लेखनस्पर्धा २०१३ - परीक्षकांची व प्रायोजकांची माहिती

Submitted by Admin-team on 9 July, 2013 - 00:22

या स्पर्धेचे विषय आणि स्पर्धेचे नियम यांच्याविषयी इथे माहिती मिळेल.

***

या स्पर्धेचं परीक्षण करणार आहेत ज्येष्ठ पत्रकार व संपादक श्री. आनंद आगाशे व सुप्रसिद्ध चित्रपटदिग्दर्शक व लेखक श्री. सुनील सुकथनकर.

AA Image.jpgसाक्षेपी संपादक व पत्रकार म्हणून श्री. आनंद आगाशे यांचा देशभर लौकिक आहे. भारतातल्या आणि परदेशातल्या असंख्य वृत्तपत्रसमूहांशी ते निगडित असून भारतातल्या अग्रगण्य इंग्रजी व मराठी वृत्तपत्रांमध्ये गेली तीन दशकांहूनही अधिक काळ पत्रकारितेचा त्यांचा अनुभव आहे. पुण्याच्या ’द इण्डिपेण्डंट’ आणि दिल्लीच्या ’द इंडियन एक्स्प्रेस’ या वृत्तपत्रांचे ते विशेष प्रतिनिधी होते. पुण्याच्या ’द इंडियन एक्स्प्रेस’मध्ये त्यांनी मुख्य वार्ताहर म्हणूनही काम केलं आहे, तसंच पुण्याच्या ’द टाईम्स ऑफ इंडिया’चे ते ब्यूरो प्रमुख होते. 'गोमांतक' समूह, गोवा यांचं मुख्य संपादकपद, मुंबई 'लोकसत्ते'चं साहाय्यक संपादकपद आणि पुणे 'लोकसत्ते'चं निवासी संपादकपद त्यांनी भूषवलं आहे. ’सकाळ मीडिया ग्रूप’चे ते संचालक-संपादक होते. श्री. आगाशे सध्या मीडियानेक्स्ट प्रा. लि. या मल्टिमीडिया कंटेंट क्षेत्रामध्ये काम करणार्‍या कंपनीचे अध्यक्ष असून 'मेनका प्रकाशना'चे संपादक आणि प्रकाशक आहेत.

sunilsukthankar.jpgश्री. सुनील सुकथनकर यांनी श्रीमती सुमित्रा भावे यांच्यासह मराठी चित्रपटांना वेगळं वळण दिलं. सातत्यानं आणि जाणीवपूर्वक दर्जेदार चित्रपटांची निर्मिती करून त्यांनी भारतीय चित्रपटक्षेत्रात खूप मोलाची कामगिरी केली आहे. चाळीसहून अधिक लघुपट, पाच लघुचित्रपट, तीन दूरदर्शन मालिका आणि 'दोघी', 'जिंदगी जिंदाबाद', 'वास्तुपुरुष', 'दहावी फ', 'देवराई', 'बाधा', 'नितळ', 'घो मला असला हवा', ’एक कप च्या’, 'बेवक्त बारिश', 'मोर देखने जंगल में', ’हा भारत माझा’, ’संहिता’ व आगामी ’अस्तु’ या चौदा चित्रपटांचं दिग्दर्शन त्यांनी केलं आहे. असंख्य राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पारितोषिकं त्यांच्या चित्रपटांना मिळाली आहेत. हे चित्रपट विसाहून अधिक देशांतल्या नावाजलेल्या चित्रपटमहोत्सवांमध्ये दाखवले गेले आहेत. एक उत्तम दिग्दर्शक म्हणून श्री. सुकथनकरांचा जसा लौकिक आहे, तसंच उत्तम लेखक, कवी, संकलक व अभिनेते म्हणूनही त्यांची ओळख आहे. त्यांच्या सर्व चित्रपटांची गीतं तर त्यांनी लिहिली आहेतच, पण ’मसाला’सारख्या चित्रपटांतली गाणीही त्यांच्या लेखणीतून उतरली आहेत. ’मिळून सायाजणी’, ’माहेर’, ’अनुभव’ यांसारख्या महत्त्वाच्या नियतकालिकांमधून त्यांनी विविध विषयांवर लेखन केलं आहे. ’शिवचरित्र आणि एक’ या 'नाटक कंपनी'नं रंगमंचावर आणलेल्या नव्या नाटकात सध्या ते मध्यवर्ती भूमिका साकारत आहेत.

***

या स्पर्धेचे प्रायोजक आहेत रोहन प्रकाशन, पुणे.

रोहन प्रकाशनाचं ब्रीदवाक्य आहे- 'घराला समृध्द करणारी पुस्तकं'! पुस्तकं प्रकाशित करणं, पुस्तकांद्वारे विविध विषय, विश्वसनीय माहिती, सर्वंकष ज्ञान योग्यरीतीनं जास्तीत जास्त वाचकांपर्यंत कसं पोहोचवता येतील, याचा विचार रोहन प्रकाशनानं नेहमीच प्राधान्यानं केला आहे.

१९८२मध्ये रोहन प्रकाशनाची स्थापना होऊन, १९८३च्या जानेवारीत 'जगावेगळी माणसं' हे 'रोहन'चं पहिलं पुस्तक प्रकाशित झालं आणि प्रकाशनविश्वातल्या वेगळया वाटचालीला सुरुवात झाली. सुरुवातीपासूनच रोहन प्रकाशनानं मराठी भाषेतील विविध विषयांतील व क्षेत्रांतील (उदा. साहित्य, सामाजिक, राजकीय, वैयक्तिक आरोग्य, कला, पाककृती) पुस्तकनिर्मितीवर भर दिला. त्याचबरोबर इंग्रजी भाषेतील काही गाजलेल्या व काही अभ्यासपूर्ण पुस्तकांचा अनुवादही ’रोहन’नं मराठीत आणला आहे. रोहन प्रकाशनानं घरातल्या सर्वांच्याच आवडीनिवडी व गरजा लक्षात घेऊन पुस्तकं प्रकाशित केली आहेत. म्हणूनच 'विषयांची विविधता राखणारी प्रकाशन संस्था' म्हणून रोहन प्रकाशन नावारूपाला आलं. चरित्र, इतिहास, राजकारण, समाजशास्त्र, शिक्षण, कला, रंगभूमी, संस्कृती, आरोग्य आणि औषधोपचार, योग, ललित साहित्य, विनोद, बालवाङ्मय, शिवणकाम, वीणकाम, क्रीडा, पाककला, साहस, संभाषणकौशल्य इ. विषयांवरील 'रोहन'ची पुस्तकं या विधानाची साक्षीदार आहेत. विविधतेबरोबरच मजकुराचं साक्षेपी संपादन व वाचकांना सोयीस्कर अशी पुस्तकांची मांडणी ही 'रोहन'ची वैशिष्टयं आहेत आणि त्याला जोड आहे ती उत्कृष्ट व आकर्षक निर्मितीमूल्यांची तसंच माफक किमतींची. म्हणूनच ही पुस्तकं इतर प्रकाशनांपेक्षा वेगळी उठून दिसतात.

रोहन प्रकाशनाला आतापर्यंत उत्कृष्ट साहित्य व पुस्तकनिर्मितीचे राज्य व राष्ट्रीय पातळीवरचे अनेक पुरस्कार मिळाले आहेत.

***

भारताला १५ ऑगस्ट १९४७ रोजी स्वातंत्र्य मिळालं आणि स्वयंपूर्ण, विकसित राष्ट्र बनण्याच्या दिशेनं भारताची वाटचाल सुरू झाली. या मार्गात अनेक चढउतार आले. दोन पावलं पुढे, चार मागे असे प्रकारही घडले. अनेकदा भारतानं कठोर परिश्रमांच्या जोरावर विकसित राष्ट्रांच्या पंक्तीत जाऊन बसण्याचा मान मिळवला. १९४७ - २०१३ या काळात भारताच्या वर्तमानाला आणि भवितव्याला आकार देणार्‍या अनेक घटना घडल्या. अनेक व्यक्तींचा त्यास हातभार लागला. या घटनांना, व्यक्तींच्या कार्यांना उजाळा देण्यासाठी आपण रोहन प्रकाशनाच्या सहकार्यानं आयोजित करत आहोत एक लेखनस्पर्धा.

विषय: