मायबोली गणेशोत्सव २०१३ : '' पत्र सांगते गूज मनीचे '' स्पर्धा - प्रवेशिका स्विकारणे बंद करत आहोत.

Submitted by संयोजक on 30 August, 2013 - 07:58

patra sangate guj maniche-1.png

"सकाळी सकाळी पूजा, स्वयंपाक करून ऑफिसला जा म्हणतात? कसं जमणार? कोण समजावणार साबांना?"
"दहा कामं एका वेळेस करायला मी काय मशिन आहे? पण बॉसला कोण सांगणार?"
"मी शाळेत असताना कित्ती मारकुट्या होत्या या बाई! शाळा म्हणलं की काटा यायचा यांच्यामुळे! कोणी तरी सांगायला हवं यांना!"

कित्ती काही सांगायचंय
या हृदयीचं त्या हृदयी पोहचवायचंय

मनात साठलंय बरंच काही,
त्यांच्यापर्यंत नेणार नाही?

आलीय बरं का संधी नामी
मन करा हलकं, भार होईल कमी

गणेशोत्सव तर निमित्तमात्र
मन करा मोकळं ,लिहा एकमेकांना पत्र!

पण थांबा थांबा, धीर धरा थोडा
आधी नियमावलीही वाचून काढा..

नियमावली

१. या स्पर्धेसाठी प्रत्येक स्पर्धकाने दोन पत्रे लिहायची आहेत.दोन व्यक्तींनी एकमेकांना लिहिलेली असे कल्पून ही पत्रे लिहायची आहेत.शब्दमर्यादा नाही ,पण पत्रसंख्या मात्र दोनच आहे. एका व्यक्तीने लिहिलेले पहिले पत्र व त्याचे दुसर्‍या व्यक्तीने दिलेले उत्तर.

२. कधीकधी रोजच्या सामान्य संवादापेक्षा पत्र लिहिणे अधिक सखोल संवादासाठी आवश्यक असते याचा अनुभव आपण सर्वांनीच घेतला आहे. अगदी इमेलच्याही स्वरूपात आपण पत्रे लिहितो, संवाद साधतो.पत्र या माध्यमात काव्यमयता असू शकते किंवा सखोल विचार, मार्गदर्शन, निखळ संवादही. पत्रव्यवहाराची ही सर्व मनोहारी वैशिष्ट्ये या स्पर्धेच्या निमित्ताने आपण जागवणार आहोत.

३. या दोन व्यक्तींमधले नाते कोणतेही असू शकते. दोन मित्र, दोन मैत्रिणी, आई-मुलगा/मुलगी, सासू-सून,प्रियकर-प्रेयसी,नवरा-बायको, कार्यालयातले सहकारी-वरिष्ठ इत्यादि इत्यादि .

४.पहिल्या व्यक्तीच्या पहिल्या पत्रातल्या प्रश्नांना, विसंवादाला, परिस्थितीला दुसर्‍या पत्रात दुसर्‍या व्यक्तीने उत्तर द्यायचे आहे ज्यातून एक नाते उलगडते, एक संवाद पूर्ण होतो,एक कथाबीज अंकुरते.

५. कोणालाही पत्रं लिहू शकता...
प्राण्याला,देवाला,अप्सरेला, राक्षसाला,मानवयोनीतल्या कुणालाही चालेल.
फक्त प्रत्युत्तर अपेक्षित आहे आणि ते तुम्हालाच लिहायचय हे लक्षात ठेवा !

६.पत्रांचा सूर विरोधाचा असू शकतो वा सहकार्याचा, प्रेमाचा, मदतीचा. कोणतीही भावना पण अर्थातच सभ्यतेची पातळी सांभाळून व्यक्त केलेली असावी.

वाटते आहे ना आव्हानात्मक ? मग चला सुरुवात कराच लिहायला. कदाचित तुमच्या किंवा जवळच्या कोणाच्या तरी आयुष्यातला एखादा नाट्यपूर्ण प्रसंग या पत्र-जोडीतून उलगडत जाईल..

स्पर्धेत भाग कसा घ्याल?
'' पत्र सांगते गूज मनीचे '' स्पर्धेत भाग घेण्यासाठी नवीन लेखनाचा धागा उघडावा लागेल.
प्रवेशिका गणेश चतुर्थीपासून,९ सप्टेंबर २०१३ (भारतीय प्रमाणवेळ) ते अनंत चतुर्दशीपर्यंत, १८ सप्टेंबर २०१३ (अमेरिकेच्या पश्चिम किनार्‍यावरची प्रमाणवेळ) स्वीकारण्यात येतील. प्रवेशिका पाठवण्याकरता 'मायबोली गणेशोत्सव २०१३' या ग्रूपचे सदस्य असणे आवश्यक आहे. हा ग्रूप सदस्य नोंदणीकरता 9 सप्टेंबरला खुला करण्यात येणार आहे.
१. 'मायबोली गणेशोत्सव २०१३ पानाच्या उजवीकडे दिसणार्‍या 'मायबोली गणेशोत्सव २०१३' या निळ्या शब्दांवर टिचकी मारा. नंतर 'सामील व्हा' या शब्दांवर टिचकी मारा. आता आपण 'मायबोली गणेशोत्सव २०१३' या ग्रूपचे सभासद झाला आहात.
२. याच ग्रूपमध्ये उजवीकडे '' पत्र सांगते गूज मनीचे ''या शब्दांवर टिचकी मारा.
३. नवीन धागा उघडला जाईल. त्यात 'शीर्षक' या चौकटीमध्ये खालीलप्रमाणे विषय लिहावा :-
- '' पत्र सांगते गूज मनीचे '': मायबोली आयडी.
४. शब्दखुणा या चौकटीमध्ये मायबोली गणेशोत्सव २०१३ हे शब्द लिहा.
५. नवीन लेखनाच्या धाग्यावर सर्वांत खाली 'Save' या कळीच्या वर ग्रूप असा शब्द दिसेल, त्यावर टिचकी मारा. सार्वजनिक या शब्दाच्या आधी असलेल्या चौकटीवर टिचकी मारा. म्हणजे तुमची प्रवेशिका सर्वांना दिसू शकेल.
६. Save ची कळ दाबा.
७. जर काही मजकूर लिहायचा राहिला असेल/बदलायचा असेल तर सर्वांत वर दिसणारा 'संपादन' हा पर्याय वापरून प्रवेशिकेत बदल करू शकता.
८. या स्पर्धेचा अंतिम विजेता मायबोलीचे सभासद मतदान पध्दतीने ठरवतील. या मतदानासाठीचा धागा अनंतचतुर्दशी नंतर उघडण्यात येईल व विजेत्याला ई-प्रशस्तिपत्रक देण्यात येईल.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मायबोलीकर मित्र-मैत्रिणींनो, तुमच्या छोटुकल्यांना जसं बाप्पाला पत्र लिहायचं आहे, तसंच तुम्हालाही (मात्र वेगळे नियम असलेलं पत्र) लिहायचं आहे.

लिहिताय ना मग? Happy

धन्यवाद.

पत्र आणि त्याचं उत्तर दोन्ही आपणच लिहायची कल्पना आवडली. हा वरचा मसुदा, कविता सगळंच छान झालं आहे. लगे रहो मंडळ Happy

नातं असायलाच पाहिजे का? काल्पनिक पात्रं किंवा म्हणजे असे कोणी चालणार नाहीत का -

पंतप्रधान
प्रेसिडेन्ट
आवडते-नावडते सेलेब्रिटी (फेडी, सचिन, अँजेलिना जोली.. पत्र मराठीतच लिहूया की)
गुन्हेगार
देव (गॉड)
अ‍ॅड्मिन
वेबमास्तर.

जरा व्हरायटी. भावनेनं ओथंबलेली "कोतबो" स्टाईल पत्रं येतील अशी भीती वाटली वरचं वाचून म्हणून म्हटलं...

भावनेनं ओथंबलेली "कोतबो" स्टाईल पत्रं येतील अशी भीती वाटली वरचं वाचून म्हणून म्हटलं...>>. Lol अगदी अगदी. मूळ कल्पना छान आहे पण फक्त 'प्रिय' (नुसतं प्रिय, पुढं काही नसलेलं :फिदी:) नं सुरु होणारी पत्रं नकोत इतकंच वाटतंय.

>>फक्त 'प्रिय' (नुसतं प्रिय, पुढं काही नसलेलं
Lol

प्राणी चालतील का? सेलेब्रिटी Mei Xiang, तिला नुकतंच बाळ झालं.

लोला +१
>>काल्पनिक पात्रं किंवा म्हणजे असे कोणी चालणार नाहीत का >>
सध्याची भारतातील परिस्थिती पाहता आसाराम नाहीतर सोनिया बाईंना पत्र पाठवायची खूप जणांना इच्छा असेल. Happy

<आसाराम नाहीतर सोनिया बाईंना पत्र पाठवायची खूप जणांना इच्छा असेल>

उत्तर पण लिहायचंय ना? की उत्तरादाखल कोरा कागद पाठवलेला चालणार आहे?

क्षमस्व लोकहो..

कोणालाही पत्रं लिहू शकता...
प्राण्याला,देवाला,अप्सरेला, राक्षसाला,मानवयोनीतल्या कुणालाही चालेल.
फक्त प्रत्युत्तर अपेक्षित आहे आणि ते तुम्हालाच लिहायचय हे लक्षात ठेवा.!

अजून दोन शंका/पर्याय.. विविधता येण्यासाठी..

१) पत्र लिहिणार्‍यामध्ये आपण स्वतः हवेच का? दोन सेलिब्रेटी आपसात पत्र-पत्र खेळतात असे नाही का चालणार.. उदाहरणार्थ, सलमानने शाहरुखला पत्र लिहिले त्यावर शाहरुखने उत्तर दिले.. अन करण अर्जुन एकत्र झाले.

किंवा,

२) आपण एखाद्या सेलिब्रेटीला पत्र लिहिले आणि त्याने उत्तर दिले याचे वायसे वर्सा करू शकतो का.. म्हणजे आधी पत्र सेलिब्रेटी लिहिणार आणि आपण उत्तर देणार.. उदाहरणार्थ, मनमोहनजींनी मला पत्र लिहून तुझ्यासारख्या युवा नेत्याची भारताला गरज आहे म्हणत काँग्रेसतर्फे निवडणूक लढवायची गळ घातली अन मी त्यांना आधीच मोदीसाहेबांनी मला बूक केलेय सांगून विनम्र नकार दिला किंवा ऑफर काय देणार विचारले वगैरे वगैरे..

दोन मित्र, दोन मैत्रिणी, आई-मुलगा/मुलगी, सासू-सून,प्रियकर -प्रेयसी,नवरा-बायको, कार्यालयातले सहकारी-वरिष्ठ इत्यादि इत्यादि .

जा बाबा मला माझ्या भूभूला पत्र लिहायचय ,चालेल का ? त्याच उत्तर पण लिहीन कि Happy

पत्र लिहिणार्‍यामध्ये आपण स्वतः हवेच का? >>>नाही...कारण नियम पहिला....दोन व्यक्तींनी एकमेकांना लिहिलेली असे कल्पून ही पत्रे लिहायची आहेत........आणि नियम दुसरा २...दोन मित्र, दोन मैत्रिणी, आई-मुलगा/मुलगी, सासू-सून,प्रियकर -प्रेयसी,नवरा-बायको, कार्यालयातले सहकारी-वरिष्ठ इत्यादि इत्यादि .

अभिषेक तुम्हाला दोन मैत्रिणीं मधले पत्र लिहावेसे वाटले तर...पत्र लिहिणा-यामध्ये तुम्ही कसे असणार? Happy

वाचा...

<<< कोणालाही पत्रं लिहू शकता...
प्राण्याला,देवाला,अप्सरेला, राक्षसाला,मानवयोनीतल्या कुणालाही चालेल.
फक्त प्रत्युत्तर अपेक्षित आहे आणि ते तुम्हालाच लिहायचय हे लक्षात ठेवा ! >>>

तुमचा अभिषेक,
पत्र लिहितांना तुम्ही स्वतः त्यातले एक हवेतच आणि पत्राची सुरुवातही तुमच्याकडूनच हवी. प्रत्युत्तर समोरून यायला हवं.

किरण कुमार,
नियम क्रमांक ५ पहा. तुम्ही कोणालाही पत्र आणि त्याच पत्राचं प्रत्युत्तर लिहू शकता.

<या स्पर्धेसाठी प्रत्येक स्पर्धकाने दोन पत्रे लिहायची आहेत.दोन व्यक्तींनी एकमेकांना लिहिलेली असे कल्पून ही पत्रे लिहायची आहेत.शब्दमर्यादा नाही ,पण पत्रसंख्या मात्र दोनच आहे. एका व्यक्तीने लिहिलेले पहिले पत्र व त्याचे दुसर्‍या व्यक्तीने दिलेले उत्तर.>

<पत्र लिहितांना तुम्ही स्वतः त्यातले एक हवेतच आणि पत्राची सुरुवातही तुमच्याकडूनच हवी. प्रत्युत्तर समोरून यायला हवं.>

नियमावलीवरून वरच्या स्पष्टीकरणात अपेक्षित असलेली अट अजिबात लक्षात येत नाही. नियम क्रमांक १ : दोन व्यक्तींनी एकमेकांना...याचा अर्थ या दोन्ही व्यक्ती तिसर्‍याच कोणी असू शकतील असा निघतो.

हे लिहीत असताना माझ्या डोक्यात स्वतःच स्वत:ला पत्र लिहिण्याची आयडिया चमकलीय. (ब्रँड न्यू नसावी बहुधा). घाबरू नका स्पर्धेसाठी देणार नाही.

भरत मयेकर,
हा पत्र-संवाद एक कल्पनाविलास आहे. यातला एक रोल आपला- म्हणजेच मूळ लेखकाचा आहे- अशी कल्पना करून पहिले पत्र आणि दुसरे पत्र हे त्याचे उत्तर असेल. स्वतःच स्वतःला पत्रे लिहिणे वा कोरी पत्रे पाठवणे पत्र-संवादात अभिप्रेत नाही.

अभिषेक तुम्हाला दोन मैत्रिणीं मधले पत्र लिहावेसे वाटले तर...पत्र लिहिणा-यामध्ये तुम्ही कसे असणार? स्मित
>>>>>>>>>>>>>>>>>>
सोनालीजी, तुम्ही गंडलात Wink
वर संयोजकांनी सांगितले तसे एक व्यक्ती आपण स्वता हवी तसे पत्राची सुरुवात देखील आपल्याकडूनच हवी..

@ संयोजक __ वर भरत मयेकर यांनी निर्देशित केल्याप्रमाणे "दोन व्यक्तींनी एकमेकांना लिहिलेली असे कल्पून ही पत्रे लिहायची आहेत." या विधानाशी खरेच हे विसंगत वाटते. या पोस्ट कोणी वाचल्या नाही तर एखादी एंट्री अशी दोन तिर्हाईत व्यक्तींमधील पत्राची येऊ शकते. बाकी आपण योग्य ती काळजी घ्यालच.

फक्त प्रत्युत्तर अपेक्षित आहे आणि ते तुम्हालाच लिहायचय हे लक्षात ठेवा >> संयोजक हे म्हणजे एकट्यानेच बुद्धिबळ खेळणे आहे.

आपुलाची वादू आपल्याशी ! संवाद कुठे आहे ह्यात? Happy

नियम पहिला....दोन व्यक्तींनी एकमेकांना लिहिलेली असे कल्पून ही पत्रे लिहायची आहेत........आणि नियम दुसरा २...दोन मित्र, दोन मैत्रिणी, आई-मुलगा/मुलगी, सासू-सून,प्रियकर -प्रेयसी,नवरा-बायको, कार्यालयातले सहकारी-वरिष्ठ इत्यादि इत्यादि .>>>म्हणूनच मी गोंधळले.. Happy

केदार, अभिषेक,
उदाहरणार्थ, अभिषेक कॉलेजातले एक मित्र मैत्रीण पत्रमाध्यमातून भेटत आहेत असं रंगवतोय.
आता तो पहिलं पत्र मित्र होऊन लिहितो. तू तेव्हा तसं का वागलीस, कुठे गेली होतीस इतकी वर्षं, आत्ता कळलं की गेट टुगेदरला येते आहेस.मीही कुठून कुठे गेलो या काळात वगैरे वगैरे Happy
मग दुसरं पत्र मैत्रिणीच्या भूमिकेत जाऊन उत्तर म्हणून लिहेल.

यात अनुभवलेलं सत्य किती कल्पित किती , नातं कोणतं हे मुद्दे ज्याचे त्याने ठरवायचे. पत्र-संवादाची स्वतःची अशी एक उत्कटता आहे, ती आपल्याला जागवायचीय त्यासाठी आपण ही पत्र-जोडी लिहिणार आहोत.

सोनाली, दोन व्यक्तींमधल्या नात्याची एक उदाहरणवजा यादी आहे ती.

<एका व्यक्तीने लिहिलेले पहिले पत्र व त्याचे दुसर्‍या व्यक्तीने दिलेले उत्तर.

तुम्ही कोणालातरी लिहिलेले पत्र आणि त्या व्यक्तीने तुम्हाला लिहिलेले उत्तर.

३. या दोन व्यक्तींमधले नाते कोणतेही असू शकते. दोन मित्र, दोन मैत्रिणी, आई-मुलगा/मुलगी, सासू-सून,प्रियकर-प्रेयसी,नवरा-बायको, कार्यालयातले सहकारी-वरिष्ठ इत्यादि इत्यादि . : दुसरी व्यक्ती कोणीही असू शकते : मित्र/मैत्रीण, आई/वडील, मुलगा/मुलगी, सासू, सून, प्रियकर/प्रेयसी, नवरा/बायको

अशी शब्दरचना केली तर कदाचित शंकांना वाव राहणार नाही. प्रतिसादांतील स्पष्टीकरणात हे आता आलेले आहेच.

ओके, माझे डाऊट क्लीअर..
आता फक्त एवढ्या शंका विचारून जर मी काहीच लिहिले नाही तर तेवढ्या शिव्या कोणी घालू नका हि विनंती Happy

बरोबर आहे भरत मयेकर,अभिषेक, स्पर्धकांच्या उत्साहामुळे अन कल्पकतेमुळे आपण स्पर्धेचा परीघ थोडा वाढवला, त्यातून पुनः खुलासे द्यावे लागले.
आता अजून बदल नकोत, स्पर्धेचं मूळ स्वरूप समजून घ्या , पत्रातून मन ओसंडू द्या,एखाद्या मस्त सिच्युएशनमधली पत्र-जोडी सर्वांना वाचायला मिळू द्या.

Pages