मुले व त्यांच्यात दिसणारी 'Loss' ची भावना..

Submitted by सीमा गायकवाड on 20 July, 2013 - 04:30

दु:ख, वेदना यांचा अनुभव केवळ एखाद्या जवळच्या व्यक्तीच्या मृत्यूमूळेच येत नाही तर इतरही अनेक गोष्टींचा Loss आणि त्यामूळे होणारा त्रास किंवा दु:ख आपल्याला होत असते. मात्र त्याकडे Loss असं म्हणून बघितले जात नाही. मनाला उदास वाटणे, चुकल्या चुकल्यासारखे वाटणे, मनाला न करमणे, चिडचिड यासारखी भावनिक आंदोलने किंवा स्थिती आपण अनुभवतो पण त्याखाली आपल्यासाठी महत्वाची असणारी कुठली तरी गोष्ट आपण गमावलेली असू शकते.

अशा कोणकोणत्या गोष्टी असतात? ज्याने आपल्याला वरील प्रकारच्या भावनांना सामोरे जावे लागते?
उदा. एखाद्या ठिकाणी/घरात आपण काही काळ राहिलो तरी त्या जागेशी आपला बंध निर्माण होतो आणि म्हणूनच ते घर किंवा ती जागा सोडावी लागली तर आपल्याला त्रास होतो. जसं आपलं राहतं घर सोडण्याचा त्रास होतो तसंच आपलं गाव, शहर, प्रांत किंवा देश सोडावा लागण्याचा देखिल भावनिक त्रास होऊ शकतो. या त्रासाची तीव्रता दु:ख म्हणण्या इतपत जास्त असू शकते. कामानिमित्त परप्रांतात किंवा परदेशी राहिलेल्या व्यक्ती याच्याशी Identify करू शकतील कारण दुसर्‍या देशात रहतानाच आपल्या देशाबद्दलची अस्मिता, संस्कृती, राहणीमान याबद्दलच्या जाणिवा मायदेशी असतानाच्या तुलनेत जास्त प्रखर होत असतात. कारण आपण या गोष्टी दुसर्‍या देशात मिस करत असतो.

Loss झाल्याच्या भावनेला तोंड देणे, सहन करणे, नविन परिस्थितीशी जुळवून घेणे (Coping) प्रौढ व्यक्तींना मुलांच्या तुलनेत सोपे जाते. या भावनेमधून बाहेर पडण्यासाठी आवश्यक अशा Coping Mechanisams मुलांमध्ये कमी असतात. म्हणून मुलांना यासाठी आपली मदत लागू शकते.

मी एका इंटरनॅशनल स्कूल मध्ये कौन्सेलर म्हणून काम करते. या ठिकाणी इतर देशांमधून शिक्षणासाठी आलेली मूले किंवा काही काळ भारताबाहेर राहून आता परत मायदेशात आलेली मूले या शाळेत आहेत. या मधल्या अनेक मुलांमध्ये विस्थापनामूळे (Migration) झालेले दु:ख आणि म्हणून नविन देशाला मोकळेपणाने स्विकारण्यामध्ये येणार्‍या अडचणी दिसून येतात, परिणामी इथले वातावरण, चालीरिती, संस्कृती, खाण्यापिण्याच्या पद्धती, पेहेराव यांना नावं ठेवणे, नाकारणे किंवा अंगवळणी पडू न देणे याबरोबरच इथल्या लोकांचा राग राग करणे यासारख्या गोष्टी दिसतात. अशा समस्या दिसणार्‍या मुलांना मदत करताना वर उल्लेख केलेले Loss च्या नजरेतून बघितले तर या मुलांना समजून घ्यायला, इथे रूजायला मदत करता येऊ शकते.

घर सोडल्याचा, प्रांत/देश सोडल्याचा जसा Loss अनुभवाला येतो तसंच पाळिव प्राण्याचा मृत्यू होणे, मित्रमैत्रिणी सुटणे, आवडतं खेळणं हरवणे/मोडणे यासारख्या गोष्टींचा देखिल Loss मुलांना अनुभवाला येऊ शकतो. हे लक्षात घेतलं की मुलांना होणार्‍या त्रासाचं, दु:खाचं काय करायचं हे आपल्याला कळू शकतं.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अभ्यासपूर्ण लेख आहे.
मृत्यूमुळे होणारे दु:ख हे त्या त्या घराशी भावनिक नात्याने जोडले जात असल्याने तिथे होणार्‍या दु:खाकडे 'त्रास' म्हणून पाहिले जात नाही. कालौघात ते दु:ख विरून जाते मात्र गेलेल्या व्यक्तीला किमान घरातील एखादीतरी व्यक्ती कधीच विसरू शकत नाही. त्यामुळेच मृत्यू ही घटना वैयक्तिकपणे पाहणे गरजेचे बनते. मनाला उदासी येणे, चिडचिड निर्माण होणे....आदी घटनाही तात्पुरत्या स्वरूपाच्या असतात. सबब त्या अवस्थेला 'लॉस' म्हणता येईल का नाही, असा प्रश्न उभा राहू शकतो.

अन्य दिलेल्या उदाहरणापैकी घर वा जागा सोडण्यामुळे जो मानसिक त्रास होतो त्यामागे दुहेरी चित्र असू शकते. एक म्हणजे त्या जागेशी असलेले आपले नाते हळवे झाले असेल तर ते नाते आता संपुष्टात येणार म्हणून होणारा मानसिक त्रास तुम्ही आम्ही समजू शकतो. पण मी अशाही काही राहत्या जागा/घरे पाहिली आहेत की तिथून कधी एकदा आपण बाहेर पडून नव्या घरी जातो असेही होऊन गेले होते. कारणे काहीही असो, पण ती जुनी जागा सोडताना उलटपक्षी आनंदही झाला होता. नोकरीनिमित्ताने गाव सोडावे लागले होते, ते अनेकांना सोडावे लागतेच....पण नव्या बदललेल्या जागी जुळवून घेण्याची केमिस्ट्री जमली की त्रासाची धारही कमी होते....अर्थात हे मी पुरुषांविषयी बोलतोय....स्त्रियांचा प्रश्न वेगळा असू शकतो याबाबतीत.

मुलांच्या कोवळ्या वयात लॉसची भावना त्याना नक्कीच त्रासदायक ठरू शकतो. मात्र तुमच्या कौन्सिलिंग सिलॅबसमध्ये त्यावर नक्कीच उपाय सुचविले असतात. नवीन परिस्थितीत प्रौढ व्यक्तीला नव्या स्थितीशी जुळवून घेणे काहीसे सोपे जरूर जाते, पण त्या तुलनेत जरी मुलगा त्या भावनेतून लवकर बाहेर पडू शकला नाही तरी त्या बाहेर न पडण्याचे रुपांतर 'त्रासा' मध्ये होऊ नये यासाठीच मला वाटते कौन्सिलिंग सायन्स काम करीत असेल.

तुम्ही मायग्रेशनला 'विस्थापित' का म्हटले आहे ते समजले नाही. मायग्रेशन = स्थलांतरीत होणे... म्हणजे काही विशिष्ट काळासाठी तो मुलगा/ती मुलगी अ गावाहून ब गावात आलेली असल्याने त्याला/तिला होणारा लॉसचा त्रास तात्पुरत्या स्थितीचा असणार. विस्थापित म्हणजे कायमपणे एक जागा सोडून दुसर्‍या जागेत राहाण्यासाठी गेलेले कुटुंब. [देशाच्या फाळणीच्या वेळी तशी परिस्थिती आपल्या बांधवांवर आली होती, तो त्रास केवळ असह्य होता.]

मित्रमैत्रिणी, खेळांची मौजमजेची, हवामानाची नित्याची स्थळे सुटल्यामुळे मनी दाटणारी वेदना ही नक्कीच लॉस सदरात येतात....अन् त्याला इलाजही नसतो.

अशोक पाटील

कायमस्वरूपी कराव्या लागणार्‍या विस्थापनाच्या मुद्द्याकडे लक्ष वेधल्याबद्दल धन्यवाद. मायग्रेशनच्या जोडीने इमिग्रेशन बद्दलही लेखामध्ये बोलणे आवश्यक होते. कायमस्वरूपी झालेल्या स्थलांतराचे मनावर होणारे परिणाम किंवा त्रास दिर्घकाळ टिकणारा खोलवर परिणाम करणारा व गंभीर असू शकतो. विशेषत: नैसर्गिक आपत्ती, युद्ध, दंगल, फाळणी यांसारख्या कारणामूळे झालेल्या विस्थापितांच्या त्रासाकडे लॉस च्या फ्रेमवर्क मधून आणि इतरही अनेक मानसिक परिमाणांमधून बघण्याची गरज असू शकते.
दुर्दैवाने विस्थापितांचे मानसिक आरोग्य हा एक महत्वाचा विषय जगभर दुर्लक्षिलेला आहे.

अशा त्रासातून बाहेर कसं यायचं, मुलांना समजून कसं घ्यायचं याबद्दलही जर लिहिता आले तर अवश्य लिहा. आजूबाजूच्या वातावरणाशी, माणसांशी, परिस्थितीशी जुळवून घेण्यासाठी काय करता येऊ शकते? कोणत्या प्रकारे ही प्रक्रिया कमी त्रासाची होऊ शकते?

अशा त्रासातून बाहेर कसं यायचं, मुलांना समजून कसं घ्यायचं याबद्दलही जर लिहिता आले तर अवश्य लिहा. आजूबाजूच्या वातावरणाशी, माणसांशी, परिस्थितीशी जुळवून घेण्यासाठी काय करता येऊ शकते? कोणत्या प्रकारे ही प्रक्रिया कमी त्रासाची होऊ शकते?
अनुमोदन

अशा त्रासातून बाहेर कसं यायचं, मुलांना समजून कसं घ्यायचं याबद्दलही जर लिहिता आले तर अवश्य लिहा. आजूबाजूच्या वातावरणाशी, माणसांशी, परिस्थितीशी जुळवून घेण्यासाठी काय करता येऊ शकते? कोणत्या प्रकारे ही प्रक्रिया कमी त्रासाची होऊ शकते?
अनुमोदन

लेख आणि विचार आवडले.

मी एका इंटरनॅशनल स्कूल मध्ये कौन्सेलर म्हणून काम करते>>>> आपले अनुभव देखील वाचायला आवडतील Happy

मी एका इंटरनॅशनल स्कूल मध्ये कौन्सेलर म्हणून काम करते>>>> आपले अनुभव देखील वाचायला आवडतील +१०००

नक्की लिहा... वाचायला आवडतील. तसेच अनेकांना इथे कामात पडतील.