आय अ‍ॅन्ड मी: भाग २

Submitted by चैर on 4 July, 2013 - 18:55

भाग १

काही वर्षांपुर्वी:

श्रीनिवास कुरतडकर हा मुंबईतल्या तमाम त्रासलेल्या मध्यमवर्गीय, संसारी माणसांपैकी एक. त्याचा आब, आवाज वगैरे फक्त घरी! घराबाहेर तो नाकासमोरून चालणारा, खाली मान घालून काम करणारा, सकाळी वेळेवर येऊन- संध्याकाळी वेळेवर घरी जाणारा, घरून रोज चपाती-भाजीचा डबा आणणारा, कुटुंबवत्सल वाटतो म्हणून ऑफिसमधल्या बायकांच्या कौतुकाचा आणि पुरुषांच्या चेष्टेचा विषय! प्रतिकूल, कठीण परिस्थितीत वाढलेली माणसं खूप समजूतदार असतात असा एक सर्वसाधारण समज असतो. सीमाचा, सीमाच्या घरच्यांचा तिचं श्रीनिवासशी लग्न लावून देताना तोच समज झाला होता. पण प्रतिकूल, कठीण परिस्थितीत वाढलेला आपला नवरा हेकेखोर आणि तापट आहे हे सीमाच्या लग्नानंतर लक्षात आलं. पण आहे त्या परिस्थितीला सामोरं जाण्याशिवाय दुसरा काही पर्याय तिच्याकडे नव्हता. त्यांचा मुलगा अभिषेक आता दोन वर्षांचा झाला होता.

श्रीनिवास, सीमा अभिषेकला घेऊन कुठल्यातरी ऑफिसच्या पार्टीला गेले होते. एरव्ही अशा पार्ट्यांमध्ये श्रीनिवास कोरा राहणारा गडी! उगाच एखाद पेग हातात घेऊन हिंडायचा. पण त्या दिवशी गंमत म्हणून लोकांनी त्याला मुद्दाम 'झिंगवला'. मग मस्करी शेवट श्रीनिवाससाठी भलताच झाला.
"कुत्र्या, बराच माजलास…माझ्यामागून आलास, आणि माझ्याकडूनच सगळं शिकून माझाच साहेब झालास…"
दारूच्या नशेत तो त्याच्या बॉसला जाऊन वाटेल ते बरळला. त्याचं नशीब बरं म्हणून त्याचा बॉस दळवी जरा सेन्सिबल होता. आजूबाजूच्या लोकांचे चेहरे बघून झाला प्रकार समजला. त्याने श्रीनिवासला घरी सोडण्याची व्यवस्था केली. गाडीत त्याची अखंड बडबड सुरु होती. घरी पोहोचल्यावर काहीतरी बोलायला सीमाने तोंड उघडलं.
"अहो, जरा शुद्धीवर या! उगाच त्या दळवींना कशाला शिव्या देताय?"
"काय बोललीस? तुलाही त्या दळवीचा पुळका? नवऱ्यावर होणाऱ्या अन्यायाचं काही वाटत नाही? एक लक्षात ठेव, अजूनही तुला आणि तुझ्या पोराला दोन वेळेला खायला मी घालतो. कळतंय का?"
"अहो…पण"
"पण? तुलाही फार माज आलाय का?"
"माज? तुम्ही तुमच्या बायकोशी बोलताय तुमच्या घरात…तेवढंतरी कळतंय का?"
"मला व्यवस्थित माहितीय की मी कुठे आहे आणि कुणाशी बोलतोय…माझ्यासमोर तुझं तोंड खूप चालतंय आज….तुलाच समजावतो थांब" म्हणून त्याने हात उगारला.
अभिषेकला काय चाललंय हे कळण्याचं वय नव्हतं, पण बापाचा उठलेला हात, आईच्या डोळ्यातलं पाणी, ते पाहून बापाने पुन्हा उचललेला हात.अभिषेक वडिलांसमोर नंतर कधी रडलाच नाही. 'बाबा' नावाची व्यक्ती घरात राहते आणि तिला घाबरायचं असतं एवढंच त्याला माहित होतं.

लहान मूल म्हणजे मातीचा गोळा! त्याला जसा आकार देऊन घडवाल तशीच मूर्ती बनत जाते.

अभिषेक सातवीत गेला. त्याची धाकटी बहिण प्रिया आता तिसरीत होती. श्रीनिवासच्या केसात काही चंदेरी बटा दिसायला लागल्या होत्या पण शरीराने तो अजिबात वाकला नव्हता.पार्टीत घडलेल्या प्रसंगानंतर त्याने ती नोकरी सोडली. नवीन नोकरी लगेच मिळाली पण त्यानंतर त्याचं घराबाहेर पडणं, लग्न-समारंभांना जाणं बंद पडलं. त्याचं आणि पर्यायाने घरच्यांचंसुद्धा! सीमाताई संसार रेटत होत्या. अभिषेक हा चारचौघांपेक्षा वेगळा मुलगा होता. कराटे आणि वाचन अशा दोन टोकाच्या आवडी जोपासणारा होता. 'वाचनाने माणूस शहाणा बनतो' हे त्याने कुठेतरी वाचलं होतं आणि तो ते आचरणात आणण्याचा मनोमन प्रयत्न करत होता!
एक दिवस तो आनंदाने आरडा-ओरडा करत घरी आला.
"आई मी जपानला जाणार"
"काय रे काय झालं? श्रीनिवासने विचारलं.
"बाबा कराटेच्या स्पर्धेसाठी आणि पुढच्या ट्रेनिंगसाठी जपानला मुलं पाठवणार आहेत! खूप कमी लोक निवडले जाणारेत. माझी निवास हमखास होणारे, मला सरांनी तुम्हांला विचारायला सांगितलंय"
"अभिषेक,तू मूर्ख आहेस का?" वडिलांच्या अशा प्रश्नाने तो हिरमुसला. त्याला कळेना आपलं काय चुकलंय?
"तुला ते लोक जपानला पाठवणार. त्याचा खर्च कोण करणार?"
"आत्ता घरी बाबांना विचार म्हणाले पण जर का मी जिंकलो तर सगळा खर्च निघेल इतकं बक्षीस आहे"
"बरं…आणि कधी जायचंय?"
"पुढच्या महिन्यात?"
"आणि जर का आपण खर्च करायला तयार असू तरी जपानला जायला पासपोर्ट, विसा एक महिन्यात होऊ शकत नाही हे कळतंय का तुला? तुझ्या क्लासच्या इतर मुलांचं ठीके, सगळी व्हाईट कॉलर बड्या बापाची पोरं ती! त्यांना पैसे खर्च करायला काही वाटत नाही, मला शंभरदा विचार करावा लागतो.तुझ्या या कराटे क्लासला जाउन अशा संगतीत तुझं नुकसान होणार असेल तर आपण तो क्लास बंद केलेला बरा. तेवढा वेळ जास्त अभ्यास कर. मार्क तरी चांगले मिळतील. परीक्षा कधीय?"
"पुढच्या महिन्यात"
"मग जाउन अभ्यास कर! आईने जेवायला हाक मारली की ये बाहेर"

जवळजवळ पाच मिनिटात विषय संपला. पाच मिनिटात मजेत असलेला अभिषेक आणि आता? श्रीनिवासचं चूक नव्हतं. असं कुणीही उठून कुणाला जपानला पाठवत नाही पण तेरा-चौदा वर्षाच्या मुलाला समजावायची पद्धत?? ती चुकीची होती. अभिषेकचं अभ्यासात अजिबात लक्ष नव्हतं. I प्रचंड चिडला होता-
"दरवेळी मीच मूर्ख ठरतो. येउन-जाउन विषय अभ्यास, परीक्षेवर आणून थांबवायचा की आपल्याला काही बोलताच येत नाही"
Me हा तसा शांत विचार करणाऱ्यांपैकी होता-
"कितीही झालं तरी बाबा वयाने, अनुभवाने मोठे आहेत. जे काही बोलतात, करतात ते आपल्या भल्याचंच आहे…"

अलीकडे अभिषेकच्या बाबतीत हे खूप रेग्युलरली व्हायला लागलं होतं. त्याच्या डोक्यातच दोन मनं, विचारप्रवृत्ती आकार घेत होत्या.
एक मन- स्वतःवर भरवसा असणारं, प्रचंड आत्मविश्वास प्रसंगी अति-आत्मविश्वास, येणाऱ्या परिस्थितीला बेधडक तोंड द्यायची वृत्ती. आणि थोडी वाईट बाजू म्हणजे दरवेळी स्वतःचा विचार! हे मन म्हणजे 'I'
दुसरं मन- मोठ्यांचा आदर करणारं, सगळ्यांचा- त्यांच्या दृष्टिकोनांचा विचार करणारं, परिस्थितीचा सारासार विचार करण्याची वृत्ती आणि थोडी वाईट बाजू म्हणजे दरवेळी अति-तटस्थ विचार! हे मन म्हणजे "Me"
I चं नाव अभिषेक मोरओव्हर अभि. Meचं नाव अभिषेक श्रीनिवास कुरतडकर.


क्रमशः

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

गुड

पहिला भाग वाचता येत नाहीये. 'तुम्हाला या पानावरती जायची मुभा नाही. हे पान सार्वजनिक वाचनासाठी नाही.' अशी सुचना दिसत आहे. प्लीज पहिला भाग वाचायला भेटला तर लिन्क लागेल. Sad