भातुकली !!

Submitted by मी मी on 10 July, 2013 - 00:23

बालपणीचा काळ सुखाचा …काहि आठवणी विसरता येत नाही आणि परत जगता सुद्धा येत नाहीत. काही आठवणी कोरल्या जातात दगडावरच्या रेषेसारख्या. मला प्रकर्षाने आठवत राहतं कधी कधी.. आज्जी आजोबांचं गावं, उन्हाळ्याच्या सुट्ट्या, मैत्रिणी आणि भातुकलीचा खेळ .

तुम्ही भातुकलीचा खेळ खेळला आहात का कधी ??

मी लहान असतांना भातुकलीच्या खेळातली गम्मत मला कळावी म्हणून आईची फार धडपड असायची…. कॉलनीतल्या मुला-मुलींना एकत्र करून त्यांची मीटिंग भरवून त्यांना भरपूर खायला घालून ती कन्विन्स करायची. सगळ काही निट ठरवून, बसवून द्यायची मग सुरु व्हायची आमची तयारी …. कुणाची तरी बाहुली कुणाचा तरी गुड्डा (बाहुला) त्यांच लुटुपुटू च लग्न लावायचं. खेळता खेळता सर्वांनी गम्मत जम्मत मोठं व्हायचं, कुणी बाबा व्हायचं कुणी आई , कुणी दादा व्हायचं कुणी ताई, कुणी आजोबा-आजी, कुणी तातोबा-दाजी……मग नवरा नवरीचे कपडे, दागिने यांची तयारी. घरातल्या चादरी, ओढण्या, साड्यानि बनवलेला वाकलेला तुटका-मोडका मांडव. तीन चाकी सायकल वरून वरात काढायची, वराती मागे सगळे चिमुकले वऱ्हाडी…. छुई-मुई चिटुकल्या साडी सांभाळत चालायच्या तर दबंग सगळे छोकरे हातातले डब्बे, खोके वाजवत बँड- बाराती व्हायचे.

नाचत, वाजत-गाजत वरात मांडवात प्रवेश करायची आणि मग सर्वांनी आप-आपल्या घरून आणलेले पीठ-धान्य एकत्र करून या छोटुकल्या चीम्न्यांनीच स्वयंपाक करायचा; पोळीचा नकाशा, वरण राहिलं कच्चंच, भाजीत पाणी जास्त, शिऱ्याची झाली खीर. अगदी काहीही आणि कसेही झाले तरी त्या दिवशीच्या त्या चिमुरड्यांच्या जेवणाला अप्रतिम खास चव असते आणि महत्व सुद्धा …… एकत्र बसून जेवणाची मज्जा ती वेगळीच ….

खरी मज्जा असते ती विदाई ला नवरीची आई रुसलेली 'माझी बाहुली मी देणार नाही'. नवरदेवाची आई कित्तेक दिवसांपासून स्वप्न पाहत असते तिच्या घरी आता नवी बाहुली येणार; नियमच न तो नवरीने नवरदेवाच्या घरी जायचं असतं. मग थोडं रुसणं थोड फुगण, लुटुपुटू च्या लग्नात थोड खरोखरच भांडण .

कसली धमाल मज्जा असायची ….… हे सर्व आठवलं त्याचं कारण म्हणजे हि प्रथा कालातीत होऊ नये आणि आजच्या पिढीला याचे महत्व आणि मज्जा कळावी म्हणून नागपूरच्या एका भागात मागल्या काही वर्षांपासून दर वर्षी असा "भातुकली चा खेळ" केला जातो. लहान मुलांच्या हाताने पत्रिका बनवून घेतल्या जातात. गुड्डा-गुड्डी बनवून घेऊन त्यांचा साज-सिंगार केला जातो अगदी बाकायदा मेहेंदी , संगीत , हळद आणि लग्न असे सगळे कार्यक्रम पार पडतात. दोन दिवसांच्या या कार्यक्रमात खर्या लग्नाची धम्माल असते. वरात निघते, अक्षतांच्या वर्षावात मंगलाष्टक म्हंटली जातात, सुलग्न लागतं आणि नंतर भोजन….लहन मुलांसोबत मोठी मंडळी सुद्धा वराती म्हणून यात सामील होतात सर्व मिळून धम्माल केली जाते. २ कुटुंबापासून सुरु झालेले आताशा २५ कुटुंब या उपक्रमाशी जुळली गेली आहेत .

मुलांना टीव्ही आणि व्हिडीओ युगातून थोडावेळ दूर करून सांस्कृतिक वातावरणात रुळवण्यासाठी आणि ऐतिहासिक वारसा जपण्यासाठी हा प्रयत्न तसेच मोठ-मोठ्या इमारतीत राहून घरात दडून बसून राहणारी आजची सभ्यता ओलांडून सामाजिक एकोपा वाढावा या अनुषंगाने उचललेले हे पाउल कौतुकास्पदच आहे …. नाही ??

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरे ब्बापरे हे एवढे असते भातुकलीत...
मी एकुलता एकच पण लहानपणी मे महिन्याच्या सुट्टीत वा गणपतीत चुलत भावंड जमायचो तेव्हा "घर घर" खेळलेले आठवतेय..

अर्थात रोज रोज तेच तेच.. आई-बाबा आणि मुले.. सकाळी उठायचे, खोटी खोटी तयारी, मग खराखुरा नाश्ता, मग खोटे खोटे ऑफिसता जाणे, मग खराखुरा लंच, मग खोटेखोटे ऑफिसचे काम करून घरी परतने, अन खोटेखोटेच मुलांचा अभ्यास घेणे, मुलांशी खेळणे अन रात्री खरेखुरे जेवण करून खोटेखोटे झोपणे..

हा घर-घर चा एक दिवस पंधरा वीस मिनिटांत संपला की वाटल्यास पुन्हा एकदा रीपीट करायचा..
दिवसाचे चार वेळा म्हणून जे खाणे व्हायचे त्यात घरातला सुका खाऊ अन सरबत असायचे..
वरील पंधरा-वीस मिनिटांपैकी दहा-पंधरा मिनिटे खाण्याचाच कार्यक्रम चालायचा, नव्हे त्यासाठीच हा खेळ खेळला जायचा Happy

असो,
लेख छान आणि या भातुकलीच्या उपक्रमाला शुभेच्छा Happy

आमच्या भातुकलीत लग्न बिग्न नव्हतं. आम्ही एकत्र येऊन स्वंयपाक करायचो. साधारण माध्यमिक शाळेत असतांना. भाण्ड्यांपासुन पिठ, तांदुळ, भाज्या, मसाले गोळा करुन जमेल तसे जेवण बनवायचे. मजा यायची.
अभिषेक तु म्हण्तोस तसा घर-घर ही आम्ही खेळायचो Happy
मयी चांगला उपक्रम.

मला आठवतयं आमच्य टेरेस वर घर घर खेळताना खुप दा नारळाच्य करवंटी मधला शिजव लेला भाप खाताना पोटात घर घर व्हायची पण आपण स्वता बनवलेला पक्षानां घालायला मन नव्हते मानत मग आपणच खायचा तो भात
खुप मजा यायची
गेले ते दिवस राहील्या फक्त आठवणी