'आभासकुमार गांगुली' अर्थात ' किशोर कुमार'!

Submitted by रसप on 4 August, 2012 - 01:04

एखादी कलाकृती निर्मित केल्यावर स्वत: कलाकारच त्या कलाकृतीच्या प्रेमात पडतो, तिच्या परिपूर्णतेने/ सौंदर्याने भारावून जातो आणि अचंबित होऊन विचार करतो की, "हे मीच बनवलं आहे?".. किंचित अभिमानाने वारंवार स्वत:च स्वत:ची पाठही थोपटतो. असंही वाटतं की, "बनवावं तर असंच, नाही तर काही करूच नये!"
अगणित कलाकृती निर्मित करणारा तो सगळ्यात मोठा कलाकार, जो कुठे आहे कुणालाच माहित नाही; पण त्याचं अस्तित्त्व अश्याच अफलातून कलाकृतींमधून जाणवत राहतं, तो विधाताही आपल्या काही निर्मितींच्या अश्याच प्रकारे प्रेमात पडला असावा; असं काहीसं मला काही व्यक्तींबाबत विचार केल्यावर बरेचदा वाटतं. अशीच एक व्यक्ती म्हणजे - 'आभासकुमार गांगुली' अर्थात ' किशोर कुमार'!

kishore-kumar-wallpaper.jpg

मी कुणी चित्रपट समीक्षक नाही, त्यामुळे मला 'आतल्या गोष्टी', किस्से-कहाण्या माहित नाहीत. मला एकच माहित आहे की, नाकातून शेंबूड वाहतो आहे हे जेव्हा मला कळायला लागलं त्या वयापासून मी किशोरचा भक्त आहे.... तो आजतागायत, जेव्हा डोळ्यातून पाणी वाहते आहे, हे कळेनासं होईपर्यंत दुनिया पाहून झाली आहे.

आज त्या माझ्या देवाचा ८४ वा वाढदिवस !
असं काय खास होतं त्याच्यात ?
फार जबरदस्त गायकी होती ? - नाही.
फार भारदस्त व्यक्तीमत्त्व होतं ? - नाही.
फार असामान्य अभिनयगुण होते ? - नाही..
फार अफलातून सौंदर्य होतं ? - नाही..
मग ?
हीच तर खासियत होती! गायन, अभिनय, लेखन, संगीत, दिग्दर्शन, निर्मिती, गीतलेखन सगळंच त्याने केलं आहे. आणि प्रत्येक क्षेत्रात आपला ठसा उमटवला. गायक किशोरकुमारचा ठसा सगळ्यात ठळक उमटला. नव्हे.. त्याच्या आवाजाने हृदयावर एकेक भावना कोरून ठेवली. त्याचा आवाज कुणाला शोभला नाही? अमिताभ, राजेश खन्ना, देव आनंद सारख्या सुपरस्टार्सपासून अमोल पालेकर, ऋषी कपूर सारख्या 'बॉय नेक्स्ट डोअर' नटांपासून ते अगदी गेलाबाजार अनिल धवन, फिरोज खान, राकेश रोशन पर्यंत प्रत्येकाच्या पडद्यावरील अस्तित्त्वाला जिवंतपणा देणारा आवाज किशोरचा होता. महान गायक अनेक झाले, आहेत. पण प्रत्येकाचा आवाज (मला तरी) कुणा ना कुणासाठी विजोड वाटला आहे; इथेच किशोर कुमार सगळ्यात वेगळा आहे.

सचिन तेंडूलकरच्या शतकांची गणती करताना एकदा एक समालोचक म्हणाला होता की, 'ह्याची जितकी शतकं ठोकून झाली आहेत, तितके सामनेही खेळायला मिळाले तरी कुणाचंही आयुष्य सार्थकी लागेल!'; तसंच 'किशोरची जितकी गाणी मनात घर करून आहेत, तितकी एकूण गाणीही कुणा गायकाला मिळाली तरी आयुष्य सार्थकी लागावं!'

आज असं वाटतंय की, बरं झालं... बरं झालं.. १३ ऑक्टोबर १९८७ पर्यंत मला फारशी समज आली नव्हती.. समजायला लागल्यापासून हेच समजलं की 'किशोर नाहीये'. नाही तर त्याच्या जाण्याच्या दु:खाने मन पोखरून ठेवलं असतं आणि ती पोकळी कधीच भरून निघाली नसती. बरं झालं.... मला तेव्हा काहीच समजत नव्हतं. म्हणूनच आजही, तो नसतानाही मला असं वाटतच नाही की तो नाहीये..

हॅप्पी बर्थडे किशोरदा.........
तेरा मुझसे हैं पहले का नाता कोई..
यूं ही नहीं दिल लुभाता कोई....

http://www.ranjeetparadkar.com/2012/08/blog-post_4.html

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

तेरा मुझसे हैं पहले का नाता कोई..
यूं ही नहीं दिल लुभाता कोई.... >>>> +१०००००००००

काय सुरेख लिहिलंस रे रणजित, फार फार म्हणजे फारच मस्त.....

असे एकदा ऐकले आहे की - पं. कुमारजींना (कुमार गंधर्व) आवडता गायक कोण म्हणून विचारण्यात आले तर ते म्हणाले किशोर कुमार, पुढे विचारले का, तर म्हणाले - दिलसे गाते है किशोरजी, गलेसे नही...

माझा सुद्धा आवडता ,गायक होता म्ह्टल्यापेक्षा अजुनही आहेच... मी आजही किशोरचे प्रत्येक गाणे ऐकते

सुरेख लिहले आहे Happy

हॅप्पी बर्थडे किशोरदा....

नक्की किती गाणी लिहावीत आणी मोजावीत हा प्रश्न पडलाय. आधी देव आनंद नंतर राजेश खन्ना मग अमिताभ ( धर्मेंद्र, जितेंद्र, शत्रुघ्न आदी होतेच) मध्ये मध्ये विजय अरोरा, विनोद मेहेरा झालेच. पण मला राजेश खन्नाला दिलेल्या आवाजापेक्षा अमिताभला दिलेला जास्त आवडला.

जहां तेरी ये नजर है( कालिया )

आदमी जो कहेता है ( मजबूर )

किसी बातपर मै किसीसे खफां हूं ( बेमिसाल ? )

काहीसा नटखट पण मर्दानी आवाज आता नाहीच मिळणार, गेंगाणे मात्र मिळतील.

किशोर गेला त्यादिवशी मात्र खूप रडले, नंतर कुठल्या कलाकाराविषयी एवढे हृदयातुन प्रेम नाहीच उपजले.:अरेरे:

किशोरचे नाव बदलले कारण त्याच्या नावाचा उल्लेख आभास असा न होता अब्बास असा व्हायचा.

काही 'ऐकीव' किस्से -

१. 'आनंद' मधील 'आनंद'ची भूमिका आधी किशोरला देण्याचे हृषीकेश मुखर्जींनी ठरवले होते. पण...............
त्याच सुमारास कुणा बंगाली निर्मात्याने किशोरचे पैसे बुडवले होते आणि अजून एका कामासाठी तो विचारणा करत होता. म्हणून किशोरने त्याच्या घराच्या वॉचमनला सांगून ठेवलं की 'कोई बंगाली प्रोड्युसर आये तो अंदर मत आने देना'. नेमके मुखर्जी पोहोचले आणि वॉचमनने प्रवेश नाकारला! किशोरच्या विक्षिप्त वागण्याचा कडेलोट समजून संतापलेले हृषीदा तडक राजेश खन्नाकडे गेले आणि रेस्ट इज हिस्टरी !

२. 'चलती का नाम गाडी' मधील गाडी किशोरची खूप आवडती गाडी होती. ती गाडी नंतर खूप जुनी झाल्यावर असं म्हणतात की किशोरने आपल्या घराच्या आवारात तिला पुरलं ! कारण घरचे लोक तिला भंगारमध्ये विकतील अशी त्याला भीती होती.

३. घराच्या आवारातील झाडांशी किशोर नेहमी गप्पा मारत असे!

४. 'पिया पिया मेरा जिया पुकारे...' ह्या आशा बाईंसोबतच्या गाण्यात एका कडव्यात आशा बाईंनी चुकून किशोरची ओळ गायला सुरुवात केली होती. पण तेव्हढ्यात किशोरने त्यांच्या तोंडावर हात ठेवून गप्प केले आणि आपली ओळ गायली. आजही रेकॉर्डिंगमध्ये मध्येच 'आ...' असा अर्धवट आवाज आला आहे. आशा बाईंनी म्हटलं की, 'दादा, अब फिर रेकॉर्ड करेंगे क्या ?' किशोर म्हणे - 'कोई बात नहीं.. स्क्रीन पे मैं ही हूं.. संभाल लुंगा!' आणि गाण्यातही किशोरने सोबतच्या नटीच्या तोंडावर हात ठेवून, झालेली चूक 'नैसर्गिक' भासवली!

तेरा मुझसे हैं पहले का नाता कोई..
यूं ही नहीं दिल लुभाता कोई.... >>>> +१०००००००००

........माय फेव्रिट सॉन्ग!!

रणजित धन्स या लेखासाठी .
..पण अजून माहितीपूर्ण करता आला असेही वाटले

छान, आटोपशीर लेख! किशोर मला जास्त गायक म्हणून आवडतो की अभिनेता म्हणून ते समजलेलं नाही अजून.

मधे मला माझ्या एका किशोर वेड्या मित्राने प्रितीश नंदीने ८५ साली घेतलेल्या किशोरच्या मुलाखतीची लिंक पाठवली होती. अफलातून आहे, जरूर वाचा...
http://songs.kishorekumar.org/pritish-nandy%E2%80%99s-extraordinary-inte...

अरे वा चिमणराव - तुम्ही ही जी किशोरदांच्या मुलाखतीची लिंक दिलीये ती मुलाखत आताच वाचली - फारच मस्त आहे - मनापासून धन्यवाद.

ही जी किशोरदांची मुलाखत आहे त्यातील सर्वात आवडलेला भाग -
किशोरदांचे खरे मित्र त्यांच्या बागेतील वृक्ष/ झाडे होती ज्या झाडांचे त्यांनी चक्क नामकरण (जनार्दन, रघुनंदन, जगन्नाथ, इ.) केले होते व त्या झाडांशी ते गप्पा मारत असत.

तेरा मुझसे हैं पहले का नाता कोई..
यूं ही नहीं दिल लुभाता कोई...<<<<< मी तर डाय हार्ट फॅन आहे ह्या गाण्याचा

अजून एक गाणे

मेरे मेहबूब कयामत होगी
आज् रुसवा तेरी गलियों मे मुहोब्बत होगी

ओह्ह!!

माहित नव्हतं ह्या स्पर्धेबाबत.. आत्ताच पाहिलं. विषय खूपच 'इण्टरेस्टिंग' आहेत. नक्कीच प्रयत्न करीन.

धन्यवाद, सिमन्तिनी व महागुरु.. Happy

मस्त Happy

rashmi + 1