अवघड वळणावर

Submitted by स्वाती२ on 12 August, 2013 - 08:14

हायस्कूल मधला लेकाचा पहिला स्नोकमिंग डान्स होता त्या निमित्ताने केलेले हे लेखन. इतरत्र पूर्वप्रकाशित. या सत्यघटनेतले नाव बदलले आहे.

अशीच एक फॉल मधली शुक्रवारची दुपार. नेहमी प्रमाणे गाणी ऐकत माझी कामं उरकत होते. फुटबॉल सिझन. त्यातुन होम गेम. शेल्बीविल v/s रशविल. ६ वाजताच हादडून बाप-लेक गेमला जाणार . त्यामुळे संध्याकाळ्च्या जेवणाची तयारी जरा लवकरच करायला घ्यायाला हवी असे स्वतःलाच सांगत असताना स्कूलबसचा आवाज आला. ५ मिनिटांनी गॅरेज बंद केल्याचा, धाडकन दप्तर टाकल्याचा वगैरे नेहमीचे आवाज. पाठोपाठ खिदळतच लेक आत आला.
"मॉम, आज काय झालं माहितेय." त्याला हसणं अनावर होत होते.
मी नुसत्याच भुवया उंचावल्या.
"It's just hilarious" कसबस एवढ म्हणुन स्वारी खुर्चीत लवंडली. पुन्हा हसण्याचा अॅटॅक.
"हळू. आणि नीट बस नाहितर पडशिल."
"आज ते अॅबस्टिनन्सवाले आले होते ना. माझ्या शेजारी अॅन. चक्क झोपली."
"असू दे. त्यात हसण्यासारखं काय आहे?"
"पुढच ऐक ना" लेक परत खिदळायला लागला.
"पटकन सांग रे. मला बरीच कामं आहेत. उद्याची पण तयारी करायचेय." माझा पेशन्स संपायला लागला.
"त्यांची बडबड संपल्यावर मी तिला उठवलं. मग त्या लोकांनी आम्हाला कँडी दिली. तर अॅन ने मला काय विचारल माहितेय....." पुन्हा अनावर झालेलं हसणं
"......तिनी विचारलं हे लोकं रबर नाही का वाटणार....."
एक मिनिट सगळं घर गर्रकन फिरलं. नकळत आधारासाठी काउंटर गच्च पकडला. लेक त्याच्या नादात अजुनही खिदळत होता.
'stay calm', 'don't over react' संगोपनाचे मंत्र आठवत मी त्याच्याकडे बघत होते.
"देवा! गजानना!"
देवाने बळ दिलं. "अॅन पण ना..." मनातील खळबळ बाहेर येऊन चालणार नव्हते.
"....आणि मी हसलो तर माझ्यावर चिडली. इडियट. मग मी पण चिडलो. I told her- they are saying 'don't do it' and you are asking for...."
"then she said f*** ."
मला सावरायला वेळ हवा होता.
"जाऊ दे. तू आटप तुझं पटपट. आणि कॉलिनची मेल आलेय. ट्रान्सक्रिप्ट पाठवलय आणि उद्याच्या मिटिंगच कन्फर्म पण करायचय."
लेक वर पळाला आणि मी मटकन खुर्चीत बसले. टेन्शनने मान अवघडायला लागली होती. खरे तर या विषयावर त्याच्याशी संवाद होता पण तरीही त्याच्या आणि अॅनच्या या जगाची झलक पाहून मी हादरले होते.
दुसरीच्या वर्गात प्रायव्हेट स्कूल मधून हट्टाने बदली घेतलेला माझा लेक आणि रुरल भागातुन बदलून आलेली अॅन पहिल्या दिवशीच बेस्ट फ्रेंड झाले.अॅन आणि माझा लेक. खरे तर दोन टोकं. दोघांचे छंद वेगळे, अभ्यासाव्यतिरिक्त अॅक्टिव्हिटीजही वेगळ्या. शाळेबाहेर फारसे एकत्र नसायचे. पण मैत्री मात्र घट्ट. आणि आज हे असे....
नवर्‍याच्या कानावर घालायला हवे म्हणताना त्याच्या नुसत्या आठवणीनेच पायात बळ आले. सावकाशीने बसुन ठरवू काय ते म्हणत मी पुन्हा कामाला लागले.
थोड्या वेळाने लेक खाली आला. काही न बोलता त्याने पिनटबटर सँडविच बनवायला घेतले, मगाचच्या हसण्याचा मागमुसही नव्हता. सँडविच खाता खाता मधेच थांबून त्याने डिश बाजूला सारली.
"Mom, I don't want Ann doing something stupid" डोळ्यात गोंधळ आणि भीती दाटलेली.
मी गॅस बंद केला.
"मी विचारल तिला कशाला हवय म्हणून तर तिनी मला ढकलून दिलं"
"मी तिच्या डॅडशी...."
"No! Mom! You will ruin everything. Then I will be the snitch." माझं बोलणं तोडत तो जवळ जवळ ओरडलाच.
देवा! 'code of silence' . मी विसरुनच गेले होते.
"Calm down baby! Calm down! I won't say a word. I promise!" त्याने काहीशा अविश्वासानेच माझ्याकडे पाहिलं.
"बाप्पा शप्पत!" मी घाईघाईने गळ्याला हात लावला. तो थोडा शांत झाला.
"अॅनला बॉयफ्रेंड मिळालाय का?" मी चौकशी सुरु केली.
"शाळेत कुणी नाहिये."
"अरे, मग just curiocity म्ह्नणुन बोलली असेल."
"आणि बाहेर कोणं असलं तर...I just want her to have opportunities"
"सोमवारी बोल तिच्याशी. तिला सांग काहितरी वेडेपणा केला तर अॅथलेटिक स्कॉलरशिप सोड साधं शाळेच्या टीमवरही खेळता येणार नाही. आणि without double protection nothing doing. "
माझ्याशी बोलून त्याच समाधान झालं पण आता माझ्या डोक्यात किडा गेला होता.
"तू.. तू काय करयच ठरवलयस?" मगाच पासुन मागच्या बर्नरवर खदखद्णारा प्रश्न.
लेकाने डोक्याला हात लावला.
"अग माझे आई! I am going to wait!" लेक परत वर जायला उठला.
"असं सगळेच म्हणतात. उद्या तुझा विचार बदलला तर..."
"तुम्हा दोघांना आधी लेखी नोटीस देइन. झालं समाधान?" लेकाने कोपरापासुन हात जोडले.
रात्री नवर्‍याशी बोलणं झालं. तोही मुलाशी बोलला. या घटनेला वर्ष होऊन गेलं. अॅनच खेळणं , लेकाच्या उचापती सध्या तरी सर्व काही ठीक चाललय. उद्या शाळेत डान्स आहे. लेकाचा सूट, टाय काढून ठेवताय. आज पुन्हा एकदा लेकाला समोर बसवून 'उजळणी' म्हणायचेय.

अपडेट - हायस्कूल कसलेही विघ्न न येता पार पडले. आता दोन्ही मुलं आपापल्या नव्या मार्गाने वाटचाल सुरु करणार. कालच लेकाला डॉर्मवर सोडून आलो. त्या आधी आठवडाभर सामानाची बांधाबांध, खाऊचे डबे, पुस्तकांची खरेदी वगैरे गडबड सुरु होती. त्याच जोडीला लेकाने अल्कोहोल अवेरनेससाठी युनिवर्सिटीने मॅन्डेटरी केलेला ऑनलाईन कोर्स पूर्ण केला. क्रेडीट कार्ड, ATM, पार्ट्या, अभ्यास, जोडीला त्याच्या दोन्ही मैत्रीणींची सुरक्षितता... माझ्या सुचना संपत नव्हत्या. गप्पा मारताना सेफ सेक्स आणि HPV वॅक्सिन चा विषय निघालाच. 'माझं झालय बोलणं डॅडशी. सध्यातरी I am going to wait. त्यातून विचार बदलला तर लगेच तुम्हाला सांगेन आणि ते वॅक्सिनचेही बघेन.' म्हणत लेकाने माझी समजूत घातली. पुन्हा एकदा लेक अवघड वळणावर उभा आहे. मोहाचे, कसोटीचे क्षण कसे हाताळेल त्यावर पुढला प्रवास ठरणार आहे. लेकाला चांगली बुद्धी दे एवढेच आता त्या रामराया कडे मागणे आहे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

खरच अवघड वळण पण तुम्ही तिघांनी छानच हँडल केलय हे कळतय.
यापुढेही तुमचा लेक स्वतःचे सुयोग्य निर्णय घेइलच याची तुमचे लेख वाचून खात्रीच वाटते. काळजी करु नका.
शुभेच्छा!

खूपच छान लिहिलंय तुम्ही.
मुलांच्या वाढीच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर पालक म्हणून आपणच आपल्याला हँडल करायला शिकत असतो असं वाटतं. Happy

हम्म... सुजाण पालक होणे जगातलं सर्वात कठीण काम असावं. भारतात तर त्याबद्दल काहीही प्रशिक्षण नाही. Sad

मुलाने पण सुस्कारा सोडला असेल. फायनली.
ले ट गो. त्याचे प्राय वेट लाइफ मध्ये आता आपण त्याच्या अपरोक्ष चर्चा करणे बरोबर वाटत नाही. एच पीवी वेक्सीन मुलांसाठी पण असते का? इथे भारतात फक्त मुलींवर त्याच्या ट्रायल्स केल्या आहेत. आता तुम्ही दोघे खूप धमाल करा. ए म्प्टी नेस्ट भावनेला दूर ठेवा शक्य तो. ही इज अ ग्रोन मॅन नाव.

>> ही इज अ ग्रोन मॅन नाव>> He is a dependent student and we are still liable for him. Here youth talk openly about their choice to wait, so no issues about privacy.

अमा, एच पी वी वॅक्सीन मुलांसाठी पण असते.

हं........अवघड वळण! एकंदरीतच हॅन्डल करायला कठीणच!
सुजाण पालक होणे जगातलं सर्वात कठीण काम असावं. +१०० विजय देशमुख.

छान लिहिलयं ..तुमच्या कडून खुप काही शिकण्यासारखे आहे..

सुजाण पालक होणे जगातलं सर्वात कठीण काम असावं.>> +१११००

पुन्हा एकदा धन्यवाद. शांत रहाणे मलाही सुरुवातीला फार कठीण जायचे. पण माझ्या फॅमिली डॉकने सांगितले - ' तुम्ही चिडला की नीट विचार करु शकत नाही आणि उलटा मुलांचा अपरहॅन्ड रहातो. त्यापेक्षा आपण नंतर बोलू असे सांगून मुलाला खोलीत पाठव. स्वतःला सावरायाला वेळ दे. '

निलीमा, इथे शाळा सुरु झाली की पहिल्या फुटबॉल होम गेमच्या निमित्ताने होमकमिंग डान्स, त्यानंतर फॉल संपताना येऊ घातलेल्या विंटर सिझन साठी स्नोकमिंग डान्स, वर्ष संपताना ज्युनियर आणि सिनियरच्या मंडळींसाठी प्रॉम असे असते. फ्रेशमन आणि सोफोमोरच्या पब्लीकला प्रॉम नसतो. काहीवेळा स्नोकमिंग डान्सला थीम असते तर काही वेळा फॉर्मल असतो. होमकमिंग आणि स्नोकमिंग डान्स शाळेतच अ‍ॅरेंज करतात. जरा कमी खर्चीक प्रकार असतो. मला फॉर्मल वेअर मधली मुलं-मुली बघायला फार आवडतं. Happy