चल खरेदी करूया , पावसाच्या दोन सरी...

Submitted by बागेश्री on 7 June, 2013 - 09:02

गर्दी ओसंडली आहे
आकाशीच्या ह्या बाजारी,
चल खरेदी करूया
पावसाच्या दोन सरी...

सर येईना एकली
म्हणे मेघ हवा काळा,
घेऊ विकत त्यालाही
दारी बांधू पावसाळा..!

वाट पहाणेच नको
हवा तेव्हा कोसळावा,
बारमाही अंगणात
कोंब हिरवा हिरवा..

नाही कुठे रखरख,
पाण्यासाठी वखवख..
मेघ माझा, सर माझी,
श्रीमंत मी झाले बघ!

ऐक जरा हे वरूणा,
माझी पिशवी अभ्रांची
दे तू मेघ आणि सरी
घाई घरी रे जाण्याची...

"अगं बाळे, जागी हो तू
पावसाला कोण बांधे?
आहे माझ्या मालकीचा
माझ्या घरातच नांदे!"

परते मी नाराजीने
मागे मागे मेघ आला,
पावसाला पाठवतो,
अलवार आश्वासला...

Group content visibility: 
Public - accessible to all site users

दारी बांधू पावसाळा..!

मस्त कवीकल्पना. तुझ्या कवितेत एखादी तरी अशी कल्पना दिसतेच दिसते...

कवितेतील मध्यवर्ती कल्पना, त्या अनुषंगाने आलेल्या काही ओळी, बोलकेपणा आणि निरागस मांडणी हे आवडले.

धन्यवाद!

छानै..

"वाट पहाणेच नको
हवा तेव्हा कोसळावा,
बारमाही अंगणात
कोंब हिरवा हिरवा.." >>> छान.

वेगळी संकल्पना हे या कवितेचं वैशिष्ट्य आहे.

ह्या सरींची शॉपिंग पाहून मला तुझ्याच "बाजार स्वप्नांचा" या ललिताची आठवण झाली.

बाकी कविता अतिशयच म्हणजे अतिशयच आवडली .

फार फार सुंदर आणि निरागस कविता! पावसाला दारी बांधून ठेवायची कल्पना लईच भारी वाटली... Happy

धन्यवाद दोस्तहो...

बापरे अमित, ते ललित लक्षात आहे तुझ्या? सस्पेन्स वाटतं ते लोकांना वाचून Happy