शाळा

Submitted by रसप on 4 September, 2011 - 05:21

बदलापूरची माझी शाळा प्रचंड मोठी... नावाजलेली.. आम्ही थोडे गावाबाहेर राहात होतो. त्यामुळे तशी दूरच होती, परंतु एक "short-cut" होता. डोंगरातून.. मी, ताई आणि अजून १-२ मुलं त्याच रस्त्याने जात असू.. शाळेत जाणं-येणं मला शाळेपेक्षा जास्त आवडायचं.
ह्या शाळेतली एक आठवण मी कधीच विसरणार नाही..

दुपारची वेळ होती, मधल्या सुट्टीनंतरची..खामकर सर. गणिताचा तास. आदल्या दिवशी मी गैरहजर होतो आणि त्याच दिवशी इंग्रजीचे पेपर मिळाले होते.
बाई आल्या आणि त्यांनी सरांना काल गैरहजर असलेल्या सा-यांना एकेक करून वर्गाबाहेर पाठवायला सांगितले.. पेपर देण्यासाठी.. परेड सुरु झाली. ७-८ मुलं होती एकूण..
पेपर घेऊन परत वर्गात आलेल्या प्रत्येकाला खामकर सर "किती..?" विचारत.
माझी धडधड माझा नंबर जसजसा जवळ येऊ लागला; वाढतच होती.. अखेरीस माझाही नंबर आला.. गेलो, बाईंकडून पेपर घेऊन मी आधी चमकलेले तारे विझवले आणि वर्गात शिरलो..
सर फळ्यावर काहीतरी खरडत होते.. अर्जुनाला जसा पक्ष्याचा डोळा दिसत होता, तसा मला फक्त माझा बाक दिसत होता.. मी जवळजवळ धावतच जागेवर जायला सुटलो. पण इतक्यात सर वळलेच अन् मला हाक मारली, "पराडकर.. किती..??"
मला काहीच सुचेना. मी ढीम्म. सर जवळ आले.. धडधड अजून वाढली..
"किती मिळाले?"
"सर, कमी आहेत."
"सर कमी नाहीत, एकच आहेत.. मार्क किती मिळाले.."
सगळा वर्ग हसला..
"सर.... कमी आहेत..."
"अरे, पण किती..??"
मी हळूच चोरून 'ती'ला पाहिलं.. ती सुद्धा हसत होती.. मला शरमेने मेल्यासारखं झालं....
"सर, कमी आहेत.." माझा आवाज अचानक कमी झाला आणि सरांचा मात्र वाढला.
"आता सांगतोस.. की देऊ एक...??"
त्यांनी हातात पट्टी घेतली होती. काय करावं कळेना.. सा-या वर्गासमोर मार्क सांगितले तर काही इज्जतच राहणार नाही.. त्यात 'ती' किती हुशार होती.. 'ती' तर माझी छी: थू च करेल आणि नाही सांगितलं तर पट्टी..
"सांग लौकर..!!"
मी नकारार्थी मान हलवली..
"हात पुढे.."
मी केला..
सट्ट.. कळवळलो..
"जो पर्यंत सांगणार नाहीस, पट्टी खावी लागेल..
मनात म्हटलं,"ह्यांना काय करायच्यात चांभार चौकश्या..उगाच त्रास देतायत मला.."
अजून चार-पाच पट्ट्या खाल्ल्यावर मात्र मी रडू लागलो.. शेवटी क्षीण आवाजात माझे एक आकडी (अव्)गुण सांगितले.. कुणाहीकडे न बघता तडक बाक गाठला आणि आडव्या हाताच्या घडीत तोंड खुपसलं..(त्या वयात येत असणा-या सा-या शिव्या देऊन झाल्या.. हे सांगायलाच नको..)

त्या दिवशी पासून 'ती'च्या नजरेला नजर देण्याची उरली-सुरली हिंमतसुद्धा विरली-जिरली..

आज खामकर सर भेटले तर त्यांना माझी इंग्रजी जरूर ऐकवीन, पण त्यांनी अजून कुठल्या विषयाबद्दल विचारलं, तर पुन्हा पट्टी खावी लागेल..!!

=========================================================================

माझी पाचवी पूर्ण झाल्यावर आम्ही मुंबईला स्थायिक झालो.. इथली माझी शाळा म्हणजे एक अतिशय गरीब, छोटीशी संस्था.. एका छोट्याशा भाड्याच्या जागेतली.. जागा पालिकेची.. लागूनच पालिकेची पण शाळा होती, जी कालांतराने बंद झाली अन् तिची जागा एका "प्रतिष्ठित" स्पोर्ट्स क्लबने त्याच्या मैदानात "सामावून" घेतली.. आमच्या शाळेवरही गंडांतर आले होते, परंतु टळले.. असो.
शाळेची सर्वात मोठी आठवण.. नव्हे, साठवण म्हणजे 'चव्हाण सर.' आमचे मुख्याध्यापक.
आठवण म्हणजे त्यांचे शिकवणं पाऊण वर्गाला समजायचं नाही आणि त्यांचा चापटी/ धपाटा वजा फटका झणझणीत झोंबायचा.. अन् साठवण म्हणजे.. त्यांनी लिहिलेली पत्रं.. त्यांचा आजही दर वाढदिवशी मलाच नव्हे, त्यांच्या शेकडो विद्यार्थ्यांना जाणारा फोन.. त्यांचं शाळेला वाहून घेतलेलं आयुष्य.. बरंच काही..

शाळेला जाण्याच्या रस्त्यावर एक बार लागायचा.. believe it or not.. पण का कुणास ठाऊक तो बार मला नेहमी मंदिर असल्याचा भास व्हायचा.. अनेकदा मी तिथे हात सुद्धा जोडले..!!

एक 'चिकन शॉप' पण लागायचं.. अनेकदा मान कापून टाकलेल्या कोंबडीचं प्लास्टिकच्या पिंपातलं तडफडणं काळीज पिळवटायचं..

ह्या शाळेत आल्यावर मी अचानक पुढच्या बाकावर बसू लागलो.. वर्गात पहिला मी कधीच नव्हतो पण पहिल्या 'काहीं'मध्ये येऊ लागलो. माझ्यातल्या बाथरूम सिंगरला एक स्टेज मिळालं.. अनेक बदल घडले..
पण..
शाळा आजही बदलली नाही.. स्थिती बदलली नाही.. परिस्थितीही बदलली नाही..
आजही चव्हाण सर रात्री ९.३०-१०.०० पर्यंत शाळेत असतात..
आजही अनेक आजी-माजी, दुस-या शाळांचे विद्यार्थी संध्याकाळी शाळेत येतात.. कुणी सहज सरांना, मित्र-मैत्रिणीना भेटायला.. कुणी अभ्यास करायला.. एखाद्या माजी विद्यार्थ्याकडून काही शिकायला..

आजही मी मुंबईला आल्यावर शाळेत जरूर जातो..
पण आजही डोळ्यात खुपतं ते मोडकं फाटक.. अन् ते सरांचं एकटेपण..

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

रणजित, लेखनशैली सुरेखच आहे - शाळेतील आठवणींविषयी वा या दुसर्‍या शाळेविषयीही अजून वाचायला आवडेलच ....

रणजीत, या चव्हाण सरांसारखी माणसे ती शाळा, ती संस्था,तो देश जिवंत ठेवताना स्वत; अनाम स्थितीत विझून जातात.
असो. छान आहे आठवणींचे निवेदन, अजून वाचायला मिळेल अशी आशा करते..

छान आहे.
>>माझी पाचवी पूर्ण झाल्यावर आम्ही मुंबईला स्थायिक झालो..>>
मला वाटले की 'ती' आता पुन्हा मुंबईत भेटणार Happy