अन्नधान्य स्वस्त आहे

Submitted by अभय आर्वीकर on 27 May, 2013 - 20:03

अन्नधान्य स्वस्त आहे

अन्नदाता या युगाचा जाहला उद्ध्वस्त आहे
(फक्त कारण एवढे की अन्नधान्ये स्वस्त आहे)

मी म्हणालो फक्त इतुके "शब्द माझे शस्त्र आहे"
चक्क माझ्या भोवताली चोख बंदोबस्त आहे

अर्थसंकल्पात होती खायसाठीची व्यवस्था
कागदावर आकडे अन् माल सारा फस्त आहे

कोण गेले, कोण मेले, कोण पुसतो काळजीला
झोपली सद्भावना अन यादवी आश्वस्त आहे

पुस्तकाने कोणत्याही नोंद नाही घेतली की
कष्ट आणिक भाग्य-लक्ष्मी हाच रेशो व्यस्त आहे

कोरडा दुष्काळ तेव्हा पांढरे पक्षी दिसेना
कंच पिकलेल्या सुगीला मात्र त्यांची गस्त आहे

नापिकीच्या पावलाने काळ हा सोकावलेला
या शिवाराचा जणू तो नेमला विश्वस्त आहे

कोरडे जेव्हा भगोणे, पीठ-मिरची सापडेना
मीच माझी भूक तेव्हा, रोज केली ध्वस्त आहे

तो म्हणाला काव्य कसले? 'अभय' गझला फालतू या
(लेखणीच्या पाभरीने जीवजंतू त्रस्त आहे)

                                         - गंगाधर मुटे
---------------------------------------------------

शेर नाही चांगला की, मी नसे कळपात त्यांच्या?
दाद का आलीच नाही, छान! वा... वा!! मस्त आहे!!!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

वा मुटे सर !!

शब्दकळा भन्नाट आवडली
टकाटक भिडणारे टोकदार शब्द !! वीरश्री ने ओतप्रोत भरलेली रचना

काही जागी भाषिक अंगाने बघता व्याकरण खटकले (तुमच्या गावाकडे अशी भाषा वापरत असतील तर मग असेना का हरकत नाही )

शेर न् शेर आवडला
काही शेरावर तर "जान कुर्बान" अगदी !!!!!

आणखी एक खास मुटेशैली ची प्रहारक गझल Happy

<<< व्याकरण खटकले>>>

कोण गेले, कोण मेले, कोण पुसतो काळजीला
मीच माझी भूक तेव्हा, रोज केली ध्वस्त आहे

या दोन ओळींबद्दल म्हणताय की अजून काही व्याकरणाच्या तृटी जाणवतात.

अन्नधान्ये स्वस्त आहे(त)
पांढरे पक्षी दिसेना(त)

अन्नधान्याच्या ओळीत बदल सुचला नाही तुम्ही बघा काही जमतेय का

बाकी असे सुचले
आज दुष्काळात कोणी पांढरा पक्षी दिसेना
कंच पिकल्यावर सुगीला 'फिक्स' त्यांची गस्त आहे

Happy
__________________________________

या शिवाराचा कुणी तो नेमला विश्वस्त आहे<<<< असेही करून पाहिले

__________________________________

तो म्हणाला काव्य कसले? 'अभय' गझला फालतू या<<<<<< Uhoh
आज देव्सर असायला हवे होते (म्हणजे मायबोलीवर..... उगाच गै न ) Lol

आहे(त)
दिसेना(त)

हवा तो आशय जसाच्या तसा व्यक्त करताना जर व्याकरण जर आड येत असेल तर
किंवा
व्याकरण सांभाळताना मुळ आशयालाच व्यक्त करणे अवघड होत असेल तर

अशा प्रसंगी तडजोड कशाशी करायची, आशयाशी की व्याकरणाशी अशी वेळ आली तर मी आशयाशी तडजोड न करता व्याकरणाशी करत असतो.

काव्य म्हणजे व्याकरणाची पुस्तिका नसून अभिव्यक्तीचे माध्यम असते, याकडे जास्त लक्ष देणे गरजेचे असते, असे माझे माझ्यापुरते मत आहे.

तूमच्यापुरते असलेले मत समजले व त्याबद्दल आदर आहे (कारण तुमच्याबद्दलच आहे तो मुळात)
मी आग्रह वगैरे करत नव्हतो फक्त सांगीतले सर ..नमूद केले !

आशय व्यक्त करायला नेमके शब्द हवेत
व्याकरणाची तडजोड् स्वीकारण्यापूर्वी एकदा शब्द बदलता येतो का ते मी पाहत असतो
थोडा उशीर लागतो पण जर शेर पूर्ण व्हावा असे नशीबाने आधीच ठरवले असेल तर अडचण फारशी येत नाही

माझ्या शेरात अनेकदा माझा आशय विषय देखील अजिबातच ठरलेला नसतो ओळी लयीच्या प्रभावामुळे व प्रवाहीपणात तयार होवून बसतात नंतर मी त्यावर जुजबी संस्करणे करून एखादा निश्चित अर्थ गवसत असेल तर शेर झाला आता असे मानून सोडून देतो

व्याकरणाच्या , र्‍हस्वदीर्घाच्या यतिस्थानांच्या ओळीच्या अखंडतेच्या/ प्रवाहीतेच्या..... अश्या प्रकारच्या अनेक तांत्रिक बाबी आशयापुढे दुय्यम महत्त्वाच्या आहेत हे मात्र मलाही बर्‍यापैकी पटेते हे खरे !!!!

Happy

(तुम्ही आजकाल देवपूरकर मोड मधे जाताय असे तुमच्या वरील प्रतिसादातून वाटले ;))

काव्य म्हणजे व्याकरणाची पुस्तिका नसून अभिव्यक्तीचे माध्यम असते, याकडे जास्त लक्ष देणे गरजेचे असते

सहमत.

नापिकीच्या पावलाने काळ हा सोकावलेला
या शिवाराचा जणू तो नेमला विश्वस्त आहे

हा शेर आवडला.

https://www.facebook.com/photo.php?fbid=1509736822632970&set=a.138211950...

Devdatta Sangep साहेब, धन्यवाद!

समीर सावंत साहेब, हा प्रकार चांगला नाही. याला चोरी म्हणतात. ज्याचे काव्य असेल त्याच्या नावाने टाकावे.
शिवाय मूळ काव्याशी छेडछाड करून त्याला विद्रुप करू नये.