अनाकलनीय मराठी - १

Submitted by यःकश्चित on 8 July, 2013 - 03:27

अनाकलनीय मराठी - १
====================================================

मराठी !!

महाराष्ट्राच्या नसानसातून धैर्याने आणि शौर्याने उसळणाऱ्या रक्ताचे आमरण विशेषण म्हणजे मराठी.

"गोल" पृथ्वीच्या कुठल्याही "कोपऱ्यात" अभिमानाने सांगायची गोष्ट म्हणजे मराठी.

मराठी भाषा आहेच तशी. सर्वात समृद्ध, संपन्न भाषा. "अमृतातेही पैजा जिंके" असं म्हणतात ते काही उगाच नाही. आता या मराठीचा वापर करून काहीजण निवडणुकाही जिंकतात ही गोष्ट निराळी. सोडा, तो आपला विषय नाही. तसा मी लहानपणापासूनच राजकारणापासून चार हात दूर. मी बाल असताना म्हणे, मला नुसतं खुर्चीवर बसवलं तरी मी भोंगा सुरु करायचो. असो ! समृद्ध आणि सर्वगुणसंपन्न अश्या या मातृभाषेबद्दल प्रचंड आदर असला तरी माझ्या निरागस मनाला पडलेल्या काही बाळबोध प्रश्नांना अजुनी उत्तरे मिळाली नाहीयेत.

उदा. मतदान करण्याचा अधिकार अठरा वर्षे पूर्ण झाल्यावर मिळतो, हे मला कळून चुकले.

आता या वाक्यातील " कळून चुकणे " हा वाक्प्रचार मला जरासा खटकतो. जर मला कळलंय तर मग मी चुकतो कसा ? आणि जर मी चुकलोय तर मग मला कळलंय असं कसं म्हणता येईल ? बाकी मतदान करताना लोक " कळून " सुद्धा पुन्हापुन्हा " चुकतात ", ही गोष्ट मला स्वातंत्र्यप्राप्तीनंतर दर पाच वर्षांनी कळत आलेली आहे.

मराठी वांड़मयात असे द्विशाब्दिक वाक्प्रचार बरेच आहेत. त्यातल्या दोन शब्दांना दोन वेगळे अर्थ असतात. पण त्यातला नेमका कुठल्या शब्दाचा अर्थ वाक्यात लावायचा हे न कळल्याने मी सहसा वाक्यात असे वाक्प्रचार वापरतच नाही. जसे की, अन्न टाकून देणे म्हणजे अन्न टाकायचे का द्यायचे ? किंवा अन्न खाऊन टाकणे म्हणजे अन्न खायचे की टाकायचे ? कमाल आहे !!

ह्या द्विशाब्दिक प्रमाणे एक शाब्दिक वाक्प्रचार देखील फार गंमतशीर आहेत. वर्तमानपत्रात बातमी असते , चोरट्याने रस्त्यावरील बाईचे मंगळसूत्र लांबविले.(!) किंवा असे म्हणतात की देवासमोर नारळ वाढविला(!). छे छे वाढविला काय ..लांबविला काय ! यात आपण न अडकलेलच बरं.

ह्या मराठीबद्दल आणखी एक गोष्ट सांगायची म्हणजे मराठीला शब्दांचा तुटवडा नाही. अगणित शब्दसंग्रह असलेल्या या मराठीत मराठी भाषिक रोज नवीन नवीन शब्दांची भर टाकत असतात. तसेच त्यांचा वापर दैनंदिन जीवनातही बऱ्याचदा करतात. हे मराठी भाषिक आपल्या पोराबाळाची नावे काय ठेवतील हे सांगता येत नाही. तसेही मराठी भाषिक नावे ठेवण्यात पटाईत आहेत म्हणा ! एखाद्या मराठी भाषिकाकडे नामकरण करताना त्यांच्यातला मराठी भाषिक जागा होतो आणि मग बहिणभावंडांची नावे ही यमकच असावी या अलिखित नियमाचे ते पालन करू लागतात. आता बहिणभावंडांची नावे यमक कशाला हवीत ? मग यातून गमती सुरु होतात.

आमच्या एका मित्राचच उदाहरण घ्या. त्यांना जुळ्या मुली झाल्या. जुळ्यावरून आठवलं, मराठी भाषिक बोलतानापण इतक्या गावंढळ चुका करतात. वरचेच वाक्य घ्या. ते म्हणतात की, आमच्या मित्राला दोन जुळ्या मुली झाल्या. बाबा रे , दोन झाल्या म्हणूनच जुळ्या म्हणतात ना ! तीन असत्या तर त्यांना तिळे झाले असे म्हणाले नसते का ? "गाईच गोमुत्र" हादेखील त्यातलाच प्रकार.

तर विषय असा होता की आमच्या मित्राला जुळ्या मुली झाल्या तर त्यांनी त्यांची नावे "पूर्वा" आणि "दुर्वा"(!) ठेवली. ( अश्याने भविष्यात मुलांना वनस्पती आणि माणूस यातला फरक समजायचा नाही. )

हे तर काहीच नाही. एका जोडप्याने कमालच केली. त्यांच्या चार वर्षाच्या "दर्पण"ला भाऊ झाला तर त्याच नाव त्या जोडप्यांनी "दर्पण"ला यमक म्हणून "तर्पण" असं ठेवलं. बहुधा त्यांना तर्पणचा अर्थ माहित नसावा. आता तिसरा मुलगा झाल्यावर त्याच नाव "तर्पण"ला यमक म्हणून "सरपण" नाही ठेवलं म्हणजे मिळवलं.

मराठी भाषेत म्हणींचाही काही ( कमी ( रेफरन्स : गाईच गोमुत्र ) ) तुटवडा नाही. पण ह्या म्हणी आणि त्यातील तर्कविसंगती मला बर्याचदा बुचकळ्यात पाडते.

" अति शहाणा त्याचा बैल रिकामा ".

यातील " अति शहाणा" आणि " बैल" यांचा काय संबंध आहे हे मला आजतागायत कळलेले नाही. अतिशहाणे लोक बैल पाळतात का ? का बैल पाळणारे लोक अतिशहाणे असतात ? मुळातच अतिशहाणे लोक बैल पाळण्यापेक्षा अति नफा मिळवून देणारा व्यवसाय करतील ना ! किंबहुना माझ्यामते बैलच अति शहाणा असल्याने तो या अतिशहाण्यांकडे न जाता एखाद्या सुस्वरूप व सुलक्षणी गाईला घेऊन तिच्याच बापानी हुंड्यात दिलेल्या एखाद्या हिरव्यागार कुरणात संसार थाटेल.

काही म्हणी मात्र मला अमराठी प्रांतातून आल्यासारख्या वाटतात. " अंगापेक्षा बोंगा मोठा " ही म्हण दक्षिणात्य "कथकली" या नृत्यप्रकारातल्या पोशाखावरून आली असावी. "नाकापेक्षा मोती जड" हा साक्षात्कार आफ्रिका/इजिप्त किंवा कुठल्यातरी आदिवाश्यांना नाकपुड्यांच्या मधल्या जागी मोठ्या मोठ्याची नथ घालताना झाला असावा.

असो ! तूर्तास येथे मी लेखणीला स्वल्पविराम देतो. पुन्हा भेटूया मराठीतल्या नवीन गमती घेऊन.

रामराम मित्रांनो...

Group content visibility: 
Public - accessible to all site users

दक्षिणा>> अगदी अगदी. मायबोलीवर त्यामानाने मी नविन आहे त्यामुळे धन्स, मेलणे, वगैरे वाक्प्रचार एवढे रुढ असलेले पाहून हबकले होते.
मुळात ईंग्रजाळलेली किंवा हिंदीमिश्रित मराठी ऐकली की डोक्यात तिडिक जाणारी मी... दैवगतीनं लग्नानंतर असंच अशुद्ध मराठी बोलणार्‍यांच्यात येऊन पडले आणि इथे तर वाक्यागणिक बोलणार्‍याचं तोंड धरून ठेवावं की काय असं वाटू लागलं. 'न' चा 'ण' आणि 'ण' चा 'न' करणे ही तर कायम थेट डोक्यात जाणारी गोष्ट. "वान्याकडे जाऊन सामाण भरुयात...." वगैरे... Sad Uhoh

दुसरं एक... मी म्हणलो. Angry

"ते तसं असणार" असं म्हणायच्या ऐवजी "ते तसं अशणार" असं म्हणणारे काही लोक आहेत…. ते खटकतं…

पण शेवटी मुद्दा हा आहे, की प्रत्येक १२ कोसांवर भाषा बदलते म्हणतात…त्यामुळे कुठलीच एका ठिकाणची भाषा शुद्ध वा अशुद्ध असू शकत नाही… फारतर एखादी मराठी "प्रमाण" मराठी फक्त लिहिण्यासाठी म्हणून असणं गोष्ट वेगळी…त्याचा उद्देश फक्त "communication gap" होऊ नये एवढाच असावा…बाकी जोवर संभाषण हा भाषेचा मूळ उद्देश साध्य होत आहे, तोवर चिंता कशाला ? उलट वेगवेगळ्या भाषा शैलींचा आनंद घ्यावा!

दक्षिणा, बेफि >> अनुमोदन. धन्स, धन्यु, 'शकतात' वाचताना चिडचिड होते.

असच अजून एक म्हणजे - "तू तिथे गेलास तर तुला अमुकमुक दिसेल" ह्या ऐवजी "तू तिथे जाणार तर तुला अनुकअमुक दिसणार". मला वाटतं ह्याचं सर्वोत्तम उदाहरण म्हणजे होम मिनिस्टर मधला आदेश बांदेकर.

नगरी माणुस ओळखायचा असेल तर तो बर्‍याच ठिकाणी रहातोच... जस की काय करुन राहिलास, काय खाउन राहिलास , कुठ जाऊन राहिलास, काम करुन राहिलास का.
माझा खांदेशी मित्र - खाउन टाकल .... आम्ही - काय हे खाउन लगेच कस काय टाकलस....

फक्त मराठीतच नव्हे हिंदितही काही वाक्यरचना वगैरे माझ्या डोक्यात जातात.

मै कर दूंगा च्या ऐवजी काही लोक करदेता मै, किन्वा मै करेगा.. असं बोलतात.
इतका अपभ्रंश आपल्या राष्ट्र भाषेचा? Uhoh

हिंदी बंबैया भाषा मला आवडते.. त्यात एक अदा आहे. त्यामुळे त्यात मला काही खटकत नाही.
(सिनेमामुळे असेल Happy खास करून सत्या)

तशिच मराठीतही परिक्षा का असु नये ?

ही: ही: ही:!
असावी ना. कोण प्रश्नपत्रिका करणार नि मुख्य म्हणजे कोण तपासणार?
नि चुकून कुणि पास झाले तर पुढे काय?

चाबकाने बडवावेसे वाटते.
एव्हढे रागावू नका हो. हळू हळू होईल सवय त्याची पण. अनुभवाचे बोल आहेत. गेल्या साठ वर्षात काय काय बदल झालेले पाहिलेत, सगळे पचनी पडत नाहीत, कारण बरेचसे कळतच नाही की हे इंग्रजी की हिंदी की मराठी.

सगळ्यात धक्का बसला तो म्हणजे २००५ साली पुण्यात आलो तेंव्हा. मी सहा महिने रहायचे असे ठरवून नोकरी वगैरे शोधली. आम्ही तिघे उपाहारगृहात चाललो होतो. एका बाजूला शिंदे, एका बाजूला कुळकर्णी, नि दोघेहि हिंदीत बोलत होते! मी विचारले कारे बाबानो हिंदी बोलता, मराठी येत नाही का? तर म्हणे आजकाल असेच बोलायची पद्धत आहे.
मी जवळच्या बँकेत खाते उघडायला म्हणून गेलो. पहिल्या एक दोन प्रश्नोत्तरांनंतर तिथला माणूस मला म्हणतो, आप हिंदीमे बोलिये, अच्छा रहेगा! हे भर पुण्यात!!

झाली सवय नि काय?

"We must speak MarathI only. After all it is our mothertongue!!" असे मराठी विश्व च्या सभेत ऐकले. त्याचीहि सवय करून घेतली. (बिचारा नुकताच भारतातून आला होता. त्याला वाटले अमेरिकेत म्हणजे इंग्रजी बोलायचा कायदा आहे!)

भारतीय लोक अमेरिकेत येऊन जे इंग्रजी बोलतात त्याचीहि सवय करून घेतली. कधी कधी आजूबाजूच्या गोर्‍यांना त्याचे अमेरिकन मधे भाषांतर करून सांगावे लागते!

फारसे मनाला लावून घेऊ नका. गंमत म्हणून लिहायला, वाचायला ठीक आहे.
खरे तर बंबैय्या हिंदी किंवा सिनेमातली टपोरी भाषा राष्ट्रभाषा करायला पाहिजे. त्यात कसे हिंदी, गुजराती, तमीळ, इंग्रजी सगळे शब्द चालतात. तो का ती वगैरेचे बंधन नाही.

सध्याची ई टीव्हीवरची सगळ्यात महान गोष्ट.. मराठी करोडपती... इथे कोट्याधीश असा शब्द वापरायला काय बंदी होती का देव जाणे..

कोण प्रश्नपत्रिका करणार नि मुख्य म्हणजे कोण तपासणार? >>>

प्रश्नपत्रिका मंडळ बनवते, आणि तपासायचा प्रश्नच नाही कारण ही प्रश्नपत्रिका बहुपर्यायी आणि संगणकिय (MH-CET सारखी) असेल.

फायदा :- यामुळे महाराष्ट्रात वेगवेगळ्या प्रांतात मराठी बोलिभाषा कशी बोलली जाते, हे कळेल आणि भाषेवरुन (किमान एकाच भाषेवरुन) तरी वाद कमी होतील.

Lol Lol
हसुन हसुन मेले मी... कसली मस्त चर्चा सुरु आहे...प्रत्येक भागात भाषा बदलते..

माझा एक मित्र औरंगाबादचा आहे आणि तो त्याच्या भावांबरोबर नेहमी हिंदी मधे बोलतो..देव जाणे का? Sad
हिंदी कुत्रा चावलाय असं मला वाटत..

आणि त्याच मराठी ..."एक घंटा लागेल"...त्याला एक तास बोलताच येत नाही..."सक्-सकाळी उठाव लागल"..सक्-सकाळी ???? असा शब्द आहे का?

मी जेव्हा घरि जाते( ता.वाई) , माझी भाषाच बदलते.. अगदी " त्यो कुठ गेलाय? " अस काही तरी..मला खुप छान म्हणताना त्रास Happy होतो... ..पण "लय भारी "सहजच येत तोंडात..पक्का गावठी ठेका..
लहानपणापासुन तसच बोलतेय...पुण्यात होते तेव्हा थोडी सुधारणा होती...पण परदेशी आल्यापासुन पुन्हा गेले पहिल्या वळणावर... लेकी ला पण कधी कधी " ए पोरी ..." अस होतय...

बोली भाषेचा एक स्वतंत्र गोडवा, 'लहेजा' असतो आणि तो ऐकायला छान वाटतो. पण लेखी भाषेला एक प्रमाण असतं. सकाळ (निदान ई-सकाळ) च्या काही काही बातम्यांमधली भाषा वाचल्यावर खटकते. उदा. भारताच्या धावसंख्येत सर्वात मोठा वाटा शिखर धवन च्या खेळीचा 'राहीला'. हे सरळ सरळ हिंदीतून मराठीत भाषांतर केल्यासारखं वाटतं. हल्ली मराठी वर्तमानपत्रातून सर्रास 'राडा' वगैरे शब्द वाचायला मिळतात.

बाकी झक्कींच्या भारतीय लोकांच्या अमेरिकेतल्या ईंग्लिश विषयीच्या निरिक्षणाला अनुमोदन. पु. लं. च्या 'ते ईंग्रजी ऐकल्यावर ईंग्रज हा देश सोडून का गेला हे पटतं' ह्याची बरेचदा आठवण होते.

जो_एस | 10 July, 2013 - 10:38 नवीन
http://www.marhati.com/?p=10183
हे घ्या येशील येशील....
----------------------
बेफ़िकीर | 10 July, 2013 - 10:40 नवीन
फिदीफिदी कसलं भयंकर गीत आहे ते
<<

अग्दी अग्दी!
कोण रे तो बापट? मराठी कशी लिहितात बोलतात ते समज्तं का? बॅड बॉय कुठला!

फायदा :- यामुळे महाराष्ट्रात वेगवेगळ्या प्रांतात मराठी बोलिभाषा कशी बोलली जाते, हे कळेल आणि भाषेवरुन (किमान एकाच भाषेवरुन) तरी वाद कमी होतील.

मग त्यासाठी परीक्षा कशाला? परीक्षा पास झाल्याने अक्कल येते, ज्ञान वाढते असे वाटते का?
एक शब्द्कोष, समानार्थी शब्दांचे एक पुस्तक लिहा.
ज्याला वाटेल तो/ती ते पुस्तक घेऊन वाचतील.
फक्त जेंव्हा च्यूंग चांग असे शब्द येतील भाषेत तेंव्हा ते पण नवीन आवृत्तीत येऊ द्या.
नि महाराष्ट्रात वाद कमी? काय स्वप्ने बघता राव!

जळगाव ,धुळे भागात वळणे याला 'फाकणे' असे म्हणतात.
' डावीकडे वळा' ऐवजी 'डावीकडे फाका' असे म्हणतात.

"तर्पण" असं ठेवलं. बहुधा त्यांना तर्पणचा अर्थ माहित नसावा
>>
लोक चक्क "पार्थिव" नाव ठेवतात आता याच अर्थ पवित्र असला तरी कोणत्या संदर्भात शब्द वापरला जातो?

निलिमा पार्थिव चे अनेक अर्थ आहेत, एक तू लिहिलास तो, दुसरा म्हणजे राजा
आणि तिसरा म्हणजे निर्जिव

असो. मला जोशी हे आडनाव उच्चारताना त्यातल्या 'जो' चा उच्चार 'जुदा' मधल्या ज सारखा करतात. माझं आडनाव तेच असल्याने रागाने तिळपापड होतो. :रागः

दक्षिणा | 10 July, 2013 - 11:45
निलिमा पार्थिव चे अनेक अर्थ आहेत, एक तू लिहिलास तो, दुसरा म्हणजे राजा
आणि तिसरा म्हणजे निर्जिव

>>
वा! राजा हा अर्थ माहित नव्हता. तरी नविन जन्मलेल्या बाळाला पार्थिव म्हणायचे म्हणजे ...

पार्थिव चा मला माहीत असलेला अर्थ म्हणजे मातीपासून बनलेला. गणपती बसवताना जी पूजा करतात त्यात "पार्थिव गणेश" असे त्या मुर्तीचे वर्णन ऐकल्याचे आठवते.

झक्की :- परिक्षेव्यतिरिक्त वाचणारे (तेही मराठी) किती आहेत? म्हणुन मी परिक्षा म्हटलं. आणि वाद करणे आणि त्याचा गोंधळ घालणे यात फरक आहे, मी वाद म्हणजे राडा या अर्थाने म्हणालो होतो. नाही पटलं तर सोडुन द्या.

अमेरिकेचच उदाहरण देतो. व्हॉईस ऑफ अमेरिका या रेडिओ चॅनेलवर एक खास कार्यक्रम असतो, अमेरिकन इंग्रजी शिकण्यासाठी, तो का म्हणुन?

उगाच भारतीयांना "तुमचं इंग्रजी..." वरुन हिणवतात, तसच महाराष्ट्रात होतं, ते होऊ नये म्हणुन मी परिक्षा (टोईकच्या धर्तीवर) म्हणालो. किमान प्रत्येकाला आपलीच मराठी तेव्हडी श्रेष्ठ असं वाटणार नाही तर इतरांना हिणवल्या जाणार नाही. आणि मी परिक्षा या शालेय मराठीबद्दल बोलतोय. टोईकचा संदर्भ दिल्याने गैरसमज झाला की काय ? Sad

अजुनही मराठी विषयाची परिक्षा पाठांतरापलिकडे गेलेली नसावी. Sad त्यामुळे साहजिकच उतारा/ संवाद व त्यावरिल प्रश्न (असा इंग्रजी भाषेचा पॅटर्न) किंवा ऑडिओ क्लिपवरुन प्रश्न आणि त्यातुन वेगवेगळ्या प्रांतातील भाषा आणि त्याचा लहेजा ओळखणे वगैरे प्रकाराने परिक्षापद्धत बदलणे गरजेचे वाटते.

मराठी भाषिक असुनही काही प्रांतात गेल्यावर मी परकिय भाषा ऐकतोय की काय, असं वाटू नये, नाही का ?

हे चूकीचे नाही पण उजवीकडे आणि डावीकडे ऐवजी वरती आणि खालती हे मला अजिबात समजत नाही.>> मलाही वरती, खालती कळत नाही नाक्की कुठे ते. सुरुवातीला तर एकदम आकाशातच वाटायचं.

अँटिमॅटर>>> काळ म्हणजे मृत्यू. या म्हणीचा शब्दशः अर्थ असा की 'म्हातारी आहे... ती कधीतरी मरणारच आहे... असा विचार करून तिला वाचवायला काहीच धडपड नाही केली तर ती मरेल. ते जाऊद्यात पण मृत्यूला वाटेल आपल्याला अडवणारे इथे कुणी नाही आणि म्हणून तो सोकावून आणखी काही जीव घेईल. म्हणून म्हातारी वाचावी म्हणून नाही तर मृत्यूला रोखण्यासाठी प्रयत्न करावेत.'
म्हणजे तात्पर्य सांगायचं तर एखादा माणूस आपल्याशी उगाचच वाकडं घेत असेल तर 'दुर्लक्ष करणे' आपल्या दृष्टीने सोपे आहे. पण तसे केल्याने 'आपण काहीही केलेले चालते' हा भ्रम त्याच्या मनात निर्माण होईल आणि त्याचे परिणाम आपल्याला आणि ईतरांनाही भोगावे लागतील.

'कानामागून आली आणी तिखट झाली' हा अपभ्रंश आहे. खरी म्हण 'पानामागून.......' आहे. मिरची ही झाडावर लागताना पानामागून येते व अर्थातच ती तिखट असते.

Pages