'मेलांज' - श्री. महेश काळे यांच्याशी गप्पा

Submitted by माध्यम_प्रायोजक on 20 June, 2013 - 15:22

भारतीय शास्त्रीय संगीताला आजपर्यंत अनेक नामवंत कलाकारांनी आपल्या गायन किंवा वादनकलेच्या माध्यमातून सातासमुद्रापार नेत जगातल्या वेगवेगळ्या व्यासपीठांवर सादर केलंय. मात्र अगदी वेदकालापासून ते आजपर्यंत, शास्त्रीय संगीताच्या एकाच छत्राखाली येणार्‍या, तरीही स्वतःची वेगळी ओळख जपणार्‍या विविध कलाविष्कारांना एकाच कार्यक्रमात, जगाच्या व्यासपीठावर सादर करण्याचा अभिनव आणि स्तुत्य उपक्रम म्हणजे ’मेलांज’.

उत्तर हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातल्या युवा पिढीचे गानप्रतिनिधी श्री. महेश काळे यांच्या संकल्पनेतून व लेखणीतून साकारलेली ’मेलांज’ ही जगातल्या कुठल्याही व्यक्तीसाठी भारतीय शास्त्रीय संगीताचा कॅनव्हास उलगडवून दाखवणारी अनोखी कलाकृती आहे. या कार्यक्रमात सामवेदातील जातिगायनापासून ते पर्शियन संगीतातून आपल्याकडे आलेल्या सुफी संगीतापर्यंत, महाराष्ट्रातील अभंग व नाट्यसंगीत, तसेच काळासोबत समृद्ध होत गेलेल्या भारतीय शास्त्रीय संगीताच्या सर्व प्रकारांचे प्रातिनिधीक सादरीकरण श्री. महेश काळे आपल्या सहकार्‍याबरोबर करतात. ’मेलांज’चं सूत्रसंचालन ख्यातनाम अभिनेत्री अश्विनी भावे करतात.

महेश काळे हे पं. जितेंद्र अभिषेकी यांचे शिष्य. अभिषेकीबुवांकडे त्यांनी शास्त्रीय संगीत, नाट्यसंगीत आणि सुगमसंगीत यांचं शिक्षण घेतलं. अभिषेकीबुवांच्या अनेक मैफिलीत महेशजींनी त्यांना साथ केली आहे. शिवाय प्रभाकर कारेकर, श्रीधर फडके, सुरेश वाडकर, आनंद मोडक यांच्याबरोबरही त्यांनी आपली कला सादर केली आहे. इंजिनीयरिंगचं शिक्षण घेतलेल्या महेशजींनी अमेरिकेतली आपली नोकरी सोडून पूर्ण वेळ संगीताला वाहून घेतलं आहे. नाट्यसंगीत, सुगमसंगीत, कीर्तन, गझल, उपशास्त्रीय गायन असे सर्व प्रकार ते लीलया हाताळतात.

शास्त्रीय संगीत सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ते सतत प्रयत्नशील असतात. संगीतात नवनवीन प्रयोग यासाठी ते करत असतात. जगभरातल्या विद्यार्थ्यांना ते ऑनलाइन संगीतशिक्षण देतात.

अटलांटा इथे २००५ साली भरलेल्या बीएमएमच्या अधिवेशनात आपली कला सादर करून त्यांनी प्रेक्षकांना जिंकलं होतं. २००७ साली सिएटलच्या अधिवेशनातही त्यांनी गाणं सादर केलं होतं. या वर्षी जुलै महिन्यात बॉस्टन इथे होणार्‍या बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या अधिवेशनात श्री. महेश काळे ’मेलांज’ हा कार्यक्रम सादर करणार आहेत. या निमित्तानं पुण्याच्या गणेश कलाक्रीडामंदिरात झालेल्या कार्यक्रमानंतर Chaitrali व harshalc या मायबोलीकरांनी श्री. महेश काळे यांच्याशी गप्पा मारल्या.

MaheshKale1.jpg

'मेलांज’ या कार्यक्रमाबद्दल कृपया सांगाल का?

आपल्या भारतीय लोकांच्या मनात शास्त्रीय संगीताबद्दल प्रचंड अभिमान असतो. परंतु, या संगीताशी अपरिचित अशा एखाद्या व्यक्तीनं जर आपल्याला विचारलं, की काय विशेष आहे असं भारतीय शास्त्रीय संगीतात, तर त्याला काय काय आणि कुठवर सांगणार? त्यामुळे या संगीताबद्दल नुसतं शब्दांत सांगण्यापेक्षा त्यातली विविधता, पूर्वापार चालत आलेल्या आणि काळासोबत संस्कृतींच्या मिलाफामुळे यात मिसळून, त्याचा भाग होऊन ते अजून समृद्ध करणार्‍या प्रकारांना एकत्रीत सादर करण्याचा विचार माझ्या मनात आला, आणि मग हा कार्यक्रम तयार झाला.

'मेलांज' हा फ्रेंच शब्द आहे, ज्याचा अर्थ विविध प्रकारच्या गोष्टींचा एकत्रित संच. या कार्यक्रमात मी भारतीय शास्त्रीय संगीतातले साधारण सर्व प्रकार सादर करताना, त्यांचा अभ्यास करून, तसंच त्या प्रकारांचा अभ्यास करणार्‍या तज्ञांबरोबर चर्चा करून, त्याबद्दलच्या ध्वनीचित्रफितींसोबत तो सादर केलाय. त्यामुळे केवळ गायन एके गायन असं न होता, अगदी लहान मुलांपासून ते वयोवृद्ध व्यक्तींना आवडेल असा हा कार्यक्रम झालाय. मी अर्थात हे कार्यक्रमानंतरच्या प्रतिक्रियांवरूनच सांगतोय.

या कार्यक्रमात कुठले संगीतप्रकार आणि कुठल्या रचना तुम्ही सादर करता?

एखाद्या मित्राशी गप्पा माराव्यात, तसा हा कार्यक्रम लिहिला आहे. कार्यक्रमाची सुरूवात सामवेदातील एका संहितेनं होते, ज्याला 'जातिगायन' असं संबोधतात. त्यानंतर खयाल, ठुमरी, दादरा, आणि टप्पा गायकीचं रूपदर्शन. याशिवाय नाट्यसंगीत, निर्गुणी भजन, गझल, अभंग, कव्वाली असे सर्व गायनप्रकार या कार्यक्रमात आहेत. तसंच सादरीकरण होत असताना मागे पडद्यावर त्या कडव्याचा अर्थ इंग्रजीतून दिसत राहतो. त्यामुळे हा कार्यक्रम जागतिक व्यासपीठावर कुठेही सादर करण्यासाठीचा आहे. ज्यांना शास्त्रीय संगीत आवडतं, त्यांनाही हा कार्यक्रम आवडेल. ज्यांना उपशास्त्रीय गायनप्रकार आवडतात, त्यांनाही हा कार्यक्रम आवडेल. भारतीय संगीत म्हणजे काय, असं जर कोणी विचारलं, तर ’मेलांज’ हा कार्यक्रम बघा, असं उत्तर देता येईल. ज्यांना भारतीय शास्त्रीय संगीताची विशेष जाण नाही, अशांनी तर हा कार्यक्रम जरूर बघावा.

अनेक प्रेक्षकांच्या फार सुरेख प्रतिक्रिया मला आजवर मिळाल्या आहेत. सुबोधनं (भावे) मला सांगितलं होतं, की ज्या तरुण मंडळींना बालगंधर्व कोण हे माहीत नव्हतं, ते आता ’बालगंधर्व’ चित्रपट बघून त्यांची गाणी ऐकू लागले आहेत. तशीच उलटी गंगा इथेही वाहते आहे. मी गायलेली ठुमरी ऐकून तुम्हांला बडे गुलाम अली खॊंसाहेबांची, गिरिजादेवींची ठुमरी ऐकावीशी वाटणं, हेच माझ्या कार्यक्रमाचं सार्थक आहे. भारतीय शास्त्रीय संगीताची विलक्षण परंपरा तरुण पिढीपर्यंत पोहोचवणारा मी केवळ निमित्तमात्र आहे, पण मानसिक शांती देणारा हा अनुभव आहे. भारतीय संगीताला जर एक नवा श्रोता मी मिळवून दिला, तर माझे गुरू, अभिषेकीबुवा, यांना माझा अभिमान वाटेल, याची मला खात्री आहे.

मात्र 'मेलांज' हा कार्यक्रम फक्त नवख्या प्रेक्षकांसाठी अजिबात नाही. या संगीतावर मनापासून प्रेम करणार्‍या सर्व दर्दी रसिकांना हा कार्यक्रम नक्की आवडेल. त्यांनी आजवर ज्यांच्यावर प्रेम केलं आहे, त्या गायकांच्या रचना तर त्यांना ऐकायला मिळतीलच, पण त्या रचनांमधला एखादा नवीन पैलू त्यांना नक्की जाणवेल, याची खात्री आहे.

’मेलांज’च्या सादरीकरणात काही अभिनव प्रयोग तुम्ही केले आहेत.

हो, सध्या प्रत्येकच क्षेत्रात प्रगत तंत्रज्ञानाचा वापर होतो आहे. सिनेमा अगोदर कृष्णधवल होता, मग इस्टमनकलर, आता थ्रीडी तंत्रज्ञान आलं आहे. तसंच ध्वनिसंयोजनातही खूप बदल झाले आहेत. ए. आर. रेहमानसारख्या संगीतकारांनी याबाबत वेगवेगळे प्रयोग केले आहेत. मराठीत अजय-अतुलसारखे संगीतकार खूप सुरेख ध्वनिमुद्रण करतात. तर, भारतीय शास्त्रीय संगीताच्या गाभ्याला धक्का न लावता उत्तम ध्वनिव्यवस्थेचा, ध्वनिसंयोजनाचा अनुभव श्रोत्यांना द्यावा, अशी माझी इच्छा आहे, आणि ’मेलांज’ हा त्या दिशेनं केलेला पहिला प्रयत्न आहे. कव्वालीचा ’आवाज’ कसा असतो, अभंगांचा त्यापेक्षा वेगळा कसा, हा विचार मी करतो. मग पेटी त्यावेळी वेगळी कशी वाजवायची, हे मी बघतो. सामगायनाच्या वेळी फक्त ढाल्या तबला असतो, जो पखवाजासारखा वाजतो. शिवाय जोडीला मंचावर रंगही वेगळे, म्हणजे अभंगांना भगवा, असतात. असा ध्वनी, प्रकाश यांचा विचार करून अजून काही प्रयोग मला करायचे आहेत.

maheshkale4.jpg

मी स्टॅनफर्ड विद्यापीठात केलेला कीर्तनाचा प्रयोग हा याचाच एक भाग होता. वारकरी संप्रदाय काही थोड्या लोकांनी शेकडो वर्षांपूर्वी स्थापन केला. आज लाखो लोक या संप्रदायाचे भाग आहेत. कीर्तन हे या संप्रदायाचं महत्त्वाचं अंग आहे. वारीत कीर्तन असायचंच, असतं. पण आज वारीत गर्दी असली तरी कीर्तनाला गर्दी होत नाही. आपण गंमत म्हणून सिनेमाला जातो, पण ’चल, आज संध्याकाळी कीर्तनाला जाऊ’, असं आपण म्हणत नाही. आजच्या मुलांच्या भाषेत बोलायचं तर कीर्तनात ’कूलनेस’ नाही. मला आजच्या तरुणांना कीर्तनाची ओळख करून द्यायची आहे, त्यामुळे फार उपदेशात्मक वाटणार नाही, अशाप्रकारे मी कीर्तन सादर केलं. भारतातून त्यासाठी कीर्तनपरंपरेतले काही कलाकार मी आमंत्रित केले होते. अ‍ॅना शुल्झ हीनं कीर्तनात पीएच.डी. केलं आहे. अनेक वर्षं ती पुण्यात राहिली, कीर्तन शिकली. फ्लॅशकार्डांच्या मदतीनं तिनं कीर्तन केलेलंही आहे. तर, कीर्तनकाराचा पूर्ण पोशाख करून मी कीर्तन सादर केलं. अ‍ॅनानं संशोधन करताना अनेक ज्येष्ठ कीर्तनकारांच्या मुलाखतींचं ध्वनिचित्रमुद्रण केलं होतं, ते व्हिडिओ मी वापरले. अभंगांचं भाषांतर करून, एक सोपी कथा घेऊन मी कीर्तनाच्या परंपरेचं पुनरुज्जीवन करण्याचा प्रयत्न केला. पहिल्या प्रयोगाला भरपूर गर्दी झाली होती. विठ्ठलाच्या गजरात संपूर्ण सभागृह सामील झालं होतं. साडेसातशे प्रेक्षकांनी येणं, हे मला खूप समाधान देणारं होतं. ही आकडेवारी महत्त्वाची नाही, पण आपण जे काम करत आहोत, त्याला चांगला प्रतिसाद मिळणं, हे माझ्यासाठी महत्त्वाचं आहे.

लोकांना सोपं जे वाटतं, ते सादर करणं काहीच कठीण नाही. पण काहीतरी मूल्य असणारं लोकांसमोर सादर करणं, हे माझ्यासाठी समाधानकारक आहे.

तुमच्या सांगीतिक प्रवासाबद्दल सांगाल का?

माझी पहिली गुरू म्हणजे माझी आई, सौ. मीनल काळे. ती 'एसएनडीटी'मध्ये संगीत शिक्षिका होती, आणि नंतर श्री. पुरुषोत्तम घांगुर्डे. मग मी पंडित जितेंद्र अभिषेकीजींकडे शिक्षण घ्यायला सुरूवात केली. त्यांच्यामुळे मला संगीत हे एकतर चांगलं असतं नाहीतर वाईट असतं, बाकी संगीताचा दुसरा प्रकार अस्तित्वात नाही, हे संस्कार मिळाले. म्हणून मी सर्व प्रकारचं संगीत ऐकतो, आत्मसात करण्याचा प्रयत्न करतो. बुवांनी गावोगावी जाऊन संगीताचा प्रसार केला. अगदी आडगावीही शास्त्रीय संगीताच्या मैफिली त्यांनी केल्या. प्रसंगी त्यांची गैरसोय व्हायची, पण त्याकडे दुर्लक्ष करीत त्यांनी शास्त्रीय संगीताचा प्रसार केला. आज मीही तोच प्रयत्न करतोय. अभिषेकीबुवा माझं स्फूर्तिस्थान आहेत, आणि त्यांच्याकडे मी जे शिकलो, त्याची रुजवात करण्याचा माझा प्रयत्न सतत सुरू असतो.

मी पुण्याच्या 'व्हीआयटी'तून इंजिनीअरींग, आणि अमेरीकेतून दोन पोस्ट-ग्रॅज्युएट डिग्र्या मिळवल्या आहेत. पण संगीताची साधना करण्यासाठी मला माझ्या कुटुंबाकडून खूप पाठींबा होता. त्यामुळे काही वर्ष नोकरी केल्यानंतर, पूर्णवेळ संगीतासाठी देण्याचा निश्चय करून मी नोकरी सोडली. आतापर्यंत जगभरात बरेच कार्यक्रम केलेत. आता मी स्वतः विद्यार्थ्यांना शास्त्रीय संगीत शिकवतो. आणि शिकवता शिकवता, माझ्याच काही विद्यार्थ्यांकडून, जे आधी दक्षिण भारतीय शास्त्रीय शिकले आहेत, त्यांच्याकडून ते शिकण्याचा प्रयत्न करतो. 'सवाई गंधर्व संगीत महोत्सवा'मध्ये मला माझी कला सादर करायला मिळाली हा एक आनंदाचा क्षण.

'संगीत कट्यार काळजात घुसली'चा अनुभव कसा होता?

'कट्यार काळजात घुसली'साठी मला राहुल देशपांडेचा फोन आला, त्यावेळी मी अमेरिकेत होतो, आणि एका क्षणाचाही विलंब न लावता मी ’हो’ म्हणालो. नंतर लक्षात आलं, की तालमी इथे भारतात होणार. आणि मग प्रश्न पडला, हे कसं जमणार? पण मग मी दोन महिने भारतातच येउन राहिलो. सुबोध भावेबरोबर, राहुलबरोबर तालमी केल्या, आणि प्रयोग उत्तम पार पडले. प्रेक्षकांनी खूप कौतुक केलं आमच्या प्रयोगांचं. विशेषत: तरुणांनी दिलेला भरघोस प्रतिसाद अतिशय सुखावणारा होता. मलाही फार मजा आली ’कट्यार...’मध्ये काम करताना. त्यामुळे संगीतनाटकांना प्रेक्षक आहे, हे नक्की. सादरीकरण, गायकी उत्तम असेल, तर आजही प्रेक्षक संगीतनाटकांना नक्की गर्दी करतील.

शंभर वर्षांपूर्वीपासून शास्त्रीय संगीताच्या भक्कम आधारावर उभ्या असलेल्या नाट्यसंगीत या गायनप्रकाराला महाराष्ट्रात जी अमाप लोकप्रियता मिळाली, त्या परंपरेचा वारसा टिकवून ठेवण्यात आपलाही हातभार लागतोय, याचं मला नक्कीच समाधान वाटतं. कारण ते अस्सल सोनं आहे. त्याचा अभ्यास आणि ते पुन्हा लोकांपर्यंत पसरवणं, हे माझ्या हातून होतंय हे मी सौभाग्यच मानतो.

maheshkale5.jpg

या नाटकाचं आणि तुमच्या भूमिकेचंही अनेक जाणकारांनी, विशेषत: झाकिर हुसेन यांनी फार कौतुक केलं..

हो, दादरला आम्ही खास त्यांच्यासाठी ’कट्यार..’चा एक प्रयोग केला होता. या प्रयोगाला झाकिरजी होतेच, शिवाय प्रभाताई (अत्रे) आल्या होत्या. कौशल इनामदार, महेश लिमये अशी आमची मित्रमंडळी होती. माझं कौतुक म्हणून सांगत नाही, पण मी झाकिरजींना माझे आदर्श मानतो म्हणून सांगतो, की नंतर एकदोनदा मुलाखतींमध्ये या पिढीतले जे आश्वासक तरुण गायक आहेत, त्यात माझं नाव घेतलं. मला भरून आलं. मी जिथे राहतो अमेरिकेत, त्याच्याजवळच राहतात झाकिरजी. त्यामुळे वर्षातून एकदा मी त्यांच्या कार्यशाळेत सहभागी होतो, सकारात्मक ऊर्जा मिळवायला.

तुम्ही शिवमणींबरोबर आणि त्रिलोक गुर्टु यांच्याबरोबरही कार्यक्रम सादर केले आहेत.

शिवमणी पहिल्यांदा अमेरिकेत आले, तेव्हा त्यांच्या कार्यक्रमासाठी त्यांना एक गायक हवा होता. एका मित्राकडून मला हे कळल्यावर मी त्यांना भेटायला गेलो. ते मला म्हणाले, काय करूयात? तुझ्या डोक्यात काही कल्पना आहेत का? मी म्हटलं, मी काही संगीतरचना केल्या आहेत. त्या मी त्यांना ऐकवायला सुरुवात केली. साधारण अर्ध्या मिनिटात ते मला म्हणाले, उत्तम, वी विल रॉक. दुसर्‍या दिवशी सकाळी आठ वाजेपासून रात्री अकरा वाजेपर्यंत एकाच खोलीत आम्ही तालीम करत होतो. आमचा हा पहिला कार्यक्रम खूप यशस्वी झाला. त्यानंतर आम्ही अमेरिकेत, भारतात काही कार्यक्रम एकत्र केले. कर्नाटकातल्या गदगमध्ये गवईगवळा मठ आहे, तिथे मी त्यांच्याबरोबर कार्यक्रमात गायलो होतो.

त्रिलोक गुर्टुंबरोबर मी ’वसंतोत्सवा’त गायलो आहे. अभिषेकीबुवांबद्दल त्यांना फार आदर आणि आपुलकी आहे, कारण शोभाताई आणि अभिषेकीबुवा हे गोव्याचे, आणि तसं पाहिलं तर दोघंही समकालीन होते. त्यामुळे अभिषेकीबुवांच्या बंदिशींच्या फ्यूजनचा कार्यक्रम आम्ही केला होता. वरचेवर फोनद्वारे संपर्कात असतो आम्ही.

अमेरिकेत जॉर्ज ब्रूक्सबरोबरही मी कार्यक्रम करतो. ’टॅन्जेन्शियल एक्सपीरियन्स’ या नावाचा आमचा एक बॅण्ड आहे. आम्ही पाचजण या बॅण्डमध्ये आहोत. ओसाम एझलेदिन एजिप्तचा आहे. काय एकहार्ट याचा जॉन मॅकलाफलीन, त्रिलोक गुर्टु यांच्याबरोबर ट्रिओ आहे, तो मूळचा जर्मनीचा आहे, आता अमेरिकेत राहतो. सेस्लो अल्बर्तिनी हा ब्राझीलचा ड्रमर आहे. जॉर्ज अमेरिकेचा, आणि मी भारतीय. असे पाच देशांमधले आम्ही पाच संगीतकार आहोत या बॅण्डमध्ये. जॉर्ज ब्रूक्स प्राणनाथजींकडे शिकला आहे. प्राणनाथांकडे शिकल्यामुळे त्याला भारतीय शास्त्रीय संगीताची उत्तम जाण आहे. अमेरिकेत पदव्युत्तर शिक्षण घेत असताना प्रत्येक सत्रात मी मिडलईस्टर्न ऑनसॉम्ब्ल, जॅझ म्यूझिक, हिस्टरी ऑफ वेस्टर्न म्यूझिक असे कोर्स घेत होतो. त्यामुळे मला पाश्चात्त्य संगीताची जाण आहे. आणि म्हणून आमचा एकमेकांशी संवाद सोपा होतो. उगाच एकत्र येऊन काहीतरी वाजवायचं-गायचं असं आम्ही करत नाही. ही सगळी मंडळी बर्कलीला राहतात, त्यामुळे आम्ही व्यवस्थित तालीम करून मगच कार्यक्रम सादर करतो.

पेद्रो युस्ताशी या वादकाबरोबरही मी कार्यक्रम केले आहेत. तो लॉस एंजल्सला राहतो. हॉलिवूडच्या अनेक चित्रपटांसाठी त्यानं वादन केलं आहे, आणि मुख्य म्हणजे तो यान्नीच्या ऑर्केस्ट्रामध्येही सोलोइस्ट आहे. हरिप्रसाद चौरासियांकडे काही दिवस तो शिकला आहे.

मी या कलाकारांबरोबर कार्यक्रम का करतो? रेहमानच्या कार्यक्रमाला, एखाद्या जॅझ कॉन्सर्टला येणारा श्रोता भारतीय शास्त्रीय संगीत ऐकायला कदाचित येणार नाही. मी जेव्हा या पाश्चात्त्य कलाकारांबरोबर कार्यक्रम करतो, तेव्हा मी ज्या गानपरंपरेतून आलो आहे, त्या परंपरेचं संगीत सादर करण्याचा प्रयत्न करतो. या संगीतामुळे त्यांच्या शहरात होणार्‍या दुसर्‍या एखाद्या भारतीय संगीताच्या कार्यक्रमाचं तिकिट विकत घेण्याची त्यांना कदाचित इच्छा होऊ शकते. शिवमणी किंवा त्रिलोककाका यांसारख्या मोठ्या कलाकारांबरोबर माझी कला सादर करायला मिळणं, याचा मला आनंदच आहे, पण ते तेवढंच नाही. माझ्या बायोडेटावर शोभून दिसेल, म्हणून मी ते करत नाही. मी रचलेलं संगीत सादर करून मला नवे श्रोते जोडता येतात, ही महत्त्वाची बाजू आहे.

अमेरिकेतल्या अनेक विद्यापीठांमध्ये तुम्ही व्याख्यानं द्यायला जाता, त्या मागची भूमिका काय?

स्टॅनफर्ड, हार्वर्ड, अ‍ॅरिझोना अशा अनेक विद्यापीठांमध्ये मी सप्रयोग व्याख्यानं दिली आहेत. विद्यापीठांमध्ये जाऊन भारतीय शास्त्रीय संगीताची ओळख करून देणं, मला अतिशय महत्त्वाचं वाटतं. काही वेळेला तर माझा कार्यक्रम ठरल्यावर मी मुद्दाम व्याख्यानासाठी वेळ मागून घेतलेली आहे. कारण मला अशा व्याख्यानांमुळे भारतीय शास्त्रीय संगीताचा प्रसार करण्याची संधी मिळते. माझं व्याख्यान जर आवडलं, तर श्रोत्यांपैकी एकजण का होईना, पण माझ्या कार्यक्रमाला येईल, आणि माझा कार्यक्रम आवडला, तर तो भारतीय संगीताच्या इतर कार्यक्रमांना हजेरी लावेल.

अभिषेकीबुवांनी गावोगावी जाऊन गाणं अक्षरश: पेरलं आहे. त्यांच्याइतकं काम मला करणं अशक्य आहे, पण त्यांनी गाण्यासाठी जे काही केलं, त्यातून प्रेरणा घेऊन प्रामाणिकपणे मी माझं गाणं जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावं यासाठी प्रयत्न करतो.

maheshkale6.jpg

’इंडियन क्लासिकल म्यूझिक अ‍ॅण्ड आर्टस् फाउंडेशन’ ही संस्थाही तुम्ही याचं उद्देशानं स्थापन केली आहे का?

या संस्थेला नाव जरी आम्ही आत्ता दिलं असलं, तरी आमचं काम मात्र फार आधीपासून सुरू आहे. या संस्थेत पद्मा तळवलकर, हेमंत पेंडसे, विजय सरदेशमुख, शौनकदादा (अभिषेकी) असे मोठे कलाकार आहेत. उत्तम, दर्जेदार कार्यक्रम आम्ही अमेरिकेत सादर करतो. हरीजी, जसराजजींचे कार्यक्रम आम्ही प्रायोजित केले आहेत, आता स्टॅनफर्डला झालेला कीर्तनाचा कार्यक्रमही 'आयसीएमए'च्या माध्यमातूनच झाला होता. 'आयसीएमए'साठी निधी गोळा करण्यासाठी पहिल्यांदा मी ’मेलांज’ सादर केला होता.

मी सिलिकन व्हॅलेत राहतो. अनेक यशस्वी भारतीय तिथे राहतात. या यशस्वी भारतीयांच्या श्रीमंत संस्कृतीचं तितकंसं योग्य प्रदर्शन मात्र तिथे होत नाही. कुठल्यातरी स्वस्त हॉलमध्ये, प्लास्टिकच्या खुर्च्या मांडून कार्यक्रम केला जातो. आता एखादा बाहेरचा माणूस अशा कार्यक्रमाला आला, तर कसं वाटेल? आपली संस्कृती आहे का अशी? तर, नाही. गायनवादनकलेला एकेकाळी राजाश्रय होता. गायक-वादकांना खूप मान होता. ही संस्कृती दिसावी, यासाठी आम्ही प्रयत्न करतो. कार्यक्रमाला येणार्‍या कलाकारांचं, श्रोत्यांचं उत्तम स्वागत करतो, त्यांना अत्तर लावतो, रांगोळ्या असतात, फुलांची सजावट असते, मध्यांतरात भारतीय फराळ असतो. म्हणजे भारतात जो नेहमीचा तामझाम असतो, तोच आम्ही तिथेही करतो. आमच्या कार्यक्रमांना उत्तम प्रतिसाद मिळतो. भरपूर गर्दी असते. तिकिटं हातोहात संपतात.

या संस्थेच्या उद्दिष्टाचा दुसरा भाग मला खूप महत्त्वाचा वाटतो. आम्ही तरुण, होतकरू विद्यार्थ्यांना, ज्यांना संगीतात करिअर करायचं आहे, सहकार्य करणार आहोत. गावाकडे संगीतात काही करू इच्छिणारे अनेक विद्यार्थी असतात. मोठ्या शहरात येऊन शिकायचं म्हणजे अनेक खर्च असतात. राहण्याचा, जेवणाखाणाचा खर्च असतो. कॉलेजची फी परवडत नाही. या खर्चामुळे गावातून शहरात गाण्यासाठी येण्याची हिंमतच कोणी करत नाही. अशा विद्यार्थ्यांना आमची संस्था मदत करेल. ज्येष्ठ संगीतकारांना गुरुदक्षिणा देण्याचीही आमची इच्छा आहे. अर्थात सध्या या उपक्रमांसाठी आम्ही पैसे गोळा करत आहोत.

शिवाय मला भारतीय संगीताचं दस्तऐवजीकरण करायचं आहे. अमेरिकेत दस्तऐवजीकरणाला खूप महत्त्व आहे. मला काही दुर्मिळ अशा व्हीएचएस टेप्स मिळाल्या आहेत. त्यांचा प्रताधिकार कोणाकडे आहे वगैरे बघून मला ते संगीत सर्वांपर्यंत पोहोचवायचं आहे. ’आयसीएमए-पाठशाला’ नावाचं एक मोबाइल अ‍ॅप मी नुकतंच प्रसिद्ध केलं. बीटा स्टेजला आहे ते सध्या. अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयाच्या परीक्षांचा अभ्यासक्रम, त्यांच्यासाठीच्या बंदिशी, ध्वनिमुद्रणं, अलंकार, प्रश्नोत्तरं असं सगळं त्या अ‍ॅपमध्ये आहे. हे अ‍ॅप गुरूंना पर्याय म्हणून तयार केलेलं नसून विद्यार्थ्यांना त्यांचा स्वत:चा अभ्यास नीट करता यावा, हा हेतू आहे.

तुम्ही स्वत: अनेक विद्यार्थ्यांना गाणं शिकवता...

सध्या माझे दीडदोनशे विद्यार्थी आहेत. नवीन पिढीला आपल्या संगीताकडे आकर्षित करण्यासाठी नवनवीन तंत्रज्ञान वापरून, ते सुलभ करून कसं देता येईल, याचा विचार करून मी ऑनलाईन संगीत शिकवतो. सध्या, मी भारतात असताना, माझ्या अमेरिकेतल्या विद्यार्थ्यांसाठी मी तिथली आणि इथली वेळ जुळवून ते शिकवतो. बाकी अमेरिकेतल्या बर्‍याचशा विद्यापीठांमध्ये शास्त्रीय संगीतावर भाषणं, सादरीकरण होत असतं.

मुलाखतीसाठी वेळ दिल्याबद्दल धन्यवाद, आणि तुमच्या कार्यक्रमांसाठी हार्दिक शुभेच्छा.

maheshkale3.jpg

सर्व छायाचित्रं श्री. महेश काळे यांच्या संग्रहातून.
'मेलांज' कार्यक्रमातील श्री. महेश काळे यांचं छायाचित्र - श्री. भूषण माटे.

***
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान झाली आहे मुलाखत. Happy

>>
कव्वालीचा ’आवाज’ कसा असतो, अभंगांचा त्यापेक्षा वेगळा कसा, हा विचार मी करतो. मग पेटी त्यावेळी वेगळी कशी वाजवायची, हे मी बघतो. सामगायनाच्या वेळी फक्त ढाल्या तबला असतो, जो पखवाजासारखा वाजतो. शिवाय जोडीला मंचावर रंगही वेगळे, म्हणजे अभंगांना भगवा, असतात. असा ध्वनी, प्रकाश यांचा विचार करून अजून काही प्रयोग मला करायचे आहेत.
<<

यू सेड इट! Happy

मोबाइल अ‍ॅप बघायला हवं. भारतीय शास्त्रीय संगीत २१व्या शतकात आणतायत काळे. Happy

मस्त मुलाखत,आवडली!स्पष्ट मतं आणि मनमोकळेपणानी मांडली आहेत!
बे एरिया मधे असला कार्यक्रम की नक्की जाणार आहे!!

छान मुलाखत. शास्त्रीय संगीताबद्दल काही कळत नाही त्यामुळे हा कार्यक्रम बघायलाच हवा.

मका दी ग्रेट...

ह्या व्यक्ती बरोबर कॉलेजमधली २ वर्षे काढलेली आहेत... कुठल्याही प्रकारचे गाणे ताकदीने सादर करण्याची क्षमता जबरी आहे... अश्या माणसाचा सहवास लाभल्याचे भाग्य वेगळेच..

सुरेख मुलाखत. धन्यवाद.

महेश काळे ज ब र द स्त गातो. त्याची तयारी आणि स्टॅमिना अफाट आहे. मेलान्ज हा एक परिपूर्ण कार्यक्रम आहे. जे लोक बीएमएमला हजेरी लावणार आहेत, त्यांनी हा कार्यक्रम मुळीच चुकवू नका.

खूप छान मुलाखत. मार्च महिन्यात त्याचा कार्यक्रम ऐकण्याची संधी मिळाली. ऑडीयन्स छोटा असताना, त्यांच्या आवडी निवडी जाणून घेऊन त्यानुसार कार्यक्रम सादर करण्याची त्यांची कला फारच वाखाणण्यासारखी आहे.

छानच मुलाखत!
इथल्या महाराष्ट्र मंडळाला या मुलाखतीची लिंक पाठवली आहे!

छान मुलाखत. 'कट्यार काळजात घुसली' पाहिलय यांचं, अतिशय सुरेख गातात. 'मेलांज' ला अनेकानेक शुभेच्छा.

कार्यक्रम सुंदर झाला. वेगवेगळ्या संगीत प्रकारांची मेजवानीच..
श्री. काळे खरोखरच ताकदीचे आणि उत्कॄष्ट गायक आहेत.

एकच गायक असल्याने हा कार्यक्रम थोडा वैविध्य-अपूर्ण वाटला.
'अश्विनी भावे' यांचे नांव या कार्यक्रमाच्या जाहीरातींमधे उठून दिसत होतं, पण 'त्या स्टेजवर होत्या' यापेक्षा फार काही लिहीता येणार नाही.
Main-Auditorium ऐवजी A+B+C ला चांगला वाटला असता.

ह्या कार्यक्रमाच्या वेळेलाच A+B+C मधे प्रशांत दामलेची मुलाखत होती. त्यामुळे खुप लोक प्रशांतच्या प्रोग्रामला गेले. त्या लोकांची एवढी गदी झाली की तो प्रोग्राम परत एकदा करायला लागला. प्रशांत दामलेचा प्रोग्राम मेन हॉल मधे ठेवायला हवा होता. Happy

त्या लोकांची एवढी गदी झाली की तो प्रोग्राम परत एकदा करायला लागला. प्रशांत दामलेचा प्रोग्राम मेन हॉल मधे ठेवायला हवा होता. >> हो, wide receiver चे काम करू शकेल अशा मला त्यावेळी तिथे NFL tackle चे काम करायला लागले होते. Lol .. मेलांज हुकले ते वेगळेच Sad

भाई, मेलांजच्या उशीराला कंटाळून लोक "दामले तरी बघू" म्हणून गेले. लोकांचा प्रेफरन्स मेलांजलाच होता.
पण या गोंधळामुळे दिसलं असं की लोकांना दामलेंचा प्रोग्राम पहायचा आहे. (देवा! एलेच्या लोकांना हे कळलेच पाहिजे नाहीतर पॉप्युलर सेलेब्रिटी म्हणून पुन्हा बोलवायचे त्यांना. Proud )
आणि कार्यक्रम परत झाला तेव्हा किती लोक होते तिथे? जास्त नसणार कारण तेव्हा लोक जेवत होते. Wink