अंड्याचे फंडे २ - फर्स्ट क्लास

Submitted by अंड्या on 9 March, 2013 - 14:30

"अंड्याचे फंडे - २" कडे वळायच्या आधी "अंड्याचे फंडे -१" खाली दिलेल्या लिंकवर जाऊन क्लीअर करू शकता.

अंड्याचे फंडे १ - रायटर अंड्या - http://www.maayboli.com/node/41484

घाईत असाल तर तसे नाही केले तरी चालेल, कारण दोन्ही लेखांचा आपसात काडीचाही संबंध नाही.

ती लिंक देण्याचे प्रयोजन वाचकांची सोय नसून स्वताच्या लेखाची जाहिरात हे आहे.

....................................................................................................................................................

आपली मुंबई लोकल आणि भरगर्दीची वेळ. अंड्याने स्कूलबसच्या पलीकडे कधी लांबचा लोकल प्रवास केला नसल्याने अश्या गर्दीला नेहमी प्लॅटफॉर्मवरूनच रामराम करतो. तीन-चार ट्रेना सोडूनही लटकलेली माणसे दिसायची बंद काही होईनात हे पाहून सरळ उजव्या खिशातले तिकिट बाहेर काढून, चुरगाळून, डाव्या खिशात टाकले आणि फर्स्टक्लासचे तिकिट काढायला गेलो. पण बसायला इथेही मिळाले नाही राव. त्यातल्या त्यात कोणाशीही शारीरीक लगट प्रस्थापित न करता उभा होतो यातच काय ते समाधान. पुढचे चार-पाच स्टेशन तसेच डोक्यावरचे हलेडुले हॅंडल पकडून, ते पकडायचे सुख किती रुपयांना पडले याचाच हिशोब करत होतो. सवयीने आजूबाजूला निरीक्षण चालूच होते. एका वयात मुलींचे निरीक्षण करण्यात धन्यता मानायचा हा अंड्या, पण हल्ली मात्र एखाद्या नवीन जागी नेहमीपेक्षा काहीतरी वेगळे बघायला मिळेल आणि त्यावर आपल्यातर्फे थोडीशी शेव भुरभुरून एखादा हटके लेख पाडता येईल हेच विचार डोक्यात जास्त चालू असतात. म्हणून पलीकडच्या कंपार्टमेंट मध्ये दिसून राहिलेल्यां "त्या" त्यांना तिथेच राहू दिले आणि सभोवताली एक नजर फिरवली.

‘वड्डे लोक वड्डी वड्डी बाते’ या उक्तीला अनुसरून एक जण दारापाशी उभा राहून फोनवर स्टायलिश ईंग्लिश झाडत होता. तर त्याच्या जवळच आणखी दोघे आपसात त्याच टोन आणि त्याच भाषेत बोलत होते. एक नजर बसलेल्यांवर टाकली. एक महाविद्यालयीन युवकांचा ग्रूप ईंग्रजी भाषेतच हसत खिदळत होता तर इतर सहप्रवाश्यांपैकी बर्‍याच जणांचे निवांत वृत्तपत्र वाचन चालू होते. इथेही, झाडून सारेच न्यूज पेपर आंग्ल भाषेतील. काही जण ईंग्रजी शब्दकोड्यांमधील गुंतागुंत सोडवत होते तर काही ‘ईकॉनॉमिक टाईम्स’ हे एखादे कॉमिक वाचल्यासारखे एंजॉय करत पैश्यांची गुंतवणूक उलगडवत होते. काही रंगीले पेज थ्री मधील फोटो झरझर चाळत होते. पण अधूनमधून एखादी बातमी मन:पूर्वक वाचत आणि बरोबरच्याला ती दाखवत आपण निव्वळ फोटो बघत नसून आपल्याला ही ईंग्रजी वाचता येते हे सिद्ध करत होते. एकंदरीत वातावरणावरून अंड्याने अनुमान काढले की फर्स्टक्लासची ऑफिशिअल लॅंगवेज ही ईंग्लिशच असावी. हे पाहून एक बाजू पकडून काही न बोलता मुकाट उभा राहिलो. उगाच काही मराठीत बोलायचो आणि सारे जण कुठे हा सेकंडक्लासचे तिकिट काढून फर्स्टक्लासमध्ये तर नाही ना चढला अश्या नजरेने आपल्याकडे बघायचे. त्यापेक्षा नकोच ते. आधीच अंड्याचे ईंग्रजी दिव्य. "व्हॉट इज युअर बोली??" तर, "मायबोली इज मराठी.." - एवढेच काय ते जेमतेम. म्हणून एका बाजूला आणखी थोडे सरकून आपले निरीक्षणकाम चालू ठेवले.

काही जण त्या जेमतेम जागेतही मांडीवर छोटामोठासा लॅपटॉप उघडून बसले होते. त्यातील काही निव्वळ फेसबूकगिरी करत होते तर काही ऑफिसचे उरलेले(?) कामकाज आटोपत होते. दिवसभर कॉप्म्युटरच्या स्क्रीनवर डोळे खपवूनही काही लोकांची कामाची हौस कशी फिटत नाही हा खरा अंड्याला पडलेला प्रश्न. ज्यांना बसायला जागा मिळाली नव्हती ते उभ्या उभ्याच सहा ईंची स्क्रीनच्या मोबाईल मध्ये लागले होते. प्रत्येक जण आपापल्या स्क्रीनवर टिचक्या मारण्यात मग्न होता. जवळच्याच एका स्क्रीनवर मी डोकावलो तर काहीसा विडिओगेम चालू होता. स्क्रीनवर टिचक्या मारत मारतच एका राजकुमाराला पळवले जात होते. ना घोडा ना गाडी, राजकुमार जीव तोडून धावत सुटलाय. जणू काही पाठीमागे वाघ लागलाय की काय असा विचार मी करतच होतो इतक्यात खरेच एक भलामोठा गोरील्ला त्या राजकुमाराच्या मागे लागलेला दिसला. दोघांच्या आकारात इतका फरक की त्याचा एक पाय पडताच राजकुमाराचा चेंदामेंदा निश्चित होता. कधी एखाद्या अडथळ्यावरून उडी मारत, तर कधी एखाद्या पुलाच्या खालून सरपटत, राजकुमार त्याला चकमा देत पळत होता. प्रत्येक वेळी तो गोरील्ला जवळ येतोय हे बघितले की माझ्या हृदयाची धडधड वाढायची. मात्र आता खेळ खल्लास असे वाटू लागताच ऐनवेळी राजकुमार निसटण्यात यशस्वी व्हायचा. पण असे किती वेळ चालणार होते. तो गेम आहे हे विसरून मला खरोखरच त्या राजकुमाराची चिंता वाटू लागली. एका क्षणाला, नाही, आता तर नाहीच वाचत, असे वाटले आणि दुसर्‍याच क्षणी समोरच्या कड्यावरून राजकुमाराने झेप घेतली ती थेट खोल दरीत. "गेम ओवर" ची पाटी स्क्रीनवर झळकायच्या आधीच त्या मुलाने ईंग्रजी आद्याक्षर "एफ" वरून आपली निराशा व्यक्त केली. हा राग स्वतावर होता की त्या गोरील्लावर हे समजले नाही, पण मी मात्र जे एवढा वेळ ‘ना घेणे न देणे’ त्या गेममध्ये गुंतलो होतो त्यातून बाहेर आलो.

एव्हाना अंधेरी आली होती. माझ्या डोळ्यासमोर नाही तर अंधेरी स्टेशन आले होते. गर्दी बर्‍यापैकी ओसरली. पुढे त्याने आणखी एक गेम खेळावा असे राहून राहून वाटत होते, पण तो माझ्या विचारांना धुडकाऊन लावत म्युजिक प्लेअर उघडून गाणी धुंडाळायला लागला. आता तो कानात स्पीकर लाऊन कोणते गाणे ऐकतोय हे ना मला समजत होते ना जाणून घेण्यात रस होता. संगीताच्या तालावर हलणार्‍या त्याच्या टाळक्याला टाटा बाय बाय करत मी रिकाम्या झालेल्या एका सीटवर स्थानापन्न झालो.

माझ्या भोवताली कॉलेजच्या विद्यार्थ्यांचा एक ग्रूप बसला होता. कधी एके काळी मी असे मुलामुलींचे एकत्र टोळके दिसले की निरीक्षणाने त्यांच्यातील जोड्या ओळखायचा प्रयत्न करायचो. या मागे एक सुप्त हेतू देखील असा असायचा, तो म्हणजे जी मुलगी सिंगल दिसेल तिच्यावर जास्त लक्ष केंद्रीत करा. पण हल्ली मुलामुलींचे आपसातील वागणे बोलणे एवढे खुले झाले आहे की काही अंदाजच येत नाही. मग कधीकधी उगाचच आपण सात-आठ वर्षे लवकर जन्म घेतल्याचे वाईट तेवढे वाटते.

त्या तिथे पुरुषांच्या डब्यात त्यांच्यासमोर हा अंड्याच संकोचून बसला होता. नजर लाजून इथे तिथे भिरभिरत, पण कान मात्र त्यांच्या गप्पांकडे टवकारलेले. प्रथम भाषा अर्थातच ईंग्रजी, पण तिच्या अधेमधे हिंदी शब्दप्रयोग चपलखपणे पेरले जात होते. फर्स्टक्लासची सेकंड लॅंगवेज हिंदी असते हा निष्कर्ष देखील मी लागलीच काढून टाकला. बोलण्याच्या विषयांवरून ईंजिनीअरींग कॉलजची मुले वाटत होती. आतल्या शाखा अंड्याला काही समजत नाहीत. पण जीआरई, कॅट अश्या परीक्षांची नावे घेत उच्च शिक्षणासाठी परदेशी शिकायला जायचा बेत आखला जात होता. माझ्या मावशीचा मुलगाही अशीच एखादी परीक्षा देऊन जर्मनीला गेला होता म्हणून मला ही नावे ऐकून माहीत. मात्र त्याच्यावेळी कुठले शिक्षण घ्यायला कुठल्या युनिवर्सिटीत जात आहे यापेक्षा कुठल्या देशात जात आहे आणि खर्च किती येणार याचीच चर्चा जोरदार व्हायची. या माझ्या समोर बसलेल्या मुलांना मात्र परदेशाचे तितकेसे अप्रूप वाटत नव्हते. जवळपास सार्‍यांचेच उड्डाण निश्चित झाले असावे. शहरातील लोकसंख्या वाढली तरी फर्स्टक्लासमधील गर्दी का वाढत नाही याचा उलगडा मला तेव्हा झाला.

थोड्यावेळाने त्यांचे खाण्याचे डब्बे उघडले गेले. ब्रेडबटर, पोटॅटो चिप्स अन फ्रूट सलाड असले हलकेफुलके आहार बाहेर निघाले. त्यातील दोन मुलींनी आज आमचा फास्ट आहे असे कारण देत आम्ही फक्त सफरचंदाचे दोनचार तुकडे खाणार असे घोषित केले. "जर तुमचा फास्ट आहे तर तुम्ही स्लो ट्रेनमध्ये काय करत आहात?" असा एक छानसा पीजे अंड्याच्या मनात आला. पण श्या, बरोबरचे ओळखीचे नसल्याने तो मारता आला नाही याचेच किंचित वैषम्य वाटले. बाकी उपवास नसताना ही यापेक्षा फारसे काही त्या खात असाव्यात असे त्यांच्या शरीरयष्टीकडे पाहून वाटत नव्हते. खाण्याआधी त्यांनी कसलेसे हॅंड सॅनिटायजर काढून हाताला चोळले. याने हाताला लागलेले विषाणू मरतात म्हणे. पण त्यांची डेडबॉडी हातावरच राहते त्याचे काय. उपवासाच्या दिवशी हा असा मांसाहार नको म्हणून हा अंड्या त्यांना अडवणार इतक्यात त्यांनी सपासप दोन फोडी तोंडात टाकून, डबा बंद होउन, पुन्हा बॅगेतही गेला होता.

पुढच्या दोनतीन स्टेशनांवर एकेक करत बरेच जण उतरले. आता त्या ग्रूपमध्ये फक्त दोघेच उरले होते. मुली निघून गेल्याने माझाही आता त्या दोघांच्या गप्पा ऐकण्यातील रस निघून गेला होता. पण काय आश्चर्य, त्यांनी तोंड उघडले आणि चमत्कारच झाला. दोघे ही अस्खलित मराठीत बोलत होते. थोड्यावेळापूर्वी हेच दोघे फुल्ल ऑफ अ‍ॅक्सेंट ईंग्लिश झाडत होते यावर विश्वास बसणे कठीण व्हावे इतके शुद्ध मराठी. अंड्याला एकदम त्यांच्या मराठी असण्याचा अभिमान वाटू लागला. त्यांच्याकडे मी अंमळ कौतुकानेच बघू लागलो. त्यांनाही हे समजले असावे. थोडेसे हसले ते माझ्याकडे बघून. तसेही मागे कोणी तरी मला म्हणाले होतेच, ‘अंड्या तू तर चेहर्‍यावरूनच मराठी वाटतोस बे..’ याची सहज आठवण झाली.

दोघांतच काय गप्पा मारणार असा विचार करत त्यांनी आपापली हत्यारे, म्हणजेच आपापले स्मार्टफोन बाहेर काढले. एक मुलगा माझ्या बाजूला बसला होता तर एक समोर. समोरच्याच्या चष्म्यामध्ये मला त्याच्या मोबाईलची भलीमोठी स्क्रीन दिसत होती. काही ओळखीचे रंग चकाकले म्हणून पाहतो तर मगासचाच राजकुमार आणि गोरील्या माकडाचा जीवघेणा खेळ. आता परत नको त्यात गुंतायला म्हणून शेजारच्या मुलाच्या फोनवर नजर टाकली तर अरे देवा, तिथेही तेच सुरू. फरक इतकाच की इथे गोरील्याच्या जागी काही मोठाले कावळे त्या राजकुमाराच्या पाठी लागले होते. पुन्हा तो राजकुमार तसाच जीव तोडून धावत होता. नदीनाले, डोंगरदर्‍या पार करत त्या राक्षसी कावळ्यांपासून आपला जीव वाचवत. पण पुन्हा एकदा त्याच मनहूस कड्याच्या टोकावर येऊन घाईघाईत पलीकडे झेप घेणे न जमल्याने राजकुमार पुन्हा एकदा गतप्राण, पुन्हा एकदा गेम ओवर. पण या मुलाने मात्र कोणताही अपशब्द न वापरता पुन्हा नवीन गेम सुरु केला. मराठी संस्कार. मन पुन्हा भरून आले. पुन्हा अंमळ कौतुक वाटले.

पुढचे तीन चार डाव फिरून फिरून तेच होत होते. त्या कड्याच्या कडेला येईपर्यंत कावळे अगदी जवळ आल्याने घाईघाईत मारलेली उडी फसणे आणि राजकुमाराचा गेम ओवर. मला आता त्या पुढे काय गेम आहे, कसा रस्ता आहे, काय घडत असेल याची फार उत्सुकता लागून राहिली होती. समोरच्या मुलाने हार मानून गेमच बदलला होता. मात्र त्याच्या राजकुमाराच्या मागे निदान गोरील्ला तरी लागला होता, पण माझ्या शेजारच्याचा राजकुमार कावळ्यांना कशाला घाबरत आहे हे काही अंड्याला समजत नव्हते.

पाचव्यांदा जेव्हा तो त्या कड्यापाशी येऊन पुन्हा तसाच खाली दरीत कोसळला तेव्हा मी न राहवून त्याला म्हणालो,
"अरे मार ना त्यांना मागे पलटून..."

समोरचा मुलगा देखील माझ्याकडे आश्चर्याने बघायला लागला.

बाजूचा गोंधळून जाऊन म्हणाला,
"ऐसे नही मार सकते यार.."

"फिर..??"

"........."

"....."

त्या क्षणाला आम्हा दोघांच्या नजरेत एकच भाव होते. तो माझी कीव करत होता आणि मी त्याची...

- अंड्या उर्फ आनंद

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

'तिकडचा' फटू तुझाच असेल आंद्या, तर तर गोड दिसतोस इतकेच म्हणेन.

हा लेख अजिब्बात वाचला नाही.

अंड्याचे फंडे१ लिहिलं तेव्हा म्हटलास 'सिरइयल; करणार नाहीये.

पण केली.

म्हणून तुला टुकटुक. अन नो रिप्लाय, नो वाचन.

काय राव, वाचू नका हवे तर पण "लै भारी लिव्हलय अंड्या, मस्तच, जबरस्दतच" असा काही बाही रिप्लाय तर द्यायचा. पाठचे लोक प्रतिसाद बघून ठरवतात वाचायचे की नाही ते.
आधीच एकतर "अंड्याचे फंडे" नाव वाचून शाकाहारी लोकांची मिसअंडरस्टँडींग होऊनशान ते इथे फिरकत ही नसतील.

आणि कंचा फोटू? प्रोफाईलवर लावलेला का?
सचिनचा आहे तो..... (काय पण अंड्याचा प्रामाणिकपणा)

अंड्या सुदिक तसाच दिसतो म्हणूनशान लावला आहे ती गोष्ट वेगळी..;)

चला टाटा बाय बाय गोड गोड नाईट.. Happy

अवांतर - खरेच वाचून बघा हो, सिरीअल विरीअल काही नाहीये. शेपरेट आहे विषय टोटली. मुन्नाभाई स्टाईल..!!!

Wink
अंडोबा, वाचला, अन छानेय म्हणून प्रतिसाद लिवला. लिवत जा. थोडी गेंड्याची कातडी ई-मेल करतो तुला. किमाण लंगोट शिवता यील. चल. झोपतो आता.

इब्लिसराव,
ते गेंड्याची कातडी, लंगोट काही झेपले नाही, मेल ही चेक केला काही पोचले नाही. Sad

सोनूताई,
अग ते टेंपल रन खेळाचे नाव मला काल समजले, आणि मुळात हे लिहायची प्रेरणाच तो खेळ होता, त्यामुळे त्याचा उल्लेख जास्त होणारच. Happy

शहरातील लोकसंख्या वाढली तरी फर्स्टक्लासमधील गर्दी का वाढत नाही याचा उलगडा मला तेव्हा झाला. >>> हे एक लईच भारी !

अंड्या तुझे फंडे अगदी मनापासून वाचतीये , लिहित रहा Happy छान , निर्मळ, मनमोकळ लिहितोस. खूप प्रामाणिक.
इथे सिंगापूरात लोक त्या मोबाईल अन लॅपटॉपच्या जगातून बाहेर बघायला तयारच नाही राव. भारत तसाच होतोय हे ऐकुन, तुझ्या लेखातुन वाचुन प्रचंड वाईट वाटले.

मग कधीकधी उगाचच आपण सात-आठ वर्षे लवकर जन्म घेतल्याचे वाईट तेवढे वाटते.>>>>>>> अंड फुटल शेवटी Biggrin
.
.
चांगल लिहिले आहे..

छान !

सिस्टर प्रिन्सेस,
माझ्या लेखावरून काही ठरवून वाईट वाटून घेऊ नकोस.
पण तसे खोटे नाही तर दिसतेय तेच लिहिलेय, ते चांगले की वाईट असा मांडायचा प्रयत्न किंवा अट्टाहास नाही. तसे वाटले तरी ते अंड्याचे वैयक्तिक मत समजावे.. Happy

अरे अंड्या हे तु नाही रे............. तु असता तर तुझ्या हातात आयफोन असता आणि तु सुध्दा तो गेम खेळत असतास Happy

उदयन, नक्कीच तो मी नाही, पण भविष्यात येणारा ज्युनिअर अंड्या असाच असण्याचे फुल्ल चान्सेस आहेत... मी सध्या स्वताला त्या कोंबड्याच्या जागीच बघतोय.. Wink

मग कधीकधी उगाचच आपण सात-आठ वर्षे लवकर जन्म घेतल्याचे वाईट तेवढे वाटते.
>>>> प्रचंड अनुमोदन Proud

काही काही पंचेस भारी!