बारोमास - सदानंद देशमुख - पुस्तक परिक्षण

Submitted by हर्ट on 20 July, 2013 - 10:39

Mukhaprushtha Baromas.JPG

भारत देश हा कृषिप्रधान आहे आणि तरीही येथील शेतकरी अज्ञानी, कर्जबाजारी, दरिद्री, मागासलेला असा होता आणि अजूनही आहे. यामुळेच या समस्या लक्षात घेऊन शेतकर्यांची बाजू मांडण्यास आणि त्यांचे संघटन करण्यास महात्मा फुले यांनी सुरुवात केली. शेतकरी, शेतमजूर यांच्या हालाखीच्या परिस्थितीचे त्यांनी ’शेतकर्यांचा आसूड’ या ग्रंथात वर्णन केले आणि या ठिकाणी शिक्षणाशिवाय पर्याय नाही ही भूमिका परखडपणे मांडली. शे-सव्वाशे वर्षापूर्वी ‘शेतकर्यांचा आसूड' लिहिणार्या महात्मा फुलेंच्या पुस्तकामध्येही शेतकर्याचा कर्जबाजारीपणा व त्याच्या हलाखीच्या परिस्थितीचे भरभरून वर्णन आहे. शेकडो वर्षापासून शेती तोटय़ातच होती म्हणून परिणामस्वरूपी तो कायमच कर्जबाजारी राहिला, हे सूर्यप्रकाशाइतके स्पष्ट आहे. शेकडो वर्षापासून तो कर्जबाजारी होता तर तेव्हा तो आत्महत्या का करत नव्हता आणि आत्ताच गेल्या काही वर्षापासून तो आत्महत्या का करतो? त्याचे उत्तर साधे, सोपे आणि सरळ आहे. पूर्वी तो कर्जबाजारी जरी असला तरीही ‘भांडवल’ खाऊन जगण्याची त्याची सोय होती. जमिनीचा आकार बर्यापैकी होता. गोठय़ातील गुराढोरांचीही संख्याही मोठी होती. शेतात झाडांची संख्या भरपूर होती. आमराई होती. तेव्हा कठीण प्रसंगी जमिनीचा तुकडा, गोठय़ातील गुरेढोरे, झाडे तोडून विकून तो जगू शकत होता. आता मात्र हे भांडवल विकून खायचीही सोय शिल्लक नाही!

मागिल काही वर्षांमधे सामाजिक विषयांवरच्या मी कादंबर्या वाचल्यात. विश्वास पाटलांचं 'पांगिरा' आणि 'झाडाझडती' ही दोन पुस्तके वाचलीत, राजन गवस यांचे 'तणकट' वाचले, कविता महाजन ह्यांचे 'ब्र' आणि 'भिन्न' ह्या दोन कांदबर्या वाचल्यात, आणि सदानंद देशमुख ह्यांचे 'बारोमास' वाचले. ही सगळी पुस्तके मला प्रभावित करत गेली. ह्या सगळ्या पुस्तकांची एक शृंखला आहे असे मला वाटते. ह्या पुस्तकांमधून महाराष्ट्रातल्या पिडीत समाजाचं खूप चांगलं चित्रण झालंय. इथे सिंगापुरमधे 'वर्हाडी' भाषा कानावर पडत नाही. माझी मातृभाषा ही वर्हाडी असल्यामुळे 'बारोमास' ही वर्हाडी भाषेत लिहिलेली कांदबरी मला प्रचंड आवडली. बस आणि ट्रेनमधून ऑफीस ते घर आणि घर ते ऑफीस असा प्रवास करताना हे पुस्तक कधी मी वाचायला घेतले होते आणि कधी ते संपले हे कळलेच नाही. ह्या पुस्तकाचा आवाका फारच मोठा आहे. विषय कमालीचा ज्वलंत आहे. तुम्हाला शेतकर्याच्या सद्यपरिस्थितीचा अंदाज असो वा नसो, हे पुस्तक तुम्हाला सुरवातीपासून अगदी शेवटपर्यंत अस्वस्थ करते एवढे मात्र खरे.

आपल्या कथा, कादंबर्या व कवितांमधून ग्रामीण जीवनाचे मर्मभेदी व वस्तुनिष्ठ चित्र रेखाटणार्या बुलढाणा जिल्ह्यातील जानेफळ ह्या खेडेगावात राहणार्या साहित्यिक प्रा. सदानंद देशमुख ह्यांनी लिहिलेली ही कादंबरी आहे. शेतकरी व ग्रामीण जीवनाचा व्यापक वेध घेणार्या ह्या कादंबरीला २००४ चा साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त झालेला आहे. कृषी व्यवस्थेतील बदलांमुळे पारंपरिक-आधुनिक अशा पेचात सापडलेल्या शेतकरी कुटुंबातील सुशिक्षित-संवेदनशील तरुणांच्या वाट्याला आलेल्या भोगाचे यथार्त चित्रण 'बारोमास' कादंबरीतून घडते. शेती, शेतीचे सध्याचे स्वरूप व त्यातील डोंगराएवढ्या अडचणी निस्तरता निस्तरता होणारी शेतकर्याची होणारी दमछाक देशमुखांनी एका सुशिक्षीत तरुणाच्या व त्याच्या कुटुंबियाच्या माध्यमातून मांडली आहे.

ह्या कादंबरीतील मुख्य पात्र आहे- एकनाथ तनपुरे. तनपुरे कुटुंबात, एकनाथच्या व्यतिरिक्त त्याची बायको अलका आहे जिने एकनाथच्या शिक्षणाकडे बघुन त्याच्याशी लग्न केलेले आहे. एकनाथचा लहान भाऊ मधु. आई शेवंतामाय अस्सल शेतकरीण आहे तर वडील सुभानराव हाडामासाचे शेतकरी. या दोघांची थोरली बहिण मंगलाक्का लग्न होवुन आपल्या सासरी आहे. एकनाथ हा एम. ए. बी. एड. झालेला आहे. नोकरीसाठी लाच देऊ न शकल्याने एकनाथ वडिलोपार्जित शेती करु लागतो. धाकटा मधु पण शिक्षणात खुप हुषार आहे, पण त्याचीहि अवस्था बरोजगारीपायी एकनाथसारखीच आहे. मात्र तो शेती न करता गुप्त धनाच्या शोधार्थ आहे. 'बारोमास'मधील शेतीला पार्श्वभूमी आहे ती जागतिकीकरणानंतरच्या बदललेल्या सामाजिक परिस्थितीची. नोकरीतून मिळणारं स्थैर्य व सुखासीनता शेतीमध्ये मिळू शकत नसल्याने एकनाथची व त्याच्या कुटुंबाची होणारी घुसमट, कुठेच मार्ग दिसत नसल्यामुळे अंधश्रद्धकडे होणारी वाटचाल, आर्थिक स्थैर्याच्या अभावामुळे भावाभावात बिघडलेले संबंध व विस्कटलेली वैवाहिक नाती, नोकरीसाठीच्या असहायतेचा फायदा घेउन पैसे घेणारे व फसवणारे नोकरीचे दलाल, या परिस्थितीचा राजकीय फायदा घेणारे नेते आणि या सगळ्या गोष्टींचा परस्परसंबंध देशमुखांनी फार चांगल्या पद्धतीनं मांडला आहे. ही संपुर्ण कथा बारा महिन्याच्या कालावधीत घडते. यात लहरी निसर्ग, सावकार, बॅंका, भ्रष्ट सरकार आणि त्यांचे राजकारण, रोजंदारीवरील गडी असे सगळेच घटक आपापली भुमिका अगदी चोख बजावतात.

सदानंद देशमुखांची ही कादंबरी ही एकनाथची कथा सांगता सांगता आपल्या शेतीविषयक प्रश्नावर उत्तरे शोधायला आणि अधिक माहिती मिळवायलाही खूप मदत करते. एक कादंबरी वाचता वाचता आपण शेतकी विषयाचा अभ्यास करतो आहे असेही वाटून जाते. ह्यातील काही मुद्दे पहा:

१)आबाजीच्या शेतीसंदर्भातील विचारांतून 'पायखताचे' महत्त्व त्यांनी स्पष्ट केले आहे. पायखत म्हणजे शेतात एकसारखा माणसांचा वावर आणि माणसांचा वावर असल्याने अनेक अडचणी वेळीच लक्षात येतात, हे महत्त्व आबाजींनी पटवून दिले आहे.

२)चांगली मशागत, मजुरीचा प्रश्न व खर्च यासाठी यंत्रांचा वापर गरजेचा आहे, हे पटवून देण्यासाठी "बारोमास'मध्ये "चाफकटर' या शेती यंत्राचा उल्लेख आला आहे.

३)शेतीची नापिकता दूर करण्यासाठी सेंद्रिय व शेणखताचा वापर यासंबंधीचे कादंबरीतील भानुदास पाटील यांचे शास्त्रशुद्ध विचार मार्गदर्शक आहेत. "स्वच्छ शेत' ही मानसिकता बदलून काडी-कचरा कुजू देण्याचे महत्त्व ते स्पष्ट करताना दिसतात.

५) डॉ. सयाजीराव वखरे यांनी शेतकरी मेळाव्यात मिश्रशेतीचे महत्त्व स्पष्ट केले आहे. त्या वेळी त्यांनी उदाहरणादाखल एक तास तुरीचे आणि दोन तास इतर पिकांचे घेण्याचा सल्ला दिला आहे.

६) मिश्रशेतीप्रमाणेच पारंपरिक शेतीला पर्याय म्हणून वनशेती व निसर्गशेती करता येते, यावरही "बारोमास'मध्ये चर्चा केलेली आहे.

७) वनशेतीसंदर्भात श्यामभाऊ गट्टाणी यांचे स्वानुभव असे आहेत, "बोरं, आवळा, चिंच, सागवान, आंबा, सीताफळ अशा झाडांचा उपयोग आपण करू शकतो. एकरी एक लाख आवळ्याचे उत्पन्न घेणारे शेतकरी आम्ही जळगाव भागात पाहिले आहेत." (पृ. ६३) या उल्लेखातून पिकाचे महत्त्व व मागणीनुसार उत्पादने घेणे आवश्यक असते, हे स्पष्ट होताना दिसते. तसेच, श्यामभाऊ गट्टाणी यांचे जमिनीचा पोत, हवामान व जलसिंचन योजना यासंदर्भातील विचारही उद्बोधक आहेत.

८) देशमुखांनी 'पणन' या शेतीविषयक मुद्द्याचाही विचार केलेला आहे. शेतीमालाची योग्य साठवणूक, वाहतूक व योग्य वेळी विक्री होणे गरजेचे असते. ग्रामीण भागातील मालाला थेट बाजारपेठ उपलब्ध होणे गरजेचे आहे, तेव्हा समूहकार्याने स्वयंविक्री केंद्रे सुरू करता येतात, अशा प्रकारच्या 'चिंच परिवार' या संस्थेचा उल्लेख कादंबरीत केलेला आहे. स्थानिक पातळीवरच्या अशा उपक्रमांमुळे प्रवासखर्च वाचविता येतो. शेतीमालाची साठवणूक व विक्रीच्या तंत्रज्ञानासंदर्भात कृषी उत्पन्न बाजार समिती व गॅट कराराचाही उल्लेख केला आहे.

९) कादबरीच्या अभ्यासांती असा निष्कर्ष निघतो, की कर्जबाजारीपणा व त्यातून येणारी वैफल्यग्रस्तता हे शेतकर्यांच्या आत्महत्येचे मुख्य कारण आहे. या आत्महत्येच्या प्रश्नातून मुक्त होण्यासाठी शेतकर्यांच्या मालाला हमीभाव हाच कायमस्वरूपी उपाय आहे. त्यासाठी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून शेतकी चळवळ फोफावणे गरजेचे आहे व अशा चळवळीचे नेतृत्व एकनाथसारख्या ग्रामीण भागातील सुशिक्षित तरुणाच्या हाती असणे आवश्यक आहे, असे लेखकाने 'बारोमास'मध्ये सूचित केले आहे.

'बारोमास'
लेखक - प्रा. सदानंद देशमुख
किंमत १७५ रुपये,
पाने ३४९,
प्रकाशक कॉंटिनेन्टल प्रकाशन
========================================================================

-- बीMukhaprushtha Baromas.JPG

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बी छान लिहिलेत. मी 'बारोमास' नविन आलेले असतानाच वाचले. खूप मनाला भिडले. ह्या कादंबरीवर हिंदी चित्रपट येणार आहे असे मधे वाचण्यात आले. त्या कादंबरीत असाही उल्लेख आहेकी प्रसंगी आपण व्याजाने कर्ज काढून रोंजनदारी करणाऱ्या गड्याला त्याने मागितलेली रक्कम बिनव्याजी द्यावी लागते तर तो टिकतो.

विश्वास पाटील यांचे 'झाडाझडती' पण खूप वर्षांपूर्वी वाचले. तुमची परीक्षणे वाचताना सर्व पुस्तके डोळ्यासमोर उभी राहिली, पुन्हा वाचल्यासारखे वाटले.

इतकं छान परीक्षण लिहील्याबद्दल धन्यवाद. इतरत्र चांगलंच ऐकलंय. पण भाषेची अडचण आहे..

छान लिहिलंय बी. मला पण आवडलंय हे पुस्तक.
झीटा पिशिंयम, भाषेची खूप काही अडचण वाटली नाही मला वाचताना. एखादं-दुसरा शब्द अडतो, पण पुस्तक समजतं, पोचतं आपल्यापर्यंत.

http://www.maayboli.com/node/13296 इथे चंपकनी पण लिहिलंय या पुस्तकाबद्दल.

मी मायबोलीवरच वाचलं होतं या पुस्तकाबद्दल, नक्की कुणाची पोस्ट होती ते आठवत नाही, पण इथे वाचूनच पुस्तक घेतलं हे मात्र नक्की. (साजिरा, तु लिहिलं होतंस का कधी बारोमास बद्दल? )

असे पुस्तक लिहावे लागते आणि त्याला पुरस्कार मिळतो, पण त्यातील व्यथेला पुर्णविराम मिळत नाही हे दुर्दैव.

किमान यापुढेतरी असे पुस्तक लिहिण्याची कोणाची इच्छा होवू नये, अशी परिस्थिती यावी अशी अपेक्षा.

मी २ वेळेला वाचले आहे. साहित्य म्हणुन चांगले च आहे.

जरी शेतकर्‍यांची परवड दाखवली असली तरी त्यात बर्‍याच शंका निर्माण होतात.

हे ( तनपुरे ) कुटुंब पापी आहे, त्यांच्या बद्दल सहानभुती वाटायची सोडुन राग च येतो. सुनेला जेवण आणि साधे कपडे देण्याची ऐपत नसताना, मुलाचे लग्न करुन देतात आणि त्या मुलीच्या आयुष्याची वाट लावतात. ती सुन कपडे सुद्धा माहेरुन आणत असते.

तनपुरे कुटूंबाच्या हलाखी ला ते स्वताच जबाबदार आहेत असे वाटत रहाते. त्यांच्या कडे बर्‍यापैकी जमीन आहे, पाणी आहे ( विहिरीचा उल्लेख आहे आणि तिला पाणी असल्याचा पण ). २ च मुलगे आहेत. एक मुलगा शेती करायची सोडुन B-Ed करत बसतो, दुसरा मुलगा नुस्त्या उंडारक्या करत हींडतो.

बी, चांगलं लिहिलंयस रे परीक्षण. माझ्या अंगावर आली होती ही कादंबरी. भयाण वाटलेलं. शिवाय मला उपलब्ध असलेल्या (तुलनेने जास्त) सुरक्षित वातावरणाबद्दलही मनात अपराधी भावना दाटून आली होती. ('झाडाझडती' बाबतीत ती अजूनही तितकीच शिल्लक आहे.)
खरंतर मी बर्‍यापैकी त्रयस्थ राहून वाचायचा प्रयत्न केला होता. पण सदानंद देशमुखांचं लेखनच भिडलं असेल. सध्या ते लिहीत असलेलं 'भुईरिंगणी' हे सदरही छान आहे, आवडतंय.
वर्‍हाडी भाषेच्या गोडव्याबद्दल अगदी सहमत. 'पूर्णामायची लेकरे'तही वर्‍हाडी भाषाच आहे ना?

सई, हो ती गोनिंदाची कादंबरीपण वर्‍हाडी भाषेतच आहे पण गोनिंदाना तितकीशी चांगली वर्‍हाडी भाषा जमली नाही जेवढी सदानंद देशमुखांना जमली.

जबरदस्त कादंबरी आहे बारोमास. अस्वस्थ करणारी. पहिल्या पानापासून पकड घेते. बी, परिक्षण एकदम व्यवस्थित लिहिले आहेस.

ही कादम्बरी जिथे घडते त्या प्रदेशात राहिलो आहे. अत्यन्त मेलोड्रामॅटिक आणि बाळबोध वाटली. वर्हाडी लेखकाची मातृभाषाच असल्याने तिच्या अस्सलते बद्दल प्रश्नच नाही.ही कादम्बरी का गाजली हा खरा प्रश्न आहे. केवळ आत्महत्या हा विषय त्यावेळी 'इन'असल्याने अकारण उदो उदो झाला. खरे म्हणजे प्रसाद १९७१ यानी म्हटल्याप्रमाणे वर्हाडी निष्क्रीय मानसिकतेचा तो पट म्हणता येईल. बाकी साहियिक मूल्ये अभावानेच आहेत...