एका धूर्त आणि दुटप्पी हुकुमशहाचे पुनरागमन!

Submitted by sudhirkale42 on 10 May, 2013 - 01:55

एका धूर्त आणि दुटप्पी हुकुमशहाचे पुनरागमन!
लेखक: सुधीर काळे, जकार्ता (सध्या अमेरिकाभेटीवर)
sbkay@hotmail.com

"मी पाकिस्तानला वाचवायला आलोय्" अशी शेखी मिरवत मुशर्रफसाहेब पाकिस्तानला परत आले. यायच्या आधी स्वत: केलेल्या अनेक गंभीर गुन्ह्यांच्या आरोपांखाली त्यांच्याविरुद्ध सुरू असलेल्या फौजदारी खटल्यांपायी होऊ शकणार्याि स्वत:च्या अटकेविरुद्ध जामीन घ्यायची खबरदारी त्यांनी घेतली होतीच. त्यांच्या 'चमच्यां’नी त्यांना काय सांगितले होते कुणास ठाऊक, पण त्यांचे स्वागत करायला केवळ मूठभर लोकच-'गार्डियन' या ब्रिटिश वृत्तपत्रानुसार फक्त १५०० लोकच-हजर होते. या विरुद्ध २००७ साली बेनझीरबाई परतल्या तेंहां त्यांच्या स्वागताला लाखोंवर लोक हजर होते. इतक्या कमी संख्येने लोक त्यांच्या स्वागताला आले याबाबबत त्यांच्या ’चमच्यां’नी मुशर्रफसाहेबांना सुरक्षेच्या अडचणींची सबब सांगितली असावी. त्यांच्या आगमनापाठोपाठ योजण्यात आलेले त्यांचे कराचीतले भाषणही सुरक्षेच्या कारणासाठीच रद्द करण्यात आले[१] व "आता ते भाषण इस्लामाबाद/रावळपिंडी येथे होईल" असेही जाहीर करण्यात आले.
मुशर्रफना चांगल्यापैकी ओळखणार्या/ तलत मसूद या एका सेवानिवृत्त जनरलने म्हटले आहे कीं " पाकिस्तानला आपल्या आगमनाचे किती महत्व आहे याबद्दलचे मूल्यमापन मुशर्रफ यांनी पार एकतर्फी केले व स्वत:ला अत्याधिक महत्व दिले. त्यांच्या आगमनाने पाकिस्तानी राजकारणाच्या महासागरात "सुनामी"[२] तर सोडाच पण वादळी लाटाही निर्माण झाल्या नाहींत, कांहीं हलके तरंगच जेमतेम उठले असतील. आज त्यांच्याकडे स्वत:चा असा राजकीय मतदारसंघही नाहीं, स्वत:च्या पक्षाची संघटना नाहीं आणि त्यांना मिळणारे समर्थनही अगदी मर्यादितच आहे."
राजा रूमी हे "जिना वैचारिक संस्थे"चे एक संचालक आहेत. ते म्हणतात, "माजी लष्करप्रमुखांना (मुशर्रफना) आपल्या थोरपणाच्या भ्रमाने पछाडलेले आहे. त्यांना जनतेच्या खर्याफखुर्याआ पाठबळाचा आधार नाहीं. कांहीं शहरी मध्यमवर्गीय लोकांना ते आवडतात. त्यांना मुशर्रफ यांची कारकीर्द आर्थिक दृष्ट्या चांगली होती असे वाटते, पण निवडणुकांकडे ऐतिहासिक नजरेतून पाहिल्यास कुठल्याही राजकीय नेत्याला सत्तेवर येण्यासाठी आपला स्वत:चा राजकीय पक्ष लागतो आणि आपल्या पक्षाच्या जाहीरनाम्याभोवती गोवलेला अनुयायांचा पाठिंबाही लागतो. अशा पक्षाची आणि अनुयायांची मुशर्रफ यांच्याकडे वानवाच आहे."
मुशर्रफसाहेबांच्यावर अनेक फौजदारी स्वरूपाच्या गंभीर गुन्ह्यांचे आरोप आहेत. राज्यघटना रद्द करणे, न्यायमूर्तींना अटकेत टाकणे यासारख्या आरोपापासून ते बेनझीर भुत्तो आणि बलोच नेते नवाब अकबर खान बुगटी या दोन नेत्यांच्या वधात त्यांचा सहभाग[३] यासारखे गंभीर आरोप त्यात आहेत. आता तर मृत्युदंडाची शिक्षा असलेल्या राष्ट्रद्रोहाचा आरोप ठेवण्याबाबतही पाकिस्तानी सर्वोच्च न्यायालयात अर्ज देण्यात आलेला आहे. त्याची सुनावणी लवकरच सुरू होईल.
लोकशाही मार्गाने पुन्हा सत्तेवर येण्याची त्यांची (दिवा)स्वप्ने धुळीला मिळालेली आहेत. कारण त्यांनी चार मतदारसंघातून निवडणूक लढविण्यासाठीची नामांकनपत्रें भरली होती पण त्यापैकी तीन मतदारसंघांबद्दलची नामांकनपत्रें त्यांनी राज्यघटना रद्द केल्याच्या आणि न्यायमूर्तींना अटकेत टाकल्याच्या कारणावरून निवडणूक आयोगाच्या स्थानीय पातळीवरच थेट फेटाळली गेली तर ’चित्राल’ या पेशावरजवळील मतदारसंघासाठीचे त्यांचे नामांकनपत्र स्थानीय पातळीवर संमत करण्यात आले होते पण उच्च न्यायालयातील आव्हानानंतर ते फेटाळण्यात आले. अशा तर्हेोने निवडणूक जिंकण्याचे त्यांचे मनोरथ धुळीला मिळाले आहेत.[४]
२९ मार्च रोजी मुशर्रफ कराचीमधील सिंध उच्च न्यायालयात त्यांच्या जामीन अर्जाच्या संदर्भात हजर होते तिथून जामीन मिळवून बाहेर पडताना सुमारे वीस वकीलांचा जमाव त्यांच्या निषेधात "या हुकुमशहाला फाशी द्या!" अशा घोषणा देत उभा होता त्यातल्या एकाने-तजम्मुल लोधी याने-त्यांच्या दिशेने बूट फेकला! सुदैवाने तो त्यांना लागला नाहीं. पण यावरून त्यांच्या ’लोकप्रियते’चा अंदाज येतो.
Shoe aimed at Musharraf outside Sindh High Court-50.png
मुशर्रफना अजूनही स्वत:बद्दलच्या सत्य परिस्थितीची पूर्ण जाणीव झालेली नसावी कारण सिंध उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती न्यायालयात आल्यावर प्रथेप्रमाणे सारे उठले. मुशर्रफही उठले, पण असे उठून उभे रहाणे त्यांना अपमानास्पद वाटले! थोडक्यात काय? "सुंभ जळाला आहे पण पीळ जळालेला दिसत नाहीं"!
निवडून आल्यानंतर नियोजित पाच वर्षें सत्तेवर रहाण्याचा विक्रम जरदारी सरकारने नुकताच पूर्ण केला. पाकिस्तान स्वतंत्र झाल्यापासून गेल्या साठाहून जास्त वर्षात असे कधीच झाले नव्हते कारण कालावधी पूर्ण होण्याच्या आधीच लष्कर सत्ता ताब्यात घेत असे. या वेळी असे झाले नाहीं. ओसामा बिन लादेनला मारताना खास अमेरिकन सैनिकांच्या "Seals" तुकड्यांनी हेलिकॉप्टर्स वापरून पाकिस्तानी हवाई हद्दीचा सहज भंग केला व खोलवर आत घुसून बिन लादेनला त्याच्या घरीच गोळ्या घालून ठार मारले व त्याचे शव घेऊन ते परतही गेले. या मोहिमेबाबत पाकिस्तानी सरकार आणि पाकिस्तानी लष्कर या दोघांना पूर्णपणे अंधारात ठेवण्यात आलेले होते.[५] या मोहिमेच्या यशस्वी अंमळबजावणीनंतर पाकिस्तानी लष्कराचे तर पूर्णपणे वस्त्रहरण झाले. त्यामुळे रागावलेले लष्करी नेतृत्व सत्ता ताब्यात घेईल अशी भीती मुलकी सरकारला होती. पण तसेही झाले नाहीं. याला कारण म्हणजे थेट तख्तापलट करून सत्ताग्रहण करणे हे आता जागतिक तसेच स्थानिक पातळीवर अग्राह्य ठरलेले आहे त्यामुळे (पाकिस्तानी जनतेला लष्करी राजवटीचा आलेला एक प्रकारचा वीट आल्यामुळे) थेट सत्ता घेण्यापेक्षा आपले कांही "पित्ते" निवडणुकीच्या रिंगणात उतरवावेत असे लष्करी नेतृत्वाला वाटू लागले आहे असे दिसते व मुशर्रफ, अमेरिकेचा कडवा विरोधक इम्रान खान, कॅनडास्थित एक मौलवी ताहीर उल काद्री, बदनाम अणूशास्त्रज्ञ डॉ. अब्दुल कादीर खान आणि एक जिहादी कंपू "दफा-ए-पाकिस्तान" यांना लष्कराने प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष पाठिंबा देऊन राजकीय क्षेत्रात उभे केले आहे. उद्देश? पाकिस्तान पीपल्स पार्टी आणि नवाज यांची मुस्लिम लीग या दोन मोठ्या पक्षांचा प्रभाव क्षीण करणे आणि पुढे संसदेत त्यांच्या विरोधात उभे राहून त्यांना धड काम न करू देणे हाच!
एका बाजूला अमेरिकेच्या बाजूने दहशतवादाविरुद्धच्या लढाईत उतरायचे आणि दुसर्यार बाजूला शत्रूच्या सेनानीला सुरक्षित जागी लपू द्यायचे असा दुटप्पी खेळ खेळण्यात मुशर्रफ कसे गुंतले होते हे आता उघड झाले आहे. ओसामा पाकिस्तानात रहायला आला ते मुशर्रफसाहेबांच्या काळातच आणि ओसामाने आपले गढीसारखे घर बांधायला जागा निवडली तीही अबताबादच्या "पाकिस्तानी लष्करी अकादमी"च्या (Pakistan Military Academy) अगदी शेजारी! मुशर्रफ जरी मारे "मला हे माहीतच नव्हते" असे सर्रास सांगत फिरत असले तरी हे सारे त्यांना न सांगता वा त्याची परवानगी न घेता करण्याची हिंमत कुठल्याही लष्करी अधिकार्या कडे नव्हती. त्यांनीच ही जागा सुचविलीसुद्धा असेल, पण एरवीसुद्धा त्यांच्या होकाराशिवाय ओसामा तिथे PMA च्या इतक्या जवळ आपली गढी बांधून राहूच शकला नसता! म्हणूनच आज अमेरिकेने मुशरफ यांचा पाठिंबा काढून घेतला आहे व मुशर्रफ यांच्यावर पाकिस्तान सरकारने अनेक गंभीर खटले ठोकलेले असतानाही अमेरिकेने त्यांच्या बाजूने एक शब्दही काढलेला नाहीं हे लक्षणीय आहे. एके काळी तालीबान सरकारला मान्यता देणारे पाकिस्तान हीकुलते एक राष्ट्र उरले होते. पण तालीबानलाही मुशर्रफ यांनी दगा दिल्यामुळे आता याच तालीबानच्या तेहरीक-ए-तालीबान-पाकिस्तान (TTP) या पाकिस्तानी शाखेने मुशर्रफला जिवे मारणाचा विडा उचलला आहे! थोडक्यात आज मुशर्रफना ना अमेरिकेचा पाठिंबा आहे ना तालीबानचा. एका बाजूला अमेरिकेचे भूतपूर्व राष्ट्राध्यक्ष (धाकल्या) बुशसाहेबांनी आपल्या आठवणीवजा पुस्तकात तक्रारीच्या स्वरूपात लिहिले आहे, "मुशर्रफ यांनी दिलेली आश्वासने ते पुरी करू शकले नाहींत वा त्यांना ती पुरी करायची नव्हती". खरे तर मुशर्रफ हे अमेरिकेच्या बाजूने उभे राहिल्यामुळे त्यांची प्रतिमा सुधारलेली होती व त्यांना legitimate dictator किंवा enlightened moderate Muslim leader अशा संज्ञा मिळाल्या होत्या. पण आता अमेरिकेच्या इस्लामाबाद येथील दूतावासाने स्पष्ट केले कीं "मुशर्रफ यांच्या स्वदेशी परत येण्याबाबत अथवा त्यांच्यावरील खटल्यांबाबत अमेरिका कुठलीच भूमिका घेऊ इच्छित नाहीं. हा प्रश्न आपल्या राज्यघटनेनुसार आणि कायद्यानुसार पाकिस्तानी सरकारला सोडवायचा आहे. अमेरिका आपला संपूर्ण पाठिंबा लोकशाही राज्यव्यवस्थेला देत असून कुठल्याही एका पक्षाला किंवा उमेदवाराला तिचा पाठिंबा नाहीं."
या उलट TTP त्यांना "जहन्नुम"ला धाडायला सज्ज झालेली आहे व त्यासाठी त्यांनी आत्मघाती बॉम्बहला करणारी पथके व दुर्बिण लावून नेम धरता येणार्याT खास रायफली वापरून नेम धरून गोळ्या घालण्यात तरबेज असलेल्या नेमबाजांची पथके आणि हाणामारीच्या द्वंद्वयुद्ध करण्यात पटाईत असलेली पथके तयार ठेवली आहेत असे जाहीर केले आहे. यामुळे मुशर्रफना वाचविण्यासाठीही सध्याचे तात्पुरते सरकार सज्ज झालेले आहे.
मुशर्रफ परतले होते ते नक्कीच निवडणूक लढविण्याच्या इराद्याने! पण केवळ आम जनतेच्या पाठिंब्यावर विसंबून न रहाता त्यांनी अनेक क्लृप्त्याही लढविल्या होत्या. त्यांनी सिंध प्रांतात प्राबल्य असलेल्या मुत्ताहिदा कौमी चळवळ (MQM) या दुसर्या क्रमांकाच्या पक्षाशी करार केला होता. त्यानुसार तो पक्ष मुशर्रफ यांच्याविरुद्ध आपला उमेदवार उभा करणार नाहीं अशी तरतूद होती व मुशर्रफ यांची "NA-250-क्लिफ्टन डिफेन्स" या मतदारसंघातून विजयी होण्याची शक्यता वाढली होती. याबद्दलच्या वाटाघाटीत MQM चे प्रमुख नेते अल्ताफ हुसेन आणि सिंध प्रांताचे राज्यपाल इश्रातुल एबाद यांनी खूप प्रयत्न केले होते.
लष्कर निवडणुकात कोणत्याप्रकारे ढवळाढवळ करेल याबाबत सर्वत्रच शंका होती. पण मुशर्रफ यांच्या पुनरागमनाबद्दलच्या प्रतिक्रियांत लष्कराकडून सत्ता हस्तगत केली जाण्याच्या भीतीपेक्षा मुशर्रफ यांच्याबद्दल संताप आणि कुचेष्टाच जास्त होती व हे ट्विटरवरील त्यांच्याविरुद्धच्या कुचेष्टेवजा टिप्पणीत उघड झाले. त्यात १८ एप्रिल रोजी इस्लामाबाद उच्च न्यायालयातून मुशर्रफ यांनी घाबरून अक्षरश: पळ काढल्याच्या त्यांच्या शौर्याला उद्देशून अनेक ट्वीट्स देण्यात आल्या त्यातल्या कांही टोमणेवजा ट्वीट्स नमुन्यादाखल खाली दिल्या आहेत:
• देखो, देखो कौन भागा? कमांडो भागा, कमांडो भागा[६]
• मुशर्रफ यांची व्यायाम करतानाची छायाचित्रे कौतुकाने प्रसिद्ध झालेली होती त्यांना उद्देशून ही ट्वीट: All that exercise paid off. Musharraf ran out of the courtroom as fast as Usain Bolt[७]." व्यायम करतानाचा मुशर्रफ यांचा फोटो पहा खालील दुव्यावर!
https://twitter.com/P_Musharraf/status/317148634300952576/photo/1
• Pakistan have never done well chasing.
• Has anyone checked if Musharraf is at Mocca?
• House Arrest? His farmhouse is the size of a whole province. Esa house arrest hum sab ko milay.....
• Not very long ago General Mush was telling us he never lead from behind. Now we know, he escapes from 'behind'!
• Real commandos don't run[६].
• Didn't they teach evasion tactics at SSG school?
• Parvaaz Musharraf.
• To give Pervez Musharraf some credit, at least he had an exit strategy this time around. Unlike Kargil."
• Speaking of awkward moments, those who 'Liked' Musharraf's fan page on facebook in bulk. Marwa dya na!
• Awkward moment for all present and former members of PML-Q (२००८ सालच्या निवडणुकीतील मुशर्रफ यांचा पक्ष)
• Musharraf has clearly taken the running for president, the wrong way.
• And so Mushi took the slogan "Go Musharraf Go" too literally, albeit very late
इस्लामाबाद उच्च न्यायालयातून (Islamabad High Court-IHC) मुशर्रफ यांना पळून जाऊ दिल्याबद्दल त्यान्यायालयाचे न्यायमूर्ती जस्टिस शौकत अजीज सिद्दीकी यांनी त्या भागचे इन्स्पेक्टर जनरल बानी अमीन यांना जबाबदार धरले व त्यांना २४ तासात अटक करण्याचा हुकूम दिला. त्या निर्णयाला अमीन यांनी आव्हान दिलेले असून त्याची सुनावणी सध्या सुरू आहे. पण दुसर्या च दिवशी पोलिसांनी त्यांना रीतसर अटक केली व न्यायालयासमोर हजर केले. त्यावेळी त्यांच्या सुरक्षिततेला असलेला धोका पाहून न्यायाधीशांनी त्यांच्या फार्महाऊसचेच छोट्या कारागृहात रूपांतर केल्याचे जाहीर केले व तिथेच त्यांना घरकैदेत ठेवण्याची आज्ञा दिली.
'Brave' Musharraf runs to his villa when he realises his arrest is imminent 50B.png
त्यांना तिथे फोनची सुविधा देण्यात आलेली नसून त्यांना कुणालाही भेटायची परवानगीही नाहीं. पण ज्या कठोरपणे मुशर्रफनी नवाज शरीफना तुरुंगात डांबले होते अथवा झिया उल हक यांनी (थोरल्या) भुत्तोंना ज्या अपमानास्पदपणे वागविले तो कठोरपणा अद्याप तरी मुशर्रफ यांच्या वाट्याला आलेला नाहीं. भविष्यकाळात त्यांना कशी वागणूक दिली जाईल हे आज कुणीच सांगू शकत नाहीं! निवडून कोण येतो याच्यावरही ते कांहीं अंशी अवलंबून आहे असे मला वाटते.
एक सेनानी म्हणून मुशर्रफ यांची प्रतिमा आज कशी आहे? नक्कीच चांगली नाहीं. कारण त्यांच्याशी जवळीक असणारे, त्यांच्या दूरच्या नात्यातले व कारगिल मोहिमेच्यावेळी "ISI" मध्ये उच्चपदावर असलेले सेवानिवृत्त सेनानी ले.ज. शाहिद अजीज यांनी त्यांच्या कारगिलच्या दुस्साहसामधील मुशर्रफ यांच्या घोडचुकांबद्दलची माहिती नुकतीच एका पुस्तकाद्वारे जगापुढे मांडून त्यांची पार लाज काढली व त्यांच्या लज्जेची लक्तरे सार्याु जगाला दाखविली. त्यात हे दुस्साहस कुणाही ज्येष्ठ सेनानींना विश्वासात न घेता मुशर्रफ यांच्याकडून केवळ चार ’पित्त्यां’च्या जोखमीवर कसे आखले गेले होते, त्यात भारत जिद्दीने हे आक्रमण परतवेल हा मुद्दाच कसा लक्षात घेतला गेला नव्हता, त्या हल्ल्यात कशी Exit strategy नव्हती, पाकिस्तानी सैनिकांना कसे वार्यादवर सोडण्यात आले व त्यामुळे ते कसे हाल-हाल होऊन मृत्युमुखी पडले याची हकीकत त्यांनी प्रसिद्ध केली. त्यामुळे एक युद्धकुशल सेनानी म्हणूनही मुशर्रफ यांची प्रतिमा पार रसातळाला गेली!
एक राजकीय नेता म्हणून मुशर्रफ यांचे भवितव्य त्यांना लष्कराचा किती पाठिंबा मिळेल याच्यावरच अवलंबून आहे. मुलकी सरकारने त्यांच्याविरुद्ध खटले चालवून जर त्यांना शिक्षा ठोठावली तर ते लष्कराच्या राजकीय शक्तीमध्ये किती र्हा स झालेला आहे याचे निदर्शक ठरेल. पाकिस्तानी लष्कराची सत्तेची भूक अजूनही मंदावलेली नाहीं. गेल्या पाच वर्षांत लष्कराने मुलकी सरकाराकडून सत्ता बळकावण्याचे अनेक अयशस्वी प्रयत्न केले. त्याचे उत्कृष्ठ उदाहरण म्हणजे "मेमोगेट" म्हणून प्रसिद्ध असलेले कुलंगडे[८]! त्यात अमेरिकेचे तत्कालीन राजदूत हुसेन हक्कानींवर लष्कराने सत्ता बळकावू नये म्हणून दबाव आणण्यासाठी अमेरिकन सरकारला एक मेमो लिहिल्याचा आरोप करण्यात आला. त्यात गुंतलेले मन्सूर अजीज हे न्यायालयासमोर आलेच नाहींत व चौकशी यथातथाच झाली. तरी लोकशाही वाचविण्यासाठी हक्कानींनी आपला राजीनामा दिला. ओसामाच्या वधासाठी पाकिस्तानी लष्कराला व सरकारला न सांगता केलेल्या अचानक आणि यशस्वी हल्ल्यामुळे (आणि ओसमाला लपवून ठेवण्यात लष्कराचा हात असल्याच्या आरोपांमुळे) पाकिस्तानी लष्कराचे मनोधैर्य इतके खचले होते कीं स्वत: जरदारींबद्दल व त्यांच्या पक्षाबाबत खोलवर रुतलेली घृणा असूनही लष्कराला सत्ता काबीज करण्याची हिंमत उरली नव्हती.
लष्कराची स्थिती अशी अतीशय नाजूक असताना मुशर्रफ यांचे आगमन त्यांना आणखीच अडचणीचे ठरणार असे दिसते कारण पाकिस्तानी लष्कर आज त्यांना सक्रीय मदत करण्याच्या स्थितीतच दिसत नाहीं!
==============================
टिपा:
[१] पाकिस्तानमध्ये (हल्ली आपल्याकडेही ) कुठल्याही घटनेचे स्पष्टीकरण देताना सुरक्षेसंबंधींच्या अडचणींची सबब देण्यात येते.
[२] इम्रान खान यांनी आपल्या प्रचंड संख्यच्या सभांना "सुनामी" म्हणायला सुरुवात केली. त्यांना पाकिस्तानी जनतेला खात्रीने सांगायचे होते कीं त्यांच्या पक्षाच्या या सुनामी लाटांत आजची विफल, परिणामशून्य व भ्रष्ट सरकारे नक्कीच वाहून जातील.
[३]आता तर बेनझीर यांचे सुपुत्र (व कदाचित् भावी पंतप्रधान) बिलावल भुत्तो जरदारी यांनीही मुशर्रफ यांच्यावर आपल्या आईच्या खुनाचा आरोप केलेला आहे.
(http://www.aljazeera.com/news/asia/2013/03/20133298916575269.html)
[४] निरोगी लोकशाही केवळ प्रौढ मताधिकारावर Adult franchise आधारित असायला हवी. मुशर्रफ यांच्यावरील आरोप नक्कीच गंभीर असल्याने त्यांच्या बाबतीत हा निर्णय कदाचित् योग्य असेलही पण या वेळी अनेक उमेदवारांचे अर्ज अगदी क्षुद्र कारणांवरून नामंजूर करण्यात आलेले आहेत व त्यावरून ही निवडणूक जास्त करून election राहिली नसून selection झाली आहे असे वाटते.
[५] पाकिस्तानी सरकारला किंवा पाकिस्तानी लष्कराला याबाबत पूर्वकल्पना दिल्यास ही मोहीम गुप्त रहाणार नाहीं व बिन लादेनला पूर्वसूचना मिळून तो हाती लागणार नाही याची खात्री असल्यानेच त्यांना अंधारात ठेवण्यात आले होते.
[६] मुशर्रफ यांना "कमांडो" या टोपणनावाने संबोधले जाते.
[७] उसेन बोल्ट हा जमेकाचा १०० आणि २०० मीटर शर्यतीत सुवर्णपद विजेता व नवे विश्वविक्रम प्रस्थापित करणारा धावपटू आहे.
[८] या भानगडीत अमेरिकेतील पाकिस्तानी वकील हुसेन हक्कानी यांच्यावर अमेरिकेकडून पाकिस्तानी लष्करावर सत्ता बळकावण्याच्या प्रयत्नांना अडविण्यासाठी मदत मागविल्याचा आरोप केला गेला. हक्कानींची एक राजदूत म्हणून अमेरिकन सरकार-दरबारी खूप ये-जा असूनही एका पाकिस्तानी वंशाच्या दांपत्त्याच्या पोटी अमेरिकेत जन्मलेल्या म्हणजेच "जन्माने अमेरिकन" असणार्यार एका व्यावसायिकाची मदत का घेतली असावी हा एक अनुत्तरित प्रश्नच आहे. ती व्यक्तीही अशी निवडली की ती एक इन्व्हेस्टमेंट बॅन्करच नव्हे तर CNN, Fox News, ABC, NBC अशा दूरचित्रवाणीकेंद्रांवर सातत्याने वावरणारी, PBS Newshour आणि ABC News Nightline सारख्या कार्यक्रमात भाग घेणारी तसेच Financial Times, New York Times, LA Times, Washington Post, International Herald Tribune Newsweek, USA Today Times of India यासारख्या वजनदार वृत्तपत्रांच्या संपादकीय पृष्ठांवर लिखाण करणारी व्यक्ती होती. हुसेन हक्कानींच्यावर आरोप ठेवला गेला कीं त्यांनी पाकिस्तानी लष्कराला सत्ता घेण्यापासून रोखण्यासाठी आणि मुलकी सरकारची पाकिस्तानी लष्करावरील पकड दृढ करण्यासाठी ओबामा सरकारकडे मदत मागण्यासाठी एक "मेमो" लिहिला व तो सर्व सेनाप्रमुखांचे अध्यक्षपदी असलेल्या (Chairman of the Joint Chiefs of Staff) अॅ्डमिरल माईक मुलन यांच्याकडे सुपूर्त करण्यासाठी मन्सूर इजाज यांच्याकडे सोपविला! आता अमेरिकन नागरिक असलेल्या मन्सूर इजाज यांची निष्ठा पाकिस्तानी लष्करावर होती कीं लोकशाही मार्गाने सत्तेवर आलेल्या सरकारवर होती कीं स्वत:च्या फायद्यावर होती ते देवच जाणे. पण या अॅकडमिरल मुलन यांना लिहिलेल्या गोपनीय "मेमो"मधला संपूर्ण वृत्तांत Foreign Policy या नियतकालिकाच्या संस्थळावर (website) १७ नोव्हेंबर २०११ रोजी प्रसिद्ध झाला. ही घटनाच मग "मेमोगेट" म्हणून (कु)प्रसिद्ध झाली. ही सारी कहाणी अतर्क्यच (आणि म्हणूनच बहुदा खोटी) असावी. त्यात हुसेन हक्कानी या राजदूताचा नाहक बळी पडला असेच मला वाटते!

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

माझ्या या लेखाच्या 'सकाळ'वरील एका वाचकाने छान प्रतिसाद दिला आहे. ते म्हणतात, "'नवाज शरीफ यांनी कारगिलच्या ह्या "खलनायका"चा सद्दाम हुसेन, गडाफी यांच्याप्रमाणे ताबडतोब 'निकाल' लावावा म्हणजे बरे!!"
मलाही हे पटते! चट चौकशी, पट 'निकाल' असेच करायला हवे!!

प्रतिसाद देणार्‍या सर्व वाचकांचे मनःपूर्वक आभार!
हल्ली मायबोलीवर लेख चढविणे फारच गुंतागुंतीचे झाले आहे. इतर संस्थळावर त्यामानाने सोपे आहे. मी 'मायबोली'चा सभासद झालो तेंव्हां ते इतके गुंतागुंतीचे नव्हते पण नंतर ते गुंतागुंतीचे झालेले आहे व त्यामुळे माझ्यासारख्या सामान्य माणसाला 'भ्या'च वाटतं!
असो. बाकीच्यांना हा त्रास नसावा असे दिसते. मग म्या पामराचे म्हणणे कोण ऐकून घेणार? पण इतकेच सांगतो कीं आधीची पद्धत जास्त सुटसुटीत व म्हणूनच जास्त user-friendly होती!

सुधिर काळेसाहेब
तुमचे लेख नेहमीच अभ्यासपूर्ण असतात. तेथील पत्रकारांच्या लिखाणावरून काढलेल्या तुमच्या निष्कर्षांशी एरवी मी सहमत नसतो.
पण या लेखातील बर्‍याच भागाशी सहमत.
सरतेशेवटी आय एस आय आणि लष्कर हेच पाक मधे काय होणार ते ठरवतात. बाकी तेथील लोकशाहीचा दिखावा आपल्यासाठी शून्य किमतीचा असे मला वाटते. आता आलेल्या नवाज शरिफांनाही लष्कर देईल तितकीच किंम्मत! त्यांची स्वताची ध्येय धोरणे कितीही चाम्गली वाटली तरी त्यात कांही अर्थ नाही.

मी-भास्करसाहेब, मी अनुवाद केलेल्या लेखांतील मते त्या मूळ लेखकाचीच असतात पण ती मला बरीचशी पटली तरच मी त्यांचा अनुवाद करून प्रसिद्धीला देतो. बर्‍याचदा या लेखांत भारताच्या हिताच्या गोष्टी असतात. उदा. कारगिलचे दुस्साहस हा ई-सकाळवरचा लेख! (http://online2.esakal.com/NewsDetails.aspx?NewsId=5006231042185477204&Se...)
समस्या ही आहे कीं पाकिस्तानी जनता आपल्या नेत्यांच्या समर्थनार्थ कधीच निदर्शने करीत नाहीं. त्यामुळे लष्कर जे मनात येईल ते करते. तसेच जरदारींच्या काळात मी पाकिस्तानी वृत्तपत्रात सतत वाचले आहे कीं प्रत्येक कॅबिनेट स्तरावरील बैठकीत ज. कियानींना निमंत्रण असायचे व ते या बैठकांत सहभागी व्हायचे. यामुळे लष्करी अधिकार्‍यांनाही एक तर्‍हेचा माज येतो. त्यात अमेरिकेचे राजदूत किंवा सरकारी भेटीवर आलेले ज्येष्ठ नेतेही पाकिस्तानी जनरल्सची न चुकता भेट घेतात. त्यामुळेही जनरल्सना माज चढतो.
आपल्याकडे लष्करप्रमुखाला कॅबिनेट स्तरावरील बैठकीसाठी कुठे बोलावणे असते? गरज असेल तेंव्हां त्याच्याशी सल्लामसलत जरूर केली जाते पण शेवटी सरकारचा निर्णय त्याला कळविला जातो व त्यानुसार कारवाई करण्यास सांगितले जाते. इतर लोकशाही राष्ट्रांतही असेच असते.
पाकिस्तानमध्ये आता शरीफ बदल घडवून आणतील काय हे पहाणे मनोरंजक ठरेल. निवडणुकांच्या आधीच्या प्रचारसभांमधील भाषणात ते लष्कराला आपल्या सरकारमधील एक विभाग (department) म्हणून वागवतील अशी विधाने केली होती ती ते कितपत पाळू शकतात ते आता पहायचे!

@sudhirkale42 | 16 May, 2013 - 19:57नवीन
निवडणुकांच्या आधीच्या प्रचारसभांमधील भाषणात ते (शरीफ) लष्कराला आपल्या सरकारमधील एक विभाग (department) म्हणून वागवतील अशी विधाने केली होती ती ते कितपत पाळू शकतात ते आता पहायचे!
>>
लष्कर त्यांना वरचढ होऊ देईल अशी मुळीच शक्यता नाही. पाकी जनतेलाही त्याची सवय आहे. तीहि एका मर्यादेबाहेर जाऊ शकत नाही असा आजवरचा इतिहास आहे. अमेरिकाही लष्कराला दुखवू शकणार नाही कारण अण्वस्त्रे सरते शेवटी लष्कराच्याच ताब्यात असणार आहेत. त्यावर अमेरिकेचा ताबा आला तरच कांही बदल अपेक्षित आहेत. पण तसा ताबा अमेरिकेला बळ वापरल्याशिवाय मिळणे निव्वळ अशक्य!

'मी-भास्कर'-जी, तुम्ही म्हणत आहात त्यात बरेचसे तथ्य आहे, पण नवाज शरीफ त्यातल्या त्यात लष्करावर अंमल गाजवायला समर्थ आहेत असे वाटते. त्यांनी त्यांच्या आधीच्या कारकीर्दीत सफाईने ले. ज. हमीद गुल यांना 'गुल' केले होते व १९९९ साली मुशर्रफनाही. फक्त त्यांनी इतर दोन-एकशे इतर उतारू असलेल्या पाकिस्तान इंटरनॅशनलच्या मुशर्रफच्या विमानाला उतरायला बंदी कुणाच्या सल्ल्यावरून केली कुणास ठाऊक, पण त्यामुळे त्यांच्याबाबत कुणालाच सहानुभूती उरली नाहीं. त्यांनी असे केले नसते तर मुशर्रफना त्यांना पदच्युत करायला सबबच मिळाली नसती!
मला या घडीला तरी असे वाटते-कदाचित् wishful thinking म्हणा-कीं नवाज शरीफ लष्कराचे महत्व कमी करून त्याच्यावर अंमल गाजवतील व पाकिस्तानच्या लोकशाहीच्या इतिहासात एक नवे पान लिहितील. बघू लवकरच भविष्याच्या पोटात काय आहे ते!

काळेसाहेब,

मुद्देसूद विश्लेषण आहे. लेख आवडला. आपण म्हणता तसा थेट कारवाई करून सत्ता ग्रहण करण्याचा पाकी लष्कराला वीट आला आहे हे खरं वाटतं. त्यामुळे राजकीय मार्गाने लष्कर वर्चस्व राखू पाहील हेही संभवनीय आहे.

पाकी लष्कराची अशी स्थिती का झाली असावी याचा मी थोडाफार अंदाज लावू इच्छितो. पाकिस्तानचा उगम अत्यंत अनैसर्गिक आहे. १९४७ साली पाकिस्तानात राहणार्‍या जनतेचा (जी बहुसंख्य मुस्लिम होती) पाकिस्तानच्या निर्मितीत अजिबात सहभाग नव्हता. त्यांना कोणीही विचारलं नव्हतं की तुम्हाला पाकिस्तान हवा का म्हणून. त्यांच्यावर पाकिस्तान लादला गेलेला आहे.

नेमक्या या ओझ्यामुळे तिथे लष्करी राजवट अत्यावश्यक आहे. कारण की जर तिथे लोकशाही नांदली, तर तिथले लोक भारत आणि पाकमध्ये फरक तो काय असा प्रश्न विचारू लागतील. यातून पाकिस्तानचे वेगळे अस्तित्व संपुष्टात यायची प्रक्रिया वेग घेईल. या प्रक्रियेत खोडा घालणे केवळ पाकी लष्करालाच शक्य आहे.

आजच्या घडीला लष्कर थेट हस्तक्षेप करू शकत नाहीये. म्हणूनच मुशर्रफ राजकीय प्रवेश करू इच्छितात अशी शंका येते. आपलं मत ऐकायला आवडेल.

आ.न.,
-गा.पै.

गामासाहेब, धन्यवाद.
माझ्या मते गेल्या दोन वर्षात पाकिस्तानी लष्कराचे संपूर्ण वस्त्रहरण करण्यात आले. मेहरान नाविक तळ, लष्कराच्या अनेक ठाण्यांवर अतिरेकी हल्ले आणि या सर्वांवर कळस झाला तो त्यांच्या देशाचा हद्दीत घुसून त्यांच्या लष्करी अकादमीच्या शेजारी रहात असलेल्या बिन लादेनची केली गेलेली हत्या. त्याचा एकंदरीत लष्कराच्या मनोबलावर प्रतिकूल परिणाम झाला असावा असे वाटते.
"त्यांच्यावर पाकिस्तान लादला गेलेला आहे." असे आपण जे म्हणालात तसे माझ्या वाचनातही आलेले नाहीं किंवा माझ्या जकार्तातील ओळखीच्या पाकिस्तानी लोकांच्या संभाषणातही आलेले नाहीं. पण एकंदरीत सामान्य पाकिस्तानी लोकांना भारतीय जनतेशी बोलायला खूप आवडते असा माझा अनुभव आहे.

काळेसाहेब,

लादला हा शब्द कदाचित अचूक नसेल. पण तिथल्या लोकांना निश्चितच विचारलं नव्हतं की तुम्हाला पाक हवा आहे का म्हणून. फारतर आपण म्हणू की तिथल्या मुस्लिमांचा स्वतंत्र पाकला थेट आक्षेप नव्हता.

मात्र तरीही पाकिस्तान म्हणजे काय आणि त्याचा कारभार कसा चालवला जाणार आहे याविषयी सर्वसामान्य पाकी नागरिकास काहीच कल्पना नव्हती. अगदी राज्यकर्तेही अंधारातच होते. इस्लामी राज्य (islamic state) घोषित करणे सोपे आहे. परंतु इस्लामी राज्यनीती (islamic polity) कशाशी खातात ते कुणालाही ठाऊक नाही.

अशा परिस्थितीत जिनांनी पाकिस्तानात पूजास्वातंत्र्य असेल असं ११ ऑगस्ट १९४७ च्या भाषणात जाहीर केलं. विकिवरील एक उतारा बघा :

You are free; you are free to go to your temples, you are free to go to your mosques or to any other place or worship in this state of Pakistan. You may belong to any religion or caste or creed that has nothing to do with the business of the state.

जिनांच्या वरील भाषणामागील भाव खरा धरला तर वेगळा पाकिस्तान काढायची काय गरज होती? हा विचार अर्थात पाकी नागरिकांनी करायचा आहे.

आ.न.,
-गा.पै.

गामासाहेब,
जीनांचे 'ते' भाषण one off होते. एरवी त्यांनी मुस्लिम धर्माचाच पाठपुरावा केला होता. अलीकडे याकूब खान बंगाश यांनी कराचीहून प्रकाशित होणार्‍य ट्रिब्यून मध्ये एक लेख लिहिला होता. त्यात त्यांनी या भाषणाचा उल्लेख खूप ठासून केला होता. हवा असल्यास मला ई-मेल करा (kbkale@yahoo.com). मी जकार्ताला परत पोचलो कीं तो तुम्हाला पाठवेन.

काळेसाहेब,

>> जीनांचे 'ते' भाषण one off होते. एरवी त्यांनी मुस्लिम धर्माचाच पाठपुरावा केला होता.

अगदी मलाही हेच म्हणायचं आहे. एरव्ही इस्लामी राजवट म्हणजे भूतलावरील स्वर्ग मानणारे राज्यकर्ते प्रत्यक्ष राज्य चालवायची वेळ आली की बावचळून जातात. इस्लामचा हेतू राज्य चालवणे हा कधीच नव्हता. ज्याला आपण इंग्रजीत diplomacy वा statecraft म्हणतो यांच्यासंबंधी संहिता इस्लाममध्ये मिळत नाही.

साहजिकच islamic state घोषित करणे सोपे आहे, पण islamic polity राबवणे हा एक निरर्थक खटाटोप होऊन बसतो. म्हणून जिनाने वरपांगी पाकिस्तानला सेक्युलर म्हंटलं.

आ.न.,
-गा.पै.

व्वा! काळेसाहेब, भास्कर, गामा, लेखाबरोबरच नन्तरच्या चर्चेतूनही नवनविन मुद्दे/कल्पना/गृहितके/दृष्टीकोन कळताहेत Happy धन्यवाद.

@गामा_पैलवान
जिनांच्या वरील भाषणामागील भाव खरा धरला तर वेगळा पाकिस्तान काढायची काय गरज होती? हा विचार अर्थात पाकी नागरिकांनी करायचा आहे. <<
सहमत.
सध्यातरी पाकी नागरिक तसे करण्यास समर्थ आहेत असे वाटत नाही कारण त्या देशाची निर्मितीच धर्मवेडेपण इतक्या संकुचित मुद्द्यावर झाली आहे.