करंजी .......... गोड : मानुषी

Submitted by मानुषी on 17 September, 2013 - 00:56
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

करंजीच्या पारीसाठी साहित्य: दीड वाटी मैदा, १ चमचा तेल मोहनासाठी, चिमूटभर मीठ, १ चांगलं पिकलेलं केळं.
सारणाचं साहित्य: १ कणीस(स्वीट कॉर्न), पनीरचा साधारणपणे अर्धी वाटी कीस, ३/४ चमचे साखर, ७/८ बदाम, ७/८ काजू. ५/६ वेलदोडे, तळणीसाठी तूप.

क्रमवार पाककृती: 

कृती: एका कुंड्यात दीड वाटी मैदा, १ चमचा तेल, चिमूटभर मीठ घ्या. त्याच्यातच १ चांगलं पिकलेलं केळं कुस्करून घाला. या मिश्रणचा छान मळून गोळा करून घ्या. झाकून फ़्रिजमध्ये ठेवा. या प्रमाणात जिन्नस घेतले तर गोळा मळण्यासाठी पाणी लागत नाही.
आता सारणासाठी एक स्वीट कॉर्न किसून घ्या. त्याचा सेमी लिक्विड असा कीस मिळेल. आता एखाद्या मायक्रोवेव्ह सेफ़ प्लेट/बोल मध्ये हा सेमी लिक्विड कीस घेऊन तो साधारण पणे दीड मिनिटे मायक्रोवेव्ह करा. तो शिजतो व आळून येतो.

किसलेले स्वीट कॉर्न व किसलेले पनीर

केळं व मैद्याचा तयार गोळा व तयार सारण

आता एका कढईत अर्धा (छोटा)चमचा तूप घ्या. त्यात हा आळलेला स्वीट कॉर्नचा कीस, पनीरचा कीस आणि ३/४ चमचे साखर घाला. गॅस पेटवून हे मिश्रण खालपासून चांगलं ढवळत शिजवून घ्या. पाच एक मिनिटात हे सारण शिजेल. मग यात काजू, बदाम आणि वेलदोडे यांची एकत्रित केलेली पूड मिक्स करा. चांगलं ढवळून गॅस बंद करा.
हे सारण थंड होऊ द्यावे.
मग फ़्रिजमधला केळं घातलेला मैद्याचा गोळा बाहेर काढा.

याचे साधारणपणे १० ते १२ छोटे गोळे होतील. म्हणजेच या सामग्रीत १० ते १२ करंज्या होतील.
आता हे गोळे मध्यम जाडीचे लाटून त्यात एक चमचा सारण घालून, बोटाने दाबून करंजीचे तोंड बंद करावे. कातण्याने कड काढून टाकावी.

आता गॅसवर कढई ठेवा. त्यात एक मोठा डाव तूप घाला. ते मध्यम आचेवर असताना त्यात २/२ करंज्या तळून काढा. आपण मुद्दामच खूप तूप घेतलेलं नाही. म्हणून तळताना झाऱ्याने करंज्यावर तूप उडवत या करंज्या तळाव्यात. म्हणजे त्या फ़ुगतात व खुसखुशीत होतात. साधारणपणे गुलबट् रंगावर तळून घ्याव्यात.
याच्या पारीच्या पिठात घातलेल्या एकाच केळ्याने करंजी खाताना छानपैकी केळ्याचा स्वाद जाणवतो.

आणि अश्या निघालेल्या कडांची शेवटी एक मुरडीची करंजी करावी.
तळणीला एकच मोठा डाव तूप घ्यावे. व झाऱ्याने तूप करंजीवर उडवत करंजी तळावी. म्हणजे एवढ्या तुपात सगळ्या करंज्या तळून होतात.
या करंज्या तेलात तळल्यास ती चव येणार नाही जी तुपात तळल्यास येते.

वाढणी/प्रमाण: 
तेच ते......कोण किती खाईल त्यावर!
अधिक टिपा: 

या करंज्या तेलात तळल्यास ती चव येणार नाही जी तुपात तळल्यास येते.

माहितीचा स्रोत: 
स्व प्रयोग!......
आहार: 
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्तच.

छान दिसताहेत करंज्या.

कशाला तोंडाला पाणी सोडता >> Lol
मानुषी नळ चालू करताहेत असं काहीसं चित्र माझ्या डोळ्यांसमोर आलं.

मस्तच मानुषीताई!
तोंपासू अगदी!

ही पाकृ तुम्ही स्वतःच केली की आधी माहित होती? सहज विचारते आहे. Happy

तळून ठेवलेल्या करंज्यांचा फोटो भारी दिसतोय. वेगळाच प्रकार आहे. जरा खटपटीचा असल्याने मुहुर्त, अवसान, उरक, वेळ आणि घटक पदार्थ हे सगळं एकत्र आल्यास करण्यात येतील Happy

अरे वा! सर्वांना धन्यवाद!
अगं वत्सला खरं सांगायचं तर आधी याचे डोनट्स करून पाहिले होते. खूपच मस्त झाले होते. पण तेव्हा करून बघू म्हणून फोटो वगैरे काढले नव्हते.
मग परत प्रत्यक्ष करायची वेळ आली तेव्हा केळ्याच्या पुर्‍या आठवल्या.(नणंदेकडे नुक्त्याच झाल्या होत्या.)
मग डॉनट्सचा बेत ऐन वेळी बदलला. आणि म्हटलं करंज्याच करून बघू.
आणि केल्या!!
सिंडी आणि पौतै.........तुम्ही सगळ्या इतक्या सुगरणी आहात .....एकदा केल्या की लक्षात येईल की इतका काही खटाटोप नाहीये बरं!

मस्त!! पण खूप रागवून जरा एकच खा हे आवर्जून सांगा. पनीर, मका, केळ, काजू, तळणे.... इथून सरळ आज व्यायाम केला का धाग्यावर.

मानुषी,
कृपया ह्या धाग्याच्या शब्दखुणांमधे 'पूर्णब्रह्म' असं लिहा.

मस्त दिसतायत करंज्या.
फोटोही स्टेप बाय स्टेप सुरेख आहेत.
>> जरा खटपटीचा असल्याने मुहुर्त, अवसान, उरक, वेळ आणि घटक पदार्थ हे सगळं एकत्र आल्यास करण्यात येतील Happy >> सिंडरेलांना अनुमोदन.

मायबोलीकर मित्र-मैत्रिणींनो, गणेशोत्सव २०१३ च्या सर्व उपक्रम आणि स्पर्धांमध्ये मध्ये भरभरुन सहभाग घेतल्याबद्दल मनःपूर्वक आभार. स्पर्धांचे मतदान सुरु झालेले आहे. तरी कृपया आपल्या आवडत्या कलाकृतींना येथे मत द्यावे.

पूर्णब्रह्म - तिखट- पाककला स्पर्धा - मतदान - http://www.maayboli.com/node/45382
पूर्णब्रह्म - गोड - पाककला स्पर्धा - मतदान - http://www.maayboli.com/node/45359
"पत्र सांगते गूज मनीचे '' स्पर्धा - मतदान - http://www.maayboli.com/node/45383