पान टपरीच्या बाजूला

Submitted by डॉ.विक्रांत प्र... on 16 June, 2013 - 10:18

पान टपरीच्या बाजूला
भिंतीच्या आडोश्याला
नुकतीच मिसरूड फुटली
मुले येती सिगारेट प्यायला
काही चुकल्या चुकल्यागत
काही अगदी बेपर्वा
चुटकी वाजवत राख झाडत
धूर सोडती आडवा तिडवा
जणू जातात एकटेच
जगापासून दूर दूर
सभोवती ओढून घेत
निळा पांढरा तो धूर
कुणी तरी येतो उगाच
कुणी आणला जातो ओढून
तंबाखूच्या उग्र गंधात
स्वत:स देती सारे झोकून
पाहता पाहता कोपऱ्यात
पाकिटांचा होतो किल्ला
मोठ्या टाईपात पाटी असतो
केविलवाणा आरोग्य सल्ला

विक्रांत प्रभाकर

http://kavitesathikavita.blogspot.in/

Group content visibility: 
Public - accessible to all site users

विक्रांतजी आपल्या कवितेत एखादा विषय घेवून आपण साध्या सहज व लयदार शब्दात तो जितका छान माण्डता व त्यातून जी परिणामकारकता बरोब्बर साधता मला बेहद्द आवडते

तुमची शैली हळू हळू आवडू लागली आहे जबरदस्त शैली आहे ही
"मुक्त"छंदच पण हळू हळू सैल सैल वेढे घेत घेत घट्ट पकडून ठेवणारा !!

वैभवजी ,आपल्या अभिप्राया बद्दल अतिशय धन्यवाद .मायबोलीवर बेफिकीर ,भारतीताई,देवपूरकर , रसप ,मुग्धमानसी ,जयश्रीजी, शशांक,आपण स्वतः अन असे इतरही अनेक सशक्त कवी आहेत .खरोखर इथे असणे हा काव्य जीवनातील सर्वात आनंददायी काळ आहे .

वैभवशी अगदी सहमत, तुम्ही डॉक्टर असल्याचेही एक परिमाण तुमच्या कवितेला आहे, ते काळाचे भान राखणारे व समाजाभिमुख आहे. ले.शु.

पाहता पाहता कोपऱ्यात
पाकिटांचा होतो किल्ला
मोठ्या टाईपात पाटी असतो
केविलवाणा आरोग्य सल्ला
..
कोरलेला, प्रत्येक विटेवर..

वैवकु, अगदी मनातलं बोललात. तुमच्याशी १००% सहमती.
रच्याकने : तुमच्या प्रतिसादातली शेवटची ओळ सविस्तरपणे समजावल काय? कळली नसली तरी मला सहमत व्हावसं वाटतंय.
आ.न.,
-गा.पै.

नमस्कार गामाजी

"मुक्त"छंदच पण हळू हळू सैल सैल वेढे घेत घेत घट्ट पकडून ठेवणारा !!<<<<<

मुक्त म्हणजे बंधन नसलेले मुक्तछंदाना लयीचे बंधन नसते म्हणजे प्रत्येक ओळीत / ओळींच्या संचाला कविताभर एकच लय -लगावली असावी असे नसते / असावीच असेही नसते (तरीही त्यास छंद म्हणतात हा मलातरी विनोद वाटतो)...नसावीच असे मात्र असते Happy

पण असे असलेतरी मुक्तछंदास ठराविक अंतरानंतर यमक मात्र असावे असे अभ्यासक मानतात हे अंतर देखील ठरावीकच असावे असेही नाही बदलत थेवताही येते एकदा एक जोडी वापरून झाली की यमकेही बदलत ठेवता येतात असे करणे नादमाधूर्य लय व ठेका यासाठी कवितेत गरजेचे मानले जाते
विक्रांतजींच्या कवितेत हे सगळे मला दिसते आहे

शिवाय आशय विषयही छान रोजच्या आयुष्यातले असतात भाषा सहज साधी सौम्य शांत अशी सहसा असते
त्यांनी निवडलेल्या ओळीना आवर्जून नसले तरी शब्दाना कवितिक लय व ताल अंगभूतपणेच असतात

अर्थानुरूप पाहता ओळी ओळीतून मनाचे सौंदर्य निथळत येते

अश्या ओळी एक एक करत सैल सैल वलये मनाभोवती तयार करतात व ही वलये आपल्या मनास पूर्णपणे वेढून टाकत हळू हळू शेवटी असे काही घट्ट जखडतात भवनांवर ताबा मिळवतात की सुटावेसेही वाटत नाही लवकर

असो मला जे प्रामाणिक पणे वाटले ते व्यक्त केले हे माझे वैयक्तिक मत आहे मी जे पाहतो ते असायला असेच्या
असेच असेल असे काही नाही
न पटल्यास क्षमस्व
चूक भूल द्यावी घ्यावी

धन्यवाद

~वैवकु !!! Happy

भारतीताई ,इब्लीसजी मामा अनेक धन्यवाद .
वैभवजी ,आता तुम्हाला काय लिहू ? माझ्या कविते बद्दल एवढे चांगले मलाही लिहता आले नसते .आपला आभारी आहे लिहणेही औपचारिक वाटत आहे .तरीही तेच लिहणे भाग आहे . धन्यवाद !!