संत गणोरेबाबा, पुणे

Submitted by मी_आर्या on 23 March, 2013 - 08:14

नमस्कार,
महाराष्ट्र ही संतांची भुमी म्हणुन ओळखली जाते. या लेखात आपण अशाच एका अपरिचित संताची ओळख करुन घेणार आहोत.
या १ जाने.ला कुठेतरी देवदर्शनाला जायचेच हा विचार डोक्यात होता. पण पुणे आणि आसपासच्या परिसरातील गर्दी गृहीत धरुन कुठेतरी अनवट ठिकाणी असं वाटत होते. मागच्या वर्षीच संत श्री. गणोरेबाबा यांचे "ओम हा गुरु' हे पुस्तक वाचनात आले होते. त्यात होते की या महाराजांचा आश्रम पुण्याच्या खुप जवळ म्हणजे भुकुम इथे आहे. आईच्याही मनात कधीपासुन या मठात जायचे होते. त्यानुसार १जाने.ला तिथे जायचे ठरले. चांदणी चौकातुन उजवीकडे वळुन तिथुन साधारण ८ कि.मी.वर (भुगावच्या पुढे) हायवेवरच उजवीकडे एक छोटीशी टेकडी दिसते. त्यावर हा हरिराम आश्रय मठ आहे. निघण्यास उशीर झाल्याने थोडं उशीराच पोचलो. साधारण दु. ३च्या सुमारास!
मठाची वास्तु उंचावर व एकांतस्थळी असल्यामुळे १२ही महिने शांत व प्रसन्न वातावरण असते. . मठाच्या खालच्या बाजुस पिरंगुटचा नागमोडी घाट दिसतो व पश्चिमेस डोंगर दर्या,छोटी छोटी शेते दिसतात. मठातुन दिसणारा सुर्योदय व सुर्यास्त विलोभनिय असतो. पौर्णिमेच्या रात्री निसर्गाचे आगळेच दर्शन घडते. प्रत्येक ऋतुचे मनोहरी दर्शन मठात घडते. उंच अशा टेकडीवर उन्हाळ्यातील प्रखर ऊन, हिवाळ्यातील बोचरी थंडी, आणि पावसाळातील पाऊस या सर्वांना लिलया सहन करुन हा मठ एखाद्या स्थितप्रज्ञ योग्यासारखा प्रसन्नतेचं चिरंतन वरदान घेउन उभा आहे.
मठात शिरल्यावर पश्चिमेकडे प्रवेशद्वार आहे. दक्षिणेकडे राशीनुसार १२ छोटी छोटी मंदीरं लागतात. मठाच्या पुर्वेस प्रेमनिधी संत गणोरेबाबा व संत सीतामाई यांचे समाधी मंदीर आहे. मठाच्या उत्तरेला धर्मशाळा आहेत. मठाच्या पुर्वेला तपश्चर्याकरता गुहा आहे. त्यावरच राधाकृष्णाचे मंदीर आहे. मंदिराच्या उत्तरेस गाईचा गोठा आहे. गुहेच्या शेजारी ग्रंथालय आहे. प्रवेशद्वाराला शेजारीच उत्तर दिशेस श्री. बाबांचे निवासस्थान असुन त्याच्यालगत स्वयंपाकघर आहे.
श्री. गणोरेबाबांचे थोडक्यात चरित्रः
गणोरेमहाराजांचे वडिल रामचंद्रशेठ आणि आई जानकीबाई अतिशय धार्मिक प्रवृत्तीचे. स्वभाव अतिशय दानशुर.सुरवातीला सुख व संपन्नता असणार्या गणोरे घराण्यात कापड व्यापारामुळे वैभव होते. पण १९०३ साली रामचंद्रशेठची २०,०० रुपयांची उधारी बुडाली. ३ घरे, शेती, १२ जनावरे अशी एकुण पंच्याहत्तर हजारांची मालमत्ता असतांनादेखिल सावकाराचे १३,००० रुपयांचे कर्ज झाले. सर्व मालमत्ता जप्त झाली पण त्यांनी आपली मनःशांती ढळु दिली नाही. लौकिक जीवनातील अर्थशुन्यता उमजल्याने परमार्थात त्यांना उच्चावस्था प्राप्त झाली. प्राप्त झालेल्या मंत्रसिद्धीचा उपयोग केल्यामुळे मुक्यांना वाचा आली, अंधांना दृष्टी मिळाली. परिणामी लांबलांबचे लोक त्यांच्याकडे येत असत. रामचंद्रशेठही निस्वार्थीपणे त्यांची सेवा करण्यात आनंद मानत. १९१४ साली त्यांनी जोगमहाराजांकडुन दीक्षा घेतली. त्यानंतर त्यांची विठ्ठलभक्ती खुप वाढली. त्यांच्या हरिभक्तीमुळे, सचोटीमुळे, सत्य वाचेमुळे, परोपकारामुले व दयाळु अंत:करणामुळे ते गावामधे भगूरचे तुकाराम महाराज म्हणुन ओळखले जाउ लागले.

देशात १९१७-१८च्या सुमारास प्लेगची साथ जोरात होती. त्याबरोबरच मानमोडीचीही साथ होती. जानकीबाई गरोदर होत्या. भगूरगावात मानमोडीची साथ पसरली. गावात दारणा नावाची मोठी नदी आहे.तिच्या पलिकडे एक मैलावर लाहुरी गाव आहे. त्या गावात दारणा नदीपासुन ४ फर्लांगावर असलेली आमराई प्रसिद्ध आहे. जानकीबाईंचे दिवस भरत आले म्हणुन त्यांना तिथे ठेवायचे ठरले. तिथे श्री सुकदेव पानसरे या शेतकर्याची झोपडी होती. तिथेच श्री. गणोरेबाबांचा जन्म माघ शुद्ध द्वादशी (१९डिसें.१९१८) पुनर्वसु नक्षत्रावर झाला. त्यांचे पाळण्यातले नाव 'श्रीराम' ठेवण्यात आले. श्री. बाबांचे शिक्षण ४थी पर्यंत झाले. घरच्या गरिबीमुळे मोलमजुरी करण्यास जावे लागे. म्हणुन शिक्षणात खंड पडला. एका किराणामालच्या दुकानात ८रु. महिन्यावर नोकरी केली. ती सुटली. नंतर कापडाच्या दुकानात नोकरी केली त्यातही घरचे व्यवस्थित भागेना म्हणुन इगतपुरी तालुक्यात घोटी या गावी गणपतशेठकडे दरसाल १००रु. वर हमाली करु लागले. त्यावेळी त्यांचे वय होते १६-१७. रोज सकाळी उठल्यापासुन झोपेपर्यंत दिवसभर बाबा हमाली करत. ४०किलोची पोती उचलत. असं २वर्ष तिथे काम केलं. परिणाम व्हायचा तो झालाच्.अपेक्षेपेक्षा अधिक ताण शरिराल दिल्याने दिवसेंदिवस तब्येत खालवत चालली.अशक्तपणा आला. आईवडीलांनी मग या १८वर्षाच्या मुलाला परत बोलवुन घेतले. औषधोपचार, पुरेशी विश्रांती याने बाबांची तब्येत पुन्हा सुधारली. आता धाकट्या मुलाला हमाली करु द्यायची नाही असे जानकीबाईंनी मनोमन ठरवत संसाराचा गाडा हाकणे सुरु केले. अशात वृत्तपत्रात एक जाहिरात आली. गरिबांच्या मुलांना मोफत शिवणकलेचं शिक्षण देण्याची सोय त्या काळातील मुंबईचे धनाढ्य व्यापारी खोंडके आणि कंपनीने नाशिकच्या वृत्तपत्रात जाहिरात दिली. टेलरिंगचा डिप्लोमा केलेले एम्.एन. पाटसकर यांच्या सहकार्याने नामदेव औद्योगिक संस्था हे शिक्षण पुण्यात डेक्कन जिमखाना इथे देणार होते.
जानकीबाईंनी बाबांना पुण्यात हे शिकण्यासाठी पाठवले. १९३५मधे बाबांनी नामदेव औद्योगिक संस्थेत प्रवेश घेतला. त्यावेळी भगुर पुणे मोटरभाडे २रु. व १ रु. खर्चासाठी असे ३रु. घेउन श्री.बाबा पुण्यास आले.
संस्थेत त्यावेळी ३० मुले होती. इथे बाबांनी सुई धरण्यापासुन ते कोट शिवेपर्यंत सर्व शिक्षण आत्मसात केले. रोज ३तासापेक्षा जास्त झोप घेतली नाही. पुण्यामधे दत्ताच्या देवळाजवळ दासबाबु नावाच्या बंगाली गृहस्थाची खानावळ होती. त्यावेळी बाबा तिथे जेवण घेत. आणि बाबा परिक्षा पास झाले. पहिला क्रमांक आला.
१९३६ साली बाबा परत भगूरला गेले. आणि महिना २ रु.भाड्याने मशिन घेउन शिवणकामास सुरवात केली. या मशिनवर रात्रंदिवस काम करुन १४ माणसांच्या कुटुंबाचा भार त्यांनी शिरावर घेतला. आणि समर्थपणे पेलला. २१व्या वर्षी बाबांचे लग्न झाले. १९३७ साली सिन्नर तालुक्यातल्या नायगावचे शंकर तात्याबा वारे यांची सुशील कन्या सीता हिच्या बरोबर बाबांचा विवाह झाला. लग्न फक्त ८०रु.त पार पडले. १९३८-३९ साली श्री बाबांच्या शिंपीकाम व्यवसायात भरभराट होउ लागली. स्वतःच्या मालकीच्या ४ मशिन्स घेतल्या. चोख आणी वेळेपुर्वी काम हेच बाबांच्या यशाचे गमक होते. सन १९४२ साली स्वतःच्या १० मशिन घेतल्या.
मुळात चैनीत जगावे, ऐषआरामात रहावे हा बाबांचा स्वभाव नव्हता. त्यामुळे घरचा गाडा सुरळीत करुनही बाबांना स्वस्थता नव्हती. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या भूमीतील ह्या ध्येयवादी तरुणाचे रक्तही इंग्रजांच्या अत्याचाराने सळसळत होते.
१९४२ साली 'चले जाव' चळवळीने सारा देश पेटुन उठला. आणि ऐन तारुण्यात सुखाचा संसार त्यागुन बाबांनी स्वातंत्र्यसंग्रामात उडी घेतली. इगतपुरी तालुक्यात शेतकरी संघटनेची स्थापना, पेठ तालुक्यातील १२८खेड्यांमधे रात्रंदिवस फिरुन जनजागृतीचे कार्य केले. तिथली सावकारांची पठाणी पद्धत मोडुन टाकली. त्यामुळे सावकार खवळले. आणी त्यांनी ब्रिटीशांकडे तक्रार केली. झालं. ब्रिटीशांचा ससेमिरा मागे लागला. बाबांच्या नावाने अटक वॉरंट निघाले. क्रांतिसिंह नाना पाटील यांच्याशी संपर्क झाल्याने श्री बाब भुमिगत झाले. अशातच पंडित नेहरु, काकासाहेब गाडगीळ अशा दिग्गज मंडळींचा सहवास मिळाला. नाना पाटलांनी १९४६च्या नाशिकच्या सभेत 'त्यागी गणोरे' असं म्हणुन बाबांबद्दल गौरवोद्गार काढले. बाबांना साने गुरुजींचाही सहवास लाभला.
श्री. बाबांबरोबर सीतामाईही काही काळ भुमीगत होत्या. भारतमाता १९४७ साली स्वतंत्र झाली. एक दिवस तुरुंगात गेलेल्या अनेकांनी स्वातंत्र्यानंतर ताम्रपट घेउन शासकीय सुविधा मिळवल्या. देश स्वातंत्र्यासाठी ५ वर्षे वाहुनही गणोरे दांपत्याने कुणाकडे काहीच मागितले नाही.
गणोरे बाबांनी १९४२मधेच आपला संपुर्ण व्यवसायावर तुळशीपत्र ठेउन भावंडांच्या हातात सोपवला होता. आता पुन्हा माघारी नको, दुसरीकडे जावे हा संकल्प बनला.
पोटापाण्याकरता बाहेरगावी जावे असा निश्चय बाबांनी केला. आधी मुंबईला जावे असे ठरले. बाबांचे सासरे शंकरशेठ वारे यांचे मित्र त्र्यंबक कुलकर्णी हे ज्योतिषशास्त्राचे गाढे अभ्यासक होते त्यांनी कुंडली मांडुन सांगितले, की " जावईबुवा मुंबईला जाल तर मशिन विकुन याल पण पुण्याला गेलात तर किर्ती मिळवाल." याप्रमाणे जाने. १९४८ मधे बाबा भगूरहुन पुण्यास पायी निघाले. २शेर बाजरीच्या भाकरी व चटणी एवढीच शिदोरी पाठीवर.भगूर-पुणे १२२ मैलाचे अंतर.पुण्याला पोहोचायला बाबांना ६ दिवस लागले. चालुन चालुन पाय सुजले होते. जवळ फक्त दीड रुपया. त्यांच्या मित्राची सासु भागूबाई चिखलकर भवानी पेठेतील कामाठीपुर्‍या रहात. त्यांच्याकडे बाबांना आश्रय मिळाला. तिसर्या दिवशी कामाची शोधाशोध. १९४८ साली कापडावर कर बसणार म्हणुन या व्यवसायात मंदी होती. चौथ्या दिवशी बाबांकडे फक्त एकच आणा शिल्लक. काम शोधण्यासाठी पायाची चक्रे फिरत होती, मात्र काम मिळत नव्हते. आता आपल्या जीवनात काहीच अर्थ राहिला नाही असे समजुन बाबा विषण्ण झाले. पाचव्या दिवशी ६ वा. उठुन आता कुठेतरी जीव द्यावा या विचाराने बाबा घरातुन सरळ येरवड्याकडे निघाले. बंडगार्डनचा पूल अर्ध्या एक मैलावर असतांनाच त्यांना रस्त्यात काही मजूर भेटले. त्यांनी चौकशी केल्यावर बाबांनी सत्य परिस्थिती सांगितली. एका मजुराने माहिती दिली," अहो, त्या सॅपर्स मायनरला एक शिख आहे त्याला शिंप्याची फार जरुरी आहे. जा जा लवकर जा"!
बाबांची त्या शीख दुकानदाराकडे नोकरी सुरु झाली. रुपयातले दहा आणे हिस्सा देण्याचे कबुल झाले. बाबांची पायपीट थांबली. थोडी स्थिरता लाभली. महिन्यात १५०रु. जमा करुन त्यांनी आपल्या पत्नीला पाठवले. वे मशिन घेउन पुण्यास येण्यास सांगितले. मित्राच्या सासुनेच दरमहा ४रु. भाड्याने एक लहान खोली दिली. त्यांनीच एक पत्र्याची ट्रंक, तिखटमिठाला एक डबडे व ताडपत्रीचा तुकडा दिला.
परंतु काही दिवसांनी शिखाची पत्नी वारली त्यामुळे त्याचे दुकान बंद पडले. जवळच पैसेही संपले रोज काम शोधण्यासाठी, मशिन ठेवण्यासाठी बाबा हिन्डत होते. फ़िरता फ़िरता ते कर्वे रस्त्यावरील कचरेवाडी येथे आले. एका कापडदुकानाच्या ओट्यावर दरमहा १५ रु भाडे घेउन मशिन ठेवण्याचे ठरले. श्री. बाबांनी रसशाळेसमोर कचरे वाडीत दीड खणी जागेत दुकान व वरती पोटमाळ्यावर संसार मांडला.
नववर्षी १ जाने. १९५० ला बाबांनी ही जागा ताब्यात घेतली. व तेथे 'गणोरे टेलर' या नावाची पाटी लागली. व्यवसाय जेमतेम सुरु झाला. त्यागी गणोरे बाबांचे जीवनाचे नवे पर्व सुरु झाले. संसार, राजकारण, पुन्हा संसार्!मोठ्या कष्टाने पुन्हा व्यवसायात जम बसवला. एकीकडे गोरगरिबांची सेवा सुरुच होती. अनेक लोक पैसे न देता कपडे शिवुन नेत. एक आंधळा वृद्ध भिक्षुक बाबांच्या घरी नेहमी येत. बाबा त्याला घरात बोलावत. आंघोळ घालीत, नवे कपडे देत, जेवायला घालत. सीतामाईंनीही बाबांबरोबर अंध वृद्धांची, अनेक अनाथांची मनोभावे सेवा केली. या वृद्ध अंधाने बाबांना आळंदी- पंढरीची वारी करण्याचा सल्ला दिला. तर अभ्यंकर नावाच्या गृहस्थाने त्यांना ज्ञानेश्वरी वाचायला दिली. बाबांना ज्ञानेश्वरीची गोडी लागली. बाबा पुण्याच्या मध्यवर्ती भागात रोज शिवलेल्या कपड्यांचे काजे करण्यासाठी जात तेव्हा जुन्या पुस्तकांच्या दुकानात जाउन आत्मज्ञानावरील पुस्तके विकत घेण्याचा छंद बाबांना जडला. हळुहळु पुस्तकांची संख्या वाढली. अध्यात्म ज्ञानाचे छोटे ग्रंथालयच बनले. बाबांनी त्यांचा सखोल अभ्यास केला. एकीकडे ज्ञानेश्वरी पारायण सुरुच होते. एके दिवशी ज्ञानेश्वरीचा १०वा अध्याय वाचतांना २२३ ओव्या वाचुन गेल्या. आणि
इंद्रियामाजी अकरावे| मन ते मी हे जाणावे|
भूतांमाजी स्वभावे| चेतना ते मी|२२४||
रात्री १० वा. ही ओवी वाचतांना एक प्रकाशझोत या ओवीतुन निघाला व ओवीचा अर्थ आतुन एकसारखा बाबांना स्फुरत गेला.
आबा ध्यानमग्न झाले. अर्धा तास ओवीच्या भावार्थाने बाबा परमानंदात होते. तिथुनच बाबांच्या पारमार्थिक जीवनाचा श्रीगणेशा झाला. अंध वृद्धाच्या उपदेशातुन बाबांनी पंढरी वारीही सुरु केली. पुढे ६ डिसें. १९५२ रोजी धुळे येथील अ.ल. भागवत यांच्याशी गाठ पडली. तेव्हा भागवत यांनी ज्ञानदेवांच्या पंथाचीच, म्हणजे नाथपंथाची दीक्षा दिली व गोरक्षनाथांचा जप करण्यास सांगितले. बाबांची तळमळ पाहुन त्यांनी काही योगाच्या क्रिया व ध्यानही शिकवले.
पुण्यात आल्यापासुन ईश्वरी सामर्थ्याचे अनुभव श्री गणोरेबाबांना सतत येत होते. ग्रंथांचे वाचन, अभ्यास, सुक्ष्म विचार आणि त्यानुसार आचरणास प्रारंभ केला. ग्रंथाचे वाचन व मनन करण्यास रात्री न रात्री पुरत नसे. दिवसभर शिवणकामाचे कष्ट व मध्यरात्री उठुन साधना करायची असा नित्यनेम सुरु झाला. सत्पुरुषांनी दिलेल्या नाममंत्राचा ते निष्ठेने जप करत. भागवतांकडुन घेतलेल्या गोरक्षमंत्राचा दररोज १२००० याप्रमाणे सतत २ वर्ष जपुन बाबांनी तो सिद्ध केला. याच काळात वडील श्री रामचंद्रशेठ यांनीही आपला पारमार्थिक वारसा बाबांना दिला.
भगूर येथील 'भगरीबाबांचा' आशिर्वाद श्री.बाबांना मिळाला. 'मेहेरबाबांचा' ही प्रसाद त्यांना मिळाला. सिंधी लोकांचे धर्मगुरु साधू वासवानी हे महान सत्पुरुष यांचाही बाबांना सहवास लाभला. स्वामी गगनगिरी, आचार्य आनंद, सावळा हरी, साधु ओंकारेश्वर, अमरानंद, नित्यानंद. संत गाडगेबाबा, वेदाचार्य मंगलमुर्ती, रमणमहर्षी,अनंतमहाराज, पुंडलिकमहाराज या विभुतींच्या गाठीभेटीत बाबांचे पारमार्थिक जीवन समृद्ध झाले.
एकीकडे कठीण परिस्थिती हरिद्वारला जाण्याची आज्ञा झाली. तीर्थयात्रेसाठी पैसा नव्हता. पण आपोआप पैसे मिळत गेले. आई व पत्नीला घेउन बाबा हैद्राबाद, जगन्नाथपुरी, गया, प्रयाग, काशी, अयोध्या, मथुरा, गोकुळ, दिल्लीची यात्रा करत ऋषीकेश,हरिद्वारला गेले.तेथुन कोलकाता व दक्षिणेश्वर केले. रामकृष्ण परमहंस यांच्या मठात काही दिवस राहिले. प्रवासात अद्भुत घटना घडतच होत्या. तीर्थयात्रा, साधु-संताच्या भेटी आणि अखंड नामस्मरणाने बाबांची भक्तीमार्गाकडे अविरत वाटचाल सुरुच होती. बाबांना अनेक ज्ञानसिद्धी प्राप्त होत होत्या. दररोज ३ तस असे तीन महिने सुर्यावर त्राटक लावुन त्यांना नेत्रसिद्धी प्राप्त झाली. ज्योतिषशास्त्राचा सखोल अभ्यास झाला. निरनिराळ्या योगसाधना झाल्या. वनस्पतींचाही सखोल अभ्यास केला. औषधी वनस्पतींचे ज्ञान झाले. वृक्षाखाली असलेल्या निरनिराळ्या शक्तींचीदेखील माहिती झाली. बाबांना साधना करुन प्रचंड सामर्थ्य प्राप्त झाले तरी त्यांनी त्याचा उपयोग लौकीकासाठी कधीच केला नाही. देहु हे त्यांची आवडते तीर्थक्षेत्र. जेथे संत तुकारामांनी इंद्रायणीत बुडालेल्या गाथा वर येण्यासाठी ध्यान लावले होते त्याच जागेवर श्री बाबांची एकदा १० दिवस समाधी लागली होती. पुण्यातील सिंहगड रोडवरील प्राचीन गणेश मंदीरातही बाबा साधनेसाठी जात. संध्याकाळी ९वा.पर्यंत शिवणकाम, रात्री २ पर्यंत ग्रंथवाचन व पहाटे साधना असा नित्यक्रम सुरु होता. दिवसभर संसारसाठीचा शिवणकामाचा उद्योग संपल्यानंतर रोज रात्री १२,००० जप झाल्याशिवाय बाबा झोपत नसत. जप संपतात ते ध्यानाला बसत. गोरक्षनाथांच्या मंत्र जपाच्या सिद्धीनंतर हरिनामाचा जप, रामनामाचा जप असे निरनिराळे मंत्र त्यांनी २-२ वर्षात सिद्ध केले.
१९५६ साल उजाडले.माघ महिना सुरु होता. माघ शुद्ध दशमीचा सुदिन उगवला. याच शुभदिवशी बाबांना तुकोबारायांनी स्वप्नी दर्शन दिले. मस्तकावर हात ठेउन मंत्र दिला आणि क्षणार्धात अदृश्य झाले. त्या क्षणापासुन बाबा जणु तुकोबारुपच झाले. विठ्ठलोपासना करत पुढील एक तप त्यांनी हा मंत्र जपला, जोपासला, अंगिकारला आणि सिद्ध केला. या नामसाधनेच्या तपातूनच संत गणोरेबाबांचा जन्म झाला.
याच पुण्यदिनी बाबाजी चैतन्यांनी तुकोबारायांना स्वप्नातच मंत्रदीक्षा दिली होती. रामकृष्णहरी हा मंत्र दिला होता.
तुकाराम महाराज आपल्या गाथेत म्हणतात,

सद्गुरुराये कृपा मज केली| परी नाही घडली सेवा काही||
बाबाजी आपले सांगितले नाम| मंत्र दिला राम कृष्ण हरि||
माघशुद्ध दशमी पाहुनि गुरुवार| केला अंगिकार तुका म्हणे||

१९६८ मधे पुनश्च तुकाराममहाराजांचा कृपाप्रसाद बाबांना लाभला. त्यांनी या दृष्टांतात एक जागा दाखवली आणि या ठिकाणी नाम घे, लोकांची सेवा कर, व सांगतो ती पथ्ये पाळ' अशी आज्ञा केली.
बाबांनी दृष्टांतात दाखवलेल्या जागेचा शोध सुरु केला. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी ते फिरले. परंतु ती जागा सापडत नव्हती. श्री. बाबा बेचैन झाले.आणी शेवटी तो शोध भुकूम गावातील पिरंगुट घाटाच्या माथ्यावरील डोंगरावर संपला. अनंतराव माझिरे यांची ती जागा होती. जागा अतिशय निवांत ठिकाणी होती. त्या ठिकाणाचे वातावरण प्रसन्न व चैतन्यमय होते. बाबांनी त्या जागेला भेट दिली. "आमच्या जागेत जर ईश्वराने सांगितलेले कार्य होत असेल तर आमचे किती मोठे भाग्य, असं सांगुन माझिरे यांनी एकही पैसा न घेता मठाच्या कार्यासाठी भूदान केले. हिंदू नववर्षारंभ, गुढी पाडवा, २९मार्च १९६८ साली हरिराम आश्रय मठाची मुहुर्तमेढ रच्लई गेली. त्यावेळचे आमदार मामासाहेब मोहोळ यांच्या हस्ते भूमीपुजन झाले. मंदिराची पायाभरणी शंकरराव ढमाले यांनी केली. मान्यवरांनी वृक्षारोपण केले.
(संत तुकोबारायांनी दृष्टांतात दाखवलेल्या जागेचा रामायणात उल्लेख आहे. त्रेतायुगात सीतामाईंना परत एकदा वनात सोडण्याची आज्ञा प्रभू रामचंद्रांनी दिली. तेव्हा प्रथम लक्ष्मणाने सीतामाईंना ज्या ठिकाणी सोडले तो भुकुम डोंगराचा परिसर होता. त्या कालात वाल्मिकी ऋषिंनी या जागेत तपश्चर्या केली. पुर्वी मठाचा परिसर घनदाट अरण्याचा होता. घोर जंगलातील काट्याकुट्यातुन चालावे लाग्त असल्याने एकदा वैतागुन सीतामाई म्हणाल्या," जळो हे सर्व!" वाल्मिकी ऋषींनी हे ऐकले व ते म्हणाले, तु जगदजननी आहे, हे सर्व जळाल्यावर प्राणीमात्रांना अन्न, चारा कोठुन मिळेल. तरी तु असा शाप देउ नको. तेव्हा सीतामाईंच्या ध्यानी आपली चुक आली, व त्या लगेच म्हणाल्या," जळो पण पिको" सीतामाई शांत झाल्यावर भुकूमच्या पवित्र टेकडीवरच वाल्मिकी ऋषींनी त्यांना उपदेश केला. सीतामाईंनी पिण्याच्या पाण्यासाठी गंगा आणली. या गंगेतुनच पुढे रामनदीचा उगम झाला.)

साधी चंद्रमौळी झोपडी बांधुन बाबांनी मठाची स्थापना केली. त्यांनंतर भाविकांची संख्या वाढु लागली. येणार्यांना बाबा नामसाधनेचं महत्व पटवुन देत. वर्षभरातच बाबांना एका मागोमाग एक नउ देवतांनी दर्शन दिले. त्या दैवतांची मंदिरं स्थापित कर असा संकेतही मिळाला. हळु हळु मठाचा पसारा वाढु लागला. पहाता पहाता नउ मंदिरांचे काम पुर्ण झाले. मठच्या दक्षिणेकडे रामेश्वर, गोरक्षनाथ, गणपती, हनुमान, भैरवनाथ, जगदंबा दीए, श्री दत्त, श्री विष्णु व संत तुकाराम महाराज अशी ९ मंदिरं झाली.
सुरवातीला मठात पाण्याचा तुटवडा होता. बाबांनी क़ळकळीने पांडुरंगाला विनवले. तेव्हा मठाच्या टेकडीवर विशिष्ट दोन ठिकाणी खोदकाम कर, असा संकेत मिळाला. एक ठिकाण टेकडीखाली होते. तर दुसरे टेकडीच्या वरच्या भागात. दोन्ही ठिकाणी खोदकाम सुरु केले आणि दोन्ही जागी पाणी लागले. टेकडीखाली विहिर बांधण्यात आली तर टेकडीवर कुपनलिका. मठाच्या उत्तरेकडे एका भव्य धर्मशाळेचे निर्माण झाले.
धार्मिक कार्य सुरु झाल्याने अनेक वस्तु लागत असत. या वस्तु-भांडी ठेवण्यासाठी एक खोली व अजुन एक खोली बांधली. त्यानंतर भाविकांना एकाग्रतेने ध्यानसाधना करता यावी म्हणुन एक गुहा बांधायचे बाबांनी थरवले. जमिनीत खोल बांधलेल्या या गुहेचे आतल्या आत दोन भाग करुन दगडी बांधकाम करण्यात आले. बाबांनी गुहेच्या शेजारीच स्वतःसाठी एक झोपडी बांधली होती. हळु हळु मठाचा व्याप वाढत गेली. गोशाळा बांधली गेली. त्याशेजारीच प्रसाधनगृह झाले.
आश्रमात माघ शुध्द दशमीचा मोठा उत्सव साजरा करण्याचा पायंडा पडला. गुढीपाडवा, गुरुपौर्णीमा असे उत्सव साजरे होउ लागले.
मठात असंख्य माणसे आई-बाबांच्या जीव्हाळ्याने बांधली गेली. मोठा साधक वर्ग श्री बाबांच्या भोवती जमा होउ लागला होता.
बाबा त्यांना मार्गदर्शन करत," हे पहा, साधना जसजशी वाढु लागते, तसतसे साधकाला निरनिराळ्या ज्ञानाची उपरती होउ लागते. परंतु या ज्ञानात जसजशी प्रगती होउ लागते तसतशी साधकामधे अहंकाराची वृत्ती वाढण्याची शक्यता असते. आपल्यासारखा ज्ञानी कुणी नाही असे वाटु लागले की आपली प्रगती तेथेच संपली असे समजायचे. म्हणुन साधकाने सुरवातीपासुनच सर्वांशीच लीनतेने वागावे, प्रेमाने व सेवाभावाने वागावे, त्यामुळे आपल्या ठिकाणी अहंकार निर्माणच होणार नाही. "
'साधनेचा जोर वाढल्यावर साधकाला निरनिराळ्या दैवतांचे दृष्टांत होउ लागतात. परंतु येथे तो भ्रमिष्ट बनण्याची शक्यता असते. जेव्हा साधकाला दैवतांचे आदेश होउ लागतात तसतसे त्यांचे सामर्थ्य सबंधीचे चिंतन सुरु होते. साधकाला आपण कुणीतरी मोठे आहोत असे वाटु लागते.अशा प्रकारे तो लौकीकाच्या गळात सापडण्याचा धोका असतो. तो लौकीकाच्या मागे लागतो व त्याची भक्ती दिखाऊ स्वरुपाची होउ लागते. आपल्या सहवासात येणारा प्रत्येक माणुस आपल्यापेक्षा मोठा आहे असे समजावे म्हणजे तो लौकीकाच्या गळातुन सुटतो.दुसरं म्हणजे, क्रोध.साधकाने आपल्या वृत्तीवर संयम ठेवावा. श्री. बाबा साधक यात्रेतील धोक्याची ठिकाणे अगदी अचुकपणे सांगत.
'ओम हा गुरु' हे पुस्तक बाबांकडुन प्रासादिक वाणीत लिहिलं गेलं. त्यांनी ते स्वतः प्रकाशित केलं. पुस्तक प्रसिद्ध झालं आणि अनेक वृत्तपत्रांकडुन वाखाणलं गेलं. या पुस्तकाद्वारे महाराजांचे तत्वज्ञान घरोघरी पोहोचले. मठावर येणारा भाविक वर्ग वाढत गेला. अनेक भाविक त्यांच्या प्रवचनाला येत. प्रवचनातील ओजस्वी व प्रेमाने ओथंबलेल्या वाणीने सारे मंत्रमुग्ध होत. लांबच्या गावालाही बाबा प्रवचनासाठी जात. बाबांच्या शरीराला पुरेशी विश्रांती मिळेनासी झाली. साठीकडे झुकलेला देह आता तनाने क्षीण होत चालला. शरीराला विश्रांती नसल्याने आजारांनी हळुहळू डोके वर काढले. सतत जनसेवेत असल्याने त्यांनी आजारपणाकडे दुर्लक्ष केले. शरीर थकु लागले.
नवे वर्ष १९७८ उजाडले. मठावर माघ शुद्ध दशमीच्या सप्ताहाची लगबग सुरु होती. बाबांचा हा शेवटचा उत्सव असेल याचे जराही कल्पना भाविकांना आली नाही. मात्र बाबांनी हे जाणले होते. १७फेब्रु.१९७८ मघ शुद्ध दशमीचा दिवस. बाबा उत्साहाने कार्यक्रमात सहभागी झाले खरे पण त्यांना चालवतही नव्हते. तरी मठाच्या आवारात फिरुन येणार्या भाविकांची जातीने चौकशी करत होते. दशमीनिमित्त बाबांचे प्रवचन झाले. नंतर त्यांचे स्नेही ह भ प निमकर महाराज यांचे किर्तन झाले. महाप्रसाद झाला. सर्व भक्त पोटभर जेवले. सर्व समुदाय श्री बाबा डोळे भरुन पहात होते. सर्वांना प्रेमाने निरोप देत होते.

पाडव्याच्या दिवशी मोठा भक्तवर्ग जमा झाला. विश्वशांती व विश्वकल्याणाकरिता यज्ञ झाल्यावर श्री बाबांचे प्रवचन सुरु झाले. बाबा नेहमीपेक्षा वेगळं बोलत होते.या शेवटच्या प्रवचनातच त्यांनी निर्वाणाचे संकेत दिले.
जपमाळेतील मणी मोजावेत तसे दिवसांमागुन दिवस जाऊ लागले. श्री बाबांची प्रकृती खालावत गेली. खुपच त्रास होउ लागल्याने भक्तांनी त्यांना दवाखान्यात नेले. तपासणीत त्यांना आतडीचा कॅन्सर झाल्याचे निष्पन्न झाले. डॉक्टरांनी तातडीने ऑपरेशन केले. ऑपरेशन यशस्वी झाले तरी बाबांच्या तब्येतीला उतार पडेना. आवाज क्षीण झाला. पित्ताशयाच्या खड्यांचं दुसरं ऑपरेशनही झाले. विश्रांतीसाठी बाबा देवरामशेठ पटेल यांच्या घरी थोडे दिवस राहिले.
शुक्ल षष्ठीचा दिवस उजाडला. आज बाबांना थोडे प्रसन्न वाटत होते.
सारा जीवनपट त्यांच्या नजरेसमोरुन सरकत होता.
षष्ठीची रात्र सरली. सप्तमीची सकाळ उजाडली ती काळवंडलेली. सर्वत्र ढगाळलेले वातावरण. अंधुक प्रकाश मठावर पडलेला. बाबांच्या चेहर्यावर निर्विकारता. बाबांच्या विश्रांतिगृहात पुर्ण शांतता होती. घड्याळाचा काटा टक टक करीत होता. चारचे टोल पडले आणि इकडे बाबा लहान बालक जसे सहजगत्या झोपी जाते तसे झोपी गेले. ...ते कायमच्यासाठीच. मंगळवार ७नोव्हें. १९७८. वार्‍यासारखी बातमी सर्वत्र पसरली. भक्तांच्या झुंडीच्या झुंडी मठाच्या दिशेने येउ लागल्या. गुहे शेजारील जागेत श्री. बाबांना अग्नी देण्यात आला. .त्यांच्यानंतर भक्तांच्या मदतीने १९७८पासुन मठाच्या विकासाला गती देण्यासाठी सीतामाईंनी कष्ट घेतले. मठात अजुन ३ मंदिरं बांधली. देहु, आळंदी, पंढरपुर या ठिकाणी मठाच्या जागा आहेत. देहुमधे धर्मशाळा बांधली.
उन्हाळ्यात भुकूमसह मुळशीच्या परिसरात पाणीप्रश्न निर्माण होतो. आजुबाजुच्या गावात प्यायला पाणी मिळेनासे होते पण बाबांनी बांधलेल्या विहिरीचे पाणी वर्षभर पुरते.
सीतामाईंच्या निर्वाणानंतर आता मुळे काकांनी मठ अनेक वर्ष सांभाळला.
मठातील सर्व उत्सव, कार्यक्रम भक्तमंड्ळी थाटात करतात. सातारा येथील संत डॉ. सुहास पेठे यांचे साधकांचे शिबिर असो वा गोंदवलेकर महाराजांच्या मासिक आरतीचा कार्यक्रम. मठावर येणार्‍या साधु-संतांचे स्वागत भक्तमंड्ळी मोठ्या आपुलकीने करतात.
गेली ४ दशके अखंड नामस्मरण सप्ताहाने माघ शुद्ध दशमीचा उत्सव साजरा केला जातो. दशमी आधी ७ दिवस माघ शुद्ध तृतीयापासुन काकड्याने दशमीच्या उत्सवाचा मंगलमय प्रारंभ होतो संत तुकाराम गाथेचे, श्री बाबांच्या 'ओम हा गुरु' या ग्रंथाचे पारायण, हरिपाठ असे सकाळचे कार्यक्रम झाल्यावर संध्याकाळी बाबांच्या अभंगाचे भजन, प्रवचन व रात्री किर्तन असे दिवसभर कार्यक्रम होतात.

संत गणोरेबाबांचे विचार-आचार

विसरायला शिका
अंतरीचे प्रेम
समदृष्टी
जयजीवा नमस्कार
चिंतन गुरुचे
ध्यान पांडुरंगाचे
ज्ञान ओम चे
नाम विठ्ठलाचे

दोन व्यक्ती एकमेकांना भेटतांना 'राम राम', 'नमस्कार' किंवा 'जय हरी' म्हणुन संभाषणाला सुरुवात करतात. बाबा आपल्याकडे येणार्या भाविकाला 'जय जीवा' असे म्हणत. Happy

टीप: संपुर्ण लेख गणोरेमहाराजांच्या जीवनाचरित्रावरील 'प्रेमनिधी' या पुस्तकावरुन घेतला आहे.

शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आर्या ,सुंदर लेख .या संत भूमीतील एका रत्नाचा परिचय झाला.संत चरित्र मन पावन करणारे ,मनाचे मालिन्य घालवणारे असते .वाचून आनंद झाला .

धन्यवाद आर्या! मला संतांची चरित्रे नेहमीच आकर्षक वाटत आली आहेत. हेही त्यास अपवाद नाही. लेखाची शैली ओघवती आहे. त्यामुळे गणोरे महाराजांचा चरित्रपट जणू डोळ्यासमोर उभा राहतो.
आ.न.,
-गा.पै.

आर्या छान लिहिलं आहेस.
परिसराचे फोटोही टाकायला हवे होतेस.
Happy

धन्यवाद गामा, विप्र, झकोबा, आसा, सारीका, अश्विनी! Happy

<<मला संतांची चरित्रे नेहमीच आकर्षक वाटत आली आहेत<< अगदी अग्दी! मला तर आताशा तीर्थक्षेत्रांच्या बाजारुपणामुळे अशा संतांच्या समाधीस्थळांचे दर्शन घेण्याचा ध्यास लागला आहे. अशा ठिकाणची स्पंदनं म्हणा की गुढ शांतता मला नेहमीच आकर्षीत करते.

<< लेखाची शैली ओघवती आहे.<<
गामा...अपडेट केलं आहे. संपुर्ण लेख श्री गणोरेबाबांच्या जीवनचरित्रावर आधारीत 'प्रेमनिधी' या पुस्तकावरुन घेतलेला आहे. त्यामुळे ते सगळं श्रेय त्या पुस्तकाच्या लेखकालाच. Happy

खरं तर अगदी पुण्यातच पण अपरिचित असलेल्या या संताची ओळख सर्वांना व्हावी हा उद्देश होता.
अजुन नगजवळ पिंपळनेर येथे समाधीस्थ असलेले संत निळोबाराय, नाशिकजवळीत तळेगाव येथे समाधीस्थ असलेले भाऊमहाराज स्वर्गे यांच्याबद्दल पण लिहायचा विचार आहे.

आर्या,

>> पिंपळनेर येथे समाधीस्थ असलेले संत निळोबाराय, नाशिकजवळीत तळेगाव येथे समाधीस्थ असलेले
>> भाऊमहाराज स्वर्गे यांच्याबद्दल पण लिहायचा विचार आहे.

लिहाच म्हणतो मी! Happy

आ.न.,
-गा.पै.

अनन्त नामे,अनन्त शक्ति.
अनेक अवतार अनन्त किर्ति.
लक्ष्मि,जानकी,पार्वती, तुझ्या मुर्ती सर्व हि.
असे जगदम्बे चे वर्णन रेणुका स्तोत्रात आहे.
तसे संत लोकांचे आहे. त्यातलेच एक संत रत्न श्री संत गणोरे महाराज.
संत नामे अनेक देह अनेक परंतु कार्य एकच लोकांना स्वताच्या वागण्यातून परमेश्वराचे दर्शन घडवण्याचा आयुष्य भराचा खटाटोप स्वतः झिजून स्वतः मध्ये असणाऱ्या परमेश्वराचे दर्शन घेण्यास लावणे,भक्ती मार्गास लावणे व सामाजिक सलोखा निर्माण करणे याचे यातून पुनश्य दर्शन घडले धन्यवाद .
लेख छानच आहे .

निळोबा रायांचे चरित्र माहित आहे ,अभंगही वाचले आहेत.पण पिंपळनेर जाने झाले नाही ,तुमच्या लेखातून तरी हि भेट घडो. भाऊमहाराज स्वर्गे बद्दल अजून वाचनात आले नाही .कृपया लिहा.

खुप सुंदर , सहज हाती लागले आनि वाचले मि भागातला आहे पण बाबांचा जिवनपट तुमच्यामुळे कळला धन्यवाद