अधिवेशनामागचे चेहरे: श्री. संजय सहस्रबुद्धे

Submitted by समीर on 20 May, 2013 - 10:06

यंदाच्या अधिवेशनाच्या संयोजनात तुमची भूमिका काय आहे?
श्री सहस्रबुद्धे: मी २०१३च्या बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या अधिवेशनाचा खजिनदार म्हणून काम करतोय. त्याचबरोबर मी न्यू इंग्लंड मराठी मंडळाचासुद्धा खजिनदार आहे. या दोन वेगवेगळ्या जबाबदार्‍या आहेत.
Sanjay_Sahasrabudhe_P2.jpgत्या संदर्भात तुमच्या विभागातल्या काही ताज्या किंवा नवीन घडामोडी सांगू शकाल का?
श्री. सहस्रबुद्धे: आम्ही निधिसंकलनाला पहिल्यापासूनच जोरदार सुरूवात केलेली होती. कारण मागच्या काही अधिवेशनांच्या अनुभवांवरून असं वाटलं होतं की, नावनोंदणीची एक ठरावीक क्षमता असते. कारण बरेच लोक असे असतात जे अधिवेशनाला नक्कीच जातात. पण आमच्याकडे निधिसंकलन आम्ही जरा जोरदार करायचं ठरवलं होतं आणि त्याच्यासाठी टार्गेट्स देण्याचं जरा महत्त्वाचं काम होतं. त्याच वेळी अमेरिकेमध्ये अर्थव्यवस्था सध्या जशी आहे त्याप्रमाणे देणग्या देणार्‍या लोकांची संख्या दिवसेंदिवस कमी होत जातेय. भारतामध्ये गणित थोडसं उलटं आहे. भारतामधून देणगीदारांची संख्या, किंवा प्रायोजकांची संख्या जास्त असते, ती वाढवणं महत्त्वाचं होतं.

वाचकांच्या माहितीकरता सांगाल का, की निधीसंकलन अशा अधिवेशनांकरता का आवश्यक असतं ?
श्री. सहस्रबुद्धे: अधिवेशनाच्या तिकिटाचा दर साधारण $२७५ इतका असतो. त्यामध्ये तीन दिवसांचा कार्यक्रम आणि जेवण वगैरे अंतर्भूत असतं. पण सध्या भारतातून कलाकार आणण्याकडे कल आहे, त्यामुळे अर्थातच खर्च वाढतो. आमचं बजेट साधारणपणे $१.६ मिलीयन आहे. आता होतं कसं की साधारण साडेतीन हजार लोक येतील, असं जर गृहित धरलं, तर त्यांच्या तिकिटाच्या मिळणार्‍या रकमेपेक्षाही जवळजवळ $५-६ लाख डॉलर्स जास्ती आवश्यक असतात. हे देणगीच्या स्वरूपात येतात, प्रायोजकत्वाच्या स्वरूपात येतात. तर ही जी तूट आहे, ती भरून काढण्यासाठी देणग्या गोळा करणं खूप आवश्यक असतं. फक्त तिकिटाच्या रकमेतून एवढा दर्जेदार कार्यक्रम नाही देता येत.

म्हणजे खर्च एकंदर तिकीटविक्री आणि देणग्यांमधून भरून काढावा लागतो का?
श्री. सहस्रबुद्धे: अगदी. माणशी चारशे डॉलर जर आपण तिकिटाची किंमत ठेवली, तर आपल्याला देणग्या गोळा कराव्या लागणार नाहीत. पण आतापर्यंत तिकिटाची किंमत साधारण $२७५ असते. सध्या अमेरिकेची अर्थव्यवस्थाही नाजूक आहे आणि अधिवेशनाचे सर्व खर्चांचे आकडे वर चालले आहेत. तरीसुद्धा आपण या अधिवेशनासाठी तिकिटाचा दर $२७५च ठेवलेला आहे.

तुम्ही कशाप्रकारे देणग्या गोळा करता आहात आणि कधीपासून या कामाला सुरुवात झाली ?
श्री. सहस्रबुद्धे: शिकागो अधिवेशन ज्या वेळी झालं, त्यावेळेलाच आम्ही सर्वांना पुढच्या अधिवेशनासाठी बॉस्टनला यायचं आमंत्रण दिलं होतं. तिथे ’कॉसमॉस बॆंके’चे काही मान्यवर आलेले होते आणि त्यांच्याबरोबर तिथेच बोलणं होऊन त्यांनी आम्हांला $७५ हजारचं प्रायोजकत्व देण्याचं कबूल केलं होतं.

ही कॉर्पोरेट स्पॉन्सरशिप म्हणू आपण. याशिवाय वैयक्तिक देणगीदारांनाही तुम्ही विचारत असाल?
श्री. सहस्रबुद्धे: नक्कीच. आमचं एक सर्वांत लोकप्रिय पॅकेज असं आहे की, एक हजार डॉलर तुम्ही जर देणगी दिलीत तर त्यामध्ये आम्ही दोन रजिस्ट्रेशन्स देतो आणि त्यांना प्रीमियम सीट्‌स्‌ मिळतात. पूर्वीच्या काही अधिवेशनांत आम्ही साधारण असा तक्रारीचा सूर ऐकला होता, की फार लांबच्या सीट्‌स्‌ मिळतात, किंवा आम्ही अगदी पहिल्या दिवशी, म्हणजे ज्या दिवशी तिकिटं मिळायला सुरुवात झाली, त्यादिवशी तिकीट काढलं तरीही आम्हांला लांबचं तिकीट मिळालं. कदाचित आधीच्या अधिवेशनांत ही सुविधा असेलही. तर अशी $५५०ची दोन प्रौढांची तिकिटे त्यात समाविष्ट असतात आणि साडेचारशे डॉलरची देणगी असते. पण ज्यावेळेला आम्ही दोन वर्षांपूर्वी ही पद्धत सुरू केली, त्यावेळेला आम्ही काही सवलती दिल्या होत्या. उदाहरणार्थ, स्थानिक देणगीदारांना आम्ही न्यू इंग्लंड मराठी मंडळाचं एक वर्षाचं सदस्यत्व फुकट दिलं होतं.

म्हणजे स्थानिक सुरुवात तिथूनच झाली.
श्री. सहस्रबुद्धे: हो, स्थानिक पातळीवर. पहिला चेक मी स्वतःच भरला, कारण आपल्या घरापासून सुरुवात करावी, असं माझं मत आहे. मग संयोजक आहेत आणि आमची जी मुख्य समिती आहे त्या सगळ्यांनी धडाधड चेक दिले. आणि २०११ च्या गणेशोत्सवात त्याचा मुहूर्त केला.
मग आम्ही काय केलं की, पूर्वीच्या अधिवेशनांचे जे देणगीदार आहेत, त्यांच्याशी संपर्क साधायला सुरूवात केली. त्यानंतर शेजारच्या, म्हणजे न्यू इंग्लंड मराठी मंडळ आहे, त्यांच्या अखत्यारित येणार्‍या सर्व राज्यांना संपर्क केला. त्यानंतर पुढच्या टप्प्यात खाली फिलाडेल्फियामध्ये गेलो, शिकागोला गेलो, बे एरियामध्येसुद्धा आलो होतो. आणि र्‍होड आयलंड, न्यू यॉर्क, न्यू जर्सी या शेजारच्या राज्यांतही.
तिथे जाऊन कॅम्पेनिंग केलं आणि देणग्या मिळायला सुरूवात झाली. मला सांगायला आनंद वाटतो की, आपल्याकडे अमेरिकेत भरपूर मराठी माणसं दानशूर आहेत. म्हणजे त्यांनी आवर्जून आम्हांला चांगली पत्रंसुद्धा लिहिली आहेत. आम्ही ती वेबसाइटवर टाकणार आहोत. त्यांत आवर्जून लोकांनी कौतुक करून लिहिलं आहे की, तुम्ही एवढी मेहनत करताय तर आम्ही आमचा खारीचा वाटा उचलतोय. एक गृहस्थ आहेत, ते स्विझर्लँडला राहणारे आहेत. त्यांनी माझा नंबर शोधून काढला होता आणि त्यांनी मला कॉल करून विचारलं की, मला पाच हजार डॉलर देणगी द्यायची आहे, तर काय प्रक्रिया आहे. म्हणजे त्यावेळी तर साइटवर देणग्या स्वीकारण्याचीही व्यवस्था नव्हती. म्हणजे २०११चीच गोष्ट आहे ही, जेव्हा वेबसाइटचं काम सुरू होतं.
सुरुवातच तेव्हापासून चांगली झाली असं म्हणता येईल. आताही अजून दिड-एक महिना आहे, तर आम्हांला अजून काही बेत तडीस न्यायचे आहेत, पण आम्ही जवळपास काम पूर्ण करत आणलेलं आहे.

मग देणग्यांखेरिज आणखी काही केलं का?
श्री. सहस्रबुद्धे: आम्ही भारतामध्ये जे जे कोणी जात होते त्यांच्यामार्फत भारतामधून देणग्या, प्रायोजकत्व मिळवायचाही प्रयत्न केला.

तुम्हांला कदाचित माहीत असेल, आम्ही यंदा एक आगळीवेगळी गोष्ट करतोय. अधिवेशनात एक शैक्षणिक परिषद करतोय आम्ही! भारतातले शिक्षणक्षेत्रातले दिग्गज, उदा. नामवंत महाविद्यालयांशी संबंधित लोक किंवा विद्यापीठांचे विश्वस्त अथवा डीन आणि अमेरिकन विद्यापीठांतील लोक यांच्या भेटीगाठी घडवून आणणं! भारतातील संबंधित लोकांना अमेरिकन विद्यापीठांच्या सहयोगाने विद्यार्थी देवाणघेवाण उपक्रमाच्या धर्तीवर असा उपक्रम करण्यात रस होता व अमेरिकन विद्यापीठांतूनही या उपक्रमाला हिरवा कंदील दाखवला गेला. मग त्या दिशेने प्रयत्न करून पहिल्यांदाच या अधिवेशनात आम्ही ती कल्पना प्रत्यक्षात आणली आहे.

याआधीच्या अधिवेशनांमध्ये मी शाळा अथवा महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांच्या भेटीगाठी होताना पाहिल्या आहेत. हे त्यापुढचं पाऊल म्हणता येईल.
श्री. सहस्रबुद्धे: हो, शाळेतील, महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांचे अनौपचारिक मेळावे आधी झाले आहेत. शैक्षणिक परिषदेत मात्र भारतीय व अमेरिकन विद्यापीठांतील लोकांच्या भेटीगाठींसाठी स्वतंत्र चर्चामंच असेल. यादरम्यान चर्चासत्रं आयोजली आहेत. सर्वसाधारणपणे अधिवेशनांचा कालावधी शुक्रवार, शनिवार आणि रविवार अर्धा दिवस असा असतो. यंदा मात्र तो मंगळवारपर्यंत वाढवण्यात आला आहे. अर्थात, ही सोय शैक्षणिक परिषदेत सहभागी होणार्‍यांसाठीच आहे. तरुण वर्गासाठी नक्कीच या फायदेशीर गोष्टी आहेत.
बॉस्टन भाग हा शिक्षणासाठी, महाविद्यालयांसाठी प्रसिद्ध आहे. लोक अनेक ठिकाणांहून इथे येतात. एम.आय.टी, हार्वर्ड, बॉस्टन विद्यापीठ अशी भरपूर विद्यापीठं इथं आहेत. हा खूप चांगला परिसर आहे. र्‍होड आयलंडचं ब्राउन विद्यापीठही आहे. या विद्यापीठातील व भारतातील शिक्षणक्षेत्रात रस असलेल्या लोकांना एकत्र आणण्यासाठी ही परिषद होत आहे. यासाठी आर्थिक पाठबळ आम्हांला भारतातून आणि इथून दोन्हीकडून मिळालं.

तुम्ही खजिनदार म्हणून सूत्रं सांभाळत आहात. तुमच्या इतर समित्यांमधल्या सहभागाबद्दल काही सांगा.
श्री. सहस्रबुद्धे: मी पद्धतशीरपणे काम करण्यावर भर देतो. तसंच, आधीही खजिनदार म्हणून काम केल्याचा अनुभव गाठीशी आहेच. तसंच, योजनाबद्ध रीतीने, तपशीलवार, बिनचूक काम करण्याकडे माझा कटाक्ष असतो. माझी पत्नी, मनीषा सहस्रबुद्धे हिची साथ या कामात मला लाभली आहे. आर्थिक व्यवहारांची बाजू सांभाळताना तिची साथ असल्यामुळे हुरूप वाढतो. सध्या या कामांसाठी आम्हांला किमान दोनतीन तास रोज द्यावे लागतात. संध्याकाळी घरी आल्यानंतर हे काम आम्ही करतो. मी वाणिज्य पदवीधर आहे, त्या पार्श्वभूमीचाही या कामांसंदर्भात मला फायदा होतो आहे.

वित्तविभागाची धुरा सांभाळताना निधी उभारणं आणि प्रायोजक शोधणं याव्यतिरिक्त तुम्हांला आणखी काय जबाबदार्‍या आहेत?
श्री. सहस्रबुद्धे: लोकांना उपलब्ध निधीच्या मर्यादेत राहून काम करण्यासाठी मार्गदर्शन करणं हे माझ्यादृष्टीनं महत्त्वाचं आहे. कारण बर्‍याच वेळेला असं होतं की सर्वांना याबद्दल माहिती नसते. उदा. आम्ही मॅसॅच्युसेट्स आणि अधिवेशनाचं केंद्र जिथे आहे त्या र्‍होड आयलंडमध्ये, अशा दोन्ही ठिकाणी मंडळाच्या नावाने विक्रीकरातून सूट मिळवली. इथे विक्रीकर ६.२५% आहे. ही 'विनानफा' पद्धतीची संस्था आहे, तेव्हा पैशांचा विनियोग मंडळासाठी, सदस्यांसाठी व्हायला हवा. अगदी क्षुल्लक रक्कमदेखील महत्त्वाची आहे. विक्रीकरातून सूट मिळवून आम्ही प्रत्येक खर्चामागे सव्वासहा टक्के रक्कम वाचवली. दुसरी महत्त्वाची पद्धत म्हणजे भारतातल्या प्रायोजकांतर्फे मिळालेल्या रकमेचा विनियोग आम्ही भारतातल्याच खर्चांसाठी केला, उदा. कलाकारांची तिकिटं आरक्षित करणं, त्यांचं मानधन. अशा खर्चांमध्ये डॉलर रुपये विनिमयामुळे जो तोटा होऊ शकतो, तो टाळण्यासाठी भारतातले खर्च भारतातूनच करणं आणि अमेरिकेतले अमेरिकेतून असं धोरण ठरवलं आहे. 'थेंबे थेंबे तळे साचे' या न्यायानं अशी बचत करून उपलब्ध निधी नीट वापरला जाण्याला हातभार लागतो. याचसाठी मी सुरुवातीला 'खर्च कसा करावा?' यावर सत्रं घेतली.
दुसरं एक उदाहरण सांगतो. अधिवेशनात आम्ही एक गणपतीचं पोस्टर लावणार आहोत. वेगवेगळ्या समित्यांतल्या लोकांकडून अतिशय चांगल्या कल्पना मिळाल्या. अर्थात प्रत्येक कल्पनेशी निगडित खर्च होताच, तेव्हा मी त्यांना सांगायचो की, ही कल्पना उत्तम आहे. यासाठी प्रायोजक शोधा. म्हणजे ते पैसे उपलब्ध निधीतून वजा होणार नाहीत. प्रायोजक मिळाल्यास 'गणपती अमुक अमुक यांच्यातर्फे प्रायोजित' असं लिहिता येईल. प्रायोजकांची जाहिरात स्मरणिका, अधिवेशनाचं केंद्र इत्यादी ठिकाणी प्रदर्शित करून त्यांना प्रसिद्धी देता येईल. देणगीस्वरुपात कुणी आपली उत्पादनं देऊ केल्यास उदा. नोंदणीच्या बॅगेत दिल्या जाणार्‍या वस्तू, त्याचाही बोजा उपलब्ध निधीवर पडत नाही. निधीउभारणीचं काम संबंधित टीम योग्यरीत्या करतेच आहे, पण हा आणलेला पैसा वाचवायचा कसा, यासंदर्भात मार्गदर्शन मी केलं होतं.

मी असं ऐकलं की तुम्ही संमोहनासंदर्भात काही कार्यक्रम करणार आहात?
श्री. सहस्रबुद्धे: हो, मी १९९५पासून म्हणजे गेली सतरा-अठरा वर्षं भारतातला नोंदणीकृत संमोहनतज्ज्ञ आहे. भारतामध्ये आणि अमेरिकेतही माझे बरेच शिष्य आहेत. या सर्वांना मी विनामूल्य प्रशिक्षण दिलं आहे. अधिवेशनात मी स्वसंमोहन प्रशिक्षणासाठी शिबिर घेणार आहे. त्यात प्राणायाम अंतर्भूत आहे. 'ज्योतीत्राटक' नावाची एक क्रिया आहे, ज्यात आपण नीरांजनातील ज्योतीवर लक्ष केंद्रित करणं आणि ते तेज आपल्या शरीरात येत आहे असं समजून मनातील विचार, वासना दूर सारून मन शुद्ध करणं ह्या गोष्टी आहेत. मी इतरही बर्‍याच गोष्टी संमोहनासंदर्भात शिकलो होतो, त्यातून मी स्वसंमोहन प्रशिक्षणासाठी स्वतःचा असा एक पाठ्यक्रम तयार केला. संमोहनतज्ज्ञ मनोहर नाईक हे माझे गुरू! बारा वर्षं त्यांच्याकडे सराव केल्यानंतर मी त्यांच्याकडून इतरांना प्रशिक्षित करण्यासाठी परवानगी मिळवली व हे प्रशिक्षणवर्ग सुरू केले.
याचा प्रत्यक्ष अनुभव घेणं गरजेचं आहे. इथे झालेल्या प्रशिक्षणाचा अनुभव न्यू इंग्लंड मराठी मंडळाच्या लोकांनी घेतलेला आहे. प्रशिक्षणांतर्गत मी प्रत्येकाला माझ्या आवाजातल्या स्वसंमोहन सूचना असलेली सीडी देतो. त्या ऐकून लोक स्वसंमोहनाची क्रिया करू शकतात. पौगंडावस्थेतली मुलं, महाविद्यालयीन शिक्षण घेणारी मुलं, व्यसनमुक्त होऊ पाहणारे लोक, मन खंबीर करू इच्छिणारे लोक, वेगवेगळ्या प्रकारची भीती नाहीशी करू पाहणार्‍या व्यक्ती यांना स्वसंमोहनाद्वारे मी नक्कीच मदत करू शकतो.
तसंच, या कार्यक्रमासाठी मी इतरांप्रमाणेच नियोजित प्रक्रियेनुसार अर्ज केला होता. मी खजिनदार आहे म्हणून माझा कार्यक्रम स्वीकारला गेला, असं नाही. तर नियोजित निर्णयप्रक्रियेला अनुसरून निवडसमितीला योग्य वाटल्याने माझा कार्यक्रम निवडला गेला, हे मी नमूद करू इच्छितो.

प्रेक्षकांसाठी हा एक न चुकवण्याजोगा कार्यक्रम आहे, असं म्हणता येईल.

श्री. सहस्रबुद्धे: अजून एक उदाहरण मी सांगू इच्छितो. माझ्याकडे काही कर्करोगाचे रुग्ण या प्रशिक्षणासाठी आले होते. त्यांना मानसिकदृष्ट्या बराच धक्का बसला होता आणि शारीरिक वेदना होत्याच. स्वसंमोहन शिकल्यानंतर 'आपल्याला अशी अनुभूती याआधी कधीही आली नव्हती' हे त्यांनी मला आवर्जून सांगितलं. त्यांना त्यातून आनंद मिळाला यातच मला समाधान आहे.
तुम्हीसुद्धा या कार्यक्रमात सहभागी होऊन अनुभव घ्यावा, असं मी सुचवेन. आपल्याकडे संमोहनाबद्दल लोकांच्या मनात बर्‍याचदा भीती असते. बरेच गैरसमजच आहेत. तसं नसतं तर मी लोकांना संमोहित करून बँक वगैरे लुटली असती. पण तुम्ही या प्रक्रियेत कुणाला फसवू शकत नाही. हे शिकताना तुमच्यावर होणार्‍या संस्कारांमुळे तुम्ही चुकीच्या गोष्टी करायचं धाडस नाही करू शकत. स्वसंमोहन तुम्हांला अंतर्बाह्य बदलून टाकू शकतं. एक उदाहरण देतो. माझ्याकडे काही विद्यार्थी होते. त्यांना परीक्षा असली की अंगात ताप असायचा. चालता-फिरता यायचं पण तापही खूप असायचा. दुसर्‍या दिवशी परीक्षा! तेव्हा त्यांनी कुठेतरी 'मला ताप असणारच आहे' हे स्वीकारलेलं होतं. त्याचं आम्ही संमोहनाद्वारे निराकरण केलं.
मी इतर मराठी मंडळांसाठीही त्यांनी जागा उपलब्ध करून दिल्यास विनामूल्य, स्वतःच्या खर्चाने हे कार्यक्रम करायला तयार आहे. मी त्यांना सीडीही देऊ करेन. मला हे शास्त्र जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवण्यात रस आहे.

आता हे अधिवेशनाबद्दल झालं. तुमच्या नेहेमीच्या कार्यक्षेत्र किंवा व्यवसायाबद्दल काही सांगा.
श्री. सहस्रबुद्धे: मी सीनियर प्रॉडक्ट मॅनेजर म्हणून डिजिटल प्रकाशनक्षेत्रात काम करतो. सेन्गेज लर्निंग ही माझी कंपनी! के१२पासून महाविद्यालयांपर्यंतच्या पुस्तकांच्या प्रकाशनाचं काम ही कंपनी करते. थॉम्प्सन पब्लिकेशन म्हणून एक दीडशे वर्षं जुनी कंपनी होती, ती आम्ही विकत घेतली. नॅशनल जिओग्राफिक हेदेखील आमच्या अखत्यारीत येतं. ही अमेरिकेतली दुसर्‍या क्रमांकाची प्रकाशनसंस्था आहे. त्यातला डिजिटल प्रकाशन विभाग मी सांभाळतो. विद्यार्थ्यांना महाविद्यालयीन शिक्षणात लागणारी उत्पादनं, पुस्तकं, इतर साहित्य, त्यासंबंधित चाचण्या, डिजिटल माध्यमासंबंधातील माहिती यांच्याशी निगडित उत्पादनं आम्ही विकसित करतो.

तुमचं बॉस्टनात वास्तव्य कधीपासून आहे?
श्री. सहस्रबुद्धे: आम्ही इथे आलो १९९९साली. त्यानंतर आम्ही साधारण तीन वर्षं भारतात गेलो होतो. ती तीन वर्षं सोडता मी बॉस्टनमधेच राहिलो आहे.
Sanjay_Sahasrabudhe_P3.jpgभारताचा उल्लेख केलात म्हणून मग आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. भारतात कुठे?
श्री. सहस्रबुद्धे मी पार्लेकर. पार्ले टिळक विद्यालयाचा मी विद्यार्थी आणि त्यानंतर पार्ल्यातल्याच डहाणूकर कॉलेजचा. कुटुंबाविषयी सांगायचं झालं तर, मला एक मोठा आणि एक लहान भाऊ आहे. माझे वडील, केशव सहस्रबुद्धे, ते सेंट्रल एक्साइजमध्ये डायरेक्टर होते. त्यांना दोनदा राष्ट्रपती पदक मिळालेलं आहे. सरकारी सेवेतला सर्वोच्च सन्मान!
अरे वा. तुमच्या पार्ल्यातल्या काही आठवणी किंवा तेव्हा तुम्ही कुठल्या कार्यक्रमात भाग घ्यायचात वगैरे सांगू शकाल का?
श्री. सहस्रबुद्धे: मी बॅडमिन्टन चॅम्पियन होतो. बॅडमिन्टन हा माझा आवडता खेळ! कॉलेजातली पाचही वर्षं मी त्यात पहिला होतो.
कॉलेजात असताना बॅडमिन्टनाव्यतिरिक्त इतर काही सांस्कृतिक कार्यक्रमांत सहभागी व्हायचात का?
श्री. सहस्रबुद्धे: नाही, नाही. सांस्कृतिक कार्यक्रमांत नव्हतो घेत भाग. म्हणजे नाटक अथवा गाणं यांत! तसा मी कानसेन आहे. मला कुमार गंधर्व, भीमसेन जोशी आवडतात. लहानपणी कुमार गंधर्वांची गाणी प्रत्यक्ष ऐकलेली आहेत. माझ्या वडिलांना ही आवड होती व ते मला आणि भावाला सोबत नेत असत. आम्ही पुढे बसून ऐकत असू.
आता पार्ल्यात गेल्यानंतर शाळा, कॉलेजच्या मित्रांची भेट होते का?
श्री. सहस्रबुद्धे: हो, अगदी. आमचं फेसबूकवरून सगळं ठरतं. त्यामुळे लगेच गँग जमते आमची तिकडे! काहीजण इथे अमेरिकेत पण आलेत , काहीजण कॅनडाला आहेत, काही भारतात आहेत पण येतो आम्ही एकत्र.

मायबोलीकरांकडून तुमच्या काय अपेक्षा आहेत? त्यांची तुम्हांला कशा प्रकारे मदत होऊ शकेल?
श्री. सहस्रबुद्धे: अजय गल्लेवाले माझे चांगले मित्र! मला मायबोली पूर्वीपासून माहीत आहे. मायबोलीकर वाचकांना मी अधिवेशनाला यायला सुचवेन. ह्याच नाही, तर सगळ्याच अधिवेशनांना जरूर हजेरी लावावी. आपण मराठी माणसं एकमेकांना पाठिंबा द्यायला थोडे कमी पडतो असं दिसतं काहीवेळा. आपण एकमेकांना पाठिंबा देऊन, एकत्र येऊन आनंद निर्माण करू शकतो, हे दाखवून द्यायला अधिवेशन हे एक माध्यम आहे. सगळ्यांनी एकत्र येऊ, गुण्यागोविंदाने राहू, कधी आम्ही तुमचं ऐकू कधी तुम्ही आमचं ऐका.. घर मोठं झाल्यावर मनं कमकुवत होतात असं म्हटलं जातं सहसा. पण या अधिवेशनाच्या निमित्ताने एकत्र येऊन लहान घरात लोक आनंदाने राहू शकतात, हे आपण साध्य करू शकू.
नक्कीच.

श्री. सहस्रबुद्धे:शेवटी पुन्हा एकदा मी माझ्या पत्नीचा आवर्जून उल्लेख करेन. आजवर मला जे थोडंफार यश मिळालं आहे त्यात तिचा सहभाग फार मोलाचा आहे. घर घडवणारी स्त्रीच असू शकते, असं जे वाचलं होतं त्याचा प्रत्यय मला आला आहे. यश मिळवण्यात आणि मिळालेलं यश टिकवून ठेवण्यात घरातल्या स्त्रीचा वाटा मोलाचा असतो.
तुम्ही तुमच्या कार्यबाहुल्यातून वेळ दिलात त्याबद्दल धन्यवाद.

********
शब्दांकन सहाय्यः सशल
भाषांतर आणि शुद्धलेखन सहाय्यः श्रद्धा आणि चिनूक्स

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

धन्यवाद समीर ओळख करून दिल्याबद्दल.
अशा मोठया कार्यक्रमात आर्थिक बाजू कशी सांभाळली जाते आणि अधिवेशनाची आर्थिक व्याप्ती किती असते या बद्दल बहुतेक पहिल्यांदाच लिहलं जातंय. यापुढे होणार्‍या अधिवेशनांना नक्कीच त्याचा उपयोग होईल.

फार महत्वाची माहिती दिल्याबद्दल धन्यवाद.

अमेरिकेत वास्तव्य करणार्‍या माझ्या नातेवाईकांना, जे BMM अधिवेशनात सहभागी होणार आहेत त्यांना या धाग्याची लिंक पाठवणार आहे.

.

अशा मोठया कार्यक्रमात आर्थिक बाजू कशी सांभाळली जाते आणि अधिवेशनाची आर्थिक व्याप्ती किती असते या बद्दल बहुतेक पहिल्यांदाच लिहलं जातंय. यापुढे होणार्‍या अधिवेशनांना नक्कीच त्याचा उपयोग होईल. >> +१