संस्कारधन

Submitted by विनायक. दि.पत्की. on 5 April, 2013 - 06:01

एक नवी टूम .................. वेळ नाही
आजकाल हा शब्द फार सामान्य झाला आहे.
चिमुरड्यांपासून ते वृद्धांपर्यंत.
परंतु मोजकेच लोक वेळेचा सदुपयोग करताना दिसतात.विशेषत: तरूण पिढी प्रचलित सुविधांमुळे ढेपाळत चालली आहे. त्यांना वेळीच सावध करण्याची घरा- घरात गरज झाली आहे.अन्यथा आपण रोजच वर्तमान पत्रात किंवा दूरदर्शन वर जे पहातो किंवा ऐकतो ते काही निश्चितच समाधानाचे नाही तर प्रसंगी सुन्न करणारे देखील असते. तेव्हा मला माझ्या संपर्कातल्या घरोघरी सामान्य तक्रारी तून सामान्यत: आढळलेले ठळक मुद्दे बघा. मुले (काही वेळा पालक देखील) वेळ कसा घालवतात आणि वर वेळ काढू पणा करतात आणि म्हणतात ,

वेळ नाही|वेळ नाही|| वेळ नाहीच|||

गाह्राणे ऐकतो देव वेळ न वारी
सांगायला वेळ नाही तरी तू तारी||१||
मालिका बघण्यात वेळ कळलाच नाही,
पुस्तकाचा गठ्ठा कोरा,मळलाच नाही||२||
धाब्यावर जेवण मीळेल का नाही?
कारण महाप्रसाद घ्यायची सवयच नाही.||३||
थोड्याश्या दुखाण्यालाही हवे इस्पितळ,
कारण व्यायामाच्या नावानेच सुरु होते मळमळ||४||
गप्पा मारायला हवा मोबाईल उशाला,
ओरडून थकले मायबाप कोरड पडली घशाला||५||
व्यसनी मित्र तो आमचा जिवलग,
उपदेशाला आम्हाला हवेत कशाला नातलग?||६||
पै-पै पैसा तो चैनीला,
उरलाच नाही तो देणगीला ||७||
नशीब आमचे किती हो वाकडे?
आत्मारामाला आम्ही कधी घालावे साकडे||८||
कर्कश्य वाद्याने जरी आम्ही झालो वेडे,
टाळ चिपळ्या वाचून आमचे काय अडे?||९||
शृंगाराला वेळ आता असलाच पाहिजे,
रासायनिक द्रव्याने देह नासलाच पाहिजे||१०||
जर पुढारीच आहे आमचा देव,
मग माय बापाचे आम्हाला कुठले भेव?||११||
विश्व शांतीसाठी आहे उसना आव,
गृह शांतीचा मात्र कडाडला भाव||१२||
आमच्या साठी जरी दिवसाचे तास पंचेवीस,
वेळ नाही म्हणून आम्ही पाडणारच किस||१३||
दिमतीला आमच्या जरी नित्य नव्या सोई,
वेळे अभावी त्यातही भासतात गैरसोई ||१४||
आम्हाला जरी आले दैन्य, तरी ते हि मान्य,
कारण दोषी नव्हे अन्य,आम्ही नियोजनातच शून्य ||१५||
आता तरी देवा सुबुद्धी दे आम्हाला
बळी पडणे नकोच आता पतनाला ||१६||

वरील माझ्या कवितेतील शेवटचे कडवे जे देवाला मागावेच लागते ती म्हणजे सुबुद्धी. (जी नको असा प्राणी सहसा कोणी नसेल)पण माझे असे ठाम मत झाले आहे कि देवाला सतत आपण मागणे मागतच असतो आणि जर त्यालाच द्यायला वेळ नाही असे त्याने ठणकावले तर काय होईल या कल्पनेने मागण्याचा विचार सोडून जे माझ्यात भरपूर आहे ते जरी तू कमी केले तरी मला सर्व मिळेल ह्या भावनेने म्हणावेसे वाटते कि,

देवा आणखी देऊ नकोस

विद्व्त्तेस मी अपात्र जर,
कुबुद्धी माझी कमी कर.
पुण्य कर्म जर घडतच नसेल तर,
पाप तरी माझे कमी कर||१||
शुरतेस मी नालायक जर,
भीती तरी माझी कमी कर.
समाधानता मनाची न होते तर,
चंचलता तरी कमी कर||२||
श्रीमंती नशिबातच नसेल जर,
दारिद्र माझे कमी कर.
सौंदर्य मजला लाभणारच नसेल तर,
कुरूपता तरी तू कमी कर||३||
नम्रता अंगी न वाढते जर,
उद्धट पणा कमी कर.
मित्रता मला टिकतच नसेल तर,
शत्रूंची संख्या तरी कमी कर ||४||
पोट माझे न भरते जर,
भूक माझी कमी कर.
ईज्जत मला मिळतच नसेल तर,
अपमान तरी माझे कमी कर||५||
सगुणांचा अभावच आहेच जर,
दोष माझे कमी कर.
विषय मजला सुटतच नसतील तर,
माया त्याची कमी कर||६||
असेन मी अपात्र च जर,
दिनता माझी कमी कर.
विनंती आता जोडूनी दोन्ही कर,
दास मी तुझा हे तू ध्यानी धर.||७||
मला चांगले सापडतच नसेल तर,
तुझ्यातच मला हरवून टाक.
पडलो तुझ्या चरणाशी,
आता मी न म्हणावे वरच माझे नाक||८||

चला तर आपल्याला माहित असलेल्या,अनुभवलेल्या चांगल्या गोष्टी ऐकणाऱ्याला जरूर सांगू या (जरी दोघानाही वेळ नसला तरी हि)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

चान्गले लिहीलय!
अभ्यासाकरता सविस्तर मूळातून अजुन वाचले नाहीये. (कारण? वेळ नाहीये Proud )
असो.
छान लिहीलय, पुन्हा वेळ काढून येऊन वाचायला हवे.

Happy