दहा रुपयांची नोट

Submitted by vaiju.jd on 19 June, 2013 - 13:38

||श्री||

सहावीत असेन मी! रात्री पपांनी हांक मारली. दहा रुपयांची नोट देत म्हणले, ” उद्या फी भरून टाक शाळेची.’
त्यांच्या समोरच मी माझे दप्तर घेऊन त्यातल्या एका पुस्तकात दप्तरातच ती नोट सरकवून ठेवली.ते पुस्तक शाळेच्या पहिल्या तासाच्या विषयाचे होते म्हणजे लगेचच फी द्यायला बरे!
दुसऱ्या दिवशी संध्याकाळी पपांनी विचारले ,” फी दिलीस का? पावती कुठे आहे?”
“आज आमच्या क्लासटीचर बाई रजेवर होत्या म्हणून फी दिली नाही.” मी
“ठीक आहे. ती नोट मला परत दे. उद्या मी भरून टाकीन.” पपा
पपा एम.इ.एस मध्ये नोकरीला असल्याने पावत्या नेऊन दाखवल्या की तीनतीन महिन्यांनी फी परत मिळायची. त्यामुळे वेळेत फी भरण्याचे , पावतीचे महत्व होते.
पपांनी नोट परत मागितल्यावर मी पुस्तक बाहेर काढून शोधले. नोट मिळाली नाही.
“हरवली कां?”
“नाही पुस्तकातच असणार.बघते!”
मग सगळी पुस्तके काढून तपासल्यावर दुसऱ्याच विषयाच्या पुस्तकात नोट मिळाली. ती मी पपांना दिली आणि काय होते आहे हे समझण्याच्या आत कान सणकन वाजून बहिराच झाला तात्पुरता ! मार लागला म्हणून रडता सुद्धा येईना.
“कां मारलेय मी तुला, लक्षात येतेय कां?”
माझे मान डोलावणे वाटले तर होकारार्थी, वाटले तर नकारार्थी!
“तुला फी भरण्याची जबाबदारी सोपवली होती, त्याचे गांभिर्य तू लक्षात घेतले नाहीस. तुझे एक महिन्याचे शिक्षण त्यावर अवलंबून आहे, हे तुला कळायला हवे. दहा रुपयांना किंमत असते. पैसे कोणत्या पुस्तकात कुठे ठेवले हे बघायला नको. वस्तू कुठे,कशी ठेवावी हे तुझ्या लक्षात यावे म्हणून ही शिक्षा केलीय मी तुला! समझलेय तुला?”
मी गाल चोळत ‘हो’ म्हटले. तो प्रसंग लक्षात राहीला कायमचा! आणि नीटनेटकेपणाचे, टापटीपेचे, ठेवरेवीचे कायमचे शिक्षण देऊन गेला.
चाळीतले घर जेमतेम दोन खोल्यांचे तिथे प्रत्येक गोष्ट व्यवस्थित ठेवणे जरुरीचे, टापटीप दिसण्यासाठी आणि वेळेवर मिळण्यासाठी !
आमच्या चाळीत एका घरात पाळणाघर होते. वेगवेगळ्या वयाची मुले बाहेरची आणि घरची सुद्धा! या बाई बऱ्याच महत्वाच्या वस्तू आमच्याकडे आणून ठेवायच्या. म्हणजे स्टेपलर, छोटी कात्री, फेविकोलची डबी, सोफ्रामायासीनचे ट्यूब, नाडीचे बंडल, मोदकाचा साचा, कारंज्याचे कातणे .. बरेच काही! आणि मोकळेपणे म्हणायच्या,
” वापरा हो तुम्ही, लागले की मागुन नेईन! तुमच्याकडे लगेच मिळते ते फार बरे आहे.”
ते ऐकताना मनात ती दहा रुपयांची नोट आठवायची!
एकदा पुण्याला एका नातेवाईकाकडे काही समारंभासाठी जमलो. अडीच खोल्यांच्या घरात तुडुंब माणसे. वेळ संध्याकाळची. सगळे तशीच दाटीवाटीने जागा मिळाली तिथे बसून गप्पा मारायला लागलो. जरासे हलायला सुद्धा जागा नाही आणि वीज गेली. घरातल्या दोघीतीघी बायका मेणबत्ती शोधायला लागल्या.
“ए कोण रे? जरा सरकरे ड्रावर मध्ये मेणबत्ती आहे कां बघते?”
“अग परवा बाथरूमच्या खिडकीवर पहिली होती बहुतेक!”
“ए कोण आहे? पायावर पाय दिलात नां ?”
“टॉर्च नाही का चटकन मिळायला?” वैगेरे …….!
शेवटी माझे मोठे तिघे दीर, नवरा, मी, त्या घरातली एकदोन माणसे काही मुले बाहेर पडलो आणि घरासमोर पटांगण होते तिथे फेऱ्या मारायला लागलो.
माझे एक मोठे दीर नेव्हीतून कमांडर म्हणून निवृत्त झालेले, म्हणाले,” इमर्जन्सीसाठी अशा वस्तू हाताशी ठराविक जागेवर ठेवल्या पाहिजेत!”
कुणी काही बोलण्यापूर्वीच माझा नवरा म्हणाला,
“आमच्याकडे असते. प्रत्येक खोलीत ठराविक जागी मेणबत्ती, काडेपेटी आणि टॉर्चसुद्धा असतो.”
“अरे वा!फारच छान!” भाऊजी म्हणाले.
मला मात्र ती दहा रुपयांची नोट आठवली.
जेव्हा फ्लॅट मध्ये राहायला आलो, तिथे मोठीमोठी छपराला भिडणारी भिंतीतली कपाटे, कितीतरी कप्पे! घरातल्या माणसांचे अपरिहार्य गरजांचे सामनाही वाढलेले (इलेक्ट्रोनिक्स आणि कागदपत्रे!) आणि माझे वय वाढलेले! त्यामुळे स्मरणाचा भाग कमी झालेला! मग मी गृह्व्यवस्थेसाठी एक युक्ति शोधून काढली. कोणत्या कपाटात कुठे काय ठेवले आहे, त्याची एक सूची तयार करायची आणि सेलोटेपने दाराला लावून ठेवायची. दरवाजा उघडला की कुठे काय आहे, हे वाचूनच हव्या असलेल्या वस्तूसाठी कपाटात हात घालायचा!
लग्न करून सून जेव्हा घरात आली, ती म्हणाली,” आई , हे छानच आहे हं! हवे ते नेमके मिळून जाते. पण आई प्रत्येक वस्तू न चुकता पहिल्याच जागी ठेवता तुम्ही! ग्रेटच आहात!” हे मिळालेले प्रशस्तिप्रत्रक !
आणि स्विकारताना मनात दहा रुपयांची नोट!
एकदा नेव्हीवाले दीर आणि जाऊबाई घरी येणार होते. ह्या माझ्या जाऊबाई सुद्धा नेव्हीच्या हॉस्पिटलमधे डॉक्टर होत्या. माझे काही कामासाठी बाहेर जाणे गरजेचे होते. मी नवऱ्याला म्हटले,” जरा चहा करून घ्यायला सांगाल का? तोपर्यंत मी येतेच!”
मी आले. पुढचे सगळे आदरातिथ्य झाल्यावर त्यांना सोडायला गाडीपर्यंत गेलो. मी सुरवातीला नव्हते त्याबद्दल दिलगीरी व्यक्त केली. तशा वहिनी म्हणाल्या,” अरे वैजयन्ती हम अचानक आये थे. और क्या हुवा? घर अपनाही है!”
“फिर भी!”
“लेकिन वैजयन्ती यु आर जस्ट परफेक्ट, मुझे कुछ तकलीफ नही हुई. जहाँ शक्कर होनी थी, थी. जहाँ चाय होनी थी, थी. बादमें तो फ्रिझही खोलना था. दूध तो कोई बाहर थोडेही रखता है? एवरीथिंग वॉज फाईन !मैने पुरा घर देखा,अच्छा लगा. “
भाऊजी त्यांच्या खुरमुऱ्या करड्या आवाजात म्हणाले,” सो , वैजयन्ती , वुई आर गिव्हिंग यु सर्टिफिकेट. तुम्ही घर फारच ‘नीट, टीप टॉप अँड टायडी’ ठेवले आहे.”
त्या नेव्हीच्या करड्या शिस्तीचा आग्रह धरणाऱ्या माणसांचे ते सर्टिफिकेट घेताना अभिमानाने मन फुलुन येण्यापेक्षा ती दहा रुपयांची नोट आठवली आणि पपांच्या आठवणीने मन अगदी भरून आले.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कोणत्या कपाटात कुठे काय ठेवले आहे, त्याची एक सूची तयार करायची आणि सेलोटेपने दाराला लावून ठेवायची. दरवाजा उघडला की कुठे काय आहे, हे वाचूनच हव्या असलेल्या वस्तूसाठी कपाटात हात घालायचा!>>>>>हे माझ्या एका मैत्रिणीने केले होते. अगदी स्वयंपाक घरात सुध्दा! तिच्या सासुबाई आल्या कि त्यांना सोपे जायचे. खुप नविन वाटली मला ती कल्पना आणि सोईस्कर पण.
मी पण मग प्रयोग केला नविन घरात ( किचन खुप मोठे असल्याने सुरवातीला गोंधळ व्हायचा) पण आता अजुन तरी लक्षात रहात असल्याने तो प्रकार बंद केला Happy

मस्तच...

बरेचदा करत राहतो सुची वगैरे... पण २-३ महिन्यातुन एकदा हात फिरवावा लागतो. पोरांच्या गडबडित इकडे तिकडे होतात काही वस्तू... पण ठिक आहे.

फार पुर्वी अगदी डावीकडुन ५ चे पुस्तक इतकं नेटकं काम होतं. {तो मीच होतो का ?} Happy

(एकीकडे राहून राहून, एका छोट्या चूकीसाठी खरे तर हलगर्जीपणासाठी कानाखाली म्हणजे जरा जास्तच शिक्षा असे वाटतेय) तरीही शिस्त लावताना, केलेली शिक्षा, नेमकी कशासाठी केली, हे समजले आहे की नाही ह्याची खात्री करून घेणारे वडील थोर!

हे ही लेखन सहज सुंदर, चांगले आहे...

हर्पेन आणि अश्विनीमामी,

मलाही थोबाडणे पटले नाही. पैसे देतांना वडिलांना संभाव्य परिणामांची कल्पना मुलीला द्यायला हवी होती. जर पैसे देता आले नाहीत तर परत कसे आणायचे याविषयी कृती (प्रोसिजर) आखून देणे अपेक्षित आहे. तसेच पैसे म्हणजे जबाबदारीची वस्तू असून तिच्याबाबत सदैव सजग असणे महत्त्वाचे आहे असे स्पष्टपणे सांगायला हवे होते.

आ.न.,
-गा.पै.

थोबाडित मारण्याचे कौतुक अजिबात पटले नाही. पटण्यासारखे नाही.
अतिव्यवस्थितपणा, त्याचा सोस घरातले वातावरण आणि लोकांची मनःशांती बिघडवण्यास कारणीभूत ठरतो.
स्वतःच्या घरात किंचितही रिलॅक्स वावरता येणार नसेल तर घरात परक्यासारखेच वाटेल..

आशुचँप दे टाळी. लेख वाचून अगदी याच धमाल बाफाची आठ्वण झाली.

लेख चांगलाय. फक्त ते एवढं मुस्काडात मारायला नको होतं असं वाटलं. पण पूर्वी चाईल्ड सायकॉलॉजीला कोणी हिंग लावून विचारीत नसे हे मात्र खरं.

मला आवडलं!
"तो" काळ थोबाडीत मारण्याचाच होता.'मुलांना मारु नये, समजावुन सांगावे' वगैरे वारे नंतर वाहिला लागले.
माझे आई-बाबा ही सांगतात त्यांनी कसा छोट्या छोट्या गोष्टींसाठी मार खाल्लाय ते.
मीही खाल्लाय... अर्थात त्याचं समर्थन होऊ शकत नाही पण इथे लेखिके कडे मारणे हा मुद्दा नसुन वडीलांनी लावलेली शिस्त हा मुद्दा आहे. ती शिस्त, ते वळण कसं लावावं हे प्रत्येकावर डिपेण्ड आहे.

माझ्याही घरी अनेक गोष्टी जागच्या जागेवर सापडतात. माझ्या आईने कधीच ही गोष्ट जागेवर ठेवा अस ओरडुन-मारुन सांगितलं नाही. पण दाराबाहेर काढलेली आमची चप्पल ती स्वतः उचलून ठेवते तेंव्हा अपोआप लाजल्यासारखं होतं आणि आम्ही लगेच उठतो. अनेक वर्षांची ही सवय आहे. आईला स्वतःला शिस्त आहे आणि आम्ही पाहुन पाहुन शिकलोय या गोष्टी.....

पण दाराबाहेर काढलेली आमची चप्पल ती स्वतः उचलून ठेवते तेंव्हा अपोआप लाजल्यासारखं होतं आणि आम्ही लगेच उठतो.>>>>>>> रीये कधीपासुन तु असं वागायला लागलीस? म्हणजे कितव्या वर्षापासुन तुला लाज वाटायला लागली आईने तुझ्या वस्तु आवरल्याची? काही नाही ग माझ्या लेकीचा अंदाज लावायचा प्रयत्न करतेय Happy

लिखाण छान आहे. आणि तुमचा व्यवस्थितपणाही .
ती सेलो टेप ची आयडिया छान आहे.करून बघायला हवी.
पण आमच्याकडे घेतलेली वस्तू पुन्हा मूळ जाग्याला जाईलच याची कोणतीही गॅरंटी नसल्याने सेलो टेपवाली आयडिया रिस्की आहे .

यामध्ये मी किती व्यवस्थित आहे, हा मुद्दा अजिबातच महत्वाचा नाही. परंतु वस्तू योग्य ठिकाणी असेल तर तिची उपयुक्तता कशी जास्तीत जास्त वापरता येऊ शकते आणि इतरांना त्याची कशी मदत होऊ शकते, हे सांगायचे होते.
वडिलांनी थोबाडीत मारल्याची गोष्ट ही अशीच आहे. ती त्यांची उस्फूर्त प्रतिक्रिया असावी किंवा त्यांच्या आयुष्यात दहा रुपयांच्या नोटेचा किंवा पैशांचा संदर्भ काही 'तसाच' असेल नाही का?

प्रतिक्रिये बद्दल सर्वांना धन्यवाद Happy

वैजु, छान जमलाय लेख. मी मार खाणार्‍या पीढीतली त्यामुळे कळलाही. शिस्तं महत्वाची हाच संदेश.
माझा अण्भव Happy -
मी होतेच झांबरी त्यामुळे मारही बर्‍यापैकी खाल्लाय... शिस्तीच्या अन चुकांच्या डिग्रीजप्रमाणात शिक्षांच्याही डिग्र्या होत्या.
घरात दोन्ही प्रकारची माणसं वावरली. कानी कपाळी ओरडणारी, कधीतरी राग अनावर होऊन धपाटा देणारी अन रियाच्या आईसारखी सतत कृतीतून दाखवत रहाणारी. सगळ्यांनाच मी खूप वाव दिला Happy
पण अत्यंत परिणामकारक ठरली ती तिसरी... कॄतीतून दाखवून देत रहाणारी माझी आत्या. मला घडवणार्‍या प्रत्येकाची स्वतःची एक मानसिकता होतीच... त्यामुळे त्याबद्दल मुळीसुद्धा तक्रार नाही.
मी स्वतः पालक म्हणून ह्या सगळ्यांचीच बनलेय. चुकांच्या डिग्रीजप्रमाणात लेकाला शिक्षा दिल्यात. त्यात फटकेही आलेच.

अती कशाचीही झाली की मातीच... तेव्हा अती व्यवस्थित घर बघितलं की मीच जरा बावरते.
शिस्तीला पर्याय नाही... हे खरच.

मला आवडल .. छान लिहल आहे
वडिलांचा नाही पण शिस्तीसाठी आनि उलट उत्तर करण्यासाठी आईचे सगळ्यात जास्त धपाटे मीच खाल्ले आहेत.. Happy आनि तरीही उलट बोलण्याचा आगाऊपणा अजुनही कमी झाला नाही Sad
पण फक्त तिच्यामुळेच सगळ्या फाईल मेटेंन करण्यापासुन ते कुठल्या डब्यात काय ठेवल आहे हे अजुनही व्यवस्थित जमत Happy

"तो" काळ थोबाडीत मारण्याचाच होता.'मुलांना मारु नये, समजावुन सांगावे' वगैरे वारे नंतर वाहिला लागले.
इथे लेखिके कडे मारणे हा मुद्दा नसुन वडीलांनी लावलेली शिस्त हा मुद्दा आहे.
>>>>>>>>>>>>>

रिया +७८६

लेख आवडला आणि पटलाही..

स्मिते, मला लहानपणीच अनेक गोष्टी आईला पाहुन करायची सवय आहे.जसं की माझ्या आईला घरातल्या मोठ्या माणसांसमोर पाय पसरुन बसलेलं आवडत नाही. त्याला कारण काही नाहीये पण तिला वाटत की हा त्यांचा एक प्रकारे अपमान असतो.
तिने मला स्वतःला पाय पसरुन बसु नकोस हे कधीच सांगितलं नाही पण एकदा दोनदा तिच्या बोलण्यातुन 'आजी/ मामा समोर बसलेत म्हणून मी पाय नाही पसरले' असं ऐकलं आणि अपोआपच हे मनावर ठसलं की मला मोठ्यांसमोर पाय पसरुन बसायचं नाहीये.
हे एक उदाहरण झालं.. मला कधीच आईला सांगावं लागलं नाही की हे कर , हे करु नकोस कारण मी बराच काळ आईच्या सहवासात असायचे. अगदी मी, आई आणि बाबा गप्पा मारत बसलेलो असताना दार वाजलं तर आपल्या आई बाबांच्या आधी आपण जाऊन उघडायला हवं वगैरे सांगितलं गेलं नाही तर समजलं..... पण माझ्या बहिणीला हे सगळं सांगावं लागतं.... आई सांगत नाही पण मी सांगते... कदाचित मी खुप घाई करत असेन... तिला पण पाहुन शिकायला मी वेळ द्यायला हवा कदाचित! पण 'कधी पासुन' हे असं नीटसं सांगता नाही येणार माझ्या बाबत... प्रिती बाबात सांगु शकते की मला आठवतं तसं म्हणजे तिला १३वं लागलं तेंव्हापासुन ती तीची छोटी मोठी कामं आईला करु देत नाही.