मनाला भावलेली नाट्यगीते

Submitted by मधुरीता on 13 April, 2013 - 09:10

हा नवीन धागा सुरू करताना मनात एकच विचार होता की जुनी माहित असलेली...तर काही विस्म्रुतीत गेलेली नाट्यगीते यांची उजळणी यानिमित्ताने व्हावी.
या धाग्यावर नाट्यपदे पुर्ण लिहिण्याची आवश्यकता नाही; पण त्या नाट्यगिताचा अर्थ, गायक, गायिका, नाटक, नाटककार, राग, ताल, त्याची पार्श्वभुमी, मनोरंजक किस्से इ. माहीती जरुर लिहावी. त्यामुळे त्या नाट्यगितांचे रसग्रहण करता येईल.
तसेच विस्म्रुतीत गेलेली नाट्यपदे ह्या धाग्यावर पुर्ण स्वरुपात दिलीत तर त्याची माहीती अनेकांना होईल.
काही गीते एकापेक्षा जास्त गायकांनी गायली असु शकतात. त्याची माहिती ज्यांना असेल त्यांनी नक्किच भर घालावी. एखाद्या गीताबद्द्ल अजुन माहिती द्यायची असल्यास गाण्याचे नाव वरती लिहुन माहिती द्यावी. बाकी रसिकांस अधिक सांगणे न लगे.

सोबत देव सरांनी सुचविलेली लिंक देत आहे. त्यामध्ये संपुर्ण नाट्यपदे लिखित आणि ध्वनीमुद्रित मिळतील. तसेच तयार नाट्यगितांचा संचय उपलब्ध होईल.
http://www.aathavanitli-gani.com/Natak

सुरूवात म्ह्णुन मी इथे एक नाट्यपद देत आहे.

मर्मबंधातली ठेव ही प्रेममय|
ठेवी जपोनी सुखाने दुखवी जीव||

ह्र्द्यांबुजी लिन लोभि अति हा|
मकरंद ठेवा लुटण्यासी आला|
बांधी जिवाला सुखाशा मनी||

संगीतः वझे बुवा
नाटकः संन्यस्त खङ्ग
गायकः दिनानाथ मंगेशकर
रागः पटदीप
तालः त्रिताल

Group content visibility: 
Public - accessible to all site users

कोणी प्रतिसाद दिला नाही, याचं खरच आश्चर्य वाटले. मराठी माणसाला नाट्यगितांची इतकी आवड असताना असा प्रतिसाद?
असो! मी खाली मला माहित असलेले अजुन एक नाट्यगीत देत आहे.

या भवनातील गीत पुराणे
मवाळ हळवे सुर जाउ द्या,
आज येथुनी दुर|

भावभक्तिची भावुक गाथा
पराभुत हो नमविल माथा
नवे गीत अन नवे तराणे
हवा नवा तो नुर||

माहिति:
नाट्कः कट्यार काळजात घुसली
गायकः पं. वसंतराव देशपांडे

बाकी माहिती जाणकारांनी द्यावी.

मधुरिता, खूप छान उपक्रम आहे. नाट्यगीते मला खूप आवडतात, पण त्या गाण्याविषयी संपूर्ण माहिती मला नसते तरीसुद्धा (१) जितेंद्र अभिषेकींचे -घेइ छंद मकरंद,
(२) वसंतराव देशपांडे- कुणी जाल का सांगाल का, (२)लगी कलेजवा कटार, (३) लाविली थंड उटी वाळ्याची, (४) मृगनयना रसिक मोहिनी, (५) शतजन्म शोधिताना शत आरती व्यर्थ झाल्या.
३) माणीक वर्मा - नृप कन्या तव जाया (२)रूप बलि नर शार्दूल

शारदा नाटकातील - म्हातारा ईतुका न अवघे पाऊणशे वयमान.

प्रज्ञा प्रतिक्रिये बद्द्ल धन्यवाद. तु सुचविलेली नाट्यगीते खुप छान आहेत. जरी तुला त्याची माहिती फार नसली तरी ती नाट्यपदे लिहीली तर ईतर रसिक त्याची माहिती नक्कि देतील.

प्रज्ञा१२३ > +१
अधिक
डॉ. वसंतराव देशपांडे :- बगळ्यांचि माळ फुले, घेई छंद मकरंद, धीर धरी,

वा: इतक्या सगळ्यांना हा उपक्रम आवडतोय आणि प्रतिसाद देताय हे पाहुन खुप आनंद झाला. जरी प्रत्येकाने एखादे नाट्यगीत लिहिले अगर त्याविषयी माहिती दिली तर हे नाट्यरसिकांना नक्कीच आवडेल.

वा हे मस्त!! मलाही नाट्यगीते खूप आवडतात. आमच्याकडे जुन्या काही कॅसेटस होत्या त्यातली
माझी काही आवडती. १) घेई छंद मकरंद २) मर्मबंधातली ठेव ही प्रेममय ३) ॠणानुबंधाच्या जिथून पडल्या गाठी ४) काटा रुते कुणाला ५) देवाघरचे ज्ञात कुणाला ६) दैव किती अविचारी ७) छेडियल्या तारा

ॠणानुबंधाच्या जिथून पडल्या गाठी
भेटीत तुष्टता मोठी

त्या कातरवेळा थरथरती अधरी
त्या तिन्ही सांजाच्या आठवणी त्या प्रहरी
कितीदा आलो, गेलो, रमलो
रुसण्यावाचुनि परस्परांच्या कधी न घडल्या गोष्टी

कधि तिने मनोरम रुसणे
रुसण्यात उगीच ते हसणे
म्हणून ते मनोहर रुसणे
हसणे, रुसणे, रुसणे, हसणे
हसण्यावरती रुसण्यासाठी, जन्मजन्मीच्या गाठी

कधि जवळ सुखाने बसलो
दुःखात सुखाला हसलो
कधि गहिवरलो, कधी धुसफ़ुसलो
सागरतीरी आठवणींनी वाळूत मारल्या रेघा,
जन्मासाठी जन्म जन्मलो, जन्मात जमली ना गट्टी

गीत : बाळ कोल्हटकर
संगीत : वसंत देसाई
स्वर : कुमार गंधर्व
नाटक : देव दीनाघरी धावला

http://www.aathavanitli-gani.com/Natak
इथे बहुतेक सगळ्या नाटकांची यादी आहे आणि त्यात त्या त्या नाटकातील पदे लिहिलेल्या स्वरूपात आहेत..तसेच एम्पी३ स्वरूपात ऐकताही येतील.

खूप छान महीतीपर धागा.
मला आवडीची ही काही नाट्यपदं:

१. शतजन्म शोधिताना : सन्यस्तखडग गीतः स्वा. सावरकर रागः भैरवी
२. सुर सुख खणी तु विमला: विद्याहरण राग: कीरवाणी. गायकः वसंतराव.भिमसेन जोशीं च पण आहे.
३. नको विसरु संकेत मीलनाचा: मत्स्यगंधा. गीतः वसंत कानिटकर. संगीतः अभिषेकी रागः मुलतानी.
४. वद जाउ कुणाला शरण गं : संगीत सौभद्र राग बहुतेक जोगिया.
आशा खाडीलकरांनी गायिलेलं हे पद खूप मस्त आहे. जरुर ऐका.
आणखी बरेच आहेत. कीती लिहीवीत? Happy Happy

ॠणानुबंधाच्या जिथून पडल्या गाठी>>>

निलु, धन्स. माझे खुप आवडिचे नाट्यगीत आहे. जुन्या नाट्यगितांना या निमित्त्याने पुन्हा उजाळा मिळतोय हे महत्वाचे.

श्रियु, मस्त माहिति दिलीत. धन्स! अशी आणखी माहिती पहायला आवडेल. विशेषत: राग, ताल इ. Happy

नाट्यगीते हा आवडीचा विषय. Happy देव दिनाघरी धावला मधले ऋणानुबंधांच्या अगदी खास आवडीचे.

मर्मबंधातली ठेव ही प्रेममय ।
ठेविं जपोनि सुखाने दुखवीं जीव ॥

हृदयांबुजी लीन लोभी अलि हा ।
मकरंद ठेवा लुटण्यासी आला ।
बांधी जिवाला सुखाशा मनीं ॥

गीत - शंकर बालाजी शास्‍त्री
संगीत - वझेबुवा
स्वर - मा. दीनानाथ
नाटक - सन्यस्तखड्ग
राग - पटदीप

विकल मन आज झुरत असहाय !
नाहि मज चैन, क्षणक्षण झुरति नैंन
कोणा सांगू?

ही चांदरात, नीज नच त्यात,
विरह सखी मी कुठवर साहू ?
नाहि मज चैन, क्षणक्षण झुरति नैंन
कोणा सांगू ?

गीत - शान्‍ता शेळके
संगीत - पं. जितेंद्र अभिषेकी
स्वर - बकुळ पंडित
नाटक - हे बंध रेशमाचे
राग - सरस्वती

हे एक खूप भावणारे...

हे सुरांनो, चंद्र व्हा
चांदण्याचे कोष माझ्या
प्रियकराला पोचवा ॥

वाट एकाकी तमाची
हरवलेल्या मानसाची
बरसुनी आकाश सारे
अमृताने नाहवा ॥

गीत - कुसुमाग्रज
संगीत - पं. जितेंद्र अभिषेकी
स्वर - पं. जितेंद्र अभिषेकी
नाटक - ययाति आणि देवयानी

यादी खूपच मोठी आहे.... Happy

भावलेल्या नाट्यगीतांमधे अनवधानाने कुणी जाल का सांगाल का, बगळ्यांची माळ फुले अशी काही भावगीतेही लिहीली गेली आहेत वरती. असो.

मला स्वयंवरातली रुक्मिणीची सर्वच पदे आवडतात, पन त्यातही अधिक भावलेली -
१. मम मनी कृष्ण सखा रमला (अत्यंत भावपूर्ण)
२. एकला नयनाला विषय तो झाला (हे खुप वेगवान पद आहे आणि चैतन्य येतं ऐकल्यावर)
३. मम सुखाची ठेव देवा तुम्हापाशी ठेवा
४. अनृतची गोपाला

दोन पदांचे तपशील थोडे थोडे आठवतात -

नाथ हा माझा मोही खला
शिशुपाला भारी झाला
वीर रुक्मी शिशुसम आणिला

राग - यमन
स्वर - आधी किर्ती शिलेदार, आता आनंद भाटेही. त्यांच्यासोबतची गायिका माहिती नाही.

स्वकुल तारक सुता सुवरा
वरुनी वाढवी वंश वनिता

नाटक - सं. स्वयंवर
स्वर - माणिक वर्मा
राग - भीमपलास
पद - श्रीपाद कृष्ण कोल्हटकर
संगीत - बहुतेक देवलांचं असावं.
(माफ करा, पद आणि तपशील पूर्ण आठवत नाहीत, खुप वर्षे झालीत ऐकून.)

इथे पदं लिहायची खरंच काही गरज आहे का?
आठवणीतील गाणी ह्या संकेतस्थळाचा मी जो दुवा दिला आहे त्यावर सगळं संकलन झालेलंच आहे...तिथे त्यातली बरीच नाट्यपदं ऐकताही येताहेत...चांगली ४ पानांची यादी आहे...नाटकांची.
सुप्रिया जाधव व्यतिरिक्त इतरांनी त्याची नोंद घेतलेली दिसत नाहीये..खुद्द धागाकर्तीनेही तशी नोंद घेतल्याचे दिसत नाहीये म्हणून पुन्हा हे लिहावे लागतेय.
असो..बाकी चालू द्या..

देव सर, तुमचे म्ह्णणे बरोबर आहे. मी याआधी तुम्ही दिलेल्या धाग्यावरती काहिही प्रतिक्रिया दिली नाही. परंतु त्याचे कारण की 'आठवणितील गाणी' मध्ये नाट्यपदे मिळतील हे मलाही माहित होते. परंतु, एखादे नाट्यगीत आवडणे आणि ते तयार लिहिलेले मिळणे हे जेव्हढे आवश्यक वाटते त्याबरोबरच त्याचा तपशिल, त्या गिताचे रसग्रहण हेही मला आवश्यक वाटते. मायबोली वरती कोणताही धागा काढण्याचे कारण म्हणजे संवाद साधणे होय. आणि आपली आवड नोंदवणे, त्यामध्ये त्या गितावर भाष्य करुन नविन माहिती मिळवणे हाही एक संवादच आहे.
मायबोली वरती असे अनेक धागे आहेत त्यामध्ये सर्व माहिती नेटवरुन मिळवता येते मग ते उघडलेच कशाला असे वाटेल. परंतु; काही वेळेला गाण्यासोबत त्याची माहिती, राग, ताल इ. तपशिल जर एकेठीकाणी मिळत असेल, शिवाय त्यावरती प्रतिक्रिया नोंदवता येत असेल तर काय हरकत आहे? बाकी तुम्ही दिलेला धागा खरेच खुप उपयोगी आहे. धन्स Happy

भावलेल्या नाट्यगीतांमधे अनवधानाने कुणी जाल का सांगाल का, बगळ्यांची माळ फुले अशी काही भावगीतेही लिहीली गेली आहेत वरती. असो.>>+१
सई,
ती गीते पं. वसंतरावांनी गायली आहेत म्हणुन वाटले असेल.
खुप छान माहीती, धन्स!

भानस,
विकल मन..... सरस्वती रागातले आहे माहित नव्हते धन्स!
खुपच उपयुक्त माहिती आणि आवडती नाट्यपदे. मस्त!! Happy

मधुरीता, अगं संवाद साधण्याला माझा कधीच आक्षेप नाहीये..किंबहुना इथे मलाही हेच अपेक्षित आहे.
माझं म्हणणं इतकंच की संपूर्ण पदं इथे लिहिण्याऐवजी तू म्हणतेस तसे त्याचे रसग्रहण, ते ज्या गायक-गायिकेने गायलेले असेल त्याबद्दलचे आपले मत/अनुभव वगैरे नोंदवले तर ते जास्त संयुक्तिक ठरेल...त्यावर चर्चा केली तर तेही उपयुक्त ठरेल...त्या गाण्यांसंबंधी जर कुणाची स्वतःची काही आठवण असेल किंवा खुद्द गीतकार/संगीतकार/नट-गायक इत्यादिंपैकी कुणाची काही आठवण असल्यास ती इथे दिली तर ते जास्त योग्य होईल आणि आवडेलही.

देव काका. तुमचे म्हणणे मला पटले. इथे नाट्यपद पुर्ण लिहिण्याची गरज नाही. मी तसा धाग्याच्या सुरुवातीला बदल करेन. आणि रसग्रहण करण्यावरती जास्त भर देईन. तुमच्या प्रेमळ सल्ल्यामुळे मला खरंच खुप बरे वाटले. या नंतरही काही चुकत असेन तर नक्की सांगा. मी नक्कीच योग्य तो बदल करेन. Happy

मधुरीता, पुर्वी आपल्याकडे ललिता होत्या, त्या आणि आम्ही सगळे नाट्यगीतांची अंताक्षरी खेळायचो. गाण्यांचे अचूक शब्द आणि पूर्ण गाणे त्या लिहित असत.

मी देखील काही ललित लिहिली होती. ( रंगदेवतेस अभिवादन करून असे काहीसे नाव होते. ) आता संगीत नाटकांचे प्रयोगच होत नसल्याने, तरुणांना काही नाटके व गाणी माहीत नसण्याची शक्यता आहेत.

वरची जी लिंक आहे त्यात काही नावे दिसली नाहीत. संगीत मंदोदरी हे त्यापैकी एक. या नाटकाला जयमालाबाईंचे संगीत होते. जय शंकर प्रलयंकर, श्रमले मी बहु श्रमले, पाहते वाट कदंबातळी.. अशी सुंदर गाणी होती. नाटकात किर्ती ही गाणी गात असे. पण या गाण्यांचे रेकॉर्डींग मात्र मला अजूनही सापडलेले नाही.

अभिषेकीबुवांच्या संगीतातले महानंदा ( योजना भाट्ये ) चे पण नाव दिसले नाही. लेकुरे उदंड झाली, घाशीराम
कोतवाल, तीन पैशाचा तमाशा, वर्‍हाडी माणसं, आंधळं दळतय, आतून किर्तन वरून तमाशा, जांभूळ आख्यान
हि पण एका तर्‍हेने संगीत नाटकेच होती. त्यांचीही नावे या यादीत नाहीत.

लहानपण देगा देवा, या नाटकासाठीही कुमार गंधर्व गायले होते, त्या नाटकाचेही नाव दिसले नाही.
दुर्गा झाली गौरी चे पण नाव असायला हवे होते.

संगीत वरदान या नाटकाला बहुतेक वसंतराव देशपांडे यांचे संगीत होते. त्यात सुमती टिकेकर ( आरती च्या सासुबाई ) यांनी गायलेली अप्रतिम गाणी होती. ( अनामिक नाद उठे गगनी )
धन्य ते गायनी कळा ला बहुतेक पं, भीमसेन जोशी यांचे संगीत होते.

सुधीर फडके ( कोण ही आसावरी ) , जयवंत कुलकर्णी ( विश्वनाट् सूत्रधार ) , उषा मंगेशकर ( धीरे धीरे लाडे ) आशा ( या शब्दाला अर्था मिळाला ) सुलोचना चव्हाण ( तांबड फुटलय ) लता ( अलिकडचे मोहन वाघांचे नाटक ) यांनी पण नाटकासाठी गायन केले आहे.

रविराज तो मी रोहिणी या नाटकाचे पण नाव दिसले नाही. पुढे याचे पयोग बाजीराव मस्तानी या नावाने झाले.
यात आधी मस्तानीची भुमिका सुहास जोशी करत असत नंतर माया जाधव.

असो नाट्यसंगीताबद्दल मी लिहायला बसलो तर वहावतच जातो.

दिनेशजी,
>>>>>वरची जी लिंक आहे त्यात काही नावे दिसली नाहीत. संगीत मंदोदरी हे त्यापैकी एक.

तुम्ही ही नविनच माहीती दिलीत. म्हणजे काही गाणी अजुनही त्या डाटाबेसवर आलेली नाहीत हे सिद्ध झाले. तुम्ही स्वतःही नाट्यगीते लिहायचा हे ऐकुन खुपच आनंद झाला. त्यातील ललीत शब्दाचा अर्थ नाही कळला. नाट्यगितांचेच दुसरे नाव आहे का?

तुम्ही लिहिलेली सर्वच माहीती माझ्यासाठी आणी इतर नाट्यरसिकांसाठी खुप नवीन आहे. तुम्ही लिहिले आहे की, नाट्यसंगिताविषयी लिहिले तर वाहवत जाईन. परंतु, आम्हांला तुमचे विचार आणी माहितीचे भांडार वाहिले तर आनंदच होईल. तुम्ही लिहिलेली नाट्यपदे फारशी माहीत नाहीत. त्याविषयी जरुर लिहा. ही संगीत रसिकांसाठी पर्वणीच ठरेल.

पुर्वी मी ललित लेख लिहिले होते. ५ भागात एकूण ७५ नाटकांची ओळख करुन दिली होती.
माझे भाग्य थोर म्हणून यातली अनेक नाटके मी बघितली आहेत. बालगंधर्व जन्मशताब्दी वर्षात दूरदर्शनवर पण अनेक संगीत नाटके सादर झाली होती.

शास्त्रीय संगीत महाराष्ट्रात लोकप्रिय करण्याचे श्रेय अर्थातच नाट्यसंगीताचे.
इप्रसारणवर खुप जूनी दुर्मिळ नाट्यगीते ऐकवली जातात.

पण कुठे मिळाली तर अवश्य ऐकावीत ( त्या लिंकवर पण ही आहेत. )

१) लपविला लाल

मोहे लिनो देख नजरीयाने जिया मोरा, या ठुमरीवर बेतलेले हे गाणे, संगीत स्वयंवर नाटकात, महाराणी
म्हणजे रुक्मिणीच्या आईच्या तोंडी आहे. मी बघितलेल्या प्रयोगात जयमालाबाईंनी हि भुमिका केली होती.
महाराणीच्या तोंडी हे एकच गाणे आहे. पण नेटवर हे गाणे नागपूरच्या कल्याणी देशमुख यांच्या आवाजात आहे.
तब्बल साडेसात मिनिटांचे हे गायन आहे. या गायनानंतर काहीही ऐकू नये, असे वाटते.

२) जयमालाबाईंच्या आवाजात कोपलास का, हे पद. अत्यंत अनवट चाल.
३) छोटा गंधर्वांच्या आवाजातली सर्वच पदे, खास करुन लाल शाल जोडी, प्रिये पहा आणि जेथ मित्रा तत्वार्थ
४) रामदास कामतांच्या आवाजात, संगीत रस सुरस
५) ज्योस्ना मोहिले... जायचे इथून दूर / किती पांडुरंगा साहू / तळमळ अति अंतरात
६) बकुल पंडीत, उगवला चंद्र पुनवेचा.. याचे मैफीलीतले गायन माझ्याकडे आहे. त्यातली एक जागा अत्यंत अनवट आहे.
७) किर्तीच्या आवाजात, जोहार मायबाप / खरा तो प्रेमा / वद जाई.. तिन्ही पदे तब्बल १५ मिनिटे गायलीय ती.
( शिवाय स्वरसम्राज्ञी मधल्या सर्व लावण्या आणि चीजा - इथे मांडला / श्रीकृष्णा सारंगधरा / राधिके तूने कैसा / आजा रे मनमोहन श्याम / बलमा आये रंगीले - कान्होपात्रा नाटकातले सर्व अभंग )
८) नूतन पेंढारकरांच्या आवाजात, मधुकर वनवन फिरत करी.
९) ज्योस्ना भोळे - क्षण आला भाग्याचा / मनरमणा
१०) सुरेश हळदणकर - श्रीरंगा कमलाकांता
११) आशा भोसले - सुकतातची जगी या
१२) आशा खाडीलकर - सोहम हर डमरू बाजे
१३) भालचंद्र पेंढारकर - आई तुझी आठवण येते
१४) क्षमा बाजीकर - दिवस आजचा असाच गेला
१५) कान्होपात्रा किणीकर - त्या मदन मनोरम रुपी / ये मौसम है रंगीन
१६) नीलाक्षी जुवेकर - मी अधना न शिवे
१७) मालिनी राजूरकर - पांडुनृपती जनक जया
१८) माणिक वर्मा - निघाले आज तिकडच्या घरी / ही तव कुटील चतुराई
१९) आरती नायक - माझ्याच पावलांची ( नाटक बिर्‍हाड बाजलं, हे नाटक पण त्या यादीत दिसले नाही)
२०) कुमार गंधर्व - प्रभु अजि गमला
२१) रजनी जोशी - मी जाया धर्ममया

माझ्याकडे नाट्यसंगीताचा भरपूर मोठा संग्रह आहे. कधी भेट झाली तर अवश्य देईन. पण वरची गाणी नेटवर मिळायला हवीत.

दिनेशदा, तुमच्या जुन्या लेखांचे दुवे द्याल का? वाचायला नक्कीच आवडेल मला.

तुम्ही उल्लेख केलेली बहुतेक नाटकांची नावं मीही ऐकलेत पण त्यांची गाणी सर्वसामान्य नाट्यसंगीत प्रेमींनाही आज फारशी परिचित नाहीत...दुसरं असं की काही मोजके अपवाद वगळल्यास त्यांच्या ध्वनीमुद्रिकाही निघाल्या नसाव्यात म्हणून ती गीतं आकाशवाणीवरूनही ऐकता नाही आली.

नाटकासाठी एखादं शीर्षकगीत तयार केलेलं असेल तर त्याला नाट्यसंगीत म्हणणं मात्र मला फारसं पटत नाही...कथानकाच्या अनुषंगाने त्यात आलेली पदं हेच खर्‍या अर्थाने नाट्यगीत-संगीत होऊ शकतं असं मला वाटतं...त्यामुळे तुम्ही उल्लेख केलेली एकेकट्याने (पार्श्वगायन म्हणून) गायलेली एकुलती एक गाणी फारशी गाजली नाहीत....

१) विश्वनाट्य सूत्रधार...ही शाबास बिरबल शाबास ह्या नाटकाची नांदी आहे आणि ती एकट्या जयवंत कुलकर्णींनी गायलेली नसून त्यात पंडित राम मराठे, रामदास कामत असे संगीत नाटकात मुरलेले गायकही आहेत...
वाचा आणि ऐका ती नांदी...
२) आसावरी नाटकाचा उल्लेखही आहे आठवणीतली गाणी ह्या संकेतस्थळावर...अगदी नाटकांच्या यादीत पहिल्याच पानावर...त्यातली सुधीर फडके ह्यांच्या आवाजातली दोन्ही गाणीही तिथे वाचता/ऐकता येताहेत.
३) अनामिक नाद उठे गगनी इथे ऐका.
४) धन्य ते गायनी कळाचीही सगळी गीते इथे आहेतच.. आणि संगीतकार भीमसेन जोशीच आहेत.

दिनेशदा, आठवणीतील गाणी ह्या संकेतस्थळावर.तुम्हाला इतरत्र न सापडतील अशी बरीच जुनी आणि अनवट गाणी..(इथे नाट्यगीत असा संदर्भ) वाचायला ऐकायला मिळतील ...तिथे शोध घेण्यासाठी वेगवेगळे पर्याय दिलेत ते एकदा पडताळून पाहा म्हणजे मग तुम्हीही माझ्यासारखेच ह्या संकेतस्थळाचे पंखे व्हाल. Happy

तुम्ही वर दिलेल्या यादीतील बहुतेक पदं इथे आहेत.

मागे अजीत कडकडे यांची २४ नॉन स्टॉप नाट्यगीते अशी एक कॅसेट निघाली होती. नमन नटवरा विस्मयकारा पासुन शत जन्म शोधिताना च्या भैरवी पर्यंत. त्यात गाण्यांची निवड खूप मस्त होती.
आणि एका गाण्यावरून पुढल्या गाण्यावर जातानाचे आलाप कींवा संगीताचे तुकडे अतिशय रेखीव होते.
कुणाकडे आहे का ती कॅसेट? मिळाली तर जरुर ऐका. Happy

Pages