'अनुमती' - एका निर्णयाचा प्रवास

Submitted by आशूडी on 15 June, 2013 - 03:04

गजेंद्र अहिरे या नावासोबत अनेक गोष्टी आपसूक येतात. मुख्य म्हणजे अस्सल दर्जेदार कथाबीज. एखादी कथा जेव्हा आपण सहज 'रिलेट' करु शकतो तेव्हा लेखकावर अधिक जबाबदारी येते ती वाचकाला गुंतवून ठेवण्याची. काही घटना, प्रसंग इतके सहज, रोज घडत असतात की त्यावर लिहीणं महाकठीण होऊन बसतं. म्हणूनच जगणं चिमटीत पकडून त्याचं बिनचूक निरीक्षण मांडणारे लेखक-कवी कायमच वाचकांच्या मनात स्थान मिळवतात. अहिरेंच्या कथा अशाच असतात. दीर्घकाळ मनात रेंगाळणार्‍या. परिस्थितीचं भान जपणार्‍या. त्यातून कोणता संदेश, तात्पर्य वगैरे मिळत नसतं. या कथा असतात माणसांच्या. तुमच्या आमच्यासारख्या मातीचे पाय असणार्‍या, माफक पण लवचिक 'कणा' असलेल्या- म्हणजेच लढून लढून शेवटी नाईलाज म्हणून परिस्थितीला शरण जावे लागण्यात कमीपणा न मानणार्‍या माणसांच्या.

अहिरेंचे आधीचेही अनेक चित्रपट मी पाहिले आहेत. त्यांच्या 'सैल' बद्दलही मी इथं लिहीलं होतं. त्यामु़ळे 'अनुमती' पाहताना आपल्याला एक संपूर्ण कथा तपशीलांसहित पडद्यावर साकारल्याचा अनुभव मिळणार आहे याबद्दल खात्री होती.मोजकी पात्रं, छोट्या पण अचूक शब्दांनी साधलेले संवाद आणि कथेला पुढे नेणारं छायाचित्रण,पार्श्वसंगीत आणि गीतं तसंच कलाकारांची चपखल निवड ही अहिरेंच्या चित्रपटातली ठळक वैशिष्ट्ये. 'अनुमती' या सर्व कारणांमुळे देखणा तर झाला आहेच, परंतु कथेचा पायाही भक्कम असल्याने थेट मनाला भिडतो.

कथा आहे अत्यंत सामान्य तरीही सुंदर सहजीवन जगलेल्या एका सुखी दांपत्याची. आयुष्यभर खस्ता खाऊन, पै पै जमवून मुलांना मोठं करुन सर्व जबाबदार्‍यांतून मुक्त होऊन आता निवांत निवृत्त आयुष्याची स्वप्नं रंगवणार्‍या एका प्रेमळ जोडप्याची. सगळं काही सुरळीत चाललं असताना अचानक ठेच लागते अन संसारचक्राला खीळ बसते. अर्ध्या वाटेत जोडीदार आपल्याला सोडून जातोय की काय अशा भीतीने मन सैरभैर होऊन जातं. गंमत असते ना, सहजीवनाची स्वप्नं आपण किती सहज रंगवतो पण एकट्यानं राहणं अपरिहार्य असलं तरी पाप समजल्यागत आपण तो विचारही मनाला शिवू देत नाही. जेव्हा नियती असा अचानक डाव साधते तेव्हा मात्र मनाच्या सगळ्याच शिवणी उसवायला लागतात. त्यातूनच मग हळूहळू मन खंबीर होत जातं अन नियतीशी दोन हात करायला मनुष्य सज्ज होतो. प्रयत्नांची शर्थ करणंच फक्त त्याच्या हातात असतं. मात्र नियतीचं दुसरं नाव 'परिस्थिती' आहे ही जाणीव जेव्हा होते तेव्हा तो अगतिक होतो, हतबल होतो. प्रयत्नांची शिकस्त झाल्यावर परिस्थितीला शरण जाणं ही त्याची हार मुळीच नसते.कारण प्राणपणानं लढणारा शूर योध्दा जेव्हा रणांगणावर धारातीर्थी पडतो तेव्हा त्याच्या मृत्यूचा गौरव 'वीरमरण' या शब्दांत केला जातो.

कथानायकाचा हा चढ उताराचा अवघड प्रवास आपल्या कसदार अभिनयाने सादर करतात विक्रम गोखले. सौभाग्याच्या लेण्यासाठी जीव टाकणार्‍या कितीतरी सावित्रींच्या कहाण्या मराठी चित्रपटसृष्टी आजवर सांगत आली. पण पत्नीच्या आयुष्यासाठी जीवाचं रान करणार्‍या 'रत्नाकर पाठारे' ची गोष्ट अभावानंच पुढे आली. एक पुरुष, नव्हे तुटपुंजी पुंजी बाळगलेला म्हातारा पुरुष आपल्या बायकोवरच्या निरतिशय प्रेमापोटी काय काय करु शकतो याचं हृदयस्पर्शी चित्रण म्हणजे अनुमती. गोखल्यांनी रत्नाकर पाठारे अक्षरशः जगून दाखवला आहे. कोणत्याही लांबलचक स्वगतांशिवाय, मेलोड्राम्याशिवाय केवळ मुद्राभिनयातून, कर्तव्य आणि व्यवहाराच्या बेचकीत सापडल्यावर छळणारी अगतिकता त्यांनी साकारली आहे. म्हणूनच ती कथा कुठेतरी आपली वाटते. याचं श्रेय अर्थातच ते स्वत:, दिग्दर्शक आणि पार्श्वसंगीताला. नायकप्रधान चित्रपटांचा मोठा इतिहास असलेल्या आपल्या भारतीय चित्रसृष्टीत अभिनयाचा विस्तृत पट उभा करु शकणार्‍या विक्रम गोखल्यांसारख्या कलाकाराला आजवर इतकी मोठी, समर्पक भूमिका का मिळू नये, याचं शल्य वाटत राहतं. या भूमिकेबद्दल त्यांना राष्ट्रीय पारितोषिक मिळणं आवश्यकच होतं. कारण जेव्हा कलाकार सातत्यानं काहीतरी चांगलंच देत असतो तेव्हा त्याचा सन्मान करुन त्यासाठी कृतज्ञता व्यक्त करणं कर्तव्यच होऊन बसतं.

कथेला आवश्यक म्हणून येणारी पात्रं म्हणजे पाठारेंची मुलं, सून आणि जावई. सुबोध भावेने पैशाच्या चणचणीने उद्विग्न तरीही वडिलांना समजून घेणार्‍या समंजस मुलाचं काम अतिशय मनापासून केलं आहे. तो एक खरोखरच उत्तम अभिनेता आहे. सई ताम्हणकर आणि नेहा पेंडसे यांना त्यांच्या नेहमीच्या चौकटीपेक्षा वेगळं काम करताना बघणं हा फारच सुखद अनुभव आहे. त्या दोघीही छोट्या छोट्या प्रसंगातूनही लक्षवेधी ठरतात.आनंद अभ्यंकरांचा सहज अभिनय पाहताना पुन्हा एकदा आता ते नसल्याची जाणीव चुटपूट लावून जाते. खूप पोटेन्शियल असलेल्या या कलाकाराला फार लवकर एक्झिट घ्यावी लागली. किशोर कदम आणि अरुण नलावडे यांचही काम त्यांच्या लौकीकाला साजेसं उल्लेखनीय.

नीना कुळकर्णी आणि रिमा यांनी विक्रम गोखलेंना तोडीस तोड साथ दिली आहे. या दोघींची कारकीर्द खरोखर अभ्यासण्यासारखी आहे. त्यांची चित्रपटांची निवड आणि त्यांनी त्या चित्रपटाला दिलेलं योगदान कायमच स्मरणात राहतं. माधवीचं रत्नाकरच्या आयुष्यातून नाहीसं होणं हे किती मोठी पोकळी निर्माण करणारं आहे हे काही मोजक्या दृष्यांतून नीनाताई अधोरेखित करतात. त्यांचं दिलखुलास मनमोकळं हसणं रत्नाकरचं कारुण्य अधिकच गडद करत जातं. रत्नाकरला फार पूर्वीपासून ओळखणारी, त्याला समजून घेणारी मैत्रिण रिमाताई आपल्या सशक्त अभिनयाने सहज साकारतात. आयुष्याकडे अलिप्ततेने बघणार्‍या अंबूच्या दृष्टिकोनाने रत्नाकर भारावून जातो. बर्‍याच दिवसांनी घरचं गरम जेवण मनापासून जेवणार्‍या रत्नाकरला बघून अंबूच्या डोळ्यात उभं राहिलेलं पाणी आपलंही काळीज हलवतं. मित्राचा स्वाभिमान न दुखावता त्याला समजून घेणार्‍या अंबूची भूमिका खरोखर केवळ रिमाताईच करु शकल्या असत्या असं आवर्जून म्हणावंसं वाटतं.

संपूर्ण चित्रपटभर कोसळणारा पाऊस, कोकणातली हिरवळ, समुद्राची निळाई आणि या सर्वातून ठरलेली मार्गक्रमणा करत जाणारी रेल्वे एकत्रितपणे जणू रत्नाकरच्या मनातले आठवणींचे, निर्णयाचे हिंदोळेच समोर आणतात. एका गंभीर विषयावरची कथा नेत्रसुखद करण्याची मोठी कामगिरी केली आहे गोविंद निहलानींनी. त्यांच्या छायाचित्रणाने आणि नरेंद्र भिडे यांच्या सुरेल पार्श्वसंगीताने कथा एका वेगळ्याच उंचीवर जाऊन पोहोचते. गजेंद्र अहिरेंची गीतं 'गाणी' होण्याआधी थेट कविता होऊन पावसासारख्या रिमझिमत बरसतात. शेवटचं 'पालखी निघाली..' गाण्याच्या शब्दांनी कथेचा संपूर्ण पट काही क्षणांत नजरेसमोरुन तरळून जातो. हे गाणं या चित्रपटाचा मानबिंदू आहे म्हटलं तरी चालेल.

निर्णय घेण्याची 'अनुमती' परिस्थिती रत्नाकरला देते का? त्याचा निर्णय 'अनुमती'चाच ठरतो का? हे प्रश्न महत्वाचे असले तरी रत्नाकरचा ल॑ढा त्याहीपेक्षा महत्त्वाचा ठरतो. एखाद्याच्या जगण्या-मरण्याचा निर्णय घेणारे आपण कोण? हा मूलभूत प्रश्न मांडणारा अविस्मरणीय चित्रपट - 'अनुमती'.

'अनुमती' हा उत्कृष्ट चित्रपट शुभारंभाच्या खेळाला, विक्रम गोखले, गजेंद्र अहिरे, गोविंद निहलानी, दिलीप प्रभावळकर व इतर कलाकारांच्या समवेत पाहण्याची संधी दिली त्याबद्दल 'मायबोली', माध्यम प्रायोजकांचे मन:पूर्वक आभार.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

किती सुंदर शब्दकळा आणि लेखनशैली आहे तुमच्याकडे - वाह - सिनेमा नक्कीच पहाणार .....

सुंदर लिहिलं आहेस. सिनेमाबद्दल सर्वांगाने लिहिलं आहेस, त्यामुळे आणखी वेगळं बोलण्यासारखं काही राहिलंच नाही. अप्रतिम सिनेमा, एवढंच लिहावंसं वाटतंय. Happy

सुंदर!

स-ही लिहीतेस तू!!
चित्रपट बघता नाही येणार इतक्यात. पण परिक्षणं वाचून चित्रपट पाहील्याचे समाधान मिळतयं!