जीवsरूss

Submitted by सई गs सई on 5 June, 2013 - 05:05

स्वप्नाळू पापण्यांचं,
आभाळफेक झेपेचं,
लपापत्या छातीचं..
माझं पाखरूss

गाईच्या डोळ्यांचं,
अडखळ पायांचं,
बावऱ्या भितीचं..
माझं वासरूss

दुडक्या चालीचं,
चुकल्या वाटेचं,
अनावर ओढीचं..
माझं कोकरूss

देवाच्या गाण्याचं,
पाऊस पाण्याचं,
चांदण गावाचं..
माझं जीवsरूss

- सई

Group content visibility: 
Public - accessible to all site users

पोरींनो, माझ्या पहिल्याच कवितेला इतके गोड गोड प्रतिसाद दिल्याबद्दल तुम्हाला खूप खूप धन्यवाद! Happy

मला ही रचना एखाद्या यादीप्रमाणे वाटली.
यातून नक्की काय अभिव्यक्त करायचे आहे ते समजले नाही.

कदाचित असंही असेल की,
एकूणच मला कविता थोssssडीशी समजते आणि
अजून बरीsssssचशी समजायची बाकी आहे.

भारतीताई आणि दाद यांना ’पोरींनो’ संबोधणार्या या कवयित्री,
"पोरा, कविता वाचत रहा.... व्यासंग वाढव..... समजायला लागतील .... ह्ळूsssहळू"
असा सल्ला मलाही देतील असे वाटते..... Wink

Bhide Sir,
'पोरिंनो' हे 'छोट्या मुलींनो' या अर्थाने खरंच नाही म्हटले हो मी. सगळ्यांच्या प्रतिक्रिया खूप छान वाटल्या म्हणुन ती हाक आपसुक निघून गेली तोंडून. पण तरीही, भारती, दाद आणि रिया यांना काही वेगळं वाटलं असेल तर त्यांची मी क्षमा मागते. बाकी कवितेबद्दल, 'समजून' घ्यावं लागावं असं काही अगम्य नाहीच तिच्यात. साधीशीच आहे खूप. माणसाची स्वप्नं, भिती, झेप, ओढ. त्याचं हुंदडणं, अडखळणं, वाट चुकणं आणि त्याच्या जीवातलं कारुण्य, गाणं, ओल अन्‌ चांदणं. हे सगळं पाखरू, वासरू, कोकरू यांच्या देहमनाच्या अविर्भावांमधून व्यक्त करण्याचा एक प्रयत्न, एवढंच तर आहे या कवितेत. आणि व्यासंग वाढवल्याने कविता 'समजतात' हे बाकी नवीनच आहे बरं का माझ्यासाठी! Wink असो. प्रतिसादाबद्दल धन्यवाद!

भिडे सर... हे बरोबर आहे Happy

बाकी आम्हाला पोरी म्हटल्यानं नसलेल्या रिबिनीनं वर बांधलेल्या वेण्या उडवत मी अन भारती उंडारतोय असं डोळ्यांसमोर तरळून गेलं... अर्थात "त्या" वयात हं... ह्या नव्हे.
व्यासंगानं बरच काही अधिक कळू लागतं... ह्यावर माझा विश्वास आहे.

लॉग इन आयडी मधे ऽ लिहू शकणार्‍या नव़्या दमाच्या, ताज्या ब्लॉगकरणीला वेलकम गऽ
नया ब्लॉऽग.. नया आयडीऽ ;)क्या बातै!

दाद, या हिशोबाने मी माझं वय किती वर्ष वाढवू??? Proud
कारण तुम्हा दोघींसोबत यायला मी फक्त वयाचाच विचार करु शकते... बाकी गोष्टीत तुमची बरोबरी या जन्मात शक्य नाही Proud

सई गs सई,

नकारात्मक प्रतिसाद खिलाडूपणे स्वीकारलात, बरं वाटलं.
कवितेतून तुम्हाला जो आशय पोहोचवायचा आहे त्याबद्दल वरील प्रतिसादात दिलेलं स्पष्टीकरण पटलं नाही. असो.....

व्यासंग वाढवल्याने कविता 'समजतात' हे बाकी नवीनच आहे बरं का माझ्यासाठी! >>> याचं उत्तर ’दाद’ यांनी त्यांच्या प्रतिसादात दिलं आहे. त्यामुळे परत तेच सांगण्यात काही हंशील नाही.

फक्त एकच विनंती : कृपा करून मला ’सर’ म्हणू नका. नुसतं भिडे म्हटलं तरी चालेल. कारण ’सर’ हे फार मोठ्या लोकांसाठी वापरतात आणि एक वय सोडलं तर बाकी सर्व बाबतीत मी इथल्या सर्वांपेक्षा लहान आहे. (हे मी याआधीही अनेकदा सांगितलं आहे.)

पुलेशु

दाद,
तुम्ही आता म्हटलात म्हणुन माझंही लहाणपणीचं चित्रं आठवलं मला! Happy आजी वेण्या घालून द्यायची आणि 'पोरींनो पोरींनो' म्हणून बोलवायची सगळ्यांना, अगदी बायकांनाही! आम्हीही मग बायकांना पोरीच म्हणायला लागलो. Happy माझी ती सवय अजून गेली नाही आणि त्याचा हा पंचनामा! Wink बाकी व्यासंगाच्या बाबतीत तुमचं म्हणणं काही अंशी पटतं मलाही. आपलं भाषाज्ञान आणि शब्दवैभव वाढवायला त्याची नक्कीच मदत होते. पण कवितेतल्या सगळ्या शब्दांचे 'अर्थ' (आणि त्यांची history-geography) कळाले तर ती कविता कळेलच असे मला नाही वाटत . कवितार्थाची अनुभुती आपल्या रोजच्या जगण्यातूनच जास्त समृध्द होत जात असावी. उदाहरणार्थ हेच बघा ना, फुलं माळणे, काजळ घालणे, समई लावणे, असं बरंच काय काय करताना त्यामधे भावनांची जी तरलता आणि कधी जी सल जाणवते ती सरळ मनातली असते (आणि अनुभवांचीही), त्यावर कसल्या व्यासंगाचं ओझं नसतं. मला वाटतं कविताही अशीच अनुभवावी, तिच्या मागे पुढे नको तितके संदर्भ नं लावता. सगळं असंच असावं असं म्हणत नाही मी, पण ही एक बाजू आहे जी मला जास्त भावते. Happy बाकी व्यासंगानेही जगणं समुद्ध होत जात यावर दुमत नाहीच. Wink

इब्लिस,
स्वागताबद्दल धन्यवाद! Happy ही कविता खूप जुनी आहे. मधे खूप वर्षे काही लिहावं वाटलं नाही. पण आजकाल जोर वाढला आणि आणखी कविता आल्या मनात. म्हणून म्हटलं मांडाव हे ब्लॉग आणि मायबोलीवर. आणि 'सई गs सई' ही हाक आजीचीच! Happy

Bhide,
स्पष्टीकरणातलं नक्की काय पटल नाही हे सांगू शकता का?

बाकी व्यासंगाच्या बाबतीत तुमचं म्हणणं काही अंशी पटतं मलाही. आपलं भाषाज्ञान आणि शब्दवैभव वाढवायला त्याची नक्कीच मदत होते. पण कवितेतल्या सगळ्या शब्दांचे 'अर्थ' (आणि त्यांची history-geography) कळाले तर ती कविता कळेलच असे मला नाही वाटत . कवितार्थाची अनुभुती आपल्या रोजच्या जगण्यातूनच जास्त समृध्द होत जात असावी. उदाहरणार्थ हेच बघा ना, फुलं माळणे, काजळ घालणे, समई लावणे, असं बरंच काय काय करताना त्यामधे भावनांची जी तरलता आणि कधी जी सल जाणवते ती सरळ मनातली असते (आणि अनुभवांचीही), त्यावर कसल्या व्यासंगाचं ओझं नसतं. मला वाटतं कविताही अशीच अनुभवावी, तिच्या मागे पुढे नको तितके संदर्भ नं लावता. सगळं असंच असावं असं म्हणत नाही मी, पण ही एक बाजू आहे जी मला जास्त भावते. बाकी व्यासंगानेही जगणं समुद्ध होत जात यावर दुमत नाहीच.>>>>>>>>> छान लिहिलत. पटलं! Happy

वैद्यबुवा आणि kiranyake,
कवितेची आणि प्रतिसादाचीही दखल घेतल्याबद्दल धन्यवाद! Happy