'बी.एम.एम. सारेगम २०१३' ही भव्य संगीतस्पर्धा आता अंतिम टप्प्यात !!!

Submitted by अजय on 29 April, 2013 - 14:02

bmmsrgm_boston_2013.jpg
'बी.एम.एम. सारेगम २०१३' ही भव्य संगीतस्पर्धा आता अंतिम टप्प्यात पोचली आहे. या स्पर्धेची उपांत्य फेरी नुकतीच बॉस्टन इथं पार पडली आणि अंतिम फेरीतल्या सहा स्पर्धकांच्या नावांची यावेळी घोषणा करण्यात आली. प्रतिभा दामले (रिचमंड), समिधा जोगळेकर (टोरांटो), रवी दातार (टोरांटो), प्रसन्न गणपुले (सिअ‍ॅटल), श्रेयस बेडेकर (ह्यूस्टन), आणि अक्षय अणावकर (न्यूजर्सी) या गायक-गायिकांनी स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. उपस्थित प्रेक्षकांनी एस.एम.एस. द्वारा दिलेल्या मतांवर अक्षय अणावकर यांना 'ऑडियन्स चॉइस अ‍ॅवॉर्ड' देण्यात आले.

अमेरिका आणि कॅनडातून ३९ स्पर्धक उपांत्यफेरीसाठी बॉस्टनला एकत्र आले होते. एकूण १३ ठिकाणी स्पर्धेची प्राथमिक फेरी झाली होती. संगीतक्षेत्रातले तज्ज्ञ मोहन भिडे, मोहिनी जोशी, आणि रामचंद्र जोशी हे उपांत्यफेरीचे परीक्षक होते. अत्यंत चुरशीच्या झालेल्या उपांत्यफेरीचे दोन टप्पे होते. पहिल्या टप्प्यातून १५ स्पर्धकांनी दुसर्‍या टप्प्यात प्रवेश केल्यावर, परीक्षकांच्या पसंतीचे गाणे सादर केले. या दोन्ही टप्प्यांतल्या कामगिरीच्या जोरावर अंतिम फेरीसाठीचे स्पर्धक निवडण्यात आले. किराणा घराण्याचे विख्यात गायक कैवल्यकुमार गुरव यावेळी उपस्थित होते आणि त्यांनी 'भारतातील कोणत्याही मोठ्या संगीतस्पर्धेत गाण्याइतकी या सर्वच स्पर्धकांची तयारी आहे,' या शब्दात बी.एम.एम. सारेगम २०१३ च्या उपांत्य फेरीतल्या सर्व गायक-गायिकांचे कौतुक केले.

आता ५-७ जुलै २०१३ दरम्यान होणार्‍या १६ व्या बी.एम.एम. अधिवेशनात या स्पर्धेच्या अंतिम फेरीचा सोहळा रंगणार आहे. प्रसिध्द संगीतसंयोजक कमलेश भडकमकर यांचा वाद्यवृंद अंतिम फेरीतल्या गायकांना स्वरसाथ करेल, प्रशांत दामले आणि प्रिया बापट या सोहळ्याचे सूत्रसंचालन करणार आहेत. तर सुप्रसिध्द गायक पद्मश्री पद्मजा फेणाणी-जोगळेकर आणि राहुल देशपांडे अंतिम फेरीचे परीक्षक असतील. याशिवाय उमेश कामत, भार्गवी चिरमुले, उर्मिला कानेटकर, वैभव मांगले आणि अतिशा नाईक यावेळी रंगतदार कार्यक्रम सादर करणार आहेत. अंतिम फेरीतल्या विजेत्यांची बक्षिसे 'पीएनजी ज्वेलर्स' आणि 'रागरंग' यांनी प्रायोजित केली आहेत. कॉसमॉस बॅंक बी.एम.एम. २०१३ आणि सारेगम २०१३ स्पर्धेची मुख्य प्रायोजक आहे.

अंतिम विजेता-निवडीत, परीक्षकांकडून मिळणार्‍या गुणांसह, रसिक प्रेक्षकांनी केलेल्या मतदानाचाही सहभाग असेल. हे मतदान जुलै २०१३ पूर्वी ऑनलाईन तर प्रत्यक्ष अधिवेशनात एस.एम.एस.द्वारा करता येणार आहे. याविषयी अधिक माहिती http://saregama.bmm2013.org या वेबसाइटवर उपलब्ध आहे. बी.एम.एम. २०१३ च्या https://www.facebook.com/bmm2013 या फेसबुक पेजद्वारेही, रसिकांना अंतिम फेरीतल्या सर्व स्पर्धकांचं दर्जेदार गाणं ऐकता येईल, अशी माहिती अधिवेशनाच्या सह-निमंत्रक अदिती टेलर यांनी दिली आहे. उत्तर अमेरिकेत पहिल्यांदाच होणार्‍या या संगीतस्पर्धेबरोबरच, बी.एम.एम. २०१३ मधे इतर अनेक मनोरंजक कार्यक्रम आणि उपयुक्त उपक्रम होणार आहेत. उत्तर अमेरिकेतल्या आणि जगभरातल्या मराठीप्रेमींनी आवर्जून या अधिवेशनाला उपस्थित रहावं असं आवाहन, अधिवेशनाचे निमंत्रक बाळ महाले यांनी केलं आहे.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

वा वा!

>>प्रतिभा दामले (रिचमंड)
हे रिचमंड व्हर्जिनियाचे काय? असेल तर त्यांना(च) हार्दिक शुभेच्छा!

अणावकर सोडल्यास बाकीच्यांच्या नावापुढे कंसात शहर लिहिलंय, न्यूजर्सी तेवढं राज्य! नॉट फेअर. एकपे रहना.

आमच्या एरियातलं कुणीच नसल्यानी सर्वांनाच शुभेच्छा! त्यातल्या त्यात दामलेंना जरा जास्त शुभेच्छा Proud युट्युबवर ह्यातील काहींचे व्हिडीओ पाहिले. खूप चाळण्यांमधुन हे ६ जण निवडले गेले आहेत, त्यामुळे स्पर्धा नक्कीच छान होईल.

सगळ्यांच्या प्रतिक्रिया टिपीकल आहेत अगदी Proud
आमच्या शुभेच्छाही अणावकरांनाच पर्यायाने न्यू जर्सीलाच.

मी अमेरिकेतल्या कुठल्याच गावा-राज्यातला नसल्याने सर्वांनाच शुभेच्छा देतो....:)
मे द बेस्ट (परफॉर्मर) विन!

सर्वांनाच खोप शुभेच्छा पण त्यातल्या त्यात बेडेकरांना. गो टेक्सास!
स्पर्धकांत कोणी माबोकर आहेत का?
ही स्पर्धा कधी बघायला मिळेल?

फ्लोरिड्यातले सगळे सूस्वरकंठी स्पर्धेतून बाहेर गेल्यामुळे सगळ्या(च) उपांत्य फेरीतल्या स्पर्धकांना शुभेच्छा! पण तरी अक्षय अणावकर यांना स्पेशल शुभेच्छा! बारा ए वे ए ठीला हजेरी लावत असल्यामुळे बाराकरांना, (लोला यांच्या शब्दांत) गूळ लावावा लागतो. Proud

सर्व स्पर्धकांना शुभेच्छा!

दामल्यांनी युट्युब लिंका देण्याचे करावे. थोडे कष्ट वाचवा आमचे.