैशाच्या वेठीला बांधले आहे हे वास्तव समोर आणणारा , एखादी व्यक्ती हवी असणे यासाठीची धडपड अन गरज प्रत्येकाची वेगळी असते याची अनुभूती देणारा चित्रपट म्हणजे गजेंद्र अहिरे यांचा 'अनुमती ' . . . !!

हा प्रवास आहे हतबलतेचा . . निवृत्त सामान्य माणूस रत्नाकर पठारे (विक्रम गोखले ) याचा . . . अमेरिकेला जात असताना अचानक मेंदूतील रक्तस्त्रावा (ब्रेन हेमरेज ) अंथरुणाला खिळलेली बायको मधु (नीना कुलकर्णी ) हिला वाचवण्याचा . . ! स्वतःची बायको वाचवण्याची धडपड अन दोन संवादामाधल्या शांततेने केलेली बडबड . .मधूला सर्वोत्तम उपचार मिळावेत म्हणून शक्य त्या ठिकाणी शक्य तितके पैसे जमवण्या साठी हेलपाटे घालणारा रत्नाकर यांच्याभोवती हा सिनेमा फिरतो . . ! DNR (Do Not Resuscitate ) फॉर्म वर सही करून स्वतःची अन संपलेल्या पैशाची ओढाताण संपवा असा सल्ला मुलगा (सुबोध भावे ) देतो . तो सल्ला नाकारून पैशासाठी कोकणातले आपले घर विकण्याचा प्रयत्न , मुलीकडून मदत , भावासोबत केलेली तडजोड अन शेवटी हतबलतेने फॉर्मवर केलेली सही अन संपलेला प्रवास म्हणजे अनुमती . . ! मैत्रीण अंबू (रीमा लागू ) सोबतचे रत्नाकर चे संवाद अन त्याच्या हसण्यातील वेदना मनाला घरे पाडते

. . . माणूस महत्वाचा की पैसा हा प्रश्न विचारात अनेक पिढ्या मोठ्या झाल्या . . अंतिम क्षणी माणसानीच पैसा पुरवल्याने काही वाढीव महिने जगल्या अन संपल्या . . माणूस हवा असताना पैसा नसेल तर काय करावे ? या प्रश्नावर अनुमती विचार करायला लावतो . . आई वडिलांची 'जबाबदारी ' नाकारणाऱ्या तरुण पिढीचे चित्र रत्नाकरच्या प्रवासातून अन अम्बुच्या संवादातून समोर येते . . योग्य जागी आठवणींचे कोलाज जोडल्यामुळे सिनेमा भावनांना हात घालतो . . रत्नाकर सह रडवतो . शेवट माहित असूनही शेवटपर्यंत बांधून ठेवतो . हृदयस्पर्शी संवाद हे या सिनेमाचे वैशिष्ट्य आहे . . अलंकारिक भाषा टाळून कमी लांबीचे अधिक खोली असलेले संवाद कलात्मकतेने सदर केल्याने रत्नाकरचे दुक्ख , हतबलता , अगतिकता , राग , असहाय्यता मनाच्या पलीकडे कोठेतरी जाऊन पोहोचते . . . तिथून अस्वस्थ करत रहाते . दवाखान्यांची उकळेगिरी , विमा कंपन्यांचा बिनकामाचा आधार , सामाजिक संस्थांची हरवलेली सामाजिक दृष्टी यावर अनुमती मार्मिक भाष्य करतो . रत्नाकरचे ' समाजसेवा मोजायला काही फुटपट्ट्या आहेत का ? ' हा संवाद मनात घर करून राहतो . . संवादाचा गरजेपुरता वापर करून शांततेला अधिक बोलायला लावल्या मुळे दर्शक केवळ ऐकत नाही तर विचार करायला लागतो . . आपल्या घरातले , आजूबाजूला पाहिलेले रत्नाकर आठवू लागतो . .

अभिनय म्हणजे काय किंवा अभिनय कशाशी खातात असा ज्यांना प्रश्न पडत असेल त्यांनी अनुमती मधले विक्रम गोखले यांचा अभिनय पहावा . . चेहेऱ्यावर रंग लावला म्हणून कोणी प्रसंग रंगवू शकत नाही , वय झाले म्हणून अभिनय वयस्कर होत नाही याचा प्रत्यय विक्रम यांचा अभिनय पाहून येतो . अभिनय सोडून बाकी सर्व सुधारण्यासाठी तडफडणाऱ्या कलाकार मंडळीनी वेळात वेळ काढून विक्रम गोखले नामक अभिनेत्याचा अभिनय जरूर पहावा . . विक्रम यांनी टाकलेले ' असतील तितके किंवा जमेल तितके (पैसे ) द्या ' वाक्य मला दूर कोठेतरी नेउन टाकते . . रीमा लागू , सई ताम्हनकर , सुबोध भावे , सौमित्र यांचा अभिनय उत्तम . सिनेफोटोग्राफी , संवाद आणि संगीत यांनी सिनेमा वेगळ्याच उंचीवर नेउन ठेवला आहे . श्रीवर्धन चे सुंदर चित्रण पहायला मिळते . .
' तू मरत आहेस त्याचे दुक्ख नाही तर मी तुला वाचवू शकत नाही याचे दुक्ख आहे ' या आशयाचा विक्रम गोखले यांचा संवाद थोपवलेल्या अश्रुना मुक्त करतो . . खिशात असलेला पैसा माणसाचे आयुष्य ठरवतो . म्हातारपणी जगू म्हणून शिलकीत ठेवलेले तारुण्य जगायची उमेद देते पण विकतचा एक श्वास द्यायचे नाकारते . . जमवलेले अन कमवलेले संचित बघ्याची भूमिका स्वीकारते . . माणसाचे आयुष्य हतबलतेने केलेली एक स्वाक्षरी ठरवते . . अनेक दिवस बाळगलेली आशा एकदिवस मावळते अन कानावर शब्द पडू लागतात . . ' वाट संपली तरी मी चालत आहे ' . .

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अगदी सुन्न करून सोडणारा सिनेमा. Sad
सिनेमा संपल्यावरही बराच काळ मनात विविध विचारांचे काहूर उठवून गेला. Sad

जबर्‍या चित्रपट !
गोखले यांनी अभिनीत केलेली अगतिकता मनाला भिडली ..

सुरुवातीली कंमेंटस टाकत टीपी करत होतो ..पण शेवटी डोळे पाणावले ..

अशक्य सुंदर लेख …. एखादे काव्य वाचल्याचा भास झाला. शेवटचा परिच्छेद फारच भिडला आणि खरे सांगायचे तर सिनेमा पेक्षा मला हा लेखच जास्त आवडला.
सिनेमा देखील चांगला आहेच पण अजून प्रभावी होऊ शकला असता असे मला वाटते. सततचे ट्रेनचे लॉंग शॉट्स कंटाळा आणतात. शिवाय भुसावळ, श्रीवर्धन, मुंबई, सिन्नर, पुणे दरम्यानच्या लांब लांबच्या प्रवासानंतरही कॅलेंडरच्या तारखा फार निवांत पुढे पुढे सरकल्या सारख्या वाटतात.
असो, तरीही विक्रम गोखलेंच्या वर्णनातीत अभिनयासाठी हा पाहायलाच हवा
अभिनय सोडून बाकी सर्व सुधारण्यासाठी तडफडणाऱ्या कलाकार मंडळीनी वेळात वेळ काढून विक्रम गोखले नामक अभिनेत्याचा अभिनय जरूर पहावा >>>> अगदी अगदी … एकेक संवादातून हा माणूस पार हलवून टाकतो.

अशक्य सुंदर लेख …. एखादे काव्य वाचल्याचा भास झाला. शेवटचा परिच्छेद फारच भिडला आणि खरे सांगायचे तर सिनेमा पेक्षा मला हा लेखच जास्त आवडला.>> अनुमोदन

कालच हा सिनेमा बघितला.
काही गोष्टी पटल्या नाहीत.
१. जे जोडपे अमेरिकेच्या प्रवासाला निघाले आहे, त्यांना ४-५ लाख रुपये जमवाजमव करुन आणावे लागतात.
२. कोकणातल्या घराला विकल्यास ४-५ लाख रुपये पण येणार नाहीत.
३. काही संवाद आक्रस्ताळी आहेत्..उदा. म्हातार्या माणसांनी जगूच नये का, तुझे मरण ठरवायची जबाबदारी माझीच का? वगैरे..
केवळ अती भावनीक संवाद आणि अती सोपे, सरधोपट प्रसंग यानी बनलेला सिनेमा हा लेखक व दिग्दर्शक या दोघांनीही कमीत कमी कष्टामधे काढला असावा असे वाटते.

खूप सुंदर लेख.
>> अभिनय सोडून बाकी सर्व सुधारण्यासाठी तडफडणाऱ्या कलाकार मंडळीनी वेळात वेळ काढून विक्रम गोखले नामक अभिनेत्याचा अभिनय जरूर पहावा >>>> अगदी अगदी … एकेक संवादातून हा माणूस पार हलवून टाकतो. >>>>> प्रचंड अनुमोदन

२. कोकणातल्या घराला विकल्यास ४-५ लाख रुपये पण येणार नाहीत.>>>>> कमीतकमी एक लाख प्रति गुंठा हा भाव आहे तिथला.जाउ दे. अवांतर झालंय!

केवळ अती भावनीक संवाद आणि अती सोपे, सरधोपट प्रसंग यानी बनलेला सिनेमा हा लेखक व दिग्दर्शक या दोघांनीही कमीत कमी कष्टामधे काढला असावा असे वाटते.+१११११११

चित्रपट अजुन बघितला नाही. पण
<<<केवळ अती भावनीक संवाद आणि अती सोपे, सरधोपट प्रसंग यानी बनलेला सिनेमा>>>> हे मेलोड्रामिक चित्रपट बघितल्याचा परिणाम तर नाही ना?

अजून पाहिला नाहीये - पण इथे (परीक्षण व प्रतिसाद पहाता) तर या चित्रपटाविषयी खूपच परस्पर विरोधी सूर दिसताहेत !!!

खूप सुंदर चित्रपट पण तितकाच सुन्न करणारा.. अभिनयातल फारसं काही कळत नाही मला, पण विक्रम गोखलेंची भूमिका, त्यांचे संवाद पाहून टचकन डोळ्यांत पाणीच आलं... खूप खूप सुंदर.. गजेंद्र अहिरे आणि सर्व टीमचे मन:पूर्वक अभिनंदन