एके रात्री चंद्र वेडा...

Submitted by सुप्रिया जाधव. on 24 May, 2013 - 04:03

एके रात्री चंद्र वेडा
माझ्या घरी आला
'रोज असतोच सा-यांचा...
आज फक्त तुझाय !!!' म्हणाला

कित्येक योनींचं अंतर
त्याने क्षणार्धात कापलं
निखळलेल्या ता-याला
कस रे मानलस आपलं ?

त्याच्या-माझ्या विश्वामधल्या
गप्पा-गोष्टी झाल्या
'आतातरी कविता तुझ्या
ऐकव काही' म्हणाला

करुन पाहिली चालढकल
थोडी-बहुत आधी
चंद्रापुढे काजवे सांग
चमकतात का कधी ?

तेव्हापासून रुसलाय वेडा
गेलाय दूरदेशी
एक कवडसा प्रतिभेचा त्याच्या
विसरलाय माझ्यापाशी

एके रात्री चंद्र शहाणा
माझ्या घरी येवून गेला
'रोज असतोच सा-यांचा...
आज फक्त तुझा !!!' नुसतच म्हणून गेला

-सुप्रिया.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

कित्येक योनींचं अंतर... ऐवजी.... कित्येक ’योजनांचं’ अंतर...असं हवंय.
योजन हे वैदिक कालात लांबी मोजण्यासाठी वापरले जाणारे माप मानले जायचे....
एक योजन म्हणजे साधारण आठ मैल
अनेकवचन=योजनं