पत्त्यांचा डाव (आजचा महाराष्ट्र टाईम्स, "शेवटचं पान")

Submitted by अनुराधा म्हापणकर on 22 June, 2013 - 22:43

उन्हाळ्याची सुट्टी म्हणजे धमाल मस्ती! शाळेच्या दिवसांत, अगदी परीक्षेच्या काळातही दिवसभर अभ्यास एके अभ्यासच असं काही एखाद्या दिवशीही होत नाही. पण सुट्टीच्या दिवसांत मात्र एक मिनिटही वाचन-लिखाणात फुकट जाता नये. दिवसभर नुसता खेळ खेळ आणि खेळ! सकाळ-संध्याकाळ घराबाहेरचे खेळ आणि दुपारभर मात्र घरातले बैठे खेळ! त्या बैठ्या खेळात पत्ते मात्र अग्रगण्य!! दुपारभर मुलांना ते गुलामचोर, मुंगूस, बदामसत्ती, नॉट अॅट होम, सातआठ खेळताना पाहून मला आमच्या लहानपणीचा दंगा आठवतो. मोठेपणाचा पत्ता शोधत त्या निवांत दुपारचे पत्ते हातातून कधी सुटले कळलंच नाही.

अशाच एका दुपारी, मुलं घरात पत्ते खेळत होती. सात-आठचे डावावर डाव खेळले जात होते. एका डावात दीदीने हात ओढले तर दुसऱ्या डावात तिच्या छोट्या भावाने! आतून त्यांचा संवाद ऐकताना मलाही खूप मजा येत होती. इतक्यात आधी एक फटका मारल्याचा आणि मग रडण्याचा; पेक्षा मुसमुसण्याचा आवाज ऐकू आला. मी बाहेर जाऊन पाहिले. दीदी चिडली होती. म्हणाली, 'बघ ना, मम्मा.. मी त्याचा एक हात ओढलाय, मग मी त्याचं एक पान ओढणारच ना! मी त्याच्या हातातून ओढलं, तर तो हुकुमाचा एक्का आणि त्यात बाकीचे तीन एक्केही माझ्याकडेच. तर याने हातातले पत्ते टाकले... म्हणतो, मी डाव फोडला. मी दिला एक फटका लावून! याला काय अर्थ आहे?' दीदी धुमसत होती. मी दुसऱ्या पिल्लाकडे नजर टाकली. ते मुसमुसत म्हणालं, म्हणून काय दीदीने मला इतकं जोरात मारायचं. बघ माझ्या पायावर तिची बोटं उठलीत.

एक आई म्हणून मी काय करायला हवं होतं ? मुलंच ती! भांडणार म्हणून दुर्लक्ष करायचं होतं की, स्पोर्टसमन स्पिरीटचे दाखले आणि डोस पाजायला हवे होते? पण मी या दोन्हीतलं काही केलं नाही. कारण, गेल्या काही दिवसांच्या अस्वस्थतेत, प्रयत्न न करता आयती चालून आलेली ती संधी मला अजिबात सोडायची नव्हती. मी दीर्घ श्वास घेतला. त्याबरोबरच, 'आता लेक्चर!' अशी मुलांनीही मनाची तयारी केलीच. शक्य तेवढ्या शांत आणि त्याहीपेक्षा सहजपणे मुलाला जवळ बसवलं, म्हटलं, तुला माहितेय, पत्ते का खेळतात ? तो मख्ख! मी पुन्हा तोच प्रश्न विचारला. मी चिडलेली नाही, याची खात्री पटवत तो चाचरत म्हणाला 'नाही'. मग तोच प्रश्न दीदीला केला. ती हुश्शार! त्यात हजरजबाबी! म्हणाली, 'सो सिंपल! करमणुकीसाठी, वेळ घालवायला!' म्हटलं, 'खरंय, वेळच घालवायला! तरीही पत्ते काहीतरी शिकवत असतात, माहितेय काय?' त्यावर मात्र दोघांनीही एकसाथ नकारार्थी मान हलवली. दीदीने अधिक अकलेचे तारे तोडले नाहीत, त्यामुळे माझा मार्ग सुकर झाल्याचं माझ्या लक्षात आल्याने मीही आणखी सरसावले आणि बोलतच राहिले.. किती तरी वेळ!

आपण पत्ते खेळतो. त्याची सुरुवात होते ती पानं वाटल्यापासून. सात-आठ, गुलामचोर, मुंगूस, बदाम सत्ती कुठलाही खेळ असू दे. आपण पानं पिसतो आणि प्रत्येकाला ती वाटतो. हो, नं? पानं जोवर जमिनीवर असतात, तोवर आपल्याला माहीत नसतं, ती पानं काय आहेत. आणि मग जेव्हा एक-एक करून ती पानं आपण उचलत जातो, तेव्हा आपल्याला चित्र स्पष्ट होत जातं की खेळ काय आहे? बरोबर ना? मुलांनी मान हलवली. आपल्या आयुष्याचा एक खूप मोठा धडा लहानपणी हे पत्ते खेळत असतानाच आपल्याला मिळतो. माहितेय? मुलांच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह! मी पुढे म्हटलं, आपलं आयुष्यही या पत्त्यांसारखंच! प्रत्येक नवा दिवस म्हणजे जमिनीवरून उचललेलं नवं पान! ते जमिनीवर आहे तोवर माहीत नाही, पण हातात आल्यावर कळतं, दुरी-तिरी आहे की हुकुमाचा एक्का! तसाच नवा दिवस. जेव्हा जगून दिवस पूर्ण होतो, तेव्हाच कळतं की तो एखाद्या बादशहासारखा गेला होता की 'गुलाम'गिरीत गेला. पण तो कसाही असला, तरी तो आपल्याला स्विकारायलाच लागतो. मला नकोस तू, म्हणून त्याला नाकारता नाही येत. तो जसा आला आहे तसाच जगावा लागतो. माझ्या पिल्लांनो, तेव्हा आपल्याला डाव फोडता येत नाही. आणि डाव फोडणं म्हणजे 'जिया खान'! जिया खानला त्यादिवशी आलेला दिवस किंवा ते आयुष्य नकोसं वाटलं. म्हणजेच हातात आलेले पत्ते तिला नकोसे होते. मग तिने काय केलं. तिने चक्क डाव फोडला! म्हणजे काय केलं ? तिने आत्महत्या केली. पत्ते आवडले नाहीत, म्हणून तिने स्वत:चं आयुष्यच संपवून टाकलं...

बाळांनो, लहानपणी हातात आलेले पत्ते हेच शिकवत असतात. ते पत्ते म्हणजेच आपलं नशीब! ते जसं वाट्याला आलंय, तसंच ते स्विकारायचं. पत्ते कुठलेही असले, तरी डाव नाही फोडायचा. डाव फोडणं म्हणजे पळपुटेपणा! तोच करायचा नाही. खेळायचं.. लढायचं.. अखेरच्या पानापर्यंत.. अखेरच्या क्षणापर्यंत खेळायचं. मिळालेल्या पानांना, आलेल्या नशिबाला पणाला लावायचं. जीव ओतायचा आणि त्यातूनच शर्थ करायची. कधी हरणंही असेल नशिबात. पण वाट्याला येणारी पानं प्रत्येक वेळी वाईटच असणार नाहीत. कधीतरी अशी वेळ येईलच, जेव्हा डाव फक्त आपला असेल! तेव्हा बाळा, तीन गोष्टी लक्षात ठेव, एक तर वाट्टेल ते झालं तरी डाव नाही फोडायचा. लढायचं.. खेळायचं. दुसरं म्हणजे कुठलीही पानं हाती आली, म्हणून रडत नाही बसायचं.. मिळालेल्या पानांवरच बाजी जिंकण्यासाठीची पराकाष्ठा करायची... आणि तिसरी गोष्ट.. चिडायचंही नाही! कारण चिडशील, तर रागाच्या भरात विवेकबुद्धी पांगळी होऊन एखाद- दुसऱ्या पानावर जे जिंकणार असशील तेही हरवून बसशील. लहानपणीच हा धडा गिरवाल तर मोठे व्हाल तेव्हा कुठलीही पानं हाती आली तरी जिंकाल, एक तर जग तर नाहीतर जगणं तरी!!
जीवनातलं अंतिम सत्य उमगल्यासारखी माझी बाळं माझ्याकडे पाहात होती. मी म्हटलं.. काय रे, आता फोडशील डाव? 'कध्धीच नाही मम्मा' एखाद्या फायटरसारखं त्यानं उत्तर दिलं. मीही मग श्वास सोडला. स्वत:लाच अत्यंत दारुण मरण देणाऱ्या जिया खानचा माझ्या घरात पुनर्जन्म होऊ नये याकरताची माझी लढाई मी आजपुरती जिंकले होते. पानं कशीही असोत, आजचा डाव माझा होता.. आणि मी तो जिंकला होता!

अनुराधा म्हापणकर
२३ जून २०१३

http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/20721205.cms

Group content visibility: 
Public - accessible to all site users

Dhanywad !

लेख चांगला वाटला तरी खरोखर असे लेक्चर दिलेत का?(प्रामाणिक प्रश्ण आहे)

कारण इतक्या लहान वयात... अशी चर्चा मुलांना नकोशीच असते व कळणे न कळणे हा प्रश्ण असतोच.

अगदी प्रामाणिक, तंतोतंत हे अगदी असेच घडले होते. एक शब्दही खोटा नाही. गम्मत म्हणजे मुलं विशेषत: मोठी मुलगी ते "लेक्चर" म्हणून न घेता, "आपली आई किती चांगला विचार करते" म्हणून विस्मित होऊन पाहात राहिली. आणि पुन्हा कधीच असं करणार नाही, म्हणून प्रामाणिक आश्वासन देत मुलगा पुढे खेळू लागला.

अतिशयोक्ती वाटेल कदाचित, पण, आपले आईवडिल हे जगातले सगळ्यात चांगले आईवडिल आहेत हा विश्वास लहानपणांपासूनच मुलांमधे निर्माण केला तर मुलांना कधीच आपले समुपदेशन हे "लेक्चर" वाटत नाही, हा स्वानुभव आहे.

अतिशयोक्ती वाटेल कदाचित, पण, आपले आईवडिल हे जगातले सगळ्यात चांगले आईवडिल आहेत हा विश्वास लहानपणांपासूनच मुलांमधे निर्माण केला तर मुलांना कधीच आपले समुपदेशन हे "लेक्चर" वाटत नाही, हा स्वानुभव आहे.
>>>
अमान्य! Happy