चिऊच्या घराची गोष्ट

Submitted by साजिरा on 22 May, 2008 - 05:00

राज ठाकरेंच्या भाषणानंतर जी ''काहीच्या काही मेलामेली' काम नसलेल्या मित्रांमध्ये चालू झाली, त्यातील एका 'काहीच्या काही विंग्रजी' कवितेचे 'काहीच्या काही स्वैर मरहाट्टी' विडंबन...

एक होती चिऊ, एक होता काऊ.
चिऊ दिवसभर कामात मग्न,
बिचारीला बोलायलाही नव्हता वेळ.
तिची लगबग पाहून काऊ शेवटी म्हणालाच-
चिऊताई, कसलं सारखं काम करत राहणं?
बघ तरी, एवढा वसंत फुललेला..
सोनेरी ऊन पडलेलं, सारं कसं छान छान!

चिऊ धापा टाकत म्हणाली,
काऊदादा, खरंय बाबा तुझं.
दिसतंय ख्ररं सगळं सुंदर,
पण ते असंच नाही राहणार.
पिल्लं अजून लहान माझी, अन
लवकरच पावसाळा सुरू होणार;
तेव्हा अन्न शोधुनही नाही सापडणार.
तेव्हा करते आताच सारी बेगमी,
अन माझं घरटंही करते जरा आणखी भक्कम!

काऊला चिऊची दया आली,
पण मग तिच्याकडे दुर्लक्ष करून
तो छान उडू, नाचू, बागडू लागला!

उन्हाळा संपला,
अन एक दिवस सोसाट्याचा आला वारा.
काऊचं तोडकंमोडकं घर पुर्णच तुटलं.
मग आला मुसळधार पाऊस.
भिजल्या, कुडकूडत्या अंगाने, भुकेल्या पोटाने,
काऊ चिऊला- राहायला दे, खायला दे- म्हणाला.
चिऊ म्हणाली, नाही रे बाबा कऊदादा..
खुप राबले मी या घरासाठी अन पिल्लांसाठी.
एकतर जागा नाही इथे, अन खाणं तर माझ्या पिल्लांसाठीच.

काऊ चिडला, अन बोलावली सरळ पत्रकार परिषदच!
चॅनेलवाले, पेपरवाले हजर झाले लगेच.
मग लाईव्ह टेलेकास्टमध्ये काऊ म्हणाला-
मी इथं पाण्यानं भिजतोय, थंडीनं कुडकूडतोय, अन्नावाचून मरतोय..
अन बघा ही बया, खुशाल खातेय, मजेत राहतेय!!
मग सर्वांना आला काऊचा कळवळा..
एका पेपरवाल्याने सरळ बातमीच छापली..
चिऊच्या दारात बिचार्‍या काऊचं उपोषण म्हणून!!
एका 'तेज'तर्रार चॅनेलनं तंबूच दिला बांधून सरळ..
अन कॅमेर्‍यानं त्यांचं २४ तास रतीब घालण्याचं काम केलं.

मग काय विचारता राव....??

मुलभूत हक्कांची पायमल्ली!!
हीच आहे का लोकशाही??
लोकप्रतिनिधी झोपलेत काय?
सरकारचे डोके फिरले काय?
साम्यवादाचा विजय असो!
काऊ-राव-जी-पंत-चंद्र-महाराज-साहेब- चिरायू होवो!
गरीबी हटाव, चिऊला भगाव!!

काऊ फक्त अंगार है, बाकी सब भंगार है!
काऊरावजी आगे बढो, हम तुम्हारे साथ है!!
न्याय मिळालाच पाहिजे..
शोषण बंद झालेच पाहिजे!
पर्यावरणाचा र्‍हास होतोय..
समानतेचा नाश होतोय!
राजीनामा दिलाच पाहिजे..
कारभारी बदललाच पाहिजे!

काय काय अन बरंच काय-काय...

चॅनेल्सवर झळकून, पेपरांत मिरवून,
काऊचा झाला झिरोतून हिरो;
मग त्याने ठेवलाच सरळ एक पी.आर.ओ.!
काऊचे कपडे मग ब्रँडेड झाले,
अंग काळेच, पण केस मात्र डाय झाले!!
रात्रीसुध्दा काऊ रे-बॅन लावूनच बोलू लागला,
पाहिजे त्या गोष्टींसाठी स्पाँसर्सही मिळवू लागला!!

काऊने मुद्दा लावून धरला, तसा
विधानसभेतच गदारोळ माजला!
आयूक्त, प्रशासक बदलले..
अन मंत्रीमंडळही विस्तारले!
पण शेवटी परिस्थिती हाताळण्यात अपयश
आल्याकारणाने मुख्यमंत्रीच बदलले!!
केंद्रसरकार हादरले,
दर तासाला परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत, म्हणू लागले!
प्रतिक्रिया तर पैशाला पासरीभर,
आपण मागे पडू, म्हणून सर्वांची धडपड!

अल्पसंख्यांक, मागासवर्गीय, दारिद्र्यरेषा..
गरीब, सवर्ण, आरक्षण, स्पेशल कोटा..
पक्षांतर, घोडेबाजार, जातीयवाद..
सभा, मोर्चे, बंद, अटक अन मतदारराजाला साद!!
समर्थक, भक्त, अनुयायी, उगवते नेतृत्व..
काही खरं नाही, कशाला येईल महत्व!!

सरकार बदललं, तसा कायदाही बदलला,
चिऊच्या घरावर सरळ सरकारी कब्जाच आला.
लेखण्या सरसावल्या, कॅमेरे क्लिकाटले..
समारंभपुर्वक काऊरावजी घराचे मालक झाले!!

चिऊ बिचारी रडली, ओरडली..
वैतागून तिने शेवटी पिल्लांसह अमेरिका गाठली!
चिऊ तिथेही राब-राब राबली,
कंस्ट्रक्शन व्यव्सायात बिझनेस-वुमन बनली!!

काऊला आजही स्वतःचं घर बांधता येत नाही,
पण भाषण करण्यात त्याचा कुणी हात धरत नाही!
आता तो नेहमी वेगवेगळ्या निवडणूका लढवतो..
एन.आर.आय. लोकांनी देशाला मदत केली पाहिजे म्हणतो..!!

गुलमोहर: 

अप्रतिम कविता........... शेवट सुन्दर आहे.......

एका ज्वलंत विषयाला खुपच समर्पकपणे रेखाटले आहे ...चिउ आणि काउच्या रुपात !
...खुप छान !

सहीच एकदम....
==================
ढिंग चँग ढिचँग... ढिंग चँग ढिचँग...

साजिरा, अशक्य आहे ही कविता. काहीच्या काही मुळीच नाही वाटली. इतकी मोठी कविता असून कुठेच थांबली नाही वाचताना.

सध्या आपली परीस्थीती अशीच आहे . अजुनही आपण झोपलेले आहोत! जेव्हा झोपतुन जागे होउ तेव्हा बहुतेक चिउ नसेलही ! पण काऊदादा नक्कीच आपला सर्वात मोठा नेता बनलेला दिसेल यात शंका नाही !

मोहनप्यारे, गोबु, येड्या, पीएसजी, प्रकाश, हिम्स्-कुल, बी, सुकांत..
प्रतिक्रियांबद्दल हार्दिक आभार.
तुमच्या प्रतिक्रियांमुळे हुरळून जाऊन यापुढेही 'काहीबाही' लिहिलं, तर प्लीज, सहन करा..
तुम्हीही लिहा, वाट बघतो...

कसलं भारी लिहिलंय!! मस्तच.
>>तुमच्या प्रतिक्रियांमुळे हुरळून जाऊन यापुढेही 'काहीबाही' लिहिलं, >>लिहिलं तर नाही, लिहाच तुम्ही साजिरोबा!! मस्तच लिहिताय.

काऊचे कपडे मग ब्रँडेड झाले,
अंग काळेच, पण केस मात्र डाय झाले!!
रात्रीसुध्दा काऊ रे-बॅन लावूनच बोलू लागला,
पाहिजे त्या गोष्टींसाठी स्पाँसर्सही मिळवू लागला!!>>>>>>>>>>>>>

काय ग्रेट कविता आहे शेवट तर टाळ्याच .......!! साजिरा you are absolutely great ......... hilarious..
लिहित रहा ( BTW ही कविता मेल केली तर चालेल का?:))

लोपामुद्रा, ही कविता (किंवा जे काय असेल ते!) जास्तीत जास्त लोकांपर्यंत जावी (कमीत कमी तिचा हेतू) असं मला वाटतं. तुला पाहिजे तेवढ्या लोकांना, पाहिजे तेवढ्या वेळा मेल कर.
तुझ्या प्रतिक्रियेबद्दल धन्स..

साजिरा,
सर्वांग सुंदर !!!!!!
"रात्रीसुध्दा काऊ रे-बॅन लावूनच बोलू लागला," "काऊ-राव-जी-पंत-चंद्र-महाराज-साहेब- चिरायू होवो!","काऊला आजही स्वतःचं घर बांधता येत नाही, पण भाषण करण्यात त्याचा कुणी हात धरत नाही!, आता तो नेहमी वेगवेगळ्या निवडणूका लढवतो..,एन.आर.आय. लोकांनी देशाला मदत केली पाहिजे म्हणतो..!!"

क्या बात है यार !! बहोत बढिया.
......................................अज्ञात

खासच रे भो. तिकडे मराठी "राज"कारणाच्या बिबीबर जायला पाहीजे अशी.

झकास!! मी तुझी परवानगी गॄहीत धरून ही मेल करते धडाधड!! आता हात थांबवत नाही!!
Happy
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
अत्तराची कुपी संपतानाच जास्त जपायची असते...

वा जबर्दस्त
गोदेय

मस्तच तेजा आइला ..
हुन जाऊदे ..
खरोखर खुपच छान ..