दस्तावेज : "नियतीशी संकेत"

Submitted by अवल on 14 August, 2013 - 15:27

१५ ऑगस्ट १९४७, भारत स्वतंत्र झाला. येथे झालेले विचारमंथन, घेतलेले अथक परिश्रम, सोसलेल्या हालअपेष्टा या सर्वांचे चीज झाले.
पं. जवाहरलाल नेहरू - आपल्या आदराचे स्थान. स्वातंत्र लढ्यातील नेते, भारताचे पहिले पंतप्रधान, उत्तम प्रशासक, आंतरराष्ट्रीय राजकारणातील मुत्सद्दी, 'शांतीदूत', इतिहासकार, तत्वज्ञानी आणि मुलांचे चाचा नेहरू; एकाच व्यक्तिमत्वाचे किती विविध पैलू !
स्वतंत्र भारताची राज्यघटना तयार करण्यासाठी जनतेने निवडून दिलेल्या घटनासमितीच्या, १४ ऑगस्ट १९४७ च्या मध्यरात्रीच्या अधिवेशनात पं. नेहरूंनी भाषण केले. भूतकाळाची योग्य जाण, वर्तमानकाळाचे सजग भान आणि भविष्याचे आव्हान या तिन्हींचे चित्रण पं. नेहरूंच्या या भाषणात आपल्याला दिसते.
पं नेहरूंचे भाषेवरील , भावनांवरील, विचारांवरील आणि घटनेच्या अन्वयर्थावरील प्रभूत्व त्यांच्या शब्दाशब्दात आपल्याला दिसते. त्यांची स्वतंत्र्य लढ्याप्रति असलेली आत्मियता- अभिमान, घडलेल्या दुर्दैवी घटनांबद्दलचे भावस्पर्शी दु:ख आणि उज्ज्वल भवितव्यासाठी उत्कट तळमळ या सर्वांचे प्रतिबिंब त्यांच्या या भाषणात दिसते. खरे तर मूळातून वाचावे असे हे भाषण! (http://www.svc.ac.in/files/TRYST%20WITH%20DESTINY.pdf)
माझ्या अल्पमतीने केलेला त्याचा हा मराठी भावार्थ.

Jawaharlal_Nehr.jpg
( जालावरून साभार )

" फार वर्षांपूर्वी आपली नियतीशी ही भेट निश्चित झाली होती. आणि आज आपली प्रतिज्ञा पूर्णत्वाने नव्हे परंतु ब-याच अंशी प्रत्यक्षात घेण्याचा क्षण आला आहे. मध्यरात्रीच्या या प्रहरी, जेव्हा जग झोपले आहे, भारत जागा होतोय; जीवनाप्रति आणि स्वातंत्र्याप्रति ! इतिहासात क्वचितच येणा-या क्षणी आपण जुन्याकडून नव्याकडे जात आहोत. एका युगाचा अंत होतो आहे. अन वर्षानुवर्षे दडपलेला राष्ट्राचा आत्मा आज मुक्त होत आहे. या औपचारिक, धीरगंभीर आणि प्रगल्भ क्षणी; भारतभूमीप्रति, तिच्या जनतेप्रति आणि त्याहून ही महान अशा मानवतेप्रति आम्ही समर्पित होऊ अशी प्रतिज्ञा करणे हे अत्यंत औचित्यपूर्ण ठरेल.

इतिहासाच्या ब्राह्ममुहूर्तावर भारतभूमीने आपला न संपणारा शोध सुरू केला. शतकानुशतके अविरत संघर्ष करून अन जयापजयाचे डोंगर पार करून ! चांगल्या- वाईट प्राक्तनातही भारताची दृष्टी या शोधापासून कधीही ढळली नाही किंवा ज्या आदर्शांनी तिला सामर्थ्य दिले त्यांचे विस्मरणही तिला कधी झाले नाही. आपला अंधःकारमय गतकाळ आज संपतो आहे. भारताला पुन्हा एकदा स्वत्वाची जाणिव होते आहे.

आज आपण साजरी करत असलेली उद्दिष्टपूर्ती ही; आपली वाट पाहणा-या विजयश्रीच्या प्रासादाची केवळ एक पायरी आहे. प्रश्न आहे तो, ही संधी प्राप्त करण्याइतका सुज्ञपणा आणि भावी आव्हाने पेलण्याइतके सामर्थ्य
आपल्यात आहे का?

स्वातंत्र्य आणि सत्ता यांच्या जोडीने जबाबदारीही येते. भारताच्या सार्वभौम जनतेचे प्रतिनिधित्व करणा-या या घटनासमितीवर फार मोठी जबाबदारी आहे. स्वातंत्र्य प्राप्तीपूर्वी तिच्या निर्मितीच्या सर्व वेदनांतून आपण गेलो आहोत; त्यातील दु:खद आठवणींनी आपले अंतःकरण जड झाले आहे; त्यातील काही वेदनांचा सल अजूनही आपण अनुभवित आहोत. असो. भूतकाळ संपला आहे अन भविष्यकाळ आपल्यासमोर उभा आहे.

हा भविष्यकाळ सहजसाध्य किंवा आरामदायक नाही. अविरत आणि प्रचंड प्रयत्नांतूनच आपण वेळोवेळी केलेली आणि आज करणार आहोत ती प्रतिज्ञा, आपण पूर्ण करू शकू. भारताची सेवा म्हणजे लाखो पीडितांची सेवा, दारिद्र्य-अज्ञान-रोगराई यांचे निर्मूलन करणे आणि संधींच्या विषमतेचे उच्चाटन करणे. प्रत्येकाच्या डोळ्यातील प्रत्येक अश्रू पुसला गेला पाहिजे अशी आपल्या पिढीतील महामानवाची महत्वाकांक्षा आहे. हे आपल्या आवाक्यापलिकडचे असेल; परंतु जो पर्यंत अश्रू आहेत, दु:ख आहे तोपर्यंत आपले कार्य संपणार नाही.

आणि म्हणूनच आपण सोसले पाहिजे, काम केले पाहिजे, कठोर परिश्रम केले पाहिजेत; तरच आपली स्वप्ने साकार होऊ शकतील. जी भारताची स्वप्ने आहेत, इतकेच नव्हे तर संपूर्ण जगाची आहेत, सर्व राष्ट्रांची आहेत, सर्व जनतेची आहेत. आज मानव एकमेकांशी अनेकविध धाग्यांनी जोडला गेला आहे की एकमेकांशिवाय जगणे त्याला अशक्य आहे. शांतता ही विभागता येत नाही; त्याच प्रमाणे स्वातंत्र्यही, त्याच प्रमाणे आता वैभवसंपन्नताही आणि या एकमेव जगातील सर्वनाशही; आता फार काळ इतरांपासून फुटून - वेगळे असे एकट्याचे काही असणार नाही.

ज्याचे आम्ही प्रतिनिधी आहोत अशा भारतीय जनतेला आम्ही आवाहन करतो की, त्यांनी या उदात्त साहसात श्रद्धा आणि विश्वासाने आमच्या मागे उभे रहावे. आताची ही वेळ क्षूद्र आणि घातक टीकेची, अनिष्ट चिंतनाची वा दुस-यावर दोषारोपण करण्याची नाही. जेथे भावी पिढी सुखाने नांदेल अशा स्वतंत्र भारताच्या प्रासादाची उभारणी आपण केली पाहिजे. मान्यवर, मी असा प्रस्ताव करण्याची विनंती करतो की, असा निर्णय घेतला जावा की -
१. मध्यरात्रीच्या शेवटच्या ठोक्यानंतर या घटना समितीमधील उपस्थित असलेले सर्व सदस्य पुढील प्रतिज्ञा करतील :
भारतीय जनतेने त्याग आणि यातना सोसून स्वातंत्र्य मिळवले. या औपचारिक, धीरगंभीर आणि प्रगल्भ क्षणी मी,... घटना समितीचा सदस्य म्हणून भारताच्या आणि येथील जनतेच्या सेवेसाठी स्वतःला वाहून घेईन, की ज्या योगे ही प्राचीन भूमी तिचे जगातील सुयोग्य स्थान प्राप्त करून जागतिक शांततेसाठी व मानवतेच्या कल्याणासाठी मनोभावे भरीव सहयोग देईल.
२. या प्रसंगी जे सदस्य उपस्थित नाहीत, तेही अशीच प्रतिज्ञा ( राष्ट्रपती जे बदल सुचवतील त्यानुरुप) समितीच्या पुढच्या सत्रात करतील. "
( पूर्वप्रकाशित : "माध्यम" - टिळक महराष्ट्र विद्यापीठ. पुन:प्रकाशानासाठी परवानगी दिल्याबद्दल मा. डॉ. दीपक टिळक सरांचे आभार )

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान जमले आहे अवल. एक दोन ठिकाणी जरा ध्वनित अर्थाचे भाषांतर हवे होते असे वाटले. आणखी एक दोनदा वाचून सांगतो.

हे (मूळ) त्यांनीच लिहीलेले असावे काय? नेत्यांची भाषणे ते स्वतः लिहीतात असे नाही, पण नेहरूंच्या भाषाकौशल्यामुळे त्यांनी लिहीले असावे असे वाटते.

अवलजी, आज ही औचित्यपूर्ण पोस्ट केल्याबद्दल धन्यवाद.
नेहरू व आपलं पहिलं मंत्रीमंडळ म्हणजे देशाच्या हिताची आत्यंतिक तळमळ असलेली एक अत्यंत कार्यक्षम अशी प्रचंड बौद्धीक व नैतिक ताकदच होती ! त्यांचे आपसांतील मतभेददेखील एका वरच्या सुसंस्कृत पातळीवरच सीमीत ठेवून ते राष्ट्रहिताआड येणार नाहीत याची दक्षता त्या महामानवानी घेतली. त्यावेळचे विरोधी पक्षनेतेही तसेच 'ऊंचे लोग'च होते. जो भक्कम पाया घालण्याचं काम त्यावेळच्या नेत्यानी केलं त्याचं महत्व अधिकाधिक तीव्रतेने आतां जाणवतंय .

फारएण्ड, जरूर सांग, मी करेन बदल, धन्यवाद Happy
भाऊ, वा, तुमच्या सगळ्या पोस्टला +१०० Happy खरच त्या वेळचे सगळेच नेते, त्यांच्यासमोर नतमस्तक व्हायला होतं ____/\____

<< हे (मूळ) त्यांनीच लिहीलेले असावे काय? >> शाळा-कॉलेजांत असताना मला नेहरू, जयप्रकाश, राजगोपालाचारी, कृपलानी, डांगे इ. इ. महान नेते व वक्ते यांची भाषणं ऐकण्याचं भाग्य मिळालं. यापैकीं कोणालाही लिहून आणलेलं भाषण वाचताना मीं कधींही पाहिलं नाही. कमाल म्हणजे, १८५७ ते १९४७ या स्वातंत्र्य लढ्याच्या दीर्घ कालखंडाचा मुद्देसूद आढावा दोन तासांच्या दोन ओघवत्या, अस्खलीत इंग्लीश भाषणातून सादर करतानाही [मुंबईच्या सेंट झेवियर्स कॉलेजमधधल्या "फादर हेरास मेमोरिअल लेक्चर्स"साठी ] जयप्रकाशजींच्या हातात फक्त कागदाचा एक छोटासा चिटोरा संदर्भासाठी असायचा !

छान

नियतीशी संकेत >>> जरा विचित्र वाटलं वाचताना.
'नियतीसे संकेत' असा मूळ हिंदी शब्दप्रयोग असेल तर 'नियतीचा संकेत' असे हवे ना?

काय सुरेख भाषांतर झाले आहे! माझ्या डोक्यात असलेल्या एक दोन गोष्टी नीट सुचवण्याकरिता पुन्हा पुन्हा वाचले - तर मूळ भाषण किती सुंदर आहे ते ही जाणवतेच, पण हे भाषांतरही सुरेख जमले आहे, हे ही.

फक्त एक दोन कॉमेण्ट्स
या एकमेव जगातील>>> येथे 'वन' चा ध्वनित अर्थ एकमेव पेक्षा एकसंध/एकता दर्शवणारा वाटतो.

भारत जागा होतोय; जीनवाप्रति आणि स्वातंत्र्याप्रति>>> हे ही जरा कृत्रिम वाटले. कदाचित अजून वेगळ्या पद्धतीने चपखल वाटेल. (आणि जीनवा चा टायपो दिसतोय)
(लेखात कोणतेही बदल करायचे सुचवत नाहीये, फक्त मला जे वाटले ते लिहीतोय). एकूण खूप छान जमले आहे.

'नियतीसे संकेत' असा मूळ हिंदी शब्दप्रयोग असेल तर 'नियतीचा संकेत' असे हवे ना?>>> मी त्याबद्दल नियतीशी करार असेही वाचले आहे.

या भाषणाचा संदर्भ अनेकवेळा वाचला होता. पुर्ण भाषण आधी वाचले नव्हते. चांगला जमलाय अनुवाद.
फारेण्डाच्या सुचना योग्यच आहेत. एकमेव चा अर्थ मानवी वस्ती असलेला एकमेव ग्रह वगैरे असेल का ?

'नियतीशी संकेत भेट' हे भाषांतर कदाचित अधिक जवळचं असावं पण त्यांतूनही मूळ 'Tryst with Destiny'ची काव्यात्मकता व आवाका पूर्णतः व्यक्त होत नाही, असं जाणवतं.

सुंदर झालंय
*
मला तरी, नियतीशी करार : ट्रिस्ट विथ डेस्टिनी : जास्त बरोबर वाटते.
(अमुक ठिकाणी भेटू या असे बहुदा प्रेमिकांचे आपसात ठरलेले असते, त्या अर्थी ट्रिस्ट वापरला जातो)

फारेंडांची कॉमेंट वाचून संपादित.

हे आम्हाला एस एस सी ला इंग्रजीच्या पाठ्यपुस्तकात होते. अत्यन्त अवघड धडा म्हणून आम्हाला त्याचा खूप रागही येई... कारण आमचे इंग्रजी तेव्हा (आणि आताही) he, she, it, they you, is, come, go , will या परिघातच असायचे .(अजूनही आहे Proud )

नुकत्याच पलिकडच्या बीबीवर डिस्कव्हरी ऑफ इंडिया हा ग्रंथ नेहरूंनी ब्रिटीशांच्या चष्म्यातून लिहिला आहे असा आरोप करण्यात आलेलाच आहे तसेच हे भाषण त्याना माऊंटब्याटन अथवा सौ. माऊन्टब्याटन यांनी लिहून दिलेले असणार अशा आरोपाची वाट पहायची आता. किम्बहुना, फार एन्ड यांनी तशी शंकाही व्यक्त केली आहे.

एकूण अवल यांनी 'नायक' चुकीचा निवडला आहे...

धन्यवाद सर्वांना.
मूळात हे शिवधनुष्यच. फार फार तोकडा पडतोय माझा इंग्रजीचा अभ्यास. पण या निमित्ताने मूळ भाषण पुन्हा सर्वांकडून वाचले जावे हीच इच्छा होती.
फारएण्ड >>>भारत जागा होतोय; जीनवाप्रति आणि स्वातंत्र्याप्रति>>> हे ही जरा कृत्रिम वाटले. कदाचित अजून वेगळ्या पद्धतीने चपखल वाटेल. (आणि जीनवा चा टायपो दिसतोय)<<< हो रे, मलाही ते खटकतेय, पण दुसरे काही सुचेना, त्या टायपो बद्दल धन्यवाद करते दुरुस्त
"नियतीशी संकेत" हे भेटण्याशी जोडलेले असल्याने अन ते अध्यारूत ठेवणेच - त्यातली तरलता टिकवण्यासाठी; मला योग्य वाटले. मुळात नेहरूंची भाषाशैली खूप वरच्या दर्जाची, माझी भाषांतराची क्षमता अन मराठी भाषेतील तरल शब्दांचा माझा नसलेला आवाका याला कारणीभूत. भाऊ, यु सेड इट Happy
पुन्हा एकदा धन्यवाद !